Sunday, March 11, 2012

संगणकाचे प्रकार


मित्रांनो, मी सध्या नितीन प्रकाशनाच्या ’ज्ञानसागरातील शिंपले’ या पुस्तकांच्या श्रुंखलेतील पुढच्या पुस्तकाचे लेखन करित आहे. त्यात समाविष्ट असलेल्या एका लेखाचीच ही झलक-


७.      संगणकाचे प्रकार
संगणकाच्या आकारानुसार तसेच वेगानुसार त्याचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात- सुपर कॉम्प्युटर, मेनफ्रेम कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर व मायक्रो कॉम्प्युटर इत्यादी. सुपर कॉम्प्युटर हा सर्वात वेगवान संगणक होय. हवामान अंदाज, उपग्रह प्रक्षेपण, मोबाईल कम्युनिकेशन यासारख्या विशिष्ट कामांकरिता हे संगणक वापरले जातात. त्यांचा वेग हा खूप जास्त असतो. तो ’फ्लॉप्स’ या एककात मोजला जातो. शासकिय संस्थांव्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांमध्येही सुपर कॉम्प्युटर वापरले जातात. सीडॅकने तयार केलेला. ’परम’ हा भारताचा पहिलाच महासंगणक अर्थात सुपर कॉम्प्युटर होता. अशा संगणकांचा हाताळण्यासाठी विशिष्ट संगणक प्रणालीची गरज असते. सुपर कॉम्प्युटर पेक्षा आकाराने लहान व वेगाने कमी असणारा संगणक म्हणजे मेनफ्रेम कॉम्प्युटर होय. १९६० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या संगणकांची निर्मिती झाली होती. आजही अनेक कंपन्यांकडे असे संगणक उपलब्ध आहेत. जिथे सुपर कॉम्प्युटरची गरज नसून अधिक कार्य करायचे असते, अशा ठिकाणी मेनफ्रेमचा वापर होतो. मेनफ्रेमपेक्षाही कमी आकाराचा व कमी वेग असणारा संगणक म्हणजे मिनी कॉम्प्युटर होय. आज अशा प्रकारचे संगणक वापरले जात नाही. ८० च्या दशकात शेवटचा मिनी कॉम्प्युटर वापरण्यात आला होता. मेनफ्रेमपेक्षा कमी आकाराचा संगणक तज्ञांनी बनविल्याने त्याला मिनी कॉम्प्युटर असे नाव दिले गेले होते. आज मिनी कॉम्प्युटरचे नामोनिशान केवळ संग्रहालयांत दिसून येते. आपल्या घरी किंवा महाविद्यालयांत जो संगणक वापरण्यात येतो त्याला मायक्रो कॉम्प्युटर असे म्हणतात. सन १९८० नंतर वैयक्तिक संगणकाचे युग अवतरल्यावर त्याला मायक्रो कॉम्प्युटर असे नाव दिले गेले. पूर्वीच्या खोलीएवढ्या मोठ्या संगणकांपेक्षा हा संगणक अतिशय लहान असल्याने त्याला हे नाव सार्थक होते. मायक्रो कॉम्प्युटरचे डेस्कटॉप व लॅपटॉप असे दोन प्रकार पडतात. डेस्कटॉप म्हणजे टेबलावर व लॅपटॉप म्हणजे मांडीवर ठेवून वापरता येण्यासारखा कॉम्प्युटर होय. आता हाताच्या तळव्यावर मावेल असा पामटॉप नावाचा कॉम्प्युटरही लोकप्रिय होत आहे. काही वर्षांनी फिंगरटॉप नावाचे संगणक बाजारात आले तर आश्चर्य वाटायला नको.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com