Showing posts with label Sakal. Show all posts
Showing posts with label Sakal. Show all posts

Sunday, September 6, 2026

तंत्रज्ञानाच्या साथीने बहरलेला माझा मराठी लेखनप्रवास: कोऱ्या कागदापासून ते 'व्हॉईस टायपिंग'पर्यंत

सन १९९९ चा तो काळ होता. 'सकाळ' वृत्तपत्र समूहाकडून तरुणांसाठी 'दै. युवा सकाळ' नावाचे विशेष वर्तमानपत्र प्रकाशित केली जात असे. तरुणांना व्यक्त होण्यासाठी आणि त्यांच्यातील लेखकाला चालना देण्यासाठी त्यात हक्काचे व्यासपीठ दिले जायचे. त्याकाळी माझी मराठी भाषेवर फारशी पकड नव्हती, परंतु केवळ एक उत्सुकता म्हणून मी 'युवा सकाळ'साठी पहिल्यांदाच एक छोटासा विनोद लिहून पाठवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो विनोद त्या पुरवणीत छापून आला! स्वतःच्या नावाने छापून आलेले ते पहिले 'साहित्य' पाहून मला जे अप्रूप वाटले, ते शब्दांत सांगता येणार नाही. नकळतपणे मिळालेल्या याच प्रोत्साहनातून मी विविध विषयांवर विचारमंथन करू लागलो आणि माझ्या प्रत्यक्ष लेखनाचा खऱ्या अर्थाने 'श्रीगणेशा' झाला. सुरुवातीच्या काळात लेखनाचा फारसा आत्मविश्वास नसल्याने, मी रेषा असलेल्या कागदांवर आधी कच्चे लिखाण करत असे. ते पुन्हा पुन्हा वाचून, योग्य ती शब्दरचना करून मग दुसऱ्या कागदावर स्वच्छ हस्ताक्षरात पक्के लिखाण करत असे. या प्रक्रियेत वेळ भरपूर जायचा, पण यामुळेच माझी एक स्वतंत्र लेखनशैली आकार घेऊ लागली होती. अवांतर वाचन वाढल्यामुळे शब्दसंग्रहही प्रगल्भ होत गेला. जसजसा अनुभव वाढत गेला, तसतशी थेट आणि अचूक वाक्यरचना करण्याची सवय जडली आणि कच्च्या लिखाणाची गरजच उरली नाही. अवघ्या पाच-सहा वर्षांच्या या सातत्यपूर्ण सरावानंतर, पूर्णपणे कोऱ्या कागदावर एका सरळ रेषेत आपले विचार अतिशय सुस्पष्टपणे मांडण्याचे कौशल्य मी आत्मसात केले.


पुढे संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आणि पदवी पूर्ण केल्यानंतर, माझ्या या लेखनात खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला. संगणकावर विविध देवनागरी फॉन्ट्सचा वापर करून मी मराठी टायपिंग शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला इंग्रजी कीबोर्डवर मराठी शब्द जुळवणे थोडे जिकिरीचे वाटायचे. पण साधारण २००८ च्या सुमारास, भारतात 'युनिकोड'चा वापर वाढू लागला. युनिकोडमुळे कोणत्याही विशिष्ट फॉन्टवर अवलंबून न राहता, आपण थेट संगणकावर मराठीत लिहू लागलो. त्याच काळात इंटरनेटवर 'बाराह' (Baraha) नावाचे एक अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर उपलब्ध झाले. यातील एडिटरमध्ये आपण भारतातील बारा भाषांपैकी हवी ती भाषा निवडून सहज टायपिंग करू शकत होतो. यात इंग्रजी अक्षरांचा वापर करून उच्चारांच्या साधर्म्यावरून (Phonetic Similarity) थेट देवनागरी लिपी टाईप केली जायची. ही पद्धत सोपी आणि वेगवान होती. याच तंत्रज्ञानाच्या साथीने मी २००९ मध्ये स्वतःचा ब्लॉग आणि संकेतस्थळ इंटरनेटवर प्रकाशित केले. नियमित ब्लॉग लेखनासाठी मी पूर्णपणे संगणकावर आधारित याच 'फोनेटिक' मराठी टायपिंगचा आधार घेऊ लागलो.

काही वर्षांनंतर गुगलने 'क्लाऊड इनपुट टूल्स' (Google Cloud Input Tools) आणले आणि संगणकावरील मराठी टायपिंग अधिकच सुखकर झाले. कमीत कमी कीज (Keys) वापरून अचूक देवनागरी शब्दरचना करणे शक्य झाल्याने माझे काम अधिकच सोपे व गतिमान झाले. मात्र, खरी क्रांती गेली पाच-सहा वर्षे अनुभवत असलेल्या गुगलच्या 'स्पीच रिकग्निशन' तंत्रज्ञानामुळे झाली. काहीही हाताने टाईप न करता, केवळ बोलून संगणकामध्ये आपोआप टाईप होण्याची ही सुविधा सुरुवातीला फक्त इंग्रजीपुरती मर्यादित होती. पण लवकरच गुगल डॉक्युमेंट्समध्ये सर्व भारतीय भाषांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली आणि माझ्या लेखनाचा वेग अफाट वाढला. याच 'व्हॉईस टायपिंग'चा प्रभावी वापर करून मी सन २०२० च्या कोविड लॉकडाऊनच्या काळात 'पायथॉन प्रोग्रामिंग'वरील माझे पहिले मराठी ई-बुक केवळ दोन दिवसांत लिहून पूर्ण केले. सुरुवातीला मराठी भाषेचा डिजिटल डेटा कमी असल्याने याची अचूकता शंभर टक्के नव्हती, पण आज ती जवळपास १०० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आता तर मी माझ्या अँड्रॉइड मोबाईलमधील 'गुगल कीप' (Google Keep) वापरून प्रवासात किंवा फावल्या वेळेत कुठेही लेख लिहू शकतो. मनात आलेले विचार फक्त मोबाईलमध्ये बोलायचे आणि ते आपोआप मराठीत टाईप होतात. नंतर लॅपटॉपवर केवळ पाच मिनिटांत थोडेफार बदल करून संपूर्ण मोठा लेख प्रकाशनासाठी तयार होतो, ज्यामुळे वेळेची मोठी बचत होते.

मागील पंचवीस वर्षांतील कागद-पेन ते थेट व्हॉईस टायपिंगपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे तंत्रज्ञानामुळे वेगाने बदललेल्या मानवी जीवनपद्धतीचे एक उत्तम उदाहरण आहे. एकेकाळी एखादे तंत्रज्ञान दशकानुदशके बदलत नसे, पण आता अतिशय सहज, सुलभ आणि आधुनिक पद्धतीने आपण संगणकावर अनेक गोष्टी करू शकतो. याच आधुनिक लेखन पद्धतींचा वापर करून संगणक आणि इंटरनेटच्या जगात मराठी भाषेतील ज्ञान साठवण्यासाठी तसेच तिचा जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. भविष्यात याहूनही अधिक प्रगत तंत्रज्ञान नक्कीच विकसित होईल आणि त्या माध्यमातून आपली मायबोली मराठी तंत्रज्ञानाच्या विश्वात अधिक वेगाने आणि दिमाखाने पसरेल, असा मला सार्थ विश्वास वाटतो.

--- तुषार भ. कुटे 

#मराठी #लेखन

Thursday, March 12, 2026

नैसर्गिक बुद्धिमत्ता

दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख ...



कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या अनेकांच्या मनामध्ये जे विचार आहेत ते नेमकेपणाने या लेखामध्ये लेखकाने मांडलेले आहेत. मागच्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे मानवाच्या सर्वच क्षमता हळूहळू यंत्रामध्ये अंतर्भूत व्हायला लागले आहेत. परंतु याच कारणास्तव आपण आपल्या क्षमता हळूहळू गमावून बसू, ही सर्वात मोठी भीती आहे. तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा परंतु तो सहाय्यक म्हणून पूर्ण बदल म्हणून नव्हे. कृत्रिम बुद्धिमत्ता आज मानवी मेंदूची कामे अगदी सहजपणे आणि आपल्यापेक्षा अधिक वेगाने तसेच अचूकतेने देखील करत आहे. त्यामुळे त्याची भुरळ मानवाला न पडली तर आश्चर्यच. अशावेळी या तंत्रज्ञानाचे आकर्षण न बाळगता समंजसपणे त्याचा वापर होणे आणि करणे अत्यंत गरजेचे आहे. आज आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मधील बहुतांश तज्ञ या तंत्रज्ञानाची नकारात्मक बाजू व्यवस्थितपणे जाणून आहेत. फक्त ही बाजू सकारात्मक दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेसमोर यायला हवी. यातूनच या तंत्रज्ञानाचे अवलंबित्व कमी होऊ शकते. शिवाय आपण आपल्या नैसर्गिक क्षमता गमविण्याऐवजी अधिक मजबूत बनवू शकू. हाच संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. 


--- तुषार भ. कुटे 

Thursday, May 16, 2019

लेखक आम्ही नामधारी

पुढे लिहिण्यापूर्वी खरं सांगायचं तर नामधारी म्हणजे नाममात्र नाही तर 'नवीन नाव धारण करणारे' आहेत. मराठी भाषेमध्ये अनेक लेखक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात अर्थात प्रत्येकाला स्वतःचे मूळ नाव लावायची हौस असतेच असं नाही. मराठी कवींमध्ये मात्र ही प्रथा खूप जोरात दिसते. मीही जेव्हा लिहायला सुरुवात केली होती, त्यावेळेस माझं पूर्ण नाव सर्वप्रथम वापरलं होतं. तुषार भगवान कुटे अशा पूर्ण नावाने माझा पहिला लेख प्रसिद्ध झाला होता. काही वृत्तपत्र वाले माझं मधलं नाव काढून टाकायचे. त्यामुळे मी तुषार भ. कुटे या नावाने लेख लिहायला सुरुवात केली. मराठीमध्ये अशा नावाने लेख लिहिण्याची परंपरा फारच क्वचित दिसते. त्यामुळे पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, ह. अ. भावे सारख्या नामवंत लेखक लेखकांकडून प्रेरणा घेऊन काही लेख मी तु. भ. कुटे या नावाने ही लिहिलेले आहेत. परंतु तरीही तुषार भ. कुटे या नावाचा मी सगळ्यात जास्त वापर केला. इंग्रजीमध्ये ही प्रसिद्ध झालेले माझे पहिले पुस्तक "कोअर जावा प्रोग्रामिंग : ए प्रॅक्टिकल अप्रोच" हे मी तुषार बी. कुटे याच नावाने लिहिलेले आहे. 'महाराष्ट्र हेराल्ड' या एकेकाळच्या इंग्रजी वृत्तपत्रासाठी मी नाव वापरलं होतं ...  K Tushar Bhagwan! काहीतरी वेगळं करायचं म्हणून तुषार पिंपरीपेंढारकर या नावाने सुद्धा मी लेख लिहिलेले आहेत. शिवाय एकदा सकाळ मध्ये कविता लिहिली होती ती 'के. तुषार' या नावाने प्रसिद्ध झाली आहे. माझा आवडता खेळाडू सौरभ गांगुली होता. त्याचंही नाव मी एकदा धारण करून तुषार गांगुली या नावाने लेख लिहिला होता!!! आपलं नाव सतत पेपर मध्ये प्रसिद्ध होत असल्यास त्याचे विशेष काही वाटत नाही. त्यामुळे कोणत्याही नावाने लेख लिहिला तरी तो प्रसिद्ध झाला, हे जास्त महत्त्वाचे होते. साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी मी पुण्याच्या दैनिक प्रभात मध्ये 'बाबुराव रामजी' या नावाने ही लेख लिहिलेले आहेत! हे माझ्या आजोबांचं नाव! आजही या नावाने मी लेख लिहित असतो.
शेक्सपिअरने म्हटलं आहे, नावात काय आहे? हे मराठीतले लेखक पुरेपूर जाणून आहेत. मीही त्यातलाच एक! कदाचित भविष्यात मी आणखी वेगळ्या नावांनी लिहित जाईन. शेवटी काय, लेखकाला आपले विचार पोहोचणे गरजेचे असते बाकी नाव कोणाचेही असो!











Wednesday, January 27, 2010

योग्य निर्णय, पण अंमलबजावणी हवी.


ह्या बातमीवर क्लिक करून पाहा. काही दिवसांपूर्वी ती दैनिक सकाळच्या महाराष्ट्र आवृत्तीमध्ये प्रकाशित झाली होती. महापालिका कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इमारतींचा दर्शनी भाग कायद्याने आकर्षक ठेवणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास सुजाण नागरिक त्याचे निश्चितच स्वागत करतील.
आपल्या देशातील शहरांत फिरताना एक गोष्ट मात्र जाणवते की, इमारतींच्या बाह्य आकर्षकतेबाबत तिचे मालक फारशे गंभीर दिसत नाहीत. इमारत बांधून झाली व तीच्या सदनिका विकल्या गेल्या वा भाड्याने दिल्या की आपले काम संपले असे त्यांचे सर्वसाधारण विचार असतात. तसेच अनेक घरमालकही घराच्या बाह्य आकर्षकतेबाबत उदासीन दिसतात. दिवसेंदिवस घरे व इमारती ह्या जुन्या होऊन त्यांचा रंगही उडून जातो तरी घरांतल्यांना चिंता नसते. महाराष्ट्रातल्या पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात काही विशिष्ट ठिकाणी अशा इमारती व घरे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे एकंदरीत शहराच्याच सौंदर्यावर त्याचा प्रभाव पडतो. शहरांची आकर्षकता कमी होते. त्यांपेक्षा खेड्यांतील घरे तरी अनेकदा बरी वाटतात.
युरोपीय व अमेरिकन देशांमध्ये जितकी शहरे आकर्षक वाटतात तितकी भारतात वाटत नाहीत. तिथल्या लहानातल्या लहान शहरांतील घरेही बाहेरून सुंदर दिसतात. भारतीय ’सौंदर्य’ त्यापुढे खुजे वाटते. अर्थातच भारतीय शहरांची आकर्षकता टिकवण्यासाठी व वाढविण्यासाठी इमारतींचे सौंदर्य वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरीकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. याबाबतीत राज्य सरकार वा केंद्र सरकार जो कायदा करील त्याला नागरीकांचा पाठिंबा व सहकार्य असायला हवे. व कायदा झाल्यावर त्याची अंमलबजावणी होणेही जरूरीचे आहे. अन्यथा अन्य कायद्यांप्रमाणे हा कायदाही केवळ नावालाच ’कायदा’ म्हणून राहील.