Sunday, February 27, 2022

मराठी गौरव आणि आपलं योगदान

आज जागतिक मराठी भाषा गौरव दिन. मागच्या काही वर्षांपासून आपण हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायला लागलो आहोत. यामागचे निश्चित कारण माहिती नाही परंतु आपल्या भाषेविषयी लोकांमध्ये जनजागृती होत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपल्या भाषेचा गौरव करताना दिसतात. परंतु त्याच भाषेसाठी व तिच्या वृद्धीसाठी आपला कितपत हातभार असतो? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळताना दिसत नाही. किंबहुना आपल्या कृतीमधून देखील या प्रश्नाचे उत्तर मराठी माणसांना देता येत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. आपल्या भाषेची वृद्धी व्हावी यासाठी दैनंदिन जीवनातील अनेक ठिकाणी तिचा वापर होणे तसेच तिचा प्रसार करणे महत्त्वाचे असते. परंतु मराठी माणूस अश्याच बहुतांश विषयांत प्रमाणात नापास झालेला दिसतो.

सार्वजनिक ठिकाणची मराठी

महाराष्ट्राची राज्यभाषा तसेच सर्वसामान्य वापरामध्ये येणारी भाषाही मराठी आहे. परंतु मागच्या काही वर्षांपासून बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या वेगाने वाढताना दिसते आहे. महाराष्ट्र हे एक समृद्ध राज्य आहे. तसेच सहिष्णू देखील आहे. 'अतिथी देवो भव' या उक्तीचा तंतोतंत आत्मसात करणारे राज्य आहे. याचाच फायदा करून घेण्यासाठी परप्रांतीयांची महाराष्ट्रामध्ये संख्या वाढते आहे. स्वतःला राष्ट्रभाषा म्हणून घेणाऱ्या भाषिकांची संख्या एकेकाळी एक आकडी टक्क्यांमध्ये होती. ती आज दोन आकडी झालेली आहे. एका अर्थाने हे मराठी भाषिकांवरील अतिक्रमण नाही का? हाही प्रश्न पडतो. खरंतर आपणच 'अतिसहिष्णू' प्रकारांमध्ये गणले जायला लागलो आहोत. अगदी मुंबईचे उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राच्या या राजधानीमध्ये सार्वजनिक जीवनात चोरून बोलली जाणारी भाषा ही मराठी आहे! अगदी मराठी माणूस देखील छातीठोकपणे सार्वजनिक ठिकाणी मराठीमध्ये बोलताना दिसत नाहीये. ही शोकांतिका केवळ आपल्याच नाकर्तेपणामुळे आलेली आहे. हळूहळू हे लोण महाराष्ट्रातील अन्य शहरात देखील पसरायला सुरुवात झालेली आहे. इथला मराठी माणूस मराठी बोलण्याचे नाकारतो. समोरच्याच्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करतो. असं असेल तर आपल्या भाषेची आपल्याच राज्यांमध्ये प्रगती कशी होणार? हा मोठा प्रश्न आहे. अगदीच महाराष्ट्रामध्ये एखादी मुस्लीम अथवा शीख पेहराव केलेला व्यक्ती जरी दिसली तरी मराठी माणूस त्याच्याशी थेट हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतो. म्हणजे त्याने मनाशी ठरवलेच असते की, समोरच्याला मराठी समजणार नाही! याच कारणामुळे परप्रांतीय लोक इथली भाषा शिकत नाहीत. मात्र आपल्याला त्यांच्या भाषेत बोलायला लावतात. लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. पण मराठी माणसाच्या अतिसहिष्णू वृत्तीमुळे ती लवकरच अधोगतीकडे जाईल असे दिसते! ग्रामीण भागात देखील उत्तरेकडून आलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढते आहे. उत्तर भारतातील राजकीय नाकर्तेपणाचा त्रास महाराष्ट्रीय जनतेला होतो आहे. शिवाय ग्रामीण लोक देखील या लोकांशी हिंदीतच बोलण्याचा प्रयत्न करतात. जणू काही आपण कुठलीतरी आंतरराष्ट्रीय भाषा बोलत आहोत आणि आपणच सर्वज्ञानी आहोत, असं अनेकांना सूचित करायचं असतं. यातून परप्रांतीय भाषांचा उदोउदो केला जातो आणि आपोआपच आपली भाषा देखील मागे पडते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. मागच्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोंढे येतच आहेत. परंतु तत्कालीन जनतेमुळे त्यातील बहुतांश लोकांनी मराठी भाषा आत्मसात केल्याचे दिसते. सद्यस्थितीला मात्र असे जाणवत नाही. ही निश्चितच धोक्याची घंटा आहे. स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून घेणारे अनेक पक्षही हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून पुढे आणतात. यामुळेच अन्य भारतीय भाषा अधोगतीकडे वाटचाल करीत आहेत.
पुढील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र द्विभाषिक राज्य म्हणून उदयास आले तर आश्चर्य वाटायला नको!


मराठी शाळा

आज महाराष्ट्रातील राष्ट्रीय सर्वोच्च स्थानी विराजमान असलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी मराठी भाषेतूनच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांच्यासाठी मातृभाषेतून प्रगतीची द्वारे उघडली गेली. परंतु मागच्या दशकभरापासून शालेय शिक्षणामध्ये इंग्रजीने अतिक्रमण केल्याचे दिसते. इंग्रजी म्हणजे प्रगती हे जरी खरे असले तरीही आपले मूल तीन वर्षाचे झाल्यापासूनच त्याच्यावर इंग्रजीचा भडीमार करणे मात्र पूर्णतः चुकीचे आहे. भाषा तज्ञांच्या म्हणण्यानुसार मातृभाषेतील शिक्षणाचे सर्वोत्तम असते. परंतु आजच्या नव्या पालकांना याच्याशी काही घेणेदेणे नसल्याचे दिसते. मराठीला डावलून मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा तयार होत आहेत. त्यातून इंग्रजीतून रट्टा मारून बाहेर पडणाऱ्या पिढ्या तयार होत आहेत. त्यामुळे आपोआपच आपल्या भाषेचा देखील ऱ्हास होताना दिसतो. महाराष्ट्र सरकार एकीकडे दुकानांवरील पाट्या मराठीमध्ये करण्याची सक्ती करते आहे. परंतु दुसरीकडे इंग्रजी शाळांना प्रोत्साहन देऊन मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. सरकारमधील अति शिकलेले व 'हाय-फाय' इंग्रजीतून शिक्षण घेतलेले काही मंत्री सर्व शालेय शिक्षण इंग्रजीमध्ये करण्याच्या मागे लागलेले आहेत. एकीकडे राजकीय फायद्यासाठी मराठीचा उदो उदो करायचा आणि दुसरीकडे मराठी शाळांवर हातोडा चालवायचा, अशी दुटप्पी वृत्ती आज सरकारांमध्ये दिसून येते. मराठी शाळा टिकल्या नाहीत तर मराठी भाषेची वृद्धी होणार नाही. म्हणूनच मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळा मजबूत व्हायला हव्यात.

मराठी साहित्य

भाषेला समृद्ध करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषेतील साहित्य होय. मराठीमध्ये गेल्या पन्नास वर्षांमध्ये अनेक अप्रतिम साहित्यिक कलाकृती तयार झाल्या. अनेक साहित्यिकांनी म्हणजेच लेखक आणि कवींनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या अनेक कलाकृती यासाहित्यामध्ये मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जातात. परंतु मागील काही वर्षांमध्ये मराठी भाषेची साहित्यिक जडणघडण मंदावताना दिसत आहे. कदाचित साहित्यक्षेत्राला कमी दर्जा दिल्यामुळे तसेच वाचनसंस्कृती कमी झाल्यामुळे हे होत असावे, असे वाटते. म्हणजेच मराठी लोक मराठी वाचनाला प्राधान्य देत नाहीत. जर वाचकांची संख्या वाढलीच नाही तर दर्जेदार साहित्य कसे तयार होणार? साहित्याचा दर्जा वाढवायचा असल्यास वाचकांची संख्या वाढायला हवी. वाचनसंस्कृती भाषेमध्ये जोपासायला हवी. तरच उत्तमोत्तम लेखक भाषेमध्ये तयार होतील. शिवाय या क्षेत्राला हवे असणारे ग्लॅमर देखील तयार होईल. स्वतःला 'ग्लोबल' समजणाऱ्या मराठी भाषिकांना इंग्रजीतील नवे साहित्य माहित असते परंतु, मराठी साहित्याकडे मात्र हे सहज कानाडोळा करतात, ही शोकांतिका आहे.
एखाद्या पुरस्काराद्वारे साहित्याचा दर्जा ठरत नसला तरी एक विश्लेषण मांडावेसे वाटते. मराठी भाषेपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या बंगाली भाषेमध्ये आजपर्यंत सहा वेळा, कन्नड भाषेमध्ये आठ वेळा, मल्याळम भाषेमध्ये सहा वेळा तर उर्दू आणि गुजराती भाषेमध्ये तब्बल चार वेळा साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर आतापर्यंत चार मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मराठीमध्ये अधिक दर्जेदार कलाकृती साहित्य कलाकृती निर्माण व्हायच्या असल्यास वाचकांची संख्या वाढायला हवी. नुसतच 'मी मराठी' म्हणून पोस्ट टाकून भागणाऱ्यातलं नाही!

मराठी चित्रपट

तीन ते चार दशकांपूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा जोरदार बोलबाला होता. एखादा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला की त्या वेळेस हिंदी चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत नव्हता. म्हणजेच मराठी चित्रपटांची महाराष्ट्रावर मक्तेदारी प्रस्थापित झालेली होती. परंतु हळूहळू मुंबईतील गोंडसवाण्या बॉलीवूडने अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीने महाराष्ट्रावर पकड घ्यायला सुरुवात केली. नव्वदच्या दशकामध्ये मराठी चित्रपट निर्मिती कमी होऊ लागली आणि हिंदी चित्रपट वाढू लागले. हिंदी चित्रपटामधलं ग्लॅमर अर्थात वैभव मराठी प्रेक्षकांना आकर्षित करू लागलं. याच कारणामुळे महाराष्ट्रात हिंदी चित्रपट सृष्टी भक्कम होऊ लागली. आणि मराठी चित्रपटांना दुय्यम दर्जा प्राप्त झाला. परंतु पंधरा ते वीस वर्षांपूर्वी हळूहळू मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा उभारी घेऊ लागली. तसं पाहिलं तर हा वेग बेताचाच होता. नवनवे दिग्दर्शक, कलाकार, कथाकार आणि संगीतकार मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाले. त्याचा फायदा मराठी चित्रपटांना झाला. हळूहळू चित्रपटांचा दर्जा देखील वाढू लागला. उत्तमोत्तम चित्रकलाकृती मराठीत तयार झाल्या. प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील चांगला होता. परंतु आजही मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ आलेला नाही. मराठी प्रेक्षकांवर हिंदी चित्रसृष्टीचे गारुड अजूनही तसेच आहे. मराठीमध्ये उत्तम चित्रपट तयार होत आहेत. परंतु मराठी प्रेक्षकच मराठीला दुय्यम दर्जा देताना दिसतो. दक्षिणेकडे बघितले तर तिथे फक्त त्यांचे चित्रपट चालतात. अनेक चित्रपटांचा १०० कोटींचा गल्ला जमा होत असतो. पण महाराष्ट्रात मात्र असे होत नाही. नुसतं मराठी-मराठी म्हणून भागणार नाही. तर मराठी चित्रपटांना मराठी प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळायला हवा. हिंदी चित्रपट सृष्टीतला तोचतोचपणा, रिमेक आणि अन्य भाषातून केली जाणारी ढापाढापी वगळता नाविण्यपणा दिसत नाही. याउलट मराठीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. त्यासाठी मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
भारतामध्ये पहिला चित्रपट ज्या दादासाहेब फाळके यांनी बनवला ते मराठी होते. शिवाय राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पहिला भारतीय चित्रपट 'श्यामची आई' हा देखील मराठी होता. परंतु मराठी प्रेक्षकांच्या अनास्थेमुळे चित्रपटसृष्टी देखील मागे पडलेली आहे. आमचं मनोरंजन म्हणजेच मराठी मनोरंजन असं ठामपणे मराठी प्रेक्षक म्हणत नाहीत. मग नुसतं मराठी आडनाव लावण्याचा काय उपयोग? हा प्रश्न देखील पडतो.
मागील काही वर्षांपासून भाषेमध्ये राजकारण आलेले आहे. राजकारणी आपल्या भाषेचा उपयोग त्यांच्या स्वार्थासाठी करताना दिसत आहेत. यामुळेच मराठी लोकांमध्ये विभागणी झालेली दिसते. शेवटी फोडा आणि राज्य करा हा इंग्रजांचा मंत्र आजही राजकीय लोक वापरताना दिसत आहेत.
एकंदरीतच मराठी माणूस आपल्या मराठीपण टिकविण्यासाठी कितपत योगदान देतो? या प्रश्नाचा त्याने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. क्षेत्र कोणतेही असो मराठी भाषा वाढली पाहिजे, टिकली पाहिजे तरच मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र टिकेल. आपल्या भाषेची वृद्धी होईल आणि आपण खऱ्या अर्थाने 'मराठी' म्हणून ओळखले जाऊ. किमान आजच्या दिवशी इतके ज्ञान प्राप्त झाले व त्याची योग्य अंमलबजावणी केली तरी खूप होईल.

© तुषार भ. कुटे,
डेटा सायंटिस्ट,
मितू स्किलॉलॉजीस आणि रिसर्च, पुणे

Wednesday, February 23, 2022

मोठी तिची सावली - राजश्री बर्वे

काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावरूनच यातील कथेचा अंदाज येतो. गूढ कथा वाचण्यासाठी काहीतरी नवीन शोधत असताना राजश्री बर्वे लिखित 'मोठी तिची सावली' हा कथासंग्रह हाती आला. मुखपृष्ठावरूनच तो भयकथा संग्रह असल्याचे समजते. एकूण १४ भयकथांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे. राजश्री बर्वे यांनी लिहिलेल्या विविध दिवाळी अंकांमध्ये तसेच मराठी नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या रहस्यकथा, गुढकथा व भयकथा यात वाचता येतील. सदर लेखिकेचे वाचलेले हे माझे पहिलेच पुस्तक होय. कथा लिहिण्याची त्यांची स्वतःची एक शैली आहे. सर्वसामान्य मराठी वाचकाला ती व्यवस्थित समजेल अशीच वाटते. कथांची मांडणी व संवाद रचना यातून आपण या कथांमध्ये गुंतून राहतो. शिवाय रहस्य व भय या रसांविषयी आपुलकी असणाऱ्या वाचकांना ती निश्चित खिळवून ठेवेल, अशीच आहे. या पुस्तकाचे एक मोठे वैशिष्ट्य असे की, एकाच नावाच्या व दोन निरनिराळ्या रसांच्या कथा यात समाविष्ट आहेत. 'पाउलखुणा' असे त्या कथेचे नाव होय. असा प्रयत्न मी पहिल्यांदाच एखाद्या पुस्तकांमध्ये पाहिला आहे.
विशेष म्हणजे लेखिकेसह मुखपृष्ठ डिझाईन, प्रस्तावना, मुद्रितशोधन आणि टाईपसेटिंग देखील स्त्रियांनीच केलेले आहे! अशा प्रकारचे हे पहिलेच पुस्तक वाचनात आले. 



Friday, February 11, 2022

बदलतं तंत्रज्ञान

घर शिफ्ट करत असताना साफसफाईमध्ये घराच्या एका कोपऱ्यामध्ये घेऊन दिलेल्या सीडीचे आणि डीव्हीडीचे पाऊच आणि कंटेनर्स नजरेस पडले. सन २००२ ते २०१२ या दरम्यानच्या काळामध्ये मी जमवलेल्या या सीडी व डीव्हीडी होत्या. मागच्या दहा वर्षांमध्ये त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. परंतु त्यादिवशी या पाऊच आणि कंटेनरने भूतकाळ जागृत केला. माझ्या संग्रहामध्ये जवळपास ४०० सीडी व डीव्हीडी असतील. आज त्या मी ई-कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीकडे सुपूर्द केल्या. 

संगणक वापरायला सुरुवात केली त्याच सुरुवातीच्या काळामध्ये माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी फ्लॉपी डिस्कचा आम्ही वापर करायचो. साडेतीन इंच आकार असणाऱ्या या फ्लॉपीमध्ये केवळ १.४४ एमबी पर्यंत माहिती साठवता यायची. याचे देखील आम्हाला अप्रूप वाटत असे. एका संगणकातून दुसऱ्या संगणकामध्ये माहिती कॉपी करण्यासाठी त्याचा आम्ही सहज वापर करायचो. परंतु १५ ते २० वेळा वापरल्यानंतर ही फ्लॉपी खराब व्हायला लागायची. त्यातील डेटा करप्ट व्हायचा आणि मग आम्ही नवीन फ्लॉपी विकत घ्यायचो. त्या काळात सायबर कॅफेमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी प्रति तास तीस रुपये मोजावे लागायचे. त्यामुळे एका तासामध्ये इंटरनेटवरून भराभर माहिती डाऊनलोड करून आम्ही फ्लॉपी डिस्कमध्ये साठवून घरच्या संगणकावर लोड करायचं. फारच थोड्या कालावधीमध्ये फ्लॉपी ड्राईव्ह देखील कालबाह्य झाले. त्यांची जागा 'सीडी'ने घेतली. बाजारामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ सीडी उपलब्ध झाल्या. संगणकाच्या सीडी ड्राईव्हद्वारे त्यातली माहिती वाचता यायची. तसेच कॉपी करता यायची. एका सीडीची माहिती साठवण्याची क्षमता ७०० एमबी इतकी होती! त्या काळात ती प्रचंड वाटायची. सीडी ड्राईव्हद्वारे सीडीमधील माहिती फक्त बघता येत होती. परंतु सीडीमध्ये माहिती साठवता येत नव्हती. खूपच कमी लोकांकडे त्यावेळी 'सीडी राईटर' उपलब्ध होता. सीडी राईटर असणारा संगणक म्हणजे उच्च प्रतीचा संगणक, असे आम्ही मानत असू. आपल्याला एखादी सीडी राईट करायची असेल तर ज्याच्याकडे सीडी राईटर आहे त्याच्या संगणकाचा वापर करून आम्ही नवीन सीडी बनवून घेत असू. कालांतराने जवळपास सर्वच संगणकांमध्ये सीडी रायटर देखील उपलब्ध झाले. त्यामुळे सीडीमध्ये माहिती साठवणे सोपे झाले होते. संगणकातील बरीचशी महत्त्वाची माहिती आम्ही सीडीमध्ये साठवायला लागलो. पुढे मागे संगणकाची हार्ड डिस्क जर खराब झाली तर? हा प्रश्न आम्हाला सतावत असायचा. त्यामुळे बरीचशी महत्त्वाची माहिती सीडीमध्ये साठवली जायची. लवकरच या संगणकातील माहितीच्या पिढीमध्ये डीव्हीडी दाखल झाली. डीव्हीडीची क्षमता साडेचार जीबी इतकी प्रचंड होती! याच काळामध्ये री-राईटेबल सीडी आणि डबल साइडेड सीडी व डीव्हीडी देखील उपलब्ध झाल्या होत्या. तंत्रज्ञानाची ही प्रगती खरोखर अचंबित करणारी होती. संगणकीय माहितीचा साठा वाढत चाललेला होता. त्यामुळे अशा नवनवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची आवश्यकता तर होतीच.
डीव्हीडी रीडर बरोबरच राईटर देखील लवकरच बाजारात आले. मग आमचा डीव्हीडी रायटिंग चा उद्योग सुरू झाला. त्याकाळात इंटरनेटवर उपलब्ध होणारी महत्त्वाची माहिती तसेच चित्रपटातली गाणी व चित्रपट देखील डीव्हीडीमध्ये साठवून ठेवू लागलो. अनेक संगणकीय नियतकालिकांसोबत देखील सीडी आणि डीव्हीडी उपलब्ध होत होत्या. त्यातली माहितीदेखील अमुल्य अशी होती. या सर्व सीडींचा माझ्याकडे बराच मोठा संग्रह तयार झाला. यातून त्या ठेवण्यासाठी नवीन पाऊच आणि कंटेनर देखील मी विकत घेतले होते. कधी कोणती माहिती लागत असेल तर लगेच ती सीडी अथवा डीव्हीडी काढून संगणकामध्ये उघडली जायची. अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. परंतु दहा वर्षांपूर्वी पेन ड्राईव्ह नावाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संगणक विश्वात प्रवेश केला. माहिती साठवण्यासाठी तसेच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हे अतिशय सुलभ तंत्रज्ञान होते. मी पाहिलेला पहिला पेन ड्राईव्ह १२८ एमबी क्षमतेचा होता! कालांतराने त्याची क्षमता वेगाने दुप्पट होत गेली. आज आपल्याकडे टीबी अर्थात टेराबाईटमध्ये देखील पेन ड्राईव्ह उपलब्ध आहेत. पेन ड्राइवचा जमाना आल्यानंतर सीडी आणि डीव्हीडीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. याशिवाय इंटरनेट अन वेबसाईटस देखील वेगाने वाढत होत्या. त्यामुळे कोणतीही गोष्ट लागत असेल तेव्हाच इंटरनेटवरून डाऊनलोड करायला लागलो. अर्थात माहिती साठवून ठेवण्याची आवश्यकता तर नव्हती. काळाच्या ओघामध्ये सीडी आणि डीव्हीडी ड्राइव्ह देखील आता लॅपटॉप व संगणकामध्ये उपलब्ध होत नाहीत. परंतु संगणकीय माहितीचा साठा करण्यासाठी या तंत्रज्ञानाने संगणकाच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले होते. आज माझ्याकडे असलेल्या सर्व सीडीज व डीव्हीडीची एकूण क्षमता ही एका पोर्टेबल हार्ड डिस्क इतकी आहे! यांना तंत्रज्ञानाची किमयाच म्हणावी लागेल. इंटेलचे संस्थापक गॉर्डन मूर यांनी संगणक विश्वाला मूरचा नियम सांगितला आहे. जरी तो संगणकातील मायक्रोप्रोसेसरला वापरण्यात येत असला तरी संगणकीय माहितीसाठ्याला देखील तो निश्चित लागू होतो. आज आपण वापरत असलेल्या हार्ड डिस्क देखील कालांतराने कालबाह्य होतील आणि नवे तंत्रज्ञान त्याची जागा घेईल. ही काळाची गरज आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाला सहाय्य करणारे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान हे इतिहासात तितकेच महत्त्वाचे होते, हे विसरून चालणार नाही!

Thursday, February 10, 2022

इंडिका

विश्वामध्ये असणारी एकमेव आणि सर्वोच्च ताकद म्हणजे निसर्ग होय. तो अद्भुत आहे, विशाल आहे, सर्वशक्तिमान आहे आणि त्याला हवे तसेच तो करतो. म्हणूनच निसर्ग विज्ञान या विषयासारखा अभ्यास करण्यासाठी दुसरा रंजक विषय नाही. याच विषयाला वाहिलेले प्रणय लाल लिखित 'इंडिका' हे पुस्तक होय. भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास, असे जरी या पुस्तकावर लिहिलेले असले तरी बहुतांशी पृथ्वीचा नैसर्गिक इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. त्याचे विवेचन करण्यापूर्वी पुस्तकातील लेखकाने दिलेला सर्वात शेवटचा परिच्छेद आधी सांगतो...
"आपल्या ४६ वर्षी श्रीमती पृथ्वीच्या आयुष्यात सेपियन्स चारेक तासांपूर्वी उपजला. श्रीमती पृथ्वीचे आयुष्य आपल्याला सांगते की कोणत्याही जीवजातीचे अस्तित्व, फार कशाला, जीवाचेही अस्तित्व अनेक अशक्यप्राय घटनासंचांमुळे घडते; ज्यातून शेवटी आपण घडलो आहोत. उत्क्रांतीच्या इतिहासात कोणत्याही जीवप्रकाराच्या उत्क्रांतीला ना दिशा असते, ना कोणते लक्ष्य असते. जवळपास सर्व जीवजाती नष्ट होणे अपरिहार्य आहे. प्रभावी जीवजात म्हणून होमो सेपियन्स उत्क्रांतीच्या नाट्यातले शेवटी रंगमंचावर आलेले पात्र आहे. जर घटना घडल्या तशा घडल्या नसत्या, आपले स्पर्धक व भक्षक विशिष्ट वेळी नष्ट झाले नसते, तर आपण आज अस्तित्वातच नसतो, ना कपींचे पूर्वज, ना त्यांचे सरीसृप सस्तन पूर्वज, एका संध्याकाळी एका उथळ डबक्यात ३.५ अब्ज वर्षांपूर्वी जीव घडला ... जर कधी नसता, तर ही चित्रफीत पुन्हा 'वाजवून' आपण घडलो असतो याची कोणतीच खात्री देता येत नाही. जर असा प्रयोग करता आलाच तर आजच्या प्राण्यांच्या वनस्पतींच्या ऐवजी पूर्णपणे वेगळे जीव घडतील. आज अस्पर्श राहिलेली गरम झऱ्यांची तळी फक्त एक आशा पुरवतात, की जर जीवसृष्टी नष्ट झाली तर ती नव्याने घडेल. पण जीव नव्याने घडेल याची खात्री आहे. का? जास्त महत्त्वाचे म्हणजे, तसे होण्या-न-होण्यावर जुगार खेळायला आपण तयार आहोत का? आणि जिंकणारे कोणते जीव असतील?"
खरं तर याच परिच्छेदांमध्ये संपूर्ण पुस्तकाचा सारांश दिलेला आहे. ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, तेव्हापासूनच घडलेल्या सर्व घडामोडी भूगर्भशास्त्राद्वारे, जीवशास्त्राद्वारे, भौतिकशास्त्राद्वारे आणि मानववंशशास्त्राद्वारे संशोधन रूपाने या पुस्तकात लेखकाने अतिशय विस्तृतरित्या मांडलेल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे पृथ्वीचा साडेचारशे कोटी वर्षांचा संक्षिप्त इतिहास होय. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून घडलेल्या घटनांची शास्त्रशुद्ध माहिती लेखकाने अतिशय सुटसुटीतरित्या या पुस्तकात दिलेली आहे. ज्या निसर्गामध्ये आपण वावरतो तो आजच्या घडीला येण्यासाठी पृथ्वीची कोट्यावधी वर्षांची मेहनत आहे. यात आपले अर्थात मानवाचे योगदान काही लाख वर्षांचे देखील नाही. तरीही आपण विश्वाचे राजे म्हणून वावरताना दिसतो. पृथ्वीचे सर्वेसर्वा म्हणून घेताना दिसतो. पण प्रत्येकाला पृथ्वीचा हा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर 'इंडिका' वाचायलाच हवे.
एकूण पंधरा प्रकरणांमध्ये या पुस्तकाची विभागणी करण्यात आलेली आहे. यातून पृथ्वीच्या निर्मितीपासून मानवाच्या आजच्या प्रगती पर्यंतचा सखोल इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. आज भारतीय उपखंड ज्या ठिकाणी आहे तिथे तो कोट्यवधी वर्षांपूर्वी नव्हताच. इतक्या वर्षांमध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपण इथवर पोहोचलेलो आहोत. भारत, मादागास्कर, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे सर्व प्रदेश एकमेकांना जोडलेले होते ही कल्पनाच किती रोमांचकारी आहे! मागच्या चार पाच कोटी वर्षांमध्ये आपण हजारो किलोमीटरचा प्रवास करत आशिया खंडाला धडकले आहोत. या कालखंडामध्ये प्राण्यांच्या लाखो जाती तयार झाल्या आणि नष्टही झाल्या. अनेक प्राण्यांनी पृथ्वीवर राज्य केले. परंतु निसर्गाच्या पुढे कोणीही टिकू शकले नाही. पुस्तकाच्या पंधरा प्रकरणांपैकी फक्त तीन प्रकरणांमध्ये मानवी वाटचाल दिलेली आहे. यातूनच पृथ्वीच्या दृष्टीने मानवाचे अस्तित्व कितपत असावे, याचा अंदाज बांधता येईल. आपल्या पूर्वी पंधरा कोटी वर्षे डायनोसॉर नावाच्या प्राण्याने पृथ्वीवर अधिराज्य गाजवले. त्याचे अवशेष व जीवाश्म आजही विविध देशांमध्ये आढळून येतात. केवळ डायनासोरस नाही तर अनेक विविध प्रकारचे प्राणी पृथ्वीवर वावरत होते. परंतु विविध कारणांमुळे ते नष्ट झाले. डार्विनच्या थियरीनुसार जो तग धरून राहतो तोच टिकतो. हे आजवर सिद्ध झालेले आहे.
निसर्गामध्ये सजीव म्हणता येणारे करोडो प्राणी आणि वृक्ष आहेत. त्यांची उत्क्रांती नक्की कशी झाली, याचा देखील इतिहास या पुस्तकांमध्ये सखोलरीत्या लिहिलेला आहे. लेखकाने भूगर्भशास्त्राचा अतिशय विस्तृत अभ्यास केलेला दिसतो. शिवाय भारतीय उपखंडामध्ये त्यांचा प्रवास देखील प्रचंड झालेला आहे. पर्वतरांगांचा, डोंगरांचा, नद्यांचा, सरोवरांचा, खडकांचा, मातीचा सखोल अभ्यास करून वैज्ञानिक निष्कर्ष काढून पृथ्वीचा इतिहास लिहिल्याचे दिसते. एक ट्रेकर म्हणून मी देखील सह्याद्रीतल्या अनेक खडकांचा इतके बारकाईने निरीक्षण केले नव्हते. पण या पुस्तकाने मला देखील नवी दृष्टी निश्चितच प्राप्त करून दिली. विज्ञान हे अमर्याद आहे. कदाचित त्याचा अभ्यास करणे आपल्याला एका जन्मात देखील शक्य नाही, याची प्रचिती या पुस्तकातून निश्चितच येते.
पुस्तकाचे सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगायची म्हटलं तर यातील सर्वच चित्रे ही रंगीत आहेत! त्यामुळे इतिहास जिवंत उभा राहतो. शिवाय लेखकाने अनेक स्थळांचे निश्चित स्थान अक्षांश व रेखांशद्वारे दिलेले आहे. म्हणूनच ते गुगल मॅपमध्ये देखील शोधायला सोपे जाते. अनेक वैज्ञानिक बारकावे लेखकाच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेची साक्ष देतात. होमो सेपियन्स जगभर कसे पसरले याचा नकाशा आणि चाळीस लक्ष वर्षांचा फॅमिली फोटो ही या पुस्तकातील सर्वोत्तम चित्रे होत! पुस्तक वाचताना वाटत होते की हा इतिहास कधीच संपू नये. अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा अधिक तीव्र होत होती. हेच या पुस्तकाचे यश होय.
प्रणय लाल यांनी हे पुस्तक इंग्रजीत लिहिलेले असले तरी नंदा खरे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. नंदा खरे यांच्या यापूर्वी वाचलेल्या स्वलिखित पुस्तकातील भाषा मला अधिक क्लिष्ट वाटली होती. परंतु या पुस्तकाचा अनुवाद मात्र उत्तमच केलेला दिसतो.
शेवटी काय विज्ञानाकडे बघण्याची किंबहुना निसर्गाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देऊन जाणारे हे पुस्तक होय. विज्ञानावर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवे.