Tuesday, June 16, 2020

निवडक र. अ. नेलेकर

धारक व मतकरी यांच्यानंतर वाचलेले र. अ. नेलेकर हे तिसरे भयकथा लेखक! त्यांच्या भयकथांचे केवळ तीन संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मराठी वाचकांना ते फारसे परिचित नसावेत. शिवाय त्यांच्या नावे तीन विनोदी कथासंग्रह देखील आहेत! भय आणि विनोद असे परस्परविरोधी प्रकार हाताळलेले नेलेकर कदाचित एकमेव मराठी लेखक असावेत. त्यांच्याच भयकथांचा हा कथासंग्रह होय- निवडक र. अ. नेलेकर (राजेंद्र प्रकाशन)
प्रत्येक लेखकाची एक वेगळी शैली असते. तशीच नेलेकरांची स्वतःची शैली आहे. फारसं वर्णनात्मक चित्रन न करता साध्या सरळ पद्धतीने परंतु वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा, हे त्यांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. धारप व मतकरी वाचल्यानंतर नेलेकरांच्या शैलीत रुळायला थोडा वेळ लागतो. पण नंतर ती आपल्या मनाची पकड घ्यायला सुरवात करते व एक अद्भुत विश्वाची सफर घडवून आणते. त्यांच्या या पुस्तकात एकूण सोळा कथा आहेत. त्यातील अखेरची 'कणक राऊळ' ही केवळ साहस कथा आहे. बाकीच्या भयकथांमध्ये कुठली सर्वात चांगली? असे निश्चित सांगता येणार नाही. कारण प्रत्येक कथा ही पूर्णतः वेगळ्या धाटणीची आहे. त्यांच्यात तोचतोचपणा जाणवत नाही. त्यामुळे कुठलीही कथा वाचली तरी आपल्याला निराळ्याच विश्वात घेऊन जाते, हे विशेष.
संग्रहातील काही कथांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यामुळे अशा दर्जेदार कथांचा संग्रह निश्चितच वाचनीय असाच आहे.

 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com