Friday, March 11, 2022

उत्तररंग - वाट चुकलेले नारायण धारप

वाट चुकलेले नारायण धारप असं या कादंबरीचं वर्णन करावं लागेल. कारण असं की, नारायण धारप म्हटलं की रहस्य कथा, भयकथा, गूढकथा आणि विज्ञान कथा समोर येतात. परंतु नारायण धारपांच्या या प्रतिमेला छेद देणारी कादंबरी म्हणजे "उत्तररंग" होय.
सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्येच धारपांनी ही एक #कौटुंबिक कादंबरी असल्याचं म्हटलं होतं. परंतु या पूर्वीची त्यांची सर्वच पुस्तके मी एकाच रसांमध्ये वाचल्यामुळे त्यांना मी या प्रस्तावनेमुळे मध्ये फारसे गांभीर्याने घेतले नाही! अर्थात त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही पूर्णतः कौटुंबिक अशीच #कादंबरी आहे. उतारवयाकडे प्रवास करत असलेल्या दोन स्त्री-पुरुषांची योगायोगाने भेट होते. दोघांच्याही मुलांची लग्न झालेली आहेत. शिवाय दोघेही सध्या एकटेच राहत आहेत. अर्थात त्यांचे जोडीदार मात्र त्यांच्यासोबत नाहीत. त्यामुळे जीवनात एकटेपणा तयार झालेला आहे. यातूनच तो अर्थात कथेचा नायक नायिकेला लग्नाची मागणी घालतो. ती मात्र विचारात पडते. परंतु सारासार विचार करून ती लग्नाला होकार देते. मग प्रश्न उरतो तो दोघांच्याही मुला-मुलींना ही बातमी सांगण्याचा. यामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनाच्या, स्वभावाच्या मुलांची संसारांमध्ये एन्ट्री होते. अर्थात या त्यात फारसा ड्रामेबाजपणा दिसून येत नाही. दोघेही व्यवस्थितपणे मुलांना आपली बाजू सांगतात. शिवाय एकमेकांची ओळख देखील करून देतात. नायकाच्या पत्नीविषयीचा एक 'ट्विस्ट' मात्र यात येऊन जातो. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही #रहस्य कादंबरीमध्ये नाही.
खरंतर कादंबरी वाचत असताना काहीतरी वेगळे रहस्य खुलेल, असं सातत्याने वाटत राहतं. पण आपला अपेक्षाभंग होतो! हा अपेक्षाभंग खरंतर नारायण धारपांच्या शेकडो रहस्य कादंबऱ्या वाचल्यामुळेच होतो, हेही तितकंच सत्य आहे. मग अगदी साधा सरळ प्रवास करत कादंबरी कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहोचते आणि नायक नायिकेच्या सुखी संसाराचा दुसरा टप्पा सुरू होतो.
#नारायण #धारप यांच्या भयकथा, रहस्यकथा तर भरपूर वाजता येतील परंतु कौटुंबिक कादंबरी मात्र सापडणे मात्र विरळाच. या प्रकारातील वाचनाची भूक भागवायची असेल तर 'उत्तररंग' ही एक उत्तम कादंबरी आहे. त्यामुळे वाट चुकलेले धारप आपल्याला या कादंबरीतून दिसून येतील.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे Wednesday, March 9, 2022

एक अनपेक्षित शेवभाजी

महाराष्ट्रीय पदार्थ काही विशिष्ट हॉटेलमध्ये अतिशय चवदार भेटतात. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे शेव भाजी होय. नाशिकला असताना मेसच्या डब्यामध्ये आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी शेव भाजी यायची. त्यामुळे ती खाऊन खाऊन कंटाळा आला होता. म्हणूनच हॉटेलमध्ये गेलो तरी कधीही नंतर मी शेव भाजी खाल्ली नाही! पण इतक्या वर्षांनंतर घारगावच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये उत्तम शेव भाजी खायला मिळाली. काही भाज्या विशिष्ट पद्धतीमध्ये बनवल्या तरच छान चवदार होतात. शेव भाजीचं देखील असंच आहे. घारगावच्या 'हॉटेल श्री लक्ष्मी'मध्ये अशीच उत्तम शेव भाजी खायला मिळाली. त्यासाठी आम्ही २५ किलोमीटरचा प्रवास करत (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) गेलो होतो!
पुणे-नाशिक महामार्गावर घारगाव हे असे एकमेव गाव आहे, ज्याला बायपास बनवण्यात आलेला नाही. हायवेवरील उड्डाणपूल गावामधूनच जातो. या उड्डाणपुलामुळे गावामध्ये असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा संपर्क हायवेशी तुटलेला आहे. यातीलच एक 'हॉटेल श्री लक्ष्मी' होय. उड्डाणपुलाच्या पूर्वेला खाली हे अतिशय साधे हॉटेल आहे. इथे शेव भाजीची स्पेशल प्लेट मिळते. तसेच आपण दह्याची सुद्धा वेगळी प्लेट घेऊ शकतो. अत्यंत उत्कृष्ट अशी चव या भाजीला आहे. मी कधी विचारही केला नव्हता की, भविष्यात पोट भरून शेव भाजी खाईल! काही गोष्टी अश्याच अनपेक्षित असतात, त्या अशा!
विशेष म्हणजे 'हॉटेल श्री लक्ष्मी' असे नाव असणाऱ्या या हॉटेलचे मालक रऊफभाई शेख नावाचे मुस्लिम आहेत! शहरात असं कधीच बघायला मिळणार नाही. मात्र गावाकडे अजूनही ही परंपरा सुरु आहे, याचे विशेष वाटते. 
Tuesday, March 8, 2022

ब्रीफ आन्सर्स टू दि बिग क्वेश्चन्स

#पुस्तक_परीक्षण
📖 ब्रीफ आन्सर्स टू दि बिग क्वेश्चन्स
✍️ स्टीफन हॉकिंग (अनुवाद प्रणव सखदेव)
📚 मंजुल पब्लिशिंग हाऊस

वर्षानुवर्षे असणाऱ्या विज्ञानाविषयीच्या अज्ञानातून अनेक अंधश्रद्धा तयार झाल्या. निसर्गातील अनेक गोष्टी या मनुष्याला अचंबित करणाऱ्या व अनुत्तरीत अशा वाटत होत्या. त्यातूनच मानवी मनातून नवनव्या संकल्पना पुढे आल्या. आपण अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे कुणावर तरी सोपवून दिली. परंतु जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसं निरनिराळी रहस्य मानवासमोर उलगडू लागली. परंतु आजही अनेक रहस्यांचा भेद झालेला नाही. बरेच प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. विज्ञानाद्वारे या प्रश्नांचा व त्यांच्या उत्तरांचा शोध घेण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे. कदाचित ती यापुढेही अव्याहतपणे चालू राहील. अशाच अनेक प्रश्नांची थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी वैज्ञानिक दृष्ट्या दिलेली उत्तरे म्हणजे हे पुस्तक होय.
महान खगोल वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचं हे शेवटचं पुस्तक आहे. त्यामुळे या पुस्तकाविषयी उत्सुकता तर होतीच. त्यांनी या पुस्तकामध्ये खालील प्रश्नांची सविस्तरपणे विवेचनासह वैज्ञानिकदृष्ट्या उत्तरे दिलेली आहेत.
- देव खरच आहे का?
- हे सगळं कसं सुरू झालं?
- भविष्यात काय घडेल, याचं पूर्वानुमान लावू शकतो का?
- कृष्णविवराच्या आत काय असतं?
- विश्वात इतरत्र कुठे बौद्धिक जीवसृष्टी आहे का?
- आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपल्याला मागे टाकेल का?
- आपल्या भविष्याला आकार कसा द्यायचा?
- आपण पृथ्वीवर तगून राहू का?
- अंतराळात आपण वसाहती केल्या पाहिजेत का?
- काळ प्रवास शक्य आहे का?
खरं तर हे सर्वच प्रश्न अतिशय उत्सुकतेने भरलेली आहेत. प्रत्येकालाच या विषयी जाणून घ्यायचं आहे. या उत्सुकतेची पूर्तता करणारे पुस्तक स्टीफन हॉकिंग सारख्या उच्च बुद्धिमत्ता असणाऱ्या वैज्ञानिकाकडून आपल्याला मिळतं. एखाद्या शास्त्रज्ञाची बौद्धिक पातळी किती उच्च असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हॉकिंग होय. विशेष म्हणजे पुस्तक वाचताना मागील शतकातील महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्याबद्दल अनेकदा उल्लेख येतो. हॉकिंग यांना आईन्स्टाईन बद्दल असणारी आपुलकी व आदर पदोपदी जाणवत राहतो. विश्वाच्या दृष्टीने आपण क्षुल्लक बाब आहोत, याची देखील जाणीव करून हे पुस्तक देतं. या पुस्तकाद्वारे विश्वरचनाशास्त्र नावाच्या भौतिकशास्त्राच्या नव्या शाखेची माहिती मिळाली. शिवाय हॉकिंग यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या आजाराबद्दल लिहिलेले आहे. त्यामुळे त्यांची त्याकाळची पार्श्वभूमी देखील लक्षात आली. शरीराने अपंग असलेल्या एक व्यक्ती किती उच्च पातळीवर विचार करू शकतो, याची प्रचिती पुस्तक वाचताना निश्चितच येते. विज्ञानावर प्रेम करणाऱ्या, पृथ्वीच्या पर्यावरणाविषयी आपुलकी असणाऱ्या व वैज्ञानिक विचारसरणी अनुसरण करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक वाचनीय असंच आहे.

Ⓒ तुषार भ. कुटे
Monday, March 7, 2022

पवनाकाठचा धोंडी

गो. नी. दांडेकर म्हटलं की, साहित्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेल्या दुर्गांचे दर्शन होतं. गोनीदांचे साहित्य म्हणजे याच सह्याद्रीच्या रांगड्या परिसरात रमलेलं मराठी ग्रामीण साहित्य आहे. 'माचीवरला बुधा' या कादंबरीमध्ये पहिल्यांदा ते अनुभवायला मिळालं. त्यांचीच 'पवनाकाठचा धोंडी' ही अशाच बाजाची कादंबरी आहे. पवन मावळामधील पवना नदीच्या काठावर वसलेला 'तुंग' दुर्ग आहे. याच दुर्गाचा हवालदार धोंडी याची ही गोष्ट.
शिवाजी महाराजांच्या काळापासून तुंगीच्या देखरेखीची जबाबदारी धोंडीच्या घराण्याने पार पाडलेली आहे. आज तो या घराण्याची परंपरा पुढे नेतो आहे. त्याचा त्याला सार्थ अभिमान आहे. शिवाय याच कारणामुळे पंचक्रोशीमध्ये त्याला मान मिळतो आहे. त्याने हवालदार म्हणून आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. कधीही कोणाशी दुजाभाव केलेला नाही. तो इमानी आहे आणि आपल्या तत्त्वांशी बांधील आहे. परंतु त्याचा भाऊ कोंडी मात्र त्याच्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आहे. तो काहीसा बंडखोर जाणवतो. याच कारणामुळे पवनाकाठी राहणाऱ्या या धोंडीच्या आयुष्यात निरनिराळ्या घटना घडतात. मात्र तो आपली तत्वे सोडत नाही.
अशी पार्श्वभूमी असणारी ही कादंबरी म्हणजे 'पवनाकाठचा धोंडी'. सुरुवातीला कथेला रंग चढायला थोडासा वेळ लागतो. नंतर ती हळूहळू वाचकाच्या मनाचा पकड घ्यायला लागते व आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. पवनाकाठच्या धोंडीचे व्यक्तिमत्व गोनीदांनी अतिशय उत्तमरीत्या रेखाटलेले आहे. विशेष म्हणजे कोंडी आणि सारजा तसेच सरू आणि धोंडी या दीर-भावजयाचं नातं अतिशय उत्तमरित्या या पुस्तकांमधून रंगवलेले आहे. शेवटी शेवटी कादंबरी भावनात्मक करून सोडते. म्हणजेच तोवर आपण कादंबरीमध्ये पूर्णपणे गुंतत गेलो असतो. हीच तर गोनीदांच्या लेखणीची जादू आहे. या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती देखील झालेली आहे. परंतु सध्या हा चित्रपट इंटरनेटवर कुठेही उपलब्ध नाही.Sunday, March 6, 2022

पावनखिंड चित्रपट का पाहावा?

पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मागच्या दोन आठवड्यांमध्ये चित्रपटाविषयीच्या तसेच चित्रपट आवडल्याच्या प्रशंसक पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर येत आहेत. एखाद्या मराठी चित्रपटाविषयी मागील काही वर्षांमध्ये मराठी प्रेक्षक भरभरून बोललेले नाहीत. पावनखिंडने मात्र ही कमी भरून काढली. त्याबद्दल मराठी प्रेक्षकांचे धन्यवादच म्हणायला हवेत. अर्थात एकंदरीत चित्रपट लोकांना आवडतो आहे, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे मी चित्रपटाचे परीक्षण करत बसणार नाही. माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की, पावनखिंड चित्रपट का पाहावा?
मागच्या काही वर्षांपासून नवी पिढी ही शालेय शिक्षणात मातृभाषेपासून दुरावलेली दिसते. सर्वांनाच हे इंग्रजीच वेड लागलेलं आहे. इंग्रजीत शिकलं की आपण फार मोठे होऊ शकतो, अशी भावना अनेकांच्या मनात रुजू होताना दिसते आहे. त्यामुळेच येणारी नवीन पिढी आता आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळांमध्ये शिकताना दिसते आहे. याच आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळांमध्ये महाराष्ट्राचा तसेच मराठ्यांचा इतिहास कितपत शिकवला जातो, हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यांच्या शालेय इतिहासामध्ये मोगलांच्या गौरवशाली(?) इतिहासाबरोबर दोन वाक्यात शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो. तोही औरंगजेब सारख्या 'महान' बादशहाला त्रास देणारा एक माणूस दक्षिणेमध्ये होता, असा सारांशरुपी इतिहास तुमच्या मुलांना समजणार आहे. म्हणजेच त्यांच्या लेखी महाराष्ट्राच्या इतिहासाची किंमत शून्य आहे. याच कारणास्तव महाराष्ट्राच्या नवीन मराठी पिढीला आपला इतिहास समजणारच नाही.
भारताच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये महाराष्ट्राचे सर्वोच्च योगदान राहिलेले आहे. महाराष्ट्राची परंपरा संघर्षाची, बलिदानाची, आत्मसमर्पणाची व अत्युच्च राष्ट्रवादाची आहे, हे आजवर महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी तेजस्वी पुरुष या मातीत जन्मला, हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. परंतु आंतरराष्ट्रीय इंग्रजी पुस्तके या इतिहासाला क्षुल्लक महत्त्व देतात. मग आपला इतिहास आपल्या पुढच्या पिढीला समजणार तरी कसा? इंग्रजीमध्ये तयार होणारे काल्पनिक चित्रपट आणि काल्पनिक हिरो यातच नवी पिढी गुंगवून ठेवायची का? आपले दिवंगत खरे खरे हिरो या पिढीला कधी समजणार? त्यांचा पराक्रम पुढच्या पिढीला दाखवायचा असेल तर शिवकालावर आधारित असे अनेक चित्रपट तयार व्हायला हवेत. तसेच मराठी पालकांनी ते आपल्या पाल्यांना दाखवायला देखील हवेत. तरच आपले पूर्वज किती पराक्रमी होते, याची माहिती नवीन पिढीला होईल.
पाश्चिमात्य देशांमध्ये होऊन गेलेल्या महापुरुषांइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा तेजस्वी महापुरूष महाराष्ट्राच्या मातीत जन्मले. परंतु महाराष्ट्रीय जनतेला आजही त्यांची माहिती नाही. आपण ऐतिहासिक पुस्तके वाचत नाही. त्यामुळे चित्रपट हे सर्वसामान्यांसमोर आपला जाज्वल्य इतिहास पोचविण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. यापुढेही शिवाजी महाराजांवर आधारित अनेक चित्रपट तयार होतील. त्यातून मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा मांडली जाईल. या चित्रपटांना देखील असाच प्रतिसाद मिळत राहो व आपला इतिहास सर्वदूर पोहोचो, हीच अपेक्षा.
टीप: तुम्हाला कोणताही मराठी चित्रपट आवडला असल्यास त्याचे रेटिंग आयएमडीबी (IMDB) या आंतरराष्ट्रीय वेबसाईटवर नक्की द्या! आपल्या चित्रपटाची प्रशंसा आपण केली तरच जग करेल, हे लक्षात असू द्या. Saturday, March 5, 2022

एक सर्वकालीन महान लेगस्पिनर

नव्वदच्या दशकामध्ये आम्हाला #क्रिकेट सामने पाहण्यासाठी टीव्ही समोर बसायला लावणारे अनेक दिग्गज होते. भारतीय खेळाडू प्रमाणेच अन्य देशातील अनेक खेळाडूंची नावे देखील यात घेता येतील. यातीलच एक खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न होय. कालच हृदयविकाराने शेन वॉर्न यांची प्राणज्योत मालवली आणि एका महान फिरकी गोलंदाजांचा शेवट झाला. 


क्रिकेट कळायला लागल्यापासून मला शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सातत्याने दिसून आला. त्या काळातील भारताचा अनिल कुंबळे, पाकिस्तानचा मुश्ताक अहमद आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न हे तीन सर्वोत्तम लेगस्पिनर म्हणून ओळखले जात असत. त्यातल्या त्यात शेन वॉर्नची खासियत अशी की तो हातभर देखील चेंडू वळवू शकायचा! एकवेळ ऑफस्पिनर होणे सोपे आहे पण #लेगस्पिनर मात्र कठीण होते. आजही त्या दर्जाचे लेग स्पिनर दिसून येत नाहीत. म्हणूनच शेन वॉर्नच्या फिरकी कौशल्य विषयी मला विशेष आदर वाटतो. सचिन #तेंडुलकर आणि शेन वॉर्न सारख्या जगविख्यात फलंदाज व गोलंदाजांची #जुगलबंदी लाइव्ह बघायला मिळाली, हे आमच्या पिढीचे भाग्य होते. शेन वॉर्नचे सर्वकालीन फिरकी घेणारे चेंडू घेऊन पाहिले की, आजचे गोलंदाज निश्चितच आश्चर्याने तोंडात बोटे घालतील. एका अर्थाने तो फिरकीचा जादूगार म्हणावा, असा होता.
इंग्लंड आणि #ऑस्ट्रेलिया मध्ये ऍशेस मालिका खेळवली जाते. विशेष म्हणजे या सर्व टेस्ट मॅचेस असतात. या मॅचेसमध्ये केली मी शेन वॉर्नची गोलंदाजी बराच वेळा पाहिलेली आहे. एखाद्या खेळाडू बद्दल आदर वाटावा असाच तो होता. ऑस्ट्रेलियाला कोणीही संघ हरवू शकत नाही, असं त्या काळात वाटायचं आणि या संघाच्या गोलंदाजीचा कणा शेन वॉर्न होता! सलग #विश्‍वचषक जिंकलेल्या संघाचा तो भाग होता. यावरूनच त्याची तत्कालीन महती आपल्याला समजू शकेल. आयपीएल सामने सुरू झाले त्यावेळेस राजस्थान रॉयल्स या सर्वात सर्वात दुबळ्या संघाचा तो कर्णधार होता. तरी देखील सर्वात पहिली #आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे भाग्य त्याला लाभले. खरं तर याला भाग्य म्हणता येणार नाही. शेन वॉर्नचे कसबच इतके उत्तम होते की, त्याचा फायदा तुलनेने दुबळा असणाऱ्या राजस्थानच्या संघाने करून घेतला. इतर सर्व संघांचे कर्णधार भारतीय असले तरी कोण जाणे, मला #राजस्थान रॉयल संघाबद्दल विशेष आपुलकी वाटायची. कदाचित शेन वॉर्न यासाठी कारणीभूत असेल.
क्रिकेट पाहण्याचा व अनुभवण्याचा आनंद या महान गोलंदाजाने आम्हाला दिला, याबद्दल आम्ही त्याचे सदैव ऋणी असू.

© तुषार भ. कुटे

Friday, March 4, 2022

द बुक ऑफ राम

#पुस्तक_परीक्षण
📖 दि बुक ऑफ राम
✍️ देवदत्त पटनायक (अनुवाद- चेतन कोळी)
📚 पेंग्विन रँडम हाऊस इंडिया, मंजुल पब्लिशिंग हाउस

देवदत्त पटनायक यांच्याविषयी यापूर्वी बरंच ऐकलेलं होतं. म्हणूनच त्यांच्या पुस्तकाविषयी उत्सुकता तर होतीच. तेव्हा त्यांचे 'द बुक ऑफ राम' हे पुस्तक हाती आले. अर्थातच नावावरून रामकथेवर अर्थात रामायणावर लिहिलेले हे पुस्तक आहे, हे लक्षात येईल. रामायण भारतीय लोकांसाठी काही वेगळा विषय नाही. राम हा भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे. शिवाय अनेकांसाठी तो अस्मितेचा देखील आहे. यापूर्वी अनेकांनी रामकथेवर पुस्तके लिहिलेली आहेत. परंतु प्रत्येक लेखकाचा दृष्टीकोन वेगवेगळा दिसून येतो. देवदत्त पटनायक यांनी देखील रामायण याचे विस्तृत विवेचन या पुस्तकाद्वारे केलेले आहे. रामायणात घडलेल्या विविध घटनांची पार्श्वभूमी सहजपणे पुस्तकात लेखकाने मांडलेली आहे. दूरदर्शनवर पाहिलेल्या रामायणामुळे रामकथा चांगलीच लक्षात राहिली होती. त्यामुळे पुस्तक वाचून नवी काय अनुभवणार, हा देखील प्रश्न होता. परंतु या पुस्तकाद्वारे लेखकाच्या दृष्टिकोनातून रामायणाचे विविध पैलू लक्षात आले. एखादी घटना का घडली, किंबहुना ती घडल्यामुळे काय परिणाम झाले? अशा प्रश्नांची उत्तरे पटनायक यांनी या पुस्तकातून दिलेली आहेत.
विशेष म्हणजे मागच्या हजारो वर्षांमध्ये विविध प्रकारची रामायणे लिहिली गेली. प्रत्येक रामायणाचा गाभा वेगवेगळ्या असला तरी कथेमध्ये काहीसे बदल होतातच, याची देखील माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. रामायणातील विविध पात्रांचे दृष्टीकोण, विसंगती तसेच विचार करण्याची पद्धती देखील आपल्याला अनुभवता येते. राम हा कथेचा नायक असल्याने त्याच्या विविध पैलूंचा अभ्यास नव्याने करता येतो. पौराणिक कथांचा देखील संशोधनात्मक अभ्यास कसा करायचा, हे या पुस्तकातून निश्चितच समजते. शिवाय रामकथेतून अनेक गोष्टींची शिकवण देखील मिळते. कदाचित याचमुळे आज देखील भारतामध्ये रामकथा सातत्याने वाचल्या व ऐकल्या जातात.
सर्वात विशेष शिकवण अशी की, जेव्हा रामाचा बाण लागून रावण खाली कोसळतो तेव्हा त्याने म्हटलेली वाक्ये देवदत्त पटनायक यांनी खूप सुंदररित्या लिहिलेली आहेत. तो म्हणतो, 'रामा तू खऱ्या अर्थानं अतिशय योग्य असा विरोधक आणि पृथ्वीतलावर ची सर्वात शक्तिमान व्यक्ती आहेस. जिला स्वतःच्याच भावनांपासून अलिप्त राहता येऊ शकते. मी तुला नमस्कार करतो. माझ्याकडे अतिशय थोडा वेळ आहे कारण मी लवकरच मृत्युमुखी पडणार आहे. मात्र माझ्या आयुष्यात मी जे शिकलो त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुला शिकवणार आहे. ज्या गोष्टींपासून नुकसान होईल अशा गोष्टींचा मोह वाटणं किंवा या गोष्टी टाळणं हिताचं आहे. अशाच गोष्टींचं आकर्षण वाटणं, हे अज्ञानी मनाचे लक्षण आहे. हे सदैव ध्यानात ठेव. ज्या गोष्टींबद्दल आपल्याला प्रचंड आकर्षण वाटतं त्याच गोष्टींमुळे तुमचं नुकसान होतं, हे समजण्याची गरज आहे. ज्या गोष्टींपासून आपण दूर पळतो, ज्या गोष्टींबद्दल आपण दिरंगाई करतो अशाच गोष्टी स्वतःचा विकास करण्यासाठी फायदेशीर ठरतात'. ही अतिशय महत्त्वाची शिकवण रावणाने रामाला दिली. विशेष म्हणजे आजही मनुष्य जातीसाठी ती आदर्श अशी शिकवणच आहे.
पुस्तकाच्या सर्वात शेवटच्या परिच्छेदांमध्ये लेखकाने जे लिहिले आहे ती रामायणातील खरी शिकवण म्हणून सांगता येऊ शकते.
आता आपल्याला सीतेची (मनाची) बंधनांतून सुटका करायची आहे. आपल्या बुद्धिरूपी हनुमानात दडलेल्या सर्व क्षमतांचा विकास करायचा आहे. जीवनरूपी सागर तरून जायचा आहे आणि रावणाच्या लंकेवर (अहंकाराच्या साम्राज्यावर) विजय मिळवायचा आहे, त्याची सोन्याची लंका जाळून तिचं रामाशी पुनर्मीलन घडवून आणायचं आहे ... कारण राम आपल्या अंतर्यामीच आहे, तो आपल्यातल्या 'स्व'त्वापर्यंत पोहोचण्याची वाट पाहतोय.
या रामाला आपण केवळ एका काव्यामध्ये किंवा एका स्थानापुरतं मर्यादित ठेवू शकत नाही. तो तर स्थळकाळाच्या मर्यादेपलीकडे आहे. तो सर्वव्यापी आहे. तो म्हणजे दुसरातिसरा कुणी नसून आपलाच आत्मा, परमचैतन्य आहे. तोच आपलं खरं अस्तित्व आहे. तोच आपल्यामध्ये प्राण ओततो आणि आपलं साक्षिभावानं निरीक्षण करतो.
आपण जेव्हा या रामाची प्रचिती घेऊ, तेव्हा राजकीय विजयाची आपल्या मनातली इच्छा लोप पावते. आणि तेव्हा आपलं मन प्रेमानं, समजेनं आणि सर्वांप्रतिच्या भूतदयेनं भरून जातं. त्या वेळी धर्म अधिराज्य गाजवतो, आणि रामराज्याची स्थापना होते ... आपल्या अंतर्यामीसुद्धा आणि सभोवतीसुद्धा!

© तुषार भ. कुटे  Wednesday, March 2, 2022

अभिशाप

#पुस्तक_परीक्षण
📖 अभिशाप
✍️ श्रीकांत कार्लेकर
📚 डायमंड पब्लिकेशन्स

सह्याद्रीमध्ये संशोधन करणारे एक प्राध्यापक आहेत. त्यांच्यासारखाच मनापासून संशोधन करणारा त्यांचा एक विद्यार्थी देखील या कथेमध्ये आहे. या गुरुशिष्यांची जोडी एका नव्या प्रकल्पावर काम करायला सुरुवात करते. तसं हे कार्य पीएचडी प्राप्त करण्यासाठी केलेलं आहे. परंतु संशोधक शिष्य ते मनापासून करतो आणि त्यातून वैज्ञानिक निष्कर्ष काढले जातात. राजकीय लोक मात्र स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी या संशोधनाला कोणतेच महत्त्व देत नाही. त्यातून अघटीत प्रकार घडतो. अशी कथा रचना असलेली ही कादंबरी होय... अभिशाप.
श्रीकांत कार्लेकर यांनी लिहिलेल्या कादंबरीमध्ये एका प्रभावी संशोधनाच्या उपेक्षेची मनाला चटका लावणारी कथा चित्रित केलेली आहे. केवळ ११४ पानांच्या या पुस्तकात आलेले ते कथानक तसे वेगवान म्हणावे लागेल. जवळपास अर्ध्याहून अधिक कादंबरी संवाद रूपानेच पुढे गेलेली दिसते. संशोधनासाठी मनापासून प्रयत्न करणारा विद्यार्थी विरुद्ध केवळ पैशाच्या जोरावर पीएचडी प्राप्त करणारा विद्यार्थी अशा लढाईचा स्पर्श देखील या कादंबरीला झालेला आहे. बहुतांश ठिकाणी देवनागरीमध्ये इंग्रजी भाषेतील वाक्य वापरली गेल्याने त्याचा लवकर अर्थ समजत नाही. एक तर ती इंग्रजीचाच रोमन लिपीमध्ये लिहायला हवी होती किंवा थेट मराठीतच हवी होती. असेही बऱ्याचदा वाटून जाते. ही गोष्ट सोडली तर एक छोटेखानी कादंबरी वाचण्याची हौस हे पुस्तक पूर्ण करते.🌐 कोठून घेतले : https://bookvishwa.com

© तुषार भ. कुटे Sunday, February 27, 2022

मराठी गौरव आणि आपलं योगदान

आज जागतिक मराठी भाषा गौरव दिन. मागच्या काही वर्षांपासून आपण हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायला लागलो आहोत. यामागचे निश्चित कारण माहिती नाही परंतु आपल्या भाषेविषयी लोकांमध्ये जनजागृती होत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपल्या भाषेचा गौरव करताना दिसतात. परंतु त्याच भाषेसाठी व तिच्या वृद्धीसाठी आपला कितपत हातभार असतो? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळताना दिसत नाही. किंबहुना आपल्या कृतीमधून देखील या प्रश्नाचे उत्तर मराठी माणसांना देता येत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. आपल्या भाषेची वृद्धी व्हावी यासाठी दैनंदिन जीवनातील अनेक ठिकाणी तिचा वापर होणे तसेच तिचा प्रसार करणे महत्त्वाचे असते. परंतु मराठी माणूस अश्याच बहुतांश विषयांत प्रमाणात नापास झालेला दिसतो.

सार्वजनिक ठिकाणची मराठी

महाराष्ट्राची राज्यभाषा तसेच सर्वसामान्य वापरामध्ये येणारी भाषाही मराठी आहे. परंतु मागच्या काही वर्षांपासून बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या वेगाने वाढताना दिसते आहे. महाराष्ट्र हे एक समृद्ध राज्य आहे. तसेच सहिष्णू देखील आहे. 'अतिथी देवो भव' या उक्तीचा तंतोतंत आत्मसात करणारे राज्य आहे. याचाच फायदा करून घेण्यासाठी परप्रांतीयांची महाराष्ट्रामध्ये संख्या वाढते आहे. स्वतःला राष्ट्रभाषा म्हणून घेणाऱ्या भाषिकांची संख्या एकेकाळी एक आकडी टक्क्यांमध्ये होती. ती आज दोन आकडी झालेली आहे. एका अर्थाने हे मराठी भाषिकांवरील अतिक्रमण नाही का? हाही प्रश्न पडतो. खरंतर आपणच 'अतिसहिष्णू' प्रकारांमध्ये गणले जायला लागलो आहोत. अगदी मुंबईचे उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राच्या या राजधानीमध्ये सार्वजनिक जीवनात चोरून बोलली जाणारी भाषा ही मराठी आहे! अगदी मराठी माणूस देखील छातीठोकपणे सार्वजनिक ठिकाणी मराठीमध्ये बोलताना दिसत नाहीये. ही शोकांतिका केवळ आपल्याच नाकर्तेपणामुळे आलेली आहे. हळूहळू हे लोण महाराष्ट्रातील अन्य शहरात देखील पसरायला सुरुवात झालेली आहे. इथला मराठी माणूस मराठी बोलण्याचे नाकारतो. समोरच्याच्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करतो. असं असेल तर आपल्या भाषेची आपल्याच राज्यांमध्ये प्रगती कशी होणार? हा मोठा प्रश्न आहे. अगदीच महाराष्ट्रामध्ये एखादी मुस्लीम अथवा शीख पेहराव केलेला व्यक्ती जरी दिसली तरी मराठी माणूस त्याच्याशी थेट हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतो. म्हणजे त्याने मनाशी ठरवलेच असते की, समोरच्याला मराठी समजणार नाही! याच कारणामुळे परप्रांतीय लोक इथली भाषा शिकत नाहीत. मात्र आपल्याला त्यांच्या भाषेत बोलायला लावतात. लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. पण मराठी माणसाच्या अतिसहिष्णू वृत्तीमुळे ती लवकरच अधोगतीकडे जाईल असे दिसते! ग्रामीण भागात देखील उत्तरेकडून आलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढते आहे. उत्तर भारतातील राजकीय नाकर्तेपणाचा त्रास महाराष्ट्रीय जनतेला होतो आहे. शिवाय ग्रामीण लोक देखील या लोकांशी हिंदीतच बोलण्याचा प्रयत्न करतात. जणू काही आपण कुठलीतरी आंतरराष्ट्रीय भाषा बोलत आहोत आणि आपणच सर्वज्ञानी आहोत, असं अनेकांना सूचित करायचं असतं. यातून परप्रांतीय भाषांचा उदोउदो केला जातो आणि आपोआपच आपली भाषा देखील मागे पडते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. मागच्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोंढे येतच आहेत. परंतु तत्कालीन जनतेमुळे त्यातील बहुतांश लोकांनी मराठी भाषा आत्मसात केल्याचे दिसते. सद्यस्थितीला मात्र असे जाणवत नाही. ही निश्चितच धोक्याची घंटा आहे. स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून घेणारे अनेक पक्षही हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून पुढे आणतात. यामुळेच अन्य भारतीय भाषा अधोगतीकडे वाटचाल करीत आहेत.
पुढील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र द्विभाषिक राज्य म्हणून उदयास आले तर आश्चर्य वाटायला नको!


मराठी शाळा

आज महाराष्ट्रातील राष्ट्रीय सर्वोच्च स्थानी विराजमान असलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी मराठी भाषेतूनच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांच्यासाठी मातृभाषेतून प्रगतीची द्वारे उघडली गेली. परंतु मागच्या दशकभरापासून शालेय शिक्षणामध्ये इंग्रजीने अतिक्रमण केल्याचे दिसते. इंग्रजी म्हणजे प्रगती हे जरी खरे असले तरीही आपले मूल तीन वर्षाचे झाल्यापासूनच त्याच्यावर इंग्रजीचा भडीमार करणे मात्र पूर्णतः चुकीचे आहे. भाषा तज्ञांच्या म्हणण्यानुसार मातृभाषेतील शिक्षणाचे सर्वोत्तम असते. परंतु आजच्या नव्या पालकांना याच्याशी काही घेणेदेणे नसल्याचे दिसते. मराठीला डावलून मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा तयार होत आहेत. त्यातून इंग्रजीतून रट्टा मारून बाहेर पडणाऱ्या पिढ्या तयार होत आहेत. त्यामुळे आपोआपच आपल्या भाषेचा देखील ऱ्हास होताना दिसतो. महाराष्ट्र सरकार एकीकडे दुकानांवरील पाट्या मराठीमध्ये करण्याची सक्ती करते आहे. परंतु दुसरीकडे इंग्रजी शाळांना प्रोत्साहन देऊन मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. सरकारमधील अति शिकलेले व 'हाय-फाय' इंग्रजीतून शिक्षण घेतलेले काही मंत्री सर्व शालेय शिक्षण इंग्रजीमध्ये करण्याच्या मागे लागलेले आहेत. एकीकडे राजकीय फायद्यासाठी मराठीचा उदो उदो करायचा आणि दुसरीकडे मराठी शाळांवर हातोडा चालवायचा, अशी दुटप्पी वृत्ती आज सरकारांमध्ये दिसून येते. मराठी शाळा टिकल्या नाहीत तर मराठी भाषेची वृद्धी होणार नाही. म्हणूनच मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळा मजबूत व्हायला हव्यात.

मराठी साहित्य

भाषेला समृद्ध करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषेतील साहित्य होय. मराठीमध्ये गेल्या पन्नास वर्षांमध्ये अनेक अप्रतिम साहित्यिक कलाकृती तयार झाल्या. अनेक साहित्यिकांनी म्हणजेच लेखक आणि कवींनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या अनेक कलाकृती यासाहित्यामध्ये मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जातात. परंतु मागील काही वर्षांमध्ये मराठी भाषेची साहित्यिक जडणघडण मंदावताना दिसत आहे. कदाचित साहित्यक्षेत्राला कमी दर्जा दिल्यामुळे तसेच वाचनसंस्कृती कमी झाल्यामुळे हे होत असावे, असे वाटते. म्हणजेच मराठी लोक मराठी वाचनाला प्राधान्य देत नाहीत. जर वाचकांची संख्या वाढलीच नाही तर दर्जेदार साहित्य कसे तयार होणार? साहित्याचा दर्जा वाढवायचा असल्यास वाचकांची संख्या वाढायला हवी. वाचनसंस्कृती भाषेमध्ये जोपासायला हवी. तरच उत्तमोत्तम लेखक भाषेमध्ये तयार होतील. शिवाय या क्षेत्राला हवे असणारे ग्लॅमर देखील तयार होईल. स्वतःला 'ग्लोबल' समजणाऱ्या मराठी भाषिकांना इंग्रजीतील नवे साहित्य माहित असते परंतु, मराठी साहित्याकडे मात्र हे सहज कानाडोळा करतात, ही शोकांतिका आहे.
एखाद्या पुरस्काराद्वारे साहित्याचा दर्जा ठरत नसला तरी एक विश्लेषण मांडावेसे वाटते. मराठी भाषेपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या बंगाली भाषेमध्ये आजपर्यंत सहा वेळा, कन्नड भाषेमध्ये आठ वेळा, मल्याळम भाषेमध्ये सहा वेळा तर उर्दू आणि गुजराती भाषेमध्ये तब्बल चार वेळा साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर आतापर्यंत चार मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मराठीमध्ये अधिक दर्जेदार कलाकृती साहित्य कलाकृती निर्माण व्हायच्या असल्यास वाचकांची संख्या वाढायला हवी. नुसतच 'मी मराठी' म्हणून पोस्ट टाकून भागणाऱ्यातलं नाही!

मराठी चित्रपट

तीन ते चार दशकांपूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा जोरदार बोलबाला होता. एखादा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला की त्या वेळेस हिंदी चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत नव्हता. म्हणजेच मराठी चित्रपटांची महाराष्ट्रावर मक्तेदारी प्रस्थापित झालेली होती. परंतु हळूहळू मुंबईतील गोंडसवाण्या बॉलीवूडने अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीने महाराष्ट्रावर पकड घ्यायला सुरुवात केली. नव्वदच्या दशकामध्ये मराठी चित्रपट निर्मिती कमी होऊ लागली आणि हिंदी चित्रपट वाढू लागले. हिंदी चित्रपटामधलं ग्लॅमर अर्थात वैभव मराठी प्रेक्षकांना आकर्षित करू लागलं. याच कारणामुळे महाराष्ट्रात हिंदी चित्रपट सृष्टी भक्कम होऊ लागली. आणि मराठी चित्रपटांना दुय्यम दर्जा प्राप्त झाला. परंतु पंधरा ते वीस वर्षांपूर्वी हळूहळू मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा उभारी घेऊ लागली. तसं पाहिलं तर हा वेग बेताचाच होता. नवनवे दिग्दर्शक, कलाकार, कथाकार आणि संगीतकार मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाले. त्याचा फायदा मराठी चित्रपटांना झाला. हळूहळू चित्रपटांचा दर्जा देखील वाढू लागला. उत्तमोत्तम चित्रकलाकृती मराठीत तयार झाल्या. प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील चांगला होता. परंतु आजही मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ आलेला नाही. मराठी प्रेक्षकांवर हिंदी चित्रसृष्टीचे गारुड अजूनही तसेच आहे. मराठीमध्ये उत्तम चित्रपट तयार होत आहेत. परंतु मराठी प्रेक्षकच मराठीला दुय्यम दर्जा देताना दिसतो. दक्षिणेकडे बघितले तर तिथे फक्त त्यांचे चित्रपट चालतात. अनेक चित्रपटांचा १०० कोटींचा गल्ला जमा होत असतो. पण महाराष्ट्रात मात्र असे होत नाही. नुसतं मराठी-मराठी म्हणून भागणार नाही. तर मराठी चित्रपटांना मराठी प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळायला हवा. हिंदी चित्रपट सृष्टीतला तोचतोचपणा, रिमेक आणि अन्य भाषातून केली जाणारी ढापाढापी वगळता नाविण्यपणा दिसत नाही. याउलट मराठीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. त्यासाठी मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
भारतामध्ये पहिला चित्रपट ज्या दादासाहेब फाळके यांनी बनवला ते मराठी होते. शिवाय राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पहिला भारतीय चित्रपट 'श्यामची आई' हा देखील मराठी होता. परंतु मराठी प्रेक्षकांच्या अनास्थेमुळे चित्रपटसृष्टी देखील मागे पडलेली आहे. आमचं मनोरंजन म्हणजेच मराठी मनोरंजन असं ठामपणे मराठी प्रेक्षक म्हणत नाहीत. मग नुसतं मराठी आडनाव लावण्याचा काय उपयोग? हा प्रश्न देखील पडतो.
मागील काही वर्षांपासून भाषेमध्ये राजकारण आलेले आहे. राजकारणी आपल्या भाषेचा उपयोग त्यांच्या स्वार्थासाठी करताना दिसत आहेत. यामुळेच मराठी लोकांमध्ये विभागणी झालेली दिसते. शेवटी फोडा आणि राज्य करा हा इंग्रजांचा मंत्र आजही राजकीय लोक वापरताना दिसत आहेत.
एकंदरीतच मराठी माणूस आपल्या मराठीपण टिकविण्यासाठी कितपत योगदान देतो? या प्रश्नाचा त्याने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. क्षेत्र कोणतेही असो मराठी भाषा वाढली पाहिजे, टिकली पाहिजे तरच मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र टिकेल. आपल्या भाषेची वृद्धी होईल आणि आपण खऱ्या अर्थाने 'मराठी' म्हणून ओळखले जाऊ. किमान आजच्या दिवशी इतके ज्ञान प्राप्त झाले व त्याची योग्य अंमलबजावणी केली तरी खूप होईल.

© तुषार भ. कुटे,
डेटा सायंटिस्ट,
मितू स्किलॉलॉजीस आणि रिसर्च, पुणे

Wednesday, February 23, 2022

मोठी तिची सावली - राजश्री बर्वे

काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावरूनच यातील कथेचा अंदाज येतो. गूढ कथा वाचण्यासाठी काहीतरी नवीन शोधत असताना राजश्री बर्वे लिखित 'मोठी तिची सावली' हा कथासंग्रह हाती आला. मुखपृष्ठावरूनच तो भयकथा संग्रह असल्याचे समजते. एकूण १४ भयकथांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे. राजश्री बर्वे यांनी लिहिलेल्या विविध दिवाळी अंकांमध्ये तसेच मराठी नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या रहस्यकथा, गुढकथा व भयकथा यात वाचता येतील. सदर लेखिकेचे वाचलेले हे माझे पहिलेच पुस्तक होय. कथा लिहिण्याची त्यांची स्वतःची एक शैली आहे. सर्वसामान्य मराठी वाचकाला ती व्यवस्थित समजेल अशीच वाटते. कथांची मांडणी व संवाद रचना यातून आपण या कथांमध्ये गुंतून राहतो. शिवाय रहस्य व भय या रसांविषयी आपुलकी असणाऱ्या वाचकांना ती निश्चित खिळवून ठेवेल, अशीच आहे. या पुस्तकाचे एक मोठे वैशिष्ट्य असे की, एकाच नावाच्या व दोन निरनिराळ्या रसांच्या कथा यात समाविष्ट आहेत. 'पाउलखुणा' असे त्या कथेचे नाव होय. असा प्रयत्न मी पहिल्यांदाच एखाद्या पुस्तकांमध्ये पाहिला आहे.
विशेष म्हणजे लेखिकेसह मुखपृष्ठ डिझाईन, प्रस्तावना, मुद्रितशोधन आणि टाईपसेटिंग देखील स्त्रियांनीच केलेले आहे! अशा प्रकारचे हे पहिलेच पुस्तक वाचनात आले. Friday, February 11, 2022

बदलतं तंत्रज्ञान

घर शिफ्ट करत असताना साफसफाईमध्ये घराच्या एका कोपऱ्यामध्ये घेऊन दिलेल्या सीडीचे आणि डीव्हीडीचे पाऊच आणि कंटेनर्स नजरेस पडले. सन २००२ ते २०१२ या दरम्यानच्या काळामध्ये मी जमवलेल्या या सीडी व डीव्हीडी होत्या. मागच्या दहा वर्षांमध्ये त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. परंतु त्यादिवशी या पाऊच आणि कंटेनरने भूतकाळ जागृत केला. माझ्या संग्रहामध्ये जवळपास ४०० सीडी व डीव्हीडी असतील. आज त्या मी ई-कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीकडे सुपूर्द केल्या. 

संगणक वापरायला सुरुवात केली त्याच सुरुवातीच्या काळामध्ये माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी फ्लॉपी डिस्कचा आम्ही वापर करायचो. साडेतीन इंच आकार असणाऱ्या या फ्लॉपीमध्ये केवळ १.४४ एमबी पर्यंत माहिती साठवता यायची. याचे देखील आम्हाला अप्रूप वाटत असे. एका संगणकातून दुसऱ्या संगणकामध्ये माहिती कॉपी करण्यासाठी त्याचा आम्ही सहज वापर करायचो. परंतु १५ ते २० वेळा वापरल्यानंतर ही फ्लॉपी खराब व्हायला लागायची. त्यातील डेटा करप्ट व्हायचा आणि मग आम्ही नवीन फ्लॉपी विकत घ्यायचो. त्या काळात सायबर कॅफेमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी प्रति तास तीस रुपये मोजावे लागायचे. त्यामुळे एका तासामध्ये इंटरनेटवरून भराभर माहिती डाऊनलोड करून आम्ही फ्लॉपी डिस्कमध्ये साठवून घरच्या संगणकावर लोड करायचं. फारच थोड्या कालावधीमध्ये फ्लॉपी ड्राईव्ह देखील कालबाह्य झाले. त्यांची जागा 'सीडी'ने घेतली. बाजारामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ सीडी उपलब्ध झाल्या. संगणकाच्या सीडी ड्राईव्हद्वारे त्यातली माहिती वाचता यायची. तसेच कॉपी करता यायची. एका सीडीची माहिती साठवण्याची क्षमता ७०० एमबी इतकी होती! त्या काळात ती प्रचंड वाटायची. सीडी ड्राईव्हद्वारे सीडीमधील माहिती फक्त बघता येत होती. परंतु सीडीमध्ये माहिती साठवता येत नव्हती. खूपच कमी लोकांकडे त्यावेळी 'सीडी राईटर' उपलब्ध होता. सीडी राईटर असणारा संगणक म्हणजे उच्च प्रतीचा संगणक, असे आम्ही मानत असू. आपल्याला एखादी सीडी राईट करायची असेल तर ज्याच्याकडे सीडी राईटर आहे त्याच्या संगणकाचा वापर करून आम्ही नवीन सीडी बनवून घेत असू. कालांतराने जवळपास सर्वच संगणकांमध्ये सीडी रायटर देखील उपलब्ध झाले. त्यामुळे सीडीमध्ये माहिती साठवणे सोपे झाले होते. संगणकातील बरीचशी महत्त्वाची माहिती आम्ही सीडीमध्ये साठवायला लागलो. पुढे मागे संगणकाची हार्ड डिस्क जर खराब झाली तर? हा प्रश्न आम्हाला सतावत असायचा. त्यामुळे बरीचशी महत्त्वाची माहिती सीडीमध्ये साठवली जायची. लवकरच या संगणकातील माहितीच्या पिढीमध्ये डीव्हीडी दाखल झाली. डीव्हीडीची क्षमता साडेचार जीबी इतकी प्रचंड होती! याच काळामध्ये री-राईटेबल सीडी आणि डबल साइडेड सीडी व डीव्हीडी देखील उपलब्ध झाल्या होत्या. तंत्रज्ञानाची ही प्रगती खरोखर अचंबित करणारी होती. संगणकीय माहितीचा साठा वाढत चाललेला होता. त्यामुळे अशा नवनवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची आवश्यकता तर होतीच.
डीव्हीडी रीडर बरोबरच राईटर देखील लवकरच बाजारात आले. मग आमचा डीव्हीडी रायटिंग चा उद्योग सुरू झाला. त्याकाळात इंटरनेटवर उपलब्ध होणारी महत्त्वाची माहिती तसेच चित्रपटातली गाणी व चित्रपट देखील डीव्हीडीमध्ये साठवून ठेवू लागलो. अनेक संगणकीय नियतकालिकांसोबत देखील सीडी आणि डीव्हीडी उपलब्ध होत होत्या. त्यातली माहितीदेखील अमुल्य अशी होती. या सर्व सीडींचा माझ्याकडे बराच मोठा संग्रह तयार झाला. यातून त्या ठेवण्यासाठी नवीन पाऊच आणि कंटेनर देखील मी विकत घेतले होते. कधी कोणती माहिती लागत असेल तर लगेच ती सीडी अथवा डीव्हीडी काढून संगणकामध्ये उघडली जायची. अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. परंतु दहा वर्षांपूर्वी पेन ड्राईव्ह नावाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संगणक विश्वात प्रवेश केला. माहिती साठवण्यासाठी तसेच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हे अतिशय सुलभ तंत्रज्ञान होते. मी पाहिलेला पहिला पेन ड्राईव्ह १२८ एमबी क्षमतेचा होता! कालांतराने त्याची क्षमता वेगाने दुप्पट होत गेली. आज आपल्याकडे टीबी अर्थात टेराबाईटमध्ये देखील पेन ड्राईव्ह उपलब्ध आहेत. पेन ड्राइवचा जमाना आल्यानंतर सीडी आणि डीव्हीडीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. याशिवाय इंटरनेट अन वेबसाईटस देखील वेगाने वाढत होत्या. त्यामुळे कोणतीही गोष्ट लागत असेल तेव्हाच इंटरनेटवरून डाऊनलोड करायला लागलो. अर्थात माहिती साठवून ठेवण्याची आवश्यकता तर नव्हती. काळाच्या ओघामध्ये सीडी आणि डीव्हीडी ड्राइव्ह देखील आता लॅपटॉप व संगणकामध्ये उपलब्ध होत नाहीत. परंतु संगणकीय माहितीचा साठा करण्यासाठी या तंत्रज्ञानाने संगणकाच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले होते. आज माझ्याकडे असलेल्या सर्व सीडीज व डीव्हीडीची एकूण क्षमता ही एका पोर्टेबल हार्ड डिस्क इतकी आहे! यांना तंत्रज्ञानाची किमयाच म्हणावी लागेल. इंटेलचे संस्थापक गॉर्डन मूर यांनी संगणक विश्वाला मूरचा नियम सांगितला आहे. जरी तो संगणकातील मायक्रोप्रोसेसरला वापरण्यात येत असला तरी संगणकीय माहितीसाठ्याला देखील तो निश्चित लागू होतो. आज आपण वापरत असलेल्या हार्ड डिस्क देखील कालांतराने कालबाह्य होतील आणि नवे तंत्रज्ञान त्याची जागा घेईल. ही काळाची गरज आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान हे इतिहासात तितकेच महत्त्वाचे होते, हे विसरून चालणार नाही!

Thursday, February 10, 2022

इंडिका

विश्वामध्ये असणारी एकमेव आणि सर्वोच्च ताकद म्हणजे निसर्ग होय. तो अद्भुत आहे, विशाल आहे, सर्वशक्तिमान आहे आणि त्याला हवे तसेच तो करतो. म्हणूनच निसर्ग विज्ञान या विषयासारखा अभ्यास करण्यासाठी दुसरा रंजक विषय नाही. याच विषयाला वाहिलेले प्रणय लाल लिखित 'इंडिका' हे पुस्तक होय. भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास, असे जरी या पुस्तकावर लिहिलेले असले तरी बहुतांशी पृथ्वीचा नैसर्गिक इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. त्याचे विवेचन करण्यापूर्वी पुस्तकातील लेखकाने दिलेला सर्वात शेवटचा परिच्छेद आधी सांगतो...
"आपल्या ४६ वर्षी श्रीमती पृथ्वीच्या आयुष्यात सेपियन्स चारेक तासांपूर्वी उपजला. श्रीमती पृथ्वीचे आयुष्य आपल्याला सांगते की कोणत्याही जीवजातीचे अस्तित्व, फार कशाला, जीवाचेही अस्तित्व अनेक अशक्यप्राय घटनासंचांमुळे घडते; ज्यातून शेवटी आपण घडलो आहोत. उत्क्रांतीच्या इतिहासात कोणत्याही जीवप्रकाराच्या उत्क्रांतीला ना दिशा असते, ना कोणते लक्ष्य असते. जवळपास सर्व जीवजाती नष्ट होणे अपरिहार्य आहे. प्रभावी जीवजात म्हणून होमो सेपियन्स उत्क्रांतीच्या नाट्यातले शेवटी रंगमंचावर आलेले पात्र आहे. जर घटना घडल्या तशा घडल्या नसत्या, आपले स्पर्धक व भक्षक विशिष्ट वेळी नष्ट झाले नसते, तर आपण आज अस्तित्वातच नसतो, ना कपींचे पूर्वज, ना त्यांचे सरीसृप सस्तन पूर्वज, एका संध्याकाळी एका उथळ डबक्यात ३.५ अब्ज वर्षांपूर्वी जीव घडला ... जर कधी नसता, तर ही चित्रफीत पुन्हा 'वाजवून' आपण घडलो असतो याची कोणतीच खात्री देता येत नाही. जर असा प्रयोग करता आलाच तर आजच्या प्राण्यांच्या वनस्पतींच्या ऐवजी पूर्णपणे वेगळे जीव घडतील. आज अस्पर्श राहिलेली गरम झऱ्यांची तळी फक्त एक आशा पुरवतात, की जर जीवसृष्टी नष्ट झाली तर ती नव्याने घडेल. पण जीव नव्याने घडेल याची खात्री आहे. का? जास्त महत्त्वाचे म्हणजे, तसे होण्या-न-होण्यावर जुगार खेळायला आपण तयार आहोत का? आणि जिंकणारे कोणते जीव असतील?"
खरं तर याच परिच्छेदांमध्ये संपूर्ण पुस्तकाचा सारांश दिलेला आहे. ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, तेव्हापासूनच घडलेल्या सर्व घडामोडी भूगर्भशास्त्राद्वारे, जीवशास्त्राद्वारे, भौतिकशास्त्राद्वारे आणि मानववंशशास्त्राद्वारे संशोधन रूपाने या पुस्तकात लेखकाने अतिशय विस्तृतरित्या मांडलेल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे पृथ्वीचा साडेचारशे कोटी वर्षांचा संक्षिप्त इतिहास होय. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून घडलेल्या घटनांची शास्त्रशुद्ध माहिती लेखकाने अतिशय सुटसुटीतरित्या या पुस्तकात दिलेली आहे. ज्या निसर्गामध्ये आपण वावरतो तो आजच्या घडीला येण्यासाठी पृथ्वीची कोट्यावधी वर्षांची मेहनत आहे. यात आपले अर्थात मानवाचे योगदान काही लाख वर्षांचे देखील नाही. तरीही आपण विश्वाचे राजे म्हणून वावरताना दिसतो. पृथ्वीचे सर्वेसर्वा म्हणून घेताना दिसतो. पण प्रत्येकाला पृथ्वीचा हा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर 'इंडिका' वाचायलाच हवे.
एकूण पंधरा प्रकरणांमध्ये या पुस्तकाची विभागणी करण्यात आलेली आहे. यातून पृथ्वीच्या निर्मितीपासून मानवाच्या आजच्या प्रगती पर्यंतचा सखोल इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. आज भारतीय उपखंड ज्या ठिकाणी आहे तिथे तो कोट्यवधी वर्षांपूर्वी नव्हताच. इतक्या वर्षांमध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपण इथवर पोहोचलेलो आहोत. भारत, मादागास्कर, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे सर्व प्रदेश एकमेकांना जोडलेले होते ही कल्पनाच किती रोमांचकारी आहे! मागच्या चार पाच कोटी वर्षांमध्ये आपण हजारो किलोमीटरचा प्रवास करत आशिया खंडाला धडकले आहोत. या कालखंडामध्ये प्राण्यांच्या लाखो जाती तयार झाल्या आणि नष्टही झाल्या. अनेक प्राण्यांनी पृथ्वीवर राज्य केले. परंतु निसर्गाच्या पुढे कोणीही टिकू शकले नाही. पुस्तकाच्या पंधरा प्रकरणांपैकी फक्त तीन प्रकरणांमध्ये मानवी वाटचाल दिलेली आहे. यातूनच पृथ्वीच्या दृष्टीने मानवाचे अस्तित्व कितपत असावे, याचा अंदाज बांधता येईल. आपल्या पूर्वी पंधरा कोटी वर्षे डायनोसॉर नावाच्या प्राण्याने पृथ्वीवर अधिराज्य गाजवले. त्याचे अवशेष व जीवाश्म आजही विविध देशांमध्ये आढळून येतात. केवळ डायनासोरस नाही तर अनेक विविध प्रकारचे प्राणी पृथ्वीवर वावरत होते. परंतु विविध कारणांमुळे ते नष्ट झाले. डार्विनच्या थियरीनुसार जो तग धरून राहतो तोच टिकतो. हे आजवर सिद्ध झालेले आहे.
निसर्गामध्ये सजीव म्हणता येणारे करोडो प्राणी आणि वृक्ष आहेत. त्यांची उत्क्रांती नक्की कशी झाली, याचा देखील इतिहास या पुस्तकांमध्ये सखोलरीत्या लिहिलेला आहे. लेखकाने भूगर्भशास्त्राचा अतिशय विस्तृत अभ्यास केलेला दिसतो. शिवाय भारतीय उपखंडामध्ये त्यांचा प्रवास देखील प्रचंड झालेला आहे. पर्वतरांगांचा, डोंगरांचा, नद्यांचा, सरोवरांचा, खडकांचा, मातीचा सखोल अभ्यास करून वैज्ञानिक निष्कर्ष काढून पृथ्वीचा इतिहास लिहिल्याचे दिसते. एक ट्रेकर म्हणून मी देखील सह्याद्रीतल्या अनेक खडकांचा इतके बारकाईने निरीक्षण केले नव्हते. पण या पुस्तकाने मला देखील नवी दृष्टी निश्चितच प्राप्त करून दिली. विज्ञान हे अमर्याद आहे. कदाचित त्याचा अभ्यास करणे आपल्याला एका जन्मात देखील शक्य नाही, याची प्रचिती या पुस्तकातून निश्चितच येते.
पुस्तकाचे सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगायची म्हटलं तर यातील सर्वच चित्रे ही रंगीत आहेत! त्यामुळे इतिहास जिवंत उभा राहतो. शिवाय लेखकाने अनेक स्थळांचे निश्चित स्थान अक्षांश व रेखांशद्वारे दिलेले आहे. म्हणूनच ते गुगल मॅपमध्ये देखील शोधायला सोपे जाते. अनेक वैज्ञानिक बारकावे लेखकाच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेची साक्ष देतात. होमो सेपियन्स जगभर कसे पसरले याचा नकाशा आणि चाळीस लक्ष वर्षांचा फॅमिली फोटो ही या पुस्तकातील सर्वोत्तम चित्रे होत! पुस्तक वाचताना वाटत होते की हा इतिहास कधीच संपू नये. अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा अधिक तीव्र होत होती. हेच या पुस्तकाचे यश होय.
प्रणय लाल यांनी हे पुस्तक इंग्रजीत लिहिलेले असले तरी नंदा खरे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. नंदा खरे यांच्या यापूर्वी वाचलेल्या स्वलिखित पुस्तकातील भाषा मला अधिक क्लिष्ट वाटली होती. परंतु या पुस्तकाचा अनुवाद मात्र उत्तमच केलेला दिसतो.
शेवटी काय विज्ञानाकडे बघण्याची किंबहुना निसर्गाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देऊन जाणारे हे पुस्तक होय. विज्ञानावर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवे.