Tuesday, June 8, 2021

मराठीतून अभियांत्रिकी

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे यावर्षीपासून भारतातील विविध १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रादेशिक भाषांमधून अभ्यासक्रम चालविण्यासाठी प्रस्ताव पाठविलेले आहेत. मागील वर्षीच या विषयाची चर्चा सुरू झाली होती. अखेर ती अंतिम टप्प्यात आली. याबद्दल तंत्रशिक्षण परिषदेचे आभार मानायला हवे. काही महिन्यांपूर्वी तंत्रशिक्षण परिषदेने द्वितीय ते चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यात त्यांना असे आढळून आले की ४२ टक्के विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा आहे. त्यातूनच नवीन प्रस्ताव तयार झालेले आहेत. भारतातील मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि हिंदी भाषिक प्रदेशांमधून प्रादेशिक भाषेमध्ये अभियांत्रिकी शिक्षण लवकरच सुरू होणार आहेत. मराठी भाषेत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातून पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (सीओईपी) या दोनच महाविद्यालयांचे प्रस्ताव आहेत. विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहराने पुन:श्च मराठी भाषेचे देखील माहेरघर आहे, हे सिद्ध केले आहे. शिवाय या निमित्ताने एका नव्या शैक्षणिक अध्यायाला पुण्यातून प्रारंभ होणार आहे, असे दिसते. दोन्ही महाविद्यालये गुणवत्तेच्या बाबतीत अतिशय सरस अशीच आहेत. त्यामुळे मराठीतून अभियांत्रिकी शिक्षण देताना ते सर्वोत्तमच असेल, अशी खात्री बाळगता येऊ शकते.
युरोप तसेच पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये तंत्रशिक्षण मातृभाषेतूनच दिले जाते. त्यामुळे देशांतर्गत प्रगतीला वेगाने चालना मिळत आहे. भारतामध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. आपल्याला युरोपीय व अमेरिकन देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळेच इंग्रजीतून अभियांत्रिकी शिक्षणाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. अनेकांचे असेही म्हणणे असते की, इंग्रजीतून शिकलं की फाडफाड बोलता येतं! परंतु हा भ्रम आहे. आजही इंग्रजीतून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या बहुतांश, किंबहूना तीन चतुर्थांश मुलांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नाही. शिवाय अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये असल्यामुळे बहुदा तो समजतही नाही. याच कारणास्तव ज्ञानाधारित पिढ्या आपल्या देशात तयार होताना दिसत नाहीत. बहुतांश मुले केवळ घोकंपट्टी करून अभियांत्रिकीच्या परीक्षा पास होत असतात. मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण मिळाल्याने किमान त्यांना संकल्पना समजण्यास तरी निश्चितच मदत होईल. बाकी फाडफाड इंग्रजी बोलणे, हे ज्याचे त्याच्या हातात आहे. अनेकांना असेही वाटते की, इंग्रजीतल्या अभियांत्रिकी संकल्पनांना मराठीमध्ये भाषांतरित कराव्या लागतील. परंतु तसे करण्याची आवश्यकता वाटत नाही. युरोपातील स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज भाषांमध्ये अभियांत्रिकीच्या संकल्पना जशाच्या तशा मांडलेल्या आहेत. भारतीय भाषांमध्येही हाच प्रयोग चालू ठेवावा लागेल. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित समजू शकतील. 

 
 
इंग्रजी ही जगाची भाषा आहे, असे सांगून केवळ त्याच भाषेतून शिक्षण घेणे गरजेचे आहे ही समजूत लवकरच बाद होईल, असे दिसते. शेवटी काय प्रगती करण्यासाठी भाषा जरी महत्त्वाची असली तरी त्याहीपेक्षा ज्ञान महत्त्वाचे आहे. मागील काही वर्षांपासून अनेक तंत्रज्ञानावर मी मराठीमध्ये लेख पुस्तके लिहिली तसेच व्हिडिओ देखील तयार केलेले आहेत. अन्य इंग्रजी भाषेतील साधनांपेक्षा मराठी भाषेतील साधनांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. शिवाय सर्वांनाच या संकल्पना व्यवस्थित समजत आहेत. आपल्या मातृभाषेतूनच प्रत्येकाला ज्ञान सहज मिळू शकते. त्यामुळे तंत्रशिक्षण परिषदेच्या या नव्या निर्णयाचे सहर्ष स्वागत करायला हवे.

Ref. Times of India, 6th June 2021.

4 comments:

to: tushar.kute@gmail.com