चार्ली चॅप्लिन म्हणजे एकेकाळचा हॉलीवूडचा अनभिषिक्त बादशहा होय! शंभर वर्षांपूर्वी त्याने अमेरिकेतल्या मूकपटांवर राज्य केलं. त्याच्याच काळात चित्रपटांचा प्रवास मूकपटाकडून बोलपटांकडे झाला. अचाट, अफाट, अकल्पनीय आणि अलौकिक अशी अनेक विशेषणे चार्ली चॅप्लिनच्या या एकंदरीत जीवन प्रवासाला लावता येतात. त्याची कथा म्हणजे एका अतिसामान्य व अठरा विश्वे दारिद्र्य भोगणार्या, टक्केटोणपे खाल्लेल्या परंतु नैसर्गिक कलागुणांच्या, बुद्धिमत्तेच्या व निरीक्षणशक्तीच्या जोरावर चित्रपटसृष्टीचा बादशहा होण्याची कथा होय.
चार्ली चॅप्लिन हे नाव माहीत नसणारा व्यक्ती म्हणजे विरळाच. आज शंभर वर्षांनी देखील कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे चार्लीवर अतोनात प्रेम आहे. त्याच्या काळात हॉलिवूड सृष्टी बहरली. चित्रपटांकडे लोक आकर्षिले गेले. चित्रपटांचे मायाजाल तयार झाले, हेही त्याच्याच कारकिर्दीतच. लहानपणी दारिद्र्याचे चटके खाणारा हा अवलिया सर्वोत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शक होतो, ही कथाच अकल्पनीय आहे. शिवाय सर्व अर्थाने ती सामान्य माणसासाठी प्रेरणादायी देखील आहे. लोकांचे मनोरंजन करणे, हे सोपे काम निश्चितच नाही. ज्या काळात नाटकांचा जमाना होता, त्याने लोकांना चित्रपटाकडे वळवले. शिवाय एका परक्या देशामध्ये अमाप प्रसिद्धी त्याला मिळाली. जीवनात त्याने अनेक चढ-उतार बघितले. त्याच्या जीवनात अनेक स्त्रिया प्रवेशकर्त्या झाल्या. त्यातील काही त्याच्या जीवनसाथी देखील बनल्या होत्या. हॉलिवूडच्या आजच्या संस्कृतीची पाळेमुळे कदाचित त्याच काळात रोवली गेली होती, असे म्हणता येईल. चार्लीने मात्र या सर्व प्रवासात अनेक दशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्याने चित्रपटांमधील निरनिराळे प्रयोग करून प्रेक्षकांचे अफाट मनोरंजन केले. त्यामुळेच तो आज प्रत्येकाला माहित आहे. या क्षेत्रातला ध्रुवतारा म्हणून त्याची ओळख आहे. त्याला जेव्हा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी सर्व प्रेक्षकवृंदाने उभे राहून सलग बारा मिनिटे टाळ्या वाजवल्या होत्या! हेच त्याच्या कारकिर्दीतले सर्वात मोठे यश होय. अशी मानवंदना अन्य कोणत्याही कलाकाराला आजवर मिळालेली नाही. अमेरिकेतल्या त्याच्या अखेरच्या कालखंडामध्ये कम्युनिस्ट म्हणून शिक्का बसल्याने त्याला मायदेशी परतावे लागले. परंतु त्याच्या कर्तृत्वाने आजही त्याची कर्मभूमी त्याची सातत्याने आठवण काढीत असते. असा अमाप यश मिळवणारा व अलौकिक कार्यसिद्धि साधणारा माणूस यापूर्वी कधी झाला, न पुन्हा होईल!
आज त्याच्या जयंतीनिमित्त या अवलियाला विनम्र अभिवादन!
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com