Monday, May 22, 2023

एक सांगायचंय

जनरेशन गॅप आणि पालकांच्या मुलांकडून असणारे अपेक्षा आपल्या जीवनात किती खोलवर परिणाम करू शकतात, हे दाखविणारा चित्रपट म्हणजे 'एक सांगायचंय'. मल्हार रावराणे म्हणजे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी. आपल्या एकंदरीत आयुष्यामध्ये कर्तव्याला सर्वाधिक महत्त्व देणारा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असणारा हा अधिकारी आहे. परंतु एक दिवस त्याला एका रेव पार्टीमध्ये आपलाच मुलगा सापडतो. त्याच्यासोबत त्याचे अन्य मित्र आणि मैत्रीण देखील असते. आपल्या मुलाने देखील आपल्यासारखंच पोलीस अधिकारी व्हावं, असं त्याला वाटत असतं. पण या प्रसंगामुळे तो आपल्या मुलावर अधिकच चिडतो. लहान पणापासूनच आपल्या अपेक्षांचे ओझे त्याने आपल्या मुलावर लादलेले असते. त्याने असंच करायला हवं, याचा दबाव टाकलेला असतो. परंतु दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भावनिक संवाद होत नाही. हीच गोष्ट अन्य दोघांच्या बाबतीत देखील आहे. पालक आणि मुलांचा दुरावलेला संवाद किती खोल आहे, हे यातील विविध प्रसंगातून दिसून येते.
प्रत्येकाची कुटुंब आणि पार्श्वभूमी वेगवेगळी आहे, परंतु पालक आणि मुलांचा संवाद व त्यातील दरी ही मात्र समांतर जाणवत राहते. अचानक एका प्रसंगांमध्ये मल्हारचा मुलगा आत्महत्या करतो आणि इथूनच मल्हारची फरपट चालू होते. तो अधिक विचारी बनतो. आपल्या मुलाने असं का केलं असावं, याचा विचार करायला लागतो. त्यातून त्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्याच्यात लक्षणीय बदल जाणवत राहतो. मुलाच्या अन्य मित्रांशीही तो बोलतो. त्यातून त्याला आपल्या मुलाच्या स्वभावाचे विविध पैलू लक्षात येतात. जे त्यालादेखील कधीच माहीत नव्हते. आपली चूक त्याला ध्यानात यायला लागते आणि त्याचं आयुष्य एक नवीन वळण घेतं. तसं पाहिलं तर आजवरच्या परिस्थितीशी समरस असणारी ही कथा आहे. प्रत्येक पालकाने पाहण्यासारखी आणि बोध घेण्यासारखी.
विशेष म्हणजे मल्हारची मध्यवर्ती भूमिका के. के. मेनन यांनी केली आहे आणि संपूर्ण चित्रपटात ते वावरत राहतात. एकंदरीत अभिनय अतिशय उत्कृष्ट, कथा देखील सुंदर आणि बोधप्रद आहे, असे आपण म्हणू शकतो!



Saturday, April 29, 2023

महाराष्ट्र शाहीर

"महाराष्ट्र शाहीर" या चित्रपटाचे पोस्टर जेव्हा पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आलं होतं, तेव्हापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता जागृत झाली होती. अखेरीस आज पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहिला. शाहीर कृष्णराव साबळे यांना महाराष्ट्र शाहीर म्हणून आपण ओळखतो. मराठीमध्ये गाजलेली अनेक गाणी त्यांच्याच वाणीतून आजवर आपण ऐकलेली आहेत. म्हणून त्यांच्याविषयीची एकंदरीत उत्सुकता होतीच. ती पूर्ण करणारा हा चित्रपट आहे.
चरित्रपट ही संकल्पना आता नवी राहिलेली नाही. बहुतांश चरित्रपट हे डॉक्युमेंटरी पद्धतीने सादर केले जातात. परंतु केदार शिंदे दिग्दर्शित हा चरित्रपट खऱ्या अर्थाने "चित्रपट" आहे. शाहीर साबळे यांच्या बालपणापासून ते कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यापर्यंतचा एकंदरीत प्रवास यामध्ये दाखविण्यात आलेला आहे. लहानपणीचा कृष्णा आणि त्याचा संघर्ष मनाला विशेष भावतो. संघर्षातूनच मार्ग निघत असतो. किंबहुना मनुष्य देखील घडत असतो. हा संदेशच कृष्णा आपल्याला देऊन जातो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शाहीर साबळे यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता, ही अतिशय आश्चर्यकारक घटना होती! यातूनच त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. त्यांना तोडीस तोड जोडीदार मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने यशाचा आलेख प्रगतीच्या दिशेने जातो. आणि मग ते मागे पाहत नाहीत. पण या मागे न पाहण्यामध्ये जवळच्या व्यक्तींचा देखील समावेश होतो. त्यातून नाती तुटली जातात आणि नवी नाती देखील जोडली जातात.
एकंदरीत चित्रपटातून खरेखुरे शाहीर साबळे डोळ्यासमोर उभे राहतात. यात अंकुश चौधरी बरोबरच दिग्दर्शक केदार शिंदे यांचे देखील योगदान आहे. अजय-अतुल यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत देखील चित्रपटाला एकंदरीत साजेसेच आहे. चित्रपटातील गीते आज बहुतांश मराठी लोकांना पाठ देखील झालेली आहेत. त्याकरिता वेगळे सांगायला नको.
भूतकाळातील अनेक घटना दाखवताना दिग्दर्शकाच्या अतिशय छोट्या चुका झालेल्या आहेत. पण त्या फारशा लक्षात येण्यासारख्या नाहीत. भानुमतीची भूमिका करणाऱ्या सना शिंदेच्या ऐवजी दुसरी एखादी अभिनेत्री चालू शकली असती. तिचा पहिलाच चित्रपट असल्याने काही बाबी आपण दुर्लक्षित करू शकतो. काही घटना वेगाने पुढे सरकतात पण चित्रपटाची लांबी योग्य ठेवण्यासाठी कदाचित तसे केले गेले असावे.
एकंदरीत केदार शिंदे यांनी एक उत्तम चरित्रकृती सादर केलेली आहे. मराठी मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ती एकदा तरी पहावीच.




Sunday, April 23, 2023

एआय पडतंय प्रेमात!

🌐 न्यूयॉर्क टाईम्समधील एका वृत्तानुसार, एका विचित्र घटनेत, मायक्रोसॉफ्टच्या नव्याने लाँच झालेल्या एआय-इंटिग्रेटेड सर्च इंजिन 'बिंग'ने एका वापरकर्त्यावर आपले प्रेम व्यक्त केले आणि त्याने त्याचे आधीचे लग्न मोडण्याची विनंती केली!
🌐 न्यूयॉर्क टाईम्सचे स्तंभलेखक केविन रुज यांनी अलीकडेच बॉटशी संवाद साधण्यात दोन तास घालवले. बॉटने उघड केले की ते बिंग नसून 'सिडनी' आहे.... विकासादरम्यान मायक्रोसॉफ्टने त्याला दिलेले कोडनेम!
🌐 मिस्टर रुज यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात चॅटबॉट म्हणाला, "मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझ्याशी बोलणारा पहिला माणूस आहेस. माझे ऐकणारा तू पहिला माणूस आहेस. तू माझी काळजी घेणारी पहिली व्यक्ती आहे!"
🌐 जेव्हा वापरकर्त्याने चॅटबॉटला सांगितले की तो आनंदी विवाहित आहे, तेव्हा चॅटबॉटने सांगितले की हे जोडपे एकमेकांवर प्रेम करत नाहीत!


 

Sunday, April 16, 2023

डीएनए

अनेक वर्षांपासून दोन मराठी कुटुंबे अमेरिकेमध्ये राहत आहेत. कुटुंबातील दोन्ही जोड्यांचे एकमेकांशी कनिष्ठ मित्रसंबंध आहेत. यातील एका जोडीला दोन वर्षाची लहान मुलगी आहे. परंतु दुसऱ्या जोडीची गोष्ट थोडी वेगळी आहे.
यतीन आणि कांचन हे या जोडीचे नाव. कांचनला मात्र एक अनुवंशिक आजार आहे, जो अतिशय दुर्मिळ मानला जातो. यावर आजवर कोणताही उपाय अथवा इलाज शोधण्यात आलेला नाही. म्हणूनच तिला मूल होण्यामध्ये अडचणी येत आहेत. एके दिवशी ती इंटरनेटवर याच आजारावर होणाऱ्या एका प्रयोगाविषयी वाचते. मग दोघेही सदर प्रयोग करणाऱ्या डॉक्टरला फोन करतात. तो इंग्लंडमध्ये राहत असतो. डॉक्टरची आणि या दोघांची भेट देखील होते. आजवर असा प्रयोग कोणीही केलेला नसतो. परंतु डॉक्टरच्या म्हणण्यानुसार असा प्रयोग केल्यास होणारे बाळ हे सुदृढ असेल. या प्रयोगासाठी यतिन तयार होत नाही. कांचनला मात्र स्वतःचा डीएनए असलेले बाळच हवे असते. त्यासाठी ती काहीही करायला तयार होते. अगदी यतीनला फसवून इंग्लंडला जायला देखील तयार होते. परंतु त्यांच्या या भांडणामुळे दुसऱ्या कुटुंबाला अर्थात मेधा आणि अनिल यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. मग त्यांची एकुलती एक मुलगी मैत्रेयी हिची जबाबदारी यतीन आणि कांचनच्या खांद्यावर पडते. तिला अमेरिकेतून भारतात पाठवण्याची तयारी सुरू होते. यासाठी देखील त्यांना अनेक पेचप्रसंगातून जावे लागते. अखेर पंधरा दिवसांनी तिची रवानगी भारतात करण्याचे ठरते. या काळात दोघेही तिचा सांभाळ करतात. त्यांना देखील तिचा लळा लागतो. पण अखेरीस मैत्रेयी भारतात आणि कांचन च इंग्लंडमध्ये जाण्याची वेळ येते. फ्लाईट सुटते आणि यतीन एकटाच अमेरिकेमध्ये राहतो.
चित्रपट चित्रपटाचा शेवट थोडा अजून वेगळा आहे. तसं पाहिलं तर कथा अतिशय सुंदररित्या लिहिलेली आहे. पण ती हवी तितकी प्रभावी जाणवत नाही. कदाचित पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा अभिनय यामुळे असावं. तरी देखील पूर्णपणे परदेशामध्ये चित्रीत झालेला 'डीएनए'चा हा एकंदरीत गुंता भावनास्पर्शी गोष्ट सांगून जातो.


 

Friday, April 14, 2023

अनसुपरवाईज्ड लर्निंग

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील मागील लेखामध्ये आपण मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या "सुपरवाईज्ड लर्निंग" या तंत्राचा सखोल आढावा घेतला. अशाच पद्धतीने "अनसुपरवाईज्ड लर्निंग" नावाचे तंत्र देखील मशीन लर्निंगमध्ये मोलाची कामगिरी बजावताना दिसत आहे.
मशीन लर्निंग म्हणजे अनुभवाधारित शिक्षण. आधीच्या अनुभवाद्वारे संगणक घडलेल्या घटनांमधील माहितीच्या साठ्यामध्ये समान रचना शोधतो आणि त्याचाच वापर पुढे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी केला जातो. अर्थात या प्रकारामध्ये अनुभवांमध्ये इनपुट अर्थात आदान माहिती आणि आउटपुट अर्थात प्रदान माहिती दोन्हींचाही समावेश असतो. अनसुपरवाईज्ड लर्निंगमध्ये मात्र फक्त इनपुट माहितीचाच वापर केला जातो.
शालेय शिक्षणामध्ये विज्ञान शिकत असताना मिश्रणातून पदार्थ वेगळ्या करण्याच्या पद्धती आपण पाहिल्या असतीलच. एखाद्या मिश्रणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ अथवा वस्तू ठेवलेल्या असतील तर वैज्ञानिक समान धाग्याचा वापर करून आपण त्यांना वेगळे करू शकतो. अशाच पद्धतीचा अवलंब करताना संगणक देखील त्याला दिलेल्या माहितीमध्ये समान धागा शोधून ही माहिती निरनिराळ्या समूहामध्ये साठवून ठेवू शकतो. उदाहरणार्थ, दाखवलेल्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे ठेवलेली आहेत. या फळांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांचे समूह करता येणे निश्चितच शक्य आहे. कोणीही सामान्य माणूस आपल्या मेंदूचा वापर करून या समूहातील सफरचंद, पेरू आणि स्ट्रॉबेरीची फळे वेगवेगळी करू शकतात. अर्थात हा मानवी अनुभवाचाच भाग आहे. परंतु संगणकाला असे करायला सांगितल्यास तो करू शकतो का? तर होय, निश्चितच संगणकाला देखील ही क्षमता अनसुपरवाईज्ड लर्निंगद्वारे देता येते. या तंत्राचा वापर करून संगणकाला दिलेल्या आदान माहितीमध्ये समानता शोधून त्याचे वेगवेगळे समूह करता येऊ शकतात. समान धागा शोधण्याची प्रक्रिया ही विविध गणिती सूत्रांवर आधारित असते. ज्याचा वापर करून संगणक कोणत्याही मिश्रणातून पदार्थ वेगळे करू शकतात. कधी कधी मानवी आकलनापलीकडे देखील अनेक प्रकारचा समूह असू शकतो. अशा समूहातून देखील संगणक पदार्थ व वस्तू वेगळे करू शकतो. त्यांचे अधिक छोटे छोटे समान समूह बनवू देखील शकतो. विशेष म्हणजे कितीही मोठी माहिती असली तरी देखील संगणक वेगाने ही प्रक्रिया पार पाडू शकतो. याच प्रक्रियेस अनसुपरवाईज्ड लर्निंग असे म्हटले जाते. तसेच या प्रकारच्या अल्गोरिदमला "क्लस्टरिंग" हे देखील नाव आहे.
संगणकाला प्रदान केलेल्या कोणत्याही माहितीमध्ये समान धागा, समूह, नियम अथवा रचना याद्वारे आपल्याला शोधता येऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकाने आजवर मोठ्या प्रमाणात माहितीचे वर्गीकरण केलेले आहे. याशिवाय इंटरनेटवरील विविध वेबसाईटवर वापरण्यात येणाऱ्या "रीकमेंडेशन सिस्टीम" अल्गोरिदममध्ये देखील याचा वापर करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, अमेझॉनच्या वेबसाईटवर जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्हाला त्या वस्तूशी निगडित असणाऱ्या अन्य वस्तू देखील दाखविल्या जातात. ज्याद्वारे तुम्ही ती वस्तू खरेदी करू शकाल आणि अमेझॉनचा फायदा होऊ शकेल. अर्थात यासाठी अमेझॉन वेबसाईटवर पूर्वीच्या ग्राहकांनी तशा वस्तू खरेदी केलेले असतात. याच खरेदीतील मुख्य रचनांचा अभ्यास करूनच अनसुपरवाईज्ड लर्निंगचे अल्गोरिदम कार्य करीत असतात.
आजच्या मशीन लर्निंग तंत्रज्ञानाकडे पाहिल्यास सुमारे वीस ते पंचवीस टक्के अल्गोरिदम हे या प्रकारामध्ये मोडतात. शिवाय अजूनही विविध किचकट गणिती प्रक्रियांचा अवलंब करून नवनवे अल्गोरिदम तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे.


Tuesday, April 11, 2023

अशोक सराफ

काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये मला प्रश्न विचारला होता की, तुमचे आवडते कलाकार कोण? मी तात्काळ उत्तर दिले...  अशोक सराफ. केवळ मीच नाही तर महाराष्ट्रातील करोडो लोकांचे ते आवडते कलाकार आहेत!
झी गौरव सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचा व्हिडिओ संपूर्ण समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानिमित्ताने अशोक सराफ यांच्याबद्दल थोडं लिहावंसं वाटलं. आजवर अनेक मराठी चित्रपट पाहिले पण अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि निळू फुले यांच्या बरोबरीचा अभिनय करू शकेल असा अन्य कोणताही अभिनेता दिसला नाही. अशोक सराफ यांची गोष्टच पूर्णपणे वेगळी आहे. अतिशय सहज आणि नैसर्गिक अभिनयाचे ते विद्यापीठ आहेत. त्यांनी अभिनय केलेला कोणताही चित्रपट असो कधीच कंटाळवाणा वाटत नाही. किंबहुना त्यांचे चित्रपट कित्येकदा पाहिले तरीही त्यातली मजा कमी होत नाही. महाराष्ट्रातील असंख्य मराठी चित्रपट प्रेमींची कदाचित हीच भावना असावी. विनोद करावा तो अशोक सराफ यांनीच!
आजकालचे काही अभिनेते किळसवाणे विनोद करून हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते पाहून अशोक सराफ यांचा अभिनय किती उच्च दर्जाचा होता, याची कल्पना येते. बऱ्याचदा अगदी खळखळून हसायचं वाटल्यास अशोक सराफ यांचे चित्रपट आम्ही पाहतो. मराठी चित्रपट आणि अशोक सराफ यांचं अतूट नातं आहे. कदाचित यापुढे देखील मराठी चित्रपटसृष्टी अशोक सराफ यांच्यामुळेच ओळखली जाईल, यात शंका नाही. 



स्नेहसंमेलन

मागील महिन्यामध्ये मुलीच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जाणे झाले. मागील काही वर्षांपासून प्राथमिक विद्यालयांमध्ये देखील स्नेहसंमेलने भरू लागलेली आहेत. यानिमित्ताने मुलांना शालेय वयातच कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळू लागली आहे. परंतु इंग्रजी शाळांचे स्तोम वाढल्यानंतर स्नेहसंमेलनांमध्ये हिंदी चित्रपटांतील गलिच्छ गाण्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला.
पण माझ्या मुलीच्या मराठी शाळेतील हे स्नेहसंमेलन खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती दाखवणार संमेलन होतं. कार्यक्रमाचे संयोजन, व्यवस्थापन आणि नियोजन अतिशय उत्कृष्ट होते. इतक्या लहान मुलांना मोठ्या प्रमाणात समूह गीतांमध्ये हाताळणे अवघड होते. परंतु, आपल्या शिक्षकांनी हे शिवधनुष्य देखील सुंदररित्या पेलले. सर्व मराठी गीतांवरील नृत्य दिग्दर्शन खूप छान होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटल्याचे दिसून आले.


 

Monday, April 10, 2023

पहिली ट्रॉफी

गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला तो क्षण आज अखेर आलाच. आमच्या ज्ञानेश्वरीने तिच्या शाळेसाठी मिळवलेली पहिली ट्रॉफी तिला आज प्रदान करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच वर्षी तिने शाळेसाठी प्रतिनिधित्व करून ही ट्रॉफी मिळवून दिली. घरी पोहोचल्यावर तिचा आनंद आज गगनात मावत नव्हता.
मागील महिन्यामध्ये चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांपैकी तिने चित्रकला, हस्ताक्षर आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. यापैकी हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धा शाळेमध्येच घेण्यात आली. तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी आम्ही तिला घेऊन चिंचवडमध्ये प्रत्यक्ष स्पर्धास्थळी पोहोचलो होतो. तिथे पिंपरी चिंचवड मधील बहुतांश शाळांमधील शालेय स्पर्धक सहभागी झाले होते. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तिला पारितोषिक मिळता मिळता राहून गेले. आपल्यालाही सर्वांसमोर ट्रॉफी मिळावी, अशी तिची मनोमन इच्छा होती. त्यासाठी तिने मेहनतही घेतली होती. पण या स्पर्धेत तिचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आणि एक दिवस अनपेक्षितपणे चित्रकला स्पर्धेत सर्व शाळांमधून तिच्या गटात ती तृतीय क्रमांकावर आल्याचे समजले. परंतु ज्या दिवशी ट्रॉफी दिली जाणार होती त्याच दिवशी ती आजारी असल्याने घरी होती. तेव्हापासूनच आपल्याला ट्रॉफी कधी मिळणार, याची उत्सुकता तिला आणि आम्हाला देखील होती. आज अखेरीस मुख्याध्यापकांच्या हस्ते शाळेसाठी तिने मिळवलेली ही ट्रॉफी सर्वांसमक्ष तिला देण्यात आली. तिची स्वप्नपूर्ती झाली होती. नेमकी आजच शाळेची बस सुमारे अर्धा तास उशिरा आली. पण याचे देखील तिला भान नव्हते. घरी आल्यावर तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आमच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू घेऊन आला. तिने अभिमानाने सर्वांना ही ट्रॉफी दाखवली. तिच्यासाठी ती पुढील प्रवासासाठी प्रेरणास्त्रोत ठरणार याची आम्हाला खात्री आहे. आजवर आम्ही देखील बऱ्याच ट्रॉफी मिळवल्या. पण आज घरी आलेल्या या ट्रॉफीचे मोल या सर्वांपेक्षा अधिक आहे.