जगभरात कुठेही गेलं की इंग्रजीच भाषा वापरतात, असा भारतीयांचा गोड गैरसमज
आहे. याच कारणास्तव मागील काही वर्षांपासून इंग्रजी शाळांचं पेव सुटलेलं
दिसतं. जगाची भाषा म्हणून आजकाल प्रत्येक जण आपल्या मुलांना इंग्रजी
शाळेमध्ये घालताना दिसतो. असेच एक जण आमच्या मित्राच्या ओळखीतल्या निघाले.
त्यांचा
मुलगा आयसीएसई नावाच्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेमध्ये चिंचवडमध्ये
शिकतो. त्याचे वडील एका मल्टिनॅशनल अर्थात बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामाला
आहेत. कदाचित परदेशातच सेटल व्हायचं म्हणून त्यांचे प्रयत्न चाललेले
दिसतात. एकदा देश निश्चित झाला की, आपल्या कुटुंबासह ते त्या देशात स्थायिक
होणार होते. अखेरीस त्यांना युरोपातील क्रोएशिया या देशात जाण्याची संधी
मिळाली. एकंदरीत तिथलं वातावरण उत्तम... पगारही चांगला म्हणून त्यांनी
आपल्या मुलाला आणि पत्नीला इथेच बोलवायचे निश्चित केले होते. परंतु त्यांना
नंतर समजले की, या देशात कुठेही इंग्रजी शाळा नाही. सर्व शिक्षण त्यांच्या
अधिकृत भाषेत अर्थात क्रोएशियन भाषेमध्ये चालते. म्हणूनच आता ते कात्रीत
सापडले आहेत. जगाची भाषा इंग्रजी म्हणून मुलगा चौथीपर्यंत इंग्रजीमध्ये
शिकला, आता क्रोएशियामध्ये स्थायिक व्हायचं म्हटल्यावर इंग्रजी काहीच
कामाची नाही, हे त्यांच्या ध्यानात आलं. अजूनही त्यांचा निर्णय झालेला
नाही!
एकंदरीत काय जगभरातील सर्वच देश मुलांना आपल्या भाषेमध्ये शिक्षण
देत आहेत. आपण मात्र इंग्रजीला कवटाळून बसलेलो आहोत. मुलं इंग्रजीतून रट्टा
मारताहेत, मार्क मिळवत आहेत, पण ज्ञान मिळवत आहेत का? हा मोठा प्रश्न
पडतो. ज्ञानाधारित शिक्षण पद्धतीला जगाने स्वीकारले असतानाही भारत मात्र
आपल्या देशाबाहेर उडण्याची स्वप्ने पाहतो आहे. मुलांना परकीय भाषेमध्ये
शिक्षण देत आहे. ज्ञान जाऊ द्या, फाडफाड इंग्रजी बोलता आले पाहिजे हे
त्यांच्या मनाने ठरवलेले आहे. पण नक्की आपला मार्ग योग्य आहे का? याची
चाचपणी मात्र त्यांनी केलेली नाही. अजूनही अनेकांना हे समजलेले नाही की,
इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यात जमीन आसमानाचा फरक आहे.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com