एखादा उद्योगपती जेव्हा नवा उद्योग सुरू करतो त्यामागे त्याचा काहीतरी सामाजिक उद्देश देखील असतो. कामगारांच्या बळावर तो प्रगती करत जातो. आणि यशाची शिखरे गाठतो. हे यशाचे शिखर गाठण्यासाठी त्याला अनेक कामगारांनी हातभार लावलेला असतो. म्हणूनच त्यांच्याविषयी त्याच्या मनात कृतज्ञता असते. मागील अनेक वर्षांपासून अनेक कंपन्यांमध्ये ही कृतज्ञता दिवाळीच्या बोनसद्वारे दाखवली जाते. अनेक कंपन्यांमधील कामगार वर्ग दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनसवरच दिवाळी साजरी करत असतो. परंतु जेव्हा उद्योजकाची नवी पिढी कारभार हातात घ्यायला लागते तेव्हा केवळ अधिकाधिक नफा मिळवायचा म्हणून फालतू वाटणारे खर्च कमी करायला सुरुवात होते. त्यातच कामगारांना बोनस नको, हा विचार पुढे येतो. परंतु ज्यांनी ही कंपनी चालू केली त्यांचा बोनस बंद करायला ठाम विरोध असतो. परंतु नवीन पिढीला समजावून सांगायचे कसे हा प्रश्न त्यांना पडतो. त्यातून ते नव्या पिढीला अर्थात आपल्या नातवाला कामगारांच्या पगारामध्ये मोठ्या शहरात केवळ एक महिना रहायला सांगतात. अर्थात हे एक आव्हान असते. लहानपणापासून ऐशोआरामाच्या जीवनात वाढलेल्या त्याला सर्वसामान्य कामगारांचे जीवन कसं असतं, याचा अनुभव यावा म्हणूनच त्याच्या आजोबांनी हे आव्हान दिलेले असते. वरकरणी त्याला हे आव्हान क्षुल्लक वाटते. परंतु जेव्हा प्रत्यक्ष तो ते स्वीकारतो आणि नव्या जीवनाचा केवळ एक महिन्यासाठी आरंभ करतो तेव्हा नवी आव्हाने समोर उभी राहतात. अनेक अडचणींचा त्याला सामना करावा लागतो.. तळागाळात काम करणाऱ्या लोकांचे जीवन त्याला अनुभवता येते. त्यांच्या समस्या देखील समजतात. कदाचित यामुळेच त्याचे मतपरिवर्तन घडते. हा सारांश आहे "बोनस" या चित्रपटाचा. एका वेगळ्या कथेचा हा चित्रपट म्हणजे श्रीमंतांना गरिबांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा असा आहे. वेगळी कथा आणि छान मांडणी हे याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
Friday, November 24, 2023
बोनस
Saturday, November 18, 2023
जगाची भाषा
जगभरात कुठेही गेलं की इंग्रजीच भाषा वापरतात, असा भारतीयांचा गोड गैरसमज
आहे. याच कारणास्तव मागील काही वर्षांपासून इंग्रजी शाळांचं पेव सुटलेलं
दिसतं. जगाची भाषा म्हणून आजकाल प्रत्येक जण आपल्या मुलांना इंग्रजी
शाळेमध्ये घालताना दिसतो. असेच एक जण आमच्या मित्राच्या ओळखीतल्या निघाले.
त्यांचा
मुलगा आयसीएसई नावाच्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेमध्ये चिंचवडमध्ये
शिकतो. त्याचे वडील एका मल्टिनॅशनल अर्थात बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामाला
आहेत. कदाचित परदेशातच सेटल व्हायचं म्हणून त्यांचे प्रयत्न चाललेले
दिसतात. एकदा देश निश्चित झाला की, आपल्या कुटुंबासह ते त्या देशात स्थायिक
होणार होते. अखेरीस त्यांना युरोपातील क्रोएशिया या देशात जाण्याची संधी
मिळाली. एकंदरीत तिथलं वातावरण उत्तम... पगारही चांगला म्हणून त्यांनी
आपल्या मुलाला आणि पत्नीला इथेच बोलवायचे निश्चित केले होते. परंतु त्यांना
नंतर समजले की, या देशात कुठेही इंग्रजी शाळा नाही. सर्व शिक्षण त्यांच्या
अधिकृत भाषेत अर्थात क्रोएशियन भाषेमध्ये चालते. म्हणूनच आता ते कात्रीत
सापडले आहेत. जगाची भाषा इंग्रजी म्हणून मुलगा चौथीपर्यंत इंग्रजीमध्ये
शिकला, आता क्रोएशियामध्ये स्थायिक व्हायचं म्हटल्यावर इंग्रजी काहीच
कामाची नाही, हे त्यांच्या ध्यानात आलं. अजूनही त्यांचा निर्णय झालेला
नाही!
एकंदरीत काय जगभरातील सर्वच देश मुलांना आपल्या भाषेमध्ये शिक्षण
देत आहेत. आपण मात्र इंग्रजीला कवटाळून बसलेलो आहोत. मुलं इंग्रजीतून रट्टा
मारताहेत, मार्क मिळवत आहेत, पण ज्ञान मिळवत आहेत का? हा मोठा प्रश्न
पडतो. ज्ञानाधारित शिक्षण पद्धतीला जगाने स्वीकारले असतानाही भारत मात्र
आपल्या देशाबाहेर उडण्याची स्वप्ने पाहतो आहे. मुलांना परकीय भाषेमध्ये
शिक्षण देत आहे. ज्ञान जाऊ द्या, फाडफाड इंग्रजी बोलता आले पाहिजे हे
त्यांच्या मनाने ठरवलेले आहे. पण नक्की आपला मार्ग योग्य आहे का? याची
चाचपणी मात्र त्यांनी केलेली नाही. अजूनही अनेकांना हे समजलेले नाही की,
इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यात जमीन आसमानाचा फरक आहे.
Tuesday, November 14, 2023
निर्मनुष्य - रत्नाकर मतकरी
गूढकथा वाचकांसाठी वेगवेगळ्या विषयांची मेजवानी नेहमीच रत्नाकर मतकरींच्या कथासंग्रहातून मिळत असते. 'निर्मनुष्य'या कथासंग्रहामध्ये देखील वेगवेगळ्या धाटणीच्या आणि निरनिराळ्या विषयांवर भाष्य केलेल्या विविध गूढकथा वाचायला मिळतात. यातूनच मतकरी यांची कल्पनाशक्ती किती विलक्षण आहे, याचा देखील अंदाज येतो. दैनंदिन जीवनातील घटनांमध्ये तयार होणारे गूढ आणि त्यातून उलगडत जाणारी रहस्ये ही मतकरींच्या या कथासंग्रहातील कथांची वैशिष्ट्ये आहेत. मनोविज्ञान हे अनेकदा गूढकथांचे उगमस्थान असते. या मानसशास्त्राचा उपयोग मतकरी आपल्या कथांमध्ये अतिशय उत्तमपणे करताना दिसतात.
'निर्मनुष्य' या कथेमध्ये पत्रकाराचं दिवंगत जीवन आपल्या कल्पनाविष्काराने त्यांनी उत्कृष्टरित्या फुलवलेलं आहे. 'व्हायरस' या कथेमध्ये राजकारण्यांना खरं बोलायला लावणारा व्हायरस किती भयंकर असू शकतो, याची आपण निव्वळ कल्पनाच करू शकतो असं दिसतं! 'भूमिका' ही कथा एका चतुरस्त्र नाटकाच्या नायकाची आहे, जो वर्षानुवर्षे त्याच्या भूमिकेशी समरस झालेला दिसतो. 'गर्भ' या कथेद्वारे पृथ्वीवर कधीही जन्म न झालेल्या गर्भाचा मृत्यू कशा पद्धतीने होतो, याचे वर्णन मतकरी करतात. प्रार्थनेने एखाद्याला मारता येते का? या विलक्षण विषयावर 'प्रार्थना' ही कथा आधारलेली आहे! 'पर्यायी' या कथेद्वारे एखादी घटना घडली नसती तर पर्यायाने काय झाले असते? असा सखोल विचार समोर येतो. मतकरींची विचारशक्ती वाचकाला या सर्व कथांद्वारे निश्चित खिळवून ठेवणारी आहे.
Saturday, November 11, 2023
तेंडुलकर वि. इतर
हे आहेत आंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमध्ये नावाजलेले सर्वोत्तम गोलंदाज. सरासरी आणि त्यांनी घेतलेले बळी यानुसार त्यांची क्रमवारी लावलेली आहे.
यामध्ये जगातील सर्वात वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, तसेच शेन वॉर्न, अनिल कुंबळे यांच्या बरोबरीचा पाकिस्तानी लेगस्पिनर मुश्ताक अहमद, दक्षिण आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज ऍलन डोनाल्ड, वेस्ट इंडिजचे फलंदाजाला धडकी भलवणारे कोर्टनी वॉल्श आणि कर्टली अँम्ब्रोस, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज शेन बॉण्ड आणि सर्वोत्तम फिरकीपटू डॅनियल व्हेटोरी यांची नावे नाहीत.
सांगायचं इतकंच की जगातील या सर्वोत्तम प्रत्येक गोलंदाजाचा सामना करून सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा विक्रम रचलेला आहे! आजचे सर्वोत्तम गोलंदाज कोणते? असा प्रश्न विचारला तर विचार करायलाच बराच वेळ जाऊ शकतो. आणि जे कोणी आहेत ते भारताच्या ताफ्यात दिसून येतात. त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची इतर कोणत्याही फलंदाजांशी कधीच बरोबरी होऊ शकत नाही. कारण एकदिवशीय क्रिकेट आता गोलंदाजांच्या वर्चस्वाकडून फलंदाजांच्या वर्चस्वाकडे झुकलेले आहे. खेळपट्टीवर आग ओकणाऱ्या गोलंदाजांचा सामना करत विश्वविक्रम रचने हे निश्चितच अविश्वासनीय कार्य होते, यात शंकाच नाही. सचिन तेंडुलकरच्या अद्वितीय विक्रमांना मनापासून सलाम!
- तुषार भ. कुटे.
Friday, November 10, 2023
रामचंद्र पुरुषोत्तम जोशी
मराठीमध्ये फॅन्टासी प्रकारातील चित्रपटांची संख्या तशी कमीच आहे. अशाच प्रकारामध्ये मोडणारा चित्रपट म्हणजे "रामचंद्र पुरुषोत्तम जोशी".
रामचंद्र नावाचे हे गृहस्थ एक वर्षांपूर्वी मृत्यू पावलेले आहेत. परंतु अचानक स्वर्गामध्ये त्यांना काही तासांसाठी पृथ्वीवर जाण्याची संधी मिळते. ते पृथ्वीवर येतात देखील. त्याच दिवशी त्यांचे वर्ष श्राद्ध देखील असते. पृथ्वीवर परतल्यानंतर आपली मुले आणि बायको यांना भेटण्याचा ते प्रयत्न करतात. वर्षश्राद्धाच्या दिवशीच त्यांच्याविषयी त्यांच्या आप्तस्वकीयांच्या मनामध्ये नक्की कोणत्या भावना आहेत, याचे दर्शन त्यांना होते. मागील एक वर्षांमध्ये त्यांच्यानंतर घरातील परिस्थिती खूप बदललेली असते. बायकोच्या मनावर परिणाम झालेला असतो. घरातील जबाबदारी मोठ्या मुलीवर आलेली असते. आणि लहान मुलगा वाया गेलेला असतो. या सर्व गोष्टी ते याची देही याची डोळा पाहतात. परंतु काहीच करू शकत नाही. घरातील एका व्यक्तीबरोबर ते संवाद साधू शकत असतात. त्यातूनच चित्रपटाची गोष्ट पुढे सरकत जाते.
चित्रपटाच्या सुरुवातीला जवळपास वीस-पंचवीस मिनिटे स्वर्गाचे ॲनिमेशन दाखवलेले आहे. त्याच वेळेस हा चित्रपट पूर्णपणे अनिमेटेड आहे की काय अशी शंका आली होती. परंतु तो नंतर वेगळ्या वळणाकडे गेला. मध्यंतरानंतर काहीसा भावुक आणि सामाजिक देखील बनू लागतो. या आगळ्यावेगळ्या कहाणीचे नायक आहेत रामचंद्र पुरुषोत्तम जोशी अर्थात ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर. ही कथा पुढे काय वळण घेते आणि शेवट कसा होतो, हे चित्रपटातच पाहणे योग्य ठरेल.