चित्रपटाची सुरुवात होते एका रेल्वे ट्रॅकवर... एका निर्मनुष्य भागातून जाणाऱ्या त्या ट्रॅकवर एक २४-२५ वर्षांची युवती रेल्वेच्या दिशेने दुःखद चेहरा करून बघत आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमांचे व्रण देखील दिसून येतात. ट्रेनच्या भोंग्याचा आवाज येतो. जसजशी ट्रेन जवळ यायला लागते तसतसे तिचे काळीज धडधडू लागते. परंतु, अखेरच्या क्षणी मृत्यूला कवेत घेण्याची तिची हिंमत होत नाही आणि ती ट्रॅकवरून बाहेर उडी मारते. पाठीमागे ट्रेन वेगाने धडधडत ट्रॅकवरून निघून जाते आणि मग सुरू होतो फ्लॅशबॅक.
ही तरुणी आहे, दिया... चेहऱ्याने निर्मळ, निष्पाप आणि स्वभावाने अबोल...
तंत्रज्ञान महाविद्यालयात शिकत असताना मास्टर्सला शिकणाऱ्या एका युवकावर तिचे प्रेम जडते. अगदी लव अॅट फर्स्ट साईट म्हणतात ना तसेच! प्रेमात पडण्याच्या वयात खरोखरच प्रेम जडल्याने ती त्या युवकाला फॉलो करायला लागते. सातत्याने त्याचाच विचार मनामध्ये घोळत राहतो. त्याच्याशी येनकेनप्रकारे जवळीक साधण्याचा ती प्रयत्न करते. पण तिला ते फारसे जमत नाही. अगदी त्याने पेन्सिलिद्वारे काढलेली चित्रे देखील महाविद्यालयाच्या फलकावरून काढून घरी घेऊन जाते. याच चित्रांमुळे तिला त्या युवकाशी अर्थात रोहितशी बोलण्याची संधी देखील मिळते. पण त्यांचे प्रकरण काही पुढे जात नाही. दिया मात्र रोहितसाठी कासावीस झालेली असते.
थोड्याच दिवसात तिला समजते की रोहितला कोरियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली आहे आणि त्यामुळे त्याने कॉलेजदेखील सोडलेले आहे. इतके दिवस ती रोहितचा पाठलाग करत असते, त्याच्याशी तिच्या प्रेमाबद्दल कसं बोलू? या प्रश्नाचे उत्तर शोधत असते परंतु यातच रोहित निघून गेल्याची बातमी येते. अर्थात यामुळे तिचा भ्रमनिरास होतो. परंतु एक दिवस अचानक काही महिन्यानंतर तिला रोहित परत भेटतो... अगदी अनपेक्षितपणे.
इथे चित्रपटातला पहिला ट्विस्ट येतो. रोहित देखील तिला अनेक महिन्यांपासून फॉलो करत असतो. त्याची देखील तिच्याशी बोलण्याची हिंमत होत नाही. पण त्या दिवशी तो बोलतो. इथे चित्रपटातील सगळ्यात पहिला आनंदाचा प्रसंग तयार होतो! प्रेमकहानी चालू होते. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही... ईथवर परिस्थिती आलेली असते. परंतु चित्रपटातील पुढचा ट्विस्ट म्हणजे एके रात्री बाईकवर जात असताना दोघांचाही भीषण अपघात होतो आणि होत्याचे नव्हते होते. दिया भयंकर मानसिक धक्क्यामध्ये जाते. कदाचित यातून ती पुन्हा कधीही सावरू शकणार नसते. तिच्या आई-वडिलांकडून बरेच प्रयत्न होतात. परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही. शेवटी ते तिचे शहर बदलायचे ठरवतात. नव्या शहरात आल्यानंतर दियाची एका नव्या मित्राबरोबर अनोख्या पद्धतीने ओळख होते. हा मित्र म्हणजे आदी. तो तिला बोलत करतो. तिच्याशी मैत्री करतो आणि यातूनच त्यांच्या मैत्रीचे नाते प्रेम भावनेमध्ये रूपांतरीत होते. ही भावना दोघेही बोलून दाखवत नाहीत. त्यांच्या अबोल नात्याला कोणत्याही शब्दांची गरज पडत नाही. दिया पुन्हा प्रेमात पडते. परंतु चित्रपटातील ट्विस्ट काही थांबत नाहीत. जीवनाचे वळण पुन्हा एकदा वेगळ्या वाटेला तिला घेऊन जाते. मानवी जीवन हे किती अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकले आहे, याची प्रचिती दियाच्या एकंदर आयुष्याकडे पाहिले तर येते. यापुढील कथा ही खूप वेगळ्या वळणाची आहे. परंतु चित्रपटाचा शेवट एका शोकांतिकेने होतो. त्याची सुरुवात जिथे झाली असते त्याच ठिकाणी शेवट देखील होतो!
एखाद्याचे जीवन इतक्या वेगवेगळ्या वळणानंतर निराळ्याच गंतव्यस्थानी येऊन पोहोचते, याची गोष्ट दियाच्या या कथेमध्ये दिसून येते.
चित्रपट सुरू झाला तेव्हाच याची सिनेमॅटोग्राफी कोणत्यातरी दक्षिण भारतीय माणसाने केली असावी, असा संशय आला आणि तो खराच ठरला. चित्रपट संपल्यानंतर जेव्हा त्याची माहिती काढली तेव्हा समजले की हा चित्रपट कन्नडमधील के. एस. अशोक दिग्दर्शित 'दिया' या चित्रपटाचा अधिकृत मराठी रिमेक आहे. शिवाय याच चित्रपटाची हिंदी आवृत्ती 'डियर दिया' आणि तेलुगु आवृत्ती 'डियर मेघा' या नावाने प्रदर्शित झाली होती. कन्नड भाषेमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाल्याने दिग्दर्शकाने स्वतःच हा चित्रपट चार भाषांमध्ये तयार केला! कथा तशी छान आहे. परंतु त्याचा शेवट एक शोकांतिका असल्याने तो एक दुःखद प्रेमपट असल्याचे दिसते.
चारही चित्रपटांपैकी मराठीमध्ये जीने दियाची भूमिका केली आहे त्या रितिका श्रोत्री हीचीच भूमिका सर्वात प्रभावी वाटली. विशेष म्हणजे 'आदी'च्या भूमिकेमध्ये कन्नड अभिनेता पृथ्वी अंबर याने कन्नड, हिंदी आणि मराठी अशा तीनही चित्रपटांमध्ये काम केले आहे! तसेच त्याच्या आईच्या भूमिकेमध्ये मृणाल कुलकर्णी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटांमध्ये आहेत. तीनही चित्रपट प्रत्येक दृश्यनदृश्य समान असल्याचे दिसतात.
एकंदरीत गोषवारा पाहिला तर रितिका दियाच्या भूमिकेमध्ये अतिशय फिट बसल्याचे दिसते. तिचा एकंदरीत अभिनय सुंदर झालेला आहे. एखाद्या मुलीला आपल्या आयुष्यात दोन-दोन हुशार आणि समंजस जोडीदार कसे मिळू शकतात? असा प्रश्न देखील पडू शकतो. आदी आणि त्याच्या आईचे जे नाते दाखवले आहे, तसे नाते सापडणे आज विरळाच! त्या नात्यास आदर्श नाते म्हणता येईल. शिवाय रोहित आणि आदी देखील एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतात. एक प्रकारे हा प्रेम त्रिकोण आहे असे म्हणता येईल. पण या त्रिकोणाच्या तीनही बाजू आपल्याला तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून देखील समजावून घेता येतील.
रोमँटिक चित्रपट पाहणाऱ्यांना हा चित्रपट निश्चितच १००% आवडेल. कदाचित त्याच्या शेवटवर ते नाराज देखील असतील. 'संमोहिनी' हे गाणे अतिशय छान आहे. वारंवार ऐकावे असेच!
"लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स" या टॅगलाईनवर चित्रपटाची निर्मिती केली गेली होती. एकंदर चित्रपट पाहता ही टॅगलाईन सार्थ ठरते. काही गोष्टी अविश्वासनीय वाटल्या तरी जीवनातील अप्रत्याशीत घटना तो दाखवून जातो. काही चित्रपट आपल्या मनाचा ठाव घेतात, अशाच पठडीतील हा देखील आहे.
चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपट समीक्षकांनी यास फारसे चांगले गुण दिले नव्हते. यामागचे कारण समजले नाही. युट्युबवर कोणीतरी अनाधिकृतपणे हा चित्रपट अपलोड केलेला आहे. त्यावरील ९०% पेक्षा अधिक लोकांनी सकारात्मक कमेंट्स केलेल्या दिसतात. म्हणजेच लोकांना हा चित्रपट आवडलेला आहे. आयएमडीबीवर देखील चित्रपटाचे रेटिंग कमी आहे. म्हणून कदाचित बहुतांश प्रेक्षक पाहत नसावेत. परंतु माझ्या दृष्टीने हा चित्रपट चांगलाच आहे.
नियमित चित्रपट बघणाऱ्यांना हा निश्चित आवडेल. तुमच्यापैकी कोणी बघितला असेल तर नक्की सांगा. बघितला नसेल तर नक्की बघा आणि प्रतिक्रिया देखील कळवा चित्रपटाच्या नायिकेच्या अर्थात दियाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटते? याचे उत्तर ऐकायला निश्चित आवडेल.
--- तुषार भ. कुटे
Sunday, September 29, 2024
सरी
Friday, September 27, 2024
सखी
कंपनीतील कमकुवत आर्थिक स्थितीमुळे सूर्यकांत जगदाळे यांना जबरदस्तीने निवृत्त व्हावे लागते. इतकी वर्षे कंपनीमध्ये काम केल्यानंतर देखील अशा पद्धतीने वागणूक मिळाल्यामुळे ते अस्वस्थ होतात. आणि पुढील आयुष्य घालवण्यासाठी आपल्या गावी येतात. शहरांमध्ये अनेक वर्ष त्यांनी एकट्यानेच घालवलेली असतात. तोच मार्ग गावी आल्यानंतर देखील चालू ठेवतात. एक दिवस संकटात सापडलेल्या युवतीला अर्थात निशीला ते वाचवतात. निशी लग्नानंतरच्या आपल्या आयुष्यात घडलेल्या अनपेक्षित घडामोडींशी सामना करत असते. सासर आणि माहेर दोन्हींपासून दुरावलेली असते. तिला सूर्यकांत आधार देण्याचा प्रयत्न करतात. पुढे काय हा प्रश्न उपस्थित राहतो. एक दिवस सूर्यकांत यांना निशीमधील एका कलेची अनुभूती येते. मग ते ठरवतात की निशीने ही कला जोपासावी आणि त्यातच करिअर करावे. त्यासाठी तिला हवी ती मदत करायला ते सज्ज होतात. तिच्यासाठी मार्गदर्शक होतात. इथून पुढची आयुष्य नीशीच्या करिअर करता वाहून घेण्याचे ठरवतात. निशी सुद्धा त्यांचा विश्वास सार्थ ठरवते. त्यांच्या या प्रवासामध्ये अनेक अडथळे देखील येतात. आपले आणि परके कोण? यांची देखील त्यांना जाणीव होते. सूर्यकांत यांच्या आयुष्यातील निशी ही खरीखुरी सखी ठरते. तिला प्रगतीच्या शिखराकडे ते घेऊन जातात.
स्त्री आणि पुरुष यांच्यातील या वेगळ्या नात्याची गोष्ट 'सखी' या चित्रपटामध्ये दिग्दर्शक लता नार्वेकर यांनी दाखविलेली आहे. पती-पत्नी आणि भाऊ-बहीण या पलीकडे असणार तिसरं नातं आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतं. अशोक सराफ, सोनाली कुलकर्णी आणि उषा नाडकर्णी या तिघांनाही 'स्वप्रतिमेबाहेरच्या भूमिका' वाटेला आलेल्या आहेत. अशा वेगळ्या भूमिकांमध्ये पाहताना छान वाटतं. उषा नाडकर्णी समंजस भूमिकेमध्ये प्रभावी ठरतात. एकंदरीत एका यशस्वी स्त्रीच्या मागे असणाऱ्या पुरुषाची गोष्ट प्रभावीपणे या चित्रपटामध्ये पाहायला मिळते.
Tuesday, September 24, 2024
एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी
जीवनामध्ये योग्य निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण तो एक निर्णय
जीवनाला कोणत्याही प्रकारे कलाटणी देऊ शकतो. कदाचित पुढील सर्व आयुष्य त्या
निर्णयावरच अवलंबून असू शकते. अशाच त्या एका निर्णयाची गोष्ट या
चित्रपटामध्ये चित्रित करण्यात आलेली आहे.
मुक्ता आणि ईशान हे एक सुखी
जोडपं. मुक्ता ही करिअरला प्राधान्य देणारी स्त्री आहे. आणि त्यासाठी
तिच्या आई-वडिलांचा देखील तिला खंबीर पाठिंबा आहे. परंतु ती आई व्हायला
तयार नसते. कारण त्यामुळे तिचं करिअर थांबू शकतं, अशी भीती तिला वाटत असते.
याच कारणास्तव पुढे जाऊन दोघांचाही घटस्फोट होतो. ईशान दुसरे लग्न करतो. पण
त्याच्या दुसऱ्या बायकोला वैद्यकीय गुंतागुंतीमुळे मूल होणार नसते.
दुसरीकडे मुक्ताच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडते आणि ती पूर्णपणे एकटी
पडते. तो एकाकीपणा तिला खाऊ लागतो. म्हणूनच ती मानसिक दृष्ट्या देखील कमकुवत
होते. एक डॉक्टर म्हणून तिची क्षमता देखील कमी व्हायला लागते. एकेकाळी मूल
होऊ न देण्याचा निर्णय आणि आज तयार झालेली पूर्ण विरुद्ध परिस्थिती यातून
ती एक वेगळाच मार्ग काढते. यात भावनिक मानसिक गुंतागुंत तयार होते. यातून
पुढे नक्की कसा मार्ग निघतो हे चित्रपटात पाहता येईल.
सुबोध भावे आणि
मधुरा वेलणकर या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. दोघांनीही आपल्या
भूमिकेला पूर्ण न्याय दिल्याचे दिसते. शिवाय भावभावनांच्या आणि नात्यातील
गुंतागुंतीचा हा खेळ दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे.
Wednesday, September 18, 2024
रिंगण
महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावामध्ये अर्जुन मगर नावाचा छोटा शेतकरी राहत आहे. पत्नी वारल्यामुळे केवळ तो आणि त्याचा मुलगा असे दोघेच आलेला दिवस आनंदाने जगत आहेत. खरंतर या जगण्याला आनंदी म्हणता येणार नाहीच. अर्जुनवर गावातल्या सावकाराचे कर्ज आहे. त्यासाठी त्यांनी गावातील जमीन देखील गहाण ठेवलेली आहे. एका वर्षामध्ये कर्ज परतफेड केली नाही तर सावकार जमीन देखील जप्त करणार आहे. त्यासाठी त्याला पैशांची गरज आहे. तो अनेकांकडे पैसे मागण्यासाठी जातो, पण त्याला काही पैसे मिळत नाहीत. असेच एकदा पैसे कमवण्यासाठी तो पंढरपूरमध्ये येतो. एका धर्मशाळेमध्ये थांबतो. परंतु तिथेच एक भुरटा त्याचे सर्वसामान आणि फटफटी घेऊन पसार होतो. इथून पुढेच अर्जुनचा जगण्याचा संघर्ष सुरू होतो. शिवाय त्याच्या मुलाची देखील त्याच्याबरोबर फरफट होते. एका ठिकाणी तो कामाला देखील लागतो. काहीही करून पैसे मिळवायचेच या विचाराने तो 'वेगळा' मार्ग देखील निवडतो. पण त्यातून भलतेच घडते. ही गोष्ट आहे 'रिंगण' या चित्रपटाची.
अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तसेच ६३व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये तब्बल सहा पुरस्कार मिळवलेला हा चित्रपट आहे. अर्जुनची मध्यवर्ती भूमिका शशांक शेंडे यांनी साकारलेली आहे. जगण्याची उमेद धैर्य आणि हिम्मत यांचा अविष्कार दाखवणारा असा हा चित्रपट.
Friday, September 13, 2024
प्रवास
चित्रपटाची सुरुवात होते एका आणीबाणीच्या प्रसंगाने. आजोबांच्या छातीमध्ये
अचानक दुखू लागतं. घरामध्ये आजोबा आजी हे दोघंच. आजीला काय करावे ते सुचत
नाही. पण तरी देखील ती धीराने मुसळधार कोसळणाऱ्या पावसामध्ये आजोबांना
हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि ते वाचतात.
या प्रसंगातून आजोबा मात्र एक
मोठा धडा घेतात. आयुष्याची इतकी वर्षे घालवली, पण आता आजवर काय कमावलं?
याचा ते विचार करतात. त्याचे उत्तर त्यांना नकारात्मक येतं. आयुष्याचा सार
काय ते समजत नाही. आपण आजवर किती माणसे कमावली, जी आपल्याला योग्य वेळी
मदतीला येतील? आपण गेल्यावर आपली आठवण किती लोक काढतील? या विचाराने ते
अस्वस्थ होतात. आयुष्याची अखेरची काही वर्षे केवळ औषधाच्या गोळ्यांच्या
भरवशावर घालवत असतात. आयुष्यातील नाकर्तेपन त्यांना ठळकपणे जाणवायला लागते.
यावर ते त्यांच्या पद्धतीने उपाय शोधून काढतात. विशेष म्हणजे दर आठवड्याला
त्यांना डायलिसिस करावे लागत असते. तरीदेखील लोकसेवेचा वसा हाती घेऊन ते
जीवनाची पुढची वर्षे काढायला सज्ज होतात. आपण जेव्हा जाऊ तेव्हा चार लोक
तरी आपल्याला खांदा द्यायला येतील का? या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळते.
एका
वेगळ्या विषयाला हात घालणारा हा चित्रपट म्हणजे 'प्रवास'. अशोक सराफ आणि
पद्मिनी कोल्हापुरे यांनी या आजी-आजोबांची भूमिका केली आहे. केवळ
त्यांच्याच नव्हे तर अन्यही काही प्रसंगातून जीवन जगण्याची गुपिते आपल्याला
समजतात. दोघांचा कसदार अभिनय आणि दमदार कथा आपल्याला शेवटपर्यंत खेळवून
ठेवते. केवळ एकच नाही तर त्याहीपेक्षा अधिक वेळा हा चित्रपट आपण पाहू शकतो.
Wednesday, September 11, 2024
प्रोग्रामर्स डे अर्थात प्रोग्रामरचा दिवस
जगभरामध्ये मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर डे प्रमाणे जवळपास सर्वच व्यावसायिकांचे डेज अर्थात दिवस साजरे केले जातात. अशाच प्रकारे संगणकीय प्रोग्रॅमर्सचा दिवस अर्थात प्रोग्रॅमर्स डे देखील साजरा होतो. यावर्षी प्रोग्रॅमर्स डे १२ सप्टेंबर रोजी आलेला आहे! मागच्या वर्षी हाच दिवस १३ सप्टेंबरला होता, हे विशेष.
अर्थात या दिवशी कोणाचीही पुण्यतिथी अथवा जयंती नाही किंवा या दिवशी प्रोग्रामरच्या आयुष्यातली कोणतेही घटना देखील घडलेली नाही.
सन २००२ मध्ये रशियातल्या पॅरलल टेक्नॉलॉजी या कंपनीतील व्हॅलेंटाईन बाल्ट आणि मायकेल चेरीयाकोव यांनी रशियन सरकारकडे १३ सप्टेंबर हा दिवस प्रोग्रॅमर्स डे साजरा केला जावा, अशी सर्वप्रथम विनंती केली. अर्थात यामागचे त्यांचे तर्कशास्त्र देखील निराळेच होते. १३ सप्टेंबर हा दिवस वर्षातला २५६वा दिवस आहे. तुम्हाला माहीत असेलच की संगणकीय मोजमापे नेहमी दोनच्या घातांक रूपामध्ये मोजली जातात. जसे २, ४, ८, १६, ३२, ६४ इत्यादी. २५६ ही दोनच्या घातांक रूपात असणारी आणि ३६५ पेक्षा कमी असणारी सर्वात मोठी संख्या आहे. म्हणून २५६ वा दिवस प्रोग्रॅमर्स डे म्हणून ओळखला जावा, अशी उभय प्रोग्रामर्सची मागणी होती. संगणकीय परिभाषेतील हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमनुसार २५६ ही संख्या १०० अशी लिहिली जाते.
रशियाच्या दोनही प्रोग्रामर्सने आपल्या मागणीला पाठिंबा मिळावा म्हणून एक ऑनलाईन याचिका देखील दाखल केली होती. तिला जगभरातून बहुसंख्य प्रोग्रामरचा पाठिंबा मिळाला. शिवाय रशियाचे तत्कालीन अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी देखील यावर ऑनलाईन सही केली होती! अखेरीस सन २००९ मध्ये रशियाच्या दूरसंचार विभागाने या मागणीस मान्यता दिली आणि तेव्हापासून हा दिवस प्रोग्रॅमर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. हा दिवस दर चार वर्षांनी अर्थात लीप वर्षांमध्ये १२ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
विशेष म्हणजे चीनमध्ये देखील प्रोग्रॅमर्स डे साजरा होतो. परंतु त्यांचा प्रोग्रामर्स दिवस हा २४ ऑक्टोबर या दिवशी असतो. ऑक्टोबर हा दहावा महिना. म्हणून दिवस आणि महिना यांची जोड १०२४ अशी होते. ही संख्या देखील दोनच्या दहाव्या घातांकात आहे. अर्थात लीपवर्ष असले तरी देखील चीनचा हा प्रोग्रॅमर्स डे बदलत नाही!
रशियाच्या जवळील बहुतांश देशांमध्ये १२ किंवा १३ सप्टेंबर या दिवशी सुट्टी दिली जाते.... अर्थात प्रोग्रामर्सला! परंतु रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनियन प्रोग्रामर्सनी या दिवसावर बहिष्कार टाकला होता, जो आजही कायम आहे.
--- तुषार भ. कुटे
डॉट कॉम मॉम
कोकणातल्या एका छोट्या गावांमध्ये एक आजी आजोबा राहत आहेत. त्यांचा मुलगा
अनेक वर्षांपासून अमेरिकेमध्ये नोकरीच्या निमित्ताने स्थायिक आहे. एक दिवस
तो आपल्या आईला अमेरिकेमध्ये राहण्यासाठी बोलावतो. भारतीय आणि अमेरिकन
संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे. पेहराव, आचार विचार आणि जीवन पद्धती अतिशय
भिन्न आहेत. याच कारणास्तव या भारतीय आजीला अमेरिकेमध्ये मनस्ताप सहन
करावा लागतो. प्रत्येक गोष्ट ती भारतीय नजरेतून करायला जाते. आणि त्यातूनच
विविध समस्या तयार होतात. याच कारणास्तव सुनेचे सहकार्य देखील तिला लागत
नाही. अतिशय खिन्न मनाने ती पुन्हा भारतामध्ये येते.
तिच्या शेजारी
राहणारी एक मुलगी देखील अमेरिकेमध्येच राहत असते. तिला जेव्हा आपल्या या
मावशीची गोष्ट समजते तेव्हा विषय व्यवस्थित समजावून घेऊन ती मार्गदर्शन
करते. आणि यातूनच अमेरिकन जीवनपद्धतीत मिसळू शकणारी डॉट कॉम मॉम तयार होते.
ती पुन्हा अमेरिकेला जाते आणि तिथल्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करते.
त्यात यशस्वी देखील होते. अशा यशस्वी आजीची कहाणी डॉट कॉम मॉम या
चित्रपटांमध्ये दाखवलेली आहे.
काहीशी सत्य परिस्थितीशी जुळणारी आणि
बऱ्याच घरांमध्ये अनुभवता येणारी ही गोष्ट आहे. दोन वेगवेगळ्या जीवन पद्धती
जुळवून घेताना कशा अडचणी येऊ शकतात हे चित्रपटांमध्ये पाहता येते. सर्वच
गोष्टी प्रभावी झालेल्या आहेत असे नाही पण कथेनुरूप वाहत जाणारा चित्रपट
म्हणूनतो निश्चितच पाहता येईल.
Friday, September 6, 2024
माधुरी
ही कथा आहे त्या दोघींची. दोघींची म्हणजे आईची आणि मुलीची. मुलीने तिच्या
तारुण्यात पदार्पण केले आहे. परंतु आई देखील तिच्याच वयाची आहे. अर्थात
शरीराने नाही तर मनाने.
मागच्या काही वर्षांपासून मानसिक धक्का
बसल्यामुळे आईला भूतकाळातील मागील वीस वर्षे आठवतच नाही. तिला अजूनही असं
वाटते की ती केवळ अठरा वीस वर्षांची आहे. आणि मुलगी देखील तिच्याच वयाची.
अशा आईला संभाळणे म्हणजे महाकठीण काम. पण तरीदेखील ती तिच्या पद्धतीने आईला
सांभाळत आहे आणि अनेक संकटांना तोंड देखील देत आहे.तिची आई एकेकाळी अशी
नव्हती. ती महाविद्यालयातील एक नामांकित प्राध्यापिका होती. पण आज
परिस्थिती वेगळी आहे. तिला समजून घेणारा तिचा एक विद्यार्थी देखील
तिच्यासोबत सातत्याने असतो. तो देखील हुशार आहे.
एक दिवस एक माणूस
उपचार तज्ञ त्यांच्या आयुष्यात येतो. तो त्याच्या पद्धतीने सदर केस
हाताळण्याचा प्रयत्न करतो.. यातून मुलीला आपली आई समजत जाते. कधी कधी तिचं
वागणं बोलणं देखील पटतं. आई कशी होती आणि आज ती अशी का झाली? याचा देखील
तिला उलगडा होत जातो. एका अर्थाने ती आपल्या आईला समजून घ्यायला लागते.
त्यांच्यामध्ये एक नवं नातं तयार होतं. हे नातं तयार होतानाचे प्रसंग
दिग्दर्शकाने छान रंगविलेले आहेत. ते कुठेच कंटाळवाणे वाटत नाही. एका
वेगळ्या नात्याची गोष्ट हा चित्रपट सांगून जातो.
आईची अर्थात माधुरीची
मध्यवर्ती भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारलेली आहे. बहुरंगी भूमिका
करण्यात त्यांचा हातखंडा आहेच. आणि तो या चित्रपटात देखील दिसून येतो.