Sunday, May 19, 2024

स्टॅटिस्टिक्स

स्टॅटिस्टिक्स अर्थात सांख्यिकी म्हणजेच संख्याशास्त्राचा अभ्यासक्रमामध्ये शालेय जीवनात अथवा महाविद्यालयीन जीवनामध्ये माझा कधीही संबंध आला नाही. जवळपास १० ते १२ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा मशीन लर्निंग शिकायला आणि शिकवायला सुरुवात केली तेव्हा संख्याशास्त्राची खऱ्या अर्थाने मला स्वतःला गरज भासू लागली. स्टॅटिस्टिक्स हे केवळ नावच ऐकले होते आणि असेही ऐकून होतो की ती गणिताचीच एक शाखा आहे. आज दशकभरामध्ये या विषयातील सर्व संकल्पना नक्की काय आहेत? त्यांचा व्यवहारिक जीवनामध्ये काय उपयोग होतो? याची व्यवस्थित माहिती झाली आहे
कदाचित डेटा सायन्स या विषयाला हात घातल्यामुळे संख्याशास्त्र कोळून प्यायची सवय झालेली आहे. डेटा सायन्स मुळेच संख्याशास्त्राचीही मला ओळख झाली. गणिताचाच एक भाग वाटत असला तरी व्यवहारिक पद्धतीने संख्यांचा उपयोग कशा पद्धतीने होतो हे संख्याशास्त्र आपल्याला सांगते. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर करून, इंग्रजी पुस्तके वाचून तसेच विविध लेखकांनी लिहिलेले ब्लॉग वाचून मी संख्याशास्त्र शिकत गेलो आणि याच कारणास्तव डेटा सायन्स अधिक उत्तमरीत्या समजायला लागले. गणित तसं पाहिलं तर अवघड नाही परंतु त्याचा व्यवहारीक उपयोग लक्षात आला तरच ते ध्यानात राहते हे समजले. गणितापेक्षा संख्याशास्त्र अधिक सुलभ आहे. या विषयावर आधारित माझ्या पाहण्यात तरी एकही मराठी पुस्तक उपलब्ध नव्हते.
अच्युत गोडबोले आणि डॉ. अमिता धर्माधिकारी यांनी लिहिलेले “स्टॅटिस्टिक्स” हे पुस्तक जेव्हा हाती लागले तेव्हा लगेचच भराभरा ते वाचून काढले. एका अर्थाने ही माझ्यासाठी उजळणीच होती. मला या संकल्पना नव्याने माझ्या भाषेतून वाचायला मिळाल्या. केवळ एवढेच नाही तर संख्याशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना आणखी व्यवस्थित समजल्या. जसे एवरेज आणि मीन मधील फरक, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशनचा उपयोग.
प्रोबॅबिलिटीचा आणि संख्याशास्त्राचा लोकसंख्याशास्त्र आणि विमा विज्ञानामध्ये असणारे उपयोग, याशिवाय भारतीय संख्या शास्त्रज्ञांची माहिती आणि विशेष म्हणजे या विषयातील कोडी, दिशाभूल आणि गमतीजमती या गोष्टी मला नव्याने या पुस्तकाद्वारे समजल्या. तसं पाहिलं तर कोणताही तांत्रिक विषय मराठीतून मांडणं अतिशय अवघड आहे. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तरीदेखील लेखक द्वयीनी संख्याशास्त्राचा सखोल ऊहापोह आणि अभ्यास या पुस्तकाद्वारे केल्याचे दिसते. काही संकल्पना नवशिक्यांना समजण्यासाठी अवघड आहेत. अर्थात त्यांचा व्यवहारिक उपयोग दर्शवून दिल्यास त्या आणखी व्यवस्थित समजू शकतील असे वाटते. प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ही संकल्पना अजूनही अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना फारशी लवकर समजत नाही. तसेच त्याचे व्यवहारिक उपयोग देखील ध्यानात येत नाहीत. खरंतर प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स साठी हे अतिशय उपयुक्त तत्व आहे. त्याची मांडणी आणखीन व्यवस्थितपणे व्हायला हवी असं वाटून जातं. बाकी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स ते इनफरन्शियल स्टॅटिस्टिक्स ची इत्यंभूत माहिती आपल्याला या पुस्तकाद्वारे वाचायला मिळते. शिवाय बहुतांश संकल्पनांचा इतिहास देखील लेखकांनी यामध्ये दिला असल्याने ती अधिक रंजक वाटते. संख्याशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी हे पुस्तक म्हणजे एक उत्तम संदर्भ ग्रंथ होईल असेच आहे.
या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे यातील दिलेली उदाहरणे. या उदाहरणाद्वारे संख्याशास्त्राचा व्यवहारिक उपयोग कसा करता येतो, किंबहुना अनेक प्रश्नांची उकल संख्याशास्त्राद्वारेच कशी करता येते याची माहिती वाचकांना होते. अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात इंग्रजी शब्दांचा भरणा दिसून आला. त्यातील  बऱ्याचशा शब्दांना उत्तम मराठी प्रतिशब्द आहेत. त्यांचा वापर करता आला असता. जसे सिस्टीम= प्रणाली, रूल= नियम, मेथड= पद्धती, एक्सपेरिमेंट= प्रयोग, प्रोबॅबिलिटी= संभाव्यता, सिलेक्शन= निवड, मार्क्स= गुण, एवरेज= सरासरी, रेट=दर, रॉ=कच्चा/अपरिपक्व, नंबर=क्रमांक, फॉर्म्युला= सूत्र, डायमेन्शन= मिती, अनालिसिस=विश्लेषण, टेक्निक= तंत्र, टेस्ट= चाचणी, थियरम= प्रमेय, टेबल= तक्ता/सारणी, इंजीनियरिंग= अभियांत्रिकी, प्रॉडक्ट= उत्पादन, ड्रॉईंग=आकृत्या इत्यादी.
लोकसंख्याशास्त्र, जीवनसारणी आणि विमाविज्ञानाविषयीचे  प्रकरण आणि गोळाबेरीज नावाचे प्रकरण हे प्रत्येक संख्याशास्त्रज्ञाला माहित असावे असेच आहे. एकंदरीत आज सर्वाधिक नोकरीच्या संधी ज्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत त्या डेटा सायन्सला शिकण्यापूर्वी संख्याशास्त्राचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करेल. 

- तुषार भ. कुटेSunday, May 5, 2024

उत्तर कोरिया: जगाला पडलेलं एक कोडं

उत्तर कोरिया म्हणजे जगातील सर्वात गुढ देश होय. अर्थात अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला न जुमानणारा देश कसा असेल? याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. शिवाय सातत्याने विविध प्रसंगी उत्तर कोरियातील प्रशासन व्यवस्थेविषयी तसेच तिथल्या राजकीय व्यवस्थेविषयी बातम्या प्रसारित होतच असतात. त्यातून असं लक्षात येतं की उत्तर कोरिया म्हणजे एक स्वतःचे वेगळे विश्व आहे. हे विश्व नक्की कसं तयार झालं? आणि इथली माणसं अशा विचित्र विश्वामध्ये कशा पद्धतीने राहतात? याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे, या सर्वांचं उत्तर देणार हे पुस्तक म्हणजे "उत्तर कोरिया: जगाला पडलेलं एक कोडं".
कोरियाच्या इतिहासाची सुरुवात होते ती जपानी आक्रमणापासून. जपानने अनेक वर्ष इथल्या लोकांना गुलामगिरीखाली वागवलं. परंतु कालांतराने या देशाच्या विचारधारेमुळे त्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन तुकडे झाले. १०० वर्षांपूर्वीच्या कोरियामध्ये उत्तर भाग हा अधिक समृद्ध तर दक्षिण भाग हा गरीब होता. पण उत्तर कोरियाने हळूहळू हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल चालू केली. एखाद्या देशामध्ये हुकूमशाही नक्की कशी सुरू होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर कोरिया होय! जर्मनीमध्ये एकेकाळी असणारी हिटलर प्रणित हुकूमशाही आणि आज उत्तर कोरिया मध्ये असणारी एकाच घराण्याची हुकूमशाही यात काहीसा फरक असला तरी फलित मात्र एकच आहे. लोकशाहीपेक्षा हुकूमशाही बरी हे जेव्हा एखाद्या देशाची जनता स्वतः मानू लागते तेव्हाच ते हळूहळू वैचारिक गुलाम होत जातात आणि राजेशाही नसली तरी विशिष्ट घराण्याला आपलं मानून त्यांचे नियमच शिरसावंद्य मानले जातात. स्वातंत्र्य म्हणजे काय, याचा अर्थ देखील ते समजून घेत नाहीत. एका डबक्यातल्या बेडकासारखी त्यांची अवस्था होते. बाहेरच्या जगात काय चाललंय, हे देखील त्यांना माहीत नसतं. अशीच काहीशी अवस्था उत्तर कोरियन नागरिकांची आहे. याचे विस्तृत विवेचन या पुस्तकाद्वारे लेखक अतुल कहाते यांनी अतिशय उत्तमरीत्या केलेले आहे.


 

Wednesday, May 1, 2024

नाच गं घुमा

ठाण्यातल्या उच्चभ्रू रहिवासी भागामध्ये राहणारे त्रिकोणी कुटुंब. यातील राजा आणि राणी अर्थात नवरा आणि बायको दोघेही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉबला आहेत. आणि त्यांची मुलगी शाळेमध्ये शिकतेय. अर्थात याच कारणास्तव त्यांच्या घरी घरकाम करण्यासाठी कामवाली बाई आहे.

त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सात वाजल्यापासून. घरातली सर्वच कामे कामवाली बाई अर्थात आशाताई अगदी तन्मयतेने करतेय. दिवसातील बारा तास वेळ ती या घरात घालवते. अर्थात घराची सर्वच जबाबदारी तीच्याकडेच आहे.  बहुतांश वेळा ती कामाला उशिरा पोहोचते. त्यामुळेच एक दिवस वैतागून राणी आशाताईला कामावरून काढून टाकते. आणि दुसरी बाई शोधायला लागते. पण तिला हवी तशी बाई मिळत नाही. मग पुन्हा आशाताईला कामावर बोलावले जाते. परत काही दिवसांनी एका घटनेमुळे तिला काम सोडावे लागते. यानंतर मात्र राणीची फारच पंचाईत व्हायला लागते. आशाताई आपल्यासाठी काय काय करू शकतात, किंबहुना काय करतायेत? याची जाणीव तिला व्हायला लागते. यातूनच राणी आणि आशाताई यांच्यातील भावनिक बंध समोर येतो आणि कथा संपते.

ही गोष्ट साधी सरळ वाटली तरी आज शहरात राहणाऱ्या अनेक मध्यम तसेच उच्चमध्यमवर्गीय घरातील जवळपास अर्ध्याअधिक कुटुंबांची तरी आहे. घर सांभाळण्यासाठी घरातील ‘त्या’ दोघांव्यतिरिक्त आणखी कोणीतरी असायला हवे हे अधोरेखित करणारी ही कहाणी आहे.

मराठीमध्ये आजवर आई-वडील, आई-मुलगा, वडील-मुलगी, बहीण-भाऊ सारख्या जवळपास प्रत्येक नात्यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट होऊन गेले. परंतु घरमालकिन आणि कामवाली बाई यांच्यातील बंध दाखवणारा कदाचित हा पहिलाच चित्रपट असावा. ही गोष्ट दिग्दर्शकाने विनोदी ढंगाने सादर केलेली आहे. परंतु शेवटाकडे जाता जाता ती भावनिक वाट पादाक्रांत करते. खरंतर हीच कथेची मुख्य गरज होती. ज्यामुळेच चित्रपट पूर्णत्वास जातो. घरातील एकूण वातावरण, दोघांच्याही ऑफिसमधील वातावरण, आजूबाजूची परिस्थिती आणि घडणाऱ्या घटना या शहरातील प्रत्येकाला आपल्याशा किंबहुना आपल्या अवतीभवतीच घडणाऱ्या आहेत, असं वाटतं. चित्रपटातील प्रत्येक पात्र त्यांच्या भूमिकेशी समरस झाल्याचं देखील दिसतं. म्हणून ही गोष्ट मनाला भावते.

या चित्रपटांमध्ये दोन ‘घुमा’ आहेत. यातील पहिली घुमा अर्थात राणीची भूमिका मुक्ता बर्वेने छान साकारलेली आहे. तर दुसरी घुमा जिला आपण या चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र म्हणू तिची अर्थात आशाताईची भूमिका नम्रता संभेरावने अतिशय उत्कृष्टपणे साकारलेली दिसते. कदाचित ही भूमिका तिच्यासाठीच लिहिली गेली असावी, हेही दिसून येतं. तिच्यासारखी चतुरस्त्र अभिनेत्री कोणतीही भूमिका अतिशय उत्तमपणे निभावू शकते. पूर्ण चित्रपटामध्ये सर्वप्रथम तिचीच भूमिका खरोखर लक्षात राहते. ‘वाळवी’ या परेश मोकाशी यांच्या आधीच्या चित्रपटामध्ये देखील अतिशय छोट्या भूमिकेमध्ये नम्रताने आपली छाप पाडली होती. कदाचित याचमुळे तिला या चित्रपटामध्ये मोठी भूमिका मिळाली असावी. तिने या संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लाखो मराठी प्रेक्षकांना नम्रता ज्ञात आहेच. पण या चित्रपटातून तिने तिच्यातील कसलेली अभिनेत्री मराठी प्रेक्षकांना पुन:श्च दिसून येते.

एकंदरीत चित्रपट एकदाच नाही तर पुन्हा-पुन्हा पहावा असाच आहे. परेश मोकाशी यांचा चित्रपट म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. हा चित्रपट देखील त्याला अपवाद नाही.