Friday, July 3, 2020

दूरदर्शी गॅलिलिओ

गतिशील पृथ्वीची संकल्पना कोपर्निकसच्या आधी ऍरिस्टार्कस वगैरे अनेक ग्रीक तत्त्वज्ञांनीही केली होती, तसेच त्याच्या भौतिक विज्ञानाविषयी शंका बाळगणारेही अनेक विद्वान गेली निदान २-३ शतके वावरतच होते.

डोक्यावर दुसरे छत निश्चित होईपर्यंत पहिले मोडकळीला आलेले घर सोडायला माणूस धजत नाही, तशी स्थिती या विद्वानांची झालेली होती. शिवाय धर्माची नाराजी ओढवून घेण्याची भीतीही त्यांच्या मनात होतीच. नवीन कल्पना मनात खेळवणे, नवीन अटकळी बांधणे, त्यांच्या शक्यता चोखाळणे इथपर्यंत धर्मसंस्थेकडून मुभा होती; परंतु त्यापुढे जाऊन प्रस्थापिताला हटवून त्याच्या जागी दुसरे ज्ञान आणण्याची मुभा त्यांना नव्हती.

गॅलिलिओ या क्रांतिवीराचे यश त्याच्या या शिकवणीत अधिक आहे. रुळलेल्या चाकोरीला चिकटून राहण्याच्या वृत्तीची जागा स्वतंत्र बुद्धीने घ्यावी, या संदेशाची ललकारीच जणू त्याने दिली. दुसरे म्हणजे अॅरिस्टॉटल पद्धतीच्या अभावी ज्यांना एकदम निराधार वाटले असते, अशा सर्वांसाठी ज्ञानार्जनाचे एक वेगळेच अतिशय प्रभावी असे साधन त्याने निर्माण केले; ते म्हणजे तर्कशास्वाशी पूर्णपणे सुसंगत अशा गणितावर आधारित वैज्ञानिक कार्यपद्धती! आधुनिक जगाला कुण्या एका माणसाने देऊ केलेली अशी ही फार मोठी देणगी आहे.

गॅलिलिओचा संपूर्ण बौद्धिक आवाका पाहता दुर्बिणीचा जनक, भव्यदिव्य शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ, आयुष्यातला वीस वर्षांचा महत्त्वाचा काळ कोपर्निकस वादाला स्वत:ला वाहून घेणारा कट्टर पुरस्कर्ता असे शिक्के त्याला अपुरे पडतात. या सर्व गोष्टी घडल्या त्या अपघातानेच! त्याचा पिंड चिंतकाचा व मौलिक संशोधकाचाच होता. नवीन विज्ञानाची फार स्पष्ट चाहूल त्याला लागली होती. त्या विज्ञानाचा मागोवा कसा घ्यायचा, हे सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांना समजून सांगण्याचा तळमळ त्याला लागली होती.

ईश्वराविषयी श्रद्धेची भावना बाळगणारा गॅलिलिओ ईश्वरनिर्मित जगाच्या मानवी व्यवहारात भावुक होता, जगाच्या भौतिक अभ्यासाची त्याला ओढ लागली होती. त्या अभ्यासाला आवश्यक अशी कार्यपद्धती त्याने शोधून काढली. ती कार्यपद्धती काटेकोरपणे अवलंबिली, तर मानव संशोधनाच्या एका अनंत मार्गावर चालत राहील आणि ईश्वर त्याला कधीही भरकटू देणार नाही, असा त्याला विश्वास होता.

आपल्याला सत्य गवसले आहे, असा दावा त्याने कधीच केला नाही, पण सत्याकडे नेणाऱ्या निरंतर मार्गाचे दरवाजे आपण उघडले आहेत आणि या यात्रेतील पथिकांचा मेळा नेहमी वाढतच जाणार, हे त्याला दिसले होते. सत्याचे स्वरूप नेहमी अधिकाधिक विशाल होत जाईल आणि क्षितिजाआडून ते मानवाला सतत खुणावत राहील, हे त्याला दिसले होते.

निसर्गाचा अविरत अभ्यास ही मानवाच्या पुढच्या पिढ्यांची महत्त्वाची कामगिरी होणार... त्याच्या स्वत:च्या पेक्षाही अधिक प्रखर व प्रगल्भ बुद्धीचे मानव, विज्ञानाचा त्याने घेतला त्यापेक्षा अधिक खोल वेध घेत राहणार... हे त्याला दिसले होते.

मानवाच्या चर्मचक्षु साठी दुर्बिणीचे साधन देऊन विश्वाचे भव्य रूप गॅलिलिओने त्याला दाखवले. नवीन विज्ञानाचा आविष्कार करून बौद्धिक वाटचालीतला दूरचा पल्ला त्याने मानवाला दाखवून दिला.

खरोखरच मानवतेच्या इतिहासातला तो एक दूरदर्शी महामानव होऊन गेला.


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com