Monday, June 29, 2020

२९ जून - भारतीय सांख्यिकी दिवस

२९ जून हा भारतीय सांख्यिकी दिवस म्हणून ओळखला जातो.  प्रशांत चंद्र महालनोबिस या आधुनिक भारतीय सांख्यिकीच्या जनकाचा हा जन्मदिवस होय. त्यांचा जन्म २९ जून १८९३ रोजी कोलकाता येथे झाला व मृत्यू २८ जून १९७२ रोजी कोलकाता येथे झाला.


त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २००६ पासून २९ जून हा दिवस भारतीय सांख्यिकी दिवस म्हणून ओळखला जातो. सांख्यिकी शास्त्रला तसं भारतीय समाजात फारसे स्थान नाही. परंतु जे आहे ते महालनोबीस यांच्या मुळेच, असं म्हणायला काहीच हरकत नाही. काही वर्षांपूर्वी 'मशीन लर्निंग' विषयाचा अभ्यास सुरू केला तेव्हा "महानॉलॉबीस डिस्टन्स" या संज्ञेबद्दल मला माहिती मिळाली. गुगलवर सर्च केल्यानंतर समजले की हे महान भारतीय गणितज्ञ आहेत. त्यांच्याच नावाने हा फॉर्मुला तयार करण्यात आलेला आहे. संख्यिकी शास्त्राची फारशी माहिती भारतीयांना नसल्यामुळे महानॉलॉबीस यांच्याबद्दलही फारशा लोकांना माहिती नाही. 


महानॉलॉबीस हे पहिल्या भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य होते. विशेष म्हणजे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सांख्यिकी सल्लागार मंडळाचे अध्यक्ष होते. १९३१ मध्ये त्यांनी कोलकाता येथे 'इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट' म्हणजेच 'भारतीय सांख्यिकी संस्थान'ची स्थापना केली. त्यानंतर सांख्यिकी संस्थानाने विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेती आणि पूर नियंत्रण यावर सांख्यिकी शास्त्राद्वारे प्रयोग करण्यात आले. शिवाय औद्योगिक उत्पादन वाढ व बेरोजगारी कमी करण्यासाठी सांख्यिकी शास्त्राचा या संस्थेने चांगला उपयोग करून घेतला. याशिवाय स्वातंत्र्यानंतर दरडोई उत्पन्न शोधण्यासाठी स्थापल्या गेलेल्या संस्थेचे अध्यक्षही महानॉलॉबीस हेच होते. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांच्या आधारावर द्वितीय पंचवार्षिक योजनेत या माहितीची चांगलीच मदत झाली. सांख्यिकी शास्त्राचा वापर कशा प्रकारे करावा? हे त्यांनी उत्तम पद्धतीने दाखवून दिले.
महानॉलॉबीस हे रवींद्रनाथ टागोर यांचे चाहते होते. आपल्या आयुष्यातले दोन महिने त्यांनी कोलकत्यात शांतिनिकेतन याठिकाणी घालवलेले आहेत. ते ते टागोरांच्या विश्वभारती संस्थेचे सचिवही होते. शिवाय टागोरांसोबत त्यांनी अनेकदा परदेश प्रवासही केला आहे.


जगातल्या विविध सांख्यिकी संस्थांचे ते सदस्य होते. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, रॉयल सोसायटी, इकॉनोमेट्रिक सोसायटी, पाकिस्तान स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, रॉयल सोसायटी ऑफ स्टॅटिस्टिक्स, अमेरिकन
स्टॅटिस्टिक्स असोसिएशन, किंग्स कॉलेज, केंब्रिज व रशियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे ते सन्माननीय सदस्य होते.

महानॉलॉबीस यांना आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले. त्यात वेल्डन मेमोरियल प्राईझ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, दुर्गाप्रसाद खेतान सुवर्णपदक, श्रीनिवास रामानुजन सुवर्णपदक व भारताचा द्वितीय क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्मविभूषण १९६८ साली त्यांना प्राप्त झाला. 
सन २०१८ मध्ये यांच्या १२५ व्या जयंतीदिनी भारत सरकारने त्यांच्या प्रतिमेचे नाणे तयार केले होते. शिवाय याच वर्षी गुगलने डूडल द्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. सन २०१५ मध्ये श्रीनिवास रामानुजन यांच्या आयुष्यावर तयार झालेला चित्रपट 'दि मॅन हू न्यू इन्फिनिटी' यामध्येही महानलोबीस यांच्या नावाची एक चरित्र भूमिका आढळून येते.
अशा महान सांख्यिकी तज्ञाला आमचा प्रणाम!!!

 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com