Sunday, September 2, 2012

मुलं कॉपी का करतात?

सन १९९३ असावं. त्या वेळेस मी पाचवीला होतो. कॉपी अशा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला होता. मराठी माध्यमातून शिकत असल्याने अश्या प्रकारचे शब्द कधितरीच कानी पडायचे. दुसऱ्याचं पाहून लिहिणं म्हणजे कॉपी करणं, हे पाचवीला असताना मला पहिल्यांदा समजलं.
काही मुलांना कॉपी करण्याची कला जन्मत्:च अवगत असते, असं मला त्या काळी काही मित्रांकडे बघुन वाटायचं. केवळ अभ्यास करूनच पास होता येतं, अशी त्या काळची माझी समजूत होती. पण, काही कॉपीबहाद्दर मित्रांना पाहून ती समजूत  बदलून गेली. छोट्या-छोट्या चिठ्ठ्या करून काही मुलं शर्टच्या किंवा पॅंण्टच्या खिश्यात लपवायची. पर्यवेक्षकाच्या नकळत ती परिक्षेच्या काळात कॉपी म्हणून वापरली जात असे. कदाचित, पर्यवेक्षकही अश्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करित असावे. त्यामुळे मलाही असू वाटू लागलं होतं की, आपणही कॉपी करून पाहावं. मग, भूगोलाचे पुस्तक उघडले व आपल्या देशातील राजधान्यांची नावं एका छोट्या कागदावर लिहिली. ती चिट्ठी खिशात ठेवून दिली. पण, परिक्षा खोलीत प्रवेश कराताना मात्र अंगाला दरदरून घाम फुटला. अशी कॉपी करण्याची कल्पनाच किती भयंकर आहे, याची जाणीव मला पहिल्याच वेळी व शेवटचीही झाली. पटकन खिशातील चिट्ठी काढून फेकुन दिली व मनाला हायसे वाटले. स्वत:चा स्वाभिमान राखल्याचे समाधानही वाटले. विशेष म्हणजे त्या चिट्ठीत लिहिलेला मजकूर आजही मला पाठ आहे. भारतातील कोणत्याही राज्याची राजधानी मी सांगू शकतो! त्यानंतर आजतागायत कॉपीचा विचारही मनात आला नाही. कॉपी करणे म्हणजे आपला स्वाभिमान गमावणे, हे त्यानंतर माझ्या पक्के मनात रूजुन बसले.
पाचवीपासूनच मी प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत होतो. मी स्वत:च्या अभ्यासाने प्रथम क्रमांक मिळवतो, याचे फार समाधान वाटायचे. काही परिक्षांना बाक जवळ जवळ असल्याने शेजारच्या मुलाच्या उत्तरपत्रिकेतील मजकूर सहज दिसायचा. पण, मला माहित होते की, त्या मुलांपेक्षा माझाच अभ्यास चांगला आहे मग मी का त्याची उत्तरे पाहून लिहू? कदाचित यास माझ्यातील उपजत स्वाभिमानाची पेरणी कारणीभूत होती!
आज शिक्षकी पेशात कार्यरत असल्याने बहुतांश वेळा कॉपी या शब्दाशी संबंध येतो. कॉपी करणे का मुलांचा स्थायीभावच आहे, असं कधी कधी वाटू लागतं. त्यातल्या त्यात आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तर या गोष्टी खूप सोपस्कर होऊ लागल्या आहेत. प्रयोगशाळेतील प्रात्याक्षिकांच्या वेळी बऱ्याचा ध्यानात येते की, विद्यार्थ्यांने कॉपी केली आहे. त्यावेळेस कधी कधी स्वत:चीच कीव करावीशी वाटते की, कॉपी करू नका, स्वत:ची बुद्धी वापरा असे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा सांगतो, तरी पण काहीजण आपली वाट का सोडत नाही? पौगंडाव्यस्थेतील मुलांचा स्वाभिमान बिंदू हा सर्वोच्च पातळीवर असतो, असे म्हणतात मग हा स्वाभिमान बिंदू कॉपी करताना का लागू पडत नाही, ही आश्चर्याची बाब वाटते. आपल्या मेंदूचा व विचारक्षमतेचा वापर आपण करून आपण शिक्षण घेवू, याचा विद्यार्थ्यांनी स्वाभिमान बाळगायला हवा. उद्या खऱ्या स्पर्धेच्या जगात प्रवेश केल्यानंतर त्यांना त्यांची हीच सवय प्रगती पथावर मार्गक्रमण करण्यास मदत करणार आहे. अनेकदा त्यांचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टीकोण चुकीचा वाटतो. स्वत:च्या कार्यक्षमतेवर ते स्वत:च प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात. हे प्रश्नचिन्ह त्यांनी बाजूला सारून स्वतंत्र विचार करण्याची सवय जोपासायला हवी. जगात कोणतेही दोन जण सारख्या पद्धतीने कधीच विचार करत नाहीत. त्यामुळे, कोणत्याही दोघांची निर्मीती हुबेहूब सारखी असणे शक्यच नाही! स्वत:ची निर्मीती अभिमानाने दाखविण्यासारखा दुसरा आनंद कदाचित आपण उपभोगू शकत नाही.
माहिती तंत्रज्ञान युग हे निर्मीती कलेचा आधार धरून मार्गक्रमण करत आहे. त्यात स्वत:चे स्थान बनवून व ओळख निर्माण करायची असेल तर दुसरऱ्याचे कॉपी करण्यापेक्षा स्वत:ची क्षमता ओळखायला शिका. दुसऱ्यापेक्षा मी किती उजवा आहे, हे तुम्ही तुमच्या निर्मीतीने दाखवून देऊ शकता. दुसऱ्याचे बोट धरून नदी पार करण्यापेक्षा स्वत:च्या हिमतीवर तीच नदी पार करणे, म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवणे व तोच आत्मविश्वास वृद्धिंगत करणे होय. 
’कॉपी’ म्हणजे एक प्रकरची चोरीच आहे. चोरी करणे म्हणजे केव्हाही गुन्हाच! असे गुन्हे करण्यापेक्षा निसर्गाचे मानवाला दिलेले वरदान अर्थात मेंदूचा वापर करणे, केव्हाही चांगलेच, असे मला वाटते...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com