Monday, May 30, 2022

पॉलिक्लिक - सोनाली शिंदे

अनेक विषयांमध्ये रुची असली तरी राजकारण या विषयापासून मी नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रत्यक्ष पाहिले तर राजकारणाची जाण देशातल्या प्रत्येक नागरिकाला असायला हवी.
राजकारण या विषयाभोवती फिरणारी पुस्तके देखील मी वाचलेली नाहीत. परंतु साम टीव्हीच्या पत्रकार व वृत्तनिवेदिका सोनाली शिंदे यांनी लिहिलेलं हे पुस्तक वाचावं, असं वाटलं. शालेय शिक्षणामध्ये नागरिकशास्त्र या विषयाचा तसेच राज्यशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास केलेला असतो. बऱ्याच गोष्टी माहीत देखील असतात. परंतु राजकारण आणि निवडणुका म्हटल्या की, उदासीनता वाटते. राजकारण व राजकारणी यांच्याविषयी अभ्यास करावा, असं क्वचितच वाटतं. पण भारतीय राजकारण आणि निवडणूक या विषयावर एका पत्रकाराच्या दृष्टीतून लिहिलेलं 'पॉलिक्लिक' हे पुस्तक बऱ्याच गोष्टी सांगून जातं.
या पुस्तकामध्ये त्यांनी तीन विभाग केलेले आहेत. पहिल्या विभागामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताच्या निवडणुका व त्यांची पार्श्वभूमी वर्णन केली आहे. स्वातंत्र्यापासून भारतीय निवडणुका कशा पद्धतीने बदलत गेल्या, त्यांची पार्श्वभूमी कशी होती, सरकारे कोणती आली आणि त्याचा समाज मनावर काय परिणाम झाला? याचा उहापोह पहिल्या विभागामध्ये केलेला आहे. याशिवाय मागील पंधरा ते वीस वर्षांमध्ये वृत्तवाहिन्यांची तसेच समाज माध्यमांची क्रांती कशी झाली, याचा देखील आढावा घेतलेला दिसतो. दुसऱ्या विभागामध्ये दहा वर्षांपूर्वी भारतामध्ये झालेले जनलोकपाल आंदोलन, निर्भया आंदोलन आणि एक सर्वमान्य नेता म्हणून पुढे आलेले नरेंद्र मोदी या तीन घटनांचा मागोवा घेतला आहे. हा विभाग वाचत असताना भूतकाळात आपल्या समोरच घडलेल्या या घटनांचे पुन:स्मरण होते. शिवाय त्याचा भारतीय सामान्य नागरिकांच्या मनावर आज झालेला परिणाम देखील समजून येतो. पुस्तकाच्या तिसऱ्या विभागामध्ये या पुस्तकाला जी टॅगलाईन 'मत तुमचं मेंदू कुणाचा?' वापरली आहे, त्याची चर्चा झालेले दिसून येते. यात प्रामुख्याने सोशल मीडियाच्या सहभागातून झालेल्या अरब देशातील क्रांती आणि ओबामा ते डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडीच्या घटना विश्लेषणात्मक वर्णन केलेल्या आहेत. यामध्ये सोशल मीडियाचा कसा आणि किती सहभाग होता, हे देखील आपल्याला ध्यानात येते.
आज आपले मत सोशल मीडियाद्वारे नियंत्रित केले जात आहे. त्यामुळे सोशल मीडिया फारसा विश्वासार्ह नाही. ही बाब अजूनही सामान्य नागरिकांच्या ध्यानात आलेली नाही. पुढचं जग 'डिजिटलायझेशन'मुळे संगणकीकृत पद्धतीने चालणार आहे. यात समाज माध्यमांचा बराच मोठा वाटा असेल. परंतु सोशल मीडियावरील बाह्य नियंत्रण येणाऱ्या पिढीसाठी घातक ठरणार आहे, असा सारांश या पुस्तकातून सांगता येऊ शकेल.


 

Sunday, May 29, 2022

प्रायमेट्स

प्रायमेट्स अर्थात माकड वंशीय प्राणी! या प्रायमेटसच्या तीन शाखांपासून विविध प्राणी उत्क्रांत होत गेले. त्यातीलच एका शाखेमध्ये मनुष्य प्राणी उत्क्रांत झाला. असा उत्क्रांतीचा सिद्धांत सांगतो. अन्य शाखांमध्ये विविध प्रकारच्या प्रायमेटसचा समावेश होतो. आपल्या आजूबाजूला जंगलांमध्ये अनेक माकडे व वानरे आढळून येतात. ही त्यांची एकच शाखा आहे. परंतु जगभरातील जंगलांमध्ये माकडवंशीय प्राण्यांचे शेकडो प्रकार आढळून आलेले आहेत. शिवाय त्यातील अनेक प्राणी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
प्रायमेटच्या प्रत्येक शाखेची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. सर्वांना आपण 'माकड' या एकाच नावांमध्ये संबोधतो. परंतु माकडांच्या इतक्या विविध प्रजाती असतील याचा आपण विचारही केलेला नसतो. 'सोनी लिव'वर उपलब्ध असलेल्या 'प्रायमेटस' या तीन भागांमधील वेब सिरीजमध्ये जगभरातल्या सर्व प्रकारच्या माकडवंशीय प्राण्यांचा आढावा घेतलेला आहे. विविध खंडांमध्ये विविध प्रकारच्या जंगलांमध्ये विविध प्रकारच्या वातावरणामध्ये प्रायमेट्स जगभर नांदत आहेत. त्यांचे उत्कृष्ट व्हिडीओ चित्रण करून ही वेब सिरीज बनविल्याचे दिसते. प्राण्यांच्या एका अद्भुत जगामध्ये आपण याद्वारे प्रवेश करतो. मानवी प्राण्याला समांतर असणारी प्राणीशाखा जगामध्ये कशा प्रकारे जगत आहे? याची सखोल माहिती या वेबसिरीजद्वारे आपल्याला होते. त्यांचे जगदेखील अद्भुत असंच आहे. परंतु आपल्यासारख्या अतिप्रगत प्रायमेट्समुळे त्यांचे जग लोप पावत चाललेले आहे. हेदेखील या वेब सिरीज मधून शिकायला मिळतं. आपण अनेक प्रायमेटसला गुलाम देखील बनवत आहोत. त्यामुळे त्यांचे जग संकुचित होत चालले आहे. मानवी प्राण्याच्या वर्चस्ववादी विचारसरणीमुळे प्रायमेट्सची संख्यादेखील कमी होताना दिसते आहे.
अशा विविध प्रकारच्या माकडवंशीय प्राण्यांची माहिती या वेबसिरिजद्वारे दिग्दर्शकांनी व फिल्ममेकर्सनी खूपच सुंदर रित्या चित्रीत केल्याचे या वेबसीरीजमध्ये दिसते.

Link: https://www.sonyliv.com/shows/primates-1700000639/secrets-of-survival-1000100208 


 

Saturday, May 28, 2022

जुन्नरच्या परिसरात - प्र. के. घाणेकर

भटकंतीची खरी मजा पावसाळ्यातच येते. महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये भटकंती करायची असल्यास अगणित पर्याय उपलब्ध आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील घाटवाटा, धबधबे, धरणे, नद्या, किल्ले ही #महाराष्ट्र पर्यटनाच्या हृदयस्थानी आहेत! पावसाळ्यात महाराष्ट्राबाहेरून देखील पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये इथे पर्यटनासाठी येत असतात. आपल्या येथील धार्मिक स्थळ देखील वर्षा पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.
लवकरच पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे पावसात पर्यटनाची अनुभूती घेण्यासाठी पर्यटक पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. #जुन्नर हा आमचा महाराष्ट्राचा पहिला घोषित केलेला पर्यटन तालुका होय. #शिवजन्मस्थान म्हणून जुन्नरची जगभरात ओळख आहेच. परंतु त्याहीपेक्षा महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवणारी अनेक ठिकाणे तसेच पावसाळी पर्यटन स्थळे या भागांमध्ये वसलेली आहेत. सुमारे दहा #घाटवाटा, चार धरणे, पाच नद्या, सात किल्ले आणि उंच डोंगरांवरून कोसळणारे असंख्य धबधबे जुन्नरच्या परिसरात पाहता येतात. पावसाळ्यामध्ये जुन्नरचा निसर्ग सह्याद्रीतल्या मनमोहक सौंदर्याची उधळण करीत असतो.
अनेकांना या परिसरामध्ये नक्की कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत, याची माहिती नसते. शिवाय सोशल मीडियाद्वारे जुजबी माहिती घेऊन अनेक जण भटकंती करतात. या सर्वांसाठी मार्गदर्शक असणारे हे #पुस्तक ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी लिहिलेले आहे. जुन्नरच्या परिसरात असणाऱ्या सुमारे ५० विविध पर्यटन स्थळांविषयी त्यांनी या पुस्तकामध्ये विस्तृत माहिती दिलेली आहे. आम्ही स्वतः जुन्नरचे असलो तरी बरेचदा याच पुस्तकाचा संदर्भ घेऊन भ्रमंती केलेली आहे. शिवाय अनेक स्थळांना मधील अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांनी या पुस्तकात नमूद केलेल्या दिसतात.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे


 

Friday, May 27, 2022

चंद्रा

मराठी चित्रपट निर्मितीमध्ये बऱ्याच वर्षांनी एका उत्तम तमाशा पटाचा प्रवेश झाला. हा चित्रपट म्हणजे #चंद्रमुखी. #chandramukhi
वृत्तपत्रांमध्ये व सोशल मीडियावर येणार्‍या समीक्षांमधून 'चंद्रमुखी' मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसते. या चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले असल्यामुळे मराठी रसिकांसाठी ही एक गाण-मेजवानीच होती. श्रेया घोषाल यांनी गायलेली 'चंद्रा' ही लावणी मागच्या महिनाभरापासून इंस्टाग्रामवरील रिल्सच्या स्वरूपात गाजताना दिसत आहे. या लावणीचे संगीत व गीत उत्कृष्ट आहेच. परंतु श्रेया घोषालच्या आवाजामध्ये ते उत्कृष्टतेचा उत्तम नमुना आहे, असेच म्हणावे लागेल. हे गाणे ऐकत असताना ते कधीही एका अमराठी गायिकेने गायलेले आहे, असे जाणवत नाही. यातच तिचे यश सामावलेले दिसते.
काही वर्षांपूर्वी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या 'जोगवा' या चित्रपटात श्रेया घोषाल यांनी 'मन रानात गेलं गं' हे गीत गायलं होतं. एक अमराठी गायिकेसाठी त्यातील उच्चार पाहता हे गीत अतिशय अवघड असंच होतं. परंतु श्रेयाने अतिशय उत्तमरीत्या सदर गीत सादर केले होते. 'चंद्रा' ही त्याची पुढची पायरी आहे, असे वाटते. श्रेया घोषाल यांनी दक्षिणेतील चारही भाषांमध्ये तसेच मराठी आणि बंगालीमध्ये देखील शेकडो गाणी गायली आहेत. या कोणत्याच गाण्यांमध्ये चूक निघेल असं वाटत नाही. 'चंद्रा' मध्ये देखील येणारे मराठी शब्द व त्यातील अक्षरे जसे च, ज, झ यांचे दोन प्रकारचे उच्चार होतात. परंतु श्रेयाने मात्र ते अतिशय उत्तमरित्या उचलेले दिसतात. लावणी मध्ये कुठेच 'ण' चा उच्चार 'ण' असा होत नाही. ही बाब देखील उल्लेखनीय अशी आहे.
जुन्या काळामध्ये अमराठी गायकांकडून मराठी गाणी धावून घ्यायची असल्यास त्यांचे बरेच नखरे असायचे. एखादा अक्षर नको किंवा एखादा उच्चार असायला नको, अशी त्यांची मागणी असायची. परंतु, श्रेया घोषाल ही आजच्या काळातली खरीखुरी भारतीय गायिका आहे! हे तिने वारंवार सिद्ध केले आहे. तिने गायलेलं गाणं पुन्हा पुन्हा कितीतरी वेळा ऐकतच रहावसं वाटतं. 'चंद्रा' देखील याला अपवाद नाही.

Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे

 



Thursday, May 26, 2022

मराठीतून पायथॉन

मागच्या सहा-सात वर्षांपासून पायथॉन नावाची नवी संगणकीय भाषा वेगाने पुढे यायला लागली होती. परंतु इंटरनेटवर ही भाषा शिकण्यासाठी हवे तितकेच स्त्रोत उपलब्ध नव्हते. हळूहळू तेदेखील इंग्रजीद्वारे उपलब्ध व्हायला लागले. परंतु मराठी भाषेतून मात्र ही संगणकीय भाषा शिकवण्यासाठी कोणताही स्त्रोत उपलब्ध नव्हता. मग आम्ही ठरवलं की, पायथॉन शिकवण्यासाठी मराठी भाषेतून व्हिडिओज तयार करायचे. मग हळू हळू एकेक व्हिडीओ तयार होत गेला आणि मी ते आमच्या अधिकृत युट्युब चॅनेल वर अपलोड करत गेलो. सुरुवातीच्या काळामध्ये फारसा प्रतिसाद नव्हता. परंतु काही महिन्यांमध्येच आमच्या चॅनेलच्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओज मध्ये मराठीतून पायथॉन शृंखलेतील सर्वच व्हिडिओ यायला लागले! या व्हिडिओजला मिळणारे व्ह्यूज मोठ्या प्रमाणात वाढत गेले. त्यावर प्रेक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या कमेंट्स वाचून आपण प्रगत तंत्रज्ञानाचा नवीन स्त्रोत मराठी भाषेतून उपलब्ध करून दिल्याची मनोमन जाणीव झाली. खरंतर आम्हाला मिळणारे हे एक प्रोत्साहन होतं.
आज युट्युबवर असणारे व्हिडिओ दोन टप्प्यांमध्ये आम्ही तयार केले आहेत. विशेष म्हणजे गुगल किंवा युट्युबवर जरी तुम्ही python in marathi असं टाईप केलं तरी हेच व्हिडीओ तुम्हाला सर्वप्रथम दिसून येतील! इतकी लोकप्रियता त्यांनी मिळवलेली आहे. मागच्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कमेंट्स, ई-मेल्स तसेच व्हाट्सअप मेसेजेस आम्हाला प्राप्त झालेले आहेत. जवळपास ३५ चे ४०% चॅनेल सबस्क्राईबर हे याच व्हिडिओजमुळे आम्हाला मिळाले आहेत. याउलट इंग्रजीतून बनवलेल्या व्हिडिओजला फारसा प्रतिसाद मिळत नाही. कारण इंग्रजीतून याच विषयावर हजारो व्हिडीओ उपलब्ध आहेत. परंतु मराठीतून नाही. याचाच फायदा आमच्या चॅनेलचे रँकिंग वाढवण्यास आणि चॅनेल मॉनेटाईझ करण्यास देखील झाला. मराठी भाषेला स्कोप नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी ही एक चपराक होती.
दीड वर्षांपूर्वी पायथॉन प्रोग्रॅमिंगवर मी मराठीतून पहिले पुस्तक ई-बुक स्वरूपात प्रकाशित केले. कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता देखील या पुस्तकाचा ऑनलाइन पद्धतीने विक्रमी खप झाला. अजूनही त्याची विक्री थांबलेली नाही. यावरूनच मराठीला ज्ञानभाषा म्हणून आजही मोठा स्कोप असल्याचे दिसते. लोकांना आपल्या मातृभाषेतून शिकायचं आहे. परंतु संसाधने इंग्रजीतून उपलब्ध असल्यामुळे त्यात अनेक अडचणी येतात. याच अडचणींवर उपाय शोधण्यासाठी यापुढेही आमचे प्रयत्न अविरत चालू राहतील. फक्त तुमचा पाठिंबा गरजेचा आहे.
पुढील काही दिवसांमध्ये 'मराठीतून पायथॉन' ही युट्युब व्हिडीओ शृंखला आणखी दहा व्हिडिओजने वाढवण्यात येणार आहे.

YouTube Link: https://www.youtube.com/playlist?list=PL9D-kb1y7d4cL3xI0Wk1krRjjiPE4IPUd


Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे

 


Wednesday, May 25, 2022

आय-ह्यूमन

सन २०१९ मध्ये 'आय-ह्यूमन' नावाची एक इंग्रजी डॉक्युमेंटरी रिलीज करण्यात आली होती. ऍमस्टरडॅम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचे सर्वप्रथम प्रदर्शन करण्यात आले.

 

जग बदल बदलविण्याची क्षमता असणारे किंबहुना मानवी भविष्याला नवीन आयाम देऊ शकणारे तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स होय. मागील काही वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा विकास अतिशय वेगाने होताना दिसतो आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या किंबहुना अन्य क्षेत्रातही कार्य करणाऱ्या अनेक कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर व विकास सुरू केल्याचे दिसते. यामुळे मानवी जीवन सुकर होईल असे सर्वांना वाटत आहे. याव्यतिरिक्त या तंत्रज्ञानाद्वारे समोर येणारी दुसरी बाजू काय असेल? याची चर्चा आय-ह्युमन या डॉक्युमेंटरीमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या करण्यात आलेली आहे.
जगातील विविध कंपन्यांमध्ये कार्य करणारे मशीन लर्निंग इंजिनियर, एआय इंजिनीयर तसेच डेटा सायंटिस्ट यांच्या मुलाखती घेऊन ही डॉक्युमेंटरी बनविण्यात आलेली आहे. सारांश सांगायचा तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे समोर येणारी दुसरी बाजू अतिशय भयानक असेल, असे सर्वांनाच वाटते. त्याची एक झलक सन २०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये 'केंब्रिज ऍनालिटिका' नावाच्या कंपनीने आपल्याला दाखवली होती. अशा अनेक घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. किंबहुना घडत देखील आहेत. भविष्यामध्ये त्याची व्याप्ती आणखी वेगाने वाढत जाईल असे दिसते. इंटरनेटद्वारे जोडल्या गेलेल्या मानवी जगावर किंबहुना मानवाच्या आभासी जगावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे अप्रत्यक्षपणे बारकाईने लक्ष आहे. फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्या जवळपास जगातील प्रत्येक माणसाला ओळखू लागलेल्या आहेत. कदाचित आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे भविष्यामध्ये मानवी मनाचा ताबा घेण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये आहे. यातून कोणत्या विनाशकारी घटना घडू शकतात, हे विविध संगणक तज्ञांनी काळजीपूर्वक या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलेले आहे.
फिल्मच्या सुरुवातीलाच स्टीफन हॉकिंग यांचं एक वाक्य दाखवण्यात येतं, 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे मानवी इतिहासातील सर्वोच्च यश असेल तसेच ते शेवटचे देखील असेल' असं ते म्हणतात. यामध्ये काहीच खोटं वाटत नाही. केंब्रिज ऍनालिटिका सारख्या शेकडो कंपन्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा ताबा घेण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट इंजिनियर्सची फौजदेखील ते तयार करत आहेत. कदाचित येत्या काळामध्ये नैतिकता हा शब्द केवळ डिक्शनरीमध्येच वाचायला मिळेल. अशी शक्यता देखील अनेक शास्त्रज्ञ व्यक्त करतात.
या फिल्ममध्ये आणखी एक महत्त्वाचं वाक्य येतं. आपण सोशल मीडियावर ज्या गोष्टी वाचतो, त्या आपल्याला कोणीतरी दाखविलेल्या असतात. म्हणजेच आपल्या वाचन्यावर त्यांचे नियंत्रण असतं अर्थात भविष्यामध्ये ते आपल्या विचार करण्यावर देखील नियंत्रण ठेवू शकतात! ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची कटू बाजू आहे. सोशल मिडीया लोकांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू लागला आहे. अब्जावधी लोकांवर नियंत्रण ठेवायचे असल्यास तितकेच शक्तिशाली अल्गोरिदम तयार करावे लागतात. अशा शेकडो अल्गोरिदमचा भरणा या क्षेत्रांमध्ये वेगाने होताना दिसतो आहे.
हे तंत्रज्ञान वापरत असताना नियम व अटी कदाचित कोणीही लागू करणार नाही. तसेच लागू केल्या तरी कोणी त्या पाळतील याची शाश्वती देता येणार नाही. पुढचं शीतयुद्ध हे इंटरनेट आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स याद्वारे लढलं जाणार आहे, हे मात्र नक्की!
या डॉक्युमेंटरीच्या शेवटी एक महत्त्वाचं वाक्य निर्माणकर्त्यांनी लिहिलेले आहे...  गुगल आणि फेसबुक यांनी आमच्या या फिल्मसाठी मुलाखत देण्यास नकार दिला होता!
या डॉक्युमेंटरीचं पार्श्वसंगीत अतिशय उत्तम आहे. त्यामुळे त्यातील वाक्य न वाक्य ऐकण्यासाठी आपण सातत्याने खिळवून राहतो. 


Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे 








Tuesday, May 24, 2022

मानववंशशास्त्र

आपण अर्थात मानव या पृथ्वीवर कसे आलो व आपली प्रगती नक्की कशी झाली? हा प्रश्न वर्षानुवर्षे जिज्ञासू वृत्ती असणाऱ्या मानवाला पडलेला होता. देव नावाच्या एका संकल्पनेने त्या प्रश्नाचे उत्तर मानवाने स्वतःलाच देऊन टाकले. परंतु काही शतकांपूर्वी चार्ल्स डार्विन नावाच्या व्यक्तीने शास्त्रशुद्ध उत्तर आपल्याला दिले आहे. ते उत्तर म्हणजे 'मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत'. या सिद्धांतामुळे मानववंशशास्त्र नावाची नवीन विज्ञान शाखा चालू झाली. उत्क्रांती या विषयाभोवती होणाऱ्या संशोधनाला वेग आला. आणि अद्भुत अशी माहिती विज्ञानाने जगासमोर आणली.
शालेय जीवनात शिकत असताना या शास्त्राची माहिती आपल्याला पहिल्यांदा होते. परंतु सारांश इतकाच लक्षात राहतो की, फार पूर्वी माणूस माकड होता आणि आज माकडाचा मानव तयार झाला! यापुढे आपण जात नाही. परंतु, मानववंशशास्त्र ही विज्ञानाची एक अद्भुत अशी शाखा आहे, जी मानवाच्या या उत्क्रांतीचं सविस्तर उत्तर देते. त्याबद्दल आपण जितकं वाचू तितकं कमीच वाटतं. किंबहुना त्याबद्दलची जिज्ञासा अधिक वेगाने वाढू लागते. विज्ञानविश्वामध्ये रमत ठेवण्याची ताकद या शास्त्रामध्ये आहे. मागच्या काही वर्षांमध्ये या विषयांवर भाष्य करणारी व माहिती देणारी विविध लेखकांची पुस्तके वाचून काढली. तरीही जिज्ञासा थांबायचं नाव घेत नाही. या अद्भुत जगापासून अलिप्त देखील राहता येत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे


 

Friday, May 20, 2022

हबल दुर्बिण

गॅलीली गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी दुर्बिणीचा शोध लावला. या शोधामुळे अंतराळात मानवाचा दृष्टीकोन बदलला. खगोलशास्त्राच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा शोध होता. गेल्या चारशे वर्षांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अनेक दुर्बिणी बनवण्यात आल्या. यामुळे असंख्य अवकाशीय वस्तूंचा शोध लागला. खगोलशास्त्राची नवीन दारे उघडली. आज दुर्बिणींना मानवी अंतराळ उड्डाणासाठी तिसरा डोळा मानला जाऊ शकतो.

 

हबल टेलिस्कोप ही पृथ्वीवर बांधलेली सर्वोत्तम दुर्बिण आहे. अंतराळ संशोधनाच्या बाबतीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी या दुर्बिणीमुळे झाली आहे. चला तर मग आता जाणून घेऊया या महाकाय दुर्बिणीचा महिमा आणि कथा.
आकाश पाहण्यासाठी महाकाय दुर्बीण बांधण्याची कल्पना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत सुरू झाली. परंतु मध्ययुगीन कालखंडातील अनेक घटनांमुळे ते तयार होऊ शकले नाही. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या संयुक्त प्रयत्नांतून ऑक्टोबर १९८६ मध्ये हबल दुर्बिणीचे प्रक्षेपण करण्यात आले. मात्र, दुर्बिणी घेऊन जाणाऱ्या चॅलेंजर अवकाशयानामध्ये बिघाड झाल्याने दुर्बिणी अवकाशात स्थिर होऊ शकली नाही. हबल टेलिस्कोप १९९० मध्ये पुन्हा अवकाशात सोडण्यात आला. पण त्याचे काम नीट होत नव्हते. या दुर्बिणीतून येणाऱ्या प्रतिमा अस्पष्टपणे बाहेर येत होत्या. म्हणून डिसेंबर १९९३ मध्ये इंडीवर नावाच्या अंतराळयानाद्वारे हबलची दुरुस्ती करण्यात आली आणि त्याचे स्थान पृथ्वीपासून ५६९ किमी अंतरावर निश्चित करण्यात आले. तेव्हापासून अवकाशावर लक्ष ठेवणारा मनुष्याचा हा तिसरा डोळा वेगाने काम करू लागला.
हबल दुर्बिणीने गेल्या तीस वर्षांत अवकाश संशोधनात अनेक टप्पे पार केले आहेत. या दुर्बिणीने केलेल्या संशोधनातून विश्वाचे वय ठरवण्याचे काम पूर्ण झाले. विविध छायाचित्रांद्वारे विश्वाचे वय १३.७ दशलक्ष वर्षे ठरवले गेले आहे. हबल टेलिस्कोप विश्वातील अनेक आकाशगंगा आणि ताऱ्यांचे सतत निरीक्षण करते. याद्वारे तो पृथ्वीला विश्वातील प्रत्येक घटकाची माहिती देतो. आकाशगंगा आणि तारे काय आहेत? नवीन ग्रह कसे तयार होतात? गडद ऊर्जा म्हणजे काय? ब्लॅक होल म्हणजे काय आणि ते कसे तयार होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मानवाला या दुर्बिणीतून सापडली आहेत. जग विस्तारत आहे. हा महत्त्वाचा शोध या दुर्बिणीद्वारे पार पडला. विशेष म्हणजे या प्रकल्पावर काम करणाऱ्या तिन्ही शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे! हबल दुर्बिणीने प्लुटोसह सूर्यमालेबाहेरील आयरिस ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास केला आहे. याशिवाय गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यूनचे वातावरण आणि उपग्रहांची माहितीही वैज्ञानिकांनी मिळवली आहे. प्लूटोच्या उपग्रह कड्या हबलने शोधल्या होत्या. याशिवाय २०१५ मध्ये या दुर्बिणीद्वारे जगातील पहिल्या सुपरनोव्हाचे छायाचित्रण करण्यात आले होते. हबल दुर्बिणीचा वापर आकाशगंगांचे वस्तुमान आणि आकार निश्चित करण्यासाठी केला जातो. या प्रकल्पात केलेल्या संशोधनानुसार आकाशगंगेचे वस्तुमान १.५ ट्रिलियन सौर युनिट्स असून तिची त्रिज्या एक लाख २९ हजार प्रकाशवर्षे निश्चित करण्यात आली आहे. धूमकेतू शूमाकर लेव्ही-९ १९९४ मध्ये गुरू ग्रहावर आदळला होता. हबलनेच या घटनेचे संपूर्ण वर्णन पृथ्वीवरील रहिवाशांना दिले. आजपर्यंत, शास्त्रज्ञांनी हबल दुर्बिणीतील प्रतिमा वापरून सुमारे १५००० रिसर्च पेपर्स लिहिले आहेत! आणि दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या पेपरपैकी दहा टक्के पेपर हबल टेलिस्कोपचा संदर्भ घेतात.
या दुर्बिणीला प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे नाव देण्यात आले आहे. गेल्या तीस वर्षांत या दुर्बिणीची पाच वेळा सर्व्हिसिंग करण्यात आली आहे. शेवटची सर्व्हिसिंग २००९ मध्ये झाली होती. तीचा कार्यकाळ २०३० ते २०४० दरम्यान संपेल. दरम्यान नासाकडून अधिक सक्षम जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप अवकाशात पाठवण्यात येणार आहे. पण यानंतरही अंतराळ संशोधन क्षेत्रात हबल दुर्बिणीची कामगिरी कोणीही विसरू शकत नाही!