Friday, January 22, 2021

इंटरटेन्मेन्टचा मराठी संघर्ष

मागच्या वीस वर्षांमध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रात अनेक वाहिन्यांचा प्रवेश झाला. झी मराठी, कलर्स मराठी (पूर्वीचे ई टीव्ही मराठी), स्टार प्रवाह, सोनी मराठी सह चित्रपट, संगीत आणि वृत्त या विषयाला वाहिलेल्या अनेक वाहिन्या मराठीमध्ये आहेत. मागच्या तीन-चार वर्षांपासून मुख्य मनोरंजक वाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध चालल्याचे दिसते. प्रेक्षकांना काय दाखवावं? यापेक्षा प्रेक्षकांना काय हवं? याकडे सर्वच वाहिन्या लक्ष देताना दिसत आहेत. अर्थात यामध्ये टीआरपी नावाच्या गोंडस नावाचा मोठा वाटा आहे. प्रत्येकालाच टीआरपी मिळवायचा आहे. ज्यामुळे जाहिराती वाढतील आणि त्यांचे उत्पन्नही वाढू शकेल. आपण दाखवत असलेल्या मालिकांमधून नक्की कोणता संदेश जातो, याची वाहिन्यांना काहीही पडलेली नाही. असेच अनेक मालिकांमधून दिसून येते.
अनेक वर्षांपासून चालू असलेल्या सासू-सुनेच्या संघर्षाच्या मालिका आजही प्रेक्षकांची पाठ सोडायला तयार नाहीत. याचे कारण एकच आहे की, प्रेक्षकांनाही तेच हवे आहे. अनेक मालिका नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्या जातात. तरीही त्यांचा टीआरपी अधिक असल्याने सदर वाहिनी अजून नाटकीयरित्या मालिकेला सादर करते. मागील २० वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलेल्या झी मराठी चे साम्राज्य नुकतेच खालसा झाले. आज स्टार प्रवाह ही वाहिनी पहिल्या क्रमांकावर आहे. एकेकाळी विविध नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन मालिका तयार करणारी झी मराठी आज नावीन्याच्या शोधात आहे. याचा अर्थ असा नाही की स्टार प्रवाह वरील मालिका या उत्कृष्ट आहेत. वर सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांना जे हवे ते ही वाहिनी सुद्धा देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व वाहिन्यांच्या सर्वाधिक प्रेक्षक या महिला आहेत. त्यामुळे महिलाकेंद्रित मालिका आणि महिलांच्या संघर्षावर आधारित मालिका सर्वात जास्त चालतात. स्टार प्रवाह चा विचार केला तर त्यांच्या प्रत्येक मालिकेमध्ये अभिनेत्री केंद्रित पटकथा आढळून येते. लग्नाच्या २५ वर्षानंतर नवऱ्याकडून फसवली गेलेली स्त्री, काळ्या रंगामुळे सासूचा द्वेष पत्करणारी स्त्री, आपल्या अधिक शिक्षणामुळे सासू कडून त्रास होणारी स्त्री, एकेकाळी मोलकरीण असणारी आणि आता मोठ्या घराची सून झालेली स्त्री, तसेच काहीही न बोलता येणारी स्त्री, अशा विविध स्त्रिया स्टार प्रवाहच्या मालिकांत मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळेच स्त्रियांचा असा वेगवेगळा संघर्ष नाटकीयरित्या या मालिकांमधून सादर केला जातोय आणि त्यास टीआरपीच्या रुपाने मोठा प्रतिसादही मिळत आहे.
मागच्याच महिन्यामध्ये सोनी मराठी वरील "सावित्रीज्योती" ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरील मालिका टीआरपीच्या अभावी बंद पडली. याचा अर्थ असा की प्रेक्षकांना खऱ्या सावित्रीचा संघर्ष बघायचा नाहीये. त्यांना आधुनिक स्त्री किती पिडलेली आहे, यात अधिक रस आहे असे दिसते. तसं पाहिलं तर सोनी मराठी वाहिनीवर बऱ्याच चांगल्या मालिका प्रदर्शित होतात. पण इतरांच्या तुलनेत ही वाहिनी नवी असल्यामुळे त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. हलकीफुलकी कथा असणाऱ्या मालिका तर आज काल कोणत्याच वाहिनीवर पाहायला मिळत नाही. ही शोकांतिका आहे. याउलट अंधश्रद्दा पसरविणाऱ्या, जादू करणाऱ्या बाबा-बुवांच्या मालिकांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. यावरूनच प्रेक्षकांचाही रस आता नक्की कशात आहे, हे स्पष्ट होतंय आणि ते निश्चितच दुर्दैवी आहे.




 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com