Tuesday, March 31, 2020

मोरू आणि मैना

चि.वि. जोशींनी सत्तर एक वर्षांपूर्वी बाल मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली. विविध बालपात्राद्वारे त्यांना मुलांना छान छान गोष्टी सांगितल्या. त्यातीलच एक बालजोडी म्हणजे मोरू आणि मैना होय. या दोन्ही बहीण-भावांच्या बालकरामती त्यांनी "मोरू आणि मैना" या पुस्तकात रंगवल्या आहेत. अगदी बालसुलभ पद्धतीने मांडलेल्या गोष्टी कधी हसवितात तर कधी उपदेशाचे डोस पाजत असतात. त्यांची वाघाबरोबरची भेट, झालेली नजरानजर, दोघांचीही गुजरात भ्रमंती, तिथल्या गमतीजमती, मोरूची हास्यउपचार पद्धती व त्याने लिहिलेला उपसंहार इत्यादी विविध गोष्टी या पुस्तकात वाचण्यासारख्या आहेत. 

Sunday, March 29, 2020

सोळा आणे

'सोळा आणे' हा चि.वि. जोशींचा १६ कथांचा कथासंग्रह. १६ गोष्टींमुळे त्यांनी ह्या संग्रहात 'सोळा आणे' हे नाव दिलं आहे, हे वेगळे सांगणे नको! सर्वसामान्य जीवनात घडणाऱ्या विविध छोट्या छोट्या घटनांना अशाप्रकारे विनोदी अंगे असू शकतात, हे या कथांमधून जाणवते. यातील काही कथा लेखकाने विद्यार्थीदशेत असताना लिहिल्या आहेत. त्यामुळे युवा वयापासूनच त्यांच्या अंगात विनोदीपणा भरला आहे, हे यातून निश्चितच दिसून येते. काही कथा ३-४ पानात संपतील अशा लघुकथा आहेत. त्यामुळे मित्र श्रेणीतील हा कथासंग्रह निश्चितच चेहऱ्यावर हसू आणणारा आहे.


Saturday, March 28, 2020

शिवछत्रपती: एक मागोवा

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडेल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली? शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते? या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते? तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते? याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल.


Friday, March 27, 2020

निळावंती

मराठी भाषेतील एक गूढ पुस्तक म्हणजे 'निळावंती' होय. याच नावाचे पुस्तक निसर्ग लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिले आहे. त्याच्या जुन्या पुस्तकाशी तसा काही संबंध नाही. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या विविध नियतकालिकात प्रकाशित झालेल्या कथांचा व लेखांचा संग्रह होय. आपल्या सहजसुंदर भाषेत त्यांनी निसर्गाला शब्दबद्ध केले आहे. मुंग्या, कोल्हा, कीटक, रानउंद्रे, तांबट, मोर अशा पक्षी-प्राणी सृष्टीची एक वेगळी ओळख या पुस्तकातून होते. शेवटचे दोन लेख "पक्ष्यांपासून माणसाला काय शिकता येईल?" व "जंगल: आपला मित्र" हे प्रत्येकाने वाचावे, असेच आहेत. निसर्ग लेखकाची खरी दृष्टी या लेखनातून दिसून येते. मानवा इतकंच प्राणी-पक्ष्यांचे व निसर्गाचे जग अद्भुत आहे, हेच मारुती चितमपल्ली या छोटेखानी पुस्तकातून दर्शवतात. या पुस्तकाचे एक पान सोबत जोडले आहे ते नक्की वाचा.
Thursday, March 26, 2020

फार फार वर्षांपूर्वी

फार वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे लाखो व कोटी वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका गोष्टीत रहस्य आहे, गुढ आहे, विज्ञान आहे, संशोधन आहे शिवाय उत्तरही आहेत. निरंजन घाटे यांचे हे पुस्तक अशाच लाखो-करोडो वर्षांपासून पडलेल्या विविध प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे आपल्याला देतं. निरंजन घाटे हे हाडाचे विज्ञानलेखक. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहीलेले सर्वच लेख आपल्याला मानववंशशास्त्र, पुराणवास्तुशास्त्र, हवामान शास्त्र व इतिहासाची माहिती करून देतात. पृथ्वीचा इतिहास हा करोडो वर्षांचा असला तरी बहुतांशी तो फक्त मागील दोन हजार वर्षांचाच पुस्तकात मांडलेला दिसतो. परंतु, तत्पूर्वी मनुष्य जीवन कसे होते? व त्यांनी प्रगतीची पावले कशी पुढे टाकली? याचे वर्णन निरंजन घाटे यांनी या पुस्तकात केले आहे. मानववंशशास्त्र व पुरातनवास्तूशास्त्र या विज्ञानशाखा किती सखोल आहे, त्याची प्रचिती हे पुस्तक देतं. संशोधन कसं करावं व त्याला किती विविध पैलू असू शकतात? या प्रश्नांची उत्तरेही आपल्याला विविध घटनांतून मिळतात. पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना याठिकाणी मांडत आहे.
 • पुरातन काळी मनुष्य हा मांसाहारी, शाकाहारी होता की प्रेताहरी? याचं सप्रमा स्पष्टीकरण त्यांनी या पुस्तकात दिलं आहे.
 • आदिमानवाचा शेती विषयक, पर्यावरण विषयक, आरोग्यविषयक प्रवास कशा प्रकारे झाला?
 • समुद्रात शेकडो मैलांवर असणाऱ्या इस्टर आयलँड वरील पुतळ्यांचं गूढ काय?
 • चंद्रावती नावाचं अतिसुंदर शहर भारतात होतं. परंतु परकीय आक्रमकांनी त्याची नासधूस करून विद्रूप करून टाकलं.
 • उत्खननात सापडलेली हाडे ही मानवशास्त्रात अभ्यास करण्यासाठी सर्वात मोठा पुरावा मानले जातात. त्यांचे महत्त्व व रोमांचकारी इतिहास इथे मांडला आहे.
 • चिली व दक्षिण अमेरिकेत अनेक प्राचीन कलाकृती आहेत. माया संस्कृतीत बनवलेल्या या कलाकृतींचे रहस्य काय?
 • ऑस्ट्रेलियातील डायनासोर्स संशोधन.
 • डायनासोर, ट्रायनोसॉर म्हणजे काय?
 • चीनमधल्या ड्रॅगनच्या हाडांच्या शोधामागचा रोमांचकारी प्रवास.
 • युरोपातल्या प्राचीन अटलांटिस शहराच्या समृद्धीतेची वर्णने आजही केली जातात. ते पाण्याच्या तळाशी स्थित आहे.
 • वृक्षवर्तुळावरून वृक्षांचे वय व त्या काळची हवामान स्थिती ओळखण्याची अचूक शास्त्र.
 • व्हिएतनाम, कंबोडिया मध्ये एकेकाळी हिंदू राजे राज्य करीत होते. परंतु परकीय आक्रमकांमुळे त्यांची संस्कृती लयास गेली. आजही त्यांच्या सांस्कृतिक पाऊलखुणा दोन्ही देशात सापडतात.
 • मानवशास्त्रज्ञ डग्लस औसली यांनी आजवर सर्वाधिक अचूकतेने या विज्ञानाचा वापर करून दाखवला आहे.
 • रेण्विक पुरानशास्त्र म्हणजे काय? त्याचा वापर कसा करता येतो?
 • आदिमाता अर्थात आपल्या सर्वांच्या एकमेव मातेचा शोध कसा घेतला गेला याची कहाणी.
 • आपण सारे होमोसेपियन एकाच आईची लेकरे आहोत. पण आज लाख वर्षानंतर आपापसात कितीतरी भेदभाव तयार झालेत.
 • आफ्रिके पासून अलिप्त असणाऱ्या अमेरिका खंडात मानव पोहोचला कसा? याचे शास्त्रीय उत्तर.
अशा विविध प्रकारची माहिती व त्याची उत्तरे निरंजन घाटे यांनी या पुस्तकात दिली आहेत. पारंपरिक इतिहास व विज्ञानापलीकडे जाऊन वाचण्यासारखे हे निश्चितच वेगळे पुस्तक आहे.


Wednesday, March 25, 2020

ओसाडवाडीचे देव

ओसाडवाडी नावाचं सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात एक गाव असतं. इथले लोक अवली आहेतच. देवही जागृत असतात. मारुती, गणपती, नवलाई सटवाई आणि महादेव हे ओसाडवाडीचे मुख्य दैवत. सर्वच जागृत देव भक्तांच्या हाकेला लगेच ओ देत असतात. याच पार्श्वभूमीवर रंगवलेला चि. वि. जोशी यांचा हा कथासंग्रह होय. पु.लंची बटाट्याची चाळ, द.मां.ची भोकरवाडी, निलेश साबळेची थुक्रटवाडी तशीच ही चि.विं.ची ओसाडवाडी होय! विशेष म्हणजे ओसाडवाडीचा त्यांचा हा पूर्ण कथासंग्रह देवांच्या विविध करामतींनी रंगलेला आहे. भक्तांच्या हाकेला ओ देऊन सर्व देव आपल्या अंगातली ताकद दाखवतात व त्यातूनच बऱ्याच गमतीजमती तयार होत असतात. कधी हनुमान सर्कशीचे खेळ दाखवतो, कधी शिपायी होतो, कधी वाईसाठी बॅटिंग करतो तर कधी पुण्यातल्या आपल्या भाऊबंदांना भेटून येतो. हीच परिस्थिती गजाननाची आणि त्याच्या उंदीर मामाची आहे. १९४६ झाली प्रसिद्ध झालेला हा कथासंग्रह आजही तितकाच हसविणारा आहे.


Tuesday, March 24, 2020

शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?

महाराष्ट्रात असे फार क्वचितच इतिहासकार असतील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिले नाही. शिवरायांवर लिहिलेल्या हजारो  पुस्तकांपैकी हेही एक छोटेखानी पुस्तक. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. खरतर शिवचरित्रापासून या अगणित गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्या एका पुस्तकातून मांडणं केवळ अशक्य आहे. जयसिंगराव पवारांनी त्यांच्या लेखमालेतून शिवचरित्रातील काही अंग इतिहासकाराच्या नजरेतून उलगडून दाखवले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी व अभ्यासकांसाठी हे निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल. मराठा इतिहासाचे ज्येष्ठ संशोधक प्रा. न.र. फाटक म्हणाले होते इतिहासाला चार मुख्य शत्रू असतात, ते म्हणजे नाटककार, कादंबरीकार, सिनेमावाले व राजकारणी लोक! त्यांच्या काळात टीव्ही नव्हता अन्यथा पाचव्या शत्रूचीही त्यात भर पडली असती. त्यांचे म्हणणे मात्र शंभर टक्के खरे आहे. खरा इतिहास जाणून घेणाऱ्यांनी या पाच शत्रुंपासून दूर राहायला हवे. 


डॉ. पवारांनी शिवचरित्राचे काही महत्त्वपूर्ण पैलू या पुस्तकातून सादर केले आहेत ते इथे नमूद करू इच्छितो.
 1. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. परंतु ते केवळ हिंदूंचेच राजे होते का? इस्लामी जनतेविषयी त्यांचा दृष्टिकोन कसा होता? या प्रश्नांची उत्तरे इतिहासकारांच्या नजरेतून आपल्याला मिळतात.
 2. शिवरायांना रयतेचा राजा मानले जात. इतर बादशहा प्रमाणे त्यांची त्यांनी स्वतःलाच रयतेचा राजा मानले नव्हते. तर रयतेने त्यांना खर्‍या अर्थाने राजा म्हणून स्वीकारले होते. हे ऐतिहासिक पुराव्यांतून डॉ. पवारांनी सिद्ध केले आहे.
 3. शिवछत्रपती हे मराठा आरमाराचे किंबहुना भारतीय आरमाराचे खरे जनक होय. सागरावर राज्य प्रस्थापित करणे किती महत्त्वाचे आहे, हे ते जाणून होते. इतिहासाच्या पुस्तकात नसणाऱ्या विविध आरमार मोहिमांची माहिती या पुस्तकातून होते. शिवाय स्वतः आरमाराच्या गलबलातून प्रवास करून मोहीम फत्ते करणारे शिवाजी महाराज हे पहिले व शेवटचे मराठी राजे होत!
 4. सुरतेच्या हल्ल्याच्यावेळी शिवाजी महाराजांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात सापडेल. शिवाय सुरतेच्या दोन्ही छाप्यांव्यतिरिक्त त्यांनी इतरही अनेक मुघलांच्या समृद्ध बाजारपेठांवर सातत्याने हल्ले केले होते. त्याचा सारांश या पुस्तकात उपलब्ध आहे.
 5. शिवराज्याभिषेक ही इतिहासातील एक मोठी घटना होती. त्यासाठी त्यांना किती दिव्ये पार पाडावी लागली होती. अनेक शतकांनंतर इस्लामी राजवटीत असलेल्या भारतात एक हिंदुराजा सार्वभौम छत्रपती झाला होता.
 6. छत्रपतींचे व इंग्रजांचे एकंदरीत राजकीय संबंध कसे होते? यावरील डॉ. पवारांचा तपशीलवार लेख आहे. इतिहासातील अनेक अज्ञात गोष्टी या माध्यमातून अभ्यासकांना निश्चितच समजतील. शिवाय सिद्धी, पोर्तुगीज, डच या पश्चिमेकडून आलेल्या अन्य परकीय शक्तींचा शिवाजी महाराजांनी कसा सामना व वापर केला याचीही माहिती या पुस्तकात आहे.
 7. शिवरायांच्या सर्व सेनानीपैकी हंबीरराव मोहिते हे असे सेनापती होते, ज्यांनी स्वराज्याच्या पहिल्या दोन्ही छत्रपतींची कारकीर्द प्रत्येकी सात वर्षे पाहिली. त्याबद्दलही इतिहासात बरीच कमी माहिती सापडते. त्यांनी ठरवले असते तर आज इतिहास वेगळा असला असता. परंतु स्वराज्य निष्ठावंत असणाऱ्या हंबीररावांनी खंबीरपणे राज्याची सेवा केली अनेक मोहिमांमध्ये विशेषत: संभाजीमहाराजांच्या काळात त्यांनी शत्रूला नामोहरम करून सोडले होते. कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेतले होते. त्यांच्यावरील सर्वात विस्तृत लेख या पुस्तकात सापडतो. तो निश्चितच वाचनीय आहे.
 8. शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमांची माहिती आजही सर्वसामान्य शिव अभ्यासकांना नाही. तंजावर, जिंजीची स्वारी, व्यंकोजी बरोबरचे युद्ध व वाटाघाटी यासंबंधी बरीचशी माहिती डॉ. पवारांनी त्यांच्या लेखांतून दिली आहे.
एकंदरीतच शिवाजी महाराजांच्या नीतीकौशल्याची, युद्धकौशल्याची व राज्यकौशल्याची तपशीलवार आढावा घेणारे काम हे पुस्तक निश्चित करते यात शंका नाही.

Friday, March 20, 2020

बोरी बाभळी : चि. वि. जोशी

विनोदी कथालेखक ही चि. वि. जोशी यांचा हा वेगळा कथासंग्रह होय. यात केवळ विनोदीच नाही तर काही विचार करायला लावणाऱ्या वैचारिक कथा देखील आहेत. छोट्या छोट्या प्रसंगांना विनोदी अंगाने सादर करण्याची जोशी यांची कला याही कथासंग्रहात दिसून येते. शिवाय भीषण भिकारी, गतवैभवाचे ठसे यांसारख्या कथांमधून त्यांनी काही वेगळे विषयी उत्तमरीत्या हाताळण्याचे दिसते.

Thursday, March 19, 2020

देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर!

'देव' या संकल्पनेभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना, विचारधारणा व धार्मिक समजुती जगात ज्ञात आहेत. शिवाय यावर आजवर अनेक तत्त्वज्ञांनी व लेखकांनी प्रकाशझोत टाकणारी पुस्तके लिहीलेली आहेत. अशाच एका वेगळ्या वाटेवरचे पुस्तक म्हणजे बाळ भागवत यांचे 'देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर' हे पुस्तक होय! पुस्तकाच्या नावावरूनच त्यात कोणत्या प्रकारचे विवेचन असावे, याची कल्पना येते. परंतु, देव हे परग्रहावरचे अंतराळवीर असू शकतात का? हा प्रश्न मात्र उत्सुकता वाढवणारा आहे. देवाच्या संकल्पनेला विज्ञान व इतिहासाच्या माध्यमातून सादर करण्याचा उत्तम प्रयोग बाळ भागवत यांनी या पुस्तकातून केला आहे. प्राचीन काळापासून म्हणजे अगदी दहा ते बारा हजार वर्षांपासून देव हे पृथ्वीवर नांदत आहेत. परंतु, देव मानायचे कुणाला? काही मोठा प्रश्न पडतो. सर्वसामान्यपणे सांगायचं तर सामान्य माणसांपेक्षा अधिक शक्तिशाली व बलवान असणारा मनुष्य म्हणजे देव होय. असे आपण म्हणू शकतो. याच विचारावर सदर पुस्तकाची पूर्ण प्रगती आहे. प्राचीन काळापासून नांदत असलेल्या अमेरिका, आशिया व आफ्रिका खंडातील विविध संस्कृतींचा अभ्यास करून विविध निष्कर्ष लेखकांनी या पुस्तकात नमूद केले आहेत. आज आपल्या अस्तित्वाच्या व प्रगतीच्या केवळ पाउलखुणा सोडून गेलेल्या माया, सुमेरियन व ईजिप्शियन संस्कृतींना विज्ञान तंत्रज्ञानाचे ज्ञान हजारो वर्षांपासून होते. त्यांच्या पाऊलखुणांमधून लेखकाने काढलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या ते पूर्णतः पटणारे वाटतात. त्यातूनच त्यांनी देवाचं अस्तित्व सिद्ध केलं आहे. आपल्यासारखे जीवनसृष्टी असणारे हजारो ग्रह आपल्या विश्वात असतील तर त्यांनी अजून आपल्याशी संपर्क साधला नसावा का? असेल तर तो कशा पद्धतीने? या प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे बाळ भागवत देतात. दक्षिण अमेरिकेत एकेकाळी नांदत असलेले प्राचीन माया संस्कृती आजच्या विज्ञानाइतकी प्रगती होती का? जगाला विविध शास्त्रांचे ज्ञान देणारी सुमेरियन संस्कृती अचानक नाहीशी का झाली? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जगाच्या विविध देशांतील दंतकथा व पुराणकथांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून त्यातील निष्कर्ष शोधण्याचाही प्रयत्न केला आहे. आजही ईस्टर आयलंड असो वा ईजिप्तचे पिरॅमिड्स यापैकी कशाचीही १००% उत्तरे कुणालाही देता आलेली नाहीत. परग्रहवासीयांनी संपर्क साधण्याचे आजवर किती शास्त्रज्ञांनी व कसे प्रयत्न केले? याची साराभर माहिती या पुस्तकात मिळते.
शास्त्रीय विचार कसा करावा? या प्रश्नाचे उत्तर हे फक्त निश्चितच देईल. एकंदरीतच देव हाही इतिहास विज्ञानाचा एक भाग आहे हे सिद्ध करण्याची क्षमता आजही मानवप्राण्यात आहे, हे त्या पुस्तकाचे एकूण सार होय.


Wednesday, March 18, 2020

काही वृद्ध काही तरुण

मानवी भावविश्वाचा विविध भावनांचा वेध घेणारा कथासंग्रह म्हणजे 'काही वृद्ध काही तरुण' होय. शिरवाडकरांच्या या कथासंग्रहात एकूण नऊ कथा आहेत. माणसांच्या मनाचे अंतरंग उलगडण्याचे काम त्यांनी या कथांमधून केले आहे. लेखकाचं भाषेवरील प्रभुत्व कथा वाचताना वाचकाला खिळवून ठेवते, हे त्या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य होय. पहिल्यांदाच त्यांच्या कथासंग्रहाला शीर्षकाच्या नावाची कथा आढळली नाही, हेही पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल!

Saturday, March 14, 2020

ओंजळधारा

जी. ए. कुलकर्णी यांचा मी वाचलेला हा पहिलाच कथासंग्रह. 'आधारित कथा' असे उपशीर्षक या पुस्तकाला देण्यात आले आहे. सर्वच कथा या 'परिकथा' या प्रकारात मोडणाऱ्या आहेत. मराठीतल्या 'फॅन्टसी' प्रकारात मोडणारे हे साहित्य मानता येईल. प्रत्येक कथेचा वेग मात्र प्रचंड आहे. कुठेही पाल्हाळ न लावता सहज समजणाऱ्या व सुटसुटीत कथा हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. एकूण बारा कथा या पुस्तकात आहेत. काही कथांवर पूर्ण चित्रपट तयार होईल इतपत त्या दीर्घ आहेत. पहिल्याच कथेत अर्थात 'तीन सोनेरी केस' या कथेने 'जी. एं'च्या लेखन कौशल्याची चुणूक आम्ही अनुभवली. परिकथेची आवड असणार्‍यांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे.Tuesday, March 10, 2020

प्रेम आणि मांजर

वि. वा. शिरवाडकर यांच्या विनोदी बुद्धीने सजलेला व रंगलेला कथांचा संग्रह म्हणजे 'प्रेम आणि मांजर' होय. या पुस्तकात सर्वच कथा या विनोदी आहेत. केवळ सात कथांमधून शिरवाडकरांनी हलक्या-फुलक्या नाटिका सादर केलेल्या आहेत. मराठी विनोदी परंपरेत शिरवाडकरांचे नाव निश्चित उच्च दर्जाचे असल्याचे सर्व कथांमधून प्रतीत होतं.


Monday, March 9, 2020

वृक्षवाढीचा वेग मंदावतोय!

जगप्रसिद्ध इकॉलॉजी जर्नलने अमेझॉन जंगलातल्या पुनर्वाढीचा वेग अपेक्षेपेक्षा अत्यंत मोठ्या प्रमाणात मंदावल्याचे निरीक्षण नोंदविल्याचे प्रसिद्ध केले आहे. मानवाकडून सतत निसर्गाचा व नैसर्गिक संपत्तीचा होणारा अशा प्रकारचा ऱ्हास सातत्याने समोर येतोय. विविध निसर्गतज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच पर्यावरणतज्ञ अनेक वर्षांपासून जी निरीक्षण नोंदवत आहेत, त्यातून अत्यल्प गोष्टी सकारात्मक आढळून येत आहेत. बहुतांश गोष्टी या नकारात्मकच असल्याचे दिसते. मागच्या काही दशकांपासून मानव प्राण्याने प्रगतीच्या नावाखाली चालू केलेला ऱ्हास हा पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या ऱ्हासाकडे चालू असल्याचे दिसते. इकॉलॉजीचे अमेझॉनच्या जंगलासंबंधीचे निरीक्षण हे जगातील इतर जंगलांना ही जवळपास समानच लागू होते. वृक्षाच्छादित जमिनीचे क्षेत्र मागच्या अनेक दशकांपासून कमी होत चाललंय. प्रगतीच्या नावाखाली होणारी निसर्गाची अपरिमित हानी निसर्गाचा समतोल ढासळत आहे. याचे परिणाम निश्चितच येणाऱ्या काही पिढ्यांना भोगावे लागतील. जमिनीचे हरितकरन, तापमान बदल, हवामान बदल यामुळे मानवी जीवनशैलीही बदलत चालली आहे. अर्थात परिस्थिती आणखी प्रतिकूलतेने कडे झुकत आहे, हेच या सर्वांमधून प्रतीत होते. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच पावले वेगाने उचलणे गरजेचे आहे. परंतु, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापुर्वी हे सर्व उपाय योजले तरच योग्य ठरेल!

वडे

वेळ: फेब्रुवारी २०२० मधील एक दिवस (शनिवार-रविवार वगळता)
स्थळ हिंजवडी आयटी पार्क मधील एक गजबजलेला चौक

संध्याकाळच्या वेळेस हिंजवडीतुन स्वतःची गाडी चालवत बाहेर पडणं म्हणजे सर्वात मोठे दिव्य! असे दिव्य पार करत एका चौकात आलो. एका छोट्याश्या हॉटेलात दोन तरुण काय खावे? याबद्दल चर्चा करत होते. बहुदा त्यातला पहिला तरुण मराठी व दुसरा तमिळ असावा.
"भाऊ काय खाणार तू?", पहिल्याने दुसऱ्याच विचारले.
"कुछ भी चलेगा." -दुसरा
"वडापाव खाणार?"
"वुई साउथ इंडियन डोन्ट इट ऑईली थिंग्स!", दुसऱ्याने किळसवाणे तोंड करून उत्तर दिले.
"मग ते भोक-भोकाचे वडे काय पाण्यात तळून खाता काय?",
पहिल्याने केलेल्या या प्रतिप्रश्नावर दुसरा निरुत्तर झाला व जबरदस्तीने हास्य तोंडावर आणू लागला.


Friday, March 6, 2020

हू इज सावित्रीबाई फुले?

दिनांक १४ फेब्रुवारी २०२० अर्थात व्हॅलेन्टाईन्स डे.
स्थळ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुख्य प्रवेश द्वार.

पुणे शहरातील सर्वात रहदारी असणाऱ्या ठिकाणांपैकी हे एक ठिकाण होय. कमीत कमी दोन ते तीन वेळा सिग्नल हिरवा होतो तेव्हा कुठे आपला क्रमांक लागतो हा सिग्नल पार करण्यासाठी! त्यादिवशी असेच दिव्य पार करत सिग्नलला झेब्रा क्रॉसिंग पर्यंत पोहोचलो. डाव्या बाजूला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी चार मुली सजून-धजून गप्पा मारत उभे असलेल्या दिसल्या. बोलण्यावरून परप्रांतातल्या वाटल्या. बहुतेक व्हॅलेन्टाईन्स डे च्या निमित्ताने त्यांच्या व्हॅलेंटाईन ची वाट बघत असाव्यात असे वाटले! २०-२२ व्या वर्षी युवापिढीच्या ज्या गप्पा मारते, त्याच गप्पांचा फड तिथे रंगला होता. एकीला कुणाचा तरी फोन आला व तिने तिचा ठावठिकाणा समोरच्याला सांगण्यासाठी आजूबाजूला पाहिले, तर समोर विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडले. तिनेही त्यावरील नाव पूर्ण वाचून समोरच्या सांगितले व फोन बंद केला. ते ऐकल्यावर एकीने अत्यंत कुतूहलाने पहिलीला विचारले,
"हे! हू इस दिस सावित्रीबाई फुले?"
हे ऐकताच मीही चमकलो. तोच सिग्नल हिरवा झाला व आम्हाला पुढे जावे लागले. परंतु, एखाद्या भारतीय स्त्रीला असा प्रश्न का पडावा? हा प्रश्न आमच्याही मनात घोळत राहिला. व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत असताना आपण कोणत्या गोष्टी विसरत चाललोय, याचे भान कदाचित आजच्या पिढीला नसावे. ज्या स्त्रीने समाज प्रवाहाच्या विरोधात जाऊन भारतीय स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला तिच्याबद्दल स्त्रियांनाच माहिती नसावी, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?


Tuesday, March 3, 2020

लिफ्ट

स्थळ: पुण्यातील एक अभियांत्रिकी महाविद्यालय
 
पहिल्या मजल्यावरील काम संपून सातव्या मजल्यावर जायचं होतं म्हणून लिफ्टच्या दरवाज्यासमोर मी लिफ्ट खाली येण्याची वाट पाहत होतो. अर्थात लिफ्टचे वर जाण्याचे बटन दाबले होते. तेवढ्यात एकजण आला व त्याने खाली जाण्याचं बटन दाबलं. पहिल्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी हा लिफ्ट वापरणार म्हणून मीही त्याच्याकडे कुतूहलाने पाहिले व विचारलं,
"तळमजल्यावर जायचं का?"
"नाही सिक्स्थ फ्लोअरला!" तो उत्तरला. 
"मग खालचं बटन का दाबलं?"
"लिफ्टला खाली आणण्यासाठी!"
मनातल्या मनात खुदकन हसवणारे उत्तर होते हे.
लिफ्ट आली आणि आम्ही आत गेलो. मग मी त्याला समजावून सांगितलं, "बाहेरची बटनं लिफ्ट कुठे न्यायची याच्यासाठी नसतात. आपल्याला कुठे जायचे? याच्यासाठी असतात".
"पण आली ना लिफ्ट खाली!"
त्याच्या या बोलण्यावर पुढे काय बोलावं, हे मला सुचेना. मी मात्र पु.ल.देशपांडे व द. मा. मिरासदार यांच्या कोणत्या पात्रात माझ्या लिफ्टमधील हे पात्र योग्यरीत्या बसेल, याचा विचार करत बसलो.