Saturday, February 26, 2011

पुन्हा अनुभवाचीच सरशी


विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुरुवातीलाच अनेक सामने एका भक्कम व एका दुबळ्या संघांमध्ये झाले. त्यामुळॆ त्यात फारशी उत्सुकता ताणली गेली नाही. पण, या आठवड्यात झालेल्या हॉलंड व आयर्लंडच्या सामन्यांमध्ये थोडीशी चुरस दिसून आली. इंग्लंड व हॉलंडमध्ये झालेल्या सामन्यात हॉलंडने इंग्लंडला चांगलीच धडक दिली होती .पण, हॉलंड मात्र ऐन वेळी अनुभवात कमी पडला. त्यामुळॆ त्यांना सामना जिंकता आला नाही. फलंदाजांच्या मेहनतीचे चीज गोलंदाजांना मात्र करता आले नाही. अशाच प्रकारे कालच्या बांग्लादेश वि. आयर्लंड मध्ये झालेल्या सामन्यात बांग्लादेशला आपल्या अनुभवाच्या जोरावरच विजय प्राप्त करता आला, हे मान्य करायलाच हवे.
बांग्लादेशचा संघ आता लिंबूटिंबू राहिलेला नाही, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. गतवर्षी त्यांनी न्युझीलंडला सरळ सरळ व्हाईटवॉश देत धूळ चारली होती. शिवाय विश्वचषकाच्या उद्घाटनाच्या सामन्यातही भारताला त्यांनी मोठी टक्कर दिली होती. शिवाय बांग्ला टायगर्सला घरच्या मैदानावर खेळत असल्याचा फायदाही होताना दिसत आहे. याची प्रचिती त्यांच्या दोन्ही सामन्यात आली. १०० पेक्षा अधिक सामने खेळलेले त्यांच्या संघात अनेक खेळाडू आहेत. २००० साली कसोटी दर्जा मिळाल्यानंतर त्यांच्या खेळाच्या दर्जात बरीच सुधारणा झालेली आहे. कसोटी संघांसोबत खेळण्याचा बांग्लादेशला मोठा फायदा मिळाला. असे असले तरी, त्यांच्या संघात २८ वर्षीय अब्दूर रझ्झाक हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे! म्हणजेच बांगला टायगर्स हे सर्व संघांमध्ये सर्वात तरूण खेळाडू आहेत! याचा फायदा बांगला खेळाडूंना आगामी सामन्यात नक्कीच होईल.
कालच्या सामन्यात आयर्लंडने आपले गोलंदाजीतील कसब दाखवून बांगलादेशला बॅक्फूटवर आणून सोडले होते. मागील विश्वचषकात त्यांनी बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही पराभवाची धूळ चारली होती. तीच पुनरावृत्ती या वेळी होते की काय, अशीच शंका पहिल्या डावानंतर वाटू लागली. परंतू, घरच्या मैदानावर खेळताना बांग्लादेशने आपली नाचक्की होऊ दिली नाही. दुसऱ्या डावात पहिल्या १०० धावांपर्यंत जरी सामन्याचे पारडे कोणा एका बाजूला कलले नव्हते तरी बांगला गोलंदाजांनी ठराविक कालावधीत बळी घेत सामन्यावर पकड प्राप्त केली. कसोटी खेळणाऱ्या कोणत्याही संघाची जी नीती असते तीच बांग्लादेशने या वेळी वापरली. व त्यात ते यशस्वीही झाले. दुसरीकडे आयर्लंड मात्र दुसऱ्या डावात एकेक पाऊल मागे टाकत गेले. बांग्लादेशी जल्लेषाचा परिणामही कदाचित आयर्लंडच्या मानसिकतेवर झाला असेल. परंतु, पहिल्याच सामन्यात त्यांनी विजयाची संधी गमावली. त्यामुळॆ आता हॉलंड विरुद्ध आयर्लंड सामना पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरेल...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com