Monday, June 1, 2020

इमान

"एक म्हैना व्हऊन गेला राव. इमानं अजून बंदच हायेत!", पहिला चिंतातुर होऊन बसला होता.
"तुला काय करायचं रं इमानाचं? तू आपलं एष्टीचं बघ की, ती बी बंदच हाय!" - दुसरा.
"असं काय करतूस राव, तुला म्हाईत नाय का इमानानं परदेशात जायचं लई मोठं सपनं हाय माझं."
"व्ह्यय की, इतकी वर्षं तेच ऐकतोय ना!"
"इमानं कधीच चालू व्हनार नाय का रं?"
"आजूक दोन-तीन म्हैनं तरी न्हाय व्हनार."
"म्हंजी... नंतर व्हतीलच ना?"
"व्हतीलच रं. पन तू लई सपान नको बघू. काईतरी दुसरा इषय काढू."
"दुसरा काय इषय आता?" - पहिला चिंताग्रस्त.
"टीवी वरचं रामायण संपलं ना? मग मला सांग, त्यातून तू काय शिकला?"
या प्रश्नावर पाहिल्याने गहन विचार केला व बोलू लागला.
"परदेशात इमानानं जाणारी सीता ही पहिली भारतीय व्हती!"
"अरे खुळ्या, ते न्हाय. दुसरं काय तरी सांग."
पुन्हा पाहिल्याने काही काळ डोके खाजविले व बोलू लागला.
"सोताच्या ताकदीवर परदेशात जाणारा हनुमान हा पहिला भारतीय व्हता!"
"खुळं तेच डोक्यात घेऊन बसलंय अजून. तू नाय सुधारणार बाबा!"
अशी तणतण करत दुसरा तेथून निघून गेला. पहिला मात्र अजून काही सुचतंय का? याचा विचार करत तिथेच डोकं खाजवत उभा होता.  


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com