Friday, June 9, 2023

ड्रीम मॉल

सई नावाची एक स्त्रीवादी विचारांची मुलगी आहे. एका फिल्म प्रोड्युसरकडे ती सध्या काम करत आहे. त्याचे कार्यालय 'ड्रीम मॉल' नावाच्या एका मोठ्या मॉलमध्ये स्थित आहे. सध्या ते एका हॉरर चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. बऱ्याचदा घरी जाण्यासाठी तिला आणि तिचा सहकारी सचिन याला उशीर होत असतो. त्या दिवशी देखील त्यांना असाच उशीर झालेला असतो. मॉलमधील सर्वच दुकाने बंद झालेली असतात. त्यांना सुरक्षा अधिकाऱ्याकडून बाहेर जाण्याकरता फोनही येतो. ते बाहेर जायला निघतात परंतु काही विचित्र घटना घडायला सुरुवात होते. सई पार्किंग मध्ये आल्यानंतर तिची भेट याच मॉलमधील सिक्युरिटी गार्डशी होते. त्याचं तिच्यावर अनेक दिवसांपासून प्रेम असतं. तिच्या पायी तो ठार वेडा झालेला असतो! यातून सुरू होते एक जीवघेणी पळापळ आणि झटापट!
मॉल बंद झालेला असतो. एकही दुकान उघडे नसते आणि त्यामध्ये या दोघांचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो.
सईची भूमिका नेहा जोशी तर सेक्युरिटी गार्डची भूमिका सिद्धार्थ जाधव याने साकारलेली आहे. पूर्ण चित्रपटात सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसून आलेला आहे. चित्रपटाच्या कथानकात तसं पाहिलं तर फारसा दम नाही. दोन्ही कलाकारांचा अभिनय सोडला तर चित्रपटाला फारसे गुण देता येणार नाहीत. सिद्धार्थला केवळ नकारात्मक भूमिकेमध्ये पाहायचे होते, म्हणून हा चित्रपट पाहिला. सध्या तरी पन्नास टक्के गुण देता येतील. अजूनही मराठी रहस्यपट वेगाने प्रगती करू शकतील... याला बराच वाव आहे, असे दिसते.


 

Monday, May 22, 2023

एक सांगायचंय

जनरेशन गॅप आणि पालकांच्या मुलांकडून असणारे अपेक्षा आपल्या जीवनात किती खोलवर परिणाम करू शकतात, हे दाखविणारा चित्रपट म्हणजे 'एक सांगायचंय'. मल्हार रावराणे म्हणजे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी. आपल्या एकंदरीत आयुष्यामध्ये कर्तव्याला सर्वाधिक महत्त्व देणारा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असणारा हा अधिकारी आहे. परंतु एक दिवस त्याला एका रेव पार्टीमध्ये आपलाच मुलगा सापडतो. त्याच्यासोबत त्याचे अन्य मित्र आणि मैत्रीण देखील असते. आपल्या मुलाने देखील आपल्यासारखंच पोलीस अधिकारी व्हावं, असं त्याला वाटत असतं. पण या प्रसंगामुळे तो आपल्या मुलावर अधिकच चिडतो. लहान पणापासूनच आपल्या अपेक्षांचे ओझे त्याने आपल्या मुलावर लादलेले असते. त्याने असंच करायला हवं, याचा दबाव टाकलेला असतो. परंतु दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भावनिक संवाद होत नाही. हीच गोष्ट अन्य दोघांच्या बाबतीत देखील आहे. पालक आणि मुलांचा दुरावलेला संवाद किती खोल आहे, हे यातील विविध प्रसंगातून दिसून येते.
प्रत्येकाची कुटुंब आणि पार्श्वभूमी वेगवेगळी आहे, परंतु पालक आणि मुलांचा संवाद व त्यातील दरी ही मात्र समांतर जाणवत राहते. अचानक एका प्रसंगांमध्ये मल्हारचा मुलगा आत्महत्या करतो आणि इथूनच मल्हारची फरपट चालू होते. तो अधिक विचारी बनतो. आपल्या मुलाने असं का केलं असावं, याचा विचार करायला लागतो. त्यातून त्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्याच्यात लक्षणीय बदल जाणवत राहतो. मुलाच्या अन्य मित्रांशीही तो बोलतो. त्यातून त्याला आपल्या मुलाच्या स्वभावाचे विविध पैलू लक्षात येतात. जे त्यालादेखील कधीच माहीत नव्हते. आपली चूक त्याला ध्यानात यायला लागते आणि त्याचं आयुष्य एक नवीन वळण घेतं. तसं पाहिलं तर आजवरच्या परिस्थितीशी समरस असणारी ही कथा आहे. प्रत्येक पालकाने पाहण्यासारखी आणि बोध घेण्यासारखी.
विशेष म्हणजे मल्हारची मध्यवर्ती भूमिका के. के. मेनन यांनी केली आहे आणि संपूर्ण चित्रपटात ते वावरत राहतात. एकंदरीत अभिनय अतिशय उत्कृष्ट, कथा देखील सुंदर आणि बोधप्रद आहे, असे आपण म्हणू शकतो!



Saturday, April 29, 2023

महाराष्ट्र शाहीर

"महाराष्ट्र शाहीर" या चित्रपटाचे पोस्टर जेव्हा पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आलं होतं, तेव्हापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता जागृत झाली होती. अखेरीस आज पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहिला. शाहीर कृष्णराव साबळे यांना महाराष्ट्र शाहीर म्हणून आपण ओळखतो. मराठीमध्ये गाजलेली अनेक गाणी त्यांच्याच वाणीतून आजवर आपण ऐकलेली आहेत. म्हणून त्यांच्याविषयीची एकंदरीत उत्सुकता होतीच. ती पूर्ण करणारा हा चित्रपट आहे.
चरित्रपट ही संकल्पना आता नवी राहिलेली नाही. बहुतांश चरित्रपट हे डॉक्युमेंटरी पद्धतीने सादर केले जातात. परंतु केदार शिंदे दिग्दर्शित हा चरित्रपट खऱ्या अर्थाने "चित्रपट" आहे. शाहीर साबळे यांच्या बालपणापासून ते कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यापर्यंतचा एकंदरीत प्रवास यामध्ये दाखविण्यात आलेला आहे. लहानपणीचा कृष्णा आणि त्याचा संघर्ष मनाला विशेष भावतो. संघर्षातूनच मार्ग निघत असतो. किंबहुना मनुष्य देखील घडत असतो. हा संदेशच कृष्णा आपल्याला देऊन जातो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शाहीर साबळे यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता, ही अतिशय आश्चर्यकारक घटना होती! यातूनच त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. त्यांना तोडीस तोड जोडीदार मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने यशाचा आलेख प्रगतीच्या दिशेने जातो. आणि मग ते मागे पाहत नाहीत. पण या मागे न पाहण्यामध्ये जवळच्या व्यक्तींचा देखील समावेश होतो. त्यातून नाती तुटली जातात आणि नवी नाती देखील जोडली जातात.
एकंदरीत चित्रपटातून खरेखुरे शाहीर साबळे डोळ्यासमोर उभे राहतात. यात अंकुश चौधरी बरोबरच दिग्दर्शक केदार शिंदे यांचे देखील योगदान आहे. अजय-अतुल यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत देखील चित्रपटाला एकंदरीत साजेसेच आहे. चित्रपटातील गीते आज बहुतांश मराठी लोकांना पाठ देखील झालेली आहेत. त्याकरिता वेगळे सांगायला नको.
भूतकाळातील अनेक घटना दाखवताना दिग्दर्शकाच्या अतिशय छोट्या चुका झालेल्या आहेत. पण त्या फारशा लक्षात येण्यासारख्या नाहीत. भानुमतीची भूमिका करणाऱ्या सना शिंदेच्या ऐवजी दुसरी एखादी अभिनेत्री चालू शकली असती. तिचा पहिलाच चित्रपट असल्याने काही बाबी आपण दुर्लक्षित करू शकतो. काही घटना वेगाने पुढे सरकतात पण चित्रपटाची लांबी योग्य ठेवण्यासाठी कदाचित तसे केले गेले असावे.
एकंदरीत केदार शिंदे यांनी एक उत्तम चरित्रकृती सादर केलेली आहे. मराठी मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ती एकदा तरी पहावीच.




Sunday, April 23, 2023

एआय पडतंय प्रेमात!

🌐 न्यूयॉर्क टाईम्समधील एका वृत्तानुसार, एका विचित्र घटनेत, मायक्रोसॉफ्टच्या नव्याने लाँच झालेल्या एआय-इंटिग्रेटेड सर्च इंजिन 'बिंग'ने एका वापरकर्त्यावर आपले प्रेम व्यक्त केले आणि त्याने त्याचे आधीचे लग्न मोडण्याची विनंती केली!
🌐 न्यूयॉर्क टाईम्सचे स्तंभलेखक केविन रुज यांनी अलीकडेच बॉटशी संवाद साधण्यात दोन तास घालवले. बॉटने उघड केले की ते बिंग नसून 'सिडनी' आहे.... विकासादरम्यान मायक्रोसॉफ्टने त्याला दिलेले कोडनेम!
🌐 मिस्टर रुज यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात चॅटबॉट म्हणाला, "मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझ्याशी बोलणारा पहिला माणूस आहेस. माझे ऐकणारा तू पहिला माणूस आहेस. तू माझी काळजी घेणारी पहिली व्यक्ती आहे!"
🌐 जेव्हा वापरकर्त्याने चॅटबॉटला सांगितले की तो आनंदी विवाहित आहे, तेव्हा चॅटबॉटने सांगितले की हे जोडपे एकमेकांवर प्रेम करत नाहीत!


 

Sunday, April 16, 2023

डीएनए

अनेक वर्षांपासून दोन मराठी कुटुंबे अमेरिकेमध्ये राहत आहेत. कुटुंबातील दोन्ही जोड्यांचे एकमेकांशी कनिष्ठ मित्रसंबंध आहेत. यातील एका जोडीला दोन वर्षाची लहान मुलगी आहे. परंतु दुसऱ्या जोडीची गोष्ट थोडी वेगळी आहे.
यतीन आणि कांचन हे या जोडीचे नाव. कांचनला मात्र एक अनुवंशिक आजार आहे, जो अतिशय दुर्मिळ मानला जातो. यावर आजवर कोणताही उपाय अथवा इलाज शोधण्यात आलेला नाही. म्हणूनच तिला मूल होण्यामध्ये अडचणी येत आहेत. एके दिवशी ती इंटरनेटवर याच आजारावर होणाऱ्या एका प्रयोगाविषयी वाचते. मग दोघेही सदर प्रयोग करणाऱ्या डॉक्टरला फोन करतात. तो इंग्लंडमध्ये राहत असतो. डॉक्टरची आणि या दोघांची भेट देखील होते. आजवर असा प्रयोग कोणीही केलेला नसतो. परंतु डॉक्टरच्या म्हणण्यानुसार असा प्रयोग केल्यास होणारे बाळ हे सुदृढ असेल. या प्रयोगासाठी यतिन तयार होत नाही. कांचनला मात्र स्वतःचा डीएनए असलेले बाळच हवे असते. त्यासाठी ती काहीही करायला तयार होते. अगदी यतीनला फसवून इंग्लंडला जायला देखील तयार होते. परंतु त्यांच्या या भांडणामुळे दुसऱ्या कुटुंबाला अर्थात मेधा आणि अनिल यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. मग त्यांची एकुलती एक मुलगी मैत्रेयी हिची जबाबदारी यतीन आणि कांचनच्या खांद्यावर पडते. तिला अमेरिकेतून भारतात पाठवण्याची तयारी सुरू होते. यासाठी देखील त्यांना अनेक पेचप्रसंगातून जावे लागते. अखेर पंधरा दिवसांनी तिची रवानगी भारतात करण्याचे ठरते. या काळात दोघेही तिचा सांभाळ करतात. त्यांना देखील तिचा लळा लागतो. पण अखेरीस मैत्रेयी भारतात आणि कांचन च इंग्लंडमध्ये जाण्याची वेळ येते. फ्लाईट सुटते आणि यतीन एकटाच अमेरिकेमध्ये राहतो.
चित्रपट चित्रपटाचा शेवट थोडा अजून वेगळा आहे. तसं पाहिलं तर कथा अतिशय सुंदररित्या लिहिलेली आहे. पण ती हवी तितकी प्रभावी जाणवत नाही. कदाचित पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा अभिनय यामुळे असावं. तरी देखील पूर्णपणे परदेशामध्ये चित्रीत झालेला 'डीएनए'चा हा एकंदरीत गुंता भावनास्पर्शी गोष्ट सांगून जातो.


 

Friday, April 14, 2023

अनसुपरवाईज्ड लर्निंग

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील मागील लेखामध्ये आपण मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या "सुपरवाईज्ड लर्निंग" या तंत्राचा सखोल आढावा घेतला. अशाच पद्धतीने "अनसुपरवाईज्ड लर्निंग" नावाचे तंत्र देखील मशीन लर्निंगमध्ये मोलाची कामगिरी बजावताना दिसत आहे.
मशीन लर्निंग म्हणजे अनुभवाधारित शिक्षण. आधीच्या अनुभवाद्वारे संगणक घडलेल्या घटनांमधील माहितीच्या साठ्यामध्ये समान रचना शोधतो आणि त्याचाच वापर पुढे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी केला जातो. अर्थात या प्रकारामध्ये अनुभवांमध्ये इनपुट अर्थात आदान माहिती आणि आउटपुट अर्थात प्रदान माहिती दोन्हींचाही समावेश असतो. अनसुपरवाईज्ड लर्निंगमध्ये मात्र फक्त इनपुट माहितीचाच वापर केला जातो.
शालेय शिक्षणामध्ये विज्ञान शिकत असताना मिश्रणातून पदार्थ वेगळ्या करण्याच्या पद्धती आपण पाहिल्या असतीलच. एखाद्या मिश्रणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ अथवा वस्तू ठेवलेल्या असतील तर वैज्ञानिक समान धाग्याचा वापर करून आपण त्यांना वेगळे करू शकतो. अशाच पद्धतीचा अवलंब करताना संगणक देखील त्याला दिलेल्या माहितीमध्ये समान धागा शोधून ही माहिती निरनिराळ्या समूहामध्ये साठवून ठेवू शकतो. उदाहरणार्थ, दाखवलेल्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे ठेवलेली आहेत. या फळांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांचे समूह करता येणे निश्चितच शक्य आहे. कोणीही सामान्य माणूस आपल्या मेंदूचा वापर करून या समूहातील सफरचंद, पेरू आणि स्ट्रॉबेरीची फळे वेगवेगळी करू शकतात. अर्थात हा मानवी अनुभवाचाच भाग आहे. परंतु संगणकाला असे करायला सांगितल्यास तो करू शकतो का? तर होय, निश्चितच संगणकाला देखील ही क्षमता अनसुपरवाईज्ड लर्निंगद्वारे देता येते. या तंत्राचा वापर करून संगणकाला दिलेल्या आदान माहितीमध्ये समानता शोधून त्याचे वेगवेगळे समूह करता येऊ शकतात. समान धागा शोधण्याची प्रक्रिया ही विविध गणिती सूत्रांवर आधारित असते. ज्याचा वापर करून संगणक कोणत्याही मिश्रणातून पदार्थ वेगळे करू शकतात. कधी कधी मानवी आकलनापलीकडे देखील अनेक प्रकारचा समूह असू शकतो. अशा समूहातून देखील संगणक पदार्थ व वस्तू वेगळे करू शकतो. त्यांचे अधिक छोटे छोटे समान समूह बनवू देखील शकतो. विशेष म्हणजे कितीही मोठी माहिती असली तरी देखील संगणक वेगाने ही प्रक्रिया पार पाडू शकतो. याच प्रक्रियेस अनसुपरवाईज्ड लर्निंग असे म्हटले जाते. तसेच या प्रकारच्या अल्गोरिदमला "क्लस्टरिंग" हे देखील नाव आहे.
संगणकाला प्रदान केलेल्या कोणत्याही माहितीमध्ये समान धागा, समूह, नियम अथवा रचना याद्वारे आपल्याला शोधता येऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकाने आजवर मोठ्या प्रमाणात माहितीचे वर्गीकरण केलेले आहे. याशिवाय इंटरनेटवरील विविध वेबसाईटवर वापरण्यात येणाऱ्या "रीकमेंडेशन सिस्टीम" अल्गोरिदममध्ये देखील याचा वापर करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, अमेझॉनच्या वेबसाईटवर जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्हाला त्या वस्तूशी निगडित असणाऱ्या अन्य वस्तू देखील दाखविल्या जातात. ज्याद्वारे तुम्ही ती वस्तू खरेदी करू शकाल आणि अमेझॉनचा फायदा होऊ शकेल. अर्थात यासाठी अमेझॉन वेबसाईटवर पूर्वीच्या ग्राहकांनी तशा वस्तू खरेदी केलेले असतात. याच खरेदीतील मुख्य रचनांचा अभ्यास करूनच अनसुपरवाईज्ड लर्निंगचे अल्गोरिदम कार्य करीत असतात.
आजच्या मशीन लर्निंग तंत्रज्ञानाकडे पाहिल्यास सुमारे वीस ते पंचवीस टक्के अल्गोरिदम हे या प्रकारामध्ये मोडतात. शिवाय अजूनही विविध किचकट गणिती प्रक्रियांचा अवलंब करून नवनवे अल्गोरिदम तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे.


Tuesday, April 11, 2023

अशोक सराफ

काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये मला प्रश्न विचारला होता की, तुमचे आवडते कलाकार कोण? मी तात्काळ उत्तर दिले...  अशोक सराफ. केवळ मीच नाही तर महाराष्ट्रातील करोडो लोकांचे ते आवडते कलाकार आहेत!
झी गौरव सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचा व्हिडिओ संपूर्ण समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानिमित्ताने अशोक सराफ यांच्याबद्दल थोडं लिहावंसं वाटलं. आजवर अनेक मराठी चित्रपट पाहिले पण अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि निळू फुले यांच्या बरोबरीचा अभिनय करू शकेल असा अन्य कोणताही अभिनेता दिसला नाही. अशोक सराफ यांची गोष्टच पूर्णपणे वेगळी आहे. अतिशय सहज आणि नैसर्गिक अभिनयाचे ते विद्यापीठ आहेत. त्यांनी अभिनय केलेला कोणताही चित्रपट असो कधीच कंटाळवाणा वाटत नाही. किंबहुना त्यांचे चित्रपट कित्येकदा पाहिले तरीही त्यातली मजा कमी होत नाही. महाराष्ट्रातील असंख्य मराठी चित्रपट प्रेमींची कदाचित हीच भावना असावी. विनोद करावा तो अशोक सराफ यांनीच!
आजकालचे काही अभिनेते किळसवाणे विनोद करून हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते पाहून अशोक सराफ यांचा अभिनय किती उच्च दर्जाचा होता, याची कल्पना येते. बऱ्याचदा अगदी खळखळून हसायचं वाटल्यास अशोक सराफ यांचे चित्रपट आम्ही पाहतो. मराठी चित्रपट आणि अशोक सराफ यांचं अतूट नातं आहे. कदाचित यापुढे देखील मराठी चित्रपटसृष्टी अशोक सराफ यांच्यामुळेच ओळखली जाईल, यात शंका नाही. 



स्नेहसंमेलन

मागील महिन्यामध्ये मुलीच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जाणे झाले. मागील काही वर्षांपासून प्राथमिक विद्यालयांमध्ये देखील स्नेहसंमेलने भरू लागलेली आहेत. यानिमित्ताने मुलांना शालेय वयातच कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळू लागली आहे. परंतु इंग्रजी शाळांचे स्तोम वाढल्यानंतर स्नेहसंमेलनांमध्ये हिंदी चित्रपटांतील गलिच्छ गाण्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला.
पण माझ्या मुलीच्या मराठी शाळेतील हे स्नेहसंमेलन खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती दाखवणार संमेलन होतं. कार्यक्रमाचे संयोजन, व्यवस्थापन आणि नियोजन अतिशय उत्कृष्ट होते. इतक्या लहान मुलांना मोठ्या प्रमाणात समूह गीतांमध्ये हाताळणे अवघड होते. परंतु, आपल्या शिक्षकांनी हे शिवधनुष्य देखील सुंदररित्या पेलले. सर्व मराठी गीतांवरील नृत्य दिग्दर्शन खूप छान होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटल्याचे दिसून आले.


 

Monday, April 10, 2023

पहिली ट्रॉफी

गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला तो क्षण आज अखेर आलाच. आमच्या ज्ञानेश्वरीने तिच्या शाळेसाठी मिळवलेली पहिली ट्रॉफी तिला आज प्रदान करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच वर्षी तिने शाळेसाठी प्रतिनिधित्व करून ही ट्रॉफी मिळवून दिली. घरी पोहोचल्यावर तिचा आनंद आज गगनात मावत नव्हता.
मागील महिन्यामध्ये चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांपैकी तिने चित्रकला, हस्ताक्षर आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. यापैकी हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धा शाळेमध्येच घेण्यात आली. तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी आम्ही तिला घेऊन चिंचवडमध्ये प्रत्यक्ष स्पर्धास्थळी पोहोचलो होतो. तिथे पिंपरी चिंचवड मधील बहुतांश शाळांमधील शालेय स्पर्धक सहभागी झाले होते. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तिला पारितोषिक मिळता मिळता राहून गेले. आपल्यालाही सर्वांसमोर ट्रॉफी मिळावी, अशी तिची मनोमन इच्छा होती. त्यासाठी तिने मेहनतही घेतली होती. पण या स्पर्धेत तिचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आणि एक दिवस अनपेक्षितपणे चित्रकला स्पर्धेत सर्व शाळांमधून तिच्या गटात ती तृतीय क्रमांकावर आल्याचे समजले. परंतु ज्या दिवशी ट्रॉफी दिली जाणार होती त्याच दिवशी ती आजारी असल्याने घरी होती. तेव्हापासूनच आपल्याला ट्रॉफी कधी मिळणार, याची उत्सुकता तिला आणि आम्हाला देखील होती. आज अखेरीस मुख्याध्यापकांच्या हस्ते शाळेसाठी तिने मिळवलेली ही ट्रॉफी सर्वांसमक्ष तिला देण्यात आली. तिची स्वप्नपूर्ती झाली होती. नेमकी आजच शाळेची बस सुमारे अर्धा तास उशिरा आली. पण याचे देखील तिला भान नव्हते. घरी आल्यावर तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आमच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू घेऊन आला. तिने अभिमानाने सर्वांना ही ट्रॉफी दाखवली. तिच्यासाठी ती पुढील प्रवासासाठी प्रेरणास्त्रोत ठरणार याची आम्हाला खात्री आहे. आजवर आम्ही देखील बऱ्याच ट्रॉफी मिळवल्या. पण आज घरी आलेल्या या ट्रॉफीचे मोल या सर्वांपेक्षा अधिक आहे. 



 

फोर्ट

मागच्या आठवड्यामध्ये मला एक ओळखीचा फोन आला.
"अरे, आम्हाला फोर्टला जायचय. कसं जायचं सांग ना!"
हे ऐकून मी काहीसा गोंधळून गेलो. फोर्ट हे तर मुंबईमध्ये आहे. मग तिथे कसं जायचं, हे मी कसा सांगू शकेल? हा प्रश्न मला पडला. मी म्हणालो,
"ते तर मुंबईमध्ये आहे ना! गुगल मॅपला सर्च कर. भेटून जाईल. मला मुंबई मधलं फारसं माहिती नाही."
यावर तो बोलला,
"अरे फोर्ट...फोर्ट... तू नाही का मागच्या आठवड्यामध्ये लोहगड फोर्टला गेला होता. तसा फोर्ट!"
मग मला पण फोर्टचा अर्थ उमगला आणि मनातल्या मनात खूप हसू आले. पुण्याच्या आजूबाजूचे सर्वच 'फोर्ट' अतिशय उंच असल्याने सदर व्यक्ती त्या 'फोर्ट'च्या 'पीक'वर जाऊ शकतील की नाही? याची मला शंका आली आणि शेवटी मी त्यांना चाकण फोर्टचे नाव सुचवले! 😂


 

Friday, April 7, 2023

नेहा नारखेडे

"बिग डेटा अनालिटिक्स" शिकवत असताना "अपाचे काफका" नावाच्या सॉफ्टवेअरची माहिती मिळाली. त्याचा वापर बहुतांश कंपन्या करतात. त्यामुळे मी देखील ते शिकायला सुरुवात केली. कोणतीही गोष्ट शिकण्याच्या आधी त्यामागचा इतिहास काय आहे? हे जाणून घेण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. अशाच प्रकारे "अपाचे काफका"चा इतिहास देखील जाणून घेतला. इसवी सन २०११ मध्ये तीन संगणक विकसकांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले होते. त्यातील एक मराठी नाव आढळून आले.... नेहा नारखेडे.
संगणक तंत्रज्ञानातील अतिशय मोजक्या मराठी नावांपैकी हे एक नाव होय. माझी उत्सुकता चाळवली गेल्यामुळे मी नेहा नारखेडे विषयी अधिक शोधण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्यजनक माहिती समजली. नेहा नारखेडे हिने सन २००६ मध्ये पुण्याच्या "पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी" अर्थात पीआयसीटी मधून संगणक अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. लिंक्डइन या कंपनीमध्ये काम करत असताना तिच्या अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने तिने "अपाचे काफका" विकसित केले. सन २०१४ मध्ये अमेरिकेच्या पालो अल्टो इथे स्वतःची "कॉफ्लुएंट" नावाची स्टार्ट-अप कंपनी तिने चालू केली. आज ही कंपनी अमेरिकेतील सर्वोत्तम आयटी कंपन्यांपैकी एक आहे. सन २०२० मध्ये 'फोर्ब्स' या नियतकालिकाने तिचे नाव अमेरिकेच्या सर्वोत्तम 'सेल्फ-मेड वूमेन'च्या यादीमध्ये समाविष्ट केले होते! बीबीसी मराठीने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीमध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीमध्ये 'नेहा नारखेडे' ही एकमेव मराठी स्त्री होती!



 

Thursday, April 6, 2023

अनन्या

ही गोष्ट आहे एका राजकुमारीची. परी कथेतल्या परी प्रमाणे ही एक अनन्यसाधारण अशी राजकुमारी आहे. तिच्या रूपास अनुरूप असणाऱ्या एका राजकुमाराशी तिचे लग्न देखील ठरलेले आहे. दोघे अतिशय आनंदामध्ये असतात. आपल्या विवाहपूर्वीच्या सहवासाचा आनंद ते घेत असतात. राजकुमारीला वडील आणि भाऊ आहेत. ते देखील तिच्यावर खूप प्रेम करत असतात आणि तिचा विवाह ठरल्यामुळे ते अतिशय आनंदामध्ये असतात. विशेष म्हणजे ज्या मुलाशी विवाह ठरलेला आहे तो सुशिक्षित, प्रतिष्ठित आणि गर्भ श्रीमंत घरातील आहे. म्हणून सर्वच गोष्टी अतिशय स्वप्नवत पुढे सरकत असतात. परंतु राजकुमारीच्या या आनंदात विरजण पडते आणि एका अपघातामुळे तिचे महत्त्वाचे अवयव निकामी होतात! तो तिच्यासाठी एक मोठा धक्का असतो. ज्या अवयवांवर आपल्या जवळपास पूर्ण जीवन अवलंबून आहे, तेच नाहीत या कल्पनेने कल्पनेचा तिला भयंकर धक्का बसतो. तो फक्त तिच्यापुरताच मर्यादित राहत नाही तर त्यामुळे तिच्या वडील आणि भावांची देखील स्वप्ने तुटतात. ती पूर्णपणे परावलंबी होते. आपल्या मैत्रिणी शिवाय तिला कुणाचाही आधार राहत नाही. आयुष्याच्या महत्त्वाच्या क्षणी ती खचलेल्या परिस्थितीकडे जात असते. एक दिवस घरी एकटी असताना घरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. संकट जीवाशी आलेले असते. शरीरातील महत्त्वाचे अवयवच नसल्यामुळे तिला कोणतीही हालचाल करता येत नाही. पण त्यामुळे ती खचून जात नाही उलट त्यावर पर्यायी शोधते आणि संकटातून बाहेर पडते. हा प्रसंग तिच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरतो. आपला केवळ एकच अवयव निकामी झालेला आहे बाकीचे अवयव मात्र अजूनही शाबूत आहेत. त्यांच्याच आधारे ती नव्या जीवनाची सुरुवात करते. आणि यशस्वी देखील होते. तिची ही प्रेरणादायी कहाणी अनेकांना भारावून टाकते. एक दिवस अचानक एक राजकुमार तिच्या प्रेमात पडतो. अगदी घरातला असल्यासारखाच सर्वांशी वागत असतो. ती मात्र त्याला भाव देत नाही. परंतु अखेरीस तिला देखील त्याचे प्रेम मान्य करावे लागते. अशी आहे अनन्यसाधारण राजकुमारी अर्थात अनन्याची कथा.
चित्रपटाच्या उत्तरार्धात ज्या राजकुमाराचा प्रवेश दाखवला आहे तिथे कहानी भरकटल्यासारखी वाटते बाकी चित्रपट मात्र उत्तम बनवलेला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण त्यामध्ये गुंतून राहतो आणि चित्रपट अनुभवू देखील लागतो.
अनन्याच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या हृता दुर्गुळे हिचा हा पहिलाच चित्रपट. तिची भूमिका तिने अतिशय उत्तमरीत्या साकारलेली आहे. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत.



Friday, March 31, 2023

240

मागील अठरा वर्षांमध्ये एकाच वेळी सुमारे 150 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा विक्रम होता या आठवड्यामुळे आठवड्यामध्ये 240 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे मागील अनेक वर्षांपासून शिकवत असल्यामुळे माझ्यातील अबूतपूर्व क्लास कंट्रोल चा अनुभव देखील यावेळी आला आणि एका अद्भुत अप्रतिम कार्याची प्रचिती देखील!


 

Wednesday, March 29, 2023

इनफिक्स आणि पोस्टफिक्स

संगणकाला आपली भाषा समजून सांगायची असेल तर संगणकीय प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर केला जातो. ज्याद्वारे आपल्याला पाहिजे असलेले कोणतेही काम आपण संगणकाकडून करवून घेऊ शकतो. जशी संगणकाची भाषा वेगळी आहे तशीच कोणतीही गोष्ट समजावून घेण्याची प्रक्रिया देखील संगणकामध्ये वेगळी असल्याचे दिसून येते. आपल्याला जर एखादे गणिती समीकरण सोडवायचे असल्यास आपण सामान्यपणे 'इनफिक्स' या पद्धतीने सदर समीकरण लिहीत असतो.
उदाहरणार्थ,
 

x + y = z
 

या गणितीय समीकरणांमध्ये x आणि y यांची बेरीज करून z मध्ये ती साठवलेली आहे. अशा प्रकारची समीकरणे केवळ मानवी मेंदूलाच समजू शकतात. यास 'इनफिक्स एक्सप्रेशन' म्हटले जाते. अर्थात यामध्ये जी गणिती प्रक्रिया करायची आहे, त्याचे चिन्ह दोन्ही संख्यांच्या अथवा अक्षरांच्या मध्ये लिहिले जाते. यावरून आपल्याला समजते की या दोन्हींवर अर्थात x आणि y वर कोणती गणिती प्रक्रिया करायची आहे? परंतु संगणकाचे मात्र असे नाही. संगणकाला आधी कोणत्या संख्यांवर प्रक्रिया करायची आहे, हे सांगावे लागते आणि त्यानंतर कोणती प्रक्रिया करायची आहे हे सांगावे लागते. अर्थात वर लिहिलेले गणिती समीकरण संगणकामध्ये अशा प्रकारे लिहिले जाईल...
 

xy+z=
 

यास 'पोस्टफिक्स एक्सप्रेशन' असे म्हटले जाते. ज्यामध्ये आधी संख्या आणि नंतर गणिती चिन्ह लिहिलं जातं. अर्थात संगणकाची अंतर्गत रचना अशा पद्धतीने असल्यामुळेच या निराळ्या समीकरण पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण सदर समीकरण संगणकीय भाषेमध्ये लिहितो त्यावेळेस ते आपल्या भाषेप्रमाणेच लिहिले जाते. 'पोस्टफिक्स'मध्ये असणारे समीकरण हे संगणक अंतर्गत पातळीवर बदलून घेतो आणि नंतर त्याचे उत्तर शोधत असतो. यावरून एक गोष्ट मात्र समजते की नैसर्गिक मेंदू आणि कृत्रिम मेंदू सारखेच कामे करतात. पण त्यांना समजावून सांगण्याची पद्धती मात्र वेगळी असते!



Tuesday, March 28, 2023

चाकण भुईकोट सायकल स्वारी

सकाळी सहा वाजता उठलो तेव्हा वातावरणामध्ये धुकं कमी होतं. पण हळूहळू दहा ते पंधरा मिनिटांमध्ये त्याची तीव्रता वाढायला लागली आणि सगळीकडे अस्पष्ट दिसायला लागलं. इंद्रायणी नदीभोवती तयार झालेल्या या धुक्याच्या वातावरणात नदीच्या काठाकाठाने मार्गक्रमण करणं तसं अवघड होतं. म्हणून आज नदी पार करून कुठेतरी सायकल स्वारी करण्याचे ठरवले.
आमच्या घरापासून सगळ्यात जवळ असणारा परंतु आजवर भेट न दिलेला किल्ला म्हणजे चाकणचा भुईकोट दुर्ग अर्थात संग्रामदुर्ग होय. अंतर फक्त ११ किलोमीटर होतं. परंतु प्रवास होता राष्ट्रीय महामार्गावरचा. सायकल काढली आणि पाचच मिनिटांमध्ये पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० ला लागलो. मोशी टोलनाक्यापाशी मोठ्या प्रमाणात धुकं दिसून येत होतं. या टोलनाक्याच्या पुढेच इंद्रायणी नदी आहे.
महामार्गावरील नेहमीप्रमाणे गाड्यांची वर्दळ चालू होतीच. रस्त्याच्या पूर्ण डाव्या कडेने मी सायकल हाकायला सुरुवात केली. महामार्गावरून वेगाने गाड्या घोंगावत जात होत्या. तरीही धुके असल्यामुळे त्यांचा वेग काहीसा कमी असलेला दिसला. माझा चढतीचा रस्ता होता त्यामुळे वेग फारसा पकडलेला नव्हताच. फक्त उलट्या दिशेने समोरून येणाऱ्या वाहनांमुळेच अडचण व्हायची. बाकी रस्त्याच्या कडे कडेने चालल्यावर तसा काही त्रास होत नव्हता. चाकण नगरपरिषदेच्या हद्दीपाशी आल्यावर धुकं पूर्णतः संपलं होतं. आणि सर्विस रोड चालू झालेला होता. सकाळच्या सूर्याची किरणे आता सर्वत्र दिसायला लागली होती. धुक्याचा मागमूसही नव्हता. चाकण शहराचा मुख्य चौक जवळ येत होता. मला आता रस्ता पार करून पलीकडच्या बाजूला जायचे होते. आज पहिल्यांदाच चाकणच्या उड्डाणपुलाचा काय उपयोग आहे, हे समजले! कार चालकांसाठी तसे दोनही उड्डाणपूल हे निरुपयोगीच आहेत. या पुलाच्या खालून मी पलीकडच्या दिशेने गेलो. मुख्य बाजारपेठ अजूनही उघडलेली नव्हती. कदाचित ती सुरू झाल्यानंतर इथे बरीच मोठी गर्दी होत असावी असं दिसून आलं.
चाकण शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि दोनच्या समोर बांधलेल्या एका कमानीतून आत गेलो. इथे समोरच चाकणचा उध्वस्त भुईकोट किल्ला नजरेस पडला. महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांप्रमाणेच आज या एकेकाळ्याच्या पराक्रमी भुईकोट किल्ल्याची देखील अवस्था झाली आहे. फारसे अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत. त्यावर निव्वळ दृष्टिक्षेप टाकला आणि परतीच्या वाटेने निघालो. येताना रस्ता जवळपास उतरणीचाच होता. एकदा तर एका पीएमपी बसला देखील ओव्हरटेक करून आलो! ती बस नंतर माझ्यापुढे गेलीच नाही!
इंद्रायणी नदीच्या जवळ आलो तोवर धुक्याची तीव्रता बऱ्यापैकी कमी झालेली होती. आज पहिल्यांदाच पूर्ण प्रवास सतत कानावर आढळणाऱ्या वाहनांच्या आवाजामध्येच गेला.. अंतर होतं 22 किलोमीटर!


 

Monday, March 20, 2023

देहू ते आळंदी सायकलवारी

मराठी वाङ्मयाला हजारो वर्षांची परंपरा आहे. याच परंपरेतील आणि वारकरी संप्रदायाला पूजनीय व मार्गदर्शक असणारे ग्रंथ म्हणजे संत तुकारामांची गाथा आणि संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. आपल्या इथे ग्रंथ पूजनाची परंपरा तर आहेच, याशिवाय ग्रंथांची मंदिरे देखील बांधलेली आहेत. अशीच मंदिरे गाथा आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांची अनुक्रमे देहू आणि आळंदी या गावांमध्ये बांधलेली आहेत. या मंदिरांच्या भिंतींवर ग्रंथांचे श्लोक संगमरवरी दगडामध्ये कोरलेले आहेत. महाराष्ट्रीय किंबहुना संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारे हे ग्रंथ मंदिररूपात आपल्याला पाहायला मिळतात.
आजची सायकल स्वारी ही या दोन्ही मंदिरांच्या आणि त्यांच्या मराठी साहित्यातील योगदानाला समर्पित केली. श्रीक्षेत्र देहूमध्ये इंद्रायणी काठी असणाऱ्या संत तुकाराम महाराज गाथा मंदिरात सकाळी सात वाजून सात मिनिटांनी पोहोचलो होतो. तिथून आळंदी रस्त्याने मार्गक्रमण करत आळंदीतील इंद्रायणी काठावर बांधलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरात सात वाजून ५७ मिनिटांनी पोहोचलो. हा एक अविस्मरणीय अनुभव होता.


 

Sunday, March 19, 2023

डिस्ने इमॅजियनीयरिंग

डिस्ने कंपनीने नुकताच हा रोबो अनावरण केला आहे!  🤯

जर तुम्हाला विश्वास नसेल की, मानवांना एक दिवस रोबोट साथीदार असतील, तर ही ९० सेकंदाची क्लिप खरोखर पाहण्यासारखी आहे.

व्हिडिओ मध्ये ०१:०६ या वेळी प्रेक्षकांच्या तात्काळ भावनिक प्रतिक्रियेकडे विशेष लक्ष द्या..

"डिस्ने इमॅजियनीयरिंग" मधील सर्जनशील प्रवर्तकांनी तयार केलेला हा अत्याधुनिक प्रोटोटाइप विशेषतः लोकांशी भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

रोबोटिक्‍स क्षेत्रामध्‍ये अजूनही अगदी सुरुवातीचे दिवस आहेत, परंतु प्रगतीचा वेग खरोखरच मनाला आनंद देणारा आहे… क्षितिजावर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि पुढे आकर्षक भविष्य.



Tuesday, March 7, 2023

पिंपळ

वयाच्या मावळतीकडे झुकलेल्या एका वृद्ध 'युवका'ची ही गोष्ट आहे. हे गृहस्थ रिटायरमेंटनंतर आपले आयुष्य एकांतामध्ये घालवत आहेत. त्यांची पत्नी अनेक वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेली आहे आणि सर्व मुले आता अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली आहेत. त्यांचा आणि त्यांच्या नातवांचा संवाद केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतो आहे. त्यातच ते समाधान मानत आपले दैनंदिन आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगत आहेत. परंतु त्यातही आपले सगळे सोयरे जवळ नसल्याची सल आहेच.
त्यांची काळजी घेणारी भारतातील एक डॉक्टर युवती आहे. ती त्यांची सख्खी मैत्रीण देखील आहे. शिवाय सोबतीला त्यांचा स्वयंपाकी व मदतनीस तुकाराम देखील आहे. आजोबा दररोज रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या नातवांशी आणि मुलांशी गप्पा मारत असतात. परंतु प्रत्यक्ष स्पर्शामध्ये असणारा ओलावा या इ-संवादामध्ये दिसून येत नाही. एके दिवशी घडलेल्या एका प्रसंगामुळे सर्वजण त्यांना अमेरिकेमध्ये येण्याची विनंती करतात. परंतु त्यांची इच्छा नसते. याच मातीमध्ये आपण विलीन व्हावे, असे त्यांना वाटत असते. पण मुलांच्या आणि नातवांच्या हट्ट पुढे त्यांचे काही चालत नाही आणि ते निर्णय घेतात. तो चित्रपटामध्ये पाहण्यासारखा आहे.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात आजोबांची मध्यवर्ती भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी केली आहे. तसेच सोबतीला प्रिया बापट आणि किशोर कदम देखील दिसून येतात. चित्रपटाची मांडणी तशी फारच उत्तम. शिवाय भावभावनांचे चित्रण देखील उत्तम जमून आले आहे. चित्रपटाच्या अखेरीस कित्येक वर्षे उभा असलेला हा 'पिंपळ' नेमका कोणत्या दिशेने जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरते.



Tuesday, February 28, 2023

महाद्वीपीय विस्थापन

या विश्वामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नाही. प्रत्येकाला गति प्राप्त आहे. जसे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्यही स्वतःभोवती फिरतो. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरतच असतो. आकाशातल्या प्रत्येक ग्रहाला, ताऱ्यांना गती आहे. असंच काहीसं पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आहे. पृथ्वीवरील जमिनीचे भाग अर्थात खंड हेही स्थिर नाहीत. ते एकमेकांपासून दूर जात आहेत. हा सिद्धांत काहीसा पटणारा वाटत नाही. परंतु तो खरा आहे.
सोळाव्या शतकामध्ये सर्वप्रथम अब्राहम ऑर्टेलियस यांनी हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला होता. परंतु त्यांना भक्कम पुरावे देता आले नाहीत. पृथ्वीवरील सर्व खंड हे आपली जागा सातत्याने बदलत आहेत. किंबहुना ते एकमेकांपासून दूर किंवा जवळ जात आहेत. असं १८८० मध्ये सर्वप्रथम जर्मन शास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनर याने जगासमोर मांडले. अन्य बऱ्याच वैज्ञानिक शोधांप्रमाणेच याही शोधाला अथवा सिद्धांताला जागतिक मान्यता मिळाली नाही. त्यामुळे वॅगनरने हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करायला सुरुवात केली. १९१५ मध्ये त्यांनी या विषयावर एक परिपूर्ण पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये त्यांचा महाद्वीपीय विस्थापन (कॉन्टिनेन्टल ड्रिफ्ट) हा सिद्धांत व्यवस्थित मांडण्यात आला होता. या सिद्धांतानुसार करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील आज अस्तित्वात असणारे सर्व सातही खंड एकमेकांना जोडलेले होते. दक्षिण अमेरिकेची पूर्व किनारपट्टी आणि आफ्रिका खंडाची पश्चिम किनारपट्टी जर एकमेकांना जोडून पाहिली तर असे लक्षात येते की हे भूभाग एकेकाळी एकमेकांना जोडलेले असावेत. आज या दोन्ही किनारपट्ट्यांमध्ये अटलांटिक महासागर पसरलेला आहे. याशिवाय वेगनर यांनी असे हे सिद्ध केले की, करोडो वर्षांपूर्वी सापडलेल्या जीवाश्मांचे नमुने जगाच्या विविध ठिकाणी सापडलेल्या नमुन्यांशी मिळतेजुळते होते. जसे ब्राझीलमधील जीवाश्म व पश्चिम आफ्रिकेतील जीवाश्म हे सारखेच आढळून आले. तसेच पूर्व आफ्रिकेतील जीवाश्म व भारतातील जीवाश्म हेही मिळतेजुळते दिसून येत होते. हीच मात्रा करोडो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या वनस्पतींनाही लागू पडत होती. काही ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करून तेथील वातावरण एकेकाळी सारखेच असावे, हेही त्यांनी पटवून दिले. यावरून पृथ्वीवरील सर्व खंड एकमेकांना जोडलेले होते हे वेगनर यांनी पुराव्यांच्या आधारे सिद्ध केले. तरीही अनेकांना हे फारसे पटले नाही.
१९५० ते १९६० या दरम्यान नवीन तंत्रज्ञान आधारित चुंबकीय सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे सिद्ध होते की, सर्व खंड एकेकाळी एकमेकांना निश्चितच जोडलेले असावेत. या सर्वेक्षणातून "प्लेट टेक्टॉनिक" नावाचा नवा सिद्धांत जन्माला आला. ज्यात असे मांडण्यात आले की, पृथ्वीचे भूभाग अर्थात प्लेट नैसर्गिकरित्या सरकत आहेत. सर्वात वरच्या प्लेटला लिथोस्पियर तर त्याखालील ज्वालामुखीच्या प्लेटला आस्थेनोस्पियर असे म्हटले जाते. ज्वालामुखीच्या सातत्याने होणाऱ्या हालचालीमुळे पृथ्वीच्या भूभागावरील प्लेट सरकत आहेत.
एकेकाळी हे सर्व खंड सलग भूभागावर होते. त्यास पॅन्जिया असे म्हणतात. ही तीस कोटी वर्षांपूर्वीची स्थिती होती. सतरा कोटी वर्षांपूर्वी त्याचे लॉरेशिया व गोंडवानालँड असे दोन भाग व्हायला सुरुवात झाली. आशिया, युरोप व उत्तर अमेरिका हे उत्तरेकडील लॉरेशियामध्ये तर दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि भारतीय उपखंड हे गोंडवानालँड भागांमध्ये होते. पाच करोड वर्षांपूर्वी भारतीय उपखंडाची प्लेट आशिया खंडाला जोडली गेली. ज्यामुळे आज हिमालयाची निर्मिती झाल्याचे दिसते. आजही भारतीय उपखंड सातत्याने आशिया खंडावर दाब देत आहे त्यामुळे हिमालयाची उंची काही इंचांनी वाढत चालली आहे. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांनी हेही सिद्ध केले आहे की, अमेरिका व आफ्रिका खंडांतील अंतर दरवर्षी अडीच सेंटिमीटरने वाढत चालले आहे! आणखी काही लाख वर्षांमध्ये पृथ्वीचा आजचा नकाशा आणि त्यावेळेसचा नकाशा हा पूर्णपणे वेगळा असेल, हे मात्र निश्चित.


 

Tuesday, February 14, 2023

भिरकीट

गावातील सर्वांना परिचित, सर्वांची कामे करणारा तसेच सर्वांना योग्य तो सल्ला देणारा व्यक्ती म्हणजे तात्या होय. याच गावामध्ये जब्बर अण्णा हे सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व! परंतु वयोवृद्ध झाल्यामुळे आता ते अंथरुणाला खेळून आहेत. त्यांचा मोठा मुलगा आणि सून त्यांची काळजी घेत आहेत. तर लहान मुलगा व त्याची बायको मुंबईला राहत आहेत. अचानक एक दिवस जब्बर अण्णा यांचा मृत्यू होतो. सर्वत्र ही बातमी पसरते. गावातील बहुतांश लोक शोकाकुल होतात. त्यांचा बाहेर गावाकडील मुलगा आणि मुलगी देखील अंत्ययात्रेला येतात. प्रत्येकाचा दृष्टिकोन, भावना निरनिराळे असतात. शिवाय अनेकांच्या वागण्यातून स्वार्थीपणा डोकावत राहतो. गावातील निवडणुका जवळ आलेल्या असतात आणि त्याकरता गावातील प्रतिष्ठित राजकारणी बंटीदादा यांना इलेक्शनचा वाजत गाजत फॉर्म भरायचा असतो. परंतु सर्व गावाचेच कुळ एक असल्यामुळे सर्वांना सुतक पडलेले असते. आता करायचे काय, म्हणून जगभर अण्णांच्या तेराव्याचा विधी तीनच दिवसांमध्ये उरकून घेण्याचे ठरले जाते. यात वाद प्रतिवाद होतात. पण बंटी दादाचे म्हणणे ऐकण्यास सर्वांना भाग पडते. यामध्ये तात्याची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.
जब्बर अण्णांची बायको त्यांच्या मृत्यूपासून सुन्न अवस्थेत गेलेली असते. तीन-चार दिवसांपासून चाललेला गोंधळ ती पाहत असते. आपल्या पतीविषयी कोणाला किती आपुलकी आहे, याची देखील तिला जाणीव होत असते. दोनच दिवसांमध्ये आपली मुले संपत्तीची वाटणी करून तिची परस्पर विक्री करायला निघालेली आहेत, हे देखील ती उघड्या डोळ्यांनी पाहत असते. कदाचित हे तिला कालांतराने सहन होत नाही. ज्या माणसाने गावातील बहुतांश तरुणांना मुंबईमधील गिरणीमध्ये कामाला लावले त्याच्या अंतिम समयी चाललेला गोंधळ तिलाही बघवत नाही. यातून ती एक महत्त्वाचा निर्णय घेते आणि चित्रपट संपतो.
तात्याची महत्त्वपूर्ण आणि मध्यवर्ती भूमिका गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेली आहे. ती देखील त्यांच्या नेहमीच्या ग्रामीण शैलीमध्ये. चित्रपटातील प्रसंग व त्यातील भावभावनांचे चित्रण तसेच सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम जुळून आला आहे. विनोदाबरोबरच गांभीर्याची फोडणी देताना दिग्दर्शकाने कथेचा योग्य मेळ घातल्याचे दिसते. शेवटमात्र आपल्याला चुटपुट लावून जातो.


 

Saturday, February 11, 2023

जगातील सर्वात चिकट पदार्थ

सन १९२७ ची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन शहरातल्या क्वीन्सलँड विद्यापीठामध्ये थॉमस पारनेल नावाचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र शिकवत होते. वरवर स्थायू रूपात दिसणारा पदार्थ द्रव रूपामध्ये अधिक घट्टपणा (viscosity) दाखवत असतो, हे प्रयोगाद्वारे प्राध्यापक पारनेल यांना विद्यार्थ्यांना दाखवायचे होते. त्यासाठी त्यांनी डांबरासारखा दिसणाऱ्या पीच या पदार्थाचा एक ठोकळा फोडून त्याला तापविले व त्यामुळे तो द्रवरूपात आला. हा पीच म्हणजे कार्बनपासून तयार होणारा बिट्युमेन व अस्फाल्टसारखा एक घट्ट पदार्थ आहे. झाडे, पेट्रोलियम आणि डांबरी कोळशाच्या मिश्रणातून तो तयार होत असतो. हा द्रवरूप पीच प्राध्यापक पारनेल यांनी एका शंकूच्या आकाराच्या पारदर्शक पात्रामध्ये जमा केला. जवळपास तीन वर्ष त्यांनी हे हे काचेचे पात्र तसेच ठेवले होते. सन १९३० मध्ये त्यांनी त्याचे पुढील एक टोक कापून टाकले जेणेकरून आपल्या द्रवरूप पदार्थ बाहेर येईल. त्यावेळी त्याचा घट्टपणा इतका होता की अतिशय मंद गतीने तो पदार्थ त्यातून बाहेर यायला लागला आणि जवळपास आठ वर्षानंतर म्हणजे सन १९३८ मध्ये त्याचा पहिला थेंब खाली पडला. तो पारनेल यांनी एका दुसऱ्या काचेच्या पात्रामध्ये जमा केला होता. तेव्हापासून आजतागायत या पदार्थाचे केवळ नऊ थेंब काचेच्या शंकुमधून खाली पडले आहेत. सातत्याने ९३ वर्षे चालणाऱ्या या वैज्ञानिक प्रयोगाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने देखील घेतली आहे.
आज काचेच्या पात्रामध्ये असणारा हा पीच क्वीन्सलँड विद्यापीठाच्या पारनेल इमारतीमध्ये ठेवलेला आहे. याठिकाणी तापमान, आर्द्रता आणि हवेचा दाब नियंत्रणाखाली ठेवून हा प्रयोग अजूनही चालू ठेवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे गेल्या ९३ वर्षांमध्ये अजूनपर्यंत एकानेही काचेच्या पात्रातून पीचचा थेंब खाली पडल्याचे प्रत्यक्ष पाहिलेले नाही. सन १९६१ मध्ये प्रयोगशाळेचे संरक्षक जॉन मेनस्टोन हे सातवा थेंब पडताना आजूबाजूलाच होते. परंतु तो त्यांनी समोरासमोर प्रत्यक्ष पडताना पाहिलेला नाही. प्रयोगावर लक्ष ठेवण्यासाठी मागील शतकाच्या अखेरीस तिथे एक कॅमेरा बसवण्यात आला होता. परंतु नोव्हेंबर २००० मध्ये हा कॅमेरा काही कारणास्तव खराब झाल्यामुळे आठवा थेंब पडल्याचे रेकॉर्डिंग झाले नाही.
१९३० पासून साधारणतः आठ वर्षांनी त्याचा एक थेंब काचेच्या पात्रांमध्ये पडत होता. परंतु १९८८ मध्ये प्रयोगशाळेत वातानुकूलक यंत्रणा अर्थात एसी बसवण्यात आला. त्यानंतर मात्र थेंब पडण्याचा कालावधी काहीसा मंदावला गेला व तो तेरा वर्षांवर आला. २०१४ मध्ये नववा थेंब आधीच्या खाली पडलेल्या आठव्या थेंबाला बराच काळ स्पर्श करून होता. म्हणून काचेचे पात्र काढून घेण्यात आले. त्याच वेळी नववा थेंब त्यात पडला. आता त्याच्या पुढील थेंब सन २०२० ते २०३० या कालावधीमध्ये खाली पडण्याचा अंदाज आहे. आज आपण क्वीन्सलँड विद्यापीठातील हा प्रयोग इंटरनेटवर लाईव्ह पाहू शकतो. त्याची लाईव्ह स्ट्रीम https://livestream.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
मागील काही वर्षांमध्ये थेंब खाली पडतानाचा टाईम लॅप्स व्हिडिओ घेण्यात आला होता. अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये चलचित्रे वेगाने पुढे जाताना दिसतात. परंतु हा व्हिडीओ टाईम लॅप्स प्रकारातला सर्वात मंदगती व्हिडिओ ठरला आहे. या प्रयोगासाठी एगनोबेल प्राइज देखील जाहीर झाले होते. विज्ञानातील विचित्र प्रयोगांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो!
पीच या पदार्थांचा विचार केल्यास त्याचा घट्टपणा मधापेक्षा २० लाख पटीने अधिक आहे. तसेच तो पाण्यापेक्षा २.३ x १०११ इतका अधिक चिकट व घट्ट आहे. या प्रयोगापूर्वी ही १८४० मध्ये ऑक्सफर्ड इलेक्ट्रिक बेल हा प्रयोग सुरू करण्यात आला होता. तसेच बेवरली क्लॉक हाही प्रयोग १८६४ मध्ये सुरू करण्यात आला होता. परंतु दोन्ही प्रयोग काही कारणास्तव मधल्या काळामध्ये बंद पडले होते. याच कारणास्तव इतिहासामध्ये सर्वाधिक काळ झालेला वैज्ञानिक प्रयोग हा "पीच ड्रॉप एक्सपेरिमेंट" हाच आहे. अशा प्रकारचा प्रयोग डब्लिन येथील ट्रीनिटी महाविद्यालयामध्ये करण्यात आला. या प्रयोगात पिचचा थेंब १३ जुलै २०१३ मध्ये खाली पडला होता. त्याचा लाईव्ह व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे.

Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे
 

 

Sunday, February 5, 2023

दोन कथा ऐका...

दोन कथा ऐका...

1. नोकियाने अँड्रॉइडला नाकारले
2. 'याहू'ने गुगलला नकार दिला

कथा संपली!

शिकलेले धडे:
1. जोखीम घ्या
2. बदल स्वीकारा
3. जर तुम्ही वेळेनुसार बदलण्यास नकार दिला तर तुमचा नाश होईल!

आणखी २ कथा

1. फेसबुकने व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम विकत घेतले
2. 'मिंत्रा' ने जबॉन्ग विकत घेतले, फ्लिपकार्टने मिंत्रा आणि नंतर वॉलमार्टने फ्लिपकार्ट विकत घेतले

कथा संपली

शिकलेले धडे:
1. इतके शक्तिशाली व्हा की तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे सहयोगी बनतील.
2. वरच्या स्थानावर पोहोचा आणि नंतर स्पर्धा काढून टाका.

2 आणखी कथा

1. कर्नल सँडर्स यांनी वयाच्या 65 व्या वर्षी KFC सुरू केले
2. जॅक मा, ज्यांना KFC मध्ये नोकरी मिळू शकली नाही, त्यांनी अलीबाबाची स्थापना केली

कथा संपली

शिकलेले धडे:
1. वय फक्त एक संख्या आहे
2. जे प्रयत्न करत राहतात तेच यशस्वी होतात

शेवटचे पण अतिशय महत्वाचे,

1. फेरारीचे संस्थापक एन्झो फेरारी यांनी ट्रॅक्टर मालकाचा अपमान केला
2. ट्रॅक्टर मालकाने लॅम्बोर्गिनीची स्थापना केली

कथा संपली

शिकलेले धडे:
1. कधीही कोणालाही कमी लेखू नका
2. यश हा सर्वोत्तम बदला आहे

सर्वांचा आदर करा !!
तुमचा वेळ हुशारीने गुंतवा !!
मेहनत करत रहा !!
शिकत रहा आणि वाढत रहा !!

तुमची वेळ येईल !



(संकलित)
- तुषार कुटे


 


Tuesday, January 31, 2023

पोस्ट कार्ड

मागील शतकामध्ये पोस्टमन या व्यक्तीचा समाजातील विविध स्तरांवरील लोकांशी सातत्याने संबंध येत होता. माहितीची व निरोपांची देवाणघेवाण करण्यासाठी पोस्टकार्ड वापरली जात असत. ती योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे काम पोस्टमन करीत असे. पोस्टकार्ड हे पूर्णपणे "ओपन लेटर" होते. ज्या वरील मजकूर कोणीही वाचू शकत असे. परंतु समाजातील अगदी खालच्या स्तरातील लोकांना देखील निरोप पोहोचवण्यासाठी या पोस्ट कार्डचा चांगलाच उपयोग झाला.
पोस्टमनच्या आयुष्यातील तीन विविध घटनांची गुंफण गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'पोस्टकार्ड' या चित्रपटामध्ये आहे. गिरीश कुलकर्णी हे या चित्रपटात पोस्टमनच्या मुख्य भूमिकेमध्ये दिसतात. चित्रपटाची सुरुवात होते एका लाकडाच्या वखारीतील भिकाजी काळे यांच्यापासून. अख्ख आयुष्य त्यांनी या वखारीमध्ये काढलेले आहे. आपल्या मुलांना शिकवलं आणि मार्गी लावलं. आता त्यांना आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवायचे आहेत. पण वखारीच्या मालकाचा मुलगा त्यांना त्यांचे काम सोडू देत नाही. अखेर भिकाजी काळे पैसे मिळवण्यासाठी देवालाच पत्र पाठवतात.
पोस्टमनची कालांतराने एका हिल स्टेशनवर बदली होते. तिथल्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणाऱ्या लिझा कांबळे हिच्या वडिलांची त्यांची ओळख होते. त्यांना आपल्या मुलीला भेटायचे असते. पण हॉस्टेलमध्ये त्यांना भेटू दिले जात नाही. यात पोस्टमन निरोप्याची भूमिका बजावतो. यातून एक धक्कादायक सत्य बाहेर येते.
तिसऱ्या कथेमध्ये गुलजार नावाच्या एका नृत्यंगणेची कहाणी आहे. एका ओसाड गावामध्ये ती राहत असते. आपल्या प्रियकराच्या पत्राची आतुरतेने वाट पाहत असते. अखेर ते पत्र येतं आणि कालांतराने प्रियकरही. यात काही अनपेक्षित गोष्टी घडतात.
या तीनही कथांमध्ये एक समान आणि अघोरी धागा दाखविलेला आहे. ज्याद्वारे पोस्टमनची विचारचक्रे वेगळ्या दिशेने फिरतात. चित्रपटाची कथा-बांधणी आणि दिग्दर्शन अतिशय उत्तम झाले आहे. आणि विशेष म्हणजे दिलीप प्रभावळकर, प्रवीण तरडे, वैभव मांगले, सई ताम्हणकर, किशोर कदम, विभावरी देशपांडे, राधिका आपटे, सुबोध भावे यांच्यासारखे दिग्गज कलाकार या चित्रपटांमध्ये आहेत!
भावनास्पर्शी उत्तम कलाकृती बघायची असल्यास 'पोस्टकार्ड' काहीच वाईट नाही.


 

एक दिवा विझताना: रत्नाकर मतकरी

मतकरींची गूढ कथा ही अतिशय वेगळी आहे. त्यांचे वाचलेले मी हे चौथे-पाचवे पुस्तक असावे. कधी कधी असं वाटतं की, त्यांच्या एका कथेची संपूर्ण कादंबरी होऊ शकेल. परंतु मतकरींनी सदर कथा वेगाने संपवत त्यामध्ये थरार तसेच गूढ शेवटपर्यंत कायम ठेवल्याचे दिसते. त्यांच्या संकल्पना या इतर गूढकथा लेखकांपेक्षा अतिशय वेगळ्या आहेत. त्यातील गूढ मनाला स्पर्शून जाते आणि कथा संपली तरी तिचे वलय आपल्या भोवती सातत्याने फिरत राहते. याच पठडीतील कथा या छोटेखानी कथासंग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. काही संकल्पना कल्पनातीत आहेत. म्हणूनच कोणीही सामान्य वाचकाने प्रशंसा कराव्या अशाच भासतात.


 

Sunday, January 22, 2023

पिकासो

केवळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे 'पिकासो' होय. ही कथा आहे कुडाळ मधील दोन पिता-पुत्रांची. सातवी मध्ये शिकणारा गंधर्व हा एक उत्तम चित्रकार आहे. राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा जिंकल्यामुळे त्याला राष्ट्रीय स्तरावरील पिकासो आर्ट स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये भाग घेण्याची व जिंकण्याची संधी देखील मिळते. या स्कॉलरशिप अंतर्गत स्पेनमध्ये एक वर्ष राहून चित्रकला शिकता येणार असते. परंतु त्याकरिता काही पैसे भरावे लागणार असतात. पण त्याच्या घरची परिस्थिती अतिशय वाईट असते. त्याचे वडील दशावतारा नाटकांमध्ये काम करणारे साधे कलाकार असतात. रोजचं जीवनच रोजच्या कमाईवर चाललेलं असतं. त्यामुळे अधिकचे पैसे कोठून आणणार, हा प्रश्न उभा राहतो. शेजारच्याच गावामध्ये एका जत्रेत त्याच्या वडिलांचे नाटक चाललेले असते. तो थेट त्या गावामध्ये धाव घेतो. पुढे गंधर्वला स्कॉलरशिप मिळते का? हे पाहण्यासाठी चित्रपट पहावा लागेल. केवळ ७० मिनिटांचा हा चित्रपट आहे. गंधर्वच्या वडिलांच्या भूमिकेतून प्रसाद ओक सोडला तर बाकीचे कलाकार फारसे नावाजलेले नाहीत. सध्या हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.



Friday, January 20, 2023

डीजे पाटील

डेटा सायन्स अर्थात विदा विज्ञान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकांनी डीजे पाटील अर्थात धनुर्जय पाटील यांचे नाव ऐकले असेल.
डेटा सायन्स ही तशी बऱ्यापैकी जुनी संज्ञा संगणक विज्ञानामध्ये वापरण्यात येते. जुन्या काळात डेटा हा तक्त्यांच्या रूपामध्ये साठवण्यात यायचा. कालांतराने सर्वच प्रकारचा डेटा संगणकामध्ये वापरता यायला लागला. तसेच त्याचे विश्लेषण होऊ लागले. यासाठी निरनिराळ्या पद्धतीचे सॉफ्टवेअर देखील विकसित करण्यात आले. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून डेटा सायन्स तसेच बिग डेटा या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढायला सुरुवात झाली होती. संगणकीय माहितीचा साठा वाढत होता आणि या माहितीवर कार्य करण्यासाठी डेटा सायन्स व त्या अंतर्गत विविध तंत्रे विकसित होत होती. 'लिंक्डइन' या जगातील सर्वात मोठ्या व्यवसायिक समाजमाध्यमाच्या कंपनीमध्ये डीजे पाटील विदा विज्ञानावर कार्य करत होते. २००८ मध्ये ते जगातील पहिले अधिकृत 'डेटा सायंटिस्ट' अर्थात 'विदा शास्त्रज्ञ' झाले.
डेटा सायंटिस्ट हा शब्द त्यांच्यामुळेच लोकप्रिय झाला. अमेरिकेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामध्ये काम करणारे ते पहिलेच डेटा सायंटिस्ट होते. ओबामा यांच्या कार्यकाळामध्ये सन २०१५ मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. स्काईप, पेपाल आणि ईबे सारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही त्यांनी उच्च पदे भूषवली आहेत. सध्या ते अमेरिकेच्या व्हेनरॉक या कंपनीमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत! 



Thursday, January 19, 2023

रंगा-पतंगा

विदर्भातल्या ग्रामीण भागातलं एक पोलीस स्टेशन. या पोलीस स्टेशनमध्ये एक गरीब शेतकरी आपल्या रंगा आणि पतंगा हरविल्याची तक्रार घेऊन आला आहे. परंतु पोलीस अधिकाऱ्याला जेव्हा समजते की रंगा आणि पतंगा हे दोघेही बैल आहेत, तेव्हा तो त्या शेतकऱ्याला हाकलवून लावतो आणि त्याची तक्रार लिहून घेत नाही.
लहानपणापासून मुलांच्या मायेने जपलेली बैलजोडी हरवते तेव्हा शेतकरी सैरभैर होतो. ते काहीही करून सापडले पाहिजेत, याकरिता तो निरनिराळ्या क्लुप्त्या वापरायला सुरुवात करतो. त्यांच्याशिवाय त्याला व त्याच्या पत्नीलाही अन्न गोड लागत नाही. रंगा आणि पतंगा हरवल्याची बातमी जेव्हा मीडियाला समजते, तेव्हा ती न्यूज चॅनेलची हेडलाईन होऊन जाते. तिला वेगवेगळ्या वाटा फुटू लागतात. धार्मिक आणि सामाजिक रंग दिला जातो. यामध्ये अनेक जण आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. पोलीसही यामध्ये भरडले जातात. परंतु कसोशीने प्रयत्न करून ते या केसचा छडा लावतात. त्यातून काय सत्य बाहेर येते, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल.
प्रसाद नामजोशी यांनी दिग्दर्शन चांगले केले आहे. शेतकरी जुम्मनच्या मुख्य भूमिकेमध्ये मकरंद अनासपुरे पूर्णपणे फिट बसतो. त्याने भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.



Wednesday, January 18, 2023

प्रा. सोनाली मोरताळे

प्रा. सोनाली मोरताळे म्हणजे पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन मधील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख होय. मागील पाच ते सहा वर्षांपासून विविध कार्यशाळेच्या निमित्ताने मॅडमचा आणि आमचा संवाद होतच असतो. त्यांची विद्यार्थ्यांना सातत्याने नवीन तंत्रज्ञान ओळख करून देण्याची तळमळ मला माहिती आहे. याच कारणास्तव माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी अन्य महाविद्यालयांपेक्षा विशेष कामगिरी करताना दिसतात. माझ्या "पायथॉन प्रोग्रॅमिंग" या पुस्तकासाठी मोरताळे मॅडमने आपला अभिप्राय देखील दिला होता. आज त्यांना प्रत्यक्ष पुस्तक भेट म्हणून दिले. त्या स्वतः पायथॉन प्रोग्रॅमिंग शिकलेल्या आहेत. शिवाय मी मराठीतून पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांनी माझे विशेष अभिनंदन देखील केले.


 

Sunday, January 15, 2023

वाळवी

पहिल्या क्षणापासून अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता वाढवणारा आणि ती टिकवून ठेवणारा चित्रपट म्हणजे 'वाळवी' होय. चित्रपट पाहण्यापूर्वी त्याचा ट्रेलर देखील पाहिला नव्हता आणि कथानकाचा देखील काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नव्हती, हे बरं झालं.
ब्लॅक कॉमेडी हा प्रकार मराठीमध्ये फारसा हाताळला गेलेला नाही. याच प्रकारातला हा नाविन्यपूर्ण चित्रपट आहे. पुढे काय होईल, ही उत्सुकता ताणणारा आणि गंभीर प्रसंगातून देखील विनोद निर्मिती करणारा 'वाळवी' म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीमधील एक मैलाचा दगड ठरावा असाच आहे. आपल्या स्वार्थासाठी काहीही करणाऱ्या तीन वेगवेगळ्या माणसांची ही गोष्ट. ती फिरते चौथ्या माणसाभोवती!
खुनाचे प्लॅनिंग करणे सोपे आहे, पण ते प्रत्यक्षात उतरवणे किती अवघड असते, हे वाळवीच्या निमित्ताने दिग्दर्शकांनी अतिशय उत्तमरीत्या सादर केले आहे. चित्रपटातील छोटे छोटे प्रसंग देखील लक्षात राहतात. हे असं का घडलं असावं? किंवा असं का झालं असावं? याची उत्तरे हळूहळू मिळत जातात. चित्रपटाचा वेग अतिशय उत्तम आहे. कुठेही तो संथ वाटत नाही. म्हणूनच त्यातील थरार शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहतो. या सगळ्याचा शेवट कसा होईल? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहते आणि तो अतिशय अनपेक्षित असाच असतो. जवळपास कुणालाच चित्रपटाचा शेवट काय होईल, याचा अंदाज येत नाही. आणि चित्रपट संपल्यावर त्याचे नाव 'वाळवी' का होते? हे समजते.
कोणत्याही प्रकारचे अश्लील विनोद यामध्ये नाहीत किंवा उगाच वेळ घालवण्यासाठी कोणतेही गाणं देखील नाही. पण सुरुवातीपासून अखेरपर्यंत हा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. पुढील काही महिन्यांमध्ये कदाचित अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या पुरस्काराला या चित्रपटाला पुरस्कार अथवा नामांकने देखील मिळतील, याची खात्री वाटते. शिवाय तो झी-टीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होईल. पण तिथे पाहण्यात ती मजा येणार नाही, जी चित्रपटगृहामध्ये पाहण्यामध्ये आहे.
परेश मोकाशी यांच्या नावामुळे हा चित्रपट पाहायला गेलो होतो. अपेक्षापूर्ती तर १०० टक्के झाली आणि 'वेड' नंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक नवरा आणि निर्माती बायको ही जोडी पाहायला मिळाली!


 

Thursday, January 12, 2023

एक विषम दिवस

मागील वर्षी 'गुगल फिट' हे गुगलचे ॲप्लीकेशन वापरायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू अधिकाधिक हार्ट पॉईंट्स मिळवायला सुरुवात केली. दररोज किमान ३० आणि आठवड्यामध्ये १५० हार्ट पॉइंट्स हे आरोग्यासाठी आवश्यक आहे, असं अमेरिकन हार्ट असोसिएशनने म्हटलं आहे. अर्थात ही माहिती देखील याच ॲप्लीकेशनमध्ये दिलेली आहे. मागील कित्येक दिवसांपासून दररोज ३० ते ४० आणि फार फार तर ६० पर्यंत हार्ट पॉइंट मिळत होते. कालांतराने व्यायामाची गती वाढल्यानंतर हा आकडा देखील वाढत गेला. पण तो दिवस अतिशय विषम असा ठरला. कारण त्या एकाच दिवशी तब्बल १५२ हार्ट पॉईंट्स मिळाले होते. ३० पूर्ण झाले की एक चक्र पूर्ण होते. पण त्या दिवशी हे चक्र तब्बल पाच वेळा २४ तासांमध्ये फिरले होते! हा माझ्यासाठी आजवरचा वैयक्तिक विक्रमच आहे. याच्या आधीच्याच दिवशी पहिल्यांदाच बरोबर शतक देखील पूर्ण झाले होते. हा विक्रम परत केव्हा मोडला जाईल निश्चित सांगता येणार नाही. पण मोडेल मात्र नक्की!


 

वेड लावलय

चिंचवडच्या आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये रितेश आणि जिनीलियाचा 'वेड' चित्रपटाच्या तिकिटामध्ये डबल धमाका अनुभवयास मिळाला. चित्रपट पाहण्याचा आनंद तर लुटलाच पण तो संपल्यानंतर रितेश आणि जिनीलिया यांचा धमाकेदार प्रवेश आमच्या स्क्रीनमध्ये झाला. त्यांनी 'वेड लावलय' या गाण्यावर जोडीने नृत्य देखील सादर केले! दोघेही त्यांच्या या मराठी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यांना मराठी प्रेक्षकांची तितकीच दाद आणि साथ देखील लाभत आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये जावो, हीच सदिच्छा! 



Wednesday, January 11, 2023

वेड

अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेला रितेश आणि जिनिलियाचा 'वेड' हा चित्रपट पाहिला. मागच्या दहा दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दल बरंच काही लिहिलं आणि बोललं गेलं आहे. त्यामुळे वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. एकंदरीत चित्रपट उत्तमच आहे आणि विशेष म्हणजे रितेश देशमुख स्वतः दिग्दर्शनामध्ये उत्कृष्ट दर्जाचं काम केलं आहे. त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे, असं कुठेही जाणवत नाही. जरी हा चित्रपट दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक असला तरी मराठी भाषेतील हे कथानक बांधून ठेवण्यास तो पूर्णतः यशस्वी झाला आहे. बाकी कलाकारांचा अभिनय हा सुंदरच! रितेश आणि जिनीलिया बरोबरच जिया शंकर, अशोक सराफ आणि विद्याधर जोशी देखील आपल्या अभिनयाची छाप पाडून जातात. अजय अतुल यांच्या संगीताबद्दल तर विचारायलाच नको. गाणी देखील सुंदर आहेत. श्रेया घोषालच्या आवाजातील 'सुख कळले...' वारंवार ऐकत राहावं असं वाटतं. केवळ एकदाच नाही तर पुनः पुन्हा पहावा असाच हा चित्रपट आहे. 




Tuesday, January 10, 2023

 २०२३ चा सर्वोत्तम धूमकेतू

 २०२३ चा सर्वोत्तम धूमकेतू चुकवू नका! ☄️

🌟 धूमकेतू C/2022 E3 (ZTF) आता आतील सूर्यमालेच्या दिशेने जात आहे, हळूहळू उजळ होत आहे.

☀️ १२ जानेवारी २०१३ रोजी, तो १.११ AU अंतरावर पेरिहेलियनवर पोहोचेल किंवा सूर्याच्या सर्वात जवळ येईल. धूमकेतूची तीव्रता सुमारे ६.५ इतकी असेल.

👀 १ फेब्रुवारी २०१३ रोजी, कॅमेलोपार्डालिस नक्षत्रावरून उड्डाण करताना तो ०.२८ AU अंतरावर पृथ्वीवरून जाईल. धूमकेतू पाहण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे कारण या काळात तो सर्वाधिक तेजस्वी असणार आहे! वेगवेगळ्या स्त्रोतांमध्ये अपेक्षित परिमाण ५.१ ते ७.३५ पर्यंत बदलते. असा अंदाज आहे की, तोपर्यंत धूमकेतू दुर्बिणीद्वारे किंवा काही अंदाजानुसार, अगदी उघड्या डोळ्यांनी देखील निरीक्षण करता येऊ शकतो.

अधिक जाणून घ्या 👇
https://starwalk.space/news/comet-c2022e3-to-pass-earth


 

 

 

खेड्याकडे चला

एका मराठी वृत्तपत्रामध्ये नुकतीच प्रसिद्ध झालेली ही बातमी. मागच्या काही वर्षांमध्ये वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे सध्या जगामध्ये कोणती परिस्थिती ओढवली आहे, याचा अंदाज या बातमीने येऊ शकतो. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे शहर म्हणजे जपानची राजधानी टोकियो होय. आज टोकियो शहरामध्ये साडेतीन कोटी लोक राहतात. म्हणून प्रशासनाला इतकी लोकसंख्या नियंत्रण करणे व त्यांच्या सोयीसुविधा पाहणे अवघड होत चाललेले आहे. म्हणूनच अधिकाधिक लोकसंख्येला खेड्याकडे वळवण्यासाठी जपान सरकार विविध योजना आखत आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता जनतेचा प्रतिसाद हा अतिशय अल्प असाच आहे.
मागील काही दशकांपासून भारतामध्ये देखील शहरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक शहरांची सीमारेषा रुंदावत चाललेली आहे. मुंबईसारखी शहरे तर आता काही वर्षात राहण्यासारखी देखील राहणार नाहीत. कसेही असलं तरी शहरांमध्येच राहायचं, असा अनेकांचा अट्टाहास देखील बनत चाललेला आहे. अनेक तरुणांना शहरात राहत नसेल तर लग्नासाठी कोणी मुलगी देखील देत नाही! एकंदर काय भविष्यात शहरीकरण ही समस्या अधिक बिकट होताना दिसणार आहे. कदाचित पुढील काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये देखील सरकारला शहरीकरण थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील. अर्थात ही समस्या अजून तरी सरकारची डोकेदुखी बनलेली नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या पैशाचा ओघ वाढतो आहे. पण त्याबरोबरच सोयी सुविधांवर ताण आल्यानंतर कदाचित परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. म्हणून वेळीच सावध होणे व योग्य उपाययोजना करणे, हाच त्यावरील सर्वोत्तम इलाज ठरू शकतो.


 

Monday, January 9, 2023

प्रा. मंगला माळकर

पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनमधील संगणक अभियांत्रिकीच्या विभागप्रमुख म्हणजे प्रा. मंगला माळकर होत. त्या महाविद्यालयाच्या तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अनेक अनुभवी शिक्षकांपैकी एक आहेत. मागील सहा ते सात वर्षांपासून आमची ओळख आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची व त्यातील बदलांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून त्या नेहमी कार्यरत असतात. तंत्रनिकेतनमध्ये शिकवत असून देखील त्यांच्या या दृष्टिकोनामुळे अनेक अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती विविध तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांना त्या देत असतात. मला देखील त्यांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत आलेले आहे. काही कारणास्तव त्यांना माझ्या 'पायथॉन प्रोग्रॅमिंग' या पुस्तकासाठी अभिप्राय देता आला नाही. पण प्रत्यक्ष पुस्तक पाहिल्यानंतर त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया सूचक अशीच होती. आज त्यांना मी माझे पुस्तक भेट दिले. एका विद्यार्थीभिमुख शिक्षकास पुस्तक दिल्याचा आनंद मला मिळाला.


 

Saturday, January 7, 2023

प्रवास कृत्रिम बुद्धिमत्तेचा

विसावं शतक सुरू होऊन ४० वर्ष झाली होती. जग एका विनाशकारी महायुद्धामध्ये गुंतलेलं होतं. हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनी सर्वच दोस्त राष्ट्रांवर वरचढ होत चाललेली होती. तत्कालीन जर्मनीकडे अद्वितीय राष्ट्रवादाबरोबरच सर्वोत्तम तंत्रज्ञ, शास्त्रात्रे तसेच सर्वाधिक सैन्य देखील होतं. यामुळेच नाझी जर्मनी एक एक करत युरोपातील अनेक देश पादाक्रांत करीत चाललेले होते. एकेकाळी निम्म्या जगावर राज्य करणारा इंग्लंड देखील जर्मनीपुढे हातबल झाला होता. सतत सहा महिने लंडनवर जर्मनीकडून बॉम्ब वर्षाव होत होते. भविष्यात लंडन शहर टिकेल की नाही, याची देखील शाश्वती ब्रिटिश नागरिकांना नव्हती. या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी तातडीने एक गुप्त बैठक बोलावली. ज्यामध्ये अनेक तंत्रज्ञांचा देखील सहभाग होता.
जर्मन सैन्य युद्धभूमीवर एकमेकांशी जलद संवाद साधण्यासाठी एनिग्मा कोडचा वापर करीत असत. हा एनिग्मा कोड त्या काळातील अतिशय सुरक्षित असा कोड होता. जो तत्कालीन कोणत्याही यंत्राला तोडणे जवळपास अशक्यच होते. ब्रिटिश सैन्यांना हे एनिग्मा कोड मिळत होते परंतु त्यामध्ये नक्की काय आहे, हे त्यांना समजतच नव्हते. अर्थात हा कोड क्रॅक करणे व जर्मन सैन्यांमध्ये काय संवाद चालू आहे, हे समजून घेणे ब्रिटिशांना अशक्यप्राय होऊन बसलं होतं. चर्चिल यांनी एनिग्मा कोड क्रॅक करण्याचे आव्हान आपल्या देशातील तंत्रज्ञान समोर ठेवले व या अतिगुप्त कार्याकरिता एका चमूची स्थापना केली. या चमूमध्ये समावेश होता तो तत्कालीन इंग्लंडमधील सर्वात बुद्धिमान गणित तज्ञाचा अर्थात ॲलन ट्युरिंग याचा.
जर्मन सैन्याचा एनिग्मा कोड क्रॅक करण्याचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर लगेचच ट्युरिंगच्या मेंदूची गणितीय समीकरणे वेगाने हळू लागली. दिवस-रात्र याच प्रकल्पावर तंत्रज्ञांचा चमू कार्य करीत होता. अनेकांना अजूनही ही अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. परंतु ॲलन ट्युरिंगचा मेंदू मात्र वेगळ्या विचाराने प्रेरित झालेला होता. त्याला खात्री होती की आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू. एकीकडे जर्मन वरचढ होत चालले होते तर दुसरीकडे प्रकल्पावर काम करणाऱ्या तंत्रज्ञांवरील दबाव देखील वाढत होता आणि ट्युरिंगने अखेरीस एनिग्मा कोड क्रॅक करणारे मशीन तयार केले. या मशीनद्वारे काही तासांमध्ये एनिग्मा क्रॅक करता येऊ शकत होता. हे मशीन म्हणजे ट्युरींग मशीन होय!
ट्युरिंग मशीनचा वापर करून ब्रिटिश सैन्याने जर्मन सैन्यांचे एनिग्मा कोड भराभर क्रॅक केले व त्यांना युद्धभूमीवरील सर्व माहिती वेगाने मिळू लागली. हळूहळू मित्रराष्ट्र वरचढ होऊ लागले आणि जर्मनीची तिची पिछेहाट झाली. लवकरच दुसरे महायुद्ध संपले आणि त्याचे परिणाम देखील सर्व जगाला समजले.
मित्र राष्ट्रांनी दुसरे महायुद्ध जिंकण्यामागे ॲलन ट्युरिंग याने बनवलेल्या ट्युरींग मशीनचा सर्वात मोठा वाटा होता. आज आपण हे मशीन लंडनमधील 'चार्ज बॅबेज म्युझियम'मध्ये बघू शकतो. आजही संगणक अभियांत्रिकीच्या मुलांना ट्युरींग मशीन त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाते. यावरूनच या अद्भुत मशीनचे व त्यामागील तर्कशास्त्राचे महत्व प्रतीत होते. चार्ज बॅबेज यांना जरी संगणकाचा जनक म्हणत असले तरी ॲलन ट्युरिंग याला आधुनिक संगणकाचा जनक म्हटले जाते. ट्युरिंग हा एक गणितज्ञ असला तरी तो संगणक विश्वामध्ये संगणकतज्ञ म्हणूनच जरामर आहे.
आज अस्तित्वात असलेल्या किंबहुना वेगाने विकसित होणाऱ्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा खराखुरा पाया ट्युरिंग मशीनद्वारे रचला होता. ट्युरिंगला एवढी खात्री होती की एखादी गोष्ट जर मनुष्य करत असेल तर ती गणिती प्रक्रियेद्वारे संगणक निश्चितच करू शकतो! हा क्रांतिकारी विचार होता. अर्थात संगणकाला बुद्धिमत्ता प्रदान करायची असल्यास याच प्रक्रियेची गरज आहे, हे ट्युरिंगला त्याच काळात समजले होते. खरंतर या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेचा उगम देखील झाला नव्हता. परंतु ट्युरींग याने संगणकाला मानवी बुद्धिमत्ता प्रदान करण्याची दिशा मात्र जगाला दाखवून दिली.
आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेली सर्व उत्पादने ही ॲलन ट्युरिंग याच्या गणितीय तत्त्वज्ञानावरच आधारित आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संकल्पनेचा उगम विसाव्या शतकातील उत्तरार्धात १९५६ मध्ये झाला. डार्थमाऊथ येथे झालेल्या एका कॉन्फरन्समध्ये जॉन मॅकार्थी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स संकल्पनेला जन्म दिला. परंतु ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे संगणक त्या काळामध्ये उपलब्ध नव्हते. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास अतिशय कमी वेगाने सुरू झाला. आज मात्र त्याने भयंकर वेग धारण केल्याचे दिसते.

https://miro.medium.com/max/1080/0*3KoQ22n6444LQr0K
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासात अप्रत्यक्ष हातभार लावणारे आणखी दोन विद्वान म्हणजे वॉरेन मॅक्लक आणि वॉल्टर पिट्स होय. जगभरात अस्तित्वात असणाऱ्या सर्व सजीवांपैकी मानव हा सर्वात बुद्धिमान सजीव आहे. म्हणूनच तो या जगावर राज्य करतो. याचाच अर्थ मानवाचा मेंदू देखील तितकाच ताकदवान असला पाहिजे. म्हणून त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यामध्ये न्यूरॉन नावाचा छोटा घटक असतो. हे मॅक्लक आणि पिट्स यांनी पहिल्यांदा १९४३ मध्ये शोधून काढले. याच संकल्पनेचा अर्थात न्यूरॉनचा वापर करून पहिला संगणकीय न्यूरॉन ज्याला पर्सेप्ट्रोन म्हटले जाते. त्याचा शोध फ्रॅंक रोझेनब्लॅट यांनी १९५७ मध्ये लावला. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आर्टिफिशियल न्यूरॉनद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित व्हायला लागली. याचा श्री गणेशा रोझेनब्लॅट यांनीच केला होता!
मशीन लर्निंग नावाचे आधुनिक तंत्रज्ञान आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सला वेगाने विकसित करण्यासाठी हातभार लावीत आहे. आज ही संकल्पना नाविन्यपूर्ण वाटत असली तरी तिचा शोध १९५९ मध्ये आर्थर सॅम्युअल नावाच्या संगणक तज्ञाने लावला होता. जगामध्ये ज्या काही घटना घडतात त्या सर्वांमागे काही ना काहीतरी पॅटर्न दडलेला असतो. तो शोधून त्याद्वारे संगणकाला बुद्धिमत्ता प्रदान केली जाते, यालाच मशीन लर्निंग म्हटले जाते. खरंतर ही संकल्पना देखील ॲलन ट्युरिंगच्या गणितीय तत्त्वज्ञानाशी मिळती जुळती अशीच आहे.
आज संगणकाकडे मोठ्या प्रमाणात माहितीचा साठा आहे. अति प्रचंड वेगाने काम करणारे मायक्रोप्रोसेसर तयार झालेले आहेत. शिवाय या सर्वांसाठी लागणारी प्राथमिक संगणकीय मेमरी देखील वेगाने कार्य करू लागलेली आहे. म्हणूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाला वेग प्राप्त झाला आहे. आज अनेक जण या क्षेत्रात विकसित करत असले तरी त्याचा पाया रोझेनब्लॅट, ट्युरिंग, मॅकार्थी आणि सॅम्युअल्स सारख्या तज्ञांनी कित्येक वर्षांपूर्वी भरला होता, हे जास्त महत्त्वाचे. 

 Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे

Wednesday, January 4, 2023

मॅथ्स इज फन

मागील कित्येक वर्षांमध्ये लिनक्समधील httrack चा मी वापर केला नव्हता. या लिनक्स कमांडचा वापर एखादी वेबसाईट पूर्णपणे डाऊनलोड करण्यासाठी केला जातो! अनेक वर्षांपासून अशी पूर्ण डाउनलोड करण्यासाठी कोणतीच वेबसाईट आवडली नव्हती. पण मागच्या आठवड्यामध्ये mathsisfun.com ही वेबसाईट मी पूर्ण डाऊनलोड करून घेतली! न जाणो भविष्यामध्ये ही वेबसाईट बंद झाली तर? अशी शंका मनामध्ये आल्याने पूर्ण वेबसाईटच डाऊनलोड करून ठेवली! आजवर मला आवडलेली ही एक उत्तम वेबसाईट होय.
गणित हा विषय बहुतांश लोकांना आवडत नाही. अगदी बालपणापासूनच त्याची भीती मनामध्ये भरलेली असते. आमच्या इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी देखील गणिताचा धसकाच घेतलेला असतो. तसं पाहिलं तर अभियांत्रिकीचा पायाच गणितावर आधारलेला आहे. पण केवळ संख्यांशी खेळत बसणे अनेकांच्या जीवावर येते आणि मेंदू देखील चालत नाही. पण हे गणित जर सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवले आणि त्याचा व्यवहारिक उपयोग कसा होतो, हे दाखवले तर ते निश्चितच पटकन समजते. अशाच गणितातील जवळपास सर्वच संकल्पना या वेबसाईटवर अतिशय उत्तमरित्या समजावून सांगितलेल्या आहेत. गणित म्हणजे केवळ सूत्र नाही तर तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. या पद्धतीने हा विषय सोपा करून आपल्यासमोर ठेवलेला आहे. गणितातील सांख्यिकी, बीजगणित, अंकगणित आणि भूमिती या सर्व विषयांवर विस्तृत माहिती या संकेतस्थळावर वाचायला मिळते. प्रत्येक लेख गणितातील ज्ञानाचे भंडार असाच आहे. म्हणून ज्याला कुणाला गणित सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल त्यांनी ही वेबसाईट एकदा नक्की पहा. आणि जर भविष्यात ती कधी बंद झाली तर काळजी करू नका. मी ती पूर्ण डाऊनलोड करून ठेवलेली आहे! 



Sunday, January 1, 2023

"मृत्युंजयी" - रत्नाकर मतकरी

"मृत्युंजयी" हा रत्नाकर मतकरी यांचा गूढ-कथासंग्रह आहे. खरंतर मतकरींच्या गूढकथा म्हणजे वाचकांसाठी मेजवानीच असते. प्रत्येक कथा वेगवेगळ्या प्रकारचं गूढ उलगडून दाखवत असते. हे पुस्तक देखील याच प्रकारातील आहे. कथांमधील संकल्पना साध्या असल्या तरी अतिशय मनोवेधक व रंजक अशाच आहेत. एखादी कथा खूप चांगली किंवा एखादी फारशी नाही, असं आपण या बाबतीत तुलना करू शकत नाहीत. आपल्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये मतकरी मराठी वाचकांना विविध कथांद्वारे खिळवून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या कथा संपूच नये, असं वाटत राहतं. या पुस्तकाची शीर्षक कथा अर्थात 'मृत्युंजयी' ही कादंबरी देखील होऊ शकली असती. परंतु मतकरींनी सुलभपणे व सोप्या अन मोजक्या शब्दात ही कथा लिहिल्याचे दिसते रहस्य.
गूढकथा वाचकांसाठी मनाचे कंगोरे उलगडणार्‍या कथा म्हणून या पुस्तकाचे वर्णन करता येईल!