Monday, June 3, 2019

मोरांना हवंय हक्काचं निवासस्थान

भंडारा डोंगरावर मोरांची संख्या वाढल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. उन्हाची तीव्रता वाढल्याने व पाणीसाठेही आटत चालल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोराची भटकंती चालू असल्याचे दिसते. मुळातच आपला हा राष्ट्रीय पक्षी लाजाळू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मनुष्य प्राण्याच्या संपर्कात तो सहजासहजी येत नाही. अगदी लहान मुलांनाही मोर दाखवायचा असेल, तर एकतर चित्रात किंवा प्राणिसंग्रहालयात नेऊन दाखवावा लागतो. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास येथे अशी बरीच छोटी-मोठी वने आहेत, जिथे मोरांचा अधिवास दिसतो. कळपाने राहत असल्याने मोरानी जंगल हेच आपले निवासस्थान मानले आहे. असे असले तरी त्यांना आपल्याकडून अजून सुरक्षित अभयारण्य मिळालेले नाही. अनेक ठिकाणी त्यांना इतर श्वापदांचा त्रास सहन करावा लागतो तर काही ठिकाणी तेच मानवी शेतात घुसून नासधूस करतात. आपल्या राष्ट्रीय पक्षाचे संवर्धन करायचे असल्यास त्यांच्यासाठी छोटी का होईना संरक्षित वने तयार करायला हवीत. जिथे अन्न व पाणी या दोन्ही सुविधा त्यांना उपलब्ध होतील. शिवाय दरवर्षी होणाऱ्या स्थलांतराची चिंताही मिटेल.


सोशल मीडिया आणि आपण

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, सोशल मीडिया नुकतंच पसरू लागलं होतं. त्यावेळेस इंटरनेटच्या वेगळ्या वेबसाईट वर आपलं अकाऊंट असतं, ही गोष्टच खूप मन हर्ष करणारी होती. आज जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येक जण सोशल मीडियातल्या विविध वेबसाईट वर ॲक्टिव दिसतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया हे व्यसन बनलेले दिसते. प्रत्येकालाच आपले अस्तित्व दाखवायचेय व त्यासाठी सोशल मीडिया सारखं स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम नाही! अनेक जण तर आजकाल सतत ऑनलाईन असणाऱ्या जिवंत असं मानतात. अगदी रात्री दोन वाजता मेसेज केला तरी तो डिलिव्हर झाल्याचा दिसतो! व्हाट्सअप ,फेसबुकचं स्टेटस, इंस्टाग्राम च्या पोस्ट, ट्विटरचे ट्विट्स यातून आम्ही ऑनलाईन जिवंत आहोत. हे दाखवण्याची धडपड प्रत्येकजण करताना दिसतो. परंतु, प्रत्येक व्यसनाचा अंतर हा वाईटच असतो हे सर्वांना ठाऊक आहे. सोशल मीडियासंबंधी रोज एक तरी बातमी पेपरमध्ये वाचायला मिळते. अगदी कालच एक बातमी वाचली. 'जगावे की मरावे?' असा प्रश्न एका मुलीने इंस्टाग्रामच्या पोलमधून विचारला होता. त्याला 70 टक्के लोकांनी नकारात्मक मत दिले. मग या मुलीने आत्महत्या केली! अशा अनेक नकारात्मक बातम्या वाचायला मिळतात. व्हाट्सअप स्टेटस वरून मारामारी, फेसबुक वरच्या कमेंट वरून धमकावणे, गुन्हा दाखल करणे, अगदी खूनही करणे. अशा अनेक बातम्या रोज वाचनात येत असतात. यावरूनच या सोशल मीडियाचा आपल्या जीवनावर किती अवास्तव परिणाम होत चाललाय, हे ध्यानात येते. संवाद माध्यमे वेगवान आणि प्रभावी होत चालली आहेत. परंतु त्यामुळेच नकारात्मकता फावत चालल्याचे आढळते. खरंतर मानवी स्वभावच असा आहे की, कोणत्याही गोष्टीचं आपण नकारात्मक गोष्टी सर्वात आधी शिकतो. अर्थात सोशल मीडियाही याला अपवाद नाहीच. 



मी अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पाहिली आहेत. त्यांनी माझं स्टेटस का नाही बघितलं? आणि माझी पोस्ट का नाही लाईक केली? असल्या फालतू गोष्टींवर दिवस दिवस विचार करत बसतात. त्यामुळे वेळ तर वाया जातोच आणि मानसिक ताणाने क्रयशक्तीही कमी होत असते. शेवटी या सर्व गोष्टी आपल्याच नियंत्रणात आहेत. आपण आपल्या सोशल मीडियाच्या वापरावर आणि मुख्यत्वे मन:शक्तीवर ताबा मिळवू शकलो तर सोशल मीडियाला केवळ मनोरंजनाचे स्थान आहे, हे पटवून घेऊ शकतो.