जसजसा महाराष्ट्र दिन जवळ येत आहे तसतसे विविध राजकीय पक्षांना मराठीचा पाझर फुटू लागला आहे. मराठीचा मुद्दा गेल्या निवडणूकीत जबरदस्त हिट झाल्याने यात मुद्द्याला हात देण्याचे काम प्रत्येक राजकिय पक्ष आता करू पाहत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा हिट बनविला, याचे श्रेय त्यांना निश्चितच जाते. परंतु, आज यावर जे राजकारण राजकिय पक्ष करू पाहत आहेत, ते महाराष्ट्राच्या हितात मात्र नक्कीच नाही. यापूर्वी मी माझ्या एका ब्लॉगमध्ये याविषयीचे विचार मराठी दिनी लिहिले होते. मागच्या रविवारच्या लोकसत्ता मध्ये ज्येष्ठ पत्रकार व लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांनी ’महाराष्ट्राची वाटचाल: मुंबई मिळाली, महाराष्ट्र हरवला’ या लेखात अतिशय उत्कृष्टरीत्या आजचा महाराष्ट्र दाखवून दिला आहे. प्रत्येकानेच वाचावा असा हा लेख आहे.
गेल्या ५० वर्षात नाही फूटले इतके उमाळे आता आपल्या मायबाप सरकारलाही फूटू लागल्याचे दिसतात. त्यामुळे मराठीसाठी गेल्या काही महिन्यांत त्यांना निर्णय घ्यावे लागले. ५० वर्षांमध्ये मराठीकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच आज मराठीला हात द्यावा लागत आहे. कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी स्वत:च्या अंतर्गत येणारा वेगळा विभाग स्थापण करण्याची घोषणा केली. याचा अर्थ असा होतो की, शासनाच्या सांस्कृतिक विभागाने आजवर काहीच केलेले नाही! राजभाषेच्या विकासासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. पण, त्यांना ती ५० वर्षात पार पाडता आली नाही. इतक्या वर्षांमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठही मिळू शकलेले नाही. दक्षिण भारतीय भाषांसाठी तसेच बंगाली भाषेसाठीही त्या-त्या राज्यामध्ये स्वतंत्र विद्यापीठ आहे. परंतु, महाराष्ट्र शासनाला अजुन तरी अशी सुबुद्धी सुचलेली नाही. यात सर्वच राजकीय पक्षांचा समान दोष आहे. कदाचित, महाराष्ट्रीयांच्या अंगातच या प्रकारची बुद्धी नसावी!
काही राजकीय पक्ष मोठमोठे फटके उडवून महाराष्ट्र दिन साजरा करणार आहेत...! त्यापेक्षा वेगळा विधायक उपक्रम राबवून हा दिवस साजरा करता येवू शकतो. त्यासाठी ध्वनीप्रदूषण व वायूप्रदूषण करून पैसा वाया घालवायची गरज वाटत नाही. आजकाल ’मराठी आमचीच’ या वादात काही राजकीय पक्ष प्रखर प्रचार करू पाहत आहेत. व ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र दिनाची मोठी जय्यत तयारीही चालविली आहे. यात सामान्य मराठी माणूसच सैरभैर झाल्याचे दिसते. राजकारणी स्वत:ची पोळी भाजून घेतात, पण त्याने मराठी माणसाची प्रतिमा मलिन होण्यास मात्र मोठी मदत झाल्याचे दिसते. सध्या देशात फक्त मराठी जनताच एकजूट नसल्याचे दिसते. याला कारण केवळ आपले नेतेमंडळीच आहेत. मराठीचा नुसता शो करण्यापेक्षा भाषाप्रगतीसाठी हातभार लावला तरच मराठीची प्रगती होणार आहे. परंतु, मराठी माणसाच्या रक्तातच हे गुण नसावेत. याच कारणामुळे मराठी भाषा व मराठी माणूसही पुढे जात नाही.
गेल्या ५० वर्षांतील प्रत्येकी ३६५ दिवसांत कधीही मराठी जनांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा केलेला नाही म्हणूनच आज महाराष्ट्र दीन होत चाललेला दिसतो...!