Showing posts with label bowlers. Show all posts
Showing posts with label bowlers. Show all posts

Saturday, November 11, 2023

तेंडुलकर वि. इतर

हे आहेत आंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमध्ये नावाजलेले सर्वोत्तम गोलंदाज. सरासरी आणि त्यांनी घेतलेले बळी यानुसार त्यांची क्रमवारी लावलेली आहे. 

यामध्ये जगातील सर्वात वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, तसेच शेन वॉर्न, अनिल कुंबळे यांच्या बरोबरीचा पाकिस्तानी लेगस्पिनर मुश्ताक अहमद, दक्षिण आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज ऍलन डोनाल्ड, वेस्ट इंडिजचे फलंदाजाला धडकी भलवणारे कोर्टनी वॉल्श आणि कर्टली अँम्ब्रोस, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज शेन बॉण्ड आणि सर्वोत्तम फिरकीपटू डॅनियल व्हेटोरी यांची नावे नाहीत.
सांगायचं इतकंच की जगातील या सर्वोत्तम प्रत्येक गोलंदाजाचा सामना करून सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा विक्रम रचलेला आहे! आजचे सर्वोत्तम गोलंदाज कोणते? असा प्रश्न विचारला तर विचार करायलाच बराच वेळ जाऊ शकतो. आणि जे कोणी आहेत ते भारताच्या ताफ्यात दिसून येतात. त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची इतर कोणत्याही फलंदाजांशी कधीच बरोबरी होऊ शकत नाही. कारण एकदिवशीय क्रिकेट आता गोलंदाजांच्या वर्चस्वाकडून फलंदाजांच्या वर्चस्वाकडे झुकलेले आहे. खेळपट्टीवर आग ओकणाऱ्या गोलंदाजांचा सामना करत विश्वविक्रम रचने हे निश्चितच अविश्वासनीय कार्य होते, यात शंकाच नाही. सचिन तेंडुलकरच्या अद्वितीय विक्रमांना मनापासून सलाम!

- तुषार भ. कुटे.

Saturday, March 5, 2022

एक सर्वकालीन महान लेगस्पिनर

नव्वदच्या दशकामध्ये आम्हाला #क्रिकेट सामने पाहण्यासाठी टीव्ही समोर बसायला लावणारे अनेक दिग्गज होते. भारतीय खेळाडू प्रमाणेच अन्य देशातील अनेक खेळाडूंची नावे देखील यात घेता येतील. यातीलच एक खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न होय. कालच हृदयविकाराने शेन वॉर्न यांची प्राणज्योत मालवली आणि एका महान फिरकी गोलंदाजांचा शेवट झाला. 


क्रिकेट कळायला लागल्यापासून मला शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सातत्याने दिसून आला. त्या काळातील भारताचा अनिल कुंबळे, पाकिस्तानचा मुश्ताक अहमद आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न हे तीन सर्वोत्तम लेगस्पिनर म्हणून ओळखले जात असत. त्यातल्या त्यात शेन वॉर्नची खासियत अशी की तो हातभर देखील चेंडू वळवू शकायचा! एकवेळ ऑफस्पिनर होणे सोपे आहे पण #लेगस्पिनर मात्र कठीण होते. आजही त्या दर्जाचे लेग स्पिनर दिसून येत नाहीत. म्हणूनच शेन वॉर्नच्या फिरकी कौशल्य विषयी मला विशेष आदर वाटतो. सचिन #तेंडुलकर आणि शेन वॉर्न सारख्या जगविख्यात फलंदाज व गोलंदाजांची #जुगलबंदी लाइव्ह बघायला मिळाली, हे आमच्या पिढीचे भाग्य होते. शेन वॉर्नचे सर्वकालीन फिरकी घेणारे चेंडू घेऊन पाहिले की, आजचे गोलंदाज निश्चितच आश्चर्याने तोंडात बोटे घालतील. एका अर्थाने तो फिरकीचा जादूगार म्हणावा, असा होता.
इंग्लंड आणि #ऑस्ट्रेलिया मध्ये ऍशेस मालिका खेळवली जाते. विशेष म्हणजे या सर्व टेस्ट मॅचेस असतात. या मॅचेसमध्ये केली मी शेन वॉर्नची गोलंदाजी बराच वेळा पाहिलेली आहे. एखाद्या खेळाडू बद्दल आदर वाटावा असाच तो होता. ऑस्ट्रेलियाला कोणीही संघ हरवू शकत नाही, असं त्या काळात वाटायचं आणि या संघाच्या गोलंदाजीचा कणा शेन वॉर्न होता! सलग #विश्‍वचषक जिंकलेल्या संघाचा तो भाग होता. यावरूनच त्याची तत्कालीन महती आपल्याला समजू शकेल. आयपीएल सामने सुरू झाले त्यावेळेस राजस्थान रॉयल्स या सर्वात सर्वात दुबळ्या संघाचा तो कर्णधार होता. तरी देखील सर्वात पहिली #आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे भाग्य त्याला लाभले. खरं तर याला भाग्य म्हणता येणार नाही. शेन वॉर्नचे कसबच इतके उत्तम होते की, त्याचा फायदा तुलनेने दुबळा असणाऱ्या राजस्थानच्या संघाने करून घेतला. इतर सर्व संघांचे कर्णधार भारतीय असले तरी कोण जाणे, मला #राजस्थान रॉयल संघाबद्दल विशेष आपुलकी वाटायची. कदाचित शेन वॉर्न यासाठी कारणीभूत असेल.
क्रिकेट पाहण्याचा व अनुभवण्याचा आनंद या महान गोलंदाजाने आम्हाला दिला, याबद्दल आम्ही त्याचे सदैव ऋणी असू.

© तुषार भ. कुटे

Monday, September 28, 2020

वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोणता? या प्रश्नाचे उत्तर जवळपास सर्वांनाच माहित आहे. परंतु, युट्युबवर जाऊन 175 एमपीएच या नावाने एकदा सर्च करून बघा. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मतिषा पथिराना याने मागील वर्षी कुमार विश्वचषकामध्ये भारताविरुद्ध 175 किलोमीटर प्रतितास वेगाचा चेंडूत टाकल्याचे व्हिडिओ तुम्हाला आढळून येतील. परंतु प्रत्यक्षात असे आहे का?
175 हा क्रिकेटमधला अविश्वसनीय वेग मानला जाईल. प्रत्यक्ष हा चेंडू पाहिला तर लक्षात येते की, काहीतरी गडबड आहे. खरं तर गडबड होतीच! त्यावेळी आयसीसीची स्पीडगन व्यवस्थित चालत नव्हती. त्यामुळे तिने 175 चा वेग दाखवला. अशी परिस्थिती सुमारे वीस वर्षापूर्वीही झाली होती. ज्यात पाकिस्तानच्या मोहम्मद सामी या गोलंदाजाचा वेग 163 इतका दाखवण्यात आला होता. याचेही व्हिडिओ युट्युबवर पाहता येतील. मोहम्मद सामीचा चेंडू सौरभ गांगुलीने सीमापार धाडला होता. तसा तो वेगवान होता. परंतु, 163 चा वेग गाठू शकेल, असे दिसत नाही. आयसीसीची स्पीडगन यापूर्वी बरेचदा अशीच बिघडलेली आहे. तरीही सर्वात वेगवान गोलंदाज कोणते? याचा खराखुरा आढावा आपण घेऊयात. मागच्या पंधरा वर्षांमध्ये शंभर मैलांचा अर्थात 160 किलोमीटर प्रतितास या वेगाचा पल्ला केवळ एकदाच एका गोलंदाजाने गाठलेला आहे. त्यापूर्वीची दहा वर्ष मात्र वेगवान गोलंदाजांनी क्रिकेट विश्वावर राज्य केले होते. त्यात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानी गोलंदाजांचा समावेश होता. वेगवान गोलंदाजांचे वेग हेच सर्वात मोठे अस्त्र होते. त्याचा वापरही उत्तमरित्या मैदानावर केला गेला. परंतू, आजची परिस्थिती पाहिली तर ध्यानात येते की, गोलंदाजांना 150 चा वेगही मोठ्या मेहनतीने पार करता येतो. 


शोएब अख्तर आजवरचा सर्वात वेगवान गोलंदाज. या पाकिस्तानी गोलंदाजाने सन 2003 च्या विश्वचषकामध्ये इंग्लंड विरुद्ध 161.3 kmph चा वेग गाठला होता. हाच  आजवरचा सर्वात वेगवान चेंडू होय. इतर वेळेसही शोएब अख्तरचे बहुतांश चेंडू 150 च्यावर वेग गाठत असत. ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली हा दुसरा वेगवान गोलंदाज होय. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना त्याने 161.1 चा वेग सन 2003 मध्येच गाठला होता. ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट या गोलंदाजानेही 161 चा वेग इंग्लंड विरुद्ध पार केलेला आहे. चौथ्या क्रमांकावरील जेफ थॉमसन याचा विक्रम सुमारे पंचवीस वर्ष अबाधित होता. वेस्ट इंडिज विरुद्ध 1975 मध्ये खेळताना त्याने 160.6 चा वेग गाठला होता. पाचव्या क्रमांकावरही ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा गोलंदाज येतो. 160 च्यावर गोलंदाजी केलेला तो पाचवा गोलंदाज होता. या पाच जणांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणीही आजवर 160 किलोमीटर प्रतितास किंवा 100 मैल प्रतितास टप्पा पार केलेला नाही!