Friday, April 30, 2021

सकारात्मकतेकडे

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शेजारच्या बिल्डिंगमध्ये समांतर मजल्यावरील एका गॅलरीमध्ये रोज सकाळी दहा वाजल्यापासून भिंतीवर हातोडे मारल्याचे आवाज येत होते. फ्लॅटचा कठडा तोडून तिथे काहीतरी वेगळं करत असावेत, असं दिसत होतं. दोन कामगार रोज नित्यनेमाने ते काम सकाळी काही काळ करत बसायचे. सकाळी त्यांचं हातोडा मारण्याचं काम चालू झालं की, आमच्या ज्ञानेश्वरीचं लक्ष त्यांच्याकडे जात होतं. घराच्या खिडकीमध्ये उभी राहून ती थोडावेळ त्यांचं निरीक्षण करत बसत असे. आणि मग नंतर आपल्या खेळण्याची सुरुवात करत असे.
एक दिवस न राहवून तिने मला विचारले,
"बाबा, हे लोक काय करतायेत?"
मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो,
"काहीतरी तोडफोड चालली आहे त्यांची, तू नको लक्ष देऊ तिकडे."
माझ्या या बोलण्यावर तिने तात्काळ उत्तर दिले,
"नाही बाबा... ते काहीतरी बनवतायेत!"
तिच्या या उत्तराने मी काहीसा आश्चर्यचकित झालो आणि पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला की रिकामा? या गोष्टीची आठवण झाली. त्या एका वाक्यातून तिचा दृष्टीकोण प्रतीत होत होता. मागच्या अनेक दिवसांपासून आजूबाजूला तयार झालेल्या नकारात्मक वातावरणामुळे की काय, आपलेही विचार नकारात्मकतेकडे झुकत आहेत असं वाटून गेलं. पण या सर्व नैराश्यपूर्ण वातावरणापासून जी पिढी अनभिज्ञ आहे ती अजूनही हा सकारात्मक दृष्टिकोन राखून आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली. हीच सकारात्मक ऊर्जा आजच्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला प्रेरित करत राहणार आहे, असं वाटतं. त्यामुळे ती निरंतरपणे आपल्या हृदयात जागृत ठेवण्याची खरोखर गरज आहे, इतकंच.

 


 

Thursday, April 29, 2021

मुसाफिर: अच्युत गोडबोले

साधारण तेरा-चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशिकच्या कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेने अच्युत गोडबोले यांचे परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये व्याख्यान आयोजित केले होते. तोपर्यंत मी अच्युत गोडबोले हे नाव केवळ ऐकून होतो. त्यांचं "ऑपरेटिंग सिस्टिम" हे पुस्तक आम्ही अभ्यासक्रमामध्ये 'रेफरन्स बुक' म्हणून वापरले होते. परंतु त्यापलीकडे अच्युत गोडबोले कोण आहेत, हे त्या दिवशी पहिल्यांदाच या व्याख्यानातून आम्हाला समजले. दोन तासात त्यांनी त्यांचा बराचसा जीवन प्रवास उलगडून सांगितला. त्याच वेळेस लक्षात आले की, हा माणूस कोणीतरी एक वेगळाच अवलिया आहे! आयआयटी सारख्या मोठ्या संस्थांमधून पास होणारे विद्यार्थी अशाच प्रकारे असतात, हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. खरतर तेव्हापासून मला अच्युत गोडबोले समजले. मग त्यांचे प्रकाशित होणारे प्रत्येक पुस्तके मी विकत घ्यायला लागलो. 'किमयागार' हे मी वाचलेलं त्यांचं पहिलं पुस्तक होतं. वैज्ञानिकांबद्दल असलेली जुजबी माहिती विस्तृतपणे या पुस्तकातून समजली. मग त्यांची सर्व पुस्तके वाचून काढली. ते जेव्हा-जेव्हा नाशिकला व्याख्यानासाठी यायचे, आमची तिथे हजेरी असायची. शिवाय नाशिकला महाविद्यालयामध्ये काम करत असताना देखील आम्ही त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. शिवाय माझ्या पहिल्या मराठी पुस्तकाला प्रस्तावना देण्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. इतके मोठे लेखक माझ्या सारख्या नवख्या लेखकाला प्रस्तावना देतील का? याची शाश्वती नव्हती. परंतु त्यांचा प्रतिसाद अनपेक्षितच होता. चांगली तीन पानांची प्रस्तावना त्यांनी माझ्या पुस्तकासाठी लिहून पाठवली. तसेच नाशिकला आल्यानंतर या पुस्तकाच्या पहिल्या प्रतिवर स्वाक्षरी देखील केली त्यांनी दिली होती. सन २०१२ मध्ये प्रकाशित झालेले ते पुस्तक आजही मी जपून ठेवले आहे. गोडबोले सरांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे, हे समजले तेव्हाच त्याची प्रकाशनपूर्व नोंदणी करून आपला अंक राखून ठेवला होता. परंतु निवांत वेळ मिळत नाही तोवर हे पुस्तक वाचायचे नाही, असे ठरवले होते. कारण इतक्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिणारा हा माणूस नक्की कसा घडला, हे मला व्यवस्थित जाणून घ्यायचे होते. शेवटी तो योग आलाच सोलापूर सारख्या एका छोट्या शहरात जन्मलेला व मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा इतक्या उच्च स्तरावर कशापद्धतीने पोहोचला, हा प्रवास निश्चितच प्रेरणा देणारा होता. आमच्या संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मी नेहमी त्यांचे उदाहरण देत असे. अच्युत गोडबोले केमिकल इंजिनिअर असूनही संगणकशास्त्रामध्ये त्यांचा किती हातखंडा आहे, ते जरा पहा. हे वाक्य अगदी सहज बोलून जात असलो तरी त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी गोडबोले सरांनी काय मेहनत घेतली होती, याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यानंतर आली. कधीकधी अनेक घटना माझ्या शैक्षणिक आयुष्याशीही जोडल्या जात असल्यासारख्या वाटत होत्या. स्वतःमध्ये बदल केल्याशिवाय अनुभव येत नाही आणि व्यक्तिमत्त्वही संपन्न होत नाही, हा धडा मात्र निश्चितच गोडबोले सरांच्या एकूण प्रवासातून मिळतो. तो अतिशय प्रेरणादायी आहे. विशेषत: अशा मुलांसाठी जे ग्रामीण भागातून येऊन शहरातल्या वातावरणाला घाबरतात. तसेच इथल्या फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या लोकांसमोर मान खाली घालून बसतात. ध्येय, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो, हे गोडबोले सरांच्या एकंदरीत प्रवासातून जाणवले. त्यांनी त्यांची आवड कधीच सोडली नाही. उलट तिला 'पॅशन' बनवून ते चालत राहिले. म्हणूनच आज देशातल्या यशस्वी लोकांमध्ये त्यांची गणना होते. ते संगणक तज्ञ आहेत, लेखक आहेत, मराठी भाषेचे जाणकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, संगीत विशारद आहेत, मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्याच मराठी मातीमध्ये जन्मले याचा निश्चितच अभिमान वाटतो. धडपडणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा देणारे व त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारे असे हे पुस्तक निश्चितच आहे. Sunday, April 25, 2021

पुरातन भाषांचा संगणकीय शोध

गेल्या हजारो वर्षांमध्ये बोलीभाषांमध्ये अनेक बदल झालेले आहेत. नव्या भाषा उदयास आल्या. त्याच प्रमाणे अनेक भाषांचा अस्तही झाला. आज उत्खननामध्ये तसेच विविध शोधांमध्ये अशा अनेक भाषा समोर आलेल्या आहेत की, ज्यांचा अर्थ आजच्या मानवाला माहित नाही. किंबहुना अनेक भाषातज्ञ व इतिहासतज्ञ यांनीदेखील या पुरातन भाषांचा व लिपींचा अभ्यास केला तरीही त्यांनाही वाचता व समजून घेता आलेली नाही. दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा अनेक भाषा विस्मरणात गेलेल्या आहेत. काही भाषांमधील काही शब्दांचा अर्थ लावता येतो परंतु पूर्ण भाषा अजूनही जाणून घेता आलेली नाही. भारतात देखील सिंधू संस्कृतीमध्ये वापरण्यात आलेली भाषा ही अतिशय किचकट व क्लिष्ट अशी आहे. अनेकांनी दावे केले होते की, ही भाषा आम्हाला वाचता येते. परंतु ही भाषा व लिपी आजवर कुणालाही वाचता आलेली नाही. अमेरिकेतील एमआयटीच्या कम्प्युटर सायन्स अँड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लॅबोरेटरीने अशा विस्मरणात गेलेल्या भाषांवर संशोधन सुरू केले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अर्थात संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे या भाषा पुनरुज्जीवित करण्याचे कार्य अमेरिकेतील शास्त्रज्ञ सध्या करत आहेत. मागील काही वर्षांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या क्षेत्रात मोठ्या वेगाने प्रगती होताना दिसत आहे. विज्ञानाची अनेक कोडी या तंत्रज्ञानाने सोडविण्याचे कार्य संगणकतज्ञ करत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे पुरातन भाषांचा अभ्यास व त्यांचा शास्त्रशुद्ध शोध घेणे होय. यावर आधारित अनेक संगणकीय अल्गोरिदम सध्या संगणकतज्ञ तयार करत आहेत. जुन्या भाषांतील शब्द आजच्या भाषेतील कोणत्या शब्दाशी मिळते जुळते आहेत व त्यांचा संबंध कशाप्रकारे आहे? याचाही शोध घेणे सुरू आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संगणकतज्ञांनी भाषाशास्त्राचा देखील सखोल अभ्यास केला आहे. पुरातन काळातील संस्कृती, विचारधारा, परिस्थिती, वातावरण यांचाही अभ्यास या भाषांचा उलगडा करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच हा शोध घेण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचा उपयोग या प्रकल्पामध्ये एमआयटीद्वारे केला गेला जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर आपण पुढील काही वर्षांमध्ये विस्मरणात गेलेल्या अनेक भाषा पुन्हा वाचू शकू व तत्कालीन इतिहासाचा देखील अभ्यास करू शकू.
 

 

Thursday, April 22, 2021

दोन जगप्रसिद्ध साहसकथा: रॉबिन हूड आणि रॉबिन्सन क्रुसो

रॉबिन हूड हे नाव तसं लहानपणी मी पहिल्यांदा ऐकलं होतं. दूरदर्शनवर रॉबिन हूड चे कार्टून दाखवले जायचे त्यावेळेस त्याची कथा फारशी कळली नव्हती. मधल्या काळात हे नाव विस्मरणात गेले. परंतु या पुस्तकाने रॉबिन हूडची नव्याने पूर्ण ओळख करून दिली, असेच म्हणता येईल. जंगलात राहणारा हा एक वनवासी आहे. तो बंडखोर आहे. त्याच्याकडे बंडखोरांची भली मोठी फौज आहे. अन्याय करणाऱ्यांविरुद्ध तो थेट युद्ध पुकारतो आणि सामान्य माणसाला मात्र काहीच त्रास देत नाही. कदाचित याचमुळे अशा वृत्तीच्या लोकांना आजच्या काळातील रॉबिन हूड म्हटले जात असावे! या पुस्तकाचा अर्धा भाग रॉबिन हूडच्या कथांवर आधारित आहे; तर उरलेला रॉबिन्सन क्रुसो याच्या कथांवर. डॅनियल डफो यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद भा. म. गोरे यांनी केलेला आहे. रॉबिन्सन क्रुसो म्हणजे निर्जन बेटाचा राजा होय. साहसी सागरी प्रवासाची आवड असलेला हा एक युवक होता. पहिल्याच सागरी प्रवासात त्याची हौस फिटली होती. परंतु त्यातून तो बाहेर पडू शकला नाही. एका सागरी वादळामध्ये त्याचे जहाज निर्जन बेटावर अडकले. शिवाय पूर्ण जहाजातील वाचलेला तो एकमेव व्यक्ती होता! त्याच्या नशिबाने जहाजावरील बरीच साधनसामग्री त्याला वापरायला मिळाली. ज्या बेटावर तो आला होता, तिथे काहीच मानववस्ती नव्हती. अशा ठिकाणी तो कित्येक वर्षे एकटाच राहिला. अठरा वर्षानंतर त्याला नशिबाने एक मनुष्य सोबतीला मिळाला. त्याचा हा पूर्ण जीवनप्रवास या पुस्तकामध्ये कथारूपाने दिलेला आहे. एखाद्या निर्जन ठिकाणी मनुष्य कशा प्रकारे जीवन व्यतीत करू शकतो? त्याची ही मूर्तिमंत कहाणी होय. तब्बल २७ वर्षे रॉबिन्सन क्रुसो त्या निर्जन बेटावर राहिला. त्याचे अनेक अनुभव या पुस्तकात चितारलेले आहेत. लेखकाची शैली पाहता आपण क्रुसोच्या भूमिकेत त्या निर्जन बेटांवर वावरत राहतो. शालेय विद्यार्थ्यांना वाचण्याजोगे व भेट देण्याजोगे ही हे पुस्तक निश्चित आहे. Wednesday, April 21, 2021

चंद्राची सावली

नारायण धारपांनी त्यांच्या भय कादंबऱ्यांमधून भुताचा प्रत्येक प्रकार हाताळलेला आहे! "चंद्राची सावली" या कादंबरी मधून 'हाकामारी'ला मध्यवर्ती भूमिका दिलेली दिसते! दोन एकटे आणि अविवाहित पुरुष या कथेचे नायक आहेत. चंद्रा नावाच्या एका इस्टेट एजंटद्वारा त्यांना उत्तर भारतातल्या एका इस्टेटीच्या सांभाळण्याची जबाबदारी मिळते. त्यांना आपला केअरटेकर हा अविवाहित व कुटुंब नसणाराच हवा असतो. त्यामागे कारणही तसेच असते. यापूर्वीच्या अनेक केअरटेकरांचा अनुभव हा भयानक आलेला असतो. जेव्हा हे दोघेजण प्रत्यक्ष बंगल्यावर जातात तेव्हा त्यांना तिथला रात्रीस खेळ काय चालतो? याचा अनुभव येतो. तिथे रात्रीच्या वेळेस एक हाकामारी येत असते. तिला कसं हाताळायचं याचं कसब त्यांच्याकडे नसतं. परंतु आपल्या बुद्धीचा वापर करून ते तिला बंदिस्त करतात आणि पळवून लावतात, याची कथा आहे... "चंद्राची सावली"! धारपांच्या नेहमीच्या शैलीत लिहिलेला हा आगळावेगळा थरार होय. Friday, April 16, 2021

अचाट, अफाट, अकल्पनीय आणि अलौकिक : चार्ली चॅप्लिन

चार्ली चॅप्लिन म्हणजे एकेकाळचा हॉलीवूडचा अनभिषिक्त बादशहा होय! शंभर वर्षांपूर्वी त्याने अमेरिकेतल्या मूकपटांवर राज्य केलं. त्याच्याच काळात चित्रपटांचा प्रवास मूकपटाकडून बोलपटांकडे झाला. अचाट, अफाट, अकल्पनीय आणि अलौकिक अशी अनेक विशेषणे चार्ली चॅप्लिनच्या या एकंदरीत जीवन प्रवासाला लावता येतात. त्याची कथा म्हणजे एका अतिसामान्य व अठरा विश्वे दारिद्र्य भोगणार्‍या, टक्केटोणपे खाल्लेल्या परंतु नैसर्गिक कलागुणांच्या, बुद्धिमत्तेच्या व निरीक्षणशक्तीच्या जोरावर चित्रपटसृष्टीचा बादशहा होण्याची कथा होय.
चार्ली चॅप्लिन हे नाव माहीत नसणारा व्यक्ती म्हणजे विरळाच. आज शंभर वर्षांनी देखील कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे चार्लीवर अतोनात प्रेम आहे. त्याच्या काळात हॉलिवूड सृष्टी बहरली. चित्रपटांकडे लोक आकर्षिले गेले. चित्रपटांचे मायाजाल तयार झाले, हेही त्याच्याच कारकिर्दीतच. लहानपणी दारिद्र्याचे चटके खाणारा हा अवलिया सर्वोत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शक होतो, ही कथाच अकल्पनीय आहे. शिवाय सर्व अर्थाने ती सामान्य माणसासाठी प्रेरणादायी देखील आहे. लोकांचे मनोरंजन करणे, हे सोपे काम निश्चितच नाही. ज्या काळात नाटकांचा जमाना होता, त्याने लोकांना चित्रपटाकडे वळवले. शिवाय एका परक्या देशामध्ये अमाप प्रसिद्धी त्याला मिळाली. जीवनात त्याने अनेक चढ-उतार बघितले. त्याच्या जीवनात अनेक स्त्रिया प्रवेशकर्त्या झाल्या. त्यातील काही त्याच्या जीवनसाथी देखील बनल्या होत्या. हॉलिवूडच्या आजच्या संस्कृतीची पाळेमुळे कदाचित त्याच काळात रोवली गेली होती, असे म्हणता येईल. चार्लीने मात्र या सर्व प्रवासात अनेक दशके चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्याने चित्रपटांमधील निरनिराळे प्रयोग करून प्रेक्षकांचे अफाट मनोरंजन केले. त्यामुळेच तो आज प्रत्येकाला माहित आहे. या क्षेत्रातला ध्रुवतारा म्हणून त्याची ओळख आहे. त्याला जेव्हा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी सर्व प्रेक्षकवृंदाने उभे राहून सलग बारा मिनिटे टाळ्या वाजवल्या होत्या! हेच त्याच्या कारकिर्दीतले सर्वात मोठे यश होय. अशी मानवंदना अन्य कोणत्याही कलाकाराला आजवर मिळालेली नाही. अमेरिकेतल्या त्याच्या अखेरच्या कालखंडामध्ये कम्युनिस्ट म्हणून शिक्का बसल्याने त्याला मायदेशी परतावे लागले. परंतु त्याच्या कर्तृत्वाने आजही त्याची कर्मभूमी त्याची सातत्याने आठवण काढीत असते. असा अमाप यश मिळवणारा व अलौकिक कार्यसिद्धि साधणारा माणूस यापूर्वी कधी झाला, न पुन्हा होईल!
आज त्याच्या जयंतीनिमित्त या अवलियाला विनम्र अभिवादन!

Thursday, April 15, 2021

अवकाशातला मानवाचा तिसरा डोळा: हबल दुर्बीण

चारशे वर्षांपूर्वी गॅलिली गॅलिलिओ यांनी टेलिस्कोप अर्थात दुर्बिणीचा शोध लावला. या शोधामुळे अवकाशाकडे पाहण्याची माणसाची दृष्टीच बदलून गेली. खगोलशास्त्राच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा शोध होता. मागील चारशे वर्षांमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाद्वारे दुर्बिणी बनवल्या गेल्या. त्यामुळे अगणित अवकाशस्थ वस्तूंचा मोठ्या प्रमाणात शोध लागला. खगोल विज्ञानाची नवी कवाडे खुली झाली. आज मानवाचा अवकाशाकडे पाहण्याचा तिसरा डोळा म्हणून टेलिस्कोपला स्थान देता येईल.
आजवर पृथ्वीवर तयार झालेली सर्वोत्कृष्ट दुर्बिंण म्हणजे हबल टेलिस्कोप होय. अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने आजवरची सर्वोत्तम कामगिरी याच टेलिस्कोप मुळे पार पडलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या अवाढव्य दुर्बिणीचे कर्तृत्व आणि कहाणी. 


विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेमध्ये एखादी अवाढव्य दुर्बिण आकाशाकडे लक्ष देण्यासाठी बनवावी, असा विचार सुरू झाला होता. परंतु मधल्या काळातील अनेक स्थित्यंतरामुळे ती तयार होऊ शकली नाही. अखेरीस अमेरिकेची नासा आणि युरोपीय अंतराळ संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नाने ऑक्टोबर १९८६ मध्ये हबल टेलिस्कोप तयार करून अवकाशात सोडण्यात आला. परंतु टेलेस्कोप वाहून नेणारे चॅलेन्जर यान नादुरुस्त झाल्यामुळे या टेलिस्कोपला अवकाशात स्थिरावला आले नाही. १९९० मध्ये मात्र हबल टेलिस्कोपला अवकाशामध्ये जागा मिळाली. परंतु त्याचे कार्य काही व्यवस्थित होत नव्हते. या दुर्बिणीद्वारे येणारी छायाचित्रे धुसर व अंधुक येत होती. त्यामुळे डिसेंबर १९९३ मध्ये इंडीवर यानाद्वारे हबलची दुरुस्ती करण्यात आली व तिचे स्थान पृथ्वीपासून ५६९ किलोमीटर अंतरावर स्थिर करण्यात आले. तेव्हापासून अवकाशाकडे नजर ठेवून असणारा माणसाचा हा तिसरा डोळा वेगाने कार्य करू लागला. मागच्या तीस वर्षांच्या कालावधीत अंतराळ संशोधनातील अनेक टप्पे हबल दुर्बिणीने पार केले आहेत. विश्वाचे वय ठरवण्याचे काम हबल दुर्बिणीद्वारे झालेल्या संशोधनातून पूर्णत्वास गेले. विविध छायाचित्रांद्वारे विश्वाचे वय १३७ कोटी वर्ष निश्चित करण्यात आले आहे. हबल दुर्बिणीतून विश्वातील असंख्य आकाशगंगा व दीर्घिका यांचा सातत्याने वेध घेण्यात येतो. याद्वारे विश्वातील प्रत्येक घटकाची माहिती हबल दुर्बीण पृथ्वीला पुरवत असते. आकाशगंगा व दीर्घिकांची रचना कशी असते? नवे ग्रह कसे तयार होतात? डार्क एनर्जी म्हणजे काय? ब्लॅक होल अर्थात कृष्णविवर म्हणजे काय व ते कसे तयार होते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे हबल दुर्बिणीच्या छायाचित्रातूनच मानवाला मिळालेली आहेत. विश्व प्रसरण पावत आहे. हा महत्वाचा शोध या दुर्बिणीद्वारे पूर्णत्वास गेला. विशेष म्हणजे या प्रकल्पावर कार्य करणाऱ्या तीनही शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे! प्लूटो या ग्रहासह सुर्यमालेबाहेरील इरीस या ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास हबल दुर्बिणीने केलेला आहे. याशिवाय गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांच्या वातावरणाची माहिती व उपग्रहांची माहिती देखील याच दुर्बिणीद्वारे शास्त्रज्ञांना मिळाली. प्लूटोचा उपग्रह स्टिक्स हा हबल द्वारेच शोधला गेला होता. तसेच सन २०१५ मध्ये विश्वातल्या पहिल्या सुपरनोव्हाचाचे छायाचित्र याच दुर्बिणीद्वारे द्वारेच टिपण्यात आले होते. आकाशगंगेचे वस्तुमान व आकार निश्चित करण्याचे कार्य हबल दुर्बिणीद्वारे केले गेले आहे. या प्रकल्पात झालेल्या संशोधनानुसार आकाशगंगेचे वस्तुमान १.५ ट्रील्लियन सोलर युनिट इतके आहे तर त्याची त्रिज्या एक लाख २९ हजार प्रकाशवर्षे इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. सन १९९४ मध्ये गुरु ग्रहावर शूमाकर लेवी-९ हा धूमकेतू आदळला होता. त्याच्या प्रवासाची इत्यंभूत माहिती हबलनेच पृथ्वीवासीयांना दिली. हबल टेलिस्कोप मधून आलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी आजवर सुमारे १५ हजार शोधनिबंध लिहिलेले आहेत! या शिवाय दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दहा टक्के शोधनिबंधामध्ये हबल दुर्बिणीच्या शोधांचा आधार दिला जातो.
मागच्या तीस वर्षांमध्ये या दुर्बिणीची पाच वेळा सर्विसिंग करण्यात आली. अखेरची सर्विसिंग २००९ मध्ये झाली होती. तिचा कार्यकाल २०३० ते २०४० च्या मध्ये संपणार आहे. यानंतर अधिक क्षमतेची जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप नासाद्वारे अंतराळात पाठवण्यात येईल. परंतु यानंतरही हबल टेलिस्कोपची कामगिरी मात्र अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये कायमच स्मरणात राहील. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांच्या नावावरूनच या दुर्बिणीला हबल टेलिस्कोप असे म्हणण्यात येते.

© तुषार भ. कुटे

Monday, April 12, 2021

गुढी: गौतमीपुत्राच्या विजयाचे प्रतिक

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. या दिवसाचे स्वागत महाराष्ट्रामध्ये गुढ्या उभारुन केले जाते. याच दिवशी महाराष्ट्राचा सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा अर्थात क्षत्रप राजा नहपान याचे हनन केले होते. या महान घटनेच्या निमित्ताने चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. जागतिक कॅलेंडर अर्थात ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार १ जानेवारी रोजी नवे वर्ष सुरू होत असते. महाराष्ट्रीय कालगणनेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी नववर्ष सुरू होते. भारतातल्या सर्व भाषिक संस्कृतीमध्ये निरनिराळ्या दिवशी नववर्ष साजरे केले जाते. जसे गुजरात मध्ये दिवाळी पाडव्याला नववर्ष सुरू होते. तर पंजाब व बंगाल मध्ये ते बैसाखी म्हणून साजरे केले जाते. अनेक जण गुढीपाडव्याचा संबंध काही पौराणिक घटनांशी जोडतात. जर तसे असते तर गुढीपाडवा केवळ महाराष्ट्रातच साजरा केला गेला नसता.
सातवाहन हे नाव आपण इतिहासात अनेक वेळा ऐकतो. बऱ्याचदा त्याची त्रोटक माहिती दिलेली असते. हेच सातवाहन दोन हजार वर्षांपूर्वी राज्य करणारे महाराष्ट्राचे पहिले निर्माते होत. इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० अशी जवळपास साडेचारशे वर्षे सातवाहनांनी महाराष्ट्रावर सत्ता गाजवली व महाराष्ट्रीयांचा सांभाळ केला. महाराष्ट्रातील अनेक गिरिदुर्ग व लेण्या ही सातवाहनांची निर्मिती आहे. इसवीसन ७८ पासून शालिवाहन शक सुरु होतो. शालिवाहन हा मूळ शब्द "सालाहण" असा आहे. तसेच सातवाहन हेही मूळचे "छातवाहन" होय! याचा अर्थ पर्वत निवासी असा होतो. सिमुक सातवाहन हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. त्याच्यामुळेच या घराण्यातील राज्यकर्त्यांना सातवाहन म्हटले जाते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या कालखंडात महाराष्ट्र व बहुतांश भारतीय भूप्रदेशावर क्षत्रप या परकीय घराण्याची सत्ता होती. जुन्नर ही त्यांची राजधानी होती. तसेच पैठण, नाशिक सारखी व्यापारी केंद्रे बहुतांश महाराष्ट्र क्षत्रपांच्या अधिपत्याखाली होती. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन घराण्यातील विसावा राजा होय. क्षत्रप राजा शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या पूर्वज राज्यकर्त्यांवर वारंवार आक्रमणे करून सातवाहन सत्ता खिळखिळी करून टाकली होती. गौतमीपुत्राचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याच्याकडे केवळ साताऱ्याच्या आजूबाजूचा परिसर होता. कोकण, मराठवाडा, खानदेश परिसर नहपानाचा सत्तेखाली चालत असत. महाराष्ट्रीय प्रजा या राजवटीत गुलामीचे जीणे जगत होती. परंतु गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाविरुद्ध संघर्षाला सुरुवात केली. त्याने क्षत्रपांशी अनेक युद्धे केली. अखेर महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध सातवाहन व नहपानामध्ये नाशिकच्या गोवर्धन येथे इसवी सन ७८ मध्ये झाले. याच गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. नाशिकच्या पांडवलेणीतील एका शिलालेखात उल्लेख आहे, 'क्षहरात वंस निर्वंस करत' अर्थात गौतमीपुत्राची क्षत्रपांच्या निर्वंश करणारा राजा, अशी प्रशंसा केली आहे. गौतमीपुत्राने आपले साम्राज्य पूर्ण महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातही वाढवले व महाराष्ट्राची खरी भरभराट सुरू झाली. सह्याद्रीतील दुर्गम गिरिदुर्ग बांधले गेले. पूर्वीपासूनच ग्रीक व रोमन सत्तांशी व्यापार चालू झाला होता. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सातवाहनांनी अनेक घाट तयार केले. गौतमीपुत्राने सातवाहनांची खरी ख्याती वाढवली. त्यामुळेच सातवाहनांना तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत ते सातवाहन अर्थात त्रीसमुद्रतोयवाहन असे अभिमानाने म्हटले जाऊ लागले. गौतमीपुत्राच्या नावापुढे शकारी अशीही पदवी लावली जाते. यावरूनच शकांवरील विजयाचे महत्व प्रतीत होते. महाराष्ट्रीय जनता गेली १९४२ वर्षे गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाचा दिवस साजरा करीत आहे. हा दिवस मराठी संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो. गुढी उभारताना सकाळी गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण महाराष्ट्रीयांनी करायलाच हवी.


 

Sunday, April 11, 2021

शिकाऊ अनुज्ञप्ती पुराण

जवळपास दोन वर्षांपासून नियमितपणे फेरफटका मारण्याची आमचे सरकारी कार्यालय म्हणजे एमएच १४ चे परिवहन कार्यालय. त्यावेळी नुकतीच पिंपरीहुन मोशीच्या नव्या इमारतीत स्थलांतरित झाले होते. तेव्हापासून आम्ही त्याची 'प्रगती' अनुभवत आहोत! जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांची प्रगती ही समान संथगतीने होत असते. त्यात हेही सुटलेले नाही!
मागच्या काही महिन्यांपासून चारचाकीची शिकाऊ अनुज्ञप्ती अर्थात लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आम्ही सदर कार्यालयात अनेक फेऱ्या मारल्या. गेल्या काही वर्षांपासून परिवहन कार्यालयाने सदर पद्धती ऑनलाईन केल्याने आपले कार्य सुलभ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु नागरिकांना त्रास देण्यासाठी व पैसे लाटण्यासाठी ही सोय होती, हे आमच्यासारख्या पामरास खूप उशिरा समजले. आम्ही स्वतः संगणक अभियंता असल्याने आमची दृष्टी वेगळी आणि पैसे लाटणाऱ्याची दृष्टी वेगळी पडते, हे आमच्या फारच उशिरा ध्यानात आले. आमचे आधीचे लायसन्स हे एमएच १५ द्वारा वितरित करण्यात आले होते. त्यामुळे नवे लायसन्स एमएच १४ कडून मिळण्यात इतक्या अडचणी येतील, याची जराही कल्पना आमच्या मनात नव्हती. परंतु त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच भारतीय संघराज्यात किंवा भारताच्या एकाच राज्यात येतात का? हाही प्रश्न आमच्या मनात घर करून राहिला होता. त्याला आता दोन वर्षे उलटली आहेत. नव्या कार्यालयातले साहेबही बदलले आहेत. त्यामुळे आम्ही आता ताज्या दमाने नवा अर्ज करण्यासाठी सज्ज झालो होतो.

 

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शासनाने जी ई-पद्धतीची अर्ज प्रक्रिया चालू केली आहे, तिचा आम्ही पुरेपूर वापर केला. ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या, त्याच्या पावतीच्या, आमच्या ओळखपत्राच्या, जन्म पुराव्याच्या आम्ही "प्रिंट्स" काढल्या व पुनश्च त्या स्कॅन करून अपलोड करण्याच्या कामाला लागलो. कुठूनतरी ढापलेल्या वेब टेम्प्लेट वर बनवलेले संकेतस्थळ आम्ही शोधले! त्यावर अजूनही "साईट टायटल हियर" असं लिहिलेलं आहे! हे विशेष! अशा नावीन्यपूर्ण संकेतस्थळावर आपले सर्व दस्तावेज अपलोड करताना आमची ऑनलाइन दमछाक झाली. चार एमबीची फाईल 200 केबीमध्ये बसवताना ऑनलाईन दमछाक होते, हे लक्षात असू द्यात! त्यानंतरचा ऑनलाइन पेमेंट गेटवे हा तब्बल तीन वेळा कोसळला! तोही ऑनलाईनच! सुमारे एक-दीड तासानंतर आमचेही ऑनलाइन पुराण समाप्त झाले. आता लवकरच आपल्या लायसन्स (ऑनलाईन!) मिळणार याची स्वप्ने पडायला लागली.
शहरात सगळ्यात जास्त बेशिस्त पार्किंग कुठे होत असेल तर, ती आरटीओ कार्यालयाच्या बाहेर! 'दिव्याखाली अंधार' ही उक्ती सार्थ ठरवणारी ही खरीखुरी जागा होय. अशा विविध सरकारी कार्यालयाची पायरी चढायची म्हणजे मोठा आत्मविश्वास व धैर्य लागते. खासकरून तेव्हा.. जेव्हा तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याचा खिसा गरम करणार नसाल! कार्यालयात प्रवेश करताच एंडोर्समेंट लायसन्स अर्थात लायसन्स वर लायसन्स काढण्यासाठी भली मोठी रांग लागलेली दिसली. अर्थात ती नव्याने लायसन्स काढणाऱ्या व्यक्तींना पेक्षा निश्चितच छोटी होती. समोर एका खुर्चीवर एक अधिकारी महिला अर्जांची छाननी करत होत्या. रांग पुढे सरकू लागली. वेग तसा चांगला होता. आजूबाजूला उभे असणाऱ्या अनेकांच्या हातातील त्यांचे अर्ज मी पाहिले. प्रत्येकाच्या अर्जावर कोणत्या ना कोणत्यातरी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा शिक्का होता. मीच आपुला उघडा बोडका अर्ज घेऊन त्या रांगेत उभा होतो, याची जाणीव झाली. चौकशी नंतर समजले की मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडून दोनशे रुपये तपासणी करणार्‍या अधिकार्‍यांना दिले जातात. मी मात्र त्यात नव्हतो, याची खंत की लाज वाटली हे मला समजले नाही. त्या दोनशे रुपयांना कदाचित ते मानधन म्हणत असावेत. त्याला लाच म्हणणे म्हणजे अधिकाऱ्याचा व पैशाचाही अपमानच होय. खरं तर एखादा सरकारी अधिकारी व कर्मचारी पाहिला की, तो आपल्याकडे 'बकरा' या नजरेने पहात असावा असं आम्हाला बऱ्याचदा जाणवतं. आपल्याकडे पाहताना त्याच्या तोंडातून लाळ गळत आहे व प्रत्येक थेंबाची किंमत सुमारे पाचशे रुपये असावी, असेही आम्हाला सतत जाणवत राहतं. प्रामाणिक अधिकारी ही आमच्या दृष्टीने अंधश्रद्धा आहे. तिचं श्रद्धेत रुपांतर करण्याची हिम्मत आजवर एकाही सरकारी अधिकाऱ्याने केलेली नाही. या वेळीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. कार्यालयातील ती रांग सरकत सरकत पुढे आली. आमचा नंबर आला. मॅडमने प्रथम पाहिलं, अर्जावर कोणत्याही मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा शिक्का नव्हता. "च्यायला दोनशे रुपये गेले!", असे भाव मॅडमच्या मनात उमटले असावेत व त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला,
"अर्ज नीट अपलोड केला नाहीये परत अपलोड करा!", असे म्हणत आमचे कागद आमच्या अंगावर फेकले व संगणकात उघडला गेलेले अर्ज तात्काळ डिलीट करून टाकला. पुढचा क्रमांक घ्यायला मग त्या सज्ज झाल्या. ऑनलाइन अर्ज डीलीट केल्याने आमच्याकडे कोणताच पुरावा राहिला नव्हता. मग आम्ही निमूटपणे मागे हटलो व खुर्चीत जाऊन बसलो. आमचा मांडी-संगणक अर्थात लॅपटॉप आमचा सोबती म्हणून सतत बरोबर असतो. आम्ही तो बाहेर काढला व पुन्हा अर्ज अपलोड करायच्या मागे लागलो. मॅडमच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. 'मला खुन्नस देतोस काय?', ही भावना त्यांच्या मनात तयार झाली असावी. आमचा अर्ज पुन्हा अपलोड होईस्तोवर रांग संपून गेली होती. मग अर्ज घेऊन आम्ही पुन्हा मॅडमच्या समोर दाखल झालो. त्यांनी पुन्हा दहा मिनिटे काहीतरी काम केल्याची नाटकं केली आणि परत आमचा फॉर्म घेतला. त्यांच्यासमोरच संपूर्ण फॉर्म अपलोड झाल्याने कदाचित त्या मनातल्या मनात नवं कारण शोधत असाव्यात. तसेच त्या दोनशे रुपयांच्या नुकसानीची खंत त्यांना सतावत असावी. यावेळेस त्यांनी फॉर्म व्यवस्थित तपासून पाहिला आणि विचारलं, "जन्मतारखेचा प्रूफ कुठे आहे?" यावर मी त्यांना तात्काळ माझं अजून दुचाकीचं लायसन्स दाखवलं व लगेच उत्तर मिळालं,
"हे नाही चालत ओ!"
ज्या आरटीओ कार्यालयाने स्वतःला दुचाकीचं लायसन्स दिलं आहे, ते तिथे खोटं ठरवण्यात आलं! ही बाई स्वतःच्या कार्यालयाने जारी केलेल्या ओळखपत्र नामंजूर करत होती! एका २०० रुपयांसाठी हे लोक काय काय करू शकतात, याचा नमुना त्यादिवशी आमच्या समोर दिसत होता. तेव्हा मनाची खात्री पटली की, काहीही झाले तरीही बाई आज आपल्याला लायसन्स मिळवून देणार नाहीये. त्यामुळे तेथून काढता पाय घेणं योग्य होतं. जाताजाता कार्यालयात शोभेसाठी लावलेला लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या फलकही आम्हाला नजरेस पडला. त्याला मनातल्या मनात आम्ही सलाम ठोकला!
जवळपास दहा दिवसांनी एक सुट्टीचा दिवस मिळाला. मग काय... पुनश्च आम्ही सरकारी लोकांची तोंडं बघायला याच कार्यालयात डेरेदाखल झालो! पुन्हा तीच मोठी रंग. आणि याही वेळी तेच आम्ही एकुलते एक यांच्या अर्जावर कोणताही स्टॅम्प नव्हता! यावेळी महिला अधिकार्‍याची जागा एका पुरुष अधिकाऱ्याने घेतली होती. सर्वांनाच प्रतिव्यक्ती दोनशे रुपये मिळायला हवेत, असा समानतेचा कायदा असल्याने कदाचित या खुर्चीवर रोज नवनवे अधिकारी बसत असावेत. यावेळी मात्र आमचा क्रमांक येईपर्यंत कामकाज संपायची वेळ झाली होती. अखेरीस जवळपास एकच्या सुमारास आमच्या क्रमांक आला. साहेबांनी आपल्या संगणकाचा पडदा कोणालाही दिसू नये म्हणून पूर्ण तिरका करुन ठेवलेला होता. त्यांनी आमचा अर्ज क्रमांक टाकला आणि ओरडले,
"डॉक्युमेंट नीट अपलोड केलेले नाहीयेत... हे बघा!"
असं सांगत त्यांनी संगणकाची स्क्रीन आमच्याकडे वळवली व त्यावरील "पेज नॉट फाऊंड" हा मेसेज दाखवला. यावर आम्ही उत्तरलो,
"पण बाकीच्यांचे कसे काय दिसत आहेत?"
"तुम्ही नीट अपलोड नाही केलीत."
"अहो पण दहा दिवसांपूर्वी तर दिसत होती."
"दहा दिवस ती डॉक्युमेंट राहणार आहेत का तिथं?"
साहेबांचा हा प्रतिप्रश्न ऐकून आम्हाला संगणक अभियंता असण्याची लाज वाटली! त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित ती कोणीतरी चोरून नेली असावित वा पावसाच्या पाण्याने भिजली असावीत. मग काय, त्यांनी आमच्या अंगावर फेकलेली कागदपत्रे पुनश्च गोळा करून आम्ही तिथून चालते पडलो. या भाऊने दोनशे रुपयांसाठी "पेज नॉट फाउंड"ची युक्ती केली होती. ती काय असावी? हा प्रश्न मात्र आमच्या मनात पडूनच राहिला.
तिसऱ्या खेपेला मात्र गयावया करून आम्ही आमचा अर्ज ऑनलाइन मंजूर करून घेतला व लर्निंग लायसन्स आमच्या हाती पडले!
सरकारी कार्यालयांकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने समजतं की, तंत्रज्ञानाच्या फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत! तुम्ही कितीही ठरवले तरी सरकारी कर्मचारी तुम्हाला त्रास देणारच आहेत. शेवटी पैसा कोणी सोडतं का? पण त्यात ही पेक्षा खरे आहेत की, फुकटचा पैसा कधी पचतो का? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच ठाऊक आहे.
शिधापत्रिकेच्या शेवटी लिहिलेलं कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी अशा प्रसंगी मला नेहमी आठवतात. #टारगेट #१००कोटी

गोरगरिबा छळू नका । पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका।

© तुषार कुटे

Wednesday, April 7, 2021

आमा

काठमांडूमधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सायरन वाजवत एक रुग्णवाहिका वेगाने आत येते. एका वृद्ध व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागलेला असतो. साठी पार केलेली ती वृद्ध व्यक्ती बेशुद्ध झालेली असते. रुग्णालयातील डॉक्टर लगेचच ऑपरेशन करण्यासाठी सांगतात. त्या व्यक्ती बरोबरच केवळ त्याची साठी पार केलेली वृद्ध पत्नी असते. थोड्याच वेळात धावतपळत त्यांची मुलगी व जावई देखील या रुग्णालयात दाखल होतात. ऑपरेशन करण्यापूर्वी काही लाखांमध्ये रक्कम भरण्यासाठी त्यांना हॉस्पिटलकडून सांगण्यात येते. सदर परिस्थिती जिकिरीची असते त्यामुळे त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी अर्थात आरती पुढाकार घेऊन ऑपरेशन करायला सांगते. तिचा भाऊ अर्थात त्या वृद्ध दाम्पत्याचा मुलगा परदेशामध्ये राहत असतो. त्यालाही सदर घटनेची माहिती कळविण्यात येते. परंतु तो लगेचच घरी परत देण्यास असमर्थता दर्शवतो. त्याच्याकडून पैशांची जुळवाजुळव सुरू करण्यात येते. मोठा भाऊ परत मायदेशात परत येण्यापूर्वी घरची सर्व जबाबदारी अर्थात आपली आई अर्थात आमा आणि रुग्णशय्येवरील वडिलांची जबाबदारी आरती स्वतःच्या खांद्यावर घेते. इथून पुढचं पूर्ण नाट्य हे रुग्णालयातच घडत राहतं. डॉक्टर रोज नवनवी कारणे सांगून नवनवीन औषधे आणायला सांगतात. वेगवेगळी इंजेक्शन द्यायला लावतात. रुग्णाची परिस्थिती कशी बिकट होत चाललेली आहे, हे संपूर्ण कुटुंबाला समजावून सांगतात. या सर्वांमध्ये त्यांचा बराच पैसा खर्च होत असतो. जमवलेले सर्व पैसे संपत चाललेले असतात. परदेशातील त्यांचा मुलगा फक्त फोनवरच धीर देत राहतो. प्रत्येक फोन गणिक तो मायदेशात परत येऊ शकेल की नाही? याची शक्यता अधिकच धुसर होत जाते. शेवटी हॉस्पिटलचा खर्च जवळपास बारा लाखांपर्यंत जातो. डोक्याला अधिक मार लागल्याने व रक्तस्त्राव झाल्यामुळे ती वृद्ध व्यक्ती केव्हाच गतप्राण झालेली असते. परंतु घरातल्या अन्य सदस्यांना त्याची हॉस्पिटल प्रशासनातर्फे माहिती देण्यात येत नाही. केवळ पैशांसाठी पुढचा तमाशा चालू राहतो. अखेरीस काही दिवसांनी त्या व्यक्तीला मृत घोषित करण्यात येते. तोवर हॉस्पिटलला देण्यासाठी सहा लाखांची थकबाकी शिल्लक असते. हा सर्व घटनाक्रम आरती समर्थपणे सांभाळत राहते. शिवाय आपल्या आईला देखील मोठ्या मुलाप्रमाणेच धीर देत असते. आलेल्या संकटातून कधीतरी बाहेर पडू, याच आशेने ते पुढचे पाऊल टाकत राहतात. अखेरीस रुग्णशय्येवर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मात्र त्यांचा मृतदेह पत्नीच्या किंवा मुलीच्या स्वाधीन करण्यात येत नाही. थकबाकी दिल्याशिवाय मृतदेह मिळणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. तो मृतदेह तसाच बंद शवाघराच्या बाहेर पडून राहतो. या सर्व धकाधकीमध्ये त्यांची पत्नी अर्थात आमा थकून गेलेली असते. आपल्या वडिलांचे अंतिम क्रियाकर्म करायचेच या उद्देशाने आरती पैशांची जुळवाजुळव करते. तिने व तिच्या पतीने "आईवीएफ"साठी जमवलेला सर्व पैसा ती हॉस्पिटलला देऊन टाकते आणि वडिलांचा मृतदेह ताब्यात घेते. अखेरीस आपला भाऊ परत यायच्या आधीच त्यांचे अर्थात आई आणि वडिलांचे अंतिम संस्कार सोपस्कारपणे पार पडते.
अशी स्टोरी लाइन असलेला हा नेपाली चित्रपट आहे आमा! चित्रपटाचे जे पोस्टर रिलीज झाले आहे, त्यावरून हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे, असे लक्षात येते. आणि खरोखरच एक वेगळे कथानक या चित्रपटातून समोर येते. नेपाली चित्रपट म्हणजे आपल्याकडचे भोजपुरी चित्रपट असावेत, असा माझा भ्रम होता. परंतु तो या चित्रपटाने दूर केला. जगातील कोणत्याही चित्रपटाशी तुलना करू शकणारा हा चित्रपट होय. तो संगीत, दिग्दर्शन आणि अभिनय या तीनही बाबींवर उच्च ठरलेला दिसतो. अभिनयाचा विचार केल्यास आरतीची भूमिका साकारलेली सुरक्षा पंता आणि आमाची भूमिका साकारलेल्या मिथिला शर्मा यांचा अभिनय निश्चितच उत्कृष्ट दर्जाचा आहे. शिवाय दिग्दर्शक दिपेन्द्र खन्याल यांची कामगिरी सुद्धा प्रशंसनीय अशीच आहे. विशेष म्हणजे सुरक्षा पंता हिने चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यासाठी स्वतःचे केस खरोखर कापून घेतले होते! आयएमडीबीवर या चित्रपटाला 8.9 स्टार मिळालेले आहेत. Monday, April 5, 2021

प्रतिक्षा - रणजित देसाई

'पाहिलंस, मिलिंद, माणूस अंतर्मुख होण्याला केवढा भितो, ते ? दुसर्याच्या दुःखाकडे तो निर्विकारपणे पाहू शकतो. त्याच्या दुःखाची छाननी करू शकतो; पण स्वत:चं परीक्षण करताना मात्र तो व्याकूळ होतो. दुसऱ्याच्या जखमेवरची पट्टी चारचौघात त्याला बेदरकारपणे काढता येते; पण स्वत:च्या जखमेवरची पट्टी दूर करण्याच्या कल्पनेनंही तो कासावीस होतो...

'याचं कारण?'

कारण एकच... जीवनावर श्रद्धा. जीवन जगण्यात असलेला प्रामाणिकपणाचा अभाव. सारेच व्यवहार स्वार्थप्रेरित. मानव एकटाच जन्माला येतो आणि त्याला शेवटी एकटाच जावं लागतं, तरीही त्याला आयुष्यभर सोबतीची आवश्यकता असते ही सोबत तो शोधीत असतो. आयुष्य क्षणभंगुर आहे, हे माहीत असूनही, चिरंतन, शाश्वत प्रेमाचे ठिकाण त्याला हवं असतं; पण हे सारं स्वत:ला सुरक्षित राखून....

'दिल्याखेरीज काहीच मिळू शकत नाही. स्वतः हरवल्याखेरीज काही गवसत नाही. हे हरवण जो शिकला, त्यालाच ती शांती, ते समाधान मिळू शकेल. मात्र ते ठिकाण प्रत्येकानं शोधायला हवं...

हिमालयाच्या कुशीमध्ये एक प्रवासी भटकत चालला आहे. वाटेत त्याची भेट एका संन्याशाची होते. तो एका तरुण स्त्री व तिच्या मुलासोबत राहत आहे. प्रवासी एका रात्रीसाठी त्याठिकाणी थांबतो. परंतु नंतर मात्र त्याचा पाय तेथून निघत नाही. तो त्या तरुण स्त्रीच्या प्रेमात पडतो. तिचा एक भूतकाळ आहे. त्यालाही तो सहजपणे स्वीकारतो व दोघांचे मिलन घडते. अशी साधी सरळ प्रेमकथा असलेली कादंबरी म्हणजे "प्रतीक्षा" होय. रणजीत देसाईंनी सुटसुटीतपणे घटनांची व प्रसंगांची मांडणी करून ही वाचकांसमोर सादर केलेली आहे. ती वाचत असताना आपण सतत हिमालयाच्या कुशीत वावरत राहतो. शिवाय संवादांची रचना मोठ्या प्रमाणात असल्याने तिच्याशी सातत्याने बोलतही राहतो, हे या कादंबरीची वैशिष्ट्ये होय.