Sunday, May 31, 2020

बिभीषण की कुंभकर्ण?

रामायणातील एक छोटी गोष्ट...
राक्षसांचा राजा लंकाधिपती रावणाचे दोन भाऊ म्हणजे बिभिषण व कुंभकर्ण. दोघेही सत्कर्मी होते. तरीही दोघांचे विचार मात्र वेगवेगळे होते. बिभीषणाने आधीपासूनच सत्याची अर्थात श्रीरामाची बाजू घेतलेली होती. त्यासाठी तो लंकेचा बळीही द्यायला तयार झाला होता.
याउलट कुंभकर्णाचं होतं. त्याला ही गोष्ट माहीत होती की, चूक रावणाची आहे. त्याच्यामुळेच लंकेवर संकट ओढवलं होतं. तरीही त्याने रावणाचीच बाजू घेतली. कारण त्यावेळी लंकेचं रक्षण करणं आवश्यक होतं. ज्याला तो धर्म मानत होता. नंतर मात्र कुंभकर्ण व रावण दोघांचाही युद्धात मृत्यू झाला.
सांगायचे इतकेच की, या जगात अशी अनेक सज्जन लोकं आहेत ज्यांना समजत नाही की, बिभीषण बनावं की कुंभकर्ण? यात गल्लत झाली की, तुम्ही नायकाचे खलनायक होऊन बसता!


Saturday, May 30, 2020

प्रतिक्षा

लॉकडाऊनमधला त्याचा बराचसा वेळ फक्त टीव्ही पाण्यातच जात होता. त्या दिवशी मात्र दुपारीच लाईट गेली. टीव्ही व फॅन दोन्ही बंद झाले. त्यामुळे त्याची पावले घराबाहेर पडली. तो चालत चालत गावाजवळून वाहणाऱ्या पुष्पावती नदीच्या किनाऱ्यावर आला. नदी संथ गतीने वाहत होती. तिच्या किनाऱ्यावरचे ते विस्तीर्ण वडाचे झाड आजही पूर्वीच्याच स्थितीत असल्याचे त्याला जाणवले. तो नदीकाठच्या व झाडाखालच्या एका खडकावर नदीमध्ये पाय टाकून बसला.


पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या ठिकाणी तो पुन्हा आला होता. गावात राहत असताना बालपणीच्या सवंगड्यांसोबत तो या ठिकाणी रोज यायचा. नदीच्या पाण्यात उड्या मारायचा, वडाच्या झाडावर सूरपारंब्या खेळायचा. त्या आठवणी आज पुन्हा जागृत झाल्या. आजूबाजूच्या गावांतील शेते हरित करणारी पुष्पावती त्याला आजही शांत व नितळ वाटत होती. खिरेश्वर ते नेतवड या छोट्याशा भागात प्रवाहित असणारी पुष्पावती; तिच्या आठवणींनी त्याला आईसारखीच वाटू लागली. तिच्या प्रवाहात तो पहिल्यांदा पोहायला शिकला, पाण्याशी मस्ती करायला शिकला. त्याकाळच्या तिच्या पाण्याचा तो स्पर्श त्याला आजही स्पष्ट जाणवत होता. वटवृक्षाच्या पारंब्याना धरुन पाण्यात मारलेले ते सुर त्याच्या डोळ्यासमोर उभे राहत होते. त्या आठवणींनी त्याला गहिवरून आलं. वडाच्या झाडाच्या फांद्यांना त्याने त्याकाळी एक झोका बांधला होता. त्याचे व्रण आजही त्या फांदीला होते. आजच्या इंटरनेट गेमिंगच्या जमान्यात तिथे झोका खेळायला कोणाला सवड असेल? असा प्रश्न त्याच्या मनात तयार झाला. मग वडाच्या झोक्यात बसून तो नदीच्या पाण्यातील आठवणींवर स्वार होऊन तल्लीन होऊन गेला. त्या काळची मजा पुन्हा अनुभवता येणार नाही, या विचाराने त्याला गहिवर उठला. त्याच्या डोळ्यात अश्रुंचे थेंब जमा होऊ लागले होते. त्यांने नदीच्या प्रवाहात स्वतःला पाहीले. वयानुरूप चेहऱ्यावर आलेली प्रगल्भता त्याला दिसत होती. पण पुष्पावतीचं तसं नव्हतं. ती आजही तरुण म्हणत होती. नव्या पिढीला आनंद द्यायला सज्ज होती. परंतु, तिला एकच प्रतीक्षा होती की, बालचमू येऊन तिच्या अंगाखांद्यावर आपल्या आठवणींच्या शृंखला पुनःश्च तयार करेल.

Image Courtesy: dreamstime.com

Friday, May 29, 2020

जॉगिंग

कांदळीतल्या एका छोटेखानी रस्त्यावर एका मजल्याचा बंगला आहे. आजकाल तिथे दोघे आजी-आजोबा राहतात. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. त्यामुळे सध्या निवृत्तीनंतर दोघेही गावीच आपल्या बंगल्यात मजेत आयुष्य घालवत आहेत.
दोन वर्षांपूर्वी पुण्यातून गावी येऊन स्थायिक झाले तरी आजोबांची फिट राहण्यासाठी दररोज सकाळी अर्धा तास चालण्याची सवय काही सुटलेली नव्हती. सुरुवातीला त्यांना कोणी सोबत नसायचे. कालांतराने मात्र त्यांनी दोन मित्र जमवले. ते मग त्यांना सकाळी सोबत असतात.
लॉकडाऊन झाल्यानंतर करोनाच्या या भीतीने दोन्ही मित्रांनी सकाळी बाहेर पडणे बंद केले. परंतु, आजोबांना काही चैन पडेना. त्यांचे रुटीन मात्र चालूच होते. सकाळी सात वाजता घरातून निघून पुढे चालत लिंबामाथ्यापर्यंत येत. मग तिथून हायवेच्या कडेकडेने एमआयडीसी रोडने पुन्हा आत जात. यात त्यांना जवळपास अर्धा तास लागायचा. बरोबर साडेसात वाजता ते पुन्हा घरी परतत असत. त्यावेळेस आजींनी चहा बनवून ठेवलेला असायचा.
आज मात्र आजोबा केवळ वीस मिनिटात अर्थात दहा मिनिटे लवकरच घरी पोहोचले होते.
"अगं चहा झाला नाही का अजून", त्यांनी आल्या आल्या फर्मावले.
त्या आवाजाने आजीबाई बाहेर आल्या व आश्चर्याने आजोबांकडे पाहू लागल्या.
"चहा कसा होईल....? पण तुम्ही इतक्या लवकर कसे आलात?"
"अगं कोकाटेंचा विकास भेटला होता रस्त्यात. तो म्हटला, काका चला तुम्हाला घरी सोडतो. मग आलो त्याच्या बाईकवर बसून. म्हटलं आजचा वेळही वाचेल."
त्यांचं बोलणं ऐकून आजींनी कपाळाला हात लावला.
"अहो एवढा वेळ वाचवायचा तर घराच्या बाहेर तरी कशाला पडता?", असं बोलून त्या परत स्वयंपाक घरात निघून गेल्या. आजोबा मात्र आजीच्या प्रश्नावर गहन विचार करू लागले.


Tuesday, May 26, 2020

अक्कल

वडज-धामनखेल रस्त्याच्या एका नाक्यावर तिघेजण नेहमी गप्पा मारत बसलेले असतात. बऱ्याचदा तिथल्या वडाच्या पारावर ते मोठमोठ्या गप्पा मारताना दिसतात. ही मंडळी प्रामुख्याने वैज्ञानिक, इतिहास संशोधक, पर्यावरण तज्ञ, निसर्ग अभ्यासक, समाजसेवक, अर्थतज्ञ, स्थापत्य अभियंता सारख्या विविध व्यवसायांशी निगडित असावित असं त्यांच्या दैनंदिन चर्चेतून जाणवतं. एवढ्या विषयांचा गाढा अभ्यास असणारी मंडळी या देशात अगदी क्वचितच सापडतं असावीत! तरीही यांना वृत्तवाहिनीवरच्या एखाद्या चर्चासत्रात कोणी का बोलावत नाही? हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
कोरोना साथ आल्यापासून लॉकडाऊनच्या काळातही त्यांच्या दैनंदिन चर्चासत्रांमध्ये खंड पडलेला नाही. परवाही ते विविध विषयांवर चर्चा करण्यात मग्न झाले होते. परंतु एकंदरीत अर्थशास्त्र या विषयांवर त्यांची त्या दिवशी जास्त चर्चा होत होती, असे दिसले.
"मोदी ने २० लाख करोडचे पॅकेज दिले म्हणे परवा", पहिला म्हणाला.
"वीस लाख की करोड? ते कळलं नाही पण!" - दुसरा
"वीस लाखाचे करोड की रे!" - तिसरा.
"म्हणजे विसावर किती शून्य?" -  दुसरा.
"आपण काय इथे शून्य मोजायला बसलोय?"  - पहिला.
"पण १३५ करोड लोकांपैकी कोणाच्या वाट्याला किती येतील?" -  दुसरा.
"पंधरा हजार येतील बघ!" - तिसरा.
"एवढं करण्यापेक्षा प्रत्येकाला एक एक करोड दिले असते तर १३५ कोटीमध्येच काम झालं असतं. नाही का?" - पहिला.
"व्हय की, मोदीला काय अक्कल नाही पण!" - तिसरा.
"आज रेशनचे पाच किलो तांदूळ मिळणार आहेत, माहितीये ना?"- दुसरा.
"अरं व्हय की, चल लवकर", असे म्हणत तिघे तिथून निघून गेले.