Friday, August 28, 2020

आरोग्य आणि शिक्षण

जगापुढे कोरोना सारख्या महामारीचे संकट उभे असताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व युनिसेफ यांनी नुकताच एक शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जगातील ३३ टक्के शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. जरी यातील एक तृतीयांश शाळा या आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशातल्या असल्या तरी बहुतांश शाळा या भारतातील देखील आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर देखील अनेक भारतीय शाळांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची सुविधा व्यवस्थित उपलब्ध होऊ शकलेली नाही. तशीच परिस्थिती हात धुण्याच्या पाण्याची व साबणाचीही आहे. भारतामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं फॅड वाढत चालले असताना सरकारी व अनुदानित शाळांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये लागणाऱ्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होताना दिसत नाहीत. शासकीय शाळांना दरवर्षी अशा विविध कामांसाठी शासनाकडून अतिशय तुटपुंजी रक्कम दिली जाते. त्यामुळे शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करता येत नाहीत. गावातील नागरिक जर सुजान असतील तर तेच लोकसहभागातून व वर्गणी द्वारे शासकीय शाळांच्या सुधारणा करत आहेत. नागरिकांचे जरी हे कर्तव्य असले तरी शासनाची ही जबाबदारी आहे. भारतासारख्या प्रगतीशील देशांमध्ये शिक्षणाचे बजेट अतिशय कमी आहे. त्यामुळेच शिक्षणाला व शिक्षण मंदिराला दुय्यम स्थान दिले जाते.

Saturday, August 22, 2020

पायथॉन प्रोग्रॅमिंग : पहिले मराठी ई-बुक

सुमारे एक वर्षापूर्वीची गोष्ट. पायथॉन प्रोग्रॅमिंगचे मराठीतून व्हिडिओ ट्युटोरिअल तयार करण्याची संकल्पना मनात आली आणि काही कालावधीतच सदर व्हिडिओज युट्युबवर आम्ही अपलोड केले. खरंतर या व्हिडिओजला मिळणारा प्रतिसाद हा अपेक्षेपेक्षा अधिकच होता. केवळ एकाच वर्षांमध्ये आमच्या युट्युब चॅनेल वरील हे सर्वात लोकप्रिय व्हिडिओ ठरले. कमेंटसवरून प्रतिसाद लक्षात यायला लागला. प्रत्येक ट्यूटोरियल मराठी प्रोग्रॅमरला आवडत होते. त्यांचा प्रतिसाद हा हुरूप देणारा ठरला. आज तुम्ही गुगल अथवा युट्युब वर Python in Marathi असे सर्च केल्यास हेच व्हिडिओ सर्वात आधी दिसून येतात. शिवाय मागच्या सलग आठ महिन्यांपासून कंपनीच्या युट्युब चॅनेलचे टॉप तीन व्हिडीओज हे "पायथॉन इन मराठी" याच प्लेलिस्टमधील आहेत!
कुणालाही आपल्या भाषेतून शिकायला मिळणे, हे आनंददायी व अधिक आवडीचे असते. त्याचाच हा परिणाम म्हणूनच पायथॉन प्रोग्रॅमिंगचे मराठीतून पुस्तक लिहावे, हा विचार मनात आला व लगेच त्यावर काम करायला आम्ही सुरुवात केली. मागच्या सहा वर्षांपासून या संगणकीय भाषेवर प्रभुत्व निर्माण झाले होते. त्यामुळे त्यातील संकल्पना सहजपणे मराठीतून मांडायला सोपे जाऊ लागले. पुस्तकाची संकल्पना दोन महिन्यांपासून आकार घेऊ लागली होती आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्यानेच इतक्या कमी कालावधीत पुस्तक तयार झाले. आज त्याची पहिली झलक इथे प्रदर्शित करीत आहोत. त्यासाठी माझी पत्नी रश्मी हिचा मोलाचा सहभाग आहे. म्हणूनच तिच्या वाढदिवशी या पुस्तकाची घोषणा करत आहोत. हे माझे तिसरे पुस्तक होय! तसेच ते पहिलेच व्यवसायिक ई-बुक आहे. त्याचे प्रकाशन ५ सप्टेंबर अर्थात शिक्षकदिनी होणार आहे. तेव्हाच त्याची आवृत्ती ऑनलाईन ई-वितरणासाठी उपलब्ध होईल. तसेच १५ सप्टेंबर अर्थात अभियंता दिनापासून ते अमेझॉन व गूगल बुक्स वरही उपलब्ध केले जाईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://mitu.co.in/python-programming-in-marathi-e-book

 

Wednesday, August 19, 2020

खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा

साधारणतः वीसेक वर्षांपूर्वी एका मराठी वृत्तपत्रामध्ये खलील जिब्रानच्या लघु बोधकथा प्रकाशित व्हायच्या. या बोधकथांमधून कमीत कमी घटनांद्वारे सर्वोत्तम संदेश लेखक देत असे. त्यामुळे त्या कथा मनाला भावत असत. खलील जिब्रान हे नाव तेव्हा मी पहिल्यांदाच ऐकले. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या विविध घटनांना बांधेसूदपणे शब्दात मांडून त्याची बोधकथा तयार करण्याचे कौशल्य खलिल जिब्रान यांच्याकडे होते. त्यामुळे दररोज प्रसिद्ध होणाऱ्या या बोधकथा मी नियमित वाचत असे. आज वीस वर्षांनी खलील जिब्रानच्या कथा वाचण्याची पुन:श्च संधी मिळाली.
अनेकांना हे नाव कदाचित परिचित नसावे. खलील जिब्रान हे इंग्रजी आणि अरेबिक साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक व चित्रकार होते. त्यांनी एकूण पंचवीस पुस्तके लिहिलेली आहेत. शिवाय त्यांच्या कथांचा जगातील २० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादही झालेला आहे. त्यांच्या या साहित्यातील सर्वोत्कृष्ट कथांचा स्मिता लिमये यांनी केलेला हा अनुवाद होय. 


खलील यांचा जन्म लेबेनॉन सारख्या सतत अराजकतेमध्ये वावरणाऱ्या देशामध्ये झाला होता. तरीही अशा वातावरणात त्यांची निर्मल विचारधारा साहित्य रुपाने बाहेर आली, हे विशेष! कमीत कमी शब्दांमध्ये कथा सादर करून त्याचे तात्पर्य वाचकांसमोर मांडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. या पुस्तकाचे प्रामुख्याने तीन भाग आहेत. यातल्या पहिल्या भागामध्ये लेखकाचे विचार सुविचार रूपामध्ये मांडलेले आहेत. दुसऱ्या भागात लघु-बोधकथा वाचता येतात. तर तिसऱ्या भागामध्ये दोन दीर्घकथा आहेत. मनाला भावणारे विचार व लघु कथांमधून येणारी त्याची प्रचिती अनुभवायची असल्यास खलील जिब्रान यांचे साहित्य निश्चितच उपयोगी आणि प्रेरणादायी ठरेल असेच आहे.

Friday, August 14, 2020

मराठी भाषे विषयी थोडसं वेगळं, पण महत्त्वाचं!

जगामध्ये शेकडो भाषा एक कोटी पेक्षा जास्त लोकांच्या मातृभाषा आहेत. ज्यांना त्यांची प्रथम भाषा म्हणूनही ओळखले जाते. अशा विविध भाषांवर काम करणारी एस.आय.एल. इंटरनॅशनल ही नामांकित संस्था होय. दरवर्षी भाषेच्या संख्येनुसार अर्थात ती भाषा बोलणाऱ्याच्या संख्येनुसार आकडेवारी एस.आय.एल. द्वारे प्रसारित केली जाते. आज जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये बहुतांश भाषा या भारतीय आहेत. यात मराठी भाषेचाही समावेश होतो. परंतु मराठी भाषा अन्य भाषांपेक्षा आपलं वेगळेपण राखून असल्याचे दिसते. त्यासाठीच हा लेखप्रपंच.
जगात बोलल्या जाणार्‍या प्रमुख भाषा या एक किंवा त्यापेक्षा अधिक देशांमध्ये राष्ट्रभाषा किंवा अधिकृत भाषा म्हणून प्रचलित आहेत. एस.आय.एल. ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या दहा भाषा व व त्या कोणत्या देशांमध्ये अधिकृत आहेत त्याची माहिती एकदा तपासून पहा.

१. चायनीज
चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असल्यामुळे चिनी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा होय. तिचे अधिकृतपणे मंदारीन असे नाव आहे. जगात ९२ कोटी लोकांची ती मातृभाषा आहे. तसेच चीन, तैवान, मकाऊ आणि सिंगापूर या चार देशांमध्ये तिला अधिकृत भाषेचा दर्जा प्राप्त आहे.

२. स्पॅनिश
बहुतांश लॅटिन अमेरिका अर्थात दक्षिण अमेरिकेमध्ये स्पॅनिश भाषा बोलली जाते. युरोपियन स्पेन सारख्या देशांपेक्षा अमेरिकेत ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ४८ करोड लोकांची ती मातृभाषा आहे. शिवाय वीस देशांची अधिकृत भाषा म्हणून स्पनिशला मान्यता आहे.

३. इंग्लिश
इंग्लिश ही जगाची भाषा म्हणून ओळखली जाते. शिवाय ती ३८ कोटी लोकांची मातृभाषा आहे. विशेष म्हणजे ८० पेक्षा अधिक देशांमध्ये इंग्लिशला अधिकृत भाषा म्हणून दर्जा दिला गेला आहे. त्यात भारताचाही समावेश होतो.

४. हिंदी
भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी ही भाषा होय. ती जगामध्ये ३४ कोटी लोकांची मूळ मातृभाषा आहे. शिवाय भारताव्यतिरिक्त फिजी या देशाची ती अधिकृत भाषा आहे.

५. बंगाली
प्रामुख्याने भारतात बोलली जाते. तिचे ते २० करोड मातृभाषा असणारे लोक आहेत. शिवाय भारत व बांगलादेश या दोन देशांची ती अधिकृत भाषा आहे.

६. पोर्तुगीज
सहाव्या क्रमांकावरील पोर्तुगीज भाषा मूळची पोर्तुगालची असली तरी ब्राझील देशामध्ये तिचे सर्वाधिक मातृभाषीक आहेत. २२ कोटी लोकांची ती प्रथम भाषा असून तिला दहा देशांमध्ये अधिकृत भाषेचा दर्जा प्राप्त आहे.

७. रशियन
क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा देश असणाऱ्या रशियाची रशियन ही अधिकृत भाषा होय. १५ कोटी लोकांची ती मातृभाषा आहे. याशिवाय जगातल्या आठ देशांमध्ये तिला राष्ट्रभाषा किंवा अधिकृत भाषा हा दर्जा प्राप्त आहे.

८. जपानी
ही भाषा प्रामुख्याने जपानमध्ये बोलली जाते. ती तेरा कोटी लोकांची मातृभाषा असून जपान सह पलाऊ देशाची अधिकृत भाषा आहे.

९. पंजाबी
भारत व पाकिस्तानच्या पंजाब प्रांतांमध्ये पंजाबी प्रामुख्याने बोलली जाते. विशेष म्हणजे भारतापेक्षा पाकिस्तान मध्ये पंजाबी बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. फरक इतकाच की, पाकिस्तानी पंजाबी शाहमुखी लिपीमध्ये तर भारतीय पंजाबी गुरुमुखी लिपीत लिहिली जाते. मातृभाषा म्हणून पाकिस्तान मध्ये पंजाबी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे! शिवाय जगात ९.२ कोटी लोकांची मातृभाषा आहे.

१०. मराठी
मातृभाषा म्हणून सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या भाषेत मराठी भाषा दहाव्या क्रमांकावर आहे. ८.३ कोटी लोकांची ती मातृभाषा आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे मराठी भाषा फक्त एकाच देशात अर्थात भारतामध्ये अधिकृत भाषेचा दर्जा राखून आहे. दहाव्या क्रमांकावरील ही पहिलीच अशी भाषा की जी फक्त एकाच देशामध्ये अधिकृत भाषा मानली जाते!

स्रोत:
https://www.sil.org/
https://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_number_of_native_speakers

@ तुषार कुटे. 
 

Thursday, August 13, 2020

मानवजातीची कथा- डॉ. हेन्री थॉमस

डॉ. हेन्री थॉमस यांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'मानवजातीची कथा' या पुस्तकाचा साने गुरुजींनी मराठीमध्ये अप्रतिम अनुवाद केला आहे. ही कथा आहे मानवजातीची...  खऱ्या अर्थाने मानवांच्या जातींची! या जाती कोणत्या? क्रूरकर्मा हुकूमशहा, धर्मांचे प्रेषित, आपल्याच नागरिकांवर अन्याय करणारे सम्राट, अहिंसेचा मार्ग असणारे संत, या विश्वाला खऱ्या मानवाच्या दृष्टीने बघणारे कवी-लेखक, कष्टकऱ्यांचे कष्ट समजून घेणारे विचारवंत, जगाला शांततेचा संदेश देणारे शांततादूत, अनेक देशांवर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारे क्रूर राज्यकर्ते आणि जगाला नवे दृष्टिकोन देणारे तत्वज्ञ. अशा विविध मानव जातींचा हा संक्षिप्त इतिहास आहे. मानवी इतिहासामध्ये आजवर अनेक व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्या जीवनाचा व कार्याचा सारांश या पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे मानव विविध प्रकारचे आहेत. मानवी इतिहासावर त्यांचा प्रभावही तितकाच मोठा आहे. त्यांनी जगाचा इतिहास व भूगोल बदलवून टाकलेला आहे. मानवाने कसे असावे व कसे असू नये? या दोहोंचीही अवलोकन करणारा हा इतिहास आहे. 

मागील अडीच ते साडेतीन हजार वर्षांमध्ये ज्या घडामोडी घडल्या व त्या घडामोडींवर ज्यांचा प्रभाव होता, त्यांचं संक्षिप्त चरित्र म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. मानवी संस्कृतीची सुरुवात झाल्यानंतर मागील तीन हजार वर्षांमध्ये आपण खऱ्या अर्थाने प्रगत होत गेलो. याच कालखंडात मानव म्हणून आपल्यातील अनेक प्रवृत्ती दिसून आल्या. त्याच प्रवृत्तींचं प्रतिमा चित्रण म्हणजे 'मानवजातीची कथा' होय. या कथेची सुरुवात होते बंडखोर राजपुत्र मुसा याच्यापासून आणि शेवट झाला आहे दुसऱ्या महायुद्धाच्या मुसोलीनी आणि हिटलरमध्ये. या दरम्यानच्या कालखंडातील अनेक व्यक्ती त्यांची नावे आपण यापूर्वी अनेकदा ऐकली. त्यांचे कार्य ही आपल्याला ज्ञात आहे. परंतु, त्याचा जगाच्या इतिहासावर नक्की कसा प्रभाव पडला याची माहिती मात्र आपल्याला नाही. हा इतिहास प्रामुख्याने युरोप खंडात घडला. ग्रीस, इटली, स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, हॉलंड या देशांमध्ये अनेक व्यक्ती होऊन गेल्या. त्यांची व त्यांच्या कार्याची मीमांसा आपल्याला पुस्तकांमधून होते. युरोप व्यतिरिक्त अमेरिकेतील दोन आणि अशियातील तीन व्यक्तींची संक्षिप्त माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे.
ग्रीक व रोमन संस्कृती या जगाच्या इतिहासातील सर्वात जुन्या संस्कृती होत. त्यांच्यामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी अनेक राजे होऊन गेले. अनेक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञही झाले. तो काळ होता जगात धर्म येण्यापूर्वीचा, म्हणजे नरसंहार करण्यासाठी तत्कालीन सम्राटांना धर्माचे कारण नव्हते. यात काळातील अलेक्झांडर, एपिक्यूरस, हॅनिबॉल, केटू, सीझर, चौदावा लुई, नेपोलियन सारखे युरोपियन सम्राट या जगावर केवळ हुकूमत गाजवण्यासाठी व राज्य करण्यासाठीच जन्माला आले होते, असे इतिहास सांगतो. त्यांच्या पूर्वी आशियाची भूमी भगवान गौतम बुद्ध, कन्फ्यूशियस आणि लाओत्से सारख्या महान पुरुषांच्या जन्माने पावन झालेली होती. युरोपात मात्र अशी परिस्थिती दिसून आली नाही. ज्या राजांना आपण इतिहासात स्थान देतो, त्यांनी किती मोठा जागतिक नरसंहार केलेला आहे, याची प्रचिती या पुस्तकातून येते. अलेक्झांडर पासून मागील शतकातल्या हिटलरपर्यंत सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव फक्त माणसे मारण्याचे काम केले होते. दोन हजार वर्षांपूर्वी जगात धर्माची निर्मिती झाली आणि पुनश्च नरसंहार करण्यासाठी राज्यकर्त्यांना सम्राटांना आणि हुकूमशहांना कारण मिळाले. साम्राज्यवादी धर्म अनेक मोठ्या लढायांना व धर्म युद्धांना कारणीभूत ठरले आहेत. या धर्माचा प्रसार जगात तर झालाच. परंतु त्याची किंमत मनुष्यहानीने जगाला मोजायला लागली. इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतर जगात फक्त ज्यू, भारतीय आणि चीनी या तीन संस्कृती आजवर टिकून आहेत. ज्यू लोकांनी आजवर जितकी हानी व अन्याय सहन केला असेल, तितका कदाचित इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये केला गेला नसावा. आक्रमकांनी आपला धर्म जगभर पोहोचवला. माणसे मारून आमचा धर्म कसा माणुसकीचा धर्म आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातही वरील तीन संस्कृती अजूनही टिकून आहे हे विशेष!
जगाचा इतिहास तसा फक्त क्रूरकर्मा राजांचा होता असे नाही. या इतिहासात डांटे आणि गटे सारखे महान कवी, शेक्सपियर सारखे नाटककार विचारवंत होऊन गेले. कला-विज्ञान यांची सांगड घालणारा लिओनार्दो द विंची होऊन गेला. जगाने संशोधक वृत्तीचा कोलंबस पाहिला आणि आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्ल्स डार्विनही पाहिला. स्पायनोझा सारखा थोर विचारवंत या जगात जन्मला होता हेही आपले भाग्य होय. लिंकन, टॉल्स्टॉय आणि महात्मा गांधी यांच्यासारखी माणसे व त्यांच्या विचारधारा जगाने पाहिल्या.
एक गोष्ट मात्र येथे हे प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की, धर्म या संकल्पनेभोवती, त्याच्या रक्षणासाठी तसेच प्रसारासाठी जितक्या अमानुष हत्या आजवर या जगात झालेल्या त्या इतर कोणत्याही कारणाने झालेल्या नाहीत. कार्ल मार्क्सने म्हटले होते की, धर्म ही अफूसारखी आहे. तिची नशा कधीच उतरत नाही. जगाच्या इतिहासातून एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते.
प्रत्येक संस्कृतीमध्ये प्रेषित तयार झाले आहेत. प्रथम प्रेषितांना ठार मारायचे आणि मग त्यांची प्रेते पुजायची. ही मानवाची नेहमीचीच युक्ती आहे. अनेक प्रेषितांनी जन्मभर मानवतेचा संदेश दिला. परंतु त्यांच्या अनुयायांना मात्र तो आजही समजलेला नाही, हे दुर्दैव! आपला इतिहास अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यातून सकारात्मक गोष्टी घेता येतात आणि नकारात्मक बाबी टाकूनही देता येतात. या इतिहासात शिकण्यासारखं बरच काही आहे. इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तींकडून अगाध ज्ञान प्राप्ती होते. परंतु त्यातून कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या? हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. हाच या पुस्तकाचा सारांश!

पुस्तकातील प्रमुख व्यक्तींचा इतिहास...
- राजपुत्र मूसा इतिहासातील पहिला युद्धविरोधी वीर जेरिमिया
- देवत्व पावलेला नास्तिक बुद्ध
- ख्रिस्ताचा आध्यात्मिक पिता कन्फ्यूशियस
- ज्याने साम्राज्य मिळाले; पण संस्कृतीचा विध्वंस असा सायरस
- अथेन्सचा लोकप्रिय लोकशाही पक्ष-नेता पेरिक्लीस अधिक चांगल्या जगाचे स्वप्न खेळविणारा प्लेटो
- स्वत: व ईश्वर यांत जगाची वाटणी करणारा अलेक्झांडर
- हसरा, दुःखवादी एपिक्यूरस
- द्वेष मूर्ती हैनिबल कार्थेजियन राजपुत्र
- जगातील कपटपटूंचा शिरोमणी कॅटो
- देव होऊ पाहणारा मनुष्य : सीझर
- नाझारेथ बहिष्कृत ज्यू येशू
- मातृहत्यारा सम्राट नीरो
- तत्त्वज्ञानी सम्राट मार्कस ऑरेलियस
- कॉन्स्टंटाइन : जुन्या धर्मवृत्तीचा आत्मा असलेला ख्रिश्चन
- शार्लमन : पोपला वाचवून स्वत: सम्राट होणारा संन्यासी
- पीटर : अमीन्सचा माथेफिरू भिक्षु
- कॅथलिक पंथी बंडखोर : अॅसिसीचा साधू फ्रॅन्सिस
- मुक्या शतकाचा आवाज : डान्टे
- युरोप व आशिया यांमधील दुवा : मार्को पोलो
- नवयुगाचे तीन पुरस्कर्ते : पेट्रार्क, जोहान्स हस, जॉन बॉल
- ऑर्लिन्स येथील कुमारी जोन ऑफ आर्क : फ्रान्सची माता
- टॉर्कीमीडा व पवित्र 'इन्क्विझिशन' न्यायसंस्था
- अमेरिका न शोधणारा कोलंबस
- कला-विज्ञान-वेत्ता लिओनार्डो डी व्हिन्सी
- पोपला धाब्यावर बसविणारा शेतकरी मार्टिन ल्यूथर
- सैतानाचा शिष्य मॅकिऑव्हिली
- नव सृष्टीचा निर्माता शेक्सपिअर
- फ्रेंच राजांपैकी अति प्रसिद्ध राजा चौदावा लुई
- अहिंसक, युद्ध-प्रतिकारी जॉर्ज फॉक्स
- अॅमस्टरडॅम येथील शांतमना स्पायनोझा
- रशियावर सुधारणा लादणारा पीटर दि ग्रेट
- व्हॉल्टेअर
- जग जिंकूनही निर्वासित अवस्थेत मरणारा नेपोलियन
- गटे: हा पाहा खरा मनुष्य
- संयुक्त युरोपचे स्वप्न खेळवणारा इटालियन नेता : मॅझिनी
- समाजवादाचा जनक कार्ल-मार्क्स
- प्रशियाचा प्रतिगामी चॅन्सेलर विस्मार्क
- आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन
- कृष्णवर्णियांचा त्राता अब्राहम लिंकन
- द्वेषविहीन जगाचे ध्येय देणारा टॉलस्टॉय
- शेवटचा कैसर सम्राट दुसरा वुइल्यम
- मॅकि विलियन पद्धत पत्करणारे हुकूमशाही विरुद्ध लोकशाही : मुसोलिनी, हिटलर, रुझवेल्ट

Saturday, August 8, 2020

कल्पित-अकल्पित - सुधा रिसबूड

सुधा रिसबूड यांच्या लेखणीतून अवतरलेला 'कल्पित-अकल्पित' हा कथा संग्रह होय. विज्ञानातील भविष्यातील प्रगती या विषयाला प्रामुख्याने अनुसरून यातील कथा लेखिकेने लिहिलेल्या आहेत. भविष्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान तसेच प्रामुख्याने खगोल विज्ञान कसे असेल? या कल्पनेतून कथा साकारलेल्या दिसून येतात. विज्ञान हा नेहमीच रंजक विषय राहिलेला आहे. त्यामुळे भविष्यातील विज्ञान अधिक रंजकता प्राप्त करून देतो. याच अनुषंगाने लिहिलेल्या कथा विज्ञान-मनोरंजन करून जातात. यातील काही कथांची व्याप्ती हजारो वर्षे भविष्यातील आहे. या कथा मांडताना लेखिकेच्या कल्पना कौशल्याचा कस लागल्याचे दिसते. बऱ्याचदा हे स्वप्नरंजन भासत असले तरी अशक्य नाही, याचीही जाणीव होते. शिवाय काही ठिकाणी शेकडो वर्षांनी विज्ञान याहीपेक्षा कितीतरी प्रगत असू शकते, हेही जाणवते.
एकंदरीत विज्ञान कथा वाचण्यासाठी एक सुंदर खजिना सुधा रिसबूड यांनी मराठी वाचकांसमोर या पुस्तकाद्वारे ठेवल्याचे या पुस्तकातून दिसते.