दक्षिण आफ्रिका संघ नेहमीप्रमाणे ’चोकर्स’ ठरले. आधीचे सर्व सामने जिंकायचे पण पुढे जो सामना जिंकणे गरजेचेच आहे, तोच सामना हरायचा असे दक्षिण आफ्रिकेचे सूत्र राहिले आहे. यंदा त्यांनी ते पुन्हा सिद्ध् केले. आफ्रिकेची साडेसाती या वर्षीच्या विश्वचषकातही सुटू शकली नाही. गतविजेता कांगारू संघ यावेळी भारताच्या हस्ते बाहेर पडला. त्याचे केवळ भारतीय क्रीडारसिकांनाच नव्हे तर ऑस्ट्रेलिया सोडून सर्वांच्याच क्रिकेटरसिकांना आनंद वाटला असणार, यात शंका नाही. उपांत्यपूर्व फेरीतील सर्वात चुरशीचा सामना म्हणून भारत वि. ऑस्ट्रेलिया याच सामन्याचे वर्णन करता येईल. न्युझीलंडने धक्कादायकरित्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. साखळी सामन्यात झगडणारा हा संघ दक्षिण आफ्रिकेच्या खराब कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहोचल्याचे दोसून येते.
वेस्ट इंडिज व इंग्लंड संघांनी १० विकेट्सने पराभव पत्करून आपण उपांत्यपूर्व फेरीच्या लायकीचेच नव्हतो, हे सिद्ध करून दाखविले. खरं तर दोन्ही संघ रडत खडतच इथवर पोहोचले होते. कदाचित इथुन पुढे ते आपली जिद्द दाखवू शकतील, अशी आशा होती. परंतू ती श्रीलंका व पाकिस्तानच्या माऱ्यापुढे फोल ठरली. विंडिज व इंग्लिश संघ क्वार्टर फायनलमध्ये खेळत आहेत, असे त्यांच्या खेळातून दिसून आले नाही. त्यांचा १० विकेट्सने झालेला पराभव धक्कादायकच होता. उपखंडात खेळताना ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व इंग्लंड या संघाना आपला खेळ सावरता आला नाही, हेच खरे.
उपांत्यफेरीत एशियन जायंट्स पोहोचल्याने तिन्ही देशांच्या क्रिकेटरसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मागील विश्वचषकातून भारत – पाक पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्याने ती स्पर्धा अत्यंत निरस अशीच ठरली. यंदा मात्र हे संघ उपांत्य फेरीत समोरासमोर ठाकले आहेत. आयसीसीने देखील अशा उत्कंठावर्धक सामन्याची अपेक्षा केली नसणार. विश्वचषकातील सर्वात मोठा महासामना म्हणून या सामन्याचे वर्णन मिडीयाने चालू केले आहे. भारत – पाक अंतिम सामन्यात झुंजण्याची प्रतिक्षा होती, पण ते उपांत्य फेरीत समोरासमोर ठाकले आहेत. त्यामुळे क्रिकेटरसिकांना विश्वचषक स्पर्धा पाहिल्याचे समाधान निश्चितच लाभले असणार. या दोघांमध्ये जो सामना जिंकेल, तोच विश्वचषक जिंकेल, असा क्रीडापंडितांचा अंदाज आहे. कदाचित, ही भविष्यवाणी खरीही ठरू शकते. पण, त्याकरिता ३० मार्चची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
श्रीलंका अपेक्षेप्रमाणे उपांत्यफेरीत पोहोचली आहे. यंदा त्यांनाही संभाव्य विजेत्यांच्या यादीत वरचा क्रमांक मिळाला आहे. तुलनेने लंकेला उपांत्य फेरीत न्युझीलंडचे सोपे आव्हान असणार आहे. तरीही कीवीजचा आत्मविश्वास हा आफ्रिकेवरच्या विजयाने उंचावला असणार, यात शंका नाही. मागील वेळेत उपविजेता असणाऱ्या लंकेला यंदा विजेतेपद मिळविल्याची चांगली संधी आहे. भारत, पाक व लंका यंदा प्रबळ दावेदार असले तरी न्युझीलंडला उपांत्य फेरीत खेळण्याचा सर्वात जास्त वेळा अर्थात चारदा अनुभव आहे. यावेळी ते पाचव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. मागील चारही वेळा कीवींना पराभव पत्करावा लागला असला तरी यंदा ते अंतिम फेरीत पोहोचण्याचा निकराने प्रयत्न करतील, यात शंका नाही.
बघुया, घोडामैदान जवळच आहे...!!!
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com