Monday, July 27, 2020

द इमिटेशन गेम : एका ध्येयवेड्या गणितज्ज्ञाची कथा

संगणकाचा जनक कोण? याचं उत्तर अर्थात चार्ल्स बाबेज हे नाव जवळपास सर्वांनाच माहीत असतं. परंतु, आधुनिक संगणकाचा जनक कोण? याचे उत्तर मात्र खूप कमी लोकांना माहीत आहे. अगदी संगणक अभियंते व तंत्रज्ञ यांनाही हे नाव कदाचित माहीत नसावं.
आधुनिक संगणकाचा जनक आहे ॲलन ट्युरिंग!
सन १९५० नंतर संगणकाची पिढी हळुहळु डिजिटल व्हायला लागली होती. डिजिटल कम्प्युटरच युग सुरुवातीच्या काळामध्ये होतं. या काळानंतर संगणक क्षेत्रात सर्वात महत्त्वाचं योगदान देणारे तीन शास्त्रज्ञ म्हणजे ॲलन ट्युरिंग, जॉन व्हॉन न्यूमन आणि डेनिस रिची होय. या तिघांशिवाय आधुनिक संगणक बनू शकला नसता, असं मला वाटतं. त्यापैकी ट्युरिंग हा सर्वाधिक विशेष असा गणितज्ञ होता. सन १९४० च्या सुमारास दुसरे महायुद्ध जर्मनीने जगावर लादलं होतं. तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीने हे महायुद्ध खूप महत्त्वाचं मानलं गेलं पाहिजे. कारण याच महायुद्धामुळे तंत्रज्ञानाचा विशेष करून डिजिटल इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर व विकास अतिशय वेगाने होऊ लागला. यात काळामध्ये ॲलन ट्युरिंग हा इंग्लंडमध्ये गणितज्ञ म्हणून नावारूपास येत होता. त्याची कहाणी सन २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इमिटेशन गेम' या चित्रपटात चित्रित करण्यात आलेली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर ट्युरिंगचे तंत्रज्ञानाला व विशेषतः संगणक तंत्रज्ञानाला असलेले योगदान किती महत्वपूर्ण आहे, याची प्रचीती येते. शिवाय त्यांनी केलेली धडपड व समर्पण हेही आपल्या समोर प्रकर्षाने येतं. अँड्रयू ह्युजेस यांनी १९८३ मध्ये लिहिलेल्या 'ऍलन ट्युरिंग: द एनिग्मा' या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे.


१९३० च्या दशकातला ॲलन ट्युरिंग हा नावाजलेला गणितज्ञ होता. त्यामुळे केंब्रिज विद्यापीठात एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी वयाच्या केवळ सत्ताविसाव्या वर्षी त्याला संधी मिळाली. आपल्याला माहीतच आहे की, याच कालावधीमध्ये हिटलरच्या जर्मनीने जगावर दुसरे महायुद्ध लादलं होतं. जर्मनी सर्वच क्षेत्रात आघाडीवर होती. युरोपमध्ये जवळपास सर्वच देश पादाक्रांत करण्याची हिटलरची मनीषा होती. या युद्धात भयंकर नरसंहारही झाला होता. जर्मन सैन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर आघाडी घेत होतं. त्यांचे एन्कोडेड संदेश हे पाठवले जायचे. यातली बरेचशे संदेश इंग्लंड व अन्य मित्र राष्ट्रांना मिळत होते. परंतु त्याचे अर्थ त्यांना उमगत नसत. एक गणिती प्रक्रिया सोडवण्यासाठी सत्तावीस वर्षे लागतील इतकी ती किचकट होती. त्यामुळे जर्मनांनी पूर्ण युरोप समोर मोठे आव्हान निर्माण केले होते. जर्मन संदेश मिळवण्यासाठी इंग्लंडकडे एनिग्मा नावाचे मशीन होते. परंतु त्यातून संदेशांची डिकोडिंग होत नव्हती. ती साध्य करण्यासाठी इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञ व गणित तज्ञांचा एक चमू कार्यरत होता. त्यात ॲलन ट्युरिंगला बोलावणे आले. तसं पाहिलं तर ट्युरिंग हा जरा विक्षिप्त होता. आल्या आल्या त्याने थेट पंतप्रधान चर्चिल यांनाच पत्र पाठवून संशोधनाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली व त्यांच्या टीम मधून दोघांना वगळून टाकले. त्याचे ध्येय निराळे होते. तो कोणत्याही प्रकारचे जर्मन संदेश तात्काळ डिकोडिंग करू शकेल, अशा यंत्राच्या शोधात होता. त्यासाठी तंत्रज्ञ गोळा करण्याकरिता बरीच मेहनत घेतली व आपल्या गणिती मेंदूचा वापर करून एक अतिशय किचकट यंत्र तयार केले. त्याला तो "ख्रिस्तोफर" म्हणत असे. क्रिस्तोफर हे त्याच्या बालपणीच्या दिवंगत मित्राचे नाव होते. या मशीनची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याने दिवस-रात्र मेहनत केली. जवळपास दोन वर्ष या प्रकल्पावर काम चालू होते. एकीकडे महायुद्ध जर्मनी जिंकणार अशी परिस्थिती बनत चालली होती. परंतु जर्मन संदेशांचे डिकोडिंग मात्र काही होत नव्हते. त्यामुळे इंग्लंड सरकारने विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांच्या चमूला अखेरचा एक महिना दिला. तो एक महिना ऍलन ट्युरिंग व त्याच्या साथीदारांनी सार्थकी लावला. एक महादिव्य असे मशीन त्यांनी तयार केले. आता जर्मन संदेश त्यांना सहजपणे डिकोडिंग करता येऊ लागले. यामागची त्यांची मेहनत, कष्ट व समर्पण हे वाखाणण्याजोगे होते. डिजिटल कम्प्युटरला तयार करणारे हेच ते इंजिन होय ज्याला 'ट्युरिंग मशीन' असे म्हटले जाते. आधुनिक डिजिटल संगणकाचा पाया या नव्या तंत्रज्ञानाने भरला गेला होता. या मशीनचा वापर इंग्लंडने जर्मन संदेश डिकोर्डिंग साठी तर केला. परंतु त्यांनी सर्वच संदेश वाचून त्यावर कृती केली नाही. त्यामुळे जर्मनांना इंग्लिश लोक आपला संदेश वाचत आहेत, हे समजूनच आले नाही. या मशीनमुळे दुसरे महायुद्ध दोन वर्ष आधीच संपले. आणि त्यामुळे १.४ कोटी लोकांचा जीव वाचला. इतिहासामध्ये ट्युरिंगचे इतके भरीव योगदान आहे. त्या काळामध्ये इंग्लंडला कदाचित ते समजले नसावे. कारण समलैंगिकतेच्या गुन्ह्याखाली त्याला शिक्षा झाली होती. त्याला दोन वर्षे जेल किंवा हर्मोनिक थेरपी यापैकी एक निवडायचे होते. संशोधनावर कार्य चालू राहावे म्हणून त्याने थेरपीची निवड केली व टुरिंग नावाने आणखी काही शोध जगासमोर आणले. त्याचा शेवट मात्र आत्महत्येने झाला. वयाच्या ४१ व्या वर्षी ट्युरिंगने सायनाईड घेऊन आत्महत्या केली. १९५४ अंतर २०१३ पर्यंत समलैंगिकतेचा कायदा इंग्लंडमध्ये लागू होता. परंतु २०१३ मध्ये इंग्लंडच्या राणीने अधिकृतरित्या ट्युरिंगची माफी मागितली होती. अर्थात त्यामुळे त्याचे योगदान इंग्लंडला मान्य करता आले.
ट्युरिंगने तयार केलेल्या ट्युरिंग मशीनच्या या बळावरच आजचा आधुनिक संगणक उभा आहे. ॲलन ट्युरिंग जर नसता तर कदाचित डिजिटल संगणक अजूनही मागच्याच पिढीमध्ये असला असता. त्याच्या या योगदानाला स्मरून एसीएम अर्थात असोसिएशन ऑफ कॉम्प्युटिंग मशिनरीने  संगणक शास्त्राचे नोबेल म्हणून ट्युरिंग अवार्ड देण्याची सुरुवात केली. आतापर्यंत अनेक महान संगणक तज्ञांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
"इमिटेशन गेम" या चित्रपटातून ट्युरिंगचे चरित्र जगासमोर आले. एकंदरीतच संगणकावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी हा चित्रपट निश्चित बघण्यासारखा आहे. काही धडपड्या व ध्येयवेड्या लोकांमुळेच आजचं तंत्रज्ञान उभं आहे. त्यातलाच एक ॲलन ट्युरिंग...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com