Showing posts with label Sayaji Shinde. Show all posts
Showing posts with label Sayaji Shinde. Show all posts

Thursday, October 19, 2023

बाबांची शाळा

कैदी आणि जेलर यांच्या सुसंवादाची गोष्ट आहे, 'बाबांची शाळा'. भारतामध्ये असे अनेक कैदी आहेत जे मूळचे गुन्हेगार नाहीत. अनेकांनी केवळ काही मिनिटांसाठी रागावर ताबा न ठेवल्यामुळे त्यांच्या हातून विविध प्रकारचे गुन्हे घडले आहेत. काहींनी तर गुन्हे देखील केलेले नाहीत, तरीदेखील त्याची शिक्षा ते भोगत आहेत. अशा विविध कैद्यांच्या गोष्टी जेलर ऐकून घेतात. त्यामागे देखील त्यांची स्वतःची वैयक्तिक पार्श्वभूमी आहे. म्हणूनच कैद्यांचा हा मुद्दा त्यांना सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. त्यावर ते स्वतःच्या पद्धतीने मार्ग देखील काढतात. त्यांना त्यांच्या घरच्यांशी भेटू दिले जाते. परंतु त्यांचे मार्ग वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटत नसतात. प्रत्येक गोष्ट कायद्यानेच व्हायला हवी असा अधिकाऱ्यांचा हेका असतो. परंतु त्यातून देखील हे जेलर चाकोरीबाहेरचा मार्ग निवडतात. एका अर्थाने ते वर्दीतील समाजसुधारक आहेत, असं चित्रपटामध्ये दिसून येतं.
नीला सत्यनारायण यांच्या पुस्तकावर आधारलेली ही कथा आहे. चित्रपटाच्या पडद्यावर पाहायला चांगली वाटली तरी प्रत्यक्षात अनुभवायला खूप अवघड वाटते. विशेष म्हणजे सयाजी शिंदे यांनी या चित्रपटांमध्ये शांत आणि संयमी अशी भूमिका साकारलेली आहे. ती सुरुवातीला समजायला जड जाते. परंतु नंतर सयाजी शिंदेंना चरित्र भूमिकेमध्ये आपण सामावून घेतो. चित्रपटाची पूर्ण मदार त्यांच्याच खांद्यावर आहे. कथा तशी चांगली पण अजून काहीशी नाट्यमय असायला हवी होती. तरीही एकदा बघायला हरकत नाही.

स्थळ: प्राईम व्हिडिओ. 




Thursday, June 10, 2010

पावसात भिजलेली ती रात्र

’त्या रात्री पाऊस होता’ बद्दल मी यापूर्वीही ऐकले होते. परंतु, प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर त्याच्या दमदार कथेची व दिग्दर्शनाची अनुभूती आली. गजेंद्र अहिरे यांच्या अप्रतिम दिग्दर्शनाखाली तयार झालेला ’त्या रात्री पाऊस होता’ हा एक सोशिओ-पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट आहे. सतत कोसळणाऱ्या पावसात त्याची कथा चालू होते. पहिले १५ मिनिटे संथ वाटणारा चित्रपट मग अपेक्षित वेग घेतो.

ही कथा आहे एकच भूतकाळ असणाऱ्या दोघांची. परंतु, त्याबाबत दोघेही नीटसे ज्ञात नाहित. जे काही माहित आहे तेही अर्धवटच. मग त्या पावसाळी रात्रीत दोघेही त्यांचा पुढचा भूतकाळ एकमेकांना सांगतात व तो काय असतो, हे चित्रपटातच पाहण्यासारखे आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी त्यांच्या चित्रपटातून आजवर अनेक सामाजिक विषय हाताळले त्याच पठडीतला हा चित्रपट आहे. आजच्या सामाजिक व राजकिय परिस्थितीवर तो नेमके भाष्य करतो. सोनाली कुलकर्णी व अमृता सुभाष यांनी दोन वेगवेगळ्या वृत्तीची स्त्री पात्रे सादर केली आहेत. त्यात दोघीही यशस्वी झाल्याच्या दिसतात. एक सामान्य गृहहितदक्ष गृहिणीची भूमिका सोनालीने साकारलीय. जशी चित्रपटाची कथा पुढे जात जाते तशी तिची बदललेली भूमिकाही लक्षात येते. सामान्य प्रामाणिक माणूस राजकारणात कधीच टिकू शकत नाही, हे तिच्या भूमिकेतून पक्के लक्षात राहते. अमृता सुभाष प्रथमच एका वेगळ्या भूमिकेत दिसली. डोक्यावर कोणाचेही छत नसल्याने स्वैर व खूप लवकर प्रौढ झालेली तरूणी तीने साकारलीय. तीची भूमिकाही लक्षात राहण्यासारखी आहे. सयाजी शिंदेंच्या बाबतीत सांगायचे तर निळू फुलेंनंतर त्याची जागा मराठीत भरून निघल्याचे दिसते. आजचा मुरलेला राजकारणी त्यांनी अतिशय उत्तम साकारलाय. भारतीय राजकारणी कोणत्या स्तरावर विचार करतात, याचेच उत्तम उदाहरण त्यांनी उभे केले आहे. चित्रपटाच्या अंतिम टप्प्यात सामान्य माणूस व राजकारणी यांच्यातील दरीवर त्यांनी दिलेले भाषण खरोखर विचार करण्यासारखे आहे. भारतीय लोकशाही कोणत्या मार्गाने चालली आहे, याचे दर्शन त्यातून घडते. कितीही काही झाले तरी राजकारण्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही, हेच खरे. अगदी पत्रकारही नाही. केवळ त्यांच्या मृत्युनेच हे सारे संपू शकते...

सुबोध भावे व संदिप मेहता यांनी त्यांच्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. चित्रपट संपल्यावर मात्र काहितरी चुकल्याची हूरहूर लागून राहते. एक वेळ पाहावा असा हा चित्रपट निश्चितच आहे.