आयएमडीबी अर्थात 'इंटरनेट मूवी डेटाबेस' म्हणजे जगभरातील सर्व प्रकारच्या सर्व भाषांतील तयार झालेल्या चित्रपटांचा परिपूर्ण शब्दकोश होय! चित्रपटांसंबंधित सर्व प्रकारची माहिती आपल्याला आयएमडीबीच्या संकेतस्थळावर मिळते. शिवाय विविध चित्रपटांना आपण परीक्षण आणि रेटिंग देखील देऊ शकतो. आयएमडीबीवर दर्दी परीक्षक आणि प्रेक्षक आपला अभिप्राय देत असतात. त्यामुळेच इथे दिलेले रेटिंग हे विश्वासार्ह मानण्यात येते. आज सदर संकेतस्थळ तुम्ही उघडून पाहिले तर बहुतांश इंग्रजी चित्रपटांना लाखांमध्ये प्रेक्षकांनी रेटिंग दिले आहे. तसेच बहुतांश बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांची रेटिंग देखील दहा हजारांच्या पटीमध्ये प्रेक्षकांनी दिले आहे.
अनेकदा अन्य भाषेतील चित्रपट पाहायचा असेल तर प्रेक्षक आयएमडीबीवरील रेटिंग तपासून पाहतात. त्यावरूनच हा चित्रपट कसा असेल, याचा अंदाज येतो. मागील काही वर्षांपासून मराठी भाषेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दर्जेदार चित्रपट निर्मिती होताना दिसत आहे. हे चित्रपट महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चालतात. परंतु त्यांनी अजूनही मराठी देशाची सीमारेषा ओलांडलेली नाही, असे दिसते. याचे कारण आयएमडीबीचे रेटिंग आहे, असे वाटते.
मराठी प्रेक्षकांनी अजूनही आपल्या भाषेतील दर्जेदार चित्रपटांना बहुसंख्येने रेटिंग आणि अभिप्राय दिलेला नाही. त्यामुळे अन्य भाषेतील प्रेक्षक मराठी चित्रपट जास्त पाहत नाहीत. मराठी लोक मात्र सर्व भाषेतील चित्रपट पाहतात. जर आपल्याला आपल्या चित्रपट इंग्लिश सब-टायटल सह अन्य भागांमध्ये पोहोचवायचे असतील तर अधिकाधिक मराठी प्रेक्षकांनी आपल्या भाषेतील चित्रपटांना आयएमडीबीवर रेटिंग देण्याची नितांत आवश्यकता आहे. जेणेकरून आपल्या कलाकृती सातासमुद्रापार देशातील लोक देखील पाहतील आणि त्यामध्ये त्यांच्या अभिप्रायाचा देखील समावेश होऊ शकेल.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com