Tuesday, January 9, 2024

गहिरे पाणी

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा गूढतेच्या दृष्टिकोनातून विचार केला की गुढकथा तयार होते. रत्नाकर मतकरी यांच्या कथेमध्ये गुढकथेचा हा सारासार विचार अतिशय प्रकर्षाने समोर येतो. निरनिराळे विषय घेऊन त्यातील घटनांमध्ये रहस्यमयता तयार करण्याची शैली केवळ मतकरींच्या लेखनामध्ये आहे, असे दिसते. “गहिरे पाणी” हा कथासंग्रह देखील रत्नाकर मतकरींच्या या शैलीची वाट जोपासणारा दिसतो. सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी अल्फा मराठी या पहिल्या खाजगी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या “गहिरे पाणी” या चित्रमालिकेच्या कथांचा हा संग्रह होय. यातून लेखकाच्या कल्पनाशक्तीचा अद्वितीय अविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक कथा एका वेगळ्या विषयाशी जोडलेली आहे. ती वाचायला सुरुवात केल्यानंतर शेवट केल्याशिवाय थांबवत नाही. मतकरींच्या कथांचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल. जवळपास प्रत्येक कथा ‘वाचनीय’ या प्रकारामध्ये मोडते. विशेष म्हणजे या कथांची चित्रमालिका देखील युट्युबवर उपलब्ध आहे. अशा सर्व कथांचा या संग्रहामध्ये समावेश नाही. परंतु या कथा वाचताना त्यातील चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते. काही कथा मतकरींच्या अन्य कथासंग्रहामध्ये देखील आहेत. तरीदेखील त्या वाचताना पुन्हा नव्याने काहीतरी वाचण्याचा आनंद देऊन जातात.

#BookReview #Book2024 #RatnakarMatkari 

एक दृष्टिकोन

पुण्यातील एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेमधील माझे काम आटोपून मी निघालो होतो. तळमजल्यावर कुणीच नव्हते. समोरून दोन विद्यार्थी काहीतरी शोधात येताना दिसले. त्यांनी मला हाक दिली आणि विचारले, “सर टॉयलेट कुठे आहे?” त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी भाषिक वाटत नव्हते. पण तरीदेखील त्यांनी मराठी भाषेतून हा प्रश्न विचारला, याचे मला आश्चर्य वाटले. त्यामुळे मी तात्काळ त्यांना स्वच्छतागृहाचा रस्ता दाखवला. जाता जाता त्यांच्यातील संभाषण माझ्या कानी पडले.
दोघेही उत्तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातून पुण्यात शिकायला आले होते. ज्या विद्यार्थ्याने मला विचारले तो इथे येण्याआधी पुणे शहराचा आणि इथल्या भाषेचा देखील अभ्यास करून आलेला होता! शिवाय मराठी भाषेत जुजबी प्रश्न विचारण्याचा सराव देखील त्याने केला होता. त्याचे मला विशेष कौतुक वाटले. कारण आजवर आपण पाहिलेच आहे की, उत्तरेतून आलेले लोक मराठी लोकांना गृहीत धरतात. आमची भाषा मराठी लोकांना येतच असेल, शिवाय तेच आमच्याशी आमच्या भाषेमध्ये बोलतील हे देखील त्यांना माहीत असतं. म्हणून महाराष्ट्र भूमीची मराठी भाषा शिकण्याची तसदी कोणी घेत नाही. परंतु या विद्यार्थ्याप्रमाणे दृष्टिकोन असेल तर त्यांच्याविषयी मराठी लोकांना देखील आपुलकी वाटेल. गरज कोणाला आहे हा प्रश्न नाही तर बाहेरून आलेले लोक इथल्या राज्याचा आणि भाषेचा किती सन्मान करतात? हे जास्त महत्त्वाचे. 


- तुषार भ. कुटे



Friday, January 5, 2024

आपली भाषा

रविवारचा दिवस. सकाळी बऱ्याच दिवसांनी बाहेर नाश्ता करण्यासाठी आम्ही जवळच्या एका हॉटेलमध्ये आलो. गर्दी फारशी नव्हती. आमची ऑर्डर दिली आणि वाट पाहू लागलो. शेजारच्या टेबलावर एक मराठी जोडपे येऊन बसले. अर्थात त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी आहेत, हे आम्हाला समजले. त्यांनी लागोलाग हॉटेलच्या वेटरला बोलावले. अर्थात याकरिता त्यांनी बहुतांश मराठी लोक गुलाम असलेल्या हिंदी भाषेचा वापर केला, हे वेगळे सांगायला नको! हॉटेलचे नाव मराठी, मालक मराठी आणि सर्व कर्मचारी देखील मराठीतच बोलत होते. तरी देखील मराठी लोकांना मुघली भाषेचा वापर का करावा वाटतो, हा मोठा प्रश्नच आहे.
त्या दोघांनी ऑर्डर दिल्यानंतर लगेचच माझ्या पत्नीने मला एक गोष्ट सांगितली,
“आपल्या इथल्या मराठी लोकांना सतत हिंदीची गुलामी करायची सवय झालेली आहे. कुठेही गेलं की, लगेच हिंदीत सुरू होतात. अशा लोकांचा मला भयंकर राग येतो!”
अर्थात हे सर्व त्यांना ऐकू जाईल अशा भाषेमध्ये ती बोलली. याचा परिणाम सकारात्मक दिसून आला. पुढच्या वेळेस जेव्हा शेजारच्या टेबलावरील ‘त्या’ने वेटरला हाक मारली त्यानंतर तो त्याच्याशी मराठीतच संवाद साधत होता. अगदी बिल देईपर्यंत!
कधी कधी मुघली भाषेची गुलामी करत असणाऱ्या मराठी लोकांना अशाच पद्धतीने टोमणे मारावेत, असं वाटतं. त्याशिवाय ते सुधारणार नाहीत. आणि आपली भाषा देखील अभिमानाने वापरणार नाहीत!

- तुषार भ. कुटे


Wednesday, January 3, 2024

अंतराळातील स्फोट

जवळपास २५ वर्षांपूर्वी एका वाचनालयामध्ये जयंत नारळीकरांचं “अंतराळातील स्फोट” हे पुस्तक वाचायला मिळाले. अभ्यास सोडून अवांतर म्हणून वाचलेलं माझ्या आयुष्यातील कदाचित हे पहिलंच पुस्तक होतं. नारळीकरांची ही विज्ञान कथा मला भयंकर आवडली. कदाचित याचमुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. यानंतर मी नारळीकरांच्याच प्रेषित आणि ‘वामन परत न आला ‘या कादंबऱ्या देखील वाचल्या. त्याही मला तितक्याच आवडल्या होत्या. कालांतराने मी स्वतःच्या पुस्तकांचा संग्रह करायला सुरुवात केली. काही वर्षानंतर मी वाचलेले ‘अंतराळातील स्फोट’ हे पुस्तक बाजारात शोधण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु ते काही मिळाले नाही. मागील आठवड्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सवात साहित्य अकादमीच्या स्टॉलवर हे पुस्तक मला अनपेक्षितरित्या दिसून आले. ते विकत घेतल्यानंतर अगदी दोन ते तीन तासांमध्ये वाचून संपवले. दोन दशकांपूर्वीच्या वाचन आठवणी जागृत करणारा हा प्रसंग होता!