Tuesday, June 7, 2011

गूगल क्रोमबुक येतेय...

=
गूगल म्हणजे इंटरनेट विश्वाचा बादशहाच मानला जातो. इंटरनेटवरील विविध प्रकारची अप्लिकेशन्स ही गूगलच्या नाविन्यपूर्ण संशोधनाचा उत्तम नमूनाच आहे. संगणक क्षेत्राला नवनव्या तंत्रज्ञानाशी ओळख करुन देण्यात गूगलचा हात कोणीच धरू शकत नाही. संगणक तंत्रज्ञानाला गूगलचा परिशस्पर्श झाल्यावर त्याचे सोने नक्कीच होते, हे त्यांनी आजवर सिद्ध करून दाखविले आहे.

येत्या १५ जूनला गूगल कंपनी संगणक विश्वातील नवा आविष्कार अर्थात ’क्रोमबुक’ घेऊन येत आहे. काही वर्षांपूर्वी गूगलने स्वत:चा "गूगल क्रोम" नावाचा इंटरनेट ब्राऊजर बाजारात आणला होता. त्याची लोकप्रियता वाढीस लागल्यावर त्यांनी ’क्रोम’ नावाच्या नव्या संगणक प्रणालीची अर्थात ऑपरेटिंग सिस्टीमची घोषणा केली होती. तीच घोषणा आज सत्यात उतरत आहे. दोन वर्षांपूर्वी संगणकाला आणखी दर्जेदार करण्यासाठी गूगलने पाऊल उचलले होते. त्याची फलनिष्पत्ती क्रोमबुकच्या रूपाने होत आहे.

सॅमसंग व एसर ह्या कंपन्यांच्या सहयोगाने गूगलने स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम बनविली व नवा नोटबुक लॅपटॉप संगणक तयार केला आहे. संगणक क्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या ’क्लाऊड कॉम्युटिंग’ तंत्राद्वारे तयार केलेला हा पहिलाच संगणक होय. संगणकातील इंटरनेट तंत्रज्ञानाला पूर्णपणे गृहित धरूनच बनविलेला हा संगणक आहे. गूगलने त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर नमूद केल्याप्रमाणे ह्या नव्या संगणकाला बूट होण्यासाठी अर्थात चालू होण्यासाठी केवळ आठ सेकंदांचा कालावधी पुरेशा ठरणार आहे. इतक्या अल्प वेळात बूट होणारी ही पहिलीच ऑपरेटिंग सिस्टीम होय. शिवाय केवळ काही सेकंदांच्या कालावधीत आपले ई-मेल वाचणे ग्राहकाला शक्य होईल. संगणकावरील सर्व सॉफ्टवेयर्स ही ओपन सोर्स व फ्रीवेयर असून ती आपोआप अपडेट केली जातील. त्याकरिता दररोज ती तपासत बसण्याची गरज नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे या संगणकात केला गेलेला ’क्लाऊड कॉम्युटिंग’ तंत्रज्ञानाचा वापर होय. ह्यात संगणकामधील सर्व माहिती गूगल आपल्या एका सेंट्रल सर्वरवर साठवून ठेवेल, जेणेकरून याकरिता संगणकाला वेगळ्या हार्ड डिस्कची गरजच भासणार नाही. म्हणजेच ’क्रोमबुकच्या’ मालकाला आपल्या माहितीसाठ्याविषयी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. ती काळजी आता गूगलने घ्यायचे ठरविले आहे. याद्वारे संगणक वापरकर्ता आपली माहिती कोणत्याही क्रोमबुकवरून वापरू शकतो. त्याकरिता पोर्टेबल हार्ड डिस्क वा पेन ड्राईव्हची गरज नाही. हेच तंत्रज्ञान क्रोमबुकला लोकप्रिय करण्यासाठी पुरेशे ठरेल.

आज वापरात असलेल्या सर्व लॅपटॉपची बॅटरी साधारण तीन-चार तास पुरते व त्यानंतर ते पुन्हा चार्ज करावे लागतात. परंतु, क्रोमबुकला पूर्ण दिवसाचा विद्युत पुरवठा त्याच्या डीसी बॅटरीद्वारे आता मिळणार आहे. म्हणजेच एकदा बॅटरी चार्ज केली की ती दिवसातून पुन्हा चार्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही, इतकी काळजी क्रोमबुकच्या बॅटरीने केलेली आहे. थ्रीजी व वाय-फाय सारख्या इंटरनेटसाठी लागणाऱ्या सुविधा क्रोमबुकमध्ये ’इन-बिल्ट’ अर्थात आधीपासूनच असणार आहेत. या तंत्राने संगणकावरून फोन लावण्याची सुविधा आता ग्राहकाला मिळेल. आपल्या माहितीच्या सुरक्षेसाठी गूगलने विशिष्ट ’मेनी लेयर सेक्युरेटी’चा योग्य वापर क्रोमबुकमध्ये केलेला आहे.

अनेक प्रकारच्या ओपन स्टॅण्डर्डसचा वापर केल्याने क्रोम या गूगलच्या मुख्य वेब ब्राऊजरला सर्व सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. गूगलची सर्व ऍप्लिकेशन्स क्रोमद्वारे सहजच वापरता येऊ शकतील. जून १५, २०११ पासून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलॅण्ड्स, ईटली या देशांत क्रोमबुक उपलब्ध केले जाणार आहे. शिवाय आगामी काळात इतर देशांतही ते लवकरच उपलब्ध होईल. बिज़नेस (व्यापार) व शिक्षण क्षेत्रात वेगळे तंत्रज्ञान वापरलेले क्रोमबुक गूगलद्वारे लवकरच उपलब्ध होतील. आज गूगल क्रोम ब्राऊजरचे १६ कोटी वापरकर्ते आहेत. त्या सर्वांना एकाच छत्राखाली जोडण्याचे गूगलचे उद्दीष्टही क्रोमबुकद्वारे साध्य केले जाईल.

आपल्या लॅपटॉपला ’रीप्लेसमेंट’ म्हणून गूगलच्या क्रोमबुककडे आज पाहिले जात आहे...

Monday, June 6, 2011

सैतानचा मनोरा अर्थात डेव्हिल्स टॉवरअमेरिकेमध्ये व्योमिंग प्रांतात क्रूक कंट्री येथे ’डेव्हिल्स टॉवर’ नावाची निसर्गनिर्मित वास्तू उभी आहे. दरवर्षी लाखो पर्यटक व गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेणारी ही वास्तू होय. शेजारच्या छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे एका विशिष्ट प्रकारची रचना असणारा हा एक प्रकारचा डोंगरच आहे. परंतू, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्याला मनोरा अर्थात टॉवर म्हटले जाते. जमिनीपासून डेव्हिल्स टॉवर हा ३८६ मीटर्स उंच आहे तर समुद्रसपाटीपासून त्याची उंची तब्बल १५५८ मीटर्स इतकी आहे. २४ सप्टेंबर १९०६ मध्ये राष्ट्रपति रूझवेल्ट यांनी ही वास्तू राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केली होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे चार लाख पर्यटक व गिर्यारोहक डेव्हिल्स टॉवरला भेट देतात व त्यातील जवळपास एक टक्का अर्थात चार हजार गिर्यारोहक हा मनोरा पारंपारिक पद्धतीने चढून पारही करित असतात.

व्योमिंग प्रांतात राहत असलेल्या अदिवासी जमातींना या पहाडाची सर्वप्रथम माहिती होती. युरोपियन अमेरिकेत येण्यापूर्वी अरापाहो, क्रो, चेचेन, कियोवा, लाकोटा, व शोशोन या जमाती या डेव्हिल्स टॉवरशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेल्या होत्या. या जमातीतील लोकांनी या मनोऱ्याला आपाआपली वेगवेगळी नावे ठेवलेली होती. त्यात प्रामुख्याने चेचेन जमातीचे ’बियर्स लॉज’ हे नाव प्रसिद्ध आहे. सन १८७५ मध्ये या मनोऱ्याचे डेव्हिल्स टॉवर असे नामांतरण झाले. कर्नल रिचर्ड आयर्विंग डॉज यांनी ’बियर्स लॉज’ टॉवरला ’बॅड गॉड्स टॉवर’ असे ऐकले व बाह्य जगताला ह्या पर्वताच्या याच नावाची माहिती झाली. परंतू, कालांतराने हे नाव डेव्हिल्स टॉवर म्हणून ओळखले जाऊ लागले. सन २००५ मध्ये डेव्हिल्स टॉवरचे पुन्हा पूर्वीचे नाव नामकरण करण्यासाठी हालचाली झाल्या होत्या परंतू, अनेक वर्षे वापरले जाणारे नावच कायम ठेवण्यात आले.

हा मनोरा म्हणजे सर्वसाधारण डोंगरासारखा दिसत नाही. सरळ उभा असणाऱ्या मानवनिर्मित मनोऱ्याप्रमाणे याची रचना असल्या कारणाने आजही त्याच्या निसर्गनिर्मित उत्पत्तीबाबत एकमत झालेले नाही. आजुबाजुच्या खडकांवरून तरी तो ट्रायॅसिक काळातीलच आहे, हे अनुमान वैज्ञानिकांनी लावलेले आहे. बहुतांश सहमती हा मनोरा ज्वालामुखीतून तयार झाला आहे, यावरच आहे. परंतु, या अनुमानासही पुरेशे पुरावे मिळालेले नाहीत. अतिशय प्राचीन काळातील असल्याने त्याच्या निर्मीतीचा पेच अजुनही शास्त्रज्ञांना सोडवता आलेला नाही. शिवाय इथे राहत असलेल्या जमातींमध्ये अनेक समजुती व आख्यायिका डेव्हिल्स टॉवर बद्दल ऐकायला मिळतात.

कियोवा व लाकोटा जमातींच्या समजुतीनुसार एक वेगळी आख्यायिका सांगण्यात येते. सात मुली जंगलात खेळत असताना अचानक एका रानटी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्याच्यापासून वाचण्यासाठी ह्या मुली एका उंच पर्वतावर चढल्या. तरिही अस्वलाने त्यांना पाठलाग सोडला नाही. मुलींनी आपल्याला वाचवण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली तेव्हा देवाने ही पर्वत आणखी उंच केला तेव्हा अस्वलाने त्यांना पकडण्यासाठी पर्वतावर थेट चढाई सुरू केली. त्याच्याच पाऊलखुणांमुळे पर्वताचे आत्ताचे रूप पाहायला मिळते. अशी कियोटांची समजुत आहे.

अशाच एका आख्यायिकेत दोन मुले आपल्या गावापासून भरकटतात. तेव्हा जंगलात त्यांच्यावर माटो नावाच्या अवाढव्य अस्वलाची नजर पडते. मुले पळू लागतात व देवाचा धावा करतात. मग, त्यांचा देव ’वाकन टंका’ प्रसन्न होऊन मुलांच्या जमिनीचा पर्वत तयार करतो व त्यांना खूप उंचीवर नेतो. माटो मात्र त्यांना पर्वताच्या सर्व बाजुंनी चढून पकडायचा प्रयत्न करतो पण त्याला यश मिळत नाही. त्याच्या पाऊल खुणांनी मात्र पर्वतावर मोठेमोठे पट्टे तयार होतात.

याच आख्यायिकेवर आधारित एक पेंटिग सुद्धा तयार झालेली आहे.


Wednesday, June 1, 2011

उपयुक्त विचारधन

फॉर्वर्डेड मेल्स मध्ये कधीकधी ज्ञानाची ओंजळ भरलेली असते. असाच एक फॉर्वर्डेड मेल मला आला होता. त्यात असलेले उपयुक्त विचारधन मी वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहे. इंग्रजीतील ’Inspiring Thoughts’ मी मराठीत भाषांतरीत केले आहेत.

* राग ही अशी स्थिती आहे जिथे जीभ ही मेंदूपेक्षा वेगाने कार्य करते.
* तुम्ही तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही पण भविष्याच्या चिंता सोडून वर्तमानावर राज्य मात्र करू शकता.
* देव नेहमी मनुष्याला त्याचे सर्वार्थ देत असतो फक्त निवड ही त्याच्यावर सोपवतो.
* सर्व मनुष्यजात ही एकाच भाषेत स्मितहास्य करते.
* प्रत्येकजण सुंदर असतो पण, प्रत्येकाला ते कळेलच असे नाही.
* प्रत्येकाला वाटतं की, आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं, विशेषत: जेव्हा त्याची त्या प्रेमासाठी पात्रता नसते.
* तुमच्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाला धन्यवाद द्या व तुमच्या गरजांसाठी देवावर विश्वास ठेवा.
* तुमच्या हृदयात जर भूतकाळातील यातना व भविष्यातील काळजी घर करून असतील तर वर्तमानासाठी तुमची झोळी रिकामी आहे, असे समजा.
* तुमची आजची निवड ही नक्कीच उद्यावर परिणामकारक ठरणार आहे.
* मनुष्य हा नेहमी बाह्य सौंदर्यावर खूष असतो. परंतू, देवाचे मात्र तसे नाही.
* हसण्यासाठी आपल्या आयुष्या थोडा वेळ राखून ठेवा. तुमच्या आत्म्याचे तेच संगीत होय.
* कडक शब्द हे कुणाचीही हाडे मोडू शकत नाहीत पण, हृदय मात्र तोडू शकतात.
* कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी आपल्याला त्यातून जावेच लागते.
* प्रेम ही अशी गोष्ट आहे जी न तोडता अनेकांना देता येते.
* आनंद हा इतरांकडून वाढविता येतो पण तो इतरांवर अवलंबून नाही.
* दुसऱ्यावर एक मिनिट रागवल्याने तुम्ही ६० सेकंदांचा आनंद गमावता जो तुम्हाला परत मिळवता येत नाही.