सेल्युलॉईड... या वर्षीचा सर्वोत्तम मल्याळम चित्रपट...!!! केरळमध्ये तयार झालेल्या पहिल्या चित्रपट निर्मितीची ही कहाणी होय. जे. सी. डॅनियल या उत्साही व धडपड्या तरूणाने ’विगतकुमारन’ या पहिल्या मल्याळी चित्रपटाची निर्मिती सन १९२८ मध्ये केरळात केली होती. त्याची कहाणी (शोकांतिका!) सांगणारा चित्रपट म्हणजे... सेल्युलॉईड!
चित्रपटाच्या फिल्मला इंग्रज लोक सेल्युलॉईड म्हणत. डॅनियलने बनविलेल्या पहिल्या चित्रपटाची प्रिंट उपलब्ध नसल्याने तो अनेक वर्षे ’Pioneer of Malayalam Cinema' म्हणून ओळखला गेला नाही. परंतु, एका सिनेपत्रकाराने त्याची कहाणी उजेडात आणली. ती दिग्दर्शक कमलने अप्रतिमरित्या पडद्यावर सादर केलीय! चित्रपटाच्या सुरूवातीलाच नंदू माधव यांचे दादासाहेब फाळके म्हणून दर्शन होते. त्यांच्या एका मराठी चित्रपटाचे चित्रिकरणही यात दाखविण्यात आले आहे. डॅनियलची धडपडी वृत्ती, त्याला त्याची पत्नी जॅनेटची मिळालेली साथ, अभिनेत्री मिळविण्यासाठी झालेला संघर्ष व दलित असल्याने तीची झालेली शोकांतिका, उतारवयातील डॅनियल, मूळचा तमिळ असल्याने केरळ सरकारने त्याची केलेली हेळसांड या सर्वांची सुंदर मांडणी या चित्रपटात दिसते.