मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या कोणत्याही मराठी माणसाला आवडेल असेच भाषा धोरण
महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केले. त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन
देखील.
मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये होत असलेली मराठी
भाषेची अधोगती लक्षात घेऊन त्यासाठी पावले उचलणे अपरिहार्यच होते. म्हणून
या निर्णयाचे स्वागत करायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची
अंमलबजावणी करण्यासाठी जेवढा शासनाचा सहभाग असेल किंबहुना त्यापेक्षा
कितीतरी अधिक सामान्य नागरिकांचा असायला हवा. कारण आज-काल मराठी भाषिक लोकच
आपल्या भाषेला तुच्छ आणि दुय्यम समजायला लागलेले आहेत. हिंदी आणि इंग्रजी
सारख्या परकीय भाषा मराठी भाषेवर अतिक्रमण करत आहेत. मराठी लोकांची साथ
असल्यामुळेच त्यांचे वर्चस्व देखील वाढू लागलेले आहे. मराठी भाषेच्या
अस्तित्वाला हा भविष्यातील सर्वात मोठा धोका संभवतो. याच कारणास्तव मराठी
संपवण्यात इतर कोणाचाही नाही तर प्रत्यक्ष मराठी लोकांचा सर्वात मोठा वाटा
असणार आहे. म्हणूनच आपली भाषा वाचवण्यासाठी काही गोष्टी बंधनकारक करणे तसेच
तिचा दैनंदिन जीवनातील वापर वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले लोक
भाषेपेक्षा जात आणि धर्म याला अधिक महत्त्व देतात. भाषा टिकली तरच तुमची
संस्कृती टिकणार आहे, हे अनेकांच्या ध्यानात येत नाही. भाषेच्या
ऱ्हासासोबतच संस्कृतीचा देखील ऱ्हास अपरिहार्य आहे.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com