सकाळी सहा वाजता उठलो तेव्हा वातावरणामध्ये धुकं कमी होतं. पण हळूहळू दहा
ते पंधरा मिनिटांमध्ये त्याची तीव्रता वाढायला लागली आणि सगळीकडे अस्पष्ट
दिसायला लागलं. इंद्रायणी नदीभोवती तयार झालेल्या या धुक्याच्या वातावरणात
नदीच्या काठाकाठाने मार्गक्रमण करणं तसं अवघड होतं. म्हणून आज नदी पार करून
कुठेतरी सायकल स्वारी करण्याचे ठरवले.
आमच्या घरापासून सगळ्यात जवळ
असणारा परंतु आजवर भेट न दिलेला किल्ला म्हणजे चाकणचा भुईकोट दुर्ग अर्थात
संग्रामदुर्ग होय. अंतर फक्त ११ किलोमीटर होतं. परंतु प्रवास होता
राष्ट्रीय महामार्गावरचा. सायकल काढली आणि पाचच मिनिटांमध्ये पुणे-नाशिक
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० ला लागलो. मोशी टोलनाक्यापाशी मोठ्या
प्रमाणात धुकं दिसून येत होतं. या टोलनाक्याच्या पुढेच इंद्रायणी नदी आहे.
महामार्गावरील
नेहमीप्रमाणे गाड्यांची वर्दळ चालू होतीच. रस्त्याच्या पूर्ण डाव्या कडेने
मी सायकल हाकायला सुरुवात केली. महामार्गावरून वेगाने गाड्या घोंगावत जात
होत्या. तरीही धुके असल्यामुळे त्यांचा वेग काहीसा कमी असलेला दिसला. माझा
चढतीचा रस्ता होता त्यामुळे वेग फारसा पकडलेला नव्हताच. फक्त उलट्या दिशेने
समोरून येणाऱ्या वाहनांमुळेच अडचण व्हायची. बाकी रस्त्याच्या कडे कडेने
चालल्यावर तसा काही त्रास होत नव्हता. चाकण नगरपरिषदेच्या हद्दीपाशी
आल्यावर धुकं पूर्णतः संपलं होतं. आणि सर्विस रोड चालू झालेला होता.
सकाळच्या सूर्याची किरणे आता सर्वत्र दिसायला लागली होती. धुक्याचा
मागमूसही नव्हता. चाकण शहराचा मुख्य चौक जवळ येत होता. मला आता रस्ता पार
करून पलीकडच्या बाजूला जायचे होते. आज पहिल्यांदाच चाकणच्या उड्डाणपुलाचा
काय उपयोग आहे, हे समजले! कार चालकांसाठी तसे दोनही उड्डाणपूल हे
निरुपयोगीच आहेत. या पुलाच्या खालून मी पलीकडच्या दिशेने गेलो. मुख्य
बाजारपेठ अजूनही उघडलेली नव्हती. कदाचित ती सुरू झाल्यानंतर इथे बरीच मोठी
गर्दी होत असावी असं दिसून आलं.
चाकण शहरातील जिल्हा परिषद शाळा
क्रमांक एक आणि दोनच्या समोर बांधलेल्या एका कमानीतून आत गेलो. इथे समोरच
चाकणचा उध्वस्त भुईकोट किल्ला नजरेस पडला. महाराष्ट्रातील इतर भुईकोट
किल्ल्यांप्रमाणेच आज या एकेकाळ्याच्या पराक्रमी भुईकोट किल्ल्याची देखील
अवस्था झाली आहे. फारसे अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत. त्यावर निव्वळ
दृष्टिक्षेप टाकला आणि परतीच्या वाटेने निघालो. येताना रस्ता जवळपास
उतरणीचाच होता. एकदा तर एका पीएमपी बसला देखील ओव्हरटेक करून आलो! ती बस
नंतर माझ्यापुढे गेलीच नाही!
इंद्रायणी नदीच्या जवळ आलो तोवर धुक्याची
तीव्रता बऱ्यापैकी कमी झालेली होती. आज पहिल्यांदाच पूर्ण प्रवास सतत
कानावर आढळणाऱ्या वाहनांच्या आवाजामध्येच गेला.. अंतर होतं 22 किलोमीटर!
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com