गो. नी. दांडेकर म्हटलं की, साहित्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेल्या दुर्गांचे दर्शन होतं. गोनीदांचे साहित्य म्हणजे याच सह्याद्रीच्या रांगड्या परिसरात रमलेलं मराठी ग्रामीण साहित्य आहे. 'माचीवरला बुधा' या कादंबरीमध्ये पहिल्यांदा ते अनुभवायला मिळालं. त्यांचीच 'पवनाकाठचा धोंडी' ही अशाच बाजाची कादंबरी आहे. पवन मावळामधील पवना नदीच्या काठावर वसलेला 'तुंग' दुर्ग आहे. याच दुर्गाचा हवालदार धोंडी याची ही गोष्ट.
शिवाजी महाराजांच्या काळापासून तुंगीच्या देखरेखीची जबाबदारी धोंडीच्या घराण्याने पार पाडलेली आहे. आज तो या घराण्याची परंपरा पुढे नेतो आहे. त्याचा त्याला सार्थ अभिमान आहे. शिवाय याच कारणामुळे पंचक्रोशीमध्ये त्याला मान मिळतो आहे. त्याने हवालदार म्हणून आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. कधीही कोणाशी दुजाभाव केलेला नाही. तो इमानी आहे आणि आपल्या तत्त्वांशी बांधील आहे. परंतु त्याचा भाऊ कोंडी मात्र त्याच्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आहे. तो काहीसा बंडखोर जाणवतो. याच कारणामुळे पवनाकाठी राहणाऱ्या या धोंडीच्या आयुष्यात निरनिराळ्या घटना घडतात. मात्र तो आपली तत्वे सोडत नाही.
अशी पार्श्वभूमी असणारी ही कादंबरी म्हणजे 'पवनाकाठचा धोंडी'. सुरुवातीला कथेला रंग चढायला थोडासा वेळ लागतो. नंतर ती हळूहळू वाचकाच्या मनाचा पकड घ्यायला लागते व आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. पवनाकाठच्या धोंडीचे व्यक्तिमत्व गोनीदांनी अतिशय उत्तमरीत्या रेखाटलेले आहे. विशेष म्हणजे कोंडी आणि सारजा तसेच सरू आणि धोंडी या दीर-भावजयाचं नातं अतिशय उत्तमरित्या या पुस्तकांमधून रंगवलेले आहे. शेवटी शेवटी कादंबरी भावनात्मक करून सोडते. म्हणजेच तोवर आपण कादंबरीमध्ये पूर्णपणे गुंतत गेलो असतो. हीच तर गोनीदांच्या लेखणीची जादू आहे. या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती देखील झालेली आहे. परंतु सध्या हा चित्रपट इंटरनेटवर कुठेही उपलब्ध नाही.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com