Tuesday, November 22, 2022

उद्याचं बेट (बिग डायोमेड) आणि कालचं बेट (लिटल डायोमेड)

ही दोन्ही डायोमेड बेटे फक्त तीन मैलांच्या अंतरावर आहेत. परंतु मोठे बेट त्याच्या लहान शेजाऱ्यापेक्षा जवळजवळ एक दिवस पुढे आहे (२१ तास). कारण ही दोन्ही बेटे पॅसिफिक महासागरातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय तारखेच्या दोन वेगवेगळ्या बाजूला आहेत आणि एका कॅलेंडर दिवसाच्या दरम्यानची सीमा चिन्हांकित करतात. हे दोन्ही भूप्रदेश अलास्का आणि सायबेरिया दरम्यान बेरिंग सामुद्रधुनीमध्ये आहेत.
बिग डायोमेड रशियन बाजूला आहे तर लिटल डायोमेड अमेरिकेच्या बाजूला आहे. हिवाळ्यात दोन बेटांमध्‍ये तयार झालेला बर्फाचा पूल बेकायदेशीर असला तरी, त्‍यांच्‍यातील अंतर कमी करतो आणि 'वेळेचा प्रवास' अर्थात टाईम ट्रॅव्हलची अनुभूती देतो!

 मनमाड-येवला रस्त्यावर

मागील एका घटनेमध्ये जसं मी सांगितलं होतं की कुणीही ट्राफिक पोलीस कर्मचारी वर्दीमध्ये समोर दिसला की तो आपल्याकडे आले आपले गिराईक अशा नजरेने पाहताना आम्हाला जाणवतो आणि त्याच्या तोंडातून गळत असलेली लाळ देखील दिसत असते. नाशिक जिल्ह्यातील किल्ले सर करून परत जात असताना घडलेला हा किस्सा देखील अशाच प्रकारचा आहे.
३१ डिसेंबर २०२१ हा दिवस होता. ३१ डिसेंबर म्हटलं की सगळीकडेच पोलिसांची गस्त असते. मनमाड शहरानजीक असलेल्या अंकाई-टंकाई किल्ल्यांचा ट्रेक करून आम्ही पुन्हा येवला शहराच्या दिशेने निघालो होतो. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गवरून अहमदनगर तसेच पुण्याकडे येणारा हा हमरस्ता आहे. म्हणूनच या रस्त्यावर मोठमोठ्या मालवाहू गाड्यांची सातत्याने वर्दळ असते. अनकाई किल्ल्याकडून येवला शहराकडे येताना अशीच भली मोठी गर्दी या रस्त्यावर झाली होती. साधारणतः सहा ते सात किलोमीटर अंतरावर ट्राफिक पोलीस गाड्यांना अडवताना दिसून आले. बहुतांश गाड्या या मालवाहू प्रकारातील होत्या. ३१ डिसेंबर असल्यामुळे कदाचित वेगळ्या प्रकारची चौकशी चालू असावी, असे आम्हाला वाटले. आमच्या गाडीचा MH14 हा क्रमांक बघून आमची गाडी बाजूला घ्यायला लावली. अगदी दुर्दैवानेच म्हणावं लागेल की १५ डिसेंबरलाच माझ्या गाडीची पीयूसी संपलेली होती! खरंतर यात माझीच चुकी होती की माझ्या ध्यानात राहिले नाही. संबंधित ट्राफिक हवालदाराने मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांना सुपूर्द केली. फक्त पीयूसीची तारीख निघून गेलेली होती. साहेबांना नवीन बकरा पकडल्याने आनंद झाला असावा. त्यांनी मला बाजूला घेतले आणि सांगितले, 'पियूसीचे हजार रुपये दंड पडतात, तुम्ही दोनशे रुपये द्या आणि निघून जा.' १००० रुपयांचे काम जर दोनशे रुपयांमध्ये होत असेल तर कोणीही ते देऊन निघून जाईल. परंतु मला ते पटत नव्हते. त्यांना मी सरळ सांगितले, "ऑनलाइन फाईन करून द्या. मी भरतो."
पीयूसी नसल्याच्या कारणावरून दंड भरणारा त्यांना मी कदाचित पहिलाच व्यक्ती भेटलो असेल. त्यामुळे ते देखील चक्रावले.
हवालदार पुढे बोलू लागला, "साहेब तुम्ही चांगले दिसता. सगळी कागदपत्रे देखील आहेत. कशाला हजार रुपयाचा भुर्दंड भरताय? त्यापेक्षा दोनशे रुपयांमध्ये तुमचं काम करून देतो! कागदावर दंड देखील लागणार नाही."
त्यांना दोनच शब्दांमध्ये उत्तर दिले, "चालेल मला! करा फाईन."


मग त्याचा देखील नाईलाज झाला. त्याने मशीनमध्ये माहिती टाकली आणि बराच वेळ वाट बघत होता. इंटरनेटला रेंज नसण्याचे कारण सांगून तो शेजारच्या गाडीपाशी असलेल्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याजवळ गेला व त्याला देखील काहीतरी सांगितले. मग तो त्याच्या जवळचे मशीन घेऊन इकडे आला. त्याने देखील पहिल्याचीच री ओढली. "साहेब तुम्ही चांगले दिसता कशाला फाईन वगैरे भरताय? दोनशे रुपये द्या लगेच गाडी मोकळी करतो."
मी पुन्हा म्हटलं, "साहेब ऑनलाईन फाईन करा. मी भरायला तयार आहे. आधीच्या साहेबांना सुद्धा मी हे सांगितलं आहे. यापेक्षा वेगळं मी काही करू शकत नाही."
मग त्याचा देखील नाईलाज झाला. गाडीला ऑनलाइन फाईन पडला. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो एक हजार रुपये नसून ५०० रुपये होता! लाखो ड्रायव्हरपैकी पियूसी नसल्यामुळे ऑनलाईन फाईन भरणारा कदाचित मी एकमेव ड्रायव्हर असावा!
दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित भाव होते. त्यांच्यासमोरच मी आरटीओच्या वेबसाईटवर फाईन भरला आणि गाडी चालू केली. एक मात्र धडा घेतला की लांबच्या प्रवासाला जाण्याच्या आधी गाडीची सगळं कागदपत्रे योग्य आहेत की नाही, हे तपासून घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांशी कुठलाही काळा व्यवहार करू नका.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे

Wednesday, November 16, 2022

इंडीजीनियस लँग्वेज

इंडीजीनियस लँग्वेज अर्थात देशी भाषा म्हणजे अशी भाषा जी एखाद्या परिसरातील मूळ रहिवाशांकडून बोलली जाते. भाषा आणि संस्कृती यांचं अतिशय दृढ असं नातं आहे. जेव्हा भाषा नष्ट होते तेव्हा त्या परिसरातील संस्कृती देखील लयाकडे प्रवास करत असते. मागील काही शतकांपासून जगभरामध्ये देशी भाषा लुप्त होण्याचं प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. जगातील सात खंडांमध्ये हजारो प्रकारचे समाज वास्तव्यात आहेत. त्यांच्याद्वारे विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. मागील हजारो वर्षांचा इतिहास बघितला तर परकीय आक्रमकांनी आपल्या भाषा जगभरातील विविध परिसरांमध्ये नेल्या. हळूहळू त्यातील शब्द स्थानिक भाषेमध्ये यायला लागले. कालांतराने त्यांचा देखील नवीन भाषिक समूह तिथे तयार व्हायला लागला आणि स्थानिक भाषा लुप्त व्हायला लागली.
मागील शतकभरामध्ये हजारो भाषा या लुप्त झालेल्या आहेत. किंबहुना अनेक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. इसवी सन २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने देशी भाषांचे वर्ष म्हणून घोषित केले होते. ज्याद्वारे जगभरातून लुप्त होणाऱ्या स्थानिक भाषा टिकाव्यात म्हणून विशेष लक्ष वेधले गेले. परंतु त्याचा फारसा प्रभाव जागतिक समुदायावर पडलेला दिसत नाही. स्थानिक भाषा लुप्त होण्यामागे अनेक कारणे आहेत. परकीय आक्रमकांनी अनेकदा सामूहिक हत्या केल्यामुळे देखील भाषा लुप्त झालेल्या आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती देखील काही भाषांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरलेली आहे. त्याहीपेक्षा मोठे कारण म्हणजे जुन्या पिढ्यांनी आपली भाषा नव्या पिढीकडे हस्तांतरित केली नाही. ही प्रक्रिया देखील अनेक शतकांपासून जागतिक समुदायांमध्ये अनुभवता येते. आज देखील त्यामध्ये बदल झालेला दिसत नाही. 


दक्षिण अमेरिका खंडाचा विचार केल्यास इसवी सन १६०० मध्ये तेथील देशांत सुमारे ५२ भाषा बोलल्या जायच्या. परंतु आज या भाषा जाणणारे अतिशय कमी लोक दक्षिण अमेरिकेमध्ये राहत आहेत. त्यांची टक्केवारी केवळ आठ टक्के इतकी आहे! अन्य लोक परकीय आक्रमकांच्या स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषा बोलतात. आज जगामध्ये ६,८०९ भाषा अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी ९०% भाषा बोलणारे समुदाय एक लाखांपेक्षा देखील कमी आहेत! याचा अर्थ पुढील काही दशकांमध्ये कमीत कमी ६,१०० भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जगात ४६ भाषा अशा आहेत की ज्या केवळ एकाच व्यक्तीला ज्ञात आहेत आणि ३५७ भाषा या जास्तीत जास्त पन्नास लोकांकडून बोलल्या जातात. अर्थात पुढील दशकांमध्येच या भाषा पूर्णपणे लुप्त होऊन जातील.
आज संगणक व इंटरनेटच्या युगामध्ये केवळ मोठ्या भाषिक समुदायांनाच ग्लॅमर प्राप्त झालेले आहे. याच कारणास्तव छोटे भाषिक समुदाय नव्या भाषांकडे आकर्षित झालेले दिसतात. त्यांना आपल्या मूळ भाषांची व त्या बोलण्याची लाज देखील वाटते. म्हणूनच त्यांची भाषा व संस्कृती लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. भारतीय समाज रचना बघितल्यास भारतीय भाषांसाठी देखील काही वेगळी परिस्थिती नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये भारतीय लोक आपल्या भाषांना दुय्यम स्थान देताना दिसत आहेत. जी परिस्थिती दक्षिण अमेरिकेतील भाषांची झाली, तीच भारतीय समुदाय आपल्या मूळ भाषांवर लवकरच आणेल असेही चित्र आहे. म्हणजेच पुढील शतकभरामध्ये भारतातल्या बहुतांश भाषा या नष्ट झालेल्या असतील आणि मुख्य भाषा देखील अल्पमतात गेलेल्या असतील. आपली भाषा आणि संस्कृती याविषयी विशेष आस्था असलेले जगातील समुदायच टिकून राहतील.
मग आपल्या भाषा आणि संस्कृती टिकवायची की तिची हत्या करायची? हे अजूनही भारतीय लोकांच्या हातात आहे!

Saturday, November 12, 2022

त्रिभाषा सूत्र

स्वातंत्र्यानंतर भाषा आधारित राज्य रचना पूर्ण झाल्यावर भारतीय भारतीय संघराज्यातील राज्यांनी शालेय शिक्षणासाठी त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला होता. किंबहुना केंद्र सरकारनेच स्थानिक भाषा, हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा या सूत्राचा राज्यांना अवलंब करण्यासाठी सांगितले. उत्तर भारतातील स्थानिक भाषा ही हिंदी असल्यामुळे त्या ठिकाणी केवळ द्विभाषा सूत्रच लागू होते. मात्र अन्य उर्वरित भारतामध्ये भारतीय संघराज्याची राजभाषा म्हणून हिंदी भाषा अभ्यासक्रमात टाकण्यात आलेली आहे. अर्थात तेव्हापासूनच केरळ आणि तमिळनाडू सारख्या राज्यांनी केंद्राला त्रिभाषा सूत्राच्या केराची टोपली दाखवली होती. आजतागायत या राज्यांमध्ये स्थानिक भाषा व इंग्रजी या दोनच भाषा शालेय शिक्षणात शिकवल्या जातात. अर्थात याचा त्यांना कधीही तोटा झालेला नाही!
उत्तर भारत वगळता अन्य भारतामध्ये शालेय शिक्षणात द्वितीय भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला जातो. मागील काही दशकांची स्थिती पाहता त्रिभाषा सूत्राचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने पहिलीपासूनच इंग्रजी या विषयाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला. तो यशस्वी देखील झाला आहे. परंतु आजची परिस्थिती पाहता पाचवीच्या अभ्यासक्रमापासून हिंदी भाषेचा अतिरिक्त बोजा विद्यार्थ्यांवर पडत असलेला दिसतो. काळाची पावले ओळखून जसा इंग्रजीचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला तसाच हिंदी या अनावश्यक विषयाऐवजी 'संगणकीय भाषा' हा सर्वोत्तम पर्याय निवडता येऊ शकतो.
एकविसावे शतक हे संगणकीय प्रगतीच्या पुढच्या टप्प्याने सुरू झाले. हळूहळू ते संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने प्रवास करत आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना संगणकीय प्रोग्रामिंग करता यावी ही येणाऱ्या काळाची गरज ठरणार आहे. शिवाय भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये देखील इयत्ता सहावी पासून संगणकीय प्रोग्रामिंग भाषा अभ्यासक्रमामध्ये असावी असे सुचवलेले आहे. अर्थात यामुळे विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त ताण तयार होईल असे वाटते. तो कमी करायचा असल्यास मराठी, इंग्रजी आणि संगणकीय भाषा असे त्रिभाषा सूत्र ठरविता येऊ शकते.
बहुतांश मुलांना आज लहान वयातच मोबाईल तसेच संगणक यांची ओळख होत असते. परंतु त्याचा वापर ते केवळ गेम खेळणे किंवा व्हिडीओ बघणे यासाठीच करत असतात. या यंत्रांचा निश्चित उपयोग काय, हे संगणकीय प्रोग्रामिंगद्वारे विद्यार्थ्यांना समजू शकते. शिवाय त्यादृष्टीने त्यांचा मेंदू देखील विकसित होण्याकरता मदत होऊ शकेल. 


आज संगणकाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रातच केला जात आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्यांना संगणकीय प्रोग्रामिंग माहीत असणे आवश्यक बनले आहे. याच कारणास्तव सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये नव्या त्रिभाषीय सूत्राचा अवलंब राज्य सरकारने करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त ताण न वाढता त्यांचा शालेय जीवनातच कौशल्य विकास होण्यास मदत होईल.

Ⓒ तुषार भ. कुटे.

Monday, November 7, 2022

मृत्यू पाहिलेली माणसं

पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या एकूण सजीवसृष्टी पैकी केवळ मनुष्य प्राणी सर्वांवर राज्य करतो आहे. त्याच्या अंगात असणाऱ्या अनेक गुणांमुळे तो या पृथ्वीचा राजा आहे, असे आपण म्हणू शकतो. प्रगल्भ बुद्धिमत्तेबरोबरच मानवाचा सर्वात मोठा गुण म्हणजे प्रखर इच्छाशक्ती! याच इच्छाशक्तीच्या बळावर त्याने आजवर अनेक असाध्य गोष्टी साध्य करून दाखवल्या. अशाच इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूवर विजय मिळवलेल्या माणसांची कहाणी सांगणारे हे पुस्तक म्हणजे, "मृत्यू पाहिलेली माणसं".
मानवी जीवनाचं 'मृत्यू' हे अंतिम सत्य आहे. ज्याला कोणीच टाळू शकत नाही. मृत्यू यायचा असतो तेव्हा तो येतोच. पण मानवी इतिहासात आजवर अशी अनेक माणसे होऊन गेली ज्यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूला देखील पळवून लावले होते. लेखिका गौरी कानेटकर यांनी या पुस्तकामध्ये मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या लेखणीबद्ध केलेल्या आहेत.
त्यांच्या या कहाण्यांमधून आपल्याला आजच्या युगातील खरे नायक आणि नायिका भेटतात. यामध्ये आहे अमेझॉनच्या जंगलात २१ दिवस भटकणारा युसी, युगांडामध्ये वंशच्छेदात तीन महिने बाथरूम मध्ये लपून काढणारी इमॅक्युली, जगातील सर्वात मोठी पर्वतरांग असणाऱ्या अँडीज पर्वताततून सुखरूप बाहेर येणारे नॅन्दो आणि रॉबर्ट, एका निर्मनुष्य जंगलात दाट धुक्यामध्ये हरवून देखील कष्टाने परतणारे बारा वर्षाचे पोर डॉन, विमान अपघातात जंगलात येऊन पडलेला जुलियन, १२७ तास दगडाखाली हात अडकलेला ऍरन, समुद्राच्या लाटांवर तब्बल १५ महिने जिवंत राहिलेला अलवरिंगा, निर्जन वाळवंटामध्ये हरविलेला रिकी आणि एका बर्फाळ बेटावर उणे ५७ तापमानात तग धरून राहिलेली अडा! यांच्या कहाण्या या कल्पनेच्या पलीकडील अशाच आहेत. हे नायक आणि नायिका ज्या परिस्थितीमध्ये जिवंत राहिले ती परिस्थिती निव्वळ मानवी जीवनासाठी अशक्य कोटीतीलच मानावी अशी आहे. पण त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जिवंत होती. त्याच इच्छाशक्तीच्या बळावर ते आलेल्या संकटाला तोंड देऊ शकले आणि त्यातून सुखरूप बाहेर देखील पडले. काहीजणांना नशिबाची साथ लाभली तरी देखील त्यांचा संघर्ष मात्र कमी नव्हता. यातील अनेकांनी काहीबाही खाऊन दिवस काढले व तग धरून राहिले.
मनुष्य प्राण्याखेरीज त्यांच्या ऐवजी जर इतर प्राणी असला असता तर कदाचित त्याचा मृत्यू झाला असता. पण मानवाचा कोणत्याही परिस्थितीत अंतिम क्षणापर्यंत तग धरून राहण्याचा गुणधर्म त्याला नेहमीच सहाय्य करत आला आहे. याची प्रचिती या पुस्तकातून आपल्याला येते. आपल्यातल्या प्रत्येकाला 'हरू नकोस हा शेवट नाही' हा संदेश हे सर्वजण देऊन जातात. खरोखर प्रेरणादायी अशा सत्य कहाण्या आपल्याला देखील ऊर्जा देऊन जातात! Sunday, November 6, 2022

फ्लॅट अर्थ सोसायटी: मूर्खांचा बाजार

दोन दिवसांपूर्वी फेसबुक वर एक मीम बघण्यात आले त्यात एका बातमीचा स्क्रीन शॉट होता. बातमी होती.

Flat Earthers say that they have community all around the globe!

फ्लॅट अर्थ आणि ग्लोब या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत! ग्लोब म्हणजे गोल जग. जगामध्ये पृथ्वी सपाट आहे, असे मानणारे देखील लोक आहेत याचे आश्चर्य वाटले. त्यांच्याविषयी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला व अतिशय वेगळी आणि आश्चर्यजनक माहिती समोर आली. पृथ्वी ही गोल नसून सपाट आहे, असे मानणारे लाखो लोक या जगात अस्तित्वात आहेत, असे समजले आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांची "फ्लॅट अर्थ सोसायटी" नावाचा जागतिक संस्था देखील बनवलेली आहे! दोन वर्षांपूर्वी या लोकांचे जागतिक संमेलन देखील भरले होते! 

Ref: https://physicsworld.com/wp-content/uploads/2020/07/Flat_Earth_illustration.jpg


पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते, हे निकोलस कोपर्निकस याने सर्वप्रथम सांगितले आणि सिद्ध देखील केले. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी पृथ्वी गोल आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केले होते. कालांतराने संपूर्ण जगाने देखील हे मान्य केले की पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते. परंतु एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्लंडमधील एका व्यक्तीने पृथ्वी नक्की गोल आहे का, यावर शंका उपस्थित केली आणि एका प्रयोगाद्वारे सिद्ध देखील केले की पृथ्वी गोल नसून सपाट आहे. पॅरालॅक्स नावाने हा व्यक्ती संबोधला जातो. इंग्लंडमध्ये एक दहा मैल लांबी असणारा सरळ कॅनॉल आहे. या कॅनॉलमध्ये दुर्बिणीचा वापर करून त्याने सिद्ध केले की पृथ्वी सपाट आहे! पृथ्वीला गोल म्हणणे ही वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे, असे त्याचे म्हणणे होते. त्याने अनेक चित्र विचित्र प्रयोग करून सपाट पृथ्वीची संकल्पना मांडली. हळूहळू पृथ्वी सपाट आहे हे मानणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत गेली. तुम्ही विश्वास करू शकत नाही की अमेरिकेमध्ये फक्त ८४ टक्के लोकांना वाटते की पृथ्वी गोल आहे आणि विशेष म्हणजे २० ते ४० या वयोगटातील ६४% लोकांनाच असे वाटते की पृथ्वी गोल आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी वैज्ञानिक दृष्ट्या चुकीची परंतु आपल्याला पटतील अशी कारणे देखील दिलेली आहेत. जसे की विमान हवेत उडताना पृथ्वीला समांतर उडत असते. त्याचा पुढचा भाग कधीच खालच्या दिशेने नसतो म्हणजे पृथ्वी सपाट आहे. विमानात तुम्ही समांतर पातळी तपासण्यासाठी चे उपकरण अर्थात लेवल इंडिकेटर नेले तर ते पूर्ण प्रवासात तुम्हाला समांतर पातळी दाखवते, असा जबरदस्त सिद्धांत "सपाट पृथ्वी" वाले मांडतात. त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीच्या कडेला मोठमोठाले बर्फाचे कडे आहेत ते तोडून तुम्ही जाऊ शकत नाही. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे पृथ्वीच्या दोन कडेला आहेत. असं सपाट पृथ्वीवाले म्हणतात.
विशेष म्हणजे त्यांच्या सिद्धांतानुसार पृथ्वी वगळता सूर्यमालेतील सर्व ग्रह हे गोल आहेत! पृथ्वीला जर सपाट म्हटले तर पूर्ण जगामध्ये एकच टाईम झोन वापरावा लागेल आणि दिवस बदलायचा असेल तर पृथ्वीला सूर्याभोवती नव्हे तर सूर्याला पृथ्वीभोवती फिरावे लागेल! ही सर्व मूर्खांची गंमत म्हणावी अशीच आहे. पृथ्वीला सपाट सिद्ध करणारे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्युबवर दिसून येतील. शिवाय "व्हॉट इफ" या सुप्रसिद्ध चॅनेलने देखील या विषयावर एक सुंदर डॉक्युमेंटरी तयार केली आहे. ती नक्की पहा. अर्थात "जर पृथ्वी सपाट असती तर?" या विषयावर ती असल्याने त्यांच्या म्हणण्यानुसार देखील पृथ्वी गोल आहे, असंच सिद्ध होतं. सपाट पृथ्वी सिद्धांत मांडणाऱ्या एका व्यक्तीने काही वर्षांपूर्वी स्वतःच रॉकेट तयार करून अवकाशात झेप घेतली होती! जेणेकरून त्याला हे सिद्ध करायचं होतं की, पृथ्वी सपाटच आहे. तर्कशास्त्र बाजूला ठेवलं तर सपाट पृथ्वीवाल्या मूर्खांच्या बाजारात आपण देखील सहजपणे सामील होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं काय करायचं?

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे

Tuesday, November 1, 2022

पुलावरच्या पाण्यातून...

किल्ल्याच्या दिशेने सकाळी सकाळीच कुच करण्याचे ठरवले. गुगल मॅपद्वारे रस्ता पंधरा किलोमीटरचा दाखवत होता. सकाळी रहदारी तशी नव्हती. महामार्गावर मात्र नियमित असणारी मालवाहतूक दिसून आली. पण थोड्याच वेळात आम्ही महामार्गातून बाहेर पडलो आणि हिरव्यागार झाडीतून किल्ल्याच्या दिशेने प्रवास करायला लागलो. यावर्षीचा पाऊस हा काही तुफानच होता. त्यामुळे परिसरातील कोणते धरण, तलाव वा नदी ओसंडून वाहिली नाही, असे झाले नाही. रस्त्यामध्ये थोड्याच अंतरावर लागूनच एक तलाव होता. तो देखील तुडुंब भरलेला होता. त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहत होते. आमचा रस्ता याच सांडव्याच्या कडेकडेने पुढे जात होता. विशेष म्हणजे पाणी सातत्याने वाहत होतं आणि रस्ता देखील पाण्याखाली गेला होता. रस्त्यावर बांधलेल्या पूलावरून देखील पाणी ओसंडून वाहत होते. पुलाचे कठडे दिसत असल्यामुळे रस्ता नेमका कुठे आहे, हे मात्र आम्हाला समजत होते. शिवाय येणारी जाणारी वाहने कमी असली तरी या रस्त्याने नेहमीची जाणारी असल्याने त्यांना परिचयाचा रस्ता होता. त्यांच्याच परिचयाचा वापर करून आयुष्यामध्ये पहिल्यांदाच इतक्या पाण्याने भरलेल्या रस्त्यामध्ये गाडी घातली. आजवर फक्त बातम्यांमध्येच असे व्हिडिओ पाहत आलो होतो. आज नाईलाजाने का होईना अशा रस्त्यावरून जाण्याची वेळ आली. पहिलीच वेळ असल्याने काहीसं थरारक असं चित्र दिसलं. केवळ एक ते दीड मिनिटांमध्ये पाण्याचा तो वाहणारा प्रवाह आम्ही पार केला. परतताना दुसऱ्या बाजूला एक मोठा खड्डा होता. अर्थात तो आम्हाला चुकवता आला नाही. पाण्याचा हा प्रवाह पार केल्यानंतर आम्हाला एसटी महामंडळाची बस देखील दिसून आली. म्हणजे ही बस या पाण्यातून नियमितपणे प्रवास करत असावी, हे देखील समजले. दुचाकीस्वार मात्र आमच्यापेक्षा मोठा थरारक अनुभव घेत असावेत, याची प्रचिती देखील आली. जाताना आणि परतताना अश्या दोन वेळा या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागले. पण तो अनुभव थरारक असाच होता!