Monday, June 28, 2021

गुगल आणि मराठी भाग ३/१० - गूगल क्रोम एक्सटेंशन

गूगल क्रोम एक्सटेंशन

जगातील सर्वाधिक संगणकांमध्ये वापरण्यात येणारा वेब ब्राउझर म्हणजे गुगल क्रोम होय. गुगलने तयार केलेला हा वेब ब्राऊजर जगातील दोन तृतीयांश संगणकांमध्ये वापरण्यात येतो. या ब्राउझरद्वारे अतिशय वेगाने इंटरनेट ब्राउझिंग करता येत असल्या कारणाने तो सर्वात लोकप्रिय ब्राउझर म्हणून गणला गेलेला आहे.  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गुगलने नैसर्गिक भाषा प्रक्रिया अर्थात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या सर्वच उत्पादनांचा वापर आपल्याला या वेब ब्राउझरमध्ये करता येतो.
मागील लेखामध्ये आपण गूगल क्लाऊड इनपुट टूल्सचा वापर करून मराठी भाषा कशी लिहायची, हे पाहिले. तशाच प्रकारच्या क्लाऊड इनपुट टूल्सचा वापर गुगल क्रोम ब्राउजरमध्ये थेट एक्सटेन्शनचा वापर करून करता येतो. गूगल क्रोम एक्सटेंशन म्हणजे या वेब ब्राउझरला गुगलद्वारे देण्यात येणारी अतिरिक्त सुविधा आहे. ज्यामध्ये हजारो एक्स्टेंशन्स आज गूगल क्रोममध्ये उपलब्ध आहेत. त्यातीलच एक एक्सटेंशन म्हणजे 'गूगल इनपुट टूल्स' होय. त्याचा वापर करायचा असल्यास क्रोमच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

https://chrome.google.com/webstore/category/extensions



चित्र क्रमांक १ मध्ये दाखवल्याप्रमाणे गुगल क्रोमचे वेब स्टोअर उघडेल. या संकेतस्थळावर डाव्या बाजूला Search the Store लिहिलेले एक टेक्स्टबॉक्स दिसेल. त्यामध्ये google input tools असे इंग्रजीमध्ये टाईप करा. 
 

चित्र क्रमांक २ मध्ये दाखवल्याप्रमाणे गूगल इनपुट टूल्सचे एक्सटेंशन तुम्हाला दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर चित्र क्रमांक ३ प्रमाणे विंडो उघडेल. 
 
आता Add to Chrome या बटनावर क्लिक करा. यानंतर तुमच्या वेब ब्राउझरला चित्र क्रमांक ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे पॉप डाऊन विंडो उघडेल. 
 

आता Add Extension या बटणावर क्लिक करा. नंतर लगेचच क्रोमच्या अधिकृत संकेतस्थळावरून सदर एक्सटेन्शन डाउनलोड होईल व चित्र क्रमांक ५ मध्ये दाखविल्याप्रमाणे एक मेसेज तुम्हाला उजव्या बाजूला वरील कोपऱ्यामध्ये दिसून येईल. 
 
त्यावर क्लिक केल्यानंतर गूगल इनपुट टूल्स इन्स्टॉल झालेले दिसेल. चित्र क्रमांक ६ मध्ये दाखविल्याप्रमाणे या नावासमोरील 'पिन आयकॉन'वर क्लिक करा. 
 

यामुळे सदर एक्सटेन्शन फ्रंट पेज वर तुम्हाला सातत्याने दिसून येईल. चित्र क्रमांक ७ मध्ये दाखविल्याप्रमाणे या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसून येतील. यापैकी पहिल्या Extension Option वर क्लिक करा. 
 

इनपुट टूल्समध्ये असलेल्या गुगलने दिलेल्या सर्व भाषा आता तुम्हाला दिसून येतील. खाली स्क्रोल करुन डाव्या बाजूच्या विंडोमध्ये मराठी भाषा शोधा. त्यावर क्लिक करा व समोरील बाणावर क्लिक करून भाषा निवडा. याद्वारे मराठी भाषा उजव्या बाजूच्या विंडोमध्ये अर्थात 'सिलेक्टेड इनपुट टूल्स'मध्ये तुम्हाला दिसून येईल. याकरता चित्र क्रमांक ८ तपासा. 
 

आता चित्र क्रमांक ९ मध्ये दाखविल्याप्रमाणे गूगल इनपुट टूल्सच्या उजव्या वरील कोपऱ्यातील आयकॉनवर क्लिक करा. 
 

ज्याद्वारे तुम्हाला मराठी नाव सर्वात वरच्या बाजूला दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर मराठी टायपिंग सक्षम होईल. आता कोणत्याही वेबसाइटवर तुम्ही मराठीमध्ये टाईप करू शकता.
गूगल इनपुट टूल्सचे आयकॉन 'म' या अक्षराने तुम्हाला दिसून येईल. ते निळ्या रंगामध्ये असल्यास मराठी टायपिंग चालू आहे, असे समजते. चित्र क्रमांक १० मध्ये दाखविल्याप्रमाणे गुगलची वेबसाईट ओपन करून त्यामध्ये मराठीमध्ये लिहायला सुरुवात करा. 
 

जी अक्षरे अथवा शब्द तुम्ही इंग्रजीमध्ये लिहाल, ती मराठी मध्ये टाईप झालेली दिसून येतील. अशाप्रकारे तुम्ही गुगलमध्ये थेट मराठी भाषेमध्ये सर्च करू शकता. शिवाय एखादा मराठी लेख लिहायचा असल्यास गुगल डॉक्युमेंट्सचा (docs.google.com) देखील वापर करता येऊ शकतो. चित्र क्रमांक ११ मध्ये दाखविल्याप्रमाणे मी गुगल डॉक्यूमेंटची वेबसाईट उघडलेली आहे. त्यातील एका नव्या डॉक्युमेंट मध्ये मी गूगल इनपुट टूल्सचा वापर करून टाईप केलेले आहे. 
 

अशाच पद्धतीने गूगल इनपुट टूल्सचा वापर अन्य ठिकाणी देखील करता येऊ शकतो. उदाहरणार्थ चित्र क्रमांक 12 मध्ये दाखविल्याप्रमाणे विकिपीडियाच्या वेबसाईट वर मी मराठी भाषा या नावाने सर्च केलेले आहे. 
 
 
अशाच पद्धतीने तुम्ही अन्य वेबसाईटवर देखील मराठी भाषेचा थेट वापर करू शकता. याकरिता कोणत्याही प्रकारच्या फॉन्टच्या वापराची आवश्यकता नाही. पुन्हा कुठे जर इंग्रजी मध्ये लिहायचे असल्यास, उजव्या वरील कोपऱ्यातील 'म' अक्षरावरून क्लिक करून ते बंद करा. आता इंग्रजी मध्ये तुम्हाला टाईप करता येऊ शकेल. या एक्स्टेंशनची सुविधा केवळ गूगल क्रोम वेब ब्राऊजर मध्येच करण्यात आलेली आहे. इंटरनेटवर मराठीचा सहज वापर करण्यासाठी याचा उपयोग करा. धन्यवाद!

Thursday, June 24, 2021

तंत्रज्ञानाच्या दारातील युरोप

संगणक तंत्रज्ञान म्हणजे अमेरिका, असा सर्वसाधारण आपला समज असतो. परंतु, युरोपातील अनेक देशांमध्ये विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित केले जाते. शिवाय या तंत्रज्ञानाधारित वस्तूंचा उपयोग जगभरातील अनेक देश करत आहेत. अशाच काही देशातील महत्त्वाच्या उत्पादनांचा घेतलेला हा आढावा.

झेक रिपब्लिक: थ्रीडी प्रिंटिंग

२०२० पर्यंत थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानामध्ये झेक प्रजासत्ताक या देशाने मोठी आघाडी घेतलेली आहे. विविध प्रकारच्या उत्पादनांचा मार्ग या तंत्रज्ञानामुळे सुकर झाल्याचे दिसते. जगातील थ्रीडी प्रिंटिंगचे तंत्रज्ञान व त्यातील नवनव्या सुविधा या झेकच्या प्राग या राजधानीमध्ये तयार झालेल्या आहेत. प्राग शहरातील प्रुसा रीसर्च ही कंपनी आधुनिक काळातील वेगाने विकसित होणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. दर महिन्याला हजारो थ्रीडी प्रिंटिंग मशीन बनविण्याचे उद्योग या कंपनीद्वारे केले जातात. विशेष म्हणजे थ्रीडी प्रिंटिंग मशीन स्वतः दुसऱ्या थ्रीडी प्रिंटिंग मशीनची निर्मिती करते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान ओपन सोर्स आहे. अर्थात तुम्हाला जरी स्वतःचे थ्रीडी प्रिंटींग हार्डवेअर व सॉफ्टवेअर बनवायचे असल्यास, त्याचा स्त्रोत इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या थ्रीडी प्रिंटिंग मशीनचा वापर वेगाने होणार आहे.


इस्टोनिया: डिजिटल प्रशासन

डिजिटल प्रशासन कशा पद्धतीचे असावे, याचा आदर्श वस्तूपाठ युरोपातील इस्टोनिया या देशाने घालवून दिलेला आहे. अनेक देशांमध्ये जी कामे करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये तासन् तास रांगा लावाव्या लागतात, ती कामे अगदी काही क्लीकवर इस्टोनिया देशामध्ये आपल्या नागरिकांसाठी केली जातात. एकंदरीतच या देशातील ९९ टक्के प्रशासकीय कामे ही ऑनलाईन पद्धतीनेच होतात. मुलाचा जन्म झाल्यापासूनच त्याच्या सर्व नोंदी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत. बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलद्वारेच त्याच्या जन्माचे प्रमाणपत्र इ-पद्धतीने तयार केले जाते. त्याबरोबरच आरोग्य विमा आणि बाळासाठी असणारे अन्य शासकीय फायदे लगेचच त्याला मिळायला सुरुवात होते. यात पालकांचा कोणताही थेट सहभाग राहत नाही. म्हणूनच बाल्टिक प्रदेशात येणाऱ्या या देशाला ई-इस्टोनिया असेही म्हटले जाते. मागील अनेक वर्षांपासून ई-प्रशासन करण्याचे कार्य इस्टोनिया मध्ये वेगाने सुरू होते. शिवाय त्यांची लोकसंख्येची घनता देखील कमी असल्यामुळे डिजिटल प्रशासन करण्यामध्ये फारशा अडचणी आल्या नाहीत. आज सुमारे तीन हजारपेक्षा अधिक सेवा या ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना दिल्या जातात. त्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांना केवळ स्वतःचे राष्ट्रीय ओळखपत्र वापरावे लागते. विशेष म्हणजे हेच ओळखपत्र ते ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरोग्य विम्यासाठी वापरू शकतात. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ओळखपत्राचा वापर करून ऑनलाइन मतदान देखील करता येते. इस्टोनियन नागरिकांना केवळ तीन गोष्टींसाठी प्रत्यक्ष शासकीय कार्यालयात जावे लागते. पहिले लग्नाची नोंदणी करण्यासाठी, दुसरे घटस्फोट घेण्यासाठी आणि तिसरे कोणती मालमत्ता विकत घ्यायची असल्यास.

जर्मनी: स्मार्ट फॅक्टरी

या शतकाच्या सुरुवातीलाच आपण औद्योगीकरणाच्या चौथ्या पिढीमध्ये प्रवेश केला. यास तंत्रज्ञानातील भाषेत इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो (Industry 4.0) असे म्हटले जाते. या पिढीमध्ये औद्योगिक क्षेत्राचे स्वयंचलन करण्यावर भर देण्यात आलेला आहे. ज्याद्वारे कमीत कमी मनुष्यबळ वापरून अधिकाधिक उत्पादन केले जाते. कारखान्यांमधील जवळपास सर्वच यंत्रसामग्री ही स्वयंचलित आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय कमी मनुष्यबळाचा वापर केला जातो. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून देखील अनेक निर्णय घेतले जातात. यास "स्मार्ट फॅक्टरी" असे म्हटले जाते. मागील दशकांमध्ये औद्योगिक प्रगतीत जर्मनीचा खूप मोठा वाटा होता. ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये केलेली जर्मनीची प्रगती वाखाणण्याजोगी होती. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर हा वेग काहीसा मंदावला. परंतु, हळूहळू त्याने पूर्ण वेग घेतला. आज जर्मनीत कारखान्यामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान अतिशय अद्ययावत प्रकारचे आहे. कॅमेरा तसेच सेन्सर्सचा वापर करून उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष ठेवले जाते. शिवाय रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे अनेक कार्ये सहज व सुलभ पार केली जातात. याशिवाय ड्रोनद्वारे संपूर्ण कारखान्यावर व कच्च्या मालाच्या वितरणावर लक्ष ठेवण्यात येते. एखाद्या ठिकाणी कच्चा माल संपला असेल किंवा संपत आला असेल तर सॉफ्टवेअरद्वारे आपोआप ऑर्डर दिल्या जातात. कंपनीतील सर्व कामगारांवर लक्षही ठेवले जाते. जर्मनीतील अनेक कंपन्यांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे. उच्च वेगाच्या इंटरनेटद्वारे मशीन, सॉफ्टवेअर आणि रोबोट एकमेकांना जोडलेले आहेत. अनेक ठिकाणी आरएफआयडी चिप बसवून माहितीची देवाण-घेवाण, नियंत्रण व विश्लेषण केले जाते. इंडस्ट्री ४.० मध्ये स्वयंचलन व स्वायत्तता या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे. त्यादृष्टीनेच ग्राहकांची गरज भागवण्यासाठी स्मार्ट फॅक्टरीची रचना करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी ग्राहकांचा थेट कंपनीशी संवाद होत असतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व चॅटबोट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कंपन्या ग्राहकांची मते व माहिती जाणून घेतात. त्यानुसारच उत्पादन प्रक्रिया राबवली जाते. या कारणास्तव अनेक कंपन्यांकडे ग्राहक आकर्षित झाले आहेत. अतिशय वेगाने होणारी कंपन्यांची प्रगती संगणक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यामुळेच होत असताना दिसते. "इंटरनेट ऑफ थिंग्स" या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कंपनीच्या मालकांना कंपनीशी संबंधित प्रत्येकाशी थेट संवाद व नियंत्रण साधने सहज शक्य झाले आहे. त्यामुळे वेळेची, ऊर्जेची व मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात बचत होताना दिसत आहे. भविष्यकाळाचा विचार केल्यास लवकरच संपूर्ण स्वयंचलित स्मार्ट फॅक्टरी तयार झाल्यास आश्चर्य वाटायला नको!

लक्झेंबर्ग: वेगवान इंटरनेट

युरोपातील सर्वात वेगवान इंटरनेट लक्झेंबर्ग या देशामध्ये उपलब्ध आहे. जागतिक आकडेवारीचा विचार केल्यास सिंगापूरनंतर इंटरनेटच्या वेगामध्ये लक्झेंबर्गचा दुसरा क्रमांक लागतो. शिवाय याच कारणामुळे स्टार्ट-अप कंपन्यांसाठी सर्वोत्तम जागा म्हणून या देशाचे नाव युरोप मध्ये अग्रणी आहे. लक्झेंबर्गने डिजिटल प्रणाली विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतविला आहे. त्यातच वेगवान इंटरनेट या देशात उपलब्ध झालेले आहे. इंटरनेटच्या एकूण व्याप्तीचा विचार केल्यास या देशामध्ये ९६ टक्के जागेवर इंटरनेट उपलब्ध आहे. एकूण युरोपमध्ये हाच आकडा ७४ टक्के इतका येतो. लक्झेंबर्गमध्ये सर्व प्रमुख ठिकाणी शासनाद्वारे वायफाय इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्याद्वारे नागरिकांना आपल्या मोबाईलवर थेट इंटरनेट वापरता येते. याच कारणास्तव खाजगी इंटरनेट सुविधा देणाऱ्या कंपन्या या देशामध्ये अतिशय अल्प प्रमाणात आहेत.

फिनलँड: ई-हेल्थ

कोणत्याही देशाच्या दृष्टीने आपल्या नागरिकांचे आरोग्य हे सर्वोच्च स्थानी असते. याचा प्रत्यय आपण गेल्या एक वर्षापासून येतच आहे. देशाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे डिजिटाइज्ड करण्याचे काम फिनलँड या देशाने केलेले आहे. जगातील सर्वात अत्याधुनिक आरोग्य सुविधा या देशामध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय या प्रकारची यंत्रणा व सॉफ्टवेअर निर्यात करणाऱ्या अनेक कंपन्या फिनलंड देशांमध्ये स्थित आहेत. मागील काही वर्षांपासून मोबाईलचा, ऑनलाईन बँकिंगचा व गव्हर्नन्सचा वाढता वापर पाहता फिनलँडने या तंत्रज्ञानाचा व सुविधांचा वापर आरोग्याच्या दृष्टीने करण्यासाठी यंत्रणा विकसित केली. डॉक्टरद्वारे दिले जाणारे प्रिस्क्रिप्शन देखील डिजिटली दिले जाते. २०१० पासून नागरिकांचा सर्व आरोग्यविषयक डेटा आज त्यांच्या आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध आहे. या माहितीचा उपयोग देशातील कोणताही डॉक्टर सदर रुग्णाची व शासनाची अनुमती घेऊन वापरू शकतो. त्याद्वारे नागरिकांच्या आरोग्याचा पूर्ण इतिहास डॉक्टरांना पाहता येतो. याशिवाय मागील वीस वर्षांची माहिती साठवण्याची सुविधा देखील या यंत्रणेमध्ये आहे. यामुळे देशात कुठेही नागरिक आरोग्य सुविधेचा वापर करून घेऊ शकतात. तसेच अन्य शहरात असलेल्या डॉक्टरांशी संवाद करण्याची प्रणाली देखील फिनलँडमध्ये तयार करण्यात आलेली आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंट व मार्गदर्शन करण्याची सुविधा या यंत्रणेत उपलब्ध आहे. फिन-जेन नावाच्या प्रकल्पाअंतर्गत नागरिकांच्या आरोग्याविषयीचे अनेक प्रकल्प या देशात राबवले जात आहेत. विशेष म्हणजे दहा टक्के नागरिकांच्या गुणसूत्रांची माहितीसुद्धा सरकारकडे उपलब्ध आहे. ज्याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भविष्यात होणाऱ्या रोगांचे निदान आधीच करून घेणे शक्य होणार आहे!

अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर भारतासारख्या विकसनशील देशात देखील शक्य आहे. आपल्याकडे तंत्रज्ञांची कमतरता नाही. पण राजकीय इच्छाशक्ती, डिजिटल सुविधांचा अभाव आणि संगणक साक्षरता या मुख्य अडथळ्यांकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता भासते.

- तुषार भ. कुटे, पुणे
 

Tuesday, June 8, 2021

मराठीतून अभियांत्रिकी

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे यावर्षीपासून भारतातील विविध १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रादेशिक भाषांमधून अभ्यासक्रम चालविण्यासाठी प्रस्ताव पाठविलेले आहेत. मागील वर्षीच या विषयाची चर्चा सुरू झाली होती. अखेर ती अंतिम टप्प्यात आली. याबद्दल तंत्रशिक्षण परिषदेचे आभार मानायला हवे. काही महिन्यांपूर्वी तंत्रशिक्षण परिषदेने द्वितीय ते चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यात त्यांना असे आढळून आले की ४२ टक्के विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा आहे. त्यातूनच नवीन प्रस्ताव तयार झालेले आहेत. भारतातील मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि हिंदी भाषिक प्रदेशांमधून प्रादेशिक भाषेमध्ये अभियांत्रिकी शिक्षण लवकरच सुरू होणार आहेत. मराठी भाषेत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातून पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (सीओईपी) या दोनच महाविद्यालयांचे प्रस्ताव आहेत. विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहराने पुन:श्च मराठी भाषेचे देखील माहेरघर आहे, हे सिद्ध केले आहे. शिवाय या निमित्ताने एका नव्या शैक्षणिक अध्यायाला पुण्यातून प्रारंभ होणार आहे, असे दिसते. दोन्ही महाविद्यालये गुणवत्तेच्या बाबतीत अतिशय सरस अशीच आहेत. त्यामुळे मराठीतून अभियांत्रिकी शिक्षण देताना ते सर्वोत्तमच असेल, अशी खात्री बाळगता येऊ शकते.
युरोप तसेच पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये तंत्रशिक्षण मातृभाषेतूनच दिले जाते. त्यामुळे देशांतर्गत प्रगतीला वेगाने चालना मिळत आहे. भारतामध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. आपल्याला युरोपीय व अमेरिकन देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळेच इंग्रजीतून अभियांत्रिकी शिक्षणाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. अनेकांचे असेही म्हणणे असते की, इंग्रजीतून शिकलं की फाडफाड बोलता येतं! परंतु हा भ्रम आहे. आजही इंग्रजीतून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या बहुतांश, किंबहूना तीन चतुर्थांश मुलांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नाही. शिवाय अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये असल्यामुळे बहुदा तो समजतही नाही. याच कारणास्तव ज्ञानाधारित पिढ्या आपल्या देशात तयार होताना दिसत नाहीत. बहुतांश मुले केवळ घोकंपट्टी करून अभियांत्रिकीच्या परीक्षा पास होत असतात. मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण मिळाल्याने किमान त्यांना संकल्पना समजण्यास तरी निश्चितच मदत होईल. बाकी फाडफाड इंग्रजी बोलणे, हे ज्याचे त्याच्या हातात आहे. अनेकांना असेही वाटते की, इंग्रजीतल्या अभियांत्रिकी संकल्पनांना मराठीमध्ये भाषांतरित कराव्या लागतील. परंतु तसे करण्याची आवश्यकता वाटत नाही. युरोपातील स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज भाषांमध्ये अभियांत्रिकीच्या संकल्पना जशाच्या तशा मांडलेल्या आहेत. भारतीय भाषांमध्येही हाच प्रयोग चालू ठेवावा लागेल. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित समजू शकतील. 

 
 
इंग्रजी ही जगाची भाषा आहे, असे सांगून केवळ त्याच भाषेतून शिक्षण घेणे गरजेचे आहे ही समजूत लवकरच बाद होईल, असे दिसते. शेवटी काय प्रगती करण्यासाठी भाषा जरी महत्त्वाची असली तरी त्याहीपेक्षा ज्ञान महत्त्वाचे आहे. मागील काही वर्षांपासून अनेक तंत्रज्ञानावर मी मराठीमध्ये लेख पुस्तके लिहिली तसेच व्हिडिओ देखील तयार केलेले आहेत. अन्य इंग्रजी भाषेतील साधनांपेक्षा मराठी भाषेतील साधनांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. शिवाय सर्वांनाच या संकल्पना व्यवस्थित समजत आहेत. आपल्या मातृभाषेतूनच प्रत्येकाला ज्ञान सहज मिळू शकते. त्यामुळे तंत्रशिक्षण परिषदेच्या या नव्या निर्णयाचे सहर्ष स्वागत करायला हवे.

Ref. Times of India, 6th June 2021.

Sunday, June 6, 2021

पडद्यावरील शिवराज्याभिषेक

६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिवस. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस होता. याच दिवशी मराठा राजा छत्रपती झाला! स्वराज्य आणि रयतेचे राज्य शिवछत्रपतींनी स्थापन केले.
कृष्णधवल चित्रपटांच्या काळातील भालजी पेंढारकरांपासून तर आजच्या हिरकणी चित्रपटापर्यत अनेकांनी पडद्यावर शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला. या सर्वांचे सादरीकरण निश्चितच उत्तम दर्जाचे होते. सर्वच गाणी सातत्याने पहावी आणि ऐकावीशी वाटतात. प्रत्येक मराठी माणसाला ती प्रेरणा देणारीच आहेत. स्टार प्रवाह वाहिनी चालू झाली त्यावेळेस त्यांनी शिवरायांवर "राजा शिवछत्रपती" हि मालिका त्यांच्या वाहिनीवरून प्रदर्शित केली होती. या मालिकेची सुरुवातच शिवराज्याभिषेकाने दाखविण्यात आली होती. अन्य चित्रपट व मालिकांमध्ये दाखविण्यात आलेल्या शिवराज्याभिषेकापेक्षा या मालिकेतील हा सोहळा काहीसा वेगळा व शिवाजी महाराजांचे भाव खऱ्या अर्थाने प्रदर्शित करणारा होता. राज्याभिषेक सोहळा हा राजासाठी व तेथील प्रजेसाठी निश्चितच आनंदाचा एक सर्वोच्च सोहळा असतो. परंतु, या मालिकेत दाखविलेल्या या सोहळ्यामध्ये सिंहासनाकडे चालत जाताना शिवाजी महाराजांच्या मनातील भावना अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आल्या होत्या. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून राज्याभिषेकापर्यंत स्वराज्यासाठी अनेक मराठा सरदारांनी प्राणांचे बलिदान दिले होते. त्यांची आठवण शिवाजीमहाराजांना येते. बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी काकडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर यांचे बलिदान शिवरायांना आठवते. त्यांच्या मनात हाही प्रश्न निर्माण होतो की, 'माझ्या भावांनो... तुमच्या पायऱ्या करून मी सिंहासनाधीश्वर व्हायचं?' त्यांचा कंठ दाटून येतो. त्यावर ते पुढे विचार करतात,
मज दिली आयोध्या
तुम्हा लाभले वैकुंठीचे नाव,
तुम्ही लपला कोठे
मला घालुनी देवपणाचे घाव...
अतिशय भावपूर्ण असा हा प्रसंग चित्रित करण्यात आलेला आहे. तो पाहताना कोणत्याही मराठी माणसाचा कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही. एकदा तरी हा व्हिडीओ नक्की पहा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!!

व्हिडिओची हॉटस्टार लिंक: https://www.hotstar.com/in/tv/raja-shivchhatrapati/13021/shivaji-takes-an-oath/1000166210

मूळ गाणे:

जय राजा शिवछत्रपतींचा,
जय मंगलमय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...

स्वराज्य सुखकर मुक्त धरेवर,
सुराज्य करिती शिवराजेश्वर
प्रतिरोधाचा लय हो,
सत्वर जन भाग्योदय हो
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...

औक्षमान भव, दिगंत वैभव,
रामकीर्ति भव, कृष्णनीती भव
पुण्यप्रतापी सुखकर्ता शिव,
सुखमय संजय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...

बंधनात लाभे सिंहासन,
शककर्त्याचे लोक प्रशासन
बंधनात लाभे सिंहासन,
शककर्त्याचे लोक प्रशासन
रामच राजन, राम प्रजाजन
शासन सविनय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...