महाराष्ट्राच्या इतिहासाचे विविध कालखंड आहेत. त्यातील मध्ययुगीन कालखंडामध्ये बहुतांश घडामोडी घडल्या ज्यामुळे महाराष्ट्र घडत गेला. ‘मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास असा लिहिला तर’ या पहिल्याच प्रकरणांमध्ये इतिहासकार सेतूमाधवराव पगडी यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा दृष्टिकोन लक्षात येतो. ‘महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा संक्षिप्तवेध’ असे उपशीर्षक असणाऱ्या ‘महाराष्ट्र आणि मराठे’ या सेतूमाधवराव पगडी लिखित पुस्तकामध्ये आपल्या इतिहासातील अनेक अज्ञात ऐतिहासिक पैलू आपल्याला वाचायला मिळतात.
शिवाजी महाराजांपूर्वी ज्या सत्ताधीशांचे राज्य महाराष्ट्रावर होते त्यांच्याविषयी काही लेख या पुस्तकांमध्ये समाविष्ट आहेत. जसे इसामीचे फारसी महाकाव्य, चौदाव्या शतकातील महाराष्ट्र, बहमनी सुलतानांची कोकण मोहीम, अहमदनगरच्या निजामशाहीतील हिंदू सरदार, मोगल कालीन महाराष्ट्राचा आर्थिक आलेख, महंमद बंगश या लेखांमध्ये आपल्याला सदर माहिती वाचायला मिळते. तसेच खानदेश मराठ्यांच्या ताब्यात कसा आला? मराठ्यांनी लाहोरवर आक्रमण करून त्याचा ताबा कसा मिळवला? निजामाने पुणे का जाळले? मराठी आणि निजाम यांचे परस्पर संबंध कसे होते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे सेतूमाधवराव पगडी या पुस्तकातून देतात. निजाम अलीची कारकीर्द, लक्ष्मीनारायण शफिक औरंगाबादी याचा ग्रंथ मासिरे आसफी याविषयी देखील एक प्रकरण या पुस्तकांमध्ये समाविष्ट आहे. तसेच पानिपतच्या युद्धाशी संबंधित दोन लेख आपल्याला वाचता येतात. यातील पहिल्या लेखामध्ये अहमदशाह अब्दालीला पानिपतचे आमंत्रण देणारा धर्मशास्त्रज्ञ शहावली उल्ला याची राजकीय पत्रे अभ्यासली आहेत तर दुसऱ्या एका लेखात पानिपतावर परचक्राला पायबंध यामध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर प्रकाश टाकण्याचे कार्य पगडी यांनी केले आहे.
एकंदरीत महाराष्ट्राच्या इतिहासातील अज्ञात पैलू शोधण्याचे आणि वाचकांना त्याचे ज्ञान प्राप्त करून देण्याचे काम पगडी या पुस्तकाद्वारे करतात.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com