Thursday, February 4, 2021

माचीवरला बुधा - गो. नी. दांडेकर

शहरीकरणाचा वेग वाढला. प्रत्येकालाच शहराची ओढ वाटते. त्यामुळे जीवन धकाधकीचं होत चालले आहे. अशातच आपण गावाकडचं जीवन विसरत चाललोय. पण या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला कधीतरी विश्रांती हवी असतेच. शहरातलं सातत्याने धावत जाणारे जीवन अनेकदा नकोसं वाटतं. अशावेळी आपण गावाकडे रमून जातो. मनाला शांतता हवी असते. सुख, समाधान आणि शांती यांचा संगम ग्रामीण जीवनामध्ये अनुभवता येतो. या सर्वांची अनुभूती देणारा प्रतिनिधी म्हणजे बुधा होय. याचीच गोष्ट गो. नी. दांडेकरांनी "माचीवरला बुधा" या कादंबरीमध्ये रेखाटली आहे. बुधाचे जीवन अनेक वर्षे मुंबईमध्ये गेले. मजुरीची कामे करून मुंबईच्या वेगवान जीवनामध्ये त्याने अनेक वर्षे काढली आहेत. एक दिवस तो आपल्या मूळ गावी अर्थात राजमाचीला परत येतो. त्याच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. इथला परिसर त्याला मन:शांती मिळवून देतो. माणसांपासून दूर राहावं, असं त्याला वाटत राहतं. मग तो निसर्गाला तसेच इथल्या प्राणी आणि पक्षांना आपले मित्र बनवतो. त्यांच्याशी संवाद साधत राहतो. अनेकदा हा संवाद दुतर्फा तर कधीतरी तो एकतर्फी असतो. पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव आपला मित्र आहे, असं त्याला वाटत राहतं. घरातल्या कुत्र्याला जितका जीव लावतो तितकाच जीव तो झाडावरच्या खारिला देखील लावतो. मनोभावे शेती करत असतो. त्यात रममाण झालेला असतो. जीवन त्याला सुखाने जगायचं असतं. त्यातही पुन्हा तोचतोचपणा येतो. अशा सर्वार्थाने "माचीवरला बुधा" या कादंबरीमध्ये आपल्याला भेटतो. त्याचं जीवन जवळून अनुभवता येतं. त्याच्या मनातली घालमेल समजते. मुंबईतलं दैनंदिन जीवन संपून तो नव्याने ग्रामीण जीवन अनुभवत असतो. तो एकटाच असतो. पण आजूबाजूचे प्राणी पक्षी आणि झाडेही त्याला आपलंसं करतात. तो त्यांनाच मित्र बनवतो. कित्येक दिवस त्याचा माणसांशी संवाद होत नाही. कधीतरी गावाजवळच्या दरीत सैनिकांचा तळ पडलेला असतो. त्यांच्याशी तो अतिशय दुरून एकाकी संवाद साधत राहतो. मुंबईहून त्याचा मुलगा त्याला न्यायला येतो. पण बुधाची पावले मुंबईच्या दिशेने पडता-पडता परत मागे फिरतात. त्याने पाळलेला कुत्रा त्याला शेवटपर्यंत साथ देतो. बकऱ्यांना ही तो जीव लावतो. परंतु अखेरीस आयुष्याशी छोटीसी झुंज देऊन तो जगाचा निरोप घेतो. अशी साधी आणि सरळ कथा गोनीदांनी या कादंबरीमध्ये मांडलेली आहे. शहरात जीवन व्यतीत करणाऱ्यांना ती निश्चितच पुढे प्रेरणा देणारी ठरेल, अशी दिसते. जीवनात सतत काबाडकष्ट करायचे का की त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा? या प्रश्नाचे उत्तर थोड्या प्रमाणात का होईना ही कादंबरी आपल्याला देते.2 comments:

to: tushar.kute@gmail.com