Friday, September 6, 2024

माधुरी

ही कथा आहे त्या दोघींची. दोघींची म्हणजे आईची आणि मुलीची. मुलीने तिच्या तारुण्यात पदार्पण केले आहे. परंतु आई देखील तिच्याच वयाची आहे. अर्थात शरीराने नाही तर मनाने.
मागच्या काही वर्षांपासून मानसिक धक्का बसल्यामुळे आईला भूतकाळातील मागील वीस वर्षे आठवतच नाही. तिला अजूनही असं वाटते की ती केवळ अठरा वीस वर्षांची आहे. आणि मुलगी देखील तिच्याच वयाची. अशा आईला संभाळणे म्हणजे महाकठीण काम. पण तरीदेखील ती तिच्या पद्धतीने आईला सांभाळत आहे आणि अनेक संकटांना तोंड देखील देत आहे.तिची आई एकेकाळी अशी नव्हती. ती महाविद्यालयातील एक नामांकित प्राध्यापिका होती. पण आज परिस्थिती वेगळी आहे. तिला समजून घेणारा तिचा एक विद्यार्थी देखील तिच्यासोबत सातत्याने असतो. तो देखील हुशार आहे.
एक दिवस एक माणूस उपचार तज्ञ त्यांच्या आयुष्यात येतो. तो त्याच्या पद्धतीने सदर केस हाताळण्याचा प्रयत्न करतो.. यातून मुलीला आपली आई समजत जाते. कधी कधी तिचं वागणं बोलणं देखील पटतं. आई कशी होती आणि आज ती अशी का झाली? याचा देखील तिला उलगडा होत जातो. एका अर्थाने ती आपल्या आईला समजून घ्यायला लागते. त्यांच्यामध्ये एक नवं नातं तयार होतं. हे नातं तयार होतानाचे प्रसंग दिग्दर्शकाने छान रंगविलेले आहेत. ते कुठेच कंटाळवाणे वाटत नाही. एका वेगळ्या नात्याची गोष्ट हा चित्रपट सांगून जातो.
आईची अर्थात माधुरीची मध्यवर्ती भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारलेली आहे. बहुरंगी भूमिका करण्यात त्यांचा हातखंडा आहेच. आणि तो या चित्रपटात देखील दिसून येतो.


 

Saturday, August 31, 2024

आयरिस डेटा सेट

संख्याशास्त्र, डेटा अनालिसिस आणि मशीन लर्निंग क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या डेटासेट्समध्ये आजवर सर्वात लोकप्रिय असणारा डेटासेट म्हणजे आयरिस डेटासेट होय. आयरिस नावाच्या एका निळ्या रानटी फुलाचा हा डेटासेट आहे. आयरिसचा अर्थ मानवी डोळ्यांतील बुबूळे असा देखील होतो. परंतु याच नावाचे रानटी फुल देखील आहे, याची बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे.
सुमारे ९० वर्षांपूर्वी जीवशास्त्रज्ञ एडगर अँडरसन याने या डेटासेटची निर्मिती केली होती. आयरिस फुलाच्या एकूण तीन प्रजाती आहेत…. सेटोसा, वर्जिनिका आणि वर्सीकलर. त्याने या तीनही प्रजातींची फुले जमा केली. आणि त्यांच्या पाकळ्यांची उंची व जाडी तसेच बाह्यकोषाची उंची आणि जाडी सेंटीमीटरमध्ये नोंदवून हा डेटासेट तयार केला होता. एका वेगळ्या प्रयोगासाठी त्याला माहिती जमा करायची होते म्हणूनच त्याने या डेटासेटची निर्मिती केली. परंतु आयरिसच्या या माहितीपूर्ण डेटासेटला लोकप्रिय करण्याचे काम संख्याशास्त्रज्ञ व गणितज्ञ रोनाल्ड फिशर यांनी केले. संख्याशास्त्रातील लिनियर डिस्क्रिमिनंट अनालिसिस या संकल्पनेला सिद्ध करण्यासाठी त्यांनी आयरिस डेटासेटचा सर्वप्रथम वापर केला. अँडरसने तयार केलेल्या मूळ डेटासेटमध्ये सुसूत्रता आणून त्यांनी तीनही प्रजातींचे समान पन्नास नमुने जमा केले होते. आज संख्याशास्त्र आणि मशीन लर्निंगमधील जवळपास प्रत्येक अल्गोरिथमची सिद्धता तपासण्यासाठी आयरिस डेटासेटचा वापर केला जात आहे. याशिवाय आर प्रोग्रामिंग आणि पायथॉन प्रोग्रामिंगच्या अंतर्गत लायब्ररीमध्ये देखील या डेटासेटचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. शिवाय याचा आकार देखील लहान असल्याने त्यावरील करण्यात येणारे प्रयोग देखील अतिशय कमी वेळामध्ये सादर करता येतात. 

--- तुषार भ. कुटे



Thursday, August 29, 2024

जीवनसंध्या

वकिलाच्या कार्यालयाबाहेर दोन वृद्ध व्यक्ती अर्थात आजी आजोबा गप्पा मारत बसलेले आहेत. रिसेप्शनिस्ट मात्र त्यांच्याकडे कौतुकाने पाहत आहे. एका ड्रायव्हर्स लॉयरच्या कार्यालयात हे दोघे नक्की काय करतायेत हा प्रश्न त्याला पडतो. तो त्यांना विचारतो देखील. त्यावर ते म्हणतात की आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे. दोघांमधील इतका सुंदर नातं बघून त्याला हा प्रश्न पडतो की ते घटस्फोट का घेत आहेत आणि ते देखील या वयात?
इथून चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये सुरू होतं. दोघांचं नातं पाच वर्षांपूर्वी सुरु झालेलं असतं. अर्थात त्यापूर्वी दोघेही आपल्या मुलांसमवेत एकांतात जीवन व्यतीत करत असतात. परंतु एक दिवस त्यांची भेट होते. हळूहळू ते दोघेही एकमेकांना आवडायला लागतात. आणि एकत्रित राहण्याचा अर्थात लग्नाचा निर्णय घेतात. हा निर्णय मात्र त्यांच्या मुलांना बिलकुल पटत नाही. मग ते मुलांविरुद्ध बंड करतात आणि वयाच्या सत्तरी मध्ये स्वतःचा संसार सुरू करतात. तो अतिशय आनंदात आणि सुरळीत चालू असतो. फक्त त्याला त्यांच्या मुलांची साथ लावत नाही. अचानक एक दिवस एका प्रसंगामुळे आजी अडचणीत येते. आणि त्यामुळेच त्यांना घटस्फोट घ्यावा लागतो. तरीदेखील एकमेकांशिवाय राहवत नाही. आणिकथा एक वेगळे वळण घेते. दोघांनाही एकत्रित राहण्याची संधी मिळते. पुढे त्यांचा संसार कसा चालतो हे चित्रपटात पाहणे सोयीस्कर ठरेल.
जीवनसंध्या या चित्रपटातील जीवन म्हणजे अशोक सराफ आणि संध्या म्हणजे किशोरी शहाणे. कित्येक वर्षांपासून या दोघांचे चित्रपट मराठी प्रेक्षक पाहत आलेले आहेत. अगदी तारुण्यापासून वृद्धत्वापर्यंत त्यांनी अनेक चित्रपट मराठी रसिकांना दिले. कदाचित कोणताच चित्रपट फ्लॉप गेला नाही किंवा कंटाळवाणा देखील वाटला नाही. हा चित्रपट जरी विनोदी नसला तरी देखील वेगळ्या धाटणीचा आहे. कदाचित जीवन आणि संध्या ची भूमिका त्यांच्यासाठीच लिहिली असावी हे चित्रपट पाहून आपल्याला समजते.



बिबट्या शोधणारी प्रणाली

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून जुन्नर परिसरात बिबट्यांचा माग शोधणारी यंत्रणा वनविभागाने कार्यान्वित केलेली आहे. अशा यंत्रणा २४ तास परिसरावर लक्ष ठेवून असतात. संगणक दृष्टी अर्थात कॉम्प्युटर व्हिजन या तंत्राद्वारे कॅमेरातून वन्य प्राण्यांना शोधून त्यांचा माग काढणे शक्य होते. परंतु याकरिता संगणकीय अल्गोरीदमला प्रशिक्षण द्यावे लागते अर्थात ट्रेन करावे लागते. त्यासाठी मोठा डेटासेट असणे आवश्यक असते.


अशाच प्रकारच्या एका अल्गोरिदमवर काम करत असताना आम्हाला कमी प्रमाणात असणाऱ्या डेटामुळे चुकीचे परिणाम दिसून येत होते. बिबट्या हा मार्जार कुळातील प्राणी. अर्थात मूळ मांजरीपासून उत्क्रांत झालेला प्राणी आहे. याच कुळामध्ये वाघ, सिंह, चित्ता आणि मांजर हे प्राणी देखील येतात. अर्थात या सर्व प्राण्यांची शरीररचना जवळपास सारखीच असते. आम्ही बनवलेल्या एका अल्गोरिदमवर कॅमेऱ्याच्या समोर मांजर जरी आले तरी तो कॅमेरा लगेचच बिबट्या आहे असे सांगत होता! अर्थात या अल्गोरिदमला ट्रेनिंग करण्यासाठी वापरण्यात आलेल्या डेटासेटचा आकार बऱ्यापैकी कमी होता. याच कारणास्तव त्याची अचूकता देखील त्या प्रमाणात नव्हती. डीप लर्निंगचा वापर करून बनवलेल्या प्रणालींमध्ये डेटासेटचा आकार हा कळीचा मुद्दा ठरतो. त्यावरून त्याची अचूकता देखील कमी जास्त होत असते. शिवाय वेगावर देखील परिणाम होतो. म्हणून अशा प्रणाली विकसित करणे बऱ्यापैकी जिकिरीचे काम आहे.
आशा आहे की, वनविभागाने बनवून घेतलेली ही प्रणाली आपले काम उत्तमरीत्या करेल.

--- तुषार भ. कुटे

Sunday, August 25, 2024

घोडा

रोजंदारीवर काम करणाऱ्या एका कामगाराची आणि त्याच्या मुलाची ही गोष्ट आहे. कामाच्या ठिकाणी एका गृहप्रकल्पावर काम चालू असते. या ठिकाणी कामगार म्हणून चित्रपटाच्या नायकाची नियुक्ती होते. अर्थात ज्या दिवशी काम त्या दिवशी पैसा, असं काही त्याच्या आयुष्यात चालू होतं.
जवळच्याच गावामध्ये त्याचा छोटसं घर असतं. अर्थात कामाच्या निमित्तानेच तो या ठिकाणी राहायला आलेला असतो. त्याला एक लहान मुलगा देखील असतो. बालपण निरागस असतं, असं म्हणतात. त्याला हा मुलगा तरी अपवाद कसा असेल? त्याच्या घराच्या समोरच एका बंगल्यावर आणखी एक छोटा मुलगा लाकडी घोड्यावर खेळताना त्याला दिसतो. त्या मुलाला तो घोडा खूप आवडतो. संध्याकाळी वडील घरी आल्यावर तो वडिलांकडे खेळण्यातल्या त्या घोड्याची मागणी करतो. दररोजच्या जीवनात खाण्यासाठी संघर्ष करताना त्याला मुलाच्या खेळण्यासाठी पैसे कसे परवडू शकतील? अर्थातच या कारणास्तव मुलाला नकार देणे, त्याला भाग पडते. परंतु मुलगा काही पिच्छा सोडत नाही. दररोज खेळण्यातल्या घोड्याची त्याच्याकडे मागणी करतो. आपल्या मुलाची एक साधी इच्छा देखील आपण पूर्ण करू शकत नाही, याचे शल्य त्याला वाटू लागते. मग त्यावर तो उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो.. गृहप्रकल्प बांधकामाच्या ठिकाणी एक जण खेळण्यातील मोडलेला घोडा टाकून देताना त्याला दिसतो. त्या मोडलेल्या घोड्याकडे बघून त्याला खूप आनंद होतो. त्या मोडलेल्या घोड्याला स्वतःच्या कारागिरीने व्यवस्थित करून खेळण्याजोगा बनवतो. आणि मुलाला घोडा देऊन आश्चर्याचा धक्का देतो. परंतु इथून खरी नाट्यमय घडामोडींना सुरुवात होते. हा लाकडी घोडा आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. यात नायकाची भयंकर दमछाक होते. ज्या घोड्यासाठी त्याने इतके प्रयत्न केले, तो त्याला शेवटपर्यंत दमवतो.
चित्रपटाची कथा अतिशय सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे दिग्दर्शकाने देखील ती चांगल्या पद्धतीने खुलविल्याची दिसते. एका अतिशय वेगळ्या प्रयत्नात हा चित्रपट निश्चित बाजी मारतो. परंतु बऱ्याच जणांना माहीत नसल्याने कदाचित अजूनही हा चित्रपट प्रेक्षकांपासून दूर असावा, असे दिसते.

--- तुषार भ. कुटे



Thursday, August 22, 2024

आम्ही मराठी बोलत नाही

आमचा नेहमीचा मराठी केशकर्तनकार त्यादिवशी सुट्टीवर असल्याने मी शेजारच्या नवीन सलूनमध्ये पोहोचलो. इथे काम करणारे सर्वच जण उत्तर भारतीय होते. मी त्याच्याशी पूर्णपणे मराठीमध्ये संवाद साधत होतो. परंतु त्याच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्हांवरून आणि गोंधळावरून मला समजले की, याला मराठी काही समजत नाहीये. मी त्याला विचारले,
“किती वर्षे झाले इथे काम करत आहेस?”
“दोन-अडीच वर्षे असतील”, तो त्याच्या भाषेतच उत्तर देत होता.
“मग अजून मराठी नाही शिकलास का?”
यावर तो म्हणाला, “इथं मराठी कोण बोलतं?”.
मी चमकून त्याच्याकडे बघितले आणि विचारले, “तुझ्याशी कोणी मराठीत बोलत नाही का?”.
“सर्वांनाच हिंदी बोलता येतं, त्याच्यामुळे ते मराठीत माझ्याशी कधीच बोलत नाहीत.”
मला हे उत्तर अपेक्षितच होतं. मग मी बोलू लागलो,
“कसं आहे मित्रा, आमची मराठी भाषा ही तुमच्या भाषेपेक्षा २००० वर्ष जुनी आहे. त्यामुळे मराठी लोकं आपली भाषा जपतात. कोणत्याही ऐऱ्यागैऱ्याला ती समजू नये, म्हणून ते त्याच्याशी मराठीत बोलत नाहीत. उद्या जर तुम्ही मराठी बोलायला लागले तर आमचं ज्ञान देखील तुम्हाला प्राप्त होईल, अशी भीती मराठी लोकांना वाटते. म्हणूनच मराठी लोक बाहेरच्या कुणाशीही मराठीत बोलत नाहीत.”

त्याला माझं बोलणं कितपत समजलं ते कळालं नाही. पण तुम्हाला समजले असेल, तर अभिप्राय नक्की सांगू शकता.  

--- तुषार भ. कुटे.



 


Monday, August 19, 2024

लेट अस सी

इयत्ता नववीमध्ये असताना माझी प्रोग्रामिंगची ओळख झाली. त्या काळात आम्हाला “बेसिक” नावाची संगणकीय भाषा शिकवली जायची. आठवड्यातून एक ते दोन तास हा वर्ग चालायचा. शिवाय या विषयाला गुण देखील नव्हते. आणि कदाचित याच कारणास्तव त्यावेळी आम्ही त्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही.
परंतु डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षी पहिल्यांदाच “सी प्रोग्रामिंग लँग्वेज”ची ओळख झाली. संगणकाच्या इतिहासामध्ये लोकप्रिय असणारी आणि आजही वापरात असणारी ही संगणकीय भाषा. २५-२६ वर्षांपूर्वी संगणकीय भाषा शिकण्यासाठी उपलब्ध असणारी साधने अतिशय मर्यादित होती. इंटरनेट अस्तित्वात होते परंतु सदैव उपलब्ध नव्हते. आणि शिवाय त्यावरील माहिती देखील अपुरी होती आणि विस्तृत नव्हती. याच कारणास्तव संगणकीय प्रोग्रामिंग शिकणे हे आव्हानात्मक होते. अर्थात सदैव केवळ पुस्तकांवरच आणि त्यावरील त्यातील ज्ञानावरच विसंबून राहावे लागत असे. अशावेळी यशवंत कानेटकर यांनी लिहिलेले “लेट अस सी” हे पुस्तक वाचण्यात आले. त्या काळात देखील सी प्रोग्रामिंगवर आधारित असणारे हे सर्वात लोकप्रिय पुस्तक होते. बऱ्याच जणांनी शिफारस केलेले हे पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर माझ्या संगणकीय प्रोग्रामिंगची सुरुवातच या पुस्तकाने झाली. फोटोमध्ये या पुस्तकाची तिसरी आवृत्ती आहे. अगदी हीच आवृत्ती सर्वप्रथम मी वाचली होती. आणि याच पुस्तकातून माझ्या प्रोग्रामिंगचा श्रीगणेशा झाला. संगणकीय भाषेमधील विविध संकल्पना याच पुस्तकातून मला समजायला लागल्या. अर्थात यासाठी मला माझ्या मित्रांनी देखील बरीच मदत केली होती. परंतु या पुस्तकाव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक प्रोग्रामिंग शिकण्यासाठी मी त्याकाळी वापरले नाही. कानेटकर म्हणतील तोच अंतिम शब्द, असं काही त्या काळात आम्ही समजत असू. अर्थात ते खरं देखील होतं. प्रोग्रामिंगच्या विविध संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे मी या पुस्तकातूनच अनुभवल्या. आणि कदाचित याच कारणास्तव प्रोग्रामिंगचा आमचा पाया अधिक भक्कम होत गेला. एका अर्थाने माझ्यासाठी प्रोग्रामिंगची ही भगवद्गीताच होती, असे म्हणायला हरकत नाही. आज या पुस्तकाची १९ वी आवृत्ती बाजारामध्ये आलेली आहे. पण माझ्यासाठी मी वाचलेली आणि अनुभवलेली तिसरी आवृत्ती महत्त्वाची वाटते. आज पुन्हा हे पुस्तक विकत घेतले. याच पुस्तकामध्ये माझ्या प्रोग्रामिंग इतिहासाच्या भावना जखडलेल्या होत्या आणि आजही आहेत. 

---  तुषार भ. कुटे



Saturday, August 17, 2024

प्रादेशिक सिनेसृष्टीचा डंका

काल भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. यावर्षी बऱ्यापैकी बिगर-हिंदी चित्रपटांनी तसेच कलाकारांनी वाखाणण्याजोगी कामगिरी पुरस्कारांमध्ये केल्याचे दिसून येते. दैनिक सकाळ या मराठी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातमीचे शीर्षक वाचा, "राष्ट्रीय पुरस्कारांत प्रादेशिक सिनेसृष्टीचा डंका". याचा अर्थ बॉलीवूड अर्थात हिंदी भाषिक सिनेसृष्टी वगळता बाकीचे सर्व भाषिक चित्रपट हे प्रादेशिक प्रकारामध्ये त्यांनी मोडल्याचे दिसते. हिंदी बोलणाऱ्यांची आणि समजणाऱ्यांची संख्या भारतामध्ये अधिक असल्याकारणाने हे चित्रपट अधिक कमाई करतात. म्हणूनच अन्य भाषेतील कलाकार देखील हिंदी भाषेमध्ये काम करायला प्राधान्य देतात. याचा अर्थ असा नाही की हिंदी भाषिक चित्रपट म्हणजेच भारतीय चित्रपटसृष्टी होय. 

हिंदी चित्रपट हे केवळ मनोरंजन आणि पैसे कमावण्याच्या दृष्टीनेच बनवलेले असतात. परंतु भारतातील अन्य भाषिक चित्रपटांमध्ये आशयघनता दिसून येते. उत्तम कथा, मांडणी, दिग्दर्शन, संगीत या सर्वच पातळ्यांवर अखिल भारतीय चित्रपट उच्च स्तरावर पोहोचलेला आहे. पण आजही भारतीय चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपट असे चित्र भारतात आणि जगभरात देखील तयार केले जात असल्याचे दिसते आणि यालाच बिगर-हिंदी भाषिक बहुतांश कारणीभूत आहेत. म्हणूनच एका मराठी वृत्तपत्राला असे शीर्षक बातमीला द्यावेसे वाटले असेल. बिगर-हिंदी भाषिक चित्रपटांना हवा तसा पाठिंबा अजूनही प्रेक्षकांकडून मिळालेला नाही. प्रामुख्याने मराठी, बंगाली, ओडिया, आसामी, गुजराती चित्रपटसृष्टी हिंदी भाषिकांच्या प्रभावामुळे मागे पडल्याचे दिसते. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टींमध्ये मात्र प्रेक्षकांच्या पाठिंब्याने अजूनही उत्तम प्रतिसाद असल्याचे दिसून येते.
भारतातल्या प्रत्येक भाषेमध्ये उत्तम चित्रपट तयार होतात. परंतु हिंदीच्या प्रभावामुळे त्यांना प्रेक्षकांसमोर जाण्यासाठी हवे तसे व्यासपीठ मिळत नाही. यास बहुतांश वेळा प्रेक्षकच कारणीभूत आहेत आणि ही परिस्थिती बदलणे हे देखील त्यांच्या हातात आहे.

बाकी पुरस्कार विजेत्या सर्व व्यक्तींचे मनःपूर्वक अभिनंदन!!!

 

---  तुषार भ. कुटे.

स्वीकारा नवे तंत्रज्ञान!

विज्ञानाने तंत्रज्ञानाला जन्म दिला आणि त्यामुळे मानवी जीवन सुसह्य आणि सुकर होऊन गेले. याच कारणास्तव विविध प्रकारच्या नोकऱ्या अस्तित्वात आल्या. नवी कौशल्ये शिकून अनेक जण तंत्रज्ञानाधारित उद्योगांमध्ये काम करायला लागले. आज जगभरात कोट्यावधी लोक तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रामध्ये काम करत आहेत. बहुतांश जण तंत्रज्ञानाचा वापर करूनच नोकरी करत आहेत. जर हे तंत्रज्ञान विकसित झाले नसते तर या नव्या नोकऱ्या तयार झाल्या नसत्या. अर्थात सदर व्यक्ती बेरोजगार असती असे नाही. प्रत्येकाने कालानुरूप स्वतःला बदलले, नवी कौशल्ये, तंत्रज्ञान शिकून घेतले आणि त्या जोरावर वैयक्तिक प्रगतीची कवाडे खुली केली. बदल हा जीवनाचा नियम आहे. अर्थात तो तंत्रज्ञानाला देखील लागू होतो. 

मागील काही वर्षांपासून वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान म्हणजे "आर्टिफिशियल इंटेलिजन्स" होय. तंत्रज्ञानाची ही सर्वात अद्ययावत आणि पुढची पायरी आहे. अर्थात या तंत्रज्ञानाचा फटका देखील सध्या मानवनिर्मित नोकऱ्यांना होत आहे. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कपात होताना दिसत आहे. आज ही सर्व कामे आता यंत्रांकडून केली जात आहेत, असे दिसते. बहुतांश कामांमध्ये मानवी बुद्धिमत्तेचा वापर होत नाही म्हणून अशी कामे अर्थात 'रोबोटिक वर्क' हे तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत आहेत. म्हणूनच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर बहुतांश जणांच्या जाण्याच्या मार्गावर आहेत. तंत्रज्ञान जसे मानवी प्रगतीला पोषक असते तसे दुसऱ्या बाजूने त्याचे भयंकर तोटे देखील असतात. त्यातीलच हा एक तोटा. मग यावर मार्ग काय? अर्थात तंत्रज्ञानासोबत जगणे..  ते शिकून घेणे व त्याचा आपल्या प्रगतीसाठी वापर कसा करता येईल, हे पाहणे होय. ही वाट जोपासली तरच तंत्रज्ञान स्पर्धेच्या या जगात आपण टिकू शकू आणि प्रगतीच्या वाटेवर इतरांसोबत चालू देखील शकू. 

--- तुषार भ. कुटे.

Monday, August 12, 2024

यांत्रिक रक्तवाहिनी प्रदीपन

आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे जीवन अधिक सुखकर होत असताना दिसत आहे. विविध प्रकारच्या उपकरणांमुळे मानवी शरीराची रचना तसेच त्यातील आजार ओळखण्यास मदत होताना दिसते. असेच नवे उपकरण आता तंत्रज्ञांनी शोधलेले आहे. शरीरातील रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या शोधणारे हे यंत्र आपल्या सर्व चाचण्या सहजपणे पार करून वैद्यकीय सेवकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. याद्वारे शरीरातील रक्त वाहून नेणाऱ्या शिरा शोधण्याचे काम अतिशय सहज आणि सोपे झाल्याचे दिसते. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना रक्तवाहिन्यांद्वारे औषधांचा पुरवठा केला जातो. अशावेळी या रक्तवाहिन्या शोधण्याचे काम काही प्रमाणात अवघड आणि जिकिरीचे असते. परंतु तंत्रज्ञानाने यावर अतिशय अचूक उपाय शोधलेला आहे. लहान मुले, वृद्ध आणि लठ्ठ व्यक्तींच्या रक्तवाहिन्या लवकर सापडत नाही. त्यामुळे सुईद्वारे त्यांना देण्यात आलेले औषध बाहेर जाण्याची शक्यता असते. म्हणूनच या शिराशोधक किंवा रक्तवाहिनी प्रदीपन यंत्रामुळे आता वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना आपले प्राथमिक कार्य करणे सोपे होणार आहे. 


 

Thursday, August 8, 2024

तिरसाट आणि प्रीतम

सैराट चित्रपट यशस्वी झाल्यानंतर मराठीमध्ये तशाच प्रकारच्या अनेक प्रेमपटांची लाट आली. काही यशस्वी झाले आणि बहुतांशी अयशस्वी. अशाच पठडीतील दोन चित्रपट म्हणजे तिरसाट आणि प्रीतम.
दोन्ही चित्रपटांना ग्रामीण पार्श्वभूमी. गावातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करणारे चित्रपटाचे नायक. दोघेही हिरो मटेरियल नाहीत. कथेचे अंतिम उद्दिष्ट एकच… मात्र प्रवास वेगवेगळा. पहिल्या चित्रपटाचा नायक हा बेफिकीर आणि स्वतःच्या आयुष्यात कोणते ध्येय न ठेवलेला बेकार आणि बेरोजगार तरुण आहे. तर दुसऱ्या चित्रपटातील नायक अगदीच सर्वसामान्य घरातील मुलगा आहे. घराचा संपूर्ण भार त्याच्यावर आहे. म्हणजे एका अर्थाने तोच घर चालवतो. पहिल्या चित्रपटांमध्ये नायकाचे आई-वडील कष्टाळू आणि आपल्या मुलाच्या भविष्यासाठी धडपडणारे आहेत. तर दुसऱ्यामध्ये नायकाची आई ही घरासाठी राबणारी मात्र वडील व्यसनाधीन झालेले आहेत. त्यांच्या घरात रोजच्या कटकटी या नित्याच्याच असतात. एकंदरीत पहिल्या चित्रपटांमध्ये दाखवलेला नायक हा काहीसा खलप्रवृत्तीच्या दिशेने जाताना दिसतो. गावातील सर्वात सुंदर मुलीवर तो अनेक वर्षे प्रेम करत असतो. परंतु ती त्याला होकार देत नाही. अर्थातच ज्या पद्धतीचा नायक दाखवलेला आहे, त्याला कोणतीही मुलगी कधीही होकार देणार नाही. परंतु यातून तो धडा घेतो. आणि जिद्दीने उभा राहतो. पुढे ती मुलगी स्वतःहूनच नायकाला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करते. दुसऱ्या चित्रपटात मात्र नायक अतिशय सभ्य आणि सरळ वृत्तीचा दाखवलेला आहे. कुणीही यावं आणि टपली मारून जावं, असा त्याचा स्वभाव. त्याची शरीरयष्टी आणि एकंदरीत देहबोली पाहता कोणतीच मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार होणार नाही, असं दिसतं. त्याचे मित्र देखील त्याची सातत्याने टवाळी करत असतात. परंतु अखेरीस तोच गावातल्या त्या सुंदर मुलीशी लग्न करतो. याकरता तो कोणती पावले उचलतो, हे चित्रपटांमध्येच पाहता येईल.
वाईटातून चांगले आणि चांगल्यातून वाईट अशा दोन दिशेने जाणारे हे दोन चित्रपट आहेत. अखेरीस प्रेमकहानी यशस्वी होते, हाच तो काय सारांश. 


 

Wednesday, August 7, 2024

समस्येवरील सहज उपाय

समस्या या मानवी जीवनाच्या मूलभूत अंग आहेत. अर्थात प्रत्येकजण आणि प्रत्येक क्षेत्र हे समस्यांनी घेरलेले आहे. परंतु कितीही अवघड समस्या असली तरी तिच्यावर उपाय हा असतोच. कधी कधी तो अतिशय सोपा असतो तर कधी कधी भयंकर अवघड. यातही बऱ्याचदा सोपी उपाय सोडून आपण अतिशय कठीण गोष्ट चुकीच्या मार्गाने उकल करायला जातो. यात वेळ वाया जातो. अर्थात हा अनुभव आणि दृष्टिकोनाचा प्रश्न आहे.
या व्हिडिओमध्ये दिसलेली अतिशय कठीण समस्या काही लोक आपल्या आपापल्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करतात. परंतु त्यावरील उपाय किती सहज आणि सोपा आहे, हे तुम्हाला त्याच्या शेवटी दिसून येईलच.


 

Tuesday, August 6, 2024

बापमाणूस, बापल्योक आणि मायलेक

परिवार आणि नातेसंबंध यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट मराठी चित्रसृष्टीमध्ये तयार झालेले आहेत. मागच्या एक-दीड वर्षांचा विचार केला तर आई-मुलगी, वडील-मुलगा, वडील-मुलगी यांच्या नात्यांवर आधारित तीन मोठे चित्रपट पाहायला मिळाले.
आईविना वाढत असणारी मुलगी आणि तिचे वडील यांचे कथानक “बापमाणूस” या चित्रपटामध्ये पाहायला मिळते. आपल्या लहान मुलीला आईशिवाय वाढवणारा धडपडा तरुण या चित्रपटामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा केला गेलेला “बापल्योक” हा चित्रपट वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करतो. मुलाच्या लग्नाच्या चिंतेत असणारा गावाकडचा बाप या चित्रपटातून आपल्याला दिसतो.
तर याच वर्षी प्रदर्शित झालेल्या “मायलेक” या चित्रपटामध्ये पौगंडावस्थेतील मुलीचे आणि तिच्या आईच्या नातेसंबंधांचे विश्व आपल्याला अनुभवायला मिळते.
बापमाणूस आणि मायलेक हे दोन्ही चित्रपट पूर्णपणे परदेशामध्ये चित्रित झालेले आहेत. त्यामुळे सातत्याने इंग्रजी शब्द कानावर पडतात. या उलट बापल्योकमध्ये पूर्णपणे ग्रामीण बोली ऐकायला मिळते. किमान एकदा तरी पहावेत असेच हे चित्रपट आहेत.





Saturday, August 3, 2024

साल्टो रोबोट

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानात दररोज नव्या नव्या उत्पादनांची भर पडत आहे. मानवी जीवन सुकर करण्याच्या दृष्टीने तसेच विविध समस्यांची उकल काढण्यासाठी नवनवे रोबोट्स तयार होताना दिसत आहे. इसवी सन २०२० मध्ये IEEE च्या एका शोधनिबंधामध्ये साल्टो नावाच्या रोबोटविषयी माहिती वाचली होती. आजही हा शोध निबंध सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कॅलिफोर्नियाचे बर्कले विद्यापीठ संगणक तंत्रज्ञानात अग्रेसर असे विद्यापीठ आहे. त्यांनी मशीन लर्निंगच्या सहाय्याने आजवर विविध उत्पादने तसेच संगणकीय अल्गोरिथम विकसित केलेले आहेत. त्यातीलच एक उड्या मारणारा हा साल्टो रोबोट होय.
मागच्या चार ते पाच वर्षांपासून विद्यापीठाच्या मशीन लर्निंग तंत्रज्ञान प्रयोगशाळेमध्ये या रोबोटवर काम चालू आहे. शिवाय या वर्षांमध्ये या रोबोने विविध कार्ये आत्मसात केलेली आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा अतिशय लहान असणारा रोबोट किती वेगाने, कशा पद्धतीने आणि किती उंच उड्या मारत आहे. त्यांच्या पहिल्या व्हिडिओमध्ये केवळ सदर रोबोटची चाचणी केली गेली होती. परंतु नव्या प्रदर्शित केलेल्या व्हिडिओमध्ये तो अधिक अचूकतेने कार्य करताना दिसतो. ही अजूनही सुरुवातच आहे. या रोबोट द्वारे विविध समस्यांची उकल विद्यापीठातील संशोधक करण्याच्या तयारीत आहेत.

संदर्भ: https://spectrum.ieee.org/salto-jumping-robot-masters-pinpoint-landings


Friday, August 2, 2024

उभयखुरा गोलंदाज

जगामध्ये प्रत्येक माणूस हा एक तर डावखुरा असतो किंवा उजखोरा. काही जणांना दोन्ही हात समान पद्धतीने वापरता येतात. अशा लोकांना उभयखुरा असे म्हटले जाते. अल्बर्ट आईन्स्टाईन, निकोला टेस्ला, लिओनार्डो दा विंची,बेंजामिन फ्रँकलिन यासारखे सुप्रसिद्ध लोक देखील उभयखुरे होते!

एका सर्वेक्षणानुसार जगामध्ये सुमारे आठ कोटी लोकांना आपले दोन्ही हात समान पद्धतीने वापरता येतात. विविध खेळांमध्ये असे काही खेळाडू आहेत की जे आपले दोन्ही हात वापरतात. क्रिकेटमध्ये डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी तसेच उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने गोलंदाजी करणारे अनेक खेळाडू होऊन गेले. यापैकी बहुतांश खेळाडूंचा गोलंदाजीचा हातच सक्षम हात मानला जात होता. परंतु क्रिकेट विश्वात असेही काही गोलंदाज आहेत त्यांनी आपल्या दोन्ही हातांचा वापर करून गोलंदाजी केलेली आहे. 

भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यामध्ये श्रीलंकेचा गोलंदाज कमेंदू मेंडीस याने आपल्या दोन्ही हातांनी गोलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारे गोलंदाजी करणारा कदाचित तो पहिलाच गोलंदाज असावा. पाकिस्तानच्या देखील दोन गोलंदाजांना ही कला अवगत होती. प्रसिद्ध पंच अलीम दार हे दोन्ही हातांनी फिरकी गोलंदाजी करायचे. पाकिस्तानच्याच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळलेला यासीर जान हा एकमेव वेगवान गोलंदाज होता, जो डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हाताने वेगवान गोलंदाजी करू शकत होता. परंतु त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. 

 


Wednesday, July 31, 2024

फोटोप्रेम मधील प्रियदर्शिनी

“महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये लोकप्रिय असणारी पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणजेच प्रियदर्शनी इंदलकर. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फुलराणी’ चित्रपटासाठी तिला २०२४ मध्ये प्रदार्पण करणाऱ्या सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला होता. याशिवाय दैनिक सकाळचा नवीन चेहरा पुरस्कार देखील तिला याच वर्षी मिळाला. मध्यवर्ती भूमिका असणारा ‘फुलराणी’ हा तिचा पहिला चित्रपट असला तरी सन २०२१ मध्ये तिने एका मराठी चित्रपटांमध्ये अतिशय छोटी भूमिका पार पाडली होती. नीना कुलकर्णी अभिनित फोटोप्रेम या चित्रपटामध्ये एक ते दोन मिनिटांसाठी प्रियदर्शनी दिसून येते. नीना कुलकर्णी यांच्या तरुण वयातील भूमिकेत प्रियदर्शनी चित्रपटाच्या पडद्यावर वावरली आहे. कदाचित अतिशय कमी जणांना ही माहिती असावी. विशेष म्हणजे प्रियदर्शनीच्या विकिपीडिया पानावर देखील याविषयी कोणतीच माहिती लिहिलेली नाही. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
चित्रपटातील एक ते दोन मिनिटांच्या भूमिकेमध्ये देखील ती लक्षात राहते हे विशेष!


Monday, July 29, 2024

बालभारतीचे शि. द. फडणीस

९० च्या दशकात बालभारतीने छापलेली गणिताची पुस्तके विविधरंगी व्यंगचित्रांनी आणि निरनिराळ्या रेखाटनांनी भरलेली असायची. ती चित्रे पाहण्यात व त्यातून शिकण्यात एक वेगळीच मजा असायची. इयत्ता बदलली की नवीन पुस्तक हातात पडायचे. मग आम्ही ते पुस्तक पूर्ण चाळून त्यातील चित्रे अनुभवायचो. यातून फार गंमत वाटायची. आणि प्रत्यक्ष जेव्हा गणित शिकायला सुरुवात होत असे तेव्हा या चित्रांमधून गणित हा विषय अधिक जवळचा वाटायचा. त्यावेळेसच या चित्रांवर शि. द. फडणीस यांचे नाव मी वाचले होते. आज या चित्रकाराला शंभरी पूर्ण झाली तेव्हा आम्ही अभ्यासलेल्या त्या पुस्तकांचा काळ पुन्हा एकदा नव्याने जागृत झाला!

“गणिताची अशी पुस्तके जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही गणितज्ञ झालो असतो.” असं त्यावेळी जेष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांनी म्हटलं होतं. बालभारतीच्या पुस्तकांमध्ये विशेषतः गणित आणि विज्ञान या पुस्तकांमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच झाला. कदाचित त्या पिढीमध्ये तयार झालेल्या गणिताच्या गोडीला हीच चित्रे कारणीभूत असावीत. 

 





 


Sunday, July 28, 2024

तंत्रज्ञानाचा शाप

तंत्रज्ञान शाप की वरदान? अशा शीर्षकाचा निबंध बऱ्याच वेळा शाळेत असताना लिहिलेला आहे. त्यावेळी विचार करायचो की तंत्रज्ञानाचे नेमकी तोटे कोणते? खरंतर तंत्रज्ञान आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी सहाय्य करत असतं. मानवी आयुष्य सुसह्य आणि सुकर करत असतं. याच कारणास्तव त्याच्या तोट्यांकडे आपण सहज डोळेझाक करतो. आणि याच दुर्लक्षाचे दुष्परिणाम नक्की काय होतील, हे आपल्या ध्यानात येत नाही. 


मागच्या अनेक वर्षांमध्ये तंत्रज्ञानाचे असे अनेक तोटे आपल्याला अनुभवायला मिळाले. त्यातीलच ही एक बातमी. केवळ तंत्रज्ञानावरच विसंबून राहिल्यामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. बायोमेट्रिक पद्धतीने दरवाजांचे स्वयंचलन करणे, ही आजकाल बहुतांश ठिकाणची मुख्य प्रणाली आहे. परंतु समजा विद्युतप्रवाह खंडित झाला तर काय? या प्रश्नाचे उत्तर निर्माणकर्त्यांनी शोधले नसावे. आणि याच कारणास्तव आपल्याला दोन जीव गमवावे लागले. प्रत्येक गोष्टीचे जितके फायदे आहेत तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक तोटे देखील असतात. त्यावर आपण योग्य तो उपाय काढू शकतो. परंतु मानवी दुर्लक्षामुळे या उपायांकडे फारसे गांभीर्याने पहिले जात नाही. याची परिणीती मानवी हानीमध्ये होऊ शकते, हे दाखवणारी ही एक घटना. अजूनही कोणतेही तंत्रज्ञान बनवताना त्याच्या तोट्यांकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, असे वाटते.

- तुषार भ. कुटे.

Saturday, July 27, 2024

एक मार्गदर्शन

एका तंत्र शिक्षण कार्यक्रमामध्ये माझे प्रशिक्षण सुरू होते. जवळपास महिनाभराचा कार्यक्रम होता. बहुतांश विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसत होते. त्यातीलच एक विद्यार्थी सकाळी बरोबर वेळेवर वर्गात पोहोचायचा, अतिशय तन्मयतेने सर्व तासिकांना हजेरी लावायचा आणि दिलेला अभ्यास देखील वेळेवर पूर्ण करायचा.
एक दिवस दुपारी जेवणाची मधली सुट्टी झाली. मी बाहेर निघत असतानाच त्याने मला थांबवले आणि बोलू लागला,
“नमस्कार सर, मी तुमचं फेसबुक प्रोफाईल बघितलं.”
त्याच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलची उत्सुकता बघून मी देखील चमकलो. तो पुढे बोलू लागला,
“सर तुमच्या सगळ्या पोस्ट मराठी मधून असतात. खूप भारी वाटतं वाचायला. आपल्यातलंच कोणीतरी लिहिलेलं आहे असं वाटतं. इथं शिकवताना तुम्ही सर्वकाही इंग्रजीतून शिकवता. ते पण छान वाटतं आणि सर्वकाही समजतं. तुम्ही कोणत्या शाळेतून शिकला आहात सर?”
त्याच्या या प्रश्नाने माझ्या चेहऱ्यावर आपोआपच स्मित उमटले. आणि मी त्याला उत्तर दिले.
“अर्थातच मराठी शाळेत. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. आणि दहावीपर्यंत पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेलो आहे.”
“मग तुम्ही इतकं चांगलं इंग्रजी कसं बोलू शकता?”, त्याचा पुढचा प्रश्न.
“कसं आहे मित्रा… जर तुमचं तुमच्या मातृभाषेवर प्रभुत्व असेल तर तुम्ही इतर कोणतीही भाषा अतिशय सहजपणे शिकू शकता. माझंही असंच झालय. इंग्रजी शिकताना, बोलताना मी इतर कुठल्याही अन्य भाषेचा विचार केला नाही. किंवा पर्याय देखील शोधला नाही. बाहेरून आपल्या भागात आलेले लोक मराठी कसे बोलू शकतात? कारण त्यांनी जर मराठी ऐकली तरच हे शक्य आहे. तसेच मी देखील करतो. तुम्ही इंग्रजी ऐकली तरच तुम्ही ती बोलू शकता. आणि मातृभाषेतून शिकल्यामुळे मला कोणतीही गोष्ट अतिशय पटकन समजायला लागते. कदाचित याचमुळे मराठी इतकीच इंग्रजी देखील मला सहज जमत असावी.”
याशिवाय त्याला मार्गदर्शनपर इतर अनेक गोष्टी मी सांगितल्या. त्याला देखील त्या पटल्या. एक वेगळाच उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. शिवाय त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास माझी मदत झाली, याचे देखील मला समाधान लाभले. 

Friday, July 19, 2024

दोष

एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेतून संस्थेतील प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपला होता आणि त्यांचे कंपन्यांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह सुरू होते. एक दिवस असाच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एक विद्यार्थी मला संस्थेमध्ये भेटला. मी त्याला विचारले, 

“झाले का रे प्लेसमेंट?”

“नाही ना सर अजून.”

“अरे मी पण ऐकलंय की ८० टक्के मुलांचे प्लेसमेंट झालेले आहे.”

“सर ते सगळे साउथ आणि नॉर्थ इंडियन आहेत. तुम्हाला माहितीये ना त्यांची इंग्रजी किती भारी असते. म्हणून मिळाला त्यांना जॉब!”. मला त्याच्या या उत्तराचा राग आला. मी त्याला तात्काळ सुनावले.

“तू तर इंग्लिश मीडियमचा आहेस ना. मग काय प्रॉब्लेम झाला? आणि मुर्खा साउथ इंडियन लोकांचा कौतुक मला नको सांगू. जेव्हा इंग्रजी बोलायची वेळ येत होती तेव्हा तू हमरे-को तुमरे-को करत बोलत होता, हे पाहिलेय मी. त्या साउथ इंडियन लोकांसाठी त्यांची भाषा आणि इंग्रजी या दोनच भाषा महत्त्वाच्या. आणि नॉर्थ इंडियन साठी हिंदी आणि इंग्रजी या दोन. तुम्ही बसा हमरे-को तुमरे-कोला कवटाळून. आणि दोष इतरांना द्या.”


आजही जेव्हा इंग्रजी बोलायची वेळ येते तेव्हा मराठी मुले हमरे-को तुमरे-कोच्या भाषेला प्राधान्य देतात. आणि सरळ सरळ इंग्रजी बोलायचं टाळतात. खरंतर ही तिसरी भाषा आपल्यावर थोपवल्याने आपलं नुकसान तर झाले नाहीये ना, याचा विचार करण्याची वेळ आलीये. 


  • तुषार भ. कुटे.  


Thursday, July 18, 2024

लुझिंग लीना

जून-जुलै १९७३ चा काळ असेल. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक अलेक्झांडर सौचुक यांच्या सिग्नल आणि इमेज प्रोसेसिंगवर काम करणाऱ्या एका विद्यार्थ्याला आणि संगणक प्रयोगशाळा सहाय्यकाला त्यांच्या प्रयोगासाठी एक उत्तम इमेज अर्थात चित्र हवे होते. संगणकीय अल्गोरिदम इमेजेस वर अर्थात चित्रांवर व्यवस्थित चालतात की नाही हे पाहण्यासाठी त्यांना योग्य ते चित्र मिळत नव्हते. त्या काळात वापरण्यात आलेली ठेवणीतील चित्रे त्यांनी वापरून बघितली, परंतु त्यातून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय त्याच त्याच इमेजेस वापरून ते कंटाळले होते. त्यांना काहीशी वेगळी, डायनामिक, सुंदर अशी नवी कोरी इमेज हवी होती. या इमेजद्वारे ते आपल्या अल्गोरिथम नवीन शोधनिबंधामध्ये प्रकाशित करू इच्छित होते. आणि अचानक त्यांना अमेरिकेतील प्रसिद्ध ‘प्लेबॉय’ या नियतकालिकाच्या आतील पानांमध्ये मध्यभागी दोन पानांवर छापलेली एक इमेज दिसून आली. ती एका स्वीडिश मॉडेलची होती. तिचे नाव…  लीना फॉरसेन.

लीनाचे हे चित्र उभे आयताकृती आणि बऱ्यापैकी मोठे होते. परंतु त्यांनी या चित्राच्या चेहऱ्याकडचा चौरसाकृत भाग ५१२ * ५१२ अशा पिक्सल रिझोल्युशन मध्ये कापून घेतला आणि संगणकामध्ये RGB चॅनल्सचा वापर करून साठवून ठेवला. याच चित्राचा वापर करून त्यांनी आपले अल्गोरिथम शोधनिबंधामध्ये प्रकाशित केले. या शोधनिबंधाचा संदर्भ घेऊन पुढे हळूहळू  इमेज प्रोसेसिंगवर काम करणाऱ्या अन्य संशोधकांनी देखील या चित्राचा वापर करायला सुरुवात केली. अल्पावधीतच हे चित्र लोकप्रिय होऊ लागले. बहुतांश विद्यार्थी आणि संशोधक याच चित्राचा वापर करून इमेज प्रोसेसिंगचे अल्गोरिथम प्रकाशित करू लागले. याच विषयावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये देखील लिहिण्याच्या चित्राचा वापर होऊ लागला. प्रामुख्याने पुरुष संशोधकांचा वर्चस्व असणाऱ्या या क्षेत्रात पहिल्यांदाच एका स्त्रीच्या चित्राचा इमेज प्रोसेसिंगच्या अल्गोरिथमसाठी वापर करण्यात आला होता. १९९५ मध्ये संगणकामध्ये सर्वाधिक वेळा वापरण्यात येणाऱ्या चित्रांमध्ये या चित्राचा पहिला क्रमांक लागला. जेव्हा ‘प्लेबॉय’ या नियतकालिकाला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी कॉपीराईटचा दावा देखील दाखल केला. परंतु या चित्राची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर कालांतराने नियतकालिकाने हा दावा मागे देखील घेतला होता. १९९१ मध्ये ऑप्टिकल इंजिनिअरिंगच्या सर्वोत्तम जर्नलच्या मुखपृष्ठावर देखील लीनाचे चित्र झळकले. तिथून या चित्राची लोकप्रियता अधिक वाढीस लागली. IEEE या प्रख्यात संस्थेच्या जर्नलमध्ये सर्वप्रथम १९९९ मध्ये तीन वेगवेगळ्या शोधनिबंधात लीना या चित्राचा वापर करण्यात आला होता. इथून पुढे IEEE च्या इमेज प्रोसेसिंग वरील बहुतांश शोधनिबंधामध्ये याच चित्राचा वापर होत गेला. विशेष म्हणजे या चित्राची लोकप्रियता वाढल्यानंतर लीना फॉरसेन या स्वीडिश मॉडेलला देखील दोन वेगवेगळ्या संशोधन कार्यक्रमांमध्ये आमंत्रित देखील करण्यात आलं होतं. शिवाय त्यातील एका कॉन्फरन्समध्ये तिने भाषण देखील दिलं! IEEE च्या इमेज प्रोसेसिंग जर्नलचे मुख्य संपादक डेव्हिड मुन्सन यांच्यामध्ये लीनाच्या या चित्रामध्ये इमेज प्रोसेसिंग मध्ये काम करणाऱ्या संशोधकांना हवी असलेली सर्व माहिती मिळून जाते. म्हणूनच ‘संगणक दृष्टी’च्या या विश्वात या चित्राचे अनन्य साधारण महत्त्व आहे. 

लीनाच्या चित्राच्या वापरावरून अनेक संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये वाद देखील झाले. शिवाय या चित्राला पर्याय शोधण्याचे देखील प्रयत्न झाले.. अर्थातच हा बदल सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही दृष्टीतून योग्य असाच होता. सन २०१८ मध्ये नेचर नॅनोटेक्नॉलॉजी आणि ऑप्टिकल इंजीनियरिंग अशा दोन्ही जर्नलने जाहीर केले की इथून पुढे लीनाची इमेज ते वापरणार नाहीत. परंतु आजही लोकप्रियतेच्या बाबतीत या चित्राने गाठलेले विक्रम अन्य कोणतेही चित्र मोडू शकलेले नाही, हेही तितकेच सत्य आहे.

इमेज प्रोसेसिंगमध्ये वर्षानुवर्षे वापरण्यात येणाऱ्या अल्गोरिथममध्ये आजही ही इमेज तितक्याच प्रभावीपणे आपले निकाल दाखवते. सन २०१९ मध्ये ‘लुझिंग लीना’ नावाची एक डॉक्युमेंटरी देखील प्रकाशित झाली होती. त्यामध्ये म्हटले होते की ‘बऱ्याच वर्षांपूर्वीच मी मॉडेलिंग मधून निवृत्त झाले आहे, आता वेळ आहे तंत्रज्ञानातून देखील निवृत्त होण्याची!’ पण ही निवृत्ती अधिकृतपणे होण्यासाठी त्यांना पाच वर्षे जावी लागली.  

१ एप्रिल २०२४ मध्ये IEEE ने जाहीर केले की इथून पुढे कोणत्याही प्रकाशनामध्ये संशोधक लीनाची इमेज वापरू शकणार नाहीत. असे असले तरी इमेज प्रोसेसिंग क्षेत्रामध्ये लीनाने जी इमेज बनवली आहे, ती क्वचितच एखादी दुसरी इमेज स्वतः बनवू शकेल!

(लीनाचे मूळ छायाचित्र छायाचित्रकार ड्वाईट हूकर यांनी काढले आहे.)


  • तुषार भ. कुटे


(सोबतचे चित्र: लीना फॉरसेन तिच्या सुप्रसिद्ध छायाचित्रासह!)

 


 

Monday, July 1, 2024

द. आफ्रिकेचा पराभव

सामन्यातला शेवटचा चेंडू टाकला गेला आणि भारत विजयी झाला. याचबरोबर भारतीय आणि प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या डोळ्यात देखील अश्रू होते परंतु त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातला घास हिरावून भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. यावेळी पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाविषयी देखील भारतीयांना वाईट वाटून गेले. कारण यावेळेसचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान किंवा बांगलादेश सारखा माजोरडा आणि शत्रुत्व राखणारा नव्हता किंवा इंग्लंड अथवा ऑस्ट्रेलियासारखा उन्मादी देखील नव्हता. क्रिकेटचा जेंटलमन्स गेम हे नाव सार्थ करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा संघ होता.
मागच्या कित्येक वर्षांपासून मोक्याच्या क्षणी मान टाकणारा अर्थात चोकर्स म्हणून या संघाची अपख्याती होती. यावर्षी त्यांना त्यांच्यावरील हा डाग पुसण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांना विजय पताका फडकवता आली नाही. यावरून या संघाचे तसेच त्यांच्या सांघिक कामगिरीचे महत्त्व कमी होत नाही. भारतीय संघाप्रमाणेच त्यांनी देखील पूर्ण विश्वचषकात शंभर टक्के यश मिळवले. पण अंतिम क्षणी विजेता आणि उपविजेत्यामध्ये काही इंचाचेच अंतर राहून गेले.
दक्षिण आफ्रिका देखील पूर्ण सामन्यामध्ये विजेत्यासारखा खेळला परंतु त्यांना विजयी होत आले नाही. याचे संवेदनशील क्रिकेट रसिकांना देखील वाईट वाटून गेले. कारण या भावना नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीयांच्या देखील होत्या. त्यामुळे आपण त्यांचे दुःख निश्चितच समजू शकतो. एक उत्तम प्रतिस्पर्धी म्हणून दक्षिण आफ्रिका संघाचा भारतीय क्रिकेट रसिकांना निश्चितच आदर आहे. क्रिकेट या खेळाला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. विश्वचषकातील एका पराभवामुळे त्यांचे महत्त्व निश्चितच कमी होत नाही.
त्यांच्या आजवरच्या कामगिरीला मनापासून सलाम. त्यांच्या या पहिल्या अंतिम सामन्याच्या अनुभवातून बोध घेऊन ते पुढील विश्वचषकात याहीपेक्षा चांगली कामगिरी ते करतील, अशी आशा करूयात.



Sunday, May 26, 2024

CNNs (Convolutional Neural Networks) कसे कार्य करतात?

डीप लर्निंगमधील CNNs (Convolutional Neural Networks) कसे कार्य करतात याचे एक विलक्षण प्रात्यक्षिक!
हा व्हिडिओ दर्शवितो की प्रतिमा लहान करणे म्हणजे नेहमीच महत्त्वाचे तपशील गमावणे असा होत नाही. हे लक्षात घ्या की प्रतिमा खूपच लहान असूनही, आपण स्पष्टपणे पाहू शकतो की या चित्रामध्ये कुत्रा आहे!
याचा अर्थ जर सुरुवातीच्या प्रतिमेच्या फक्त २५% भागामध्ये ती काय आहे, हे शोधण्यासाठी पुरेशी माहिती असेल तर आपण फक्त त्या भागावर लक्ष केंद्रित करू शकतो. अशा प्रकारे, आपल्याला CNN मध्ये संपूर्ण प्रतिमेसह कार्य करण्याची गरज नाही, ज्यामुळे गोष्टी अधिक सोप्या आणि जलद होतात.


(संकलित)


 

कोणत्याही क्षेत्रातील सर्जनशीलतेची शक्ती

➡️ नवकल्पनांना प्रोत्साहन:
सर्जनशीलता नवीन कल्पना तसेच समस्यांवर उपाय सुचवते.
ती व्यवसायांना स्पर्धात्मक बाजारपेठांमध्ये पुढे राहण्यास मदत करते.

➡️ समस्या चुटकीसरशी सोडवते:
सर्जनशील विचारांना अद्वितीय दृष्टीकोन देते.
ती आव्हानांचे संधीत रूपांतर करते.

➡️ उत्पादकता वाढवते:
"आउट-ऑफ-द-बॉक्स" विचारांना प्रोत्साहन देते.
कार्यक्षमता आणि उत्पादकता वृद्धिंगत करते.

➡️ अनुकूलता वाढवते:
सर्जनशीलता बदल सहजतेने करण्यात मदत करते.
तसेच कार्यात लवचिकता तयार करते.

➡️ सहयोग सुधारते:
विविध कल्पना आणि संघशक्तीला प्रोत्साहन देते.
अधिक समृद्ध, आणि अधिक प्रभावी परिणामांकडे नेते.

➡️ वैयक्तिक वाढीस चालना देते:
सतत शिकण्यास आणि विकासाला प्रोत्साहन देते.
तसेच आपल्याला सतत उत्सुक आणि प्रेरित ठेवते.

तुमचे कार्य आणि जीवन बदलण्यासाठी सर्जनशीलतेची शक्ती स्वीकारा! 🚀

(संकलित)


 

🚀 वैद्यकीय क्षेत्राचे भविष्य: हेड ट्रान्सप्लांट आणि एआयचा वापर! 🧠

अशा जगाची कल्पना करा जिथे डोके प्रत्यारोपण ही केवळ साय-फाय संकल्पना नसून एक वैद्यकीय वास्तव आहे! एमआयटी न्यूजनुसार, भविष्यात हे शक्य होऊ शकते! हे जितके महत्त्वाचे वाटते तितकेच, अशा वैद्यकीय सीमांना पार करण्यात एआय ची भूमिका निश्चितच सर्वात महत्वाची असणार आहे.
सर्जिकल प्लॅनिंग, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि पोस्टऑपरेटिव्ह केअरमध्ये एआय ची अचूकता ही भविष्यातील असे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. न्यूरल नेटवर्क सिम्युलेशनपासून रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रियांपर्यंत, एआय आणि मानवी नवकल्पना यांचा समन्वय अभूतपूर्व वैद्यकीय प्रगतीचा मार्ग मोकळा करत आहे, असं दिसतं!

संदर्भ: एमआयटी न्यूज.


 

Sunday, May 19, 2024

स्टॅटिस्टिक्स

स्टॅटिस्टिक्स अर्थात सांख्यिकी म्हणजेच संख्याशास्त्राचा अभ्यासक्रमामध्ये शालेय जीवनात अथवा महाविद्यालयीन जीवनामध्ये माझा कधीही संबंध आला नाही. जवळपास १० ते १२ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा मशीन लर्निंग शिकायला आणि शिकवायला सुरुवात केली तेव्हा संख्याशास्त्राची खऱ्या अर्थाने मला स्वतःला गरज भासू लागली. स्टॅटिस्टिक्स हे केवळ नावच ऐकले होते आणि असेही ऐकून होतो की ती गणिताचीच एक शाखा आहे. आज दशकभरामध्ये या विषयातील सर्व संकल्पना नक्की काय आहेत? त्यांचा व्यवहारिक जीवनामध्ये काय उपयोग होतो? याची व्यवस्थित माहिती झाली आहे
कदाचित डेटा सायन्स या विषयाला हात घातल्यामुळे संख्याशास्त्र कोळून प्यायची सवय झालेली आहे. डेटा सायन्स मुळेच संख्याशास्त्राचीही मला ओळख झाली. गणिताचाच एक भाग वाटत असला तरी व्यवहारिक पद्धतीने संख्यांचा उपयोग कशा पद्धतीने होतो हे संख्याशास्त्र आपल्याला सांगते. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर करून, इंग्रजी पुस्तके वाचून तसेच विविध लेखकांनी लिहिलेले ब्लॉग वाचून मी संख्याशास्त्र शिकत गेलो आणि याच कारणास्तव डेटा सायन्स अधिक उत्तमरीत्या समजायला लागले. गणित तसं पाहिलं तर अवघड नाही परंतु त्याचा व्यवहारीक उपयोग लक्षात आला तरच ते ध्यानात राहते हे समजले. गणितापेक्षा संख्याशास्त्र अधिक सुलभ आहे. या विषयावर आधारित माझ्या पाहण्यात तरी एकही मराठी पुस्तक उपलब्ध नव्हते.
अच्युत गोडबोले आणि डॉ. अमिता धर्माधिकारी यांनी लिहिलेले “स्टॅटिस्टिक्स” हे पुस्तक जेव्हा हाती लागले तेव्हा लगेचच भराभरा ते वाचून काढले. एका अर्थाने ही माझ्यासाठी उजळणीच होती. मला या संकल्पना नव्याने माझ्या भाषेतून वाचायला मिळाल्या. केवळ एवढेच नाही तर संख्याशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना आणखी व्यवस्थित समजल्या. जसे एवरेज आणि मीन मधील फरक, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशनचा उपयोग.
प्रोबॅबिलिटीचा आणि संख्याशास्त्राचा लोकसंख्याशास्त्र आणि विमा विज्ञानामध्ये असणारे उपयोग, याशिवाय भारतीय संख्या शास्त्रज्ञांची माहिती आणि विशेष म्हणजे या विषयातील कोडी, दिशाभूल आणि गमतीजमती या गोष्टी मला नव्याने या पुस्तकाद्वारे समजल्या. तसं पाहिलं तर कोणताही तांत्रिक विषय मराठीतून मांडणं अतिशय अवघड आहे. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तरीदेखील लेखक द्वयीनी संख्याशास्त्राचा सखोल ऊहापोह आणि अभ्यास या पुस्तकाद्वारे केल्याचे दिसते. काही संकल्पना नवशिक्यांना समजण्यासाठी अवघड आहेत. अर्थात त्यांचा व्यवहारिक उपयोग दर्शवून दिल्यास त्या आणखी व्यवस्थित समजू शकतील असे वाटते. प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ही संकल्पना अजूनही अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना फारशी लवकर समजत नाही. तसेच त्याचे व्यवहारिक उपयोग देखील ध्यानात येत नाहीत. खरंतर प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स साठी हे अतिशय उपयुक्त तत्व आहे. त्याची मांडणी आणखीन व्यवस्थितपणे व्हायला हवी असं वाटून जातं. बाकी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स ते इनफरन्शियल स्टॅटिस्टिक्स ची इत्यंभूत माहिती आपल्याला या पुस्तकाद्वारे वाचायला मिळते. शिवाय बहुतांश संकल्पनांचा इतिहास देखील लेखकांनी यामध्ये दिला असल्याने ती अधिक रंजक वाटते. संख्याशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी हे पुस्तक म्हणजे एक उत्तम संदर्भ ग्रंथ होईल असेच आहे.
या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे यातील दिलेली उदाहरणे. या उदाहरणाद्वारे संख्याशास्त्राचा व्यवहारिक उपयोग कसा करता येतो, किंबहुना अनेक प्रश्नांची उकल संख्याशास्त्राद्वारेच कशी करता येते याची माहिती वाचकांना होते. अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात इंग्रजी शब्दांचा भरणा दिसून आला. त्यातील  बऱ्याचशा शब्दांना उत्तम मराठी प्रतिशब्द आहेत. त्यांचा वापर करता आला असता. जसे सिस्टीम= प्रणाली, रूल= नियम, मेथड= पद्धती, एक्सपेरिमेंट= प्रयोग, प्रोबॅबिलिटी= संभाव्यता, सिलेक्शन= निवड, मार्क्स= गुण, एवरेज= सरासरी, रेट=दर, रॉ=कच्चा/अपरिपक्व, नंबर=क्रमांक, फॉर्म्युला= सूत्र, डायमेन्शन= मिती, अनालिसिस=विश्लेषण, टेक्निक= तंत्र, टेस्ट= चाचणी, थियरम= प्रमेय, टेबल= तक्ता/सारणी, इंजीनियरिंग= अभियांत्रिकी, प्रॉडक्ट= उत्पादन, ड्रॉईंग=आकृत्या इत्यादी.
लोकसंख्याशास्त्र, जीवनसारणी आणि विमाविज्ञानाविषयीचे  प्रकरण आणि गोळाबेरीज नावाचे प्रकरण हे प्रत्येक संख्याशास्त्रज्ञाला माहित असावे असेच आहे. एकंदरीत आज सर्वाधिक नोकरीच्या संधी ज्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत त्या डेटा सायन्सला शिकण्यापूर्वी संख्याशास्त्राचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करेल. 

- तुषार भ. कुटे



Sunday, May 5, 2024

उत्तर कोरिया: जगाला पडलेलं एक कोडं

उत्तर कोरिया म्हणजे जगातील सर्वात गुढ देश होय. अर्थात अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला न जुमानणारा देश कसा असेल? याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. शिवाय सातत्याने विविध प्रसंगी उत्तर कोरियातील प्रशासन व्यवस्थेविषयी तसेच तिथल्या राजकीय व्यवस्थेविषयी बातम्या प्रसारित होतच असतात. त्यातून असं लक्षात येतं की उत्तर कोरिया म्हणजे एक स्वतःचे वेगळे विश्व आहे. हे विश्व नक्की कसं तयार झालं? आणि इथली माणसं अशा विचित्र विश्वामध्ये कशा पद्धतीने राहतात? याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे, या सर्वांचं उत्तर देणार हे पुस्तक म्हणजे "उत्तर कोरिया: जगाला पडलेलं एक कोडं".
कोरियाच्या इतिहासाची सुरुवात होते ती जपानी आक्रमणापासून. जपानने अनेक वर्ष इथल्या लोकांना गुलामगिरीखाली वागवलं. परंतु कालांतराने या देशाच्या विचारधारेमुळे त्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन तुकडे झाले. १०० वर्षांपूर्वीच्या कोरियामध्ये उत्तर भाग हा अधिक समृद्ध तर दक्षिण भाग हा गरीब होता. पण उत्तर कोरियाने हळूहळू हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल चालू केली. एखाद्या देशामध्ये हुकूमशाही नक्की कशी सुरू होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर कोरिया होय! जर्मनीमध्ये एकेकाळी असणारी हिटलर प्रणित हुकूमशाही आणि आज उत्तर कोरिया मध्ये असणारी एकाच घराण्याची हुकूमशाही यात काहीसा फरक असला तरी फलित मात्र एकच आहे. लोकशाहीपेक्षा हुकूमशाही बरी हे जेव्हा एखाद्या देशाची जनता स्वतः मानू लागते तेव्हाच ते हळूहळू वैचारिक गुलाम होत जातात आणि राजेशाही नसली तरी विशिष्ट घराण्याला आपलं मानून त्यांचे नियमच शिरसावंद्य मानले जातात. स्वातंत्र्य म्हणजे काय, याचा अर्थ देखील ते समजून घेत नाहीत. एका डबक्यातल्या बेडकासारखी त्यांची अवस्था होते. बाहेरच्या जगात काय चाललंय, हे देखील त्यांना माहीत नसतं. अशीच काहीशी अवस्था उत्तर कोरियन नागरिकांची आहे. याचे विस्तृत विवेचन या पुस्तकाद्वारे लेखक अतुल कहाते यांनी अतिशय उत्तमरीत्या केलेले आहे.


 

Wednesday, May 1, 2024

नाच गं घुमा

ठाण्यातल्या उच्चभ्रू रहिवासी भागामध्ये राहणारे त्रिकोणी कुटुंब. यातील राजा आणि राणी अर्थात नवरा आणि बायको दोघेही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉबला आहेत. आणि त्यांची मुलगी शाळेमध्ये शिकतेय. अर्थात याच कारणास्तव त्यांच्या घरी घरकाम करण्यासाठी कामवाली बाई आहे.

त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सात वाजल्यापासून. घरातली सर्वच कामे कामवाली बाई अर्थात आशाताई अगदी तन्मयतेने करतेय. दिवसातील बारा तास वेळ ती या घरात घालवते. अर्थात घराची सर्वच जबाबदारी तीच्याकडेच आहे.  बहुतांश वेळा ती कामाला उशिरा पोहोचते. त्यामुळेच एक दिवस वैतागून राणी आशाताईला कामावरून काढून टाकते. आणि दुसरी बाई शोधायला लागते. पण तिला हवी तशी बाई मिळत नाही. मग पुन्हा आशाताईला कामावर बोलावले जाते. परत काही दिवसांनी एका घटनेमुळे तिला काम सोडावे लागते. यानंतर मात्र राणीची फारच पंचाईत व्हायला लागते. आशाताई आपल्यासाठी काय काय करू शकतात, किंबहुना काय करतायेत? याची जाणीव तिला व्हायला लागते. यातूनच राणी आणि आशाताई यांच्यातील भावनिक बंध समोर येतो आणि कथा संपते.

ही गोष्ट साधी सरळ वाटली तरी आज शहरात राहणाऱ्या अनेक मध्यम तसेच उच्चमध्यमवर्गीय घरातील जवळपास अर्ध्याअधिक कुटुंबांची तरी आहे. घर सांभाळण्यासाठी घरातील ‘त्या’ दोघांव्यतिरिक्त आणखी कोणीतरी असायला हवे हे अधोरेखित करणारी ही कहाणी आहे.

मराठीमध्ये आजवर आई-वडील, आई-मुलगा, वडील-मुलगी, बहीण-भाऊ सारख्या जवळपास प्रत्येक नात्यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट होऊन गेले. परंतु घरमालकिन आणि कामवाली बाई यांच्यातील बंध दाखवणारा कदाचित हा पहिलाच चित्रपट असावा. ही गोष्ट दिग्दर्शकाने विनोदी ढंगाने सादर केलेली आहे. परंतु शेवटाकडे जाता जाता ती भावनिक वाट पादाक्रांत करते. खरंतर हीच कथेची मुख्य गरज होती. ज्यामुळेच चित्रपट पूर्णत्वास जातो. घरातील एकूण वातावरण, दोघांच्याही ऑफिसमधील वातावरण, आजूबाजूची परिस्थिती आणि घडणाऱ्या घटना या शहरातील प्रत्येकाला आपल्याशा किंबहुना आपल्या अवतीभवतीच घडणाऱ्या आहेत, असं वाटतं. चित्रपटातील प्रत्येक पात्र त्यांच्या भूमिकेशी समरस झाल्याचं देखील दिसतं. म्हणून ही गोष्ट मनाला भावते.

या चित्रपटांमध्ये दोन ‘घुमा’ आहेत. यातील पहिली घुमा अर्थात राणीची भूमिका मुक्ता बर्वेने छान साकारलेली आहे. तर दुसरी घुमा जिला आपण या चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र म्हणू तिची अर्थात आशाताईची भूमिका नम्रता संभेरावने अतिशय उत्कृष्टपणे साकारलेली दिसते. कदाचित ही भूमिका तिच्यासाठीच लिहिली गेली असावी, हेही दिसून येतं. तिच्यासारखी चतुरस्त्र अभिनेत्री कोणतीही भूमिका अतिशय उत्तमपणे निभावू शकते. पूर्ण चित्रपटामध्ये सर्वप्रथम तिचीच भूमिका खरोखर लक्षात राहते. ‘वाळवी’ या परेश मोकाशी यांच्या आधीच्या चित्रपटामध्ये देखील अतिशय छोट्या भूमिकेमध्ये नम्रताने आपली छाप पाडली होती. कदाचित याचमुळे तिला या चित्रपटामध्ये मोठी भूमिका मिळाली असावी. तिने या संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लाखो मराठी प्रेक्षकांना नम्रता ज्ञात आहेच. पण या चित्रपटातून तिने तिच्यातील कसलेली अभिनेत्री मराठी प्रेक्षकांना पुन:श्च दिसून येते.

एकंदरीत चित्रपट एकदाच नाही तर पुन्हा-पुन्हा पहावा असाच आहे. परेश मोकाशी यांचा चित्रपट म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. हा चित्रपट देखील त्याला अपवाद नाही. 

 


 


Friday, April 19, 2024

काळाच्या संदर्भात

काळ अर्थात टाईम म्हणजे विज्ञानाला अजूनही सखोलपणे न समजलेली गोष्ट. आम्हाला वेळ कळते, असं म्हणणारी माणसं देखील काळाबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. याच काळावर आधारित लेखक बाळ फोंडके यांनी लिहिलेले आणि नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले हे पुस्तक, “काळाच्या संदर्भात”.
बाळ फोंडके म्हणतात, काळाला सुरुवात व शेवटही नाही याची जाणीव होते तेव्हा तो गूढ, अतिवास्तववादी रूप धारण करतो. तो शाश्वत आहे. तो उलट्या दिशेने प्रवाहित होऊ शकणार नाही, यासाठी गणितशास्त्त्राप्रमाणे जरी काही कारण नसलं तरी त्याचा प्रवाह एकाच दिशेने भूतकाळातून भविष्याकडे आहे. ही विवेक शून्यता कमी होती म्हणून की काय अल्बर्ट आईन्स्टाईनने अधिकृतपणे जाहीर केलं की काळ ही अशी चौथी मिती आहे. ज्यात विश्वाचं अस्तित्व आहे जी स्थळापासून विभक्त होऊ शकत नाही. शिवाय काळ स्वायत्त नसतो, पण तो निरीक्षकाच्या संदर्भ चौकटीवर अवलंबून असतो.
विश्वामध्ये बिग बँगपासून काळाची सुरुवात झाली असं म्हणतात. याच कारणास्तव जीवसृष्टी एका सुसूत्रतेमध्ये बांधलेली दिसते. आपण आपल्यापुरता लोकल टाईमचा विचार करतो. परंतु टाईम ही संज्ञा विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय सखोल अभ्यास करण्यासारखी आहे. माणसाने आपल्या सोयीसाठी कालगणना तयार केली. परंतु ती तयार करत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय अनेक गणित मांडावी लागली. त्यातील अचूकता टिकून राहावी म्हणून बऱ्याच उपाययोजनाही करावे लागल्या. यामुळे काळामध्ये अनेक अगम्य वैशिष्ट्ये तयार झालेली दिसतात. या सर्वांचा आढावा बाळ फोंडके यांनी या पुस्तकातून घेतलेला आहे. काल विभाजन कसे केले जाते? लीप वर्ष, लीप सेकंद म्हणजे काय? सेकंद, दिवस, रात्र नक्की काय असतात? अधिक महिना म्हणजे काय? दशमान वेळ, आठवडा, दिनदर्शिका, घड्याळ, सूर्यतबकड्या, पाणघड्याळ यांचा काळाशी नक्की काय संदर्भ आहे? काळाच्या विषयी आईन्स्टाईन तसेच स्टीफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञांचे नक्की काय म्हणणे होते? क्वार्टझ घड्याळ, आण्विक घड्याळ नक्की कशी बनवली जातात? चौथी मिती आणि गुरुत्वाकर्षण यांचा काय संबंध आहे? भूत आणि भविष्य सापेक्ष आहेत का? कालबाण, जीवाश्म, रेडिओकार्बन, कालक्षेत्र यांचा नक्की अर्थ काय? जेट लॅग काय असतो? सहस्त्रक म्हणजे नक्की काय? अशा ५० हून अधिक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाद्वारे आपल्याला मिळतात. त्यामुळेच काळाचा एकंदरीत विस्तृत आवाका ध्यानात यायला देखील मदत होते. काही गोष्टी आपल्या कल्पनेच्या पलीकडील आहेत. परंतु त्या सुटसुटीतपणे लेखकाने या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्या सर्व गोष्टी रूप आहेत. विक्रम आणि वेताळ यांच्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. याच विक्रम-वेताळाच्या प्रश्नोत्तरांच्या गोष्टींशी सांगड घालून लेखकाने हे पुस्तक लिहिलेले आहे. वेताळ प्रश्न विचारतो आणि विक्रम त्याची ससंदर्भ आणि शास्त्रीय उत्तरे देतो. अशा प्रकारची या पुस्तकाची रचना आहे. हे गोष्टी रूप विज्ञान ऐकताना आपली उत्सुकता टिकून राहते आणि वाचायला देखील आनंद मिळतो.
मूळ इंग्रजीत असणारे हे पुस्तक सुहासिनी अग्निहोत्री यांनी मराठीमध्ये भाषांतरित केलेले आहे.


Sunday, April 14, 2024

चीप - अतुल कहाते

विसावं शतक हे संगणक अर्थात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीचं शतक होतं. या क्रांतीने आज वापरात असलेली बहुतांश इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि उपकरणे जन्माला घातली. तंत्रज्ञानाचा वेग वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. एकविसाव्या शतकातील संगणकीय तंत्रज्ञान याच इलेक्ट्रॉनिक क्रांतीवर आधारलेला दिसतं.
मागील शतकातील या महत्त्वपूर्ण क्रांतीने संगणकाच्या मेंदूला अर्थात मायक्रोप्रोसेसरला जन्म दिला. आज वापरात येणाऱ्या संगणकासह इतर सर्व महत्त्वपूर्ण उपकरणांमध्ये मायक्रोप्रोसेसर चीपचा प्रामुख्याने समावेश असतो. अर्थात आजच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा तो मेंदूच आहे, असे म्हणावे लागेल. आज वेगाने प्रगत होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा पाया देखील मागील शतकातील मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञानाने घातला होता. या प्रोसेसरच्या अर्थात चीपच्या प्रगतीचा आढावा घेणारं हे पुस्तक म्हणजे लेखक अतुल कहाते यांचं 'चीप'.
या पुस्तकाद्वारे डिजिटल इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये मागील शतकभरामध्ये घडलेल्या क्रांतीचा विस्तृत आढावा घेण्यात आलेला आहे. आज तंत्रज्ञानाची चाके याच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा आधार घेऊन वेगाने पळताना दिसत आहेत. ही क्रांती घडत असताना अनेक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी आपल्या बुद्धीचा उपयोग करून विविध संकल्पना जन्माला घातल्या. अनेक समस्यांची उकल त्यांनी करून दिली. याच कारणास्तव संगणकीय कार्यभाग सहजतेने व वेगाने व्हायला सुरुवात झाली. आज आपण वापरत असणाऱ्या जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये प्रोसेसरचा अर्थात चिपचा समावेश असतो. तिचा इतिहास रंजकपणे या पुस्तकात मांडण्यात आलेला आहे.
आज अस्तित्वात असणाऱ्या एकंदरीत इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये सर्वात गुंतागुंतीचे आणि किचकट असणारे हे उपकरण आहे. ज्याशिवाय आपला संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि अन्य स्मार्ट उपकरणे चालू शकत नाहीत. याची आजवरची प्रगती सदर पुस्तकांमधून आपल्याला वाचायला मिळते. अनेक तंत्रज्ञांची मेहनत अनुभवायला मिळते. अर्थातच नव्या पिढीच्या संगणक तंत्रज्ञांना ती प्रेरणा देणारी अशीच आहे!


 

Sunday, April 7, 2024

गणिती

गणित म्हणजे अनेकांचा डोक्याबाहेरचा अर्थात नावडता विषय. माझ्या बाबतीत सांगायचं तर शालेय जीवनामध्ये गणित मला कधी कठीण वाटलं नाही. दहावीला सुद्धा १५० पैकी १४२ गुण मला या विषयात मिळाले होते. परंतु या गणिताचे रूपांतर जेव्हा “मॅथेमॅटिक्स”मध्ये झालं त्यानंतर आमची आकलनक्षमता कमी होत गेली. अर्थात हे गणित आम्हाला व्यवहारिक गणित म्हणून समजलं नाही.
डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला असताना माझा वर्गात दुसरा क्रमांक आला होता. या परीक्षेतील अभियांत्रिकी गणितामध्ये मला १०० पैकी केवळ ५० गुण मिळाले होते तर पहिल्या क्रमांकावरील आमच्या मित्राला १०० पैकी १०० गुण होते! एकंदरीत अभियांत्रिकीच्या सहाही वर्षांमध्ये जवळपास सारखीच परिस्थिती राहिली. गणिताचा आणि आमचा अनेकदा संबंध आला पण तो केवळ पास होण्यापुरता!
तसं पाहिलं तर गणित हाच विश्वाचा पाया आहे. प्रत्येक गोष्ट ही गणिताशी अतिशय घट्टपणे जोडलेली आहे. किंबहुना गणिताशिवाय जगाचे पान देखील हलणार नाही, अशी परिस्थिती आहे. पण हे गणित व्यवहारांमध्ये नक्की कशा पद्धतीने वापरले जाते, याची माहिती आपल्याला होत नाही. म्हणजे गणित शिकवतानाच त्याचा व्यवहारांमध्ये नक्की कुठे कसा उपयोग होतो, हेच आपल्याला समजत नाही. किंबहुना समजावले जात नाही. म्हणूनच गणित अवघड वाटते.
मी देखील त्यातीलच एक होतो. परंतु जवळपास दहा वर्षांपूर्वी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केल्यापासून हळूहळू मला गणित आणि त्याचा व्यवहारातील उपयोग समजायला लागला. कोणते सूत्र, समीकरण कुठल्या ठिकाणी वापरायचे याची माहिती व्हायला लागली. परंतु त्याची खोली अजूनही फारशी जास्त नव्हती. आजही मला उच्च दर्जाचे गणित माहिती आहे हे मी खात्रीने सांगू शकत नाही. एकंदरीतच गणित हा प्रत्येकासाठीच गुढ, किचकट आणि मेंदूला ताण देणारा विषय आहे.
गणित या विषयाशी संदर्भ असणारी खूप कमी पुस्तके मराठीमध्ये लिहिली गेलेली आहेत. परंतु या सर्वांमधील सर्वोत्तम पुस्तक म्हणजे अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूर देसाई लिखित “गणिती” होय. गणिताचा उगम कशा पद्धतीने झाला आणि त्याची मागील हजारो वर्षांची प्रगती कशी होती, याची इत्यंभूत माहिती रोचक आणि रोमांचक घटनांद्वारे लेखकद्वयींनी या पुस्तकामध्ये विस्तृतपणे मांडलेली आहे. तुम्हाला गणित आवडो अथवा न आवडो हे पुस्तक निश्चित एक उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करेल.
जगाने ही गोष्ट स्वीकारलेलीच आहे की, शून्य या संकल्पनेचा जनक भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांनी लावला. कोणतीही गोष्ट शून्यापासून सुरुवात होते. म्हणजेच भारतीयांनीच गणिताची सुरुवात केली, असं म्हणायला हरकत नाही! परंतु भारतीयांव्यतिरिक्त दोन हजार वर्षांपूर्वी मेंदुने आणि संस्कृतीने प्रगत असणाऱ्या अनेक देशांनी गणिताच्या प्रगतीमध्ये बहुमूल्य असा हातभार लावलेला आहे. त्याची सुरुवात ग्रीक गणितज्ञांपासून होते. युक्लीड, पायथागोरस सारख्या गणितज्ञांनी खऱ्या अर्थाने गणिताचा पाया समृद्ध केला. अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि बीजभूमिती सारख्या गणिती शाखांचा दोन हजार वर्षांपूर्वी उगम झाला. त्यामध्ये अनेक महान गणितज्ञांचा बहुमूल्य वाटा होता. गणिताच्या आधारे अनेक सूत्रे आणि समीकरणे रचली गेली. विचारवंतांचे मेंदू पणाला लागले. अनेक गूढ प्रश्नांची उकल करण्यासाठी गणिती समीकरणे उदयास आली. यात भारतीय तसेच बहुतांशी युरोपीय गणितज्ञांचा भला मोठा वाटा दिसून येतो.
गणिताचा अभ्यास करत असताना वापरली गेलेली अनेक सूत्रे संकल्पना आणि समीकरणे ज्या गणितज्ञांच्या नावाने आहेत ते सर्व या पुस्तकातून मला भेटले. नेपियर आणि लॉगॅरिथम, देकार्तची बीजभूमिती, फर्माची प्रमेये, बायनॉमियल थियरम आणि कॅल्क्युलसचा शोध लावणारा सर आयझॅक न्यूटन, कॅल्क्युलेटरच्या प्रगतीमध्ये मोलाची भर घालणारा पास्कल, लेबनीट्स, बर्नोली यांचे गणिती घराणं, लँगरज, लाप्लास, गाऊस, बंडखोर गणितज्ञ गॅल्व्हा, रिमान, हार्डी पॉइनकरे, कॅण्टर, न्यूमन, नॅश यासारखे अनेक गणितज्ञ या पुस्तकातून आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात.
बहुतांश गणितज्ञ हे त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय सामान्य बुद्धीचे होते. कदाचित त्यावेळी त्यांना त्यांच्या मेंदूची प्रतिभा लक्षात आलेली नसावी. परंतु आपल्या सुगीच्या काळामध्ये त्यांनी गणिती विश्वात अतिशय बहुमूल्य कामगिरी करून दाखवली. काही गणितज्ञ अतिशय कमी वयाचे देखील होते. परंतु इतक्या कमी कालावधीमध्ये देखील त्यांनी गणिती विश्व समृद्ध केले. विज्ञानाला पडणाऱ्या कोड्यांची उकल गणितज्ञांनी आपल्या उच्च बुद्धिमत्तेचा वापर करून केलेली दिसते. विशेष म्हणजे मागील हजार वर्षांमधील बहुतांश गणितज्ञ हे फ्रान्स, जर्मनी आणि रशिया याच तीन प्रमुख देशांमध्ये जन्मलेले दिसतात. यामध्ये अमेरिकी वंशाचा एकही नाही. न्युटन आणि जॉर्ज बुली वगळला तर एकही इंग्लिश देखील नाही.
अंकगणितापासून सुरू झालेला प्रवास आजच्या आधुनिक गणितातील टोपोलॉजी, सेट थियरी, गेम थिअरी, बुलियन अल्जेब्रा, सॅटिस्टिक्स अर्थात सांख्यिकी, प्रॉबाबिलिटी अर्थात संभाव्यताशास्त्र आणि लॉजिक अर्थात तर्कशास्त्रापर्यंत पोहोचल्याचा दिसतो. गणितातील प्रत्येक शाखेचा अंतर्भाव या पुस्तकामध्ये अतिशय विस्तृतरित्या केलेला आहे. काही संकल्पना ज्या इंग्रजीमध्ये समजायला अवघड जातात, त्यांचे विस्तृत विश्लेषण आपल्याला वाचायला मिळते.
गणिताचे विश्वदेखील गणितातील इन्फिनिटी या संकल्पनेप्रमाणेच अमर्याद आहे, याची प्रचिती या पुस्तकाद्वारे होते. कोणत्याही संकल्पनेचा प्रवास कधीच थांबत नाही. गणिताचे देखील तसंच आहे. अनेक गणितज्ञांनी त्यांच्या ज्ञानाने गणितीविश्व समृद्ध केलेले आहे. त्याचाच वापर करून पुढील गणितज्ञ याच गणिताला पुढच्या पातळीवर घेऊन चाललेले आहेत. आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये गणित हा प्रमुख पाया मानला जातो. यात टिकून राहायचं असेल तर गणिती संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांचा व्यवहारिक उपयोग शोधता आला पाहिजे. तरच मानवी अर्थात नैसर्गिक बुद्धिमत्ता संगणकामध्ये आपल्याला गणिती संकल्पनांचा वापर करून अंतर्भूत करता येईल.
गणिताची भीती घालवणारे तसेच त्याच्या रोमांचक प्रवासाची सफर घडवून आणणारे हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचायलाच हवं.


- तुषार भ. कुटे
जुन्नर, पुणे.