Monday, July 31, 2023

फोटो प्रेम

मागील शतकामध्ये भारतात जेव्हा नुकतेच कॅमेऱ्याचे आगमन झाले होते त्यावेळेस अनेकांना स्वतःचा फोटो काढून घेण्याची उत्सुकता होती. तशीच कॅमेऱ्यात फोटो काढण्यासाठी घाबरणारे देखील होते. अशाच एका आजीची गोष्ट आहे, 'फोटो प्रेम'.
आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या वयोवृद्ध माणसांचा मृत्यू होतो. आणि वृत्तपत्रामध्ये श्रद्धांजली देण्यासाठी देखील नातेवाईकांकडे त्यांचा फोटो नसतो. हे पाहून चित्रपटाची नायिका अस्वस्थ होते. माणूस निघून गेल्यानंतर तो सर्वांच्या हृदयामध्ये केवळ त्याच्या शेवटच्या फोटोमध्येच राहत असतो. त्या फोटोमध्येच सर्वजण दिवंगत व्यक्तीला पाहत असतात. परंतु चित्रपटाची नायिका जी एक आजी आहे, तिचा स्वतःचा असा एकही फोटो नसतो. किंबहुना ती फोटो काढून घ्यायलाच घाबरत असते. जे काही फोटो असतात ते वेगवेगळ्या कोनातून आणि कुठेही फ्रेम न करता लावण्याजोगे असतात. समोर कॅमेरा दिसला की ती अस्वस्थ होत असते. फोटोविषयी तिच्या मनात एक वेगळीच भीती बसलेली असते. परंतु फोटो तर असायलाच हवा. कारण सर्वांच्या मनामध्ये तोच चेहरा अखेरपर्यंत राहतो असं तिला वाटतं. तर हा फोटो काढण्यासाठी ती कोण कोणते उपद्व्याप करते याची गोष्ट आहे, 'फोटो प्रेम'.
नीना कुलकर्णी सारख्या कसलेल्या अभिनेत्रीने या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारलेली आहे. फोटोच्या प्रेमाची ही आगळीवेगळी कहाणी चलचित्र रूपात आपल्याला पाहायला मिळते.


 

Tuesday, July 25, 2023

ह्यूमन काइंड: मानवजातीचा आशावादी इतिहास

मानव आणि मानवता यावर भाष्य करणारे अनेक विचारवंत होऊन गेले. शिवाय या विषयावर आजवर अनेक पुस्तके देखील लिहिली गेली होती. जसजसा मानव प्रगत होत गेला तस तशी मानवता लयास गेली, असा इतिहास सांगतो. मानवी इतिहास हा युद्धांचा, लढायांचा, कत्तलिंचा आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक गोष्टींचा आहे.
आपण इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक गोष्टीच अधिक प्रमाणात दिसून येतात. मानवता या शब्दाची व्याख्या अजूनही कोणीही परिपूर्ण केलेले नाही. पण मानवाकडे उपजत बुद्धी असल्यामुळे त्याने सर्वांशी प्रेमाने दयाळू भावाने आणि सहकार्याने वागायला हवे, याची शिकवण मानवता देते. हा सर्वसामान्य सिद्धांत आहे. परंतु या सिद्धांताला मानवानेच अनेकदा पायदळी तुडवले. म्हणूनच आजच्या काळामध्ये मानवता हा मानवाचा सर्वोत्तम गुणधर्म आहे, असे म्हणता येते.
नकारात्मक इतिहासाला बाजूला सारून 'ह्युमनकाईंड' या पुस्तकातून लेखकाने आशावादी इतिहास आपल्यासमोर ठेवल्याचे दिसते. इतिहासामध्ये अनेक अशा घटना घडून गेल्या होत्या जिथे मानवतेला काळीमा फासला गेला. पण तरीदेखील मानवता अजूनही जागृत आहे, असं दाखवणारा आशेचा किरण देखील त्या घटनांमध्ये दिसला होता. अनेक मानसशास्त्रज्ञांनी यापूर्वी बरेच प्रयोग केले, ज्यातून मनुष्य  कशाप्रकारे वागतो याचा अभ्यास केला गेला. अनेकदा त्यातून आलेले निष्कर्ष हे मानवतेला धरून होते म्हणजेच सकारात्मकता दर्शवणारे होते. आपल्याला देखील काही घटनांमधून आश्चर्य वाटून जाते. अजूनही मानवता टिकू शकते आणि आजचा मानव त्या टिकवू शकतो असा आशावादी दृष्टिकोन यातून आपल्याला मिळतो. इतिहासातील नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणारा हा प्रवास या पुस्तकामुळे आपल्याला अनुभवायला मिळतो. अनेकदा मनुष्य वरवर जरी दाखवत असला तरीही त्याचा मूळ मानवतावादी स्वभाव बदलत नाही, ही शिकवण देखील या पुस्तकातून मिळते.
खरं सांगायचं तर मानवतेकडे आशावादीदृष्ट्या बघायला हवं. ती जागृत ठेवायला हवी. मनुष्य या सृष्टीचा सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून पालनकर्ता आहे. त्यानेच मानवतावाद तयार केला आणि इथून पुढे देखील तो टिकवण्याची जबाबदारी देखील त्याची आहे, हे मात्र या पुस्तकातून शिकायला मिळतं.

- तुषार भ. कुटे


 

Sunday, July 23, 2023

रझाकार

रझाकार हा शब्द शालेय जीवनामध्ये इतिहास शिकत असताना ऐकला होता. तो केवळ अभ्यासा पुरताच. परंतु रझाकार या मराठी चित्रपटाने या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने पहिल्यांदा उलगडून सांगितला.
चित्रपटाचे कथानक मराठवाड्यातील एका गावामध्ये घडते. हे गाव अतिशय मागासलेले आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? याची देखील त्यांना जाणीव नाही. सध्या ते हैदराबादच्या निजामाच्या राजवटीखाली आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील हैदराबादच्या निजामाने भारतामध्ये समाविष्ट होण्यास नकार दिला होता. याउलट त्याने रझाकारांची फौज तयार करून भारत सरकार विरुद्ध अप्रत्यक्ष युद्धच पुकारले होते. असेच काही रझाकार मराठवाड्यातल्या या छोट्याशा गावात येतात. त्यांच्या अन्यायाची मालिका सुरू होते. गांधीवादी विचारांचे एक सदपुरुष स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा तसेच सत्य आणि अहिंसेचा प्रचार करण्यासाठी या गावामध्ये येतात. यातून नवीन संघर्ष तयार होतो. गावातीलच एक उनाडक्या करत फिरणाऱ्या मुलाची भूमिका सिद्धार्थ जाधव याने साकारली आहे. तो नेहमीप्रमाणे आपल्या भूमिकेमध्ये चपखल बसतो. चित्रपटाचे कथानक सुमारे ७५ वर्षांपूर्वीचे दाखविण्यास दिग्दर्शक यशस्वी झाल्याचा दिसतो. काही ठिकाणी कथा थोडीशी भरकटते, पण ते ध्यानात येत नाही. एकंदरीत अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची आणि एका वेगळ्या स्वातंत्र्यलढ्याची गोष्ट हा चित्रपट दाखवून जातो.


 

Wednesday, July 19, 2023

मुक्काम पोस्ट धानोरी

पुरातत्वशास्त्राची विद्यार्थीनी असणारी एक तरुणी जुन्या मंदिरांवर संशोधन करत आहे. धानोरी नावाच्या गावात असेच एक प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिर परिसरात ब्रिटिश काळातील खजिना दडलेला आहे, याची माहिती तिला मिळते. तो शोधण्यासाठी ती आपल्या मित्राला घेऊन थेट या गावात दाखल होते. तिच्यासोबत तिचा मित्र आणि रस्त्यामध्ये भेटलेले अन्य दोघेजण असतात. गावात आल्यावर प्रत्यक्ष खजिना शोधायला सुरुवात केल्यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीची तिची गाठ पडते. तिचा मनसुबा त्यांना देखील समजतो आणि यातूनच नवी स्पर्धा तयार होते. यामध्ये कोण जिंकतं आणि कुणाला खजिना प्राप्त होतो, याची कहाणी "मुक्काम पोस्ट धानोरी" या चित्रपटांमध्ये रंगवलेली आहे.
मराठी चित्रपटांमध्ये रहस्य कथेचा किंबहुना थरारकथेचा देखील अनेक वर्षांपासून दुष्काळच पडलेला आहे. त्यातीलच हाही एक चित्रपट. रहस्यपट पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी तो एक सर्वसामान्य चित्रपट वाटतो. अनेकदा कथेची मांडणी पूर्णपणे चुकल्याचे समजते. याशिवाय बहुतांश वेळी लेखकाचे तर्कशास्त्र ध्यानात येत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला एक प्रसंग दाखवलेला आहे, त्याचा संदर्भ शेवटपर्यंत लागत नाही. केवळ अंधार आणि अंधारातून घडलेल्या घटना दाखवल्या म्हणजे चित्रपट ठराविक होत नाही, हे दिग्दर्शकांनी देखील लक्षात घ्यावे असे आहे.


Monday, July 17, 2023

होमो डेअस: मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध

होमो सेपियन्स अर्थात आपण अर्थात आजचा सर्वात प्रगत मानव. होमो सेपियन्सने मागच्या लाखो वर्षांपासून या जगावर राज्य केलं. परंतु त्याची आजवरची प्रगती पाहता यापुढे होमो सेपिअन्स कशा पद्धतीने वागतील? याचा नेम नाही. होमो सेपियन्स ज्या वेगाने प्रगती करत आहेत तो वेग कदाचित अन्य कोणत्याही  प्राण्याला आजवर गाठता आलेला नाही. यासाठी त्याने विकसित केलेले तंत्रज्ञान कारणीभूत आहे. आजवरची प्रगती पाहता भविष्यात होमो सेपियन्स हे होमो डेअस अर्थात भविष्यातील मानवाकडे कशा पद्धतीने प्रवास करतील, याची माहिती सांगणारे पुस्तक म्हणजे युवाल नोवा हरारी लिखित "होमो डेअस" होय.
हरारी यांचे सेपियन्स हे पुस्तक वाचल्यानंतरच मी त्यांचा मोठा चाहता झालो होतो. भूतकाळामध्ये इतिहासात होऊन गेलेल्या अनेक विचारवंतांबद्दल ऐकलं होतं. त्यांची पुस्तके देखील वाचली. पण आजच्या काळातील खराखुरा विचारवंत कसा असतो, याची माहिती किंबहुना प्रचिती सेपियन्स वाचल्यानंतर आली. सेपियन्स हे मानव जातीच्या इतिहासाचे पुस्तक होते. त्याचाच पुढचा खंड हरारी यांनी होमो डेअस या पुस्तकाद्वारे आणला आहे. हे पुस्तक म्हणजे आधुनिक विश्वाची सांगड घालणारं एक तत्त्वज्ञानाचे पुस्तक आहे. मला तर यातील वाक्यनवाक्य हे आधुनिक सुविचारांशी मिळतं जुळतं आहे, असं वाटलं. बरीच वाक्ये मी अजूनही बाजूला काढून ठेवलेली आहेत. त्यांचे विचार पटतात किंबहुना जुळतात म्हणून हे पुस्तक अधिक भावलं.
मानवी प्रगतीचा वेग पाहता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जेनेटिक इंजीनियरिंग या तंत्रज्ञानाद्वारे मानवाची भविष्यातील वाटचाल चालू राहणार आहे, असं हरारी म्हणतात. या तंत्रज्ञानाद्वारे कदाचित प्रत्यक्ष अस्तित्वात नसणारा देवही घडविण्याची ताकत मानवात आहे. सेपियन्समध्ये त्यांनी मानवानं देव, पैसा, समानता आणि स्वातंत्र्य यासारख्या काल्पनिक पण सर्वमान्य संकल्पनांवर विश्वास ठेवून सारं जग काबीज केलेले आहे, असं म्हटलं होतं. आणि या पुस्तकामध्ये इथून पुढचे जग मनुष्य कशा पद्धतीने काबीज करेल, याची माहिती दिलेली आहे. भूतकाळाची भविष्याशी घातलेली सांगड हा या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आज आपण तंत्रज्ञानाने घेरलेले आहोत. हे तंत्रज्ञान आपल्याला कुठवर येईल याची निश्चित माहिती सांगता येणार नाही. पण सद्य परिस्थिती पाहता इथून पुढे तंत्रज्ञानच मानवी आयुष्यावर नियंत्रण करू शकेल, हे मात्र निश्चित.
आज आपण स्वतःला पृथ्वीवरच्या देवांच्या रूपात घडवत असलो तर नेमके कोणते कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत? हे हरारी सांगतात. आपला ग्रह आजच्या मानवी करामती पाहता लवकरच मरणाच्या दिशेने प्रवास करताना दिसतो. आपणच आपल्या कबरी नकळतपणे खोदत चाललो आहोत. एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे असलं तरी त्यातील विनाशकारी तोटे आपल्यावर वर्चस्व गाजवू शकतात. मग यातून बाहेर कसं  पडायचं? या मायाजालातून बाहेर पडणं खरोखर सोपं आहे का? याकरता कोणत्या विचारधारेची किंवा नवसंकल्पनेची आवश्यकता आहे? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून हरारी आपल्याला देतात. कादंबरी किंवा कथा नसली तरी वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकत लेखकाच्या लेखणीमध्ये आहे.
एकविसाव्या शतकाला आकार देत असताना होऊ शकणारा मानवी प्रवास हा अंधारमय आणि प्रकाशमय अशा दोन्ही वाटा दाखवतो. त्यातली कोणती वाट निवडायची हे मानवानेच ठरवायचे आहे. पुढचं शतक पाहताना मानवी प्रगती कुठपर्यंत वाटचाल करेल? याचा अंदाज हरारी यांना आलेलाच आहे. कदाचित त्यांनी आपल्याला सावध करण्यासाठी या पुस्तकाचा मार्ग अवलंबला असावा.

- तुषार भ. कुटे




Saturday, July 15, 2023

लंगर

चित्रपटाची सुरुवात होते ती ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट यांच्या भाषणाने. खंडोबाच्या मुरळीच्या समस्येवर ते त्यांचे विचार मांडत असतात. यातीलच एक मुरळी अर्थात मालन होय. तिला इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जाते आणि चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जातो.
आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुरळीची प्रथा दिसून येते. अशाच एका कुटुंबातील मालन देखील याच प्रथेला बळी पडलेली आहे. खंडोबाच्या सेवेसाठी लहानपणीच तिला वाघ्या असणाऱ्या तिच्या मामाकडे पाठवले जाते.  इथूनच तिचा खडतर प्रवास सुरू होतो. खंडोबा सोडून इतर कुणा पुरुषाचा विचार करणे देखील त्यांना पाप असते. परंतु एक दिवस तिच्या जीवनामध्ये ‘त्याचा’ प्रवेश होतो. आयुष्य बदलू लागलं असतं. पण ते पुन्हा एकदा अनपेक्षित वळणावर जातं. आणि सुरू होते तिची फरपट. यातून ती आपल्या प्रियकराला आणि मामाला देखील गमावते. कधीतरी घरी येते तेव्हा वडील आणि भाऊ ओळख देखील दाखवत नाहीत. आईची मात्र जीवापाड माया असते. आयुष्याची ही फरपट सांगत असताना होणाऱ्या वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतात.
महाराष्ट्रातील अनेक सामाजिक समस्यांपैकी एक असणाऱ्या या मुरळीच्या कथेवर आधारित असणारा कदाचित हा एकमेव चित्रपट असावा.



Tuesday, July 11, 2023

बाबू बँड बाजा

संघर्ष हा मानवी जीवनाचा पाया आहे. याच संघर्षातून मनुष्य घडत असतो. वाईट परिस्थिती मनुष्याच्या जीवनाला योग्य दिशा देत असते. जे लोक इतिहासामध्ये घडले त्यांनी बऱ्याचदा अशाच वाईट परिस्थितींचा सामना केलेला असतो. याच प्रकारचे चित्रण दाखविणारा चित्रपट म्हणजे "बाबू बँड बाजा" होय.
गावाकडील लग्नामध्ये अंत्यविधीमध्ये तसेच विविध मंगल प्रसंगी बँड बाजा वाजविणारा जग्गू हा अतिशय हालाकीत जीवन जगत आहे. त्याची पत्नी देखील पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे करते. त्यांचा मुलगा बाबू हा मात्र दररोज शाळेमध्ये जातो. परंतु त्याच्या शालेय जीवनाला देखील संघर्षाची पार्श्वभूमी आहे. त्याच्याकडे गणवेश नाही. वह्या आणि पुस्तके देखील नाहीत. म्हणूनच गुरुजी त्याला सातत्याने टोचून बोलत असतात. यातून देखील तो आपल्या उपजत बुद्धिमत्तेमुळे शिकत असतो. एके दिवशी चुकून त्याचे दप्तर हरवले जाते आणि पुन्हा नव्या संघर्षाला सुरुवात होते. त्याच्या आईला अतिशय मनापासून वाटत असते की आपल्या मुलाने शिकावे आणि मोठे व्हावे. जे आपल्याला करता आले नाही ते त्याने करून दाखवावे. म्हणूनच ती जिद्दीने काम करत असते आणि आपल्या मुलाला शाळेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन देत असते. त्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून पोट तिडकीने प्रयत्न करत असते. तिची तळमळ विविध प्रसंगातून आपल्याला दिसून येते. वडिलांना मात्र आपल्या कुटुंबाला जगवायचे असते. पण त्यांचा संघर्ष देखील वेगळ्या प्रकारचा आहे. गावात १०० लग्न एकाच वेळी होणार म्हटल्यावर त्यांचा व्यवसाय देखील बुडतो. कामे हातची जायला लागतात. अशा प्रसंगी एक निराळाच माणूस त्यांना मदत करतो. एकंदरीत हळूहळू सर्वकाही सुरळीत व्हायला सुरुवात झालेली असते. पण अचानक एक अनपेक्षित प्रसंग घडतो ज्याने बाबूच्या आयुष्याची दिशाच बदलून जाते आणि चित्रपट संपतो.
कोणालाही आवडेल अशी ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. भारतातल्या अनेक कुटुंबांच्या दैनंदिन जीवनातील संघर्षाची गोष्ट आहे. जी आपल्याला अनेक धडे शिकून जाते!