Saturday, November 28, 2009

शिक्षणाची जबाबदारी कोणाची?

आज शालेय शिक्षणापासुन उच्च शिक्षणाची हालत इतकी खराब झाली आहे की उद्याचा भारत घडविणारे युवक आपण यातुन कसे घडवु हा मोठा प्रश्न डोळ्यासमोर दिसतो. मुलांना व त्यांच्या गुणवत्तेला मार्कांच्या तराजुत तोलणारे आपण कोणते पाप करतो आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे. याच कारणामुळे पुर्वी पवित्र मानले जाणारे शिक्षणक्षेत्र आज बदनाम होताना दिसते. मार्कांच्या स्पर्धेत आपण नेहमीच पुढे दिसावे याकरीता सर्वचजण ’मेहनतीने’ झटताना दिसतायेत. शालेय शिक्षणाची तर वाट लावलीच आहे, आता उच्च शिक्षणाचीही त्याच दिशेने ’वाटचाल’ चाललेली आहे. शाळेत शिकत असताना शिक्षक नावाच्या व्यक्तीविषयी माझ्या मनात खुप आदराची प्रतिमा होती. आजही ती काही प्रमाणात आहे. पण बर्याच वाईट अनुभवांनी मन चेचुन काढलेले आहे.
शिक्षकाने प्रामाणिक असावे, अशी माझीही अपेक्षा होती पण त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनुभवांनी मी ही अपेक्षा सोडुन दिलेली आहे. काही वेळा शिक्षकाच्या प्रामाणिकपणाचाच अंत केला जातो. तर कधी कधी त्याला जबरद्स्तीने अप्रामाणिक व्हावे लागते. या बाबी शिक्षकाच्या नीतीमत्तेचा शेवट करणार्या आहेत. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला केवळ पैशातच मोजणारे लोकांमध्ये आता शिक्षकांचाही समावेश होत आहे. ही गोष्ट उच्च शिक्षणक्षेत्राला पुढील काळात निश्चित मारक ठरणारी दिसते. उद्योगांमध्ये वाढणारा पैसा पाहील्यावर तंत्रशिक्षणातील मारामार्या मोठया प्रमाणात वाढलेल्या आहेत. असे वाटते, पुढील काही काळामध्ये ९० टक्के मिळविणारा अभियंता काहीच येत नसल्याने कंपनीतुन लाथ मारून हाकलून देण्यात येईल! याला उच्च तंत्रशिक्षणातील भोंगळ कारभारच जबाबदार राहणार आहे. आजही अनेक विद्यालय व महाविद्यालयांमध्ये लायकी नसताना विद्यार्थांचे गुण वाढवून दिले जातात. विद्यार्थांना शिक्षण देऊन सक्षम बनविणे हेच शिक्षकाचे मुख्य कर्तव्य असते, लायकी नसताना त्याचे गुण वाढविणे हे नव्हे. याच कारणांमुळे शिक्षण व गुणवत्ता यांच्यातील दरी वाढताना आढळते. व विद्यार्थांनाही आपण काही न केल्याचे गुण मिळाल्याचे ’स्वर्ग समाधान’ मिळते. या ठिकाणी गरजेचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी न राहता शिक्षक राहतो. विद्यार्थांना शिक्षणाची गरज निर्माण होण्याची व गोडी लागण्याची खरी आवश्यकता आहे. तीच आपली शिक्षणपद्धती पुरवू शकत नाही. हे मोठे दुर्दैव मानावे लागेल. सध्याची अशी परिस्थिती पाहता पुढील काळामध्ये उच्च तंत्रशिक्षण खुपच निराळ्या वळणावर दिसणार आहे.
उच्च तंत्रशिक्षणाचा दर्जा जर खरोखरच सुधरवायचा असेल तर शिक्षणाची दोरी हातात असणारे अधिकारी व शिक्षक दोघेही तळमळिचे असणाची गरज वाटते. आपले कर्तव्य काय आहे, याची जरी जाणीव प्रत्येकाने ठेवली तरी आपण चांगले तंत्रज्ञ घडवु शकु याची मला खात्री आहे...

पुरंदर प्रवास


छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे, तसे माझे आहे. त्यांच्या भूमीतच माझा जन्म झाला असल्याने मला याचा खूप अभिमान वाटतो. मी पाहिलेला पहिला किल्ला म्हणजे शिवनेरी होय. त्याशिवाय मी अधिक काही फ़िरलेलो नाही. २००९ च्या उन्हाळ्यामध्ये आम्ही चौघा भावांनी सिंहगड व पुरंदर या आमच्या पुणे जिल्ह्यातील दोन किल्ल्यांची सफ़र करायचे ठरवले. सिंहगड किल्ला पुण्याचा जवळच असल्याने त्याच्यावर नेहमीच मोठी गर्दी राहते. विशेषत: प्रेमी युगुलांचा तिथे नेहमीचा निवास झाला आहे. त्यामुळे या किल्ल्याचे सौंदर्य झाकोळलेले दिसते. याऊलट पुरंदर हा काहीसा दुर्लक्षित किल्ला आहे. आम्ही तिथे गेलो त्या वेळी दुपारचे जवळपास २ वाजुन गेले होते. शिवाय तो आमच्यासाठी नविनच किल्ला असल्याने चढाईचा मार्ग माहित नव्हता. तरीही समोरच्या पायवाटेने आम्ही तो शोधला. पुरंदरच्या इतिहास प्रसिद्ध तहासाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे. दोन टप्प्यांत हा किल्ला चढावा लागतो. पहिल्या टप्प्यात सैन्याची छावणी दिसते. याच ठिकाणी वीर मुरारबाजी देशपांडे यांचा भव्य पुतळा आहे. तो पुतळा पाहुन खरोखर इतिहासातील घटना ताज्या वाटु लागतात. हा किल्ला बराच लांबीचा आहे. कदाचित लांबीने जास्त असणार्या किल्ल्यांमध्ये त्याचा समावेश होत असावा. ज्या भगव्या जरीपट्क्याला आम्ही लांबुनच पाहिले होते त्याच्या जवळ गेल्यावर उर अभिमानाने भरुन आला. तो डौलाने फ़डकत होता. पुरंदर वरचे अवशेष भग्न अवस्थेतील वाटतात, त्यावरुनच तो दुर्लक्षित असल्याचे समजुन येते. छत्रपती संभाजी राजांचे जन्मठिकाण तेथे आहे, हे मला प्रथमच समजले...! पण दुर्दैवाने तोपर्यंत संध्याकाळ झाल्याने आम्ही या जागेवर जाऊ शकलो नाही. पुरंदरच्या भव्यतेमुळेच हे अशक्य झाले. पुढील वेळी नक्की हे जन्मस्थान पाहु, असा निश्चय करुन आम्ही किल्ला उतरु लागलो.
पुरंदर हा किल्ला म्हणुन आज पाहण्यालायक दिसतो. प्रत्येकाने हा किल्ला ज़रूर पाहावा. या किल्ल्यामुळेच सासवड तालुक्याला ’पुरंदर’ असे नाव दिले आहे......