Tuesday, August 29, 2023

फनरल

जग बदलतं तशा व्यवसायाच्या पद्धती देखील बदलत जातात. नवे व्यवसाय उदयास येतात. शिवाय आजच्या स्टार्टअपच्या जमान्यात व्यवसायाच्या संकल्पना पुन्हा नव्या वाटा शोधू लागल्या आहेत. अशाच नव्या वाटेची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे, 'फनरल'.
एका चाळीमध्ये आजोबा आणि नातू राहत आहेत. आजोबा आणि नातवाचं नातं नेहमीच विशेष असतं. परंतु या दोघांचा तसं नाही. एकत्र राहत असले तरी दोघांची तोंडे दोन वेगवेगळ्या बाजूला आहेत. आजोबांना समाजसेवा करण्याची भारी हौस. पण नातू मात्र उनाडक्या करत फिरणारा एक युवक आहे, असं त्यांना वाटतं. आजवर  नातवाने अनेक ठिकाणी नोकरीमध्ये धरसोड केलेले आहे. आजोबांनी देखील त्याच्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. पण एकाही ठिकाणी तो टिकत नाही. अचानक एका घटनेमध्ये एका व्यक्तीला मदत केल्यामुळे त्याला पैसे मिळतात. त्यातूनच व्यवसायाचा एक नवीन मार्ग त्याला सापडतो. आजोबांसाठी मात्र हा व्यवसाय नसून ही सेवा आहे, असे वाटते. तरीदेखील त्यांचा रोष पत्करून आणि आधी विरोध असणाऱ्या मित्रांनाच सोबत घेऊन तो आपली आगळ्यावेगळ्या व्यवसायाची कंपनी सुरू करतो. त्यातून त्याला आजोबांच्या रागाचा सामना करावा लागतो. ते त्याच्याशी बोलत देखील नाही. कंपनी उभी करताना त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा देखील सामना करावा लागतो. यातून तो उभा राहतो. लोकांना साथ देतो आणि लोकांची देखील साथ त्याला मिळते. हळूहळू तो समाजप्रिय देखील होतो. पण आजोबा मात्र शेवटपर्यंत त्याच्याशी बोलत नाहीत. एका नवीन संकल्पनेतून व्यवसायाची सुरुवात त्यांनी केलेली असते. जी त्यांना अखेरपर्यंत पटत नाही.
विजय केंकरे आणि आरोह वेलणकर यांनी या आजोबा नातवाच्या जोडगोळीची भूमिका साकारलेली आहे. एका वेगळ्या कथेचा आणि धाटणीचा चित्रपट म्हणून फनरल निश्चित पाहता येईल.


 

Friday, August 4, 2023

प्रशिक्षणाची भाषा

काही महिन्यांपूर्वी भारतातील एका प्रसिद्ध मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये माझे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण आयोजित केले होते. पुणे जिल्ह्यामधील विविध एमआयडीसीमध्ये या कंपनीच्या अनेक शाखा आहेत. दर दिवशी एका शाखेमध्ये समान पद्धतीचेच प्रशिक्षण द्यायचे होते. विविध शाखांमध्ये विविध भाषिक लोक असल्यामुळे बहुतांश वेळा प्रशिक्षण इंग्रजीतूनच होत होते. काही ठिकाणी अमराठी लोक देखील मराठी समजून घेत. अशा ठिकाणी दोनही भाषांचा मी वापर केला. एका शाखेमध्ये सर्वच लोक मराठी भाषिक होते. तिथे पूर्ण वेळ मराठीतून प्रशिक्षण घेतले. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सलग प्रशिक्षण चालू होते. परंतु प्रशिक्षणार्थींचा उत्साह काही कमी झाला नव्हता. याउलट त्यांची उत्सुकता जागृत झाली आणि त्या दिवशीचे प्रशिक्षण अतिशय उत्तमरीत्या पार पडले. लोकांना आपल्या भाषेमध्ये तंत्रज्ञान समजून घ्यायचे होते आणि ते त्यांना समजले देखील. याचा मला देखील आनंद झाला होता. अनेकांनी नंतर देखील माझ्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
या उलट अन्य एका शाखेमध्ये दक्षिण भारतीय लोकांची संख्या जास्त असल्यामुळे तिथे पूर्णपणे इंग्रजीतून प्रशिक्षण घ्यावे लागले. अर्थात प्रशिक्षणातील मुद्दे समान होते. त्यात काहीच फरक नव्हता. फक्त भाषा वेगळी होती. त्यामुळे इथला प्रतिसाद आधीच्या शाखेइतका प्रभावी वाटला नाही. खरंतर इंग्रजी कितीही अनौपचारिक करण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्यासाठी परकीय भाषाच असते. आणि औपचारिक सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच वापरण्यात येते. कदाचित याच कारणामुळे आधीच्या प्रशिक्षणाइतका जोरदार प्रतिसाद इथे मिळाला नाही. काहीजण तर एखादं जबरदस्तीने ऐकावं लागणार लेक्चर ऐकतोय, अशा स्थितीमध्ये बसले होते. सर्वांना प्रशिक्षणातील मुद्दे तर समजले. पण जो प्रतिसाद अपेक्षित होता तसा मिळाला नाही.
दोन्ही ठिकाणी प्रशिक्षणातील मुद्दे समान होते, प्रशिक्षक देखील तोच होता, फक्त भाषा वेगळी होती. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ इंग्रजीतून शिकवत असल्याने त्याची खूप सवय झाली आहे. मराठीतून बोलताना देखील अनेक तांत्रिक शब्द तोंडात येतात. पण मराठीमधून आपण समोरच्या माणसांशी जोडले जातो. कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जेव्हा वक्ता आणि श्रोते एकमेकांशी भाषेने जोडले जातात तेव्हा त्याची परिणामकारकता अतिशय उच्च असते. याची प्रचिती त्यादिवशी मला आली.


- तुषार भ. कुटे

Thursday, August 3, 2023

गुगलचा नवीन क्वांटम कॉम्प्युटर ४७ वर्षांची संगणकीय कामे अवघ्या ६ सेकंदात पूर्ण करू शकतो.

क्वांटम कॉम्प्युटिंगमधील शर्यतीमुळे तंत्रज्ञानातील पुढच्या पायऱ्या ह्या वेगाने चढल्या जात आहेत. सध्या आयबीएम, इंटेल, मायक्रोसॉफ्ट आणि चीन क्वांटम कॉम्प्युटिंगवर काम करत आहेत.

जुलै २०२३ मध्ये, गुगलने घोषणा केली की, त्यांच्या नवीन क्वांटम कॉम्प्यूटर, अर्थात सायकॅमोर २.० ने क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे. हा संगणक अवघ्या ६ सेकंदात रँडम सर्किट सॅम्पलिंग गणना पूर्ण करतो, जे जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरला पूर्ण करण्यासाठी ४७ वर्षे लागतील!
 
हा एक महत्त्वाचा शोध आहे, कारण तो शास्त्रीय संगणकांच्या क्षमतेच्या पलीकडे असलेली गणना करण्याची क्वांटम संगणकाची क्षमता दर्शवतो. "रँडम सर्किट सॅम्पलिंग" हे एक अतिशय किचकट कार्य आहे, जे क्वांटम सिस्टमच्या वर्तनाचे अनुकरण करण्यासाठी वापरले जाते. हे कार्य इतक्या त्वरीत पार पाडण्याचे काम करून सायकॅमोर २.० ने दाखवून दिले आहे की क्वांटम कॉम्प्युटरचा वापर वास्तविक जगातील समस्या सोडवण्यासाठी केला जाऊ शकतो, जी सध्या शास्त्रीय संगणकांसाठी अतिशय अवघड बाब आहे.
 
क्वांटम संगणकाचा विकास अद्याप त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, परंतु अलिकडच्या वर्षांत झालेली प्रगती खरोखरच उल्लेखनीय आहे. क्वांटम कॉम्प्युटरमध्ये सुधारणा होत असल्याने त्यामध्ये औषधे, शोध, साहित्य, विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.


 

Tuesday, August 1, 2023

ग्रंथांची गोष्ट सांगणारा ग्रंथ

पारंपारिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तकांचा वापर होतो. पुस्तके मानवी जीवनावर भाष्य करतात, तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगतात, आयुष्याची शिकवण देतात आणि शहाणपणाचे धडे देखील देतात. पण पुस्तकांविषयी भाष्य करणारी पुस्तके अतिशय कमी आहेत. त्यातीलच एक आणि मी आजवर वाचलेले सर्वोत्तम पुस्तक म्हणजे, 'जग बदलणारे ग्रंथ'.
जग बदलण्याची ताकद जितकी मानवामध्ये आहे, निसर्गामध्ये आहे तितकीच ती ग्रंथांमध्ये देखील आहे. मागील हजारो वर्षांपासून ग्रंथांची परंपरा मानवी इतिहासामध्ये दिसून येते. त्यातील प्रामुख्याने धार्मिक ग्रंथांनी मानवी जीवनावर प्रभाव टाकलेला दिसतो. परंतु धर्मग्रंथांव्यतिरिक्त अजूनही अनेक असे ग्रंथ आहेत ज्यामुळे मानवी जीवनावर विशिष्ट बदल घडेल, असा प्रभाव देखील पडलेला आहे. अशा निवडक आणि सर्वोत्तम ५० ग्रंथांविषयी लेखिका दीपा देशमुख यांनी या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. हे ग्रंथ लिहिणारे लेखक काही सामान्य व्यक्ती होते तर काही असामान्य. धर्म, अर्थ, काम, विज्ञान, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, गणित अशा विविध ज्ञानशाखांमध्ये लिहिले गेलेले ग्रंथ त्या शाखेमध्ये मैलाचा दगड ठरले होते. किंबहुना अनेक ग्रंथांनी या ज्ञानशाखेच्या अभ्यासाची दिशाच बदलवून टाकली. काही ज्ञानशाखा तर याच ग्रंथांमुळे पुढे आलेल्या आहेत. भगवद्गीता, त्रिपीटक, बायबल, कुराण यासारखे ग्रंथ धर्मग्रंथ असल्यामुळे त्यांनी मानवी जीवनावर प्रभाव तर टाकलाच होता. परंतु इतिहासामध्ये अजरामर झालेल्या अन्य व्यक्तींनी लिहिलेले ग्रंथ देखील तितकेच महत्त्वाचे होते. अनेकदा इतिहासातील बऱ्याच व्यक्ती त्यांच्या या ग्रंथांमुळेच ओळखल्या जातात. अनेक शास्त्रज्ञांनी आपले सिद्धांत, प्रमेय आपल्या मूळ ग्रंथातूनच मांडली. त्यावर बरेच वादविवाद झाले. सुरुवातीला बहुतांश लोकांनी त्यांचे विचार स्वीकारले नाहीत. अनेकांनी तर धर्मविरोधी म्हणून त्याच्या प्रती देखील जाळल्या. परंतु अखेरीस हे ग्रंथ समाजमान्यता पावले. आज विविध ज्ञानशाखातील सखोल ज्ञान प्राप्त करायचे असल्यास सर्वप्रथम हेच ग्रंथ वाचले जातात, प्रमाण मानले जातात. इतकी ताकद यांच्या लेखकांमध्ये व त्यांच्या लेखणीमध्ये होती. कौटिल्याचे अर्थशास्त्र, युक्लीडचे द इलेमेंट्स, गॅलिलिओचे डायलॉग, आयझॅक न्यूटनचा प्रिन्सिपिया, कार्ल लिनियसचा सिस्टीमा नॅचुरे, अरिस्टॉटलचा वर्क्स, कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल, चार्ल्स डार्विनचा द ओरिजिन ऑफ स्पेशीस, रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली, मोहनदास करमचंद गांधी यांचा सत्याचे प्रयोग, स्टीफन हॉकिंग यांचा ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम आणि युवाल नोवा हरारीचा सेपियन्स हे ग्रंथ तर प्रत्येकाने आपले आयुष्यात किमान एकदा तरी वाचावे असेच आहेत.
लेखिकेने केवळ ग्रंथाविषयीच नव्हे तर त्यातील मूळ गाभ्याविषयी देखील सखोल भाष्य केले आहे. लेखकाने कोणत्या उद्देशाने किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये हा ग्रंथ लिहिला, याची देखील माहिती आपल्याला होते. शिवाय एखादा ग्रंथ आपण वाचलेला नसेल तरी तो वाचण्याची उत्सुकता निश्चित तयार होते. कार्ल लिनियसचा सिस्टीमा नॅचुरे बद्दल मला या पुस्तकातून पहिल्यांदाच माहिती मिळाली होती. नंतर त्याचे पुस्तक देखील वाचले आणि खरा जीनियस कसा असतो याची माहिती मिळाली. अजूनही यात वर्णिलेले अनेक ग्रंथ मी देखील वाचलेले नाहीत. पण आगामी काळामध्ये ते नक्की वाचू, याची मला खात्री वाटते.

- तुषार भ. कुटे