Friday, March 11, 2011

टॉरेन्ट म्हणजे काय?

इंटरनेटवरून विविध फाईल विशेषत: चित्रपट व नवनवे गेम्स डाऊनलोड करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून लोकप्रिय झालेला प्रकार म्हणजे टॉरेन्ट होय. हे टॉरेन्ट म्हणजे काय? ते जाणून घेऊयात.

आकाराने जास्त असलेल्या (साधारणत: जीबीमध्ये) असलेल्या फाईल्स इंटरनेटवरुन डाउनलोड करण्यासाठी बरेच निरनिराळे सॉफ्टवेयर्स वापरले जातात. परंतु, अशा सॉफ्टवेयर्सने फाईल डाऊनलोड करताना मोठी इंटरनेट बॅंडविड्थ वापरली जाते. या कारणाने इंटरनेटचा वेग कमी होतो. त्याला पर्याय म्हणून टॉरेन्ट हा नवा इंटरनेट प्रोटोकॉल तयार करण्यात आलेला आहे. तो साधा डाऊनलोडर म्हणूनच काम करतो. परंतू, एका वेगळ्या प्रकारे तो कार्य करतो. शिवाय त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ’पॉप-अप ऍडव्हर्टाइझिंग’चा त्रासही होत नाही. टॉरेन्ट हे पूर्णत: व्हायरस फ्री सॉफ्टवेयर म्हणून काम करते. टॉरेन्टद्वारे फाईल डाऊनलोड करण्यासाठी ’बिटटॉरेन्ट, ’म्युटॉरेन्ट’ व ’अझ्युरियस’ ही लोकप्रिय सॉफ्टवेयर्स वापरली जातात. http://www.download.com वरून ती मोफत डाऊनलोड करता येतात. टॉरेन्टचे कार्य पाहण्यापूर्वी सर्वसाधारण फाईलचे डाऊनलोड इंटरनेटद्वारे कशा प्रकारे होते, ते पाहूयात.

इंटरनेटवरून परंपरागत डाऊनलोडिंग

ही ’क्लायंट-सर्व्हर’ डाऊनलोडिंग तंत्राद्वारे केली जाते. ती काहीशी अशा प्रकारे कार्य करते:

1. आपण इंटरनेटवर आपल्याला हवे ते पेज उघडतो वर त्यातील डाऊनलोड लिंकवर क्लिक करतो.

2. आपण वापरत असलेला वेब ब्राऊजर (जसे, इंटरनेट एक्सप्लोरर, मॉझिला फायरफॉक्स) हा सर्व्हरला (जिथे डाऊनलोड करायची फाईल ठेवलेली असते) त्याच्या फाईलची कॉपी पाठवायची विनंती करतो.

3. नंतर HTTP’ (Hyper Text Transfer Protocol) वा ’FTP’ (File Transfer Protocol) द्वारा ती फाईल सर्व्हरवरून आपल्या कॉम्प्युटरवर पाठविली जाते. शेजारच्या छायाचित्रात ही प्रक्रिया दाखविण्यात आली आहे.


अशी फाईल डाऊनलोड करताना तीचा डाऊनलोडिंगचा वेग हा बऱ्याच बाबींवर आधारित असतो. नेटवर्क प्रोटोकॉल, इंटरनेटवरची रहदारी, तसेच ती फाईल डाऊनलोड करत असलेले अन्य कॉम्युटर इत्यादि बाबी या प्रकारच्या डाऊनलोडिंगच्या वेगावर परिणाम करतात. जर एखादी फाईल खूपच लोकप्रिय असेल व ती अनेक कॉम्प्युटरवर डाऊनलोड करण्यात येत असेल तर तीचा आपल्या संगणकावर डाऊनलोडिंग वेग निश्चितच कमी होतो. आता टॉरेन्ट वापरत असलेली पीयर-टू-पीयर फाईल शेयरिंग कशा प्रकारे कार्य करते ते पाहूया.

पीयर-टू-पीयर फाईल शेयरिंग मध्ये वेब ब्राऊजर ऐवजी असा सॉफ्टवेयर प्रोग्राम वापरला जातो जो इंटरनेटवर असे कॉम्प्युटर्स शोधून काढतो जिथे आपल्याला हवी असलेली फाईल ठेवलेली आहे. अर्थात, आपल्याला हवी असलेली फाईल इंटरनेटवर एकापेक्षा अधिक संगणकांवर ठेवलेली असते, ती शोधायचे काम हा सॉफ्टवेयर करतो. अश्या अनेक संगणकांना ’पीयर’ म्हटले जाते. हे संगणक सर्व्हर नसून सर्वसाधारण संगणकच असतात. ही प्रक्रिया काहीशी अशा प्रकारे होते-

1. आपण आपल्या संगणकावरून पीयर-टू-पीयर फाईल शेयरिंगचे सॉफ्टवेयर (उदा. ग्नुटेला प्रोग्राम) रन करतो. हे सॉफ्टवेयर इंटरनेटवर आपल्याला हवी असलेली फाईल शोधण्यासाठी विनंती पाठवते.

2. ही फाईल शोधण्यासाठी आपले सॉफ्टवेयर पीयर-टू-पीयर फाईल शेयरिंगचे सॉफ्टवेयर वापरत असलेले अन्य संगणक शोधून काढते.

3. जेव्हा या सॉफ्टवेयरला आपल्याला हवी असलेली फाईल सापडते तेव्हा त्या संगणकावरून आपल्या संगणकावर डाऊनलोडिंग चालू होते. शिवाय या पद्धतीने अन्य संगणकांनाही त्यांना हवी असलेली फाईल आपल्या संगणकावरून डाऊनलोड करता येते!

4. ग्नुटेला प्रोग्रामने होणारी ही प्रक्रिया पुढील छायाचित्रात दाखवली आहे-

इथे दाखविल्याप्रमाणे एकच फाईल इंटरनेटवरच्या विविध संगणकांवर डाऊनलोड झालेली असते. अशा प्रकारे ही फाईल इंटरनेटवरच्या अनेक संगणकांवर साठविलेली असते. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे लाल रंगाच्या मार्गाने ही फाईल इंटरनेटवरच्या एका संगणकावरून दुसऱ्या संगणकांकडे पाठविली गेली आहे. त्या प्रक्रियेतील एका जरी संगणकाने आपले डाऊनलोडिंग बंद केले तर त्याच्या खालील संगणकांना ती फाईल डाऊनलोड करता येणार नाही. अर्थात त्या खालच्या संगणकांना परत वरच्या एखाद्या कार्यान्वित संगणकाला जोडावे लागेल. ज्या संगणकाने आपले डाऊनलोडिंग बंद केले अशा संगणकास ’लीचर’ असे म्हटले जाते.

हेच तत्व वापरून टॉरेन्ट सॉफ्टवेयर कसे कार्य करते ते पाहू...

टॉरेन्टमध्येही पीयर-टू-पीयर फाईल शेयरिंगच वापरले जाते. परंतु, याव्यतिरिक्त टॉरेन्ट हे ’तुम्ही जगा व दुसऱ्यांनाही जगवा’ अथवा ’जशास तसे’ या तत्वानुसारही काम करते. टॉरेन्ट प्रोटोकॉल हा आपल्याला हवी असलेली फाईल शोधण्यासाठी ’ट्रॅकर’ची मदत घेतो. ट्रॅकर्स हे आपली फाईल शोधुन टॉरेन्टला देतात व नंतर ती डाऊनलोड करण्याचे काम टॉरेन्टचे सॉफ्टवेयर करते. अर्थात डाऊनलोडिंग करत असनाच आपल्याला ती फाईल अन्य संगणकांनाही डाऊनलोडिंगसाठी द्यावी लागते. या प्रक्रियेद्वारे ती फाईल डाऊनलोड करण्यासाठी लागणाऱ्या ’पीयर्स’मध्ये आणखी एकाची भर पडते. टॉरेन्टच्या प्रक्रियेत फाईल डाऊनलोड होत असताना ती अपलोडही होत असते! यामुळे फाईलच्या ’लीचिंग’चा प्रश्न सोडविला जातो. जरी एखाद्या ’पीयर’ने अपलोडिंग थांबविली तर त्याची डाऊनलोडिंगही थांबविली जाते. जितके जास्त पीयर्स एखाद्या फाईलला लाभतात तितक्या अधिक वेगाने ती फाईल आपल्या संगणकावर डाऊनलोड होते. अर्थात, याच कारणाने इंटरनेटची बॅंडविड्थ योग्य प्रकारे वापरली जाते. टॉरेन्ट सॉफटवेयर हे विविध संगणकांवरून एकाच फाईलचे विविध भाग शोधुन आपल्या संगणकावर डाऊनलोड करते.

ही प्रक्रिया खाली दाखविली आहे-

1. आपण आपल्याला हवे असलेले वेब पेज उघडतो व डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक करतो.

2. यानंतर बिटटॉरेन्टचे आपल्या संगणकावरील क्लायंट सॉफ्टवेयर ट्रॅकरद्वारे इंटरनेटवरील अन्य संगणक शोधुन काढते ज्यावर आपल्याला हवी असलेली फाईल बिटटॉरेन्टद्वारे डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध आहे. ज्या संगणकांवर ही फाईल पूर्ण डाऊनलोड होऊन अपलोड होत असेल अशा संगणकांना ’सीडर्स’ असे म्हणतात.

3. ट्रॅकर्स द्वारे असेही संगणक शोधले जातात ज्यावर ही फाईल डाऊनलोडही होत आहे व अपलोडही होत आहे. याचा अर्थ या संगणकांवर ती फाईल काही टक्क्यांमध्ये डाऊनलोड झालेली असते. अशा संगणकांना ’स्वॉर्म’ म्हटले जाते. वरील छायाचित्रात हे दाखविण्यात आले आहे.

4. ट्रॅकर्सद्वारे सीडर्स व स्वॉर्मस मधुन आपल्याला हवी असलेली फाईल निरनिराळ्या भागांमधुन डाऊनलोड करण्यात येते. उदा. जसे वरील छायाचित्रात ही फाईल निरनिराळ्या सहा संगणकांवरून ३७ टक्के डाऊनलोड झालेली आहे. ३७% च्या पुढे दाखविण्यात आलेल्या प्रोग्रेस बारमध्ये सहा निळ्या रंगाचे भाग दाखविले आहेत, ते सहा संगणकांवरून घेण्यात आले आहेत. अर्थात सर्वसाधारण डाऊनलोडर्स प्रमाणे पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत हे डाऊनलोडिंग होत नाही. एका वेळी अनेक संगणकांवरून आपल्या फाईलचे भाग घेत असल्याने इथे डाऊनलोडिंग सरळ होत नाही.

5. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे निळ्या रंगाचे बाण हे आपल्या संगणकातील डाउनलोडिंग दर्शवितात तर हिरवे बाण हे आपल्या संगणकातून होत असलेली अपलोडिंग दर्शवितात. पहिला संगणक अर्थात ’स्वॉर्म’ हा ७४ टक्के पूर्ण आहे त्यामुळे त्याला आपल्या संगणकावरून अपलोडिंग होत आहे तर दुसरा संगणक अर्थात सीडर हा १०० टक्के पूर्ण आहे, म्हणून त्यातून आपण केवळ डाऊनलोडिंग करत आहोत.

टॉरेंटद्वारे डाऊनलोडिंग करण्याची पद्धती:

1. सर्वप्रथम download.com या वेबसाईट वरून utorrent किंवा BitTorrent डाऊनलोड करून घेणे. इंस्टॉल करणे.

2. त्याचा हिरव्या रंगाचा आयकॉन उजव्या बाजुला खाली जिथे संगणकाची तारीख दिसते तिथे दिसतो. त्यावर डबल क्लिक केल्यावर तो मोठा होईल.

3. thepiratebay.org, alivetorrents.com, isohunt.com, kickasstorrents.com, mininova.org अशा टॉरेंट उपलब्ध करणाऱ्या वेबसाईटवरून आपल्याला हवे ते torrent (चित्रपट, गाणी वगैरे) शोधुन डाऊनलोड करून घ्यावे. ह्या फाइल्सला .torrent असे एक्सटेन्शन असते. त्याला डबल क्लिक केल्यावर ते आपल्या सॉफ्ट्वेयर (utorrent किंवा BitTorrent) मधुन उघडेल.

4. या नंतर डाऊनलोडिंग आपोआप चालु होईल. न झाल्यास दिसणाऱ्या torrent मध्ये उजवे क्लिक करून start download किंवा force download म्हणावे.

5. डाऊनलोडिंग च्या वेगानुसार तुमचे डाऊनलोड होण्यास वेळ लागेल. संगणक बंद करून चालु केला तरी आधी डाऊनलोड झालेली फ़ाईल आहे तेव्हढी डाऊनलोडेड राहते. अमर्याद इंटरनेटची सुविधा असणाऱ्या संगणकधारकांसाठी टॉरेन्ट हे डाऊनलोडिंगचे सुलभ साधन आहे.

2 comments:

  1. नमस्कार तुषार
    बिट टॉरेन्ट मी खुप वेळा वापरले आहे पण टॉरेन्टम्हणजे काय? ते तुम्ही फारच छान पद्धतिने सांगीतले आहे.
    धन्यवाद
    संजय जोशी

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com