कंपनीतील कमकुवत आर्थिक स्थितीमुळे सूर्यकांत जगदाळे यांना जबरदस्तीने निवृत्त व्हावे लागते. इतकी वर्षे कंपनीमध्ये काम केल्यानंतर देखील अशा पद्धतीने वागणूक मिळाल्यामुळे ते अस्वस्थ होतात. आणि पुढील आयुष्य घालवण्यासाठी आपल्या गावी येतात. शहरांमध्ये अनेक वर्ष त्यांनी एकट्यानेच घालवलेली असतात. तोच मार्ग गावी आल्यानंतर देखील चालू ठेवतात. एक दिवस संकटात सापडलेल्या युवतीला अर्थात निशीला ते वाचवतात. निशी लग्नानंतरच्या आपल्या आयुष्यात घडलेल्या अनपेक्षित घडामोडींशी सामना करत असते. सासर आणि माहेर दोन्हींपासून दुरावलेली असते. तिला सूर्यकांत आधार देण्याचा प्रयत्न करतात. पुढे काय हा प्रश्न उपस्थित राहतो. एक दिवस सूर्यकांत यांना निशीमधील एका कलेची अनुभूती येते. मग ते ठरवतात की निशीने ही कला जोपासावी आणि त्यातच करिअर करावे. त्यासाठी तिला हवी ती मदत करायला ते सज्ज होतात. तिच्यासाठी मार्गदर्शक होतात. इथून पुढची आयुष्य नीशीच्या करिअर करता वाहून घेण्याचे ठरवतात. निशी सुद्धा त्यांचा विश्वास सार्थ ठरवते. त्यांच्या या प्रवासामध्ये अनेक अडथळे देखील येतात. आपले आणि परके कोण? यांची देखील त्यांना जाणीव होते. सूर्यकांत यांच्या आयुष्यातील निशी ही खरीखुरी सखी ठरते. तिला प्रगतीच्या शिखराकडे ते घेऊन जातात.
स्त्री आणि पुरुष यांच्यातील या वेगळ्या नात्याची गोष्ट 'सखी' या चित्रपटामध्ये दिग्दर्शक लता नार्वेकर यांनी दाखविलेली आहे. पती-पत्नी आणि भाऊ-बहीण या पलीकडे असणार तिसरं नातं आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतं. अशोक सराफ, सोनाली कुलकर्णी आणि उषा नाडकर्णी या तिघांनाही 'स्वप्रतिमेबाहेरच्या भूमिका' वाटेला आलेल्या आहेत. अशा वेगळ्या भूमिकांमध्ये पाहताना छान वाटतं. उषा नाडकर्णी समंजस भूमिकेमध्ये प्रभावी ठरतात. एकंदरीत एका यशस्वी स्त्रीच्या मागे असणाऱ्या पुरुषाची गोष्ट प्रभावीपणे या चित्रपटामध्ये पाहायला मिळते.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com