Sunday, March 17, 2024

मराठी भाषा धोरण

मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या कोणत्याही मराठी माणसाला आवडेल असेच भाषा धोरण महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केले. त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन देखील.
मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये होत असलेली मराठी भाषेची अधोगती लक्षात घेऊन त्यासाठी पावले उचलणे अपरिहार्यच होते. म्हणून या निर्णयाचे स्वागत करायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची अंमलबजावणी करण्यासाठी जेवढा शासनाचा सहभाग असेल किंबहुना त्यापेक्षा कितीतरी अधिक सामान्य नागरिकांचा असायला हवा. कारण आज-काल मराठी भाषिक लोकच आपल्या भाषेला तुच्छ आणि दुय्यम समजायला लागलेले आहेत. हिंदी आणि इंग्रजी सारख्या परकीय भाषा मराठी भाषेवर अतिक्रमण करत आहेत. मराठी लोकांची साथ असल्यामुळेच त्यांचे वर्चस्व देखील वाढू लागलेले आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वाला हा भविष्यातील सर्वात मोठा धोका संभवतो. याच कारणास्तव मराठी संपवण्यात इतर कोणाचाही नाही तर प्रत्यक्ष मराठी लोकांचा सर्वात मोठा वाटा असणार आहे. म्हणूनच आपली भाषा वाचवण्यासाठी काही गोष्टी बंधनकारक करणे तसेच तिचा दैनंदिन जीवनातील वापर वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले लोक भाषेपेक्षा जात आणि धर्म याला अधिक महत्त्व देतात. भाषा टिकली तरच तुमची संस्कृती टिकणार आहे, हे अनेकांच्या ध्यानात येत नाही. भाषेच्या ऱ्हासासोबतच संस्कृतीचा देखील ऱ्हास अपरिहार्य आहे. 


 

Tuesday, March 12, 2024

जयहिंद पॉलीटेक्निक

१९९९ यावर्षी अर्थात बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात जुन्नरमधल्या जयहिंद पॉलीटेक्निक या महाविद्यालयातून झाली. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान म्हणजे काय? हे मला माहिती देखील नव्हते. परंतु महाविद्यालयीन जीवनात तंत्रज्ञानाच्या अ-आ-ईची सुरुवात झाली. आज त्याच महाविद्यालयात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. खरंतर माझ्यासाठी हा अत्यंतिक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. मागील २५ वर्षांमध्ये मी ज्या गोष्टी मिळवल्या त्याची सुरुवात या भूमीतून झाली होती, याचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना २५ वर्षांपूर्वीचा मी मला पुन्हा आठवला. माझ्या वैयक्तिक अनुभवाची शिदोरी उलगडताना मन भरून आले होते. तत्कालीन परिस्थिती आणि आजची परिस्थिती अतिशय भिन्न आहे. सुयोग्य मार्गदर्शनाची वाणवा, साधनांचा अभाव आणि खडतर परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात केली होती. पहिल्यापासूनच मागे न वळून पाहण्याची प्रेरणा मनात होती. हे महाविद्यालयीन नसते तर कदाचित मी आज इंजिनियर देखील झालो नसतो. म्हणूनच माझ्या करिअरचा श्रीगणेशा करणाऱ्या या महाविद्यालयाचा मी शतशः ऋणी आहे.
आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, हीच मनापासून इच्छा.
ही संधी मला दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ आणि प्राचार्य डॉ. स्वप्नील पोखरकर यांचे मनःपूर्वक आभार! 

 

Friday, March 8, 2024

स्माईल प्लीज

नंदिनी ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि करिअरला वाहून घेतलेली प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. पतीबरोबर होणाऱ्या वारंवार कलहामुळे तिने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण अजूनही दोघांमध्ये कटूता नाही. दोघांची मुलगी असल्याने त्यांच्यात सर्वकाही सामंजस्याने सुरू आहे. प्रगतीच्या पायऱ्या चढत चढत नंदिनी यशाच्या शिखराकडे प्रवास करीत आहे. परंतु अचानक एका दिवसापासून ती छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागते. कामाच्या व्यापात हे तिच्या फारसं लक्षात येत नाही. पण आपली मैत्रीण असलेल्या मानसोपचार तज्ञाबरोबर चर्चा केल्यानंतर तिला समजते की तिला डिमेन्शिया अर्थात विसरण्याचा आजार झालेला आहे. आणि तो अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. यावर कुठलाही उपाय आजवर शोधला गेलेला नाही. मेंदूतून हळूहळू अनेक गोष्टी विसरल्या जाणार आहेत. हा तिच्यासाठी एक मोठा धक्का असतो. जसजसे दिवस जातात तसतशी तिची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. ती वेगळ्याच कोशात वावरत असते. परंतु एक दिवस तिला एक नवा मित्र भेटतो. जो तिला तिच्या आयुष्याची नवी दिशा दाखवतो. तिच्यातील मूळ कलागुण ओळखून नव्याने जगायला शिकवतो. पण कधीतरी ती त्याला देखील विसरत असते. कथेचा शेवट गोड होतो की कटू हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.
मुक्ता बर्वे हिने नंदिनीची भूमिका केलेली आहे. शिवाय प्रसाद ओक तिच्या पूर्वश्रमीच्या पतीच्या तर ललित प्रभाकर नव्या मित्राच्या भूमिकेत दिसतो. कथेची मांडणी तशी उत्तम आहे. शिवाय सर्वच कलाकार कसलेले असल्यामुळे एक उत्तम कलाकृती या चित्रपटातून पाहायला मिळते.


 

Thursday, March 7, 2024

काबुली हरभरा

दुपारची सुट्टी झाली. स्टाफ रूममध्ये आलो तोवर तिथे कोणीही आलेले नव्हते. शिपाई आल्यानंतर त्यांना लगेचच कॅन्टीनमधून जेवण घेऊन यायला सांगितले. दोनच मिनिटात जेवण आले आणि मी जेवायला सुरुवात केली. पाच-एक मिनिटांनी ‘त्या’ आत मध्ये आल्या. कदाचित त्यांचे लेक्चर उशिराने संपलं असावं. माझ्या ताटाकडे बघून त्यांनी विचारलं,
“ कोणती भाजी आहे आज?”
“ काबुली हरभरा.”, मी उत्तरलो.
माझ्या या उत्तराने त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव आणले. आणि पुढे बोलू लागल्या,
“ छोले आहेत होय!.... मराठी नावं म्हणजे कशी विचित्रच वाटतात नाही. त्यापेक्षा आपलं हिंदी आणि इंग्रजी बरं.”
त्यावर मी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि बोललो,
“ सिमला मिर्च, लेडीज फिंगर आणि एलिफंट इयरबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?”
यावर प्रतिसाद म्हणून मला उसनं स्मितहास्य प्राप्त झालं. त्यानंतर मात्र आमचा संवाद अतिशय क्वचित झाला असावा.