Friday, October 29, 2021

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स - अच्युत गोडबोले

#पुस्तक_परीक्षण
📖 आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
✍️ अच्युत गोडबोले
📚 मधुश्री प्रकाशन

तंत्रज्ञानाची अमर्याद क्षितिजे पार केलेले आधुनिक काळातील यंत्र म्हणजे संगणक होय. गेल्या शंभर वर्षांमध्ये अशक्य असलेल्या अनेक गोष्टी याच संगणकाने शक्य करून दाखवलेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता होय!
मागच्या पाच-सहा वर्षांपासून या क्षेत्रात विकसन आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य मी करत आहे. केवळ 'अमर्याद' याच एका शब्दाने या क्षेत्राची व्याप्ती वर्णन करता येईल. यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संकल्पनेवर आधारलेले व ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले लिखित 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' हे पुस्तक म्हणजे खरोखरच एक जग हदरवणारे तंत्रज्ञान आहे, हेच ध्यानात येते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयाला वाहिलेले मराठीतील पहिलेच परिपूर्ण पुस्तक अच्युत गोडबोले यांनी लिहिले आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच 'जग हादरवणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख, इतिहास, उपयोग आणि भविष्य यांचा रंजक वेध' असं लिहिलेलं आहे. पुस्तकाचा पूर्ण सारांश या एका वाक्यात आपल्याला लगेच ध्यानात येईल.
तसं पाहिलं तर गोडबोले सरांचं अनेक वर्षानंतर संगणक तंत्रज्ञानाशी निगडित प्रकाशित झालेलं हे पुस्तक होतं. त्यामुळे त्याची उत्सुकताही तितकीच लागलेली होती. आपल्या सर्व अपेक्षांची पूर्ती करणारं हे पुस्तक होय.
संगणक माणसाची जवळपास सर्व कामे हळूहळू शिकू लागला आहे आणि करू लागला आहे. असं एकही क्षेत्र उरलेले नाही की जिथे संगणकाचा उपयोग होत नाही. संगणकाधारित स्वयंचलनामुळे आज लाखो नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. भविष्यातही ही व्याप्ती आणखी वेगाने वाढत जाणार आहे. कारण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे संगणक मानवी बुद्धिमत्ता प्राप्त करू लागला आहे. शिवाय मानवापेक्षा अधिक अचूकतेने तसेच वेगाने आणि सातत्याने सर्वच कामे करू लागला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसित होणार आहे. ते कसे? याची इत्यंभूत माहिती अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकात वर्णिलेली आहे.
तसं पाहिलं तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संकल्पना ७० ते ८० वर्षे जुनी आहे. त्या काळातील संगणक आणि गणितज्ञांनी या अद्भुत तंत्रज्ञानाची ओळख विश्वाला करून दिली. परंतु संगणकाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील मर्यादांमुळे हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष साकारायला अनेक दशके जावी लागली. आज संगणनाचा वेग प्रचंड गतीने वाढतो आहे. त्याच वेगाने संगणक मानवी कार्यक्षमता विकसित करू लागला आहे. मशीन लर्निंग,  डीप लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग सारख्या तंत्रज्ञानाद्वारे बुद्धिमत्ता प्राप्त करू लागलेला आहे. याच कारणास्तव फायनान्स, मार्केट रिसर्च, रिटेल, जाहिराती, मार्केटिंग, सेल्स, शिक्षण आणि आरोग्यसेवेत देखील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने शिरकाव केलेला दिसतो. याव्यतिरिक्त शेती, पर्यटन, कला, संगीत, लीडरशिप सारखी क्षेत्रे देखील लवकरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अधिपत्याखाली येतील, असे दिसते. सर्व कामे वेगाने व अचूकतेने होत आहेत. परंतु जगदेखील त्याच वेगाने बदलू लागलेले दिसते. बेरोजगारी वाढलेली आहे. असं असलं तरी या तंत्रज्ञानाद्वारे नवनवे रोजगारही विकसित होताना दिसत आहेत. त्यामुळे ज्यांना टिकायचं असेल त्यांना हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भीती देखील आहे. या सर्वांचा उहापोह अच्युत गोडबोले यांनी विस्तृतपणे या पुस्तकामध्ये घेतलेला दिसतो.
सेल्फ ड्रायव्हिंग कार्स अर्थात स्वयंचलित वाहने, चॅटबॉट सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित संकल्पना देखील त्यांनी विस्तृतपणे मांडलेल्या आहेत. ज्याद्वारे भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान कितपत प्रगती करू शकेल, याचा आपल्याला अंदाज येतो. कधी कधी असंही जाणवतं की, जर संगणकच सर्व काम करत असेल तर मनुष्याचा या जगामध्ये नक्की काय उपयोग होईल? हा प्रश्न पडतो. एकंदरीत माणूस रोबोट बनत चाललेला आहे आणि संगणक नवनवे रोबोट विकसित करत आहे. याचा ताळमेळ भविष्यामध्ये कसा लागेल, हे सांगणं आता तरी अवघड दिसते इतकच!


 

Friday, August 13, 2021

फ्रायडे द थर्टीन

संगणक विश्वामध्ये कॉम्प्युटर व्हायरस हा नेहमीच कुतूहलाचा आणि भीतीचा विषय राहिलेला आहे! मागच्या अनेक दशकांमध्ये नवनवे व्हायरस संगणकामध्ये प्रवेशकर्ते झाले. त्यातील बऱ्याच संगणकीय विषाणूंनी दहशत देखील पसरवली होती. अशाच संगणक विषाणूपैकी एक विषाणू म्हणजे फ्रायडे द थर्टीन (Friday the 13th) होय. आज २०२१ या वर्षातील एकमेव फ्रायडे द थर्टीन आलेला आहे. अर्थात महिन्याची १३ तारीख शुक्रवारी आलेली आहे. 


कित्येक दशकांपासून युरोपीय देशांमध्ये शुक्रवार आणि १३ तारीख ही अशुभ मानली जाते. शिवाय त्यांचे मीलन झाल्यास त्याची अशुभता आणखी प्रखर होते. अशी अंधश्रद्धा आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी जेव्हा संगणकामध्ये मायक्रोसॉफ्टची डॉस नावाची संगणक प्रणाली वापरली जात होती, त्या काळात फ्रायडे द थर्टीन नावाच्या व्हायरसने धुमाकूळ घातला होता. या विषाणूला जेरूसलेम व्हायरस असे देखील म्हटले जायचे. या काळात विंडोज, लिनक्स किंवा ऍपल मॅक सारख्या माउसद्वारे वापरण्यात येणाऱ्या संगणक प्रणाली विकसित झालेल्या नव्हत्या. 'डॉस' सारखी संगणकीय कमांडद्वारे वापरण्यात येणारी संगणक प्रणाली लोकप्रिय होऊ लागली होती. त्यातच फ्रायडे द थर्टीन या मालवेअर अर्थात आणि हानिकारक सॉफ्टवेअरचा प्रवेश संगणकामध्ये झाला. हा व्हायरस म्हणजे एक 'लॉजिक बॉम्ब' होता. लॉजिक बॉम्ब हे व्हायरसचे एक विशिष्ट रूप आहे. असे व्हायरस इतर वेळी सुप्त पडून संगणकामध्ये राहतात. परंतु ते एका विशिष्ट वेळीच कार्यरत व्हायला लागतात. जेरुसलेम व्हायरस हा वर्षाच्या महिन्याच्या १३ तारखेला शुक्रवार असेल तरच आपले कार्य सुरु करायचा! संगणकामधील सर्व सॉफ्टवेअर फाइल्स अर्थात एक्झिक्युटेबल फाईल्सची रचना तो बदलून टाकत असे. त्यामुळे कोणतेच सॉफ्टवेअर चालत नसत. याच कारणामुळे संगणक वापरकर्त्यांमध्ये दहशत तयार झालेली होती. त्याकाळात वापरण्यात येणाऱ्या फ्लॉपी डिस्कद्वारे त्याचा प्रसार एका संगणकातून दुसऱ्यामध्ये होत होता. फ्लॉपी डिस्कला रीड ओन्ली नावाचा एक 'नॉच' असायचा. तो जर चालू केलेला असेल तर कोणत्याही व्हायरसचा प्रवेश फ्लॉपी डिस्क मध्ये होत नव्हता. हीच सुरक्षा या व्हायरस पासून वाचण्याकरता उपलब्ध होती! व्हायरसचा शिरकाव संगणकामध्ये झाल्यावर संगणक केवळ त्याच्या २० टक्के क्षमतेने चालू राहत होता. या कारणास्तव अनेक वर्षे संगणक वापरकर्ते १३ तारखेच्या शुक्रवारी संगणक देखील चालु करत नसत! परंतु कालांतराने नव्या ऑपरेटिंग सिस्टिम उदयास आल्यानंतर मात्र या व्हायरसचा प्रभाव शून्य झाला. कारण डॉस आधारित सूचनांचा संग्रह निष्क्रिय झाला होता. पण संगणकीय व्हायरस च्या इतिहासात या विषाणूने घातलेला धुमाकूळ आजही संगणक विश्वात आपले स्थान राखून आहे. फ्रायडे द थर्टीन या नावाने हॉलिवूडमध्ये चित्रपटांची शृंखला देखील तयार झाल्याचे दिसून येते!

Saturday, July 17, 2021

एक अपूर्ण आणि अद्भुत पावसाळी ट्रेक

Quora मराठी च्या "आठवणीतला पाऊस" स्पर्धेतील या वर्षीची दुसऱ्या क्रमांकाची कथा.
मूळ लिंक

 
हटकेश्वरनंतर जुन्नर मधील सर्वात उंच शिखर म्हणजे ढाकोबा डोंगर होय. जुन्नर मधल्या सर्व शिखरांवरून आणि किल्ल्यांवरून ढाकोबाचे दर्शन होते. त्यामुळे हाडाचे ट्रेकर असणाऱ्या आम्हाला ढाकोबाने नेहमीच भुरळ घातली होती. साधारणतः तीन वर्षांपूर्वी ढाकोबाचा ट्रेक आम्ही पूर्ण केला.
आंबोली हे जुन्नर मधलं सर्वात शेवटचं गाव. इथून पुढे सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. निसर्गरम्य दाऱ्या घाट आहे. या घाटाच्या डाव्या बाजूने वर चढत गेलं की दूरवर ढाकोबा शिखर लागतं. हा अतिशय दुर्गम प्रदेश असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलांच्या अवघड पायवाटा आहेत. शिवाय गाव सोडल्यानंतर शिखरापर्यंत कुठेही मनुष्यवस्ती दिसून येत नाही. कोकणकड्यावरच ढाकोबाचे शिखर असल्याने त्याचे रौद्रपण अधिकच जाणवते. या ट्रेकचा मनमुराद आनंद आम्ही तीन वर्षांपूर्वी घेतला. इथली निसर्गराजी मनमोहक अशीच होती. त्यामुळे पावसाळ्यात एकदा तरी या ठिकाणी यायचा आमचा मनोदय होता. त्याचप्रमाणे सन २०१९ च्या जुलै महिन्यामध्ये आमची पावसाळी ट्रेकची योजना तयार झाली. जुलैमध्ये पाऊस भरात आला होता. दिवसेंदिवस सूर्याचं दर्शनही दुर्लभ होत होतं. अशा वातावरणात पावसाळी ट्रेक आम्ही अनेकदा अनुभवला आहे. परंतु त्यादिवशीचा पावसाळ्यातील ढाकोबाच्या ट्रेक आम्हाला सदैव लक्षात राहील असाच ठरला.
एखाद्या ट्रेकसाठी जायचे असल्यास सहसा सुट्टीचे दिवस वगळूनच आम्ही जात असतो. त्या दिवशीही कोणतीही सुट्टी नव्हती. त्यामुळे कुठेही फारशी वर्दळ असण्याचा संभव नव्हता. जुन्नरवरून आंबोलीला जाण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तास लागला. आंबोली गाव रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये न्हावून निघालेले होते. तसा थेंबांचा वेग जास्त नव्हता. असा पाऊस या ठिकाणी नेहमीच बसत असतो. शिवाय तिन्ही बाजूंना उंच उंच कडे असल्याने सातत्याने तो धुक्यामध्ये राहतानाही दिसतो. अगदी सकाळीच सातच्या सुमारास आम्ही आंबोलीला पोहोचलो. मी, रजत आणि अक्षय असे आमचे त्रिकुट होते. आजवर केलेल्या सर्व ट्रेकपैकी जवळपास ९० टक्के ट्रेकमध्ये आम्ही तिघेही एकत्रच फिरलेलो आहोत. त्यामुळे तिघांनाही एकमेकांबद्दल व्यवस्थित माहिती होती. आमच्यामध्ये रजत सर्वात उत्साही मनुष्य! वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक करण्याचा त्याचा उत्साहच आम्हाला त्याच्या सोबत घेऊन जात असे. यावेळीही काही वेगळी परिस्थिती नव्हती.
आंबोलीतुन दाऱ्याघाटाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्यावेळेस पावसाच्या मंद सरी कोसळत होत्या. वातावरणामध्ये बर्‍यापैकी गारवा तयार झालेला होता. शिवाय कोकण कड्यावरून येणारे वारे शरीराला थंडीची जाणीव करून देत होते. सुरवातीचा रस्ता तसा चढता नव्हता. साधारणतः एक किलोमीटर चालत गेल्यानंतर उजव्या बाजूला जुन्नरमधील सर्वात उंच आंबोली धबधबा दिसून आला. विकेंडला आजकाल या धबधब्याखाली भली मोठी गर्दी दिसते. दोन ते तीन टप्प्यात कोसळणारा हा धबधबा ढाकोबाच्या शिखरावरून मार्गक्रमण करत खाली येत असतो. त्याच्या उजव्या बाजूने कडेकडेने एक पायवाट ढाकोबा शिखराच्या दिशेने जाते. मागील ट्रेकच्या वेळी आम्हाला ती माहीत झाली होती. त्यामुळे त्या झाडीतुन रस्ता शोधण्यास फारसा विलंब लागला नाही. पण आता पावसाळी हंगाम होता, त्यामुळे झाडी ही बर्‍यापैकी वाढलेली होती. डोंगरावरून येणारे पाण्याचे प्रवाह पायवाटेवरूनच खाली येत होते. म्हणूनच थोडं सावधगिरीने आम्ही पावले टाकत होतो. चढण सुरु झाल्यावर थोड्याच अंतरावर एक कोरकाई देवीचे उघडे मंदिर दिसून आले. चार लोखंडी खांब आणि त्यावर पत्रा, आतमध्ये ओबडधोबड दगडांनी सजवलेले ते मंदिर त्या दिवशी पावसाने न्हावून निघत असल्याचे दिसले. मंदिराच्या उजव्या बाजूने डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेने आम्ही चढाई सुरू केली. पावसाचा वेग हळूहळू वाढत चालला होता. त्यामुळे पायवाटेवरील पाण्याचा प्रवाह वेग धरू लागला. कडेलाच धबधबा कोसळत होता. पाण्याचे इतक्या उंचावरून कोसळणारे आवाज त्याच्या रौद्रपणाची जाणीव करून देत होते. आजूबाजूचा परिसर दिसेनासा होऊ लागला होता. केवळ पंधरा मिनिटांमध्ये आम्ही पूर्णतः भिजून गेलो होतो. पायातील बुटांमध्ये पाणी साचू लागले होते. अधून मधून बूट काढून त्या पाण्याला बाहेर काढत होतो. पण ते नेहमीपेक्षा अधिक जड झाले होते. म्हणूनच आमचा चालण्याचा वेगही मंदावला होता. अनेक ठिकाणचा रस्ता हा दाट झाडीतून जात होता. त्यातून येणारे पाण्याचे प्रवाह आता गुडघ्यापर्यंत लागायला लागले होते. पावसाचा वेग वाढत असल्याचे आम्हाला जाणवले देखील. पण पाऊस नंतर कमी होईल या आशेने आम्ही चढाई करत होतो. जवळपास एक तासानंतर पहिला डोंगर पार केला. पावसाची तीव्रता आहे तेवढीच होती. त्याचे टपोरे थेंब आता अंगाला बोचू लागले होते. इथून पुढे तीन ते चार जंगली वाटा पूर्ण केल्यानंतरच आम्ही ढाकोबा पर्यंत पोहोचणार होतो. धबधब्याखाली कोसळणारी पाण्याची धार पार करावी लागणार होती. आज तिचा वेग मात्र प्रचंड दिसून आला. पण तिघांनीही एकमेकांचे हात धरून तो प्रवाह पार केला. पुढे जंगलातून जाणारी एक अरुंद पायवाट होती. ती माहीत असल्यामुळे आम्ही मार्गक्रमण करू शकलो. एखाद्या नवख्या माणसाला कदाचित ती कधीच सापडू शकली नसती. पायवाटेने जातानादेखील पाण्याचा प्रवाह वेगाने पायांवर आदळत होता. कदाचित पुढे जाऊ नका, असा संदेशही तो यातून देत असावा. परंतु त्याचे आम्ही ऐकले नाही. दहा मिनिटानंतर जंगलातील झाडी काहीशी कमी झाली होती. पण पावसाचा वेग कमी होत नव्हता. पुढे रस्ता बंद झाल्यासारखा वाटला. रजतने आजूबाजूची झाडी बाजूला सारून कुठे वाट सापडते का? हे चाचपणी याचा प्रयत्न केला. अक्षय मात्र आता घाबरायला लागला होता. आजुबाजुला घनदाट जंगल आणि वरून धो धो कोसळणारा पाऊस. शिवाय चुकलेली पायवाट! यात आम्ही फसत चाललो होतो. किंबहुना फसलेलो होतो!
पायवाट ही मागील वेळेस गेलो होतो, त्याच वेळेसची होती. पण नक्की कुठे संपली, वा सुरू झाली, हे समजले नाही. पाण्याचे प्रवाह सगळ्याच बाजूंनी येत होते. त्यामुळे पुढचा रस्ता सापडत नव्हता. काय करावे ते सुचत नव्हते. बराच वेळ आम्ही तिथेच रस्ता शोधत कसेबसे चाचपडत होतो. पण तो सापडत नव्हता. रजतला देखील त्या दिवशी मी पहिल्यांदाच हताश झालेले बघितले. तो अनुभवी ट्रेकर होता. पण त्या दिवशी आम्ही सर्वच जण फसलो होतो. शेवटी पुन्हा मागे फिरायचे ठरवले. पाणी जाईल त्या दिशेने आम्ही खाली उतरू लागलो. आता पाण्याचा प्रवाह आम्हाला खाली खेचत होता. बराच वेळ झाला पण परतीचे ते जंगल संपत नव्हते. पाणी मात्र वेगाने खालच्या दिशेने वाहत होते. पाऊण ते एक तास झाला असेल. तरीही आम्ही पूर्वी पार केलेल्या धबधब्याच्या प्रवाहापर्यंत पोहोचलो नाही. कदाचित पुन्हा रस्ता चुकला होता! त्यामुळे आता हृदयाची धडधड वाढायला लागली होती. कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती. ते पण पूर्णतः भिजून गेले होते. पाऊस वेगाने कोसळतच होता. आजूबाजूला अंधार पडला नव्हता, हीच आमच्यासाठी जमेची बाजू होती. अक्षय आता रडकुंडीला आला होता. काय करावे काहीच सुचेनासे झाले होते. पायवाटा पावसाच्या प्रवाहाने पूर्णतः विरून गेल्या होत्या. वेगाने कोसळणाऱ्या त्या धारांमध्ये आम्ही तिघेही एकमेकांचे हात पकडून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत होतो.
जंगलातील एका वरच्या धारेतून झाडे हलण्याचा आवाज आला. तिघांनीही चमकून त्या दिशेने पाहिले. झाडांची वरची पाने हलत होती. आत मध्ये कुणीतरी असावे व ते आपल्या दिशेने येत आहे, असे जाणवत होते. एखादं हिंस्त्र श्वापद तर नसेल ना? या विचारानेच आमची गाळण उडाली.
तिघांनीही एकमेकांचे हात घट्ट धरले होते. समोरच्या झाडाची एक फांदी बाजूला सारली गेली व त्यातून एक व्यक्ती आमच्या दिशेने येताना दिसली. हातात काठी घेऊन पाण्याच्या प्रवाहामध्ये पुढे सरकत सरकत एक वृद्ध महिला आमच्या दिशेने येत होती. डोक्यावर तिने पावसापासून संरक्षण होण्यासाठी रेनकोटसारखा एक प्लास्टिकचा झगा घातला होता. ती काठी टेकवत आमच्या समोर येऊन उभी राहिली.
"काय रे पोरांनो... काय करता हितं?" - तिचा प्रश्न.
तिच्या या काळजीवजा प्रश्नाने आम्हाला थोडेसे हायसे वाटले.
"आजी... ढाकोबाकडे जायचा रस्ता कुठय?", रजतने विचारले.
यावर तिने स्मितहास्य केले व बोलू लागली.
"ढाकुबा तिकडं पलीकडच्या डोंगराकडं राहिला. ह्यो डोंगररस्ता पार दुर्गा देवीच्या मंदिराकडे जातो. ते पण लय लांब हाय... पण एवढ्या पावसात तुम्हाला रस्ता गावल का?"
"आजी, आम्हाला खाली गावात जायचा रस्ता तरी सांगा. आम्ही परत जातो.", अक्षय बोलला.
"चला मग माझ्यासोबत.", असं म्हणत ती आजी पुढे चालू लागली.
पाण्याच्या त्या वेगवान प्रवाहामध्ये देखील अतिशय स्थिर पावले टाकत ती चालत होती. रस्ता तिच्या ओळखीचा होता. आम्हाला तिच्यावर विश्वास ठेवण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. आम्ही तिच्या मागे मागे सावध पावले टाकत चाललो. दोन-तीन वळणे घेत आम्ही धबधब्याच्या प्रवाहाशी पोहोचलो. अतिशय शिताफीने पावले टाकत तिने तो प्रवाह सहजपणे पार केला. आम्हाला मात्र एकमेकांचे हात धरल्याशिवाय पुढे जाता येत नव्हते. ती सपासप पावले टाकत चाललेली होती. आम्हीदेखील तिच्यामागे त्याच वेगाने चालू लागलो होतो.
"एवढ्या पावसाचं कशाला यायचं पोरांनो इकडं?", चालता चालताच तिने प्रश्न केला.
पण आमच्यापैकी कोणीही तिला उत्तर दिले नाही. कदाचित तितके बळही आमच्यामध्ये शिल्लक नसावे. अर्ध्या तासाच्या उतरणीनंतर आम्ही सकाळी भेटलेल्या त्या उघड्या मंदिरापाशी आलो. तेव्हा सुटकेचा निश्वास सोडला.
"थँक्यू आजी!", असं म्हणत अक्षयने तिचे आभार मानले. ती काहीच बोलली नाही. फक्त स्मितहास्य केले व पाठमोरी होऊन पुन्हा वरच्या दिशेने चालु लागली. आम्हाला काय बोलावे, काही सुचत नव्हते. एका मोठ्या संकटातून तिने आमची सुटका केली होती. धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये ती तिची चालत जाणारी ती पाठमोरी आकृती काही सेकंदातच दिसेनाशी झाली. आम्ही तिघे जण ज्या वाटेने चाचपडत चाललो होतो, त्याच वाटेने ती झराझरा चालत निघूनही गेली.
आमचे चेहरे आता चिंतामुक्त झाले होते इतक्या वर्षात अपूर्ण राहिलेला हा आमचा पहिलाच ट्रेक! शिवाय पावसाच्या भीषणतेची जाणीव करून देणारा देखील पहिलाच ट्रेक होता. आम्ही भानावर आलो. तेव्हा अनेक प्रश्न आमच्या मनात पडत गेले. ढाकोबाच्या त्या परिसरामध्ये कोणीही मनुष्य राहत नाही. मग इतक्या पावसात ती आजी त्या ठिकाणी आली कशी? शिवाय ती आम्हाला रस्ता दाखवून पुन्हा त्याच मार्गाने निघून गेली. नंतर जेव्हा आम्हाला या घटना आठवायला लागल्या त्यावेळेस त्या आजी बद्दलचे कुतूहल नेहमीच जागृत व्हायला लागले. पुन्हा कधी ढाकोबाला गेलोच तर तिच्या घरी नक्की जाऊ, असे आम्ही ठरवले. तिचे मनापासून आभार मानायचे राहूनच गेले होते.
या घटनेनंतर साधारणतः चार महिन्यांनी आत्रामगडाच्या ट्रेकवर जाण्यापूर्वी पायथ्याशी कोरकाई देवीचे एक छोटेखानी बंदिस्त मंदिर दिसून आले. सहसा आम्ही मंदिरामध्ये जात नाही. पण या मंदिरात जाण्याची इच्छा मनात निर्माण झाली. मंदिराचे दार अतिशय छोटे होते. त्याच्या वरती अवाढव्य अक्षरांमध्ये 'श्री कोरकाई प्रसन्न' असे लिहिलेले होते. आम्ही त्या चिंचोळ्या दारातून आत प्रवेश केला. समोर एक शेंदूर फासलेला दगड ठेवलेला होता आणि भिंतीवर देवीचा चित्रकाराने काढलेला ओबडधोबड चेहरा दिसून आला. तो चेहरा पाहिला आणि काळजाचा एक ठोकाच चुकला! हा तोच चेहरा होता, ज्या आजीबाईने आम्हाला ढाकोबावर संकटातून मुक्तता केली होती!

Monday, June 28, 2021

गुगल आणि मराठी भाग ३/१० - गूगल क्रोम एक्सटेंशन

गूगल क्रोम एक्सटेंशन

जगातील सर्वाधिक संगणकांमध्ये वापरण्यात येणारा वेब ब्राउझर म्हणजे गुगल क्रोम होय. गुगलने तयार केलेला हा वेब ब्राऊजर जगातील दोन तृतीयांश संगणकांमध्ये वापरण्यात येतो. या ब्राउझरद्वारे अतिशय वेगाने इंटरनेट ब्राउझिंग करता येत असल्या कारणाने तो सर्वात लोकप्रिय ब्राउझर म्हणून गणला गेलेला आहे.  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गुगलने नैसर्गिक भाषा प्रक्रिया अर्थात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या सर्वच उत्पादनांचा वापर आपल्याला या वेब ब्राउझरमध्ये करता येतो.
मागील लेखामध्ये आपण गूगल क्लाऊड इनपुट टूल्सचा वापर करून मराठी भाषा कशी लिहायची, हे पाहिले. तशाच प्रकारच्या क्लाऊड इनपुट टूल्सचा वापर गुगल क्रोम ब्राउजरमध्ये थेट एक्सटेन्शनचा वापर करून करता येतो. गूगल क्रोम एक्सटेंशन म्हणजे या वेब ब्राउझरला गुगलद्वारे देण्यात येणारी अतिरिक्त सुविधा आहे. ज्यामध्ये हजारो एक्स्टेंशन्स आज गूगल क्रोममध्ये उपलब्ध आहेत. त्यातीलच एक एक्सटेंशन म्हणजे 'गूगल इनपुट टूल्स' होय. त्याचा वापर करायचा असल्यास क्रोमच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

https://chrome.google.com/webstore/category/extensionsचित्र क्रमांक १ मध्ये दाखवल्याप्रमाणे गुगल क्रोमचे वेब स्टोअर उघडेल. या संकेतस्थळावर डाव्या बाजूला Search the Store लिहिलेले एक टेक्स्टबॉक्स दिसेल. त्यामध्ये google input tools असे इंग्रजीमध्ये टाईप करा. 
 

चित्र क्रमांक २ मध्ये दाखवल्याप्रमाणे गूगल इनपुट टूल्सचे एक्सटेंशन तुम्हाला दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर चित्र क्रमांक ३ प्रमाणे विंडो उघडेल. 
 
आता Add to Chrome या बटनावर क्लिक करा. यानंतर तुमच्या वेब ब्राउझरला चित्र क्रमांक ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे पॉप डाऊन विंडो उघडेल. 
 

आता Add Extension या बटणावर क्लिक करा. नंतर लगेचच क्रोमच्या अधिकृत संकेतस्थळावरून सदर एक्सटेन्शन डाउनलोड होईल व चित्र क्रमांक ५ मध्ये दाखविल्याप्रमाणे एक मेसेज तुम्हाला उजव्या बाजूला वरील कोपऱ्यामध्ये दिसून येईल. 
 
त्यावर क्लिक केल्यानंतर गूगल इनपुट टूल्स इन्स्टॉल झालेले दिसेल. चित्र क्रमांक ६ मध्ये दाखविल्याप्रमाणे या नावासमोरील 'पिन आयकॉन'वर क्लिक करा. 
 

यामुळे सदर एक्सटेन्शन फ्रंट पेज वर तुम्हाला सातत्याने दिसून येईल. चित्र क्रमांक ७ मध्ये दाखविल्याप्रमाणे या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसून येतील. यापैकी पहिल्या Extension Option वर क्लिक करा. 
 

इनपुट टूल्समध्ये असलेल्या गुगलने दिलेल्या सर्व भाषा आता तुम्हाला दिसून येतील. खाली स्क्रोल करुन डाव्या बाजूच्या विंडोमध्ये मराठी भाषा शोधा. त्यावर क्लिक करा व समोरील बाणावर क्लिक करून भाषा निवडा. याद्वारे मराठी भाषा उजव्या बाजूच्या विंडोमध्ये अर्थात 'सिलेक्टेड इनपुट टूल्स'मध्ये तुम्हाला दिसून येईल. याकरता चित्र क्रमांक ८ तपासा. 
 

आता चित्र क्रमांक ९ मध्ये दाखविल्याप्रमाणे गूगल इनपुट टूल्सच्या उजव्या वरील कोपऱ्यातील आयकॉनवर क्लिक करा. 
 

ज्याद्वारे तुम्हाला मराठी नाव सर्वात वरच्या बाजूला दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर मराठी टायपिंग सक्षम होईल. आता कोणत्याही वेबसाइटवर तुम्ही मराठीमध्ये टाईप करू शकता.
गूगल इनपुट टूल्सचे आयकॉन 'म' या अक्षराने तुम्हाला दिसून येईल. ते निळ्या रंगामध्ये असल्यास मराठी टायपिंग चालू आहे, असे समजते. चित्र क्रमांक १० मध्ये दाखविल्याप्रमाणे गुगलची वेबसाईट ओपन करून त्यामध्ये मराठीमध्ये लिहायला सुरुवात करा. 
 

जी अक्षरे अथवा शब्द तुम्ही इंग्रजीमध्ये लिहाल, ती मराठी मध्ये टाईप झालेली दिसून येतील. अशाप्रकारे तुम्ही गुगलमध्ये थेट मराठी भाषेमध्ये सर्च करू शकता. शिवाय एखादा मराठी लेख लिहायचा असल्यास गुगल डॉक्युमेंट्सचा (docs.google.com) देखील वापर करता येऊ शकतो. चित्र क्रमांक ११ मध्ये दाखविल्याप्रमाणे मी गुगल डॉक्यूमेंटची वेबसाईट उघडलेली आहे. त्यातील एका नव्या डॉक्युमेंट मध्ये मी गूगल इनपुट टूल्सचा वापर करून टाईप केलेले आहे. 
 

अशाच पद्धतीने गूगल इनपुट टूल्सचा वापर अन्य ठिकाणी देखील करता येऊ शकतो. उदाहरणार्थ चित्र क्रमांक 12 मध्ये दाखविल्याप्रमाणे विकिपीडियाच्या वेबसाईट वर मी मराठी भाषा या नावाने सर्च केलेले आहे. 
 
 
अशाच पद्धतीने तुम्ही अन्य वेबसाईटवर देखील मराठी भाषेचा थेट वापर करू शकता. याकरिता कोणत्याही प्रकारच्या फॉन्टच्या वापराची आवश्यकता नाही. पुन्हा कुठे जर इंग्रजी मध्ये लिहायचे असल्यास, उजव्या वरील कोपऱ्यातील 'म' अक्षरावरून क्लिक करून ते बंद करा. आता इंग्रजी मध्ये तुम्हाला टाईप करता येऊ शकेल. या एक्स्टेंशनची सुविधा केवळ गूगल क्रोम वेब ब्राऊजर मध्येच करण्यात आलेली आहे. इंटरनेटवर मराठीचा सहज वापर करण्यासाठी याचा उपयोग करा. धन्यवाद!

Thursday, June 24, 2021

तंत्रज्ञानाच्या दारातील युरोप

संगणक तंत्रज्ञान म्हणजे अमेरिका, असा सर्वसाधारण आपला समज असतो. परंतु, युरोपातील अनेक देशांमध्ये विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित केले जाते. शिवाय या तंत्रज्ञानाधारित वस्तूंचा उपयोग जगभरातील अनेक देश करत आहेत. अशाच काही देशातील महत्त्वाच्या उत्पादनांचा घेतलेला हा आढावा.

झेक रिपब्लिक: थ्रीडी प्रिंटिंग

२०२० पर्यंत थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानामध्ये झेक प्रजासत्ताक या देशाने मोठी आघाडी घेतलेली आहे. विविध प्रकारच्या उत्पादनांचा मार्ग या तंत्रज्ञानामुळे सुकर झाल्याचे दिसते. जगातील थ्रीडी प्रिंटिंगचे तंत्रज्ञान व त्यातील नवनव्या सुविधा या झेकच्या प्राग या राजधानीमध्ये तयार झालेल्या आहेत. प्राग शहरातील प्रुसा रीसर्च ही कंपनी आधुनिक काळातील वेगाने विकसित होणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. दर महिन्याला हजारो थ्रीडी प्रिंटिंग मशीन बनविण्याचे उद्योग या कंपनीद्वारे केले जातात. विशेष म्हणजे थ्रीडी प्रिंटिंग मशीन स्वतः दुसऱ्या थ्रीडी प्रिंटिंग मशीनची निर्मिती करते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान ओपन सोर्स आहे. अर्थात तुम्हाला जरी स्वतःचे थ्रीडी प्रिंटींग हार्डवेअर व सॉफ्टवेअर बनवायचे असल्यास, त्याचा स्त्रोत इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या थ्रीडी प्रिंटिंग मशीनचा वापर वेगाने होणार आहे.


इस्टोनिया: डिजिटल प्रशासन

डिजिटल प्रशासन कशा पद्धतीचे असावे, याचा आदर्श वस्तूपाठ युरोपातील इस्टोनिया या देशाने घालवून दिलेला आहे. अनेक देशांमध्ये जी कामे करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये तासन् तास रांगा लावाव्या लागतात, ती कामे अगदी काही क्लीकवर इस्टोनिया देशामध्ये आपल्या नागरिकांसाठी केली जातात. एकंदरीतच या देशातील ९९ टक्के प्रशासकीय कामे ही ऑनलाईन पद्धतीनेच होतात. मुलाचा जन्म झाल्यापासूनच त्याच्या सर्व नोंदी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत. बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलद्वारेच त्याच्या जन्माचे प्रमाणपत्र इ-पद्धतीने तयार केले जाते. त्याबरोबरच आरोग्य विमा आणि बाळासाठी असणारे अन्य शासकीय फायदे लगेचच त्याला मिळायला सुरुवात होते. यात पालकांचा कोणताही थेट सहभाग राहत नाही. म्हणूनच बाल्टिक प्रदेशात येणाऱ्या या देशाला ई-इस्टोनिया असेही म्हटले जाते. मागील अनेक वर्षांपासून ई-प्रशासन करण्याचे कार्य इस्टोनिया मध्ये वेगाने सुरू होते. शिवाय त्यांची लोकसंख्येची घनता देखील कमी असल्यामुळे डिजिटल प्रशासन करण्यामध्ये फारशा अडचणी आल्या नाहीत. आज सुमारे तीन हजारपेक्षा अधिक सेवा या ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना दिल्या जातात. त्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांना केवळ स्वतःचे राष्ट्रीय ओळखपत्र वापरावे लागते. विशेष म्हणजे हेच ओळखपत्र ते ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरोग्य विम्यासाठी वापरू शकतात. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ओळखपत्राचा वापर करून ऑनलाइन मतदान देखील करता येते. इस्टोनियन नागरिकांना केवळ तीन गोष्टींसाठी प्रत्यक्ष शासकीय कार्यालयात जावे लागते. पहिले लग्नाची नोंदणी करण्यासाठी, दुसरे घटस्फोट घेण्यासाठी आणि तिसरे कोणती मालमत्ता विकत घ्यायची असल्यास.

जर्मनी: स्मार्ट फॅक्टरी

या शतकाच्या सुरुवातीलाच आपण औद्योगीकरणाच्या चौथ्या पिढीमध्ये प्रवेश केला. यास तंत्रज्ञानातील भाषेत इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो (Industry 4.0) असे म्हटले जाते. या पिढीमध्ये औद्योगिक क्षेत्राचे स्वयंचलन करण्यावर भर देण्यात आलेला आहे. ज्याद्वारे कमीत कमी मनुष्यबळ वापरून अधिकाधिक उत्पादन केले जाते. कारखान्यांमधील जवळपास सर्वच यंत्रसामग्री ही स्वयंचलित आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय कमी मनुष्यबळाचा वापर केला जातो. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून देखील अनेक निर्णय घेतले जातात. यास "स्मार्ट फॅक्टरी" असे म्हटले जाते. मागील दशकांमध्ये औद्योगिक प्रगतीत जर्मनीचा खूप मोठा वाटा होता. ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये केलेली जर्मनीची प्रगती वाखाणण्याजोगी होती. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर हा वेग काहीसा मंदावला. परंतु, हळूहळू त्याने पूर्ण वेग घेतला. आज जर्मनीत कारखान्यामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान अतिशय अद्ययावत प्रकारचे आहे. कॅमेरा तसेच सेन्सर्सचा वापर करून उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष ठेवले जाते. शिवाय रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे अनेक कार्ये सहज व सुलभ पार केली जातात. याशिवाय ड्रोनद्वारे संपूर्ण कारखान्यावर व कच्च्या मालाच्या वितरणावर लक्ष ठेवण्यात येते. एखाद्या ठिकाणी कच्चा माल संपला असेल किंवा संपत आला असेल तर सॉफ्टवेअरद्वारे आपोआप ऑर्डर दिल्या जातात. कंपनीतील सर्व कामगारांवर लक्षही ठेवले जाते. जर्मनीतील अनेक कंपन्यांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे. उच्च वेगाच्या इंटरनेटद्वारे मशीन, सॉफ्टवेअर आणि रोबोट एकमेकांना जोडलेले आहेत. अनेक ठिकाणी आरएफआयडी चिप बसवून माहितीची देवाण-घेवाण, नियंत्रण व विश्लेषण केले जाते. इंडस्ट्री ४.० मध्ये स्वयंचलन व स्वायत्तता या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे. त्यादृष्टीनेच ग्राहकांची गरज भागवण्यासाठी स्मार्ट फॅक्टरीची रचना करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी ग्राहकांचा थेट कंपनीशी संवाद होत असतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व चॅटबोट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कंपन्या ग्राहकांची मते व माहिती जाणून घेतात. त्यानुसारच उत्पादन प्रक्रिया राबवली जाते. या कारणास्तव अनेक कंपन्यांकडे ग्राहक आकर्षित झाले आहेत. अतिशय वेगाने होणारी कंपन्यांची प्रगती संगणक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यामुळेच होत असताना दिसते. "इंटरनेट ऑफ थिंग्स" या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कंपनीच्या मालकांना कंपनीशी संबंधित प्रत्येकाशी थेट संवाद व नियंत्रण साधने सहज शक्य झाले आहे. त्यामुळे वेळेची, ऊर्जेची व मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात बचत होताना दिसत आहे. भविष्यकाळाचा विचार केल्यास लवकरच संपूर्ण स्वयंचलित स्मार्ट फॅक्टरी तयार झाल्यास आश्चर्य वाटायला नको!

लक्झेंबर्ग: वेगवान इंटरनेट

युरोपातील सर्वात वेगवान इंटरनेट लक्झेंबर्ग या देशामध्ये उपलब्ध आहे. जागतिक आकडेवारीचा विचार केल्यास सिंगापूरनंतर इंटरनेटच्या वेगामध्ये लक्झेंबर्गचा दुसरा क्रमांक लागतो. शिवाय याच कारणामुळे स्टार्ट-अप कंपन्यांसाठी सर्वोत्तम जागा म्हणून या देशाचे नाव युरोप मध्ये अग्रणी आहे. लक्झेंबर्गने डिजिटल प्रणाली विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतविला आहे. त्यातच वेगवान इंटरनेट या देशात उपलब्ध झालेले आहे. इंटरनेटच्या एकूण व्याप्तीचा विचार केल्यास या देशामध्ये ९६ टक्के जागेवर इंटरनेट उपलब्ध आहे. एकूण युरोपमध्ये हाच आकडा ७४ टक्के इतका येतो. लक्झेंबर्गमध्ये सर्व प्रमुख ठिकाणी शासनाद्वारे वायफाय इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्याद्वारे नागरिकांना आपल्या मोबाईलवर थेट इंटरनेट वापरता येते. याच कारणास्तव खाजगी इंटरनेट सुविधा देणाऱ्या कंपन्या या देशामध्ये अतिशय अल्प प्रमाणात आहेत.

फिनलँड: ई-हेल्थ

कोणत्याही देशाच्या दृष्टीने आपल्या नागरिकांचे आरोग्य हे सर्वोच्च स्थानी असते. याचा प्रत्यय आपण गेल्या एक वर्षापासून येतच आहे. देशाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे डिजिटाइज्ड करण्याचे काम फिनलँड या देशाने केलेले आहे. जगातील सर्वात अत्याधुनिक आरोग्य सुविधा या देशामध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय या प्रकारची यंत्रणा व सॉफ्टवेअर निर्यात करणाऱ्या अनेक कंपन्या फिनलंड देशांमध्ये स्थित आहेत. मागील काही वर्षांपासून मोबाईलचा, ऑनलाईन बँकिंगचा व गव्हर्नन्सचा वाढता वापर पाहता फिनलँडने या तंत्रज्ञानाचा व सुविधांचा वापर आरोग्याच्या दृष्टीने करण्यासाठी यंत्रणा विकसित केली. डॉक्टरद्वारे दिले जाणारे प्रिस्क्रिप्शन देखील डिजिटली दिले जाते. २०१० पासून नागरिकांचा सर्व आरोग्यविषयक डेटा आज त्यांच्या आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध आहे. या माहितीचा उपयोग देशातील कोणताही डॉक्टर सदर रुग्णाची व शासनाची अनुमती घेऊन वापरू शकतो. त्याद्वारे नागरिकांच्या आरोग्याचा पूर्ण इतिहास डॉक्टरांना पाहता येतो. याशिवाय मागील वीस वर्षांची माहिती साठवण्याची सुविधा देखील या यंत्रणेमध्ये आहे. यामुळे देशात कुठेही नागरिक आरोग्य सुविधेचा वापर करून घेऊ शकतात. तसेच अन्य शहरात असलेल्या डॉक्टरांशी संवाद करण्याची प्रणाली देखील फिनलँडमध्ये तयार करण्यात आलेली आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंट व मार्गदर्शन करण्याची सुविधा या यंत्रणेत उपलब्ध आहे. फिन-जेन नावाच्या प्रकल्पाअंतर्गत नागरिकांच्या आरोग्याविषयीचे अनेक प्रकल्प या देशात राबवले जात आहेत. विशेष म्हणजे दहा टक्के नागरिकांच्या गुणसूत्रांची माहितीसुद्धा सरकारकडे उपलब्ध आहे. ज्याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भविष्यात होणाऱ्या रोगांचे निदान आधीच करून घेणे शक्य होणार आहे!

अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर भारतासारख्या विकसनशील देशात देखील शक्य आहे. आपल्याकडे तंत्रज्ञांची कमतरता नाही. पण राजकीय इच्छाशक्ती, डिजिटल सुविधांचा अभाव आणि संगणक साक्षरता या मुख्य अडथळ्यांकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता भासते.

- तुषार भ. कुटे, पुणे
 

Tuesday, June 8, 2021

मराठीतून अभियांत्रिकी

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे यावर्षीपासून भारतातील विविध १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रादेशिक भाषांमधून अभ्यासक्रम चालविण्यासाठी प्रस्ताव पाठविलेले आहेत. मागील वर्षीच या विषयाची चर्चा सुरू झाली होती. अखेर ती अंतिम टप्प्यात आली. याबद्दल तंत्रशिक्षण परिषदेचे आभार मानायला हवे. काही महिन्यांपूर्वी तंत्रशिक्षण परिषदेने द्वितीय ते चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यात त्यांना असे आढळून आले की ४२ टक्के विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा आहे. त्यातूनच नवीन प्रस्ताव तयार झालेले आहेत. भारतातील मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि हिंदी भाषिक प्रदेशांमधून प्रादेशिक भाषेमध्ये अभियांत्रिकी शिक्षण लवकरच सुरू होणार आहेत. मराठी भाषेत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातून पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (सीओईपी) या दोनच महाविद्यालयांचे प्रस्ताव आहेत. विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहराने पुन:श्च मराठी भाषेचे देखील माहेरघर आहे, हे सिद्ध केले आहे. शिवाय या निमित्ताने एका नव्या शैक्षणिक अध्यायाला पुण्यातून प्रारंभ होणार आहे, असे दिसते. दोन्ही महाविद्यालये गुणवत्तेच्या बाबतीत अतिशय सरस अशीच आहेत. त्यामुळे मराठीतून अभियांत्रिकी शिक्षण देताना ते सर्वोत्तमच असेल, अशी खात्री बाळगता येऊ शकते.
युरोप तसेच पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये तंत्रशिक्षण मातृभाषेतूनच दिले जाते. त्यामुळे देशांतर्गत प्रगतीला वेगाने चालना मिळत आहे. भारतामध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. आपल्याला युरोपीय व अमेरिकन देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळेच इंग्रजीतून अभियांत्रिकी शिक्षणाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. अनेकांचे असेही म्हणणे असते की, इंग्रजीतून शिकलं की फाडफाड बोलता येतं! परंतु हा भ्रम आहे. आजही इंग्रजीतून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या बहुतांश, किंबहूना तीन चतुर्थांश मुलांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नाही. शिवाय अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये असल्यामुळे बहुदा तो समजतही नाही. याच कारणास्तव ज्ञानाधारित पिढ्या आपल्या देशात तयार होताना दिसत नाहीत. बहुतांश मुले केवळ घोकंपट्टी करून अभियांत्रिकीच्या परीक्षा पास होत असतात. मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण मिळाल्याने किमान त्यांना संकल्पना समजण्यास तरी निश्चितच मदत होईल. बाकी फाडफाड इंग्रजी बोलणे, हे ज्याचे त्याच्या हातात आहे. अनेकांना असेही वाटते की, इंग्रजीतल्या अभियांत्रिकी संकल्पनांना मराठीमध्ये भाषांतरित कराव्या लागतील. परंतु तसे करण्याची आवश्यकता वाटत नाही. युरोपातील स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज भाषांमध्ये अभियांत्रिकीच्या संकल्पना जशाच्या तशा मांडलेल्या आहेत. भारतीय भाषांमध्येही हाच प्रयोग चालू ठेवावा लागेल. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित समजू शकतील. 

 
 
इंग्रजी ही जगाची भाषा आहे, असे सांगून केवळ त्याच भाषेतून शिक्षण घेणे गरजेचे आहे ही समजूत लवकरच बाद होईल, असे दिसते. शेवटी काय प्रगती करण्यासाठी भाषा जरी महत्त्वाची असली तरी त्याहीपेक्षा ज्ञान महत्त्वाचे आहे. मागील काही वर्षांपासून अनेक तंत्रज्ञानावर मी मराठीमध्ये लेख पुस्तके लिहिली तसेच व्हिडिओ देखील तयार केलेले आहेत. अन्य इंग्रजी भाषेतील साधनांपेक्षा मराठी भाषेतील साधनांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. शिवाय सर्वांनाच या संकल्पना व्यवस्थित समजत आहेत. आपल्या मातृभाषेतूनच प्रत्येकाला ज्ञान सहज मिळू शकते. त्यामुळे तंत्रशिक्षण परिषदेच्या या नव्या निर्णयाचे सहर्ष स्वागत करायला हवे.

Ref. Times of India, 6th June 2021.

Sunday, June 6, 2021

पडद्यावरील शिवराज्याभिषेक

६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिवस. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस होता. याच दिवशी मराठा राजा छत्रपती झाला! स्वराज्य आणि रयतेचे राज्य शिवछत्रपतींनी स्थापन केले.
कृष्णधवल चित्रपटांच्या काळातील भालजी पेंढारकरांपासून तर आजच्या हिरकणी चित्रपटापर्यत अनेकांनी पडद्यावर शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला. या सर्वांचे सादरीकरण निश्चितच उत्तम दर्जाचे होते. सर्वच गाणी सातत्याने पहावी आणि ऐकावीशी वाटतात. प्रत्येक मराठी माणसाला ती प्रेरणा देणारीच आहेत. स्टार प्रवाह वाहिनी चालू झाली त्यावेळेस त्यांनी शिवरायांवर "राजा शिवछत्रपती" हि मालिका त्यांच्या वाहिनीवरून प्रदर्शित केली होती. या मालिकेची सुरुवातच शिवराज्याभिषेकाने दाखविण्यात आली होती. अन्य चित्रपट व मालिकांमध्ये दाखविण्यात आलेल्या शिवराज्याभिषेकापेक्षा या मालिकेतील हा सोहळा काहीसा वेगळा व शिवाजी महाराजांचे भाव खऱ्या अर्थाने प्रदर्शित करणारा होता. राज्याभिषेक सोहळा हा राजासाठी व तेथील प्रजेसाठी निश्चितच आनंदाचा एक सर्वोच्च सोहळा असतो. परंतु, या मालिकेत दाखविलेल्या या सोहळ्यामध्ये सिंहासनाकडे चालत जाताना शिवाजी महाराजांच्या मनातील भावना अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आल्या होत्या. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून राज्याभिषेकापर्यंत स्वराज्यासाठी अनेक मराठा सरदारांनी प्राणांचे बलिदान दिले होते. त्यांची आठवण शिवाजीमहाराजांना येते. बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी काकडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर यांचे बलिदान शिवरायांना आठवते. त्यांच्या मनात हाही प्रश्न निर्माण होतो की, 'माझ्या भावांनो... तुमच्या पायऱ्या करून मी सिंहासनाधीश्वर व्हायचं?' त्यांचा कंठ दाटून येतो. त्यावर ते पुढे विचार करतात,
मज दिली आयोध्या
तुम्हा लाभले वैकुंठीचे नाव,
तुम्ही लपला कोठे
मला घालुनी देवपणाचे घाव...
अतिशय भावपूर्ण असा हा प्रसंग चित्रित करण्यात आलेला आहे. तो पाहताना कोणत्याही मराठी माणसाचा कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही. एकदा तरी हा व्हिडीओ नक्की पहा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!!

व्हिडिओची हॉटस्टार लिंक: https://www.hotstar.com/in/tv/raja-shivchhatrapati/13021/shivaji-takes-an-oath/1000166210

मूळ गाणे:

जय राजा शिवछत्रपतींचा,
जय मंगलमय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...

स्वराज्य सुखकर मुक्त धरेवर,
सुराज्य करिती शिवराजेश्वर
प्रतिरोधाचा लय हो,
सत्वर जन भाग्योदय हो
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...

औक्षमान भव, दिगंत वैभव,
रामकीर्ति भव, कृष्णनीती भव
पुण्यप्रतापी सुखकर्ता शिव,
सुखमय संजय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...

बंधनात लाभे सिंहासन,
शककर्त्याचे लोक प्रशासन
बंधनात लाभे सिंहासन,
शककर्त्याचे लोक प्रशासन
रामच राजन, राम प्रजाजन
शासन सविनय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो... 


 

Thursday, May 27, 2021

नटसम्राट

वि. वा. शिरवाडकर यांची काही कादंबऱ्या पुस्तकांच्या कपाटाच्या बाहेर काढून ठेवलेल्या होत्या. तेवढ्यात 'तो' एक जण आला. त्याने पुस्तके चाळायला सुरुवात केली. एका पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखकाचे छायाचित्र होते. त्याने टक लावून पाहिले. काहीसे आठवल्यासारखे केले व तेवढ्यात त्याचा दिवा पेटला असावा. त्याने मला विचारले,
"या पुस्तकाचे लेखक बघ... ते मराठी कवी नाही का, कुसुमाग्रज... त्यांच्यासारखे दिसतायेत."
मी वळून त्याच्याकडे बघितले. पुस्तकावरचा तो फोटो पाहून स्मितहास्य केले आणि त्याला हसून दुजोरा दिला,
"नाही रे! हे त्या नटसम्राट नाटकाचे नाटककार आहेत ना, त्यांच्या सारखेच दिसतात...!!!"
मग तो सुद्धा परत ते छायाचित्र टक लावून पाहू लागला.

Monday, May 24, 2021

रुमाली रहस्य: गो. नी. दांडेकर

गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही ऐतिहासिक रहस्यकथा होय. या कादंबरीला पेशवेकालीन पार्श्वभूमी आहे. घाशीराम कोतवाल यातून एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. याशिवाय नाना फडणवीस व रामशास्त्री प्रभुणे देखील या कथेतून आपल्याला भेटतात. कादंबरीची सुरुवात होते सर्जेराव घारे नावाच्या मराठा सरदाराच्या खुनापासून आणि थोड्याच वेळामध्ये आणखी एका खुनाची वार्ता घाशीराम कोतवाल यांच्या कानावर येते. लगेचच शोध पथके आपल्या कामाला लागतात. अंदाज बांधले जातात, तर्कवितर्क करून खुन्याच्या मार्गावर मराठी सरदार पाठवले जातात. उत्तरेकडून आलेले व बैराग्याचा वेश घेतलेले दोन जण वेगाने दक्षिणेकडे कूच करत असतात. मराठी सरदार त्यांचा निजामाच्या सीमेपर्यंत पाठलाग करतात. परंतु त्यांना यश येत नाही. तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत वेगळ्या मार्गाने खुन्यापर्यंत पोहोचण्याचा विचार केला जातो. घाशीराम कोतवाल यांची दृष्टी व मराठा सरदारांचे साहस यातून या खुनाची उकल होते. परंतु ज्या गोष्टीसाठी हा खून झालेला असतो ती मात्र खोटी असते. मग खरी गोष्ट नक्की कुठे आहे? त्याची उकल शेवटच्या प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी अनेक रेखाचित्रांनी सजलेली आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर प्रसंग उभे करण्यात ती निश्चितच यशस्वी होते. शिवाय गो. नी. दांडेकर यांचा रहस्यमय साहित्याचा हा प्रयोगही उत्कंठावर्धक शेवटाने संपतो. Wednesday, May 19, 2021

वेडा विश्वनाथ

नावात लिहिल्याप्रमाणे विश्वनाथ उर्फ विश्या हा या कादंबरीचा मुख्य नायक आहे. संपूर्ण उपेक्षित, कोणतीही जाण नसलेला तसेच समाजामध्ये कोणतेही स्थान नसलेला हा वेडा विश्वनाथ होय. त्याचं वय विशीच्या पार आहे, पण बुद्धीची समज फक्त ३ वर्षांच्या मुलाइतकीच आहे. दिवसभर बाहेर फिरून काही ना काही उद्योग करत राहणे आणि परत फिरून संध्याकाळी घरी येणे, हाच त्याचा सर्वसामान्य दिनक्रम! त्याच्याच गावात राहणारी आशा ही वयात आलेली मुलगी होय. एक दिवस गावातील काही उनाड टाळकी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात. परंतु वेडा विश्वनाथ तिला त्यातून सहीसलामत सोडवतो. त्याचं हे वेगळं रुप तिला आश्चर्यचकित करणारं असतं. एक-दोन शब्दांच्या पलीकडेही न बोलणारा वेडा विश्या इतकी अचाट कामगिरी कशी करू शकतो, याचे तिला आश्चर्य वाटल्याशिवाय तिला राहवत नाही. मग या गोष्टीमध्ये एन्ट्री होते ती पीएसआय अदवंत यांची. इथून पुढचा घटनाक्रम धारपांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये रंगवलेला आहे. अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटना आणि वेडा विश्वनाथ यांचा काय संबंध आहे? याचे रहस्य हळूहळू उलगडत जाते. अदवंत, आशा आणि विश्वनाथ एका दुष्ट चक्रामध्ये फसले जातात. त्यातून ते बाहेर पडतात का आणि वेड्या विश्वनाथाचे पुढे काय होतं? या प्रश्नांची रंजक मांडणी धारपांनी या पुस्तकांमध्ये केलेली आहे.
Sunday, May 16, 2021

द अल्केमिस्ट

प्रेरणादायी पुस्तकांच्या यादी मधलं हे एक नाव... "द अल्केमिस्ट". ही कथा आहे एका मेंढपाळाची, जो खजिन्याच्या शोधार्थ फिरतो आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात गेलेला आहे. तिथून वाळवंटाद्वारे तो पिरॅमिडच्या प्रदेशात अर्थात इजिप्तपर्यंत पोहोचतो. या त्याच्या प्रवासामध्ये अनेक अडथळे येतात. त्याला काही संकटांचा सामना करावा लागतो. पण त्यातूनच त्याला अनुभव मिळत जातो. बाहेरचं जग कसा आहे, हे समजत जातं. नव्या गोष्टी तो शिकत चालतो. त्याच्या या प्रवासाने शिकवलेले अनुभव त्याला बरेच काही देऊन जातात. आपल्यामध्ये क्षमता किती आहेत? याची अनेकांना जाणीव नसते. अर्थात खजिना नक्की कुठे आहे? हेच आपण आयुष्यभर शोधत राहतो. परंतु या खजिन्याची दिशा व मार्ग आपल्याला प्रयत्नाने कधी ना कधीतरी सापडतोच, अशी कथा आहे... अल्केमिस्ट या पोर्तुगीज कादंबरीची. एका मेंढपाळाच्या प्रवासाभोवती फिरणारी ही कथा बरंच काही शिकवून जाते. एकाग्रतेने व सलगतेने वाचल्यास तिचा प्रभाव मात्र अनेक काळ आपल्या मनावर टिकून राहतो.Saturday, May 15, 2021

इमोजी: डिजिटल युगातील सर्वमान्य भाषा

सकाळी मोबाईल हातात घेतला आणि व्हाट्सअपचे मेसेज बघितले की बहुतांश सर्वच मेसेज इमोजीने भरलेले असतात. फेसबुकचही काहीच असंच आहे. ट्विटरही याला अपवाद नाही. शिवाय आज काल लिंक्डइनवर देखील इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, "पिक्चर सेज मोर दॅन वर्डस" अर्थात शब्दांपेक्षा चित्रे अधिक काही सांगून जातात. याच कारणामुळे शब्दांपेक्षा चित्र रूपात असलेल्या इमोजींचा वापर वाढत चाललेला आहे. किंबहुना स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक जण त्यांचा अगदी सहजपणे वापर करत असतो. शिवाय शब्दांमध्ये लिहिण्यापेक्षा चित्रांमध्ये लिहिणे आज-काल सोपे होऊ लागले आहे. जवळपास सर्वच प्रकारच्या इमोजी आज मोबाईलमध्ये व सोशल मीडियावर उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणूनच कमीत कमी शब्दांमध्ये व्यक्त होण्यासाठीचे एक उत्तम व प्रभावी माध्यम तयार झालेले आहे. नव्या पिढीची बहुतांश चॅटिंग ही याच स्वरूपामध्ये दिसून येते. ही भाषा चित्रांची असल्यामुळे ती सर्वमान्य आहे. यामध्ये चित्ररूपी भावनांमधून व्यक्त होता येते. ही भाषा अतिशय सोपी आहे. त्यामुळे इंटरनेटचा व सोशल मिडीयाचा वापर करणारा प्रत्येक जण या भाषेमध्ये व्यक्त होत असतो. अशी ही इमोजीची भाषा नक्की सुरू केव्हा झाली, ते बघूयात.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण इमोजीचा जन्म मागच्या शतकातला आहे. १९९९ मध्ये शिगेताका कुरिता नावाच्या जपानी विकसकाने इमोजी सर्वप्रथम तयार केले. दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची जपानी कंपनी "डोकोमो" मध्ये कार्यरत असताना इमोजी त्याने तयार केली होती. दूरसंचार कंपन्यांमधील चढाओढ या काळामध्ये सुरू झाली होती. त्यातूनच इमोजीचा जन्म झालेला आहे. १२ x १२ पिक्सेलच्या १७६ इमोजी कुरिता याने तयार केल्या होत्या. आज त्या सर्व इमोजी 'न्यूयॉर्क म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट' मध्ये पाहता येतात. वातावरण, रहदारी, तंत्रज्ञान तसेच चंद्राच्या विविध कला अशा निरनिराळ्या थीमचा वापर करून तत्कालीन ईमोजी बनवल्या गेल्या होत्या. आज त्या अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत. सन २०१५ मध्ये 😂 या इमोजीला अर्थात LOL ला 'वर्ड ऑफ दी ईयर' म्हणून ऑक्सफर्ड शब्दकोशाने घोषित केले होते! म्हणजेच केवळ पंधरा वर्षांमध्ये इमोजीच्या भाषेतील शब्दांनी सर्वोच्च पातळी गाठली, असे म्हणता येईल. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेतील सत्ताकेंद्र अर्थात व्हाईट हाऊसने प्रकाशित केलेल्या आर्थिक अहवालामध्ये देखील इमोजींचा वापर पाहण्यात येतो!
सुरवातीच्या काळामध्ये याला 'इमोटिकॉन्स' म्हटले जायचे. त्यासाठी कीबोर्ड मधील अक्षरांचा विशिष्ट समूह उपयोगात आणायला जायचा. जसे हसण्याच्या स्माईलीसाठी :-) हे चिन्ह आणि नाराजीच्या स्माईलीसाठी :-( असे चिन्ह वापरले जात होते. "डोकोमो"मध्ये बनविण्यात आलेल्या या ईमोजी लवकरच लोकप्रिय होऊ लागल्याने स्पर्धक कंपन्यांनी देखील त्यांचा वापर सुरू केला. सन २००० नंतर जपानच्या बाहेर अनेक देशांमध्ये त्यांचा वापर व्हायला लागला. त्या काळामध्ये केवळ विशिष्ट मोबाईलसाठी ईमोजी उपलब्ध होत्या. परंतु सन २००७ मध्ये गुगलच्या पुढाकाराने इमोजीसाठी संगणकामध्ये युनिकोड देण्यात आला. युनिकोड प्रदान करणाऱ्या युनिकोड कन्सॉर्टियम या संस्थेने अनेक इमोजींना संगणकामध्ये वापर करण्यास मान्यता दिली. युनिकोड ही संगणकातील एक अधिकृत व सर्वमान्य कोडींग पद्धती आहे, ज्यामध्ये प्रत्येक अक्षराला एक जागतिक क्रमांक दिला जातो. त्यामुळे जगातील प्रत्येक संगणकांमध्ये ही अक्षरे वापरता येतात. शिवाय मोबाईलमध्येही त्यांचा वापर करता येतो. म्हणूनच इमोजींना देखील युनिकोड क्रमांक दिल्याने त्यांचा वापर सार्वत्रिक झाला. सन २००९ मध्ये ॲपल मधील या यासुओ किडा आणि पीटर एडबर्ग यांनी ६२५ नवीन इमोजींचा युनिकोडमध्ये अंतर्भाव केला. सन २०१० मध्ये या इमोजी सार्वत्रिक करण्यात आल्या. २०११ मध्ये ॲपल कंपनीच्या स्मार्टफोनवरील कीबोर्डमध्ये पहिल्यांदाच इमोजी दिसून आल्या. त्यानंतर दोन वर्षांनी अँड्रॉइड मोबाईलमधील कीबोर्डवर इमोजी दिसू लागल्या होत्या. आज युनिकोड कन्सॉर्टियमने हजारो इमोजी संगणकामध्ये वापरण्यास मान्यता दिलेली आहे. जवळपास जगातील सर्वच प्रकारच्या इमोजी संगणकात वापरता येतात. दरवर्षी शेकडो नव्या इमोजी युनिकोडमध्ये येत आहेत. सन २०१५ मध्ये युनिकोडने इमोजींचे स्किन टोन बदलण्याची देखील मान्यता दिली. ज्याद्वारे मानवी शरीराचे अंग असलेल्या ईमोजी आपल्याला त्वचेच्या विविध रंगांमध्ये वापरता येतात. इमोजी तयार करताना किंवा त्यांना मान्यता देताना युनिकोडला सर्वच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जगातील प्रत्येक वंश, धर्म, पंथ, भाषा, देश यांचा अपमान तर होत नाही ना? याची देखील त्यांना काळजी घ्यावी लागते.
मागच्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोनचा वापर वेगाने वाढत चालल्याने आज स्मार्टफोनद्वारे होणारी माहितीची देवाण-घेवाण ईमोजीच्या भाषेमध्ये बदलताना दिसत आहे. जसे 'आय लव यू' साठी 🤎 हे चिन्ह वापरले जाते आणि लोटस ऑफ लाफ्टर अर्थात LOL साठी 😂 या चिन्हाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. इमोजींची लोकप्रियता पाहून ॲपल कंपनीने ऍनिमोजी अर्थात ऍनिमेटेड इमोजी नावाची नवीन संकल्पना तयार केली. तीदेखील बऱ्यापैकी लोकप्रिय झालेली आहे. आज युनिकोडने मान्यता दिलेल्या ३,५२१ ईमोजी अस्तित्वात आहेत. एखाद्या भाषेमध्ये देखील इतकी अक्षरे कदाचित अस्तित्वात नसावी. अर्थात डिजिटल वापरकर्त्यांची सर्वमान्य भाषा असल्यामुळे एवढ्या मोठ्या शब्दभांडाराचा अंतर्भाव तिच्यात असणे गरजेचेच होते. इमोजीची सध्याची प्रगती पाहता प्रिंट माध्यमांमध्ये देखील त्यांचा अशाच पद्धतीने वापर वाढला तर आश्चर्य वाटायला नको!Friday, May 14, 2021

नरभक्षक मानव

वीसेक वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये "द टेक्सास चेनसॉ" नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अमेरिकेतल्या एका जंगलामध्ये एक रानटी जमात राहत असते. ही जमात माणसांच्या मांसांवर जगायची अर्थात हे जंगली लोक नरभक्षक होते, असं ह्या चित्रपटात दाखविण्यात आले होते. तसं पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये नरभक्षक मानव हा पूर्णपणे संपल्यातच जमा आहे. आज नरभक्षण हा मानसिक रोग मानला जातो. परंतु मानवी प्राण्यातील नरभक्षकत्व यापूर्वी अस्तित्वात होते का? याचा शोध शास्त्रज्ञांनी बऱ्याच काळापासून घेतलेला आहे. यातून पुढे आलेल्या पुराव्यांनुसार मनुष्य प्राणी देखील या नरभक्षक होता, हे सिद्ध झालेले आहे. आठ लाख वर्षांपूर्वी स्पेनमधील ग्रँड डॉलीना गुहेमध्ये सापडलेल्या हाडांवरून मानवी नरभक्षकत्वाचे सर्वात जुने पुरावे मिळतात. हाडांवरील खुणा तपासल्या असता शास्त्रज्ञांना मानवी नरभक्षकत्व सिद्ध करता आले आहे. या हाडांद्वारे युरोप मधील मानवाच्या अनेक जाती या नरभक्षक होत्या, असे शास्त्रज्ञांना वाटते. त्यानंतरच्या अनेक मानवी जातींमध्ये देखील नरभक्षकत्व दिसून आलेले आहे. प्रामुख्याने अन्नाची कमतरता आणि एका जमातीचे दुसऱ्या जमातीवरील वर्चस्व या दोन कारणांमुळे माणूस नरभक्षक होत असावा, असे अनुमान काढता येते. नंतरच्या काळामध्ये देखील पश्चिम व मध्य आफ्रिका, पॅसिफिक सागरातील बेटे, ऑस्ट्रेलिया, सुमात्रा, उत्तर व दक्षिण अमेरिका या सारख्या प्रदेशांमध्ये नरभक्षक मानव अस्तित्वात होते. याशिवाय अनेक संस्कृतींमध्ये मानवी मांस हे अन्य प्राण्यांच्या मांसाप्रमाणेच उपयोगात आणले जायचे. तसेच काही विशिष्ट प्रसंगी देखील या मांसाचा उपयोग केला जात असे. न्यूझीलंडमधल्या एका प्रदेशात मानवी मांस मेजवानी म्हणून खाल्ले जात असे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये मानवी शरीरातील अनेक अवयव भाजून खाल्ले जात असत. मध्य अमेरिकेतल्या ऍझटेक संस्कृतीमध्ये देखील मांसभक्षणाची परंपरा दिसून येते. याशिवाय ऑस्ट्रेलियातील मूलनिवासी देखील नरमांसभक्षक होते, असे आढळून आलेले आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये संस्कृती विकसित झाल्यानंतर नरभक्षक मानव जवळपास संपल्यातच जमा झालेले आहेत. परंतु त्याचा हा गुण आता निसर्गाच्या मुळावर उठल्याचे प्रकर्षाने दिसते!

संदर्भ: १००१ आयडियाज दॅट चेंज्ड वी थिंक Wednesday, May 12, 2021

समांतर: अर्धी वेब सिरीज आणि अर्धे पुस्तक

मागच्या एक वर्षापासून वेब सिरीज हा प्रकार काही आता नवीन राहिलेला नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज रिलीज होत आलेल्या आहेत. मराठीमध्ये तशी त्यांची संख्या कमीच होती. पण हळूहळू हा ट्रेंड आता मराठीत देखील दाखल झालेला आहे. अशीच एक मराठी वेब सिरीज म्हणजे "समांतर" होय.
मागच्या वर्षभरामध्ये मराठीत सर्वाधिक चर्चिली गेलेली ही लोकप्रिय वेबसिरीज होय. मागील आठवड्यामध्ये एमएक्स प्लेयरवर पाहण्याचा योग आला. सुहास शिरवळकर यांच्या 'समांतर' या कादंबरीवर ही वेबसिरीज आधारलेली आहे. या कथेतील नायक कुमार महाजन याची भूमिका स्वप्निल जोशी याने साकारलेली आहे. तसेच त्याच्या पत्नीची अर्थात निमाची भूमिका तेजस्विनी पंडित हीने साकारली आहे. कुमार महाजन हा परिस्थितीने पीडित आणि सातत्याने अपयशाला सामोरे जाणारा एक युवक आहे. त्याचा मित्र वाफगावकर त्याला एका ज्योतिष सांगणार्‍या स्वामींकडे घेऊन जातो. त्यांचं भविष्य आजवर कधीही चुकलेले नसतं. परंतु हे स्वामी त्याचं भविष्य सांगायला नकार देतात. शिवाय त्याचा हात त्यांनी यापूर्वी पाहिलेला आहे, असेही ते सांगतात. त्यामुळे भविष्यामध्ये नक्की काय होईल? हे जाणून घेण्याची कुमारची आणखी तीव्र इच्छा तयार होते. त्यातच त्याला समजतं की, ज्या माणसाचा हात अगदी तंतोतंत त्याच्याशी जुळतो असा सुदर्शन चक्रपाणी नावाचा मनुष्य देखील अस्तित्वात आहे. मग शोध सुरू होतो..  या नव्या माणसाचा अर्थात सुदर्शन चक्रपाणीचा. त्याच्या शोधासाठी कुमारला अनेक दिव्ये पार करावी लागतात. परंतु तो जिद्द सोडत नाही. अखेरीस चक्रपाणीपर्यंत पोहोचतोच. या सुदर्शन चक्रपाणीची भूमिका नितीश भारद्वाज यांनी साकारलेली आहे. दोघांच्या हातांवरील रेषा समान असल्यामुळे दोघेही समांतर आयुष्य जगत आहेत, असं दिसून येतं. चक्रपाणी जे आयुष्य यापूर्वी जगलेला आहे, तसंच कुमारच्या बाबतीत होणार असतं. म्हणून त्याचं भविष्य सुदर्शन चक्रपाणीकडून जाणून घेण्याचाच त्याचा प्रयत्न असतो. तेव्हा त्याला सुदर्शनच्या आयुष्यातील डायऱ्या मिळतात आणि इथून पुढे सुरु होतो खरा थरार. सुदर्शनच्या आयुष्यातील घटना कुमार महाजनच्या आयुष्यात घडू लागतात. परंतु डायरीतल्या एका पानापाशी येऊन ही वेब सिरीज थांबते. त्यामुळे आता पुढे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही. माझेही काहीसे असेच झाले. वेब सिरीजमध्ये रंगलेला थरार अचानकपणे थांबतो. तेव्हा पुढे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा शोधण्याचा आपणही त्याच्या परीने प्रयत्न करू लागतो. या वेब सिरीजचा पुढचा भाग कधी येईल, ते माहीत नाही. त्यामुळे सुहास शिरवळकर यांचे समांतर पुस्तकच वाचायला घेतले.
एकूण १९६ पानांच्या या पुस्तकातील कथेनुसार वेब सिरीज १२२ व्या पानापर्यंत तयार झालेली आहे. तिथूनच पुढे पुस्तक वाचायला सुरुवात केली. हा काही वेगळाच अनुभव होता. अर्धी कथा व्हिडिओ रूपात आणि अर्धी कथा वाचनाच्या रुपाने अनुभवायला मी सुरुवात केली. तसं पाहिलं तर पुस्तकावरूनच जशीच्या तशी वेबसिरिज तयार करण्यात आलेली आहे. पात्रांची नावेही तीच आहेत फक्त कथाविस्तार करण्यासाठी काही घटनांचा अंतर्भाव वेब सिरीजमध्ये करण्यात आल्याचा दिसतो. पुस्तकाची १२२ ते १९६ ही पाने उत्सुकतेने वाचून काढली. कथा तुटत असल्याचे बिलकुल जाणवले नाही. या भागांमध्ये मात्र दोन नव्या पात्राची एन्ट्री झाल्याचे दिसते. पुस्तक वाचताना पदोपदी कुमार महाजन म्हणजे स्वप्नील जोशीच असल्याचे जाणवत होते. प्रत्येक घटना वेबसिरीजमध्ये दाखवलेल्या परिस्थितीप्रमाणे पुढे चालली आहे, याचाही अनुभव येत होता. अखेरीस एका मोठ्या रहस्य भेदाने या कादंबरीचा शेवट झाला. खरोखर शिरवळकरांनी लिहिलेल्या एका अप्रतिम रहस्य कथेचा हा शेवट असल्याचे जाणवले. काही कथा लिहिताना लेखकाच्या सर्जनशीलतेची कसोटी लागते. तशीच ही कादंबरी होय. शिरवळकरांच्या अनेक उत्तम कलाकृतीपैकी समांतर ही सुद्धा एक कलाकृती आहे. भय आणि रहस्य या दोन्ही प्रकारात मोडणारी ही दीर्घ कथा आहे. यापूर्वीही अनेकांनी समांतर वेबसीरिज आणि पुस्तक वाचले असावे. परंतु अर्धी वेबसिरिज आणि अर्धे पुस्तक असा प्रयोग करणारा आणखी कोणी आहे का? असाही प्रश्न मला विचारावासा वाटतो.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केलेले दिग्दर्शन अप्रतिम आहे. परंतु वेब सिरीज म्हटलं की, गलिच्छ शिव्यांचा भडिमार करायचा आणि किसिंग सीनचा अंतर्भाव करायचा, हे कदाचित दिग्दर्शकाने आधीच मनोमन ठरवले असावे. तसा याचा कादंबरीशी काहीच संबंध नाही. शिवाय शिरवळकरांच्या या 'दुनियादारी'नंतरच्या या दुसऱ्या पुस्तकाचा नायकही स्वप्नील जोशी आहे, हे विशेष! स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघे कदाचित दूरदर्शनवर अनेक वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या श्रीकृष्ण मालिकेनंतर पहिल्यांदाच एकत्रित आले असावेत. यातही त्यांनी एकमेकांशी जोडलेल्या भूमिका केलेल्या आहेत.
एकंदरीत काय, वेबसिरीज बघा किंवा कादंबरी वाचा, शिरवळकरांच्या कथेतील थरार आपल्याला रोमांचित करून सोडतो, हे मात्र नक्की!
Sunday, May 9, 2021

गुगल आणि मराठी भाग २/१० (गुगल इनपुट टूल्स)

संगणकामध्ये युनिकोड पद्धतीचा वापर सुरू झाल्यानंतर जगातील सर्व प्रमुख भाषा आपल्याला यामध्ये वापरता यायला लागल्या. शिवाय अनेक भाषांची लिपी एकच असल्यामुळे केवळ लिपीचा अंतर्भाव केल्यानंतर अनेक भाषा आज संगणकामध्ये व्यवस्थित लिहिता येतात. मराठीसाठी वापरण्यात येणारी देवनागरी लिपी देखील आपण संगणकात सहज पद्धतीने लिहू शकतो. एकेकाळी इंग्रजी वगळता अन्य भाषा संगणकात वापरायच्या असल्यास विविध प्रकारच्या फॉन्टचा वापर केला जायचा. मराठी भाषेमध्ये "शिवाजी" तसेच आज वापरण्यात येणाऱ्या "श्रीलीपी" व "कृतीदेव" या फॉन्टचा अनेक जण वापर करतात. परंतु आज युनिकोडच्या सुलभतेमुळे कोणीही माणूस संगणकामध्ये आपल्या भाषेत टाईप करू शकतो. तसेच विविध प्रकारच्या फाइल्समध्ये माहिती साठवूही शकतो. त्याकरिता कोणत्याही फॉन्टची अथवा विशिष्ट प्रकारच्या किबोर्ड लेआऊटची गरज नाही.
गुगलने इंग्रजीसह अन्य भाषांमध्ये सहज टाईप करता यावेत याकरिता ऑनलाइन इनपुट टूल्स असलेला एडिटर बनवलेला आहे. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता.

https://www.google.com/inputtools/try

 


जिथे इंग्लिश असे लिहिले आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला छायाचित्र क्रमांक दोन प्रमाणे सर्व भाषांची नावे दिसून येतील. 
 

 
जगभरातील जवळपास १३० भाषांमध्ये या एडिटरद्वारे आपल्याला लिहिता येते. लक्षात ठेवा की, हा कोणत्याही प्रकारचा फॉन्ट नाही. इथे लिहिलेली माहिती तुम्ही जगात कोणत्याही संगणकावर व कोणत्याही सॉफ्टवेअरवर तसेच ऑपरेटिंग सिस्टिमवर जशीच्या तशी वापरू शकता! हे युनिकोड चे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. भाषांच्या नावांमधून मराठीवर क्लिक केल्यास तुम्हाला एडिटरमध्ये थेट मराठी मध्ये टाईप करता येऊ शकेल. कोणत्याही मराठीत शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग टाईप करायला सुरुवात करा. लगेचच एका पॉपडाऊन विंडोमध्ये छायाचित्र क्रमांक ३ मध्ये दाखविल्याप्रमाणे सूचना तुम्हाला दिसून येतील. 
 

 
जेव्हा तुम्ही स्पेस टाइप कराल, त्यावेळेस तुम्ही मराठीत इंग्रजीत टाईप केलेला शब्द मराठी मध्ये उमटेल. यासाठी कोणत्या मराठी उच्चाराला इंग्रजीत कोणते अक्षर वापरले जाते? याची माहिती असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, 'क्ष' टाईप करायचे असल्यास ksh तसेच 'त्र' टाईप करायचे असल्यास tra अशा कि-बोर्डवरील अक्षरांचा वापर करावा. सातत्यपूर्ण सरावाने तुम्ही वेगाने मराठीमध्ये टाईप करू शकाल. इथे टाईप केलेली माहिती कॉपी करून तुम्ही कुठेही जशीच्या तशी वापरू शकता.
एखादा मराठी लेख लिहिण्यासाठी या पद्धतीचा सहज पद्धतीने अवलंब करता येऊ शकतो. 'मराठी' जिथे लिहिले आहे, त्या समोर एक 'म' अक्षर दिसून येईल, त्यावर एकदा क्लिक केल्यास. मराठी भाषा बंद होऊन तुम्ही इंग्रजीमध्ये टाईप करू शकता. छायाचित्र क्रमांक ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे 'म' अक्षराच्या समोर असलेल्या त्रिकोनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार पर्याय दिसून येतील. 
 

 
यातील दुसऱ्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही चित्र क्रमांक ५ सारखी विंडो तुम्हाला दिसून येईल. 
 

 
या व्हाईटबोर्डचा वापर करून तुम्ही माऊसच्या सहाय्याने मराठी अक्षर लिहू शकता व 'एंटर' केल्यानंतर ते अक्षर देवनागरी लिपीमध्ये तुम्हाला एडिटरवर उमटलेले दिसेल. शिवाय चित्र क्रमांक पाच मध्ये दाखविल्याप्रमाणे सदर अक्षराशी मिळतेजुळते दुसरे अक्षर देखील तुम्ही निवडू शकता! चित्र क्रमांक चार मध्ये दाखविल्याप्रमाणे तिसरा पर्याय आहे अर्थात देवनागरी (फोनेटिक) निवडल्यानंतर तुम्ही थेट इंग्रजी अक्षरांचा वापर करून मराठीमध्ये टाईप करू शकता. यासाठी चित्र क्रमांक सहा तपासून पहा. या पद्धतीने टाईप करायचे असल्यास थोडा वेगळ्या पद्धतीच्या कीबोर्डचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, 'आ' चा उच्चार लिहिण्यासाठी दोन वेळा a टाईप करावे लागेल. तसेच पहिल्या उकारासाठी u हे अक्षर तर दुसऱ्या ऊकारासाठी U चा वापर होतो. चौथी पर्याय अर्थात देवनागरी (इनस्क्रिप्ट) हा उपलब्ध असला तरी तो फारसा उपयोगाचा नाही.
चला तर मग सुरु करा मराठीमध्ये लिहायला... गुगल इनपुट टूल्सद्वारे!

Saturday, May 8, 2021

चमचाभर जिंदगी, थोडी आंबट बरीचशी गोड, लेखक: रवी वाळेकर

पुस्तक_परीक्षण
📖 चमचाभर जिंदगी, थोडी आंबट बरीचशी गोड
✍️ रवी वाळेकर
📚 शिवसमर्थ सेवा प्रकाशन

बऱ्याच दिवसांपासून काहीतरी हलकाफुलकं वाचावं म्हणून पुस्तके शोधत होतो. त्यातच हे पुस्तक हाती लागलं. रवी वाळेकर हे यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या कंबोडायन आणि इंडोनेशियायन या प्रवास वर्णनांनी मराठी साहित्य विश्वात प्रकाश झोतात आलेले, नव्या दमाचे आणि आगळ्या शैलीचे लेखक होय. त्यांच्या जीवनातील विविध घटनांचा मागोवा त्यांनी या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. एकंदरीत या सर्व घटनांवरून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येतो आणि तो निश्चितच सकारात्मक दृष्टीचा आहे. त्यांच्या जीवनातील हे अनुभव केवळ आंबट आणि गोड नसून अन्य चवींचे देखील आहेत, असं ध्यानात येतं. अनेक घटनांमधून ते माणसाला ओळखू पाहतात. त्याच्या मनाचा ठाव घेऊ पाहतात. शिवाय साध्या आणि सरळ भाषेमध्ये त्याचं वर्णनही करतात. अन्य काही लेखकांप्रमाणे त्यांनी मराठीतले अवजड आणि बोजड शब्द न वापरता या पुस्तकाचे लेखन केले आहे. मुंबईतील त्यांचे अनेक अनुभव संवेदनशील मुंबईकरांनाही आले असतील. परंतु त्यांचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असेल. वाळेकर म्हणतात की, हे जग सुंदर आहे फक्त आपला दृष्टिकोन तसा ठेवायला हवा. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मनाला भावून जातात. शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची देखील ओळख होते. रतन टाटांविषयी लिहिलेला त्यांचा अनुभव हा खूप सुंदर आहे. बहुतांश भारतीयांना ज्ञात असणारे रतन टाटा लेखकालाही तसेच जाणवतात. एखादा व्यक्ती महान किंवा होतो? या प्रश्नाचे उत्तरही आपल्याला सहज मिळून जाते. शेवटी काय...  या पृथ्वीवर काही काळासाठी राहण्याकरता आलेले आपण सर्व पाहुणे आहोत. जीवनाचा आनंद ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने घ्यायचा असतो आणि जिंदगीतल्या आंबट आणि गोड प्रसंगांना सोबत घेऊन जायचं असतं, हाच या पुस्तकाचा सारांश!Wednesday, May 5, 2021

चित्रपट: साईना

चार वर्षांपूर्वी जेव्हा साईना नेहवालच्या जीवनावर चित्रपट बनण्याची घोषणा झाली होती, तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता तर होतीच. अखेरीस मागील वर्षी प्रदर्शित होणारा हा चित्रपट लॉकडाऊनमुळे अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. मागील काही वर्षांमध्ये भारतातल्या मोठ्या क्रीडापटुंवर चित्रपट निघाले आहेत. हाही त्याच शृंखलेतील एक चित्रपट होय. कदाचित बॅडमिंटनवर आधारित असलेला हा पहिलाच चित्रपट असावा. भारतामध्ये बॅडमिंटन या खेळाला फारसे वलय नाहीये. त्यातल्या त्यात महिला बॅडमिंटन क्षेत्रात तर काहीच नव्हतं. परंतु मागच्या काही वर्षांपासून साईना नेहवालने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटनला विशेषत: महिला बॅडमिंटनला उच्च स्थानावर नेऊन ठेवलं होतं. तिचीच ही कहाणी होय.
प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद यांच्या व्यतिरिक्त भारतात बॅडमिंटन खेळाडू फारसे नावाजलेले नव्हते. परंतु आज आपण अनेक खेळाडूंची नावे ऐकत असतो. याला काही अर्थाने साईना नेहवाल कारणीभूत होती, असं म्हणावं लागेल. हरियाणाच्या एका निमशहरी भागातून हैदराबादमध्ये आलेली ही मुलगी होय. तिचे आईवडील दोघेही बॅडमिंटन खेळाडू होते. परंतु विशेषतः आईच्या प्रयत्नांनी ती या क्षेत्रात दाखल झाली. हळूहळू घरातला इतरांचीही तिला साथ लाभत गेली. हैदराबाद मधील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम मधून सुरू झालेला हा प्रवास जगातील नंबर वन बॅडमिंटन खेळाडू होण्यापर्यंत अविरत चालू होता. या प्रवासामध्ये तिला अनेकांची साथ लाभली. अनेकांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. बऱ्याचदा तिचा मार्गही चुकला. ती ठेचाळत होती. पण पुन्हा ती ध्येयाच्या दिशेने चालू लागली. अशी साईनाची कहाणी दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी या चित्रपटात चितारलेली आहे. अन्य चित्रपटांप्रमाणेच नाटकीयरित्या काही प्रसंग सादर केले गेले आहेतच. त्यामुळे डॉक्युमेंटरी न पाहता चित्रपट पाहण्याचा फील येतो. परंतु, कधीकधी दिग्दर्शकाचे प्रयत्न कमी पडत आहेत, असंही जाणवतं. बऱ्याचदा चित्रपट संथ गतीने चालला आहेत, असेही वाटू लागतं. साईनाची भूमिका केलेल्या परिणीती चोप्रा हिने चांगली मेहनत घेतली असल्याचे दिसतं. कदाचित याहीपेक्षा चांगली भूमिका ती करू शकली असती, असं वाटून जातं. एकंदरीतच महिला क्रीडापटूंना प्रेरणा देणारा हा प्रवास आहे. किमान एकदा तरी बघायलाच हवा.

 


Tuesday, May 4, 2021

ऑनलाइन तंत्रशिक्षणाकडे

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालये कोवीड-१९ च्या प्रभावामुळे प्रादुर्भावामुळे लवकर उघडणार नाहीत, हे ध्यानात घेऊन या एआयसीटीई अर्थात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने त्यांचे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली होती. एआयसीटीई च्या अटल अकॅडमी अर्थात एआयसीटीई ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमीने भारतभर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील पंधरा आठवड्यांमध्ये सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यातील बहुतांश प्रशिक्षण कार्यक्रम हे कार्यशाळा पद्धतीने विशेषत: संगणक अभियांत्रिकीशी निगडित होते. भारतातील कोणीही व्यक्ती या कार्यशाळांमध्ये सहभाग घेऊ शकत होता. अगदी औद्योगिक क्षेत्रातील लोकांनाही एआयसीटीईने या कार्यशाळांमध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली होती. भारतातल्या विविध राज्यांमधील महाविद्यालयात होणारे व झालेले हे प्रशिक्षण कार्यक्रम गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूम सारख्या वेब कॉन्फरन्सिंग एप्लीकेशनद्वारे पार पडले. एका कार्यशाळेत अधिकाधिक दोनशे जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. शिवाय एका अकाऊंटद्वारे तुम्ही दोन ते जास्तीत जास्त चार कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ शकत होता. त्यासाठी एआयसीटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी गरजेची होती. ज्यात प्रामुख्याने ईमेल आयडी व व्हाट्सअँप क्रमांक तपासला जात होता. या पंधरा आठवड्यांमध्ये भारतातील विविध अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या बारा कार्यशाळा मी पूर्ण केल्या. प्रत्येक कार्यशाळेसाठी कमीत कमी ८०% उपस्थिती व अंतिम दिवशी ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ६० टक्के गुण येणे गरजेचे होते. या बाराही कार्यशाळा मी ८० टक्के उपस्थिती व ६० टक्के गुणांची पूर्ती करून पूर्ण केल्या. खरतर एकाला केवळ चारच प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करता येऊ शकत होते. परंतु तीन वेगवेगळ्या ईमेल आयडी व व्हाट्सअप क्रमांकाद्वारे मी त्यात माझा सहभाग नोंदवला. ज्यामुळे मला बारा कार्यशाळा पूर्ण करता आल्या! अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित यातील अनेक कार्यशाळा संपन्न झाल्या. डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डीप लर्निंग, वर्चुअल रियालिटी, थ्रीडी प्रिंटिंग सारखे नवनवीन विषय या कार्यशाळांमध्ये हाताळण्यात आले होते. सदर विषयांवर मी यापूर्वीही सखोल अभ्यास केला आहे. परंतु दर कार्यशाळेमध्ये नवनवीन माहिती वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासायला व शिकायला मिळाली. विशेष म्हणजे भारतातील विविध भागातील अनेक तज्ञांशी बोलायला व त्यांची शिकवण्याची पद्धती अभ्यासायला मिळाली. त्यातून एक वेगळ्या प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले. अनुभवसंपन्नता आली. लॉकडाऊनचा व ई-लर्निंगचा हा एक प्रकारे फायदाच झाला, असे म्हणता येईल. एकंदरीत या अनुभवाचा पुढील वाटचालीसाठी निश्चितच उपयोग होईल, असे वाटते.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या या कार्यक्रमांविषयी काही गोष्ट नमूद कराव्याशा वाटतात. त्यांनी प्रत्येक कार्यशाळेसाठी २०० जणांसाठीच जागा राखीव करून ठेवल्या होत्या. त्यामुळे दोनशेपेक्षा अधिक प्रवेशिका आल्या असल्यास महाविद्यालये त्या सरळ रद्द करीत होते. परंतु वस्तुस्थिती अशी होती की, एकाही कार्यक्रमाला नोंदणी केलेल्या सहभागींपैकी १०० पेक्षा अधिक सहभागी प्रत्यक्ष उपस्थित राहत नव्हते. याचाच अर्थ असा की ज्यांना खरोखर प्रशिक्षण कार्यक्रम करायचे होते, त्यांचे नाव रद्द केले गेले असावे. अनेक महाविद्यालयांमध्ये ४०० ते ५०० जणांनी सहभाग नोंदवला होता. परंतु प्रत्यक्ष ८० ते १०० लोकांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावर तंत्रशिक्षण परिषदेने काहीतरी उपाय शोधायला हवा. शिवाय प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असल्यामुळे उपस्थितांचा निष्काळजीपणा अनेक ठिकाणी दिसून आला. अर्थात तंत्रशिक्षण परिषदेने अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच राबविला असल्याने त्यात कदाचित या त्रुटी राहिल्या असतील. परंतु भविष्यात असे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, याचा विचार निश्चितच करायला हवा.
बाकी काय ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर ते नक्कीच मिळवा. त्याने त्याचे मूल्य कधीच कमी होत नाही. पुढील काही महिन्यांमध्ये तंत्रशिक्षण परिषदेकडून पुन्हा असे कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहेत. कदाचित यावेळी या कार्यक्रमांचे नियोजन अधिक उत्तमरित्या असेल. शिवाय अधिकाधिक तंत्रज्ञ व प्राध्यापक त्याचा लाभ घेऊ शकतील अशी आशा वाटते. 


 

Saturday, May 1, 2021

गुगल आणि मराठी भाग १

वीस वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा इंटरनेट वापरायला सुरुवात केली त्यावेळेस इंटरनेटवर आपण सहजपणे मराठी वापरू शकतो, याची शक्यता ही मनात आली नव्हती. पण आजचा विचार केल्यास इंटरनेटवर मराठी आता आपण अगदी सहज व सोप्या पद्धतीने वापर करू शकतो. ही सर्व अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाची किमया आहे. छायाचित्र क्रमांक १ वरील सर्वेक्षण पहा. 
 

२०२१ पर्यंत इंटरनेटवर मराठी भाषेचा वापर करणारे भारतात पाच लाखांपेक्षा वापरकर्ते आहेत! भारताचा उत्तर पट्टा हिंदी भाषिकांचा असल्यामुळे अर्थातच त्यांची संख्या अधिक आहे. शिवाय भारत सरकारच्या राज्यव्यवहाराची भाषा असल्यामुळे त्याचा फायदा ही हिंदी भाषेला झाला आहे. त्यामुळे हिंदी भाषा पहिल्या क्रमांकावर असल्याचे विशेष नाही. विशेष म्हणजे आपल्या भाषेचा सर्वाधिक स्वाभिमान बाळगणारे तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषिक मराठी भाषिकांच्या अजूनही मागे आहेत. शिवाय बंगाली व तमिळ या अन्य देशांच्या देखील राष्ट्रभाषा आहेत. त्यावर मात करून मराठी आज भारतातली इंटरनेटवरील दुसऱ्या क्रमांकाची भाषा ठरली, हे विशेष! त्याबद्दल मराठी इंटरनेट वापरकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो.
आज पासून सुरू होणाऱ्या या लेखमालिकेद्वारे मराठीचा इंटरनेटवर आपण किती सहज व सुलभ वापर करू शकतो, याची माहिती घेणार आहोत. दहा लेखांच्या या लेखमालिकेचे नाव आहे, "गूगल मराठी" अर्थात गुगलच्या विविध साधनांद्वारे इंटरनेटवर आपण मराठी कशी समृद्ध करू शकतो, तसेच तिचा कशापद्धतीने सहज वापर करू शकतो? याचा आढावा घेणार आहोत. युनिकोडचा वापर वाढल्यापासून जगातील सर्वच भाषा संगणकावर स्थानापन्न झालेल्या आहेत. याचाच फायदा जगातील सर्व प्रमुख भाषिकांनी घेतला. यात मराठी भाषिक आजही कमी नाहीत. किंबहुना मराठी भाषेची प्रगती इंटरनेटवर अतिशय वेगाने होत आहेत. जे मराठी भाषिक अजूनही मराठीचा वापर इंटरनेटवर करू शकत नाही. त्यांच्यासाठी या लेखमालिकेचा निश्चितच फायदा होईल.
नैसर्गिक भाषा प्रक्रिया अर्थात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर करून गुगलने अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आजही मराठी भाषिक अशा अनेक सुविधांपासून अनभिज्ञ आहेत. याच सुविधांचा वापर कसा व केव्हा करायचा, याचा आढावा आपण या लेखमालिकेमध्ये घेणार आहोत. आजच्या लेखामध्ये गुगल सर्च बाबत थोडं जाणून घेऊयात.
गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. अर्थात याचा वापर करून इंटरनेटवर असलेली कोणतीही माहिती आपण सहज शोधू शकतो. आज जगातील ९२% संगणक वापरकर्ते गुगलचा वापर करूनच माहितीचा शोध घेत असतात. ही माहिती शोधताना केवळ इंग्रजीचाच वापर करावा लागतो, असे नाही. गुगलने जगातील शेकडो भाषा गुगल सर्चमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्याकरिता आपल्याला आपल्या गुगल अकाऊंट मधील ते प्रेफर्ड लैंग्वेज अर्थात प्राधान्य असलेली भाषा बदलावी लागेल. खालील लिंकवर क्लिक करा.

https://myaccount.google.com/language

तुमच्या गुगल अकाउंटसाठी असलेली भाषा अर्थात त्यास प्रेफर्ड लैंग्वेज तसेच ऑप्शनल लैंग्वेज आणि ऑदर लँग्वेज तुम्ही इथे बदलू शकता. ही भाषा बदलल्यावर तुम्हाला गुगलच्या सर्व सुविधा मराठीमध्ये वापरता येतील. यानंतर गुगलच्या फ्रंट पेज वर अर्थात मुख्य पानावर या सर्च बॉक्सच्या खाली तुम्हाला काही भारतीय भाषांची नावे दिसून येतील. तिथूनही तुम्ही तुमची भाषा बदलू शकता. सर्च बॉक्सच्या समोर चित्र क्रमांक २ मध्ये दाखविल्याप्रमाणे एक कीबोर्ड दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला देवनागरी फोनेटिक कीबोर्ड स्क्रीनवर पॉप अप होईल. त्याचा वापर करण्याची आवश्यकता नाही. 
 

आता केवळ गुगलच्या सर्च बॉक्समध्ये इंग्रजी अक्षरांचा वापर करून मराठीमध्ये टाईप करा. याठिकाणी मराठीमध्ये अक्षरी उमटू लागतील. या सुविधेचा वापर करून तुम्ही थेट मराठीतून माहिती गुगलद्वारे शोधू शकता. 
 
 
चित्र क्रमांक ३ वर दाखविल्याप्रमाणे तुम्हाला गुगलमध्ये मराठी शब्दांचा वापर करून माहिती शोधता येईल. विशेष म्हणजे ज्या मराठी शब्दांचा वापर तुम्ही केला आहे, त्याचेच इंग्रजी समानार्थी शब्द देखील आपोआप गुगलमध्ये शोधले जातात! तुम्ही इंग्रजीमध्ये जरी एखादी गोष्ट शोधली तरी सर्च परिणामांच्या उजव्या बाजूला ती माहिती तुम्हाला मराठीत भाषांतरित करून आलेली दिसेल. भाषा प्राधान्यक्रम बदलल्यानंतरच ही माहिती तुम्हाला मराठीमध्ये दिसते. यासाठी छायाचित्र क्रमांक ४ पहा. 
 

या पद्धतीचा अवलंब करून कोणतीही माहिती तुम्ही थेट मराठी मधून शोधू शकता.
धन्यवाद.
#गूगल #मराठी #गूगल_सर्च
क्रमशः...