Sunday, August 7, 2011

डिव्होराक की क्वर्टी?


संगणकासाठी वापरत असलेल्या कीबोर्डवर इंग्लिश keys ह्या एबीसीडी ह्या क्रमाने नसतात. त्यांच्यासाठी एका वेगळ्या क्रमाची निर्मिती केली गेली आहे. त्याला QWERTY अर्थात क्वर्टी असे म्हणतात. कारण, ह्या कीबोर्डवरच्या कीज ह्या QWERTY ह्या क्रमाने सुरू होतात! अमेरिकन नॅशनल स्टॅण्डर्ड इन्स्टीट्युटने अर्थात आन्सीने प्रमाणित केल्याप्रमाणे असा कीबोर्ड संगणकासाठी वापरण्यात येतो. कीबोर्ड वापरणे सोपे जावे याकरिता अशा किबोर्ड लेआऊटची निर्मिती केली गेली आहे. आजकाल मोबाईलमध्येही ह्याच प्रकारचा इंग्लिश कीबोर्ड वापरण्यात येतो. परंतु, क्वर्टी कीबोर्डला पर्याय म्हणून डिव्होराक नावाचा कीबोर्डही संगणक विश्वात अस्तित्वात आहे, याची माहिती बहुधा कमी जणांना असावी. इंटरनेटवर सर्च केल्यास या Dvorak कीबोर्डबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. शिवाय प्रत्येक ठिकाणी असेही नमूद केले आहे की, क्वर्टीपेक्षा डिव्होराक कीबोर्ड हा अधिक फायदेशीर व वेगाने टाईप करणारा आहे. एखाद्या कीबोर्ड लेआऊटवर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधन झाल्याचे डिव्होराकने दिसून येते.
वॉशिंग्टन विद्यापीठात शिक्षण मानसतत्ज्ञ असणाऱ्या ऑगस्ट डिव्होराक यांनी या प्रकारच्या कीबोर्ड रचनेची निर्मिती केली होती. गेट्रुएड फोर्ड यांच्या मास्टर डिग्रीच्या शोधनिबंधाचे टायपिंग करत असताना त्यांना मोठया प्रमाणात टायपिंगच्या चुकांना सामोरे जावे लागले होते. ते लक्षात आल्यावर डिव्होराक यांना वेगाने टाईप करणाऱ्या व स्पेलिंग चुकांना कमी करणाऱ्या आधुनिक कीबोर्डची रचना सुचली. या काळात क्वर्टी प्रकारचा कीबोर्डच सर्व ठिकाणी वापरण्यात येत होता. डिव्होराक यांच्या संशोधनात त्यांचा मेहुणा विल्यम डिलीही सामील झाला. तो दक्षिण टेक्सास टीचर्स कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणुन कार्य करत होता. डिव्होराक व डिली यांनी नव्या पद्धतीचा कीबोर्ड तयार करण्यासाठी वीस वर्षे बरीच मेहनत घेतली. मानसशास्त्राचा तसेच इंग्लिश भाषेतील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा अभ्यास करुन त्यांनी डिव्होराक कीबोर्डची निर्मिती सन १९३२ मध्ये केली.
सन १९३३ पासुन डिव्होराक यांनी त्यांच्या नव्या कीबोर्डचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. या काळात टाईपरायटर कंपन्या त्यांचा उत्पादनाचा खप वाढावा म्हणुन टायपिंगच्या स्पर्धा घेत असत. सन १९३४ ते १९४१ अशा सलग आठ वर्षी डिव्होराक कीबोर्डच्या टायपिस्टने या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला! सन १९३५ मध्ये तब्बल नऊ डिव्होराक टायपिस्टने वीस पारितोषिके प्राप्त केली होती. सन १९३७ मध्येही हीच परिस्थिती असताना स्पर्धा समितीने डिव्होराक टायपिस्टला स्पर्धेतून बादच करण्याचा हुकुम काढला होता. कारण, त्यांच्या वेगाने टाईप करण्याच्या पद्धतीने क्वर्टी टायपिस्टला आवाजाचा त्रास सहन करायला लागायचा! १९३० च्या दशकात टाकोमा येथील वॉशिंग्टन शाळेने विद्यार्थ्यांसाठी डिव्होराक कीबोर्ड शिकण्यासाठी शिबीराचे आयोजन केले होते. त्यात त्यांना असे ध्यानात आले की क्वर्टी कीबोर्ड शिकण्यापेक्षा डिव्होराक शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ एक-तृतीयांशच वेळ लागत आहे!
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार बार्बरा ब्लॅकबर्न ही जगातील सर्वात वेगाने इंग्लिश टाईप करणारी टायपिस्ट आहे. तीने डिव्होराक कीबोर्ड वापरुन पन्नास मिनिटे सलग १५० शब्द प्रति मिनिट वेगाने टायपिंग केली होती! कमी कालावधीसाठी तीचा वेग सरासरी १७० पर्यंत होता तर एका मिनिटाला तो २१२ वर पोहोचला होता, हे विशेष! हायस्कुलमध्ये असताना बार्बरा क्वर्टी कीबोर्ड वापरात अयशस्वी झाली होती. परंतु, सन १९३८ मध्ये तीने डिव्होराक वापरण्यात मास्टरी मिळविली.
क्वर्टी कीबोर्डमध्ये असणारे कच्चे दुवे डिव्होराकने शोधुन काढले व त्यावर मात मिळविली. आपण वापरत असलेल्या क्वर्टीमध्ये खालील चुका दिसुन येतात.
१.      अधिक वापरत येणाऱ्या कीजला टाईप करण्यासाठी बोटांची अधिक हालचाल लागते.
२.      अधिक वापरत येणाऱ्या कीज अनेकदा एकाच बोटाने टाईप कराव्या लागतात.
३.  अधिक वापरत येणाऱ्या कीज केवळ एकाच हाताने टाईप कराव्या लागता त्यामुळे दुसऱ्या हाताला फारसे कष्ट पडत नाहीत.
४.      बहुतांश टायपिंग ही डाव्या हाताने करावी लागते, जो जगातील नव्वद टक्के जणांचा कमकुवत हात आहे.
५.      अधिक वापरत येणाऱ्या कीज ह्या जवळ-जवळच्या बोटांनी टाईप कराव्या लागतात.
६.      कोबोर्डच्या (तिसऱ्या) खालच्या ओळीत तीस टक्के टायपिंग होते. त्यामुळे वेग मंदावतो.
७.  ५२ टक्के टायपिंग ही वरच्या ओळीत होते. त्यामुळे सतत तीनही ओळीत बोटे फिरवावी लागतात.
डिव्होराकने या सर्व बाबींचा सखोल विचार करुन त्याच्या नव्या कीबोर्डमध्ये काही महत्वपूर्ण गोष्टींचा समावेश केला.
१.      अक्षरे ही दोन्ही हातांनी सतत एकाच हाताने टाईप करता येऊ नयेत.
२.      वेग वाढविण्याकरिता जास्तीत जास्त अक्षरे ही मधल्या रांगेत ठेवण्यात यावीत.
३.      ज्या अक्षरांचा वापर सर्वात कमी होतो, ती अक्षरे ही सर्वात खालच्या रांगेत असावीत.
४.   उजव्या हाताचा वापर अधिक करण्यात यावा कारण याच हाताचा वापर जगातील बहुसंख्य लोक करतात.

अशा अनेक बाबींचा सखोल विचार करुन डिव्होराक कीबोर्डची निर्मिती झाली. सन १९३२ मध्ये ह्या कीबोर्डची रचना झाली व १९३६ मध्ये त्याला अमेरिकेचे पेटंट मिळाले. परंतु, आन्सीची मान्यता मिळाण्यासाठी १९८२ हे साल उजाडावे लागले. १९८४ मध्ये ह्या कीबोर्डचे एक लाख वापरकर्ते होते!
कीबोर्डच्या तीन रांगांनुसार डिव्होराक व क्वर्टीमध्ये होणारी टायपिंग:
पहिली रांग: डिव्होराक- २२ टक्के क्वर्टी- ५२ टक्के.
दुसरी रांग: डिव्होराक- ७० टक्के क्वर्टी- ३२ टक्के.
तिसरी रांग: डिव्होराक- ८ टक्के क्वर्टी- १६ टक्के.
मधल्या रांगेत डिव्होराकचे सत्तर टक्के “की-स्ट्रोक” होत असल्याने बोटे जास्त फिरवण्याची गरज पडत नाही. ज्या कारणाने असा कीबोर्ड वापरणाऱ्यांत RSI अर्थात Repetitive Stress Injury होण्याचे प्रमाणही अत्यंत कमी प्रमाणात आहे.
या कीबोर्डचा लेआऊट पाहिल्यास असे ध्यानात येईल की, त्यावरील अंकही हे १,२,३.. अश्या क्रमात नसुन ७ ५ ३ १ ९ ० २ ४ ६ ८ अशा क्रमात आहेत. आधी विषम व नंतर सम संख्या अशा क्रमाने ते शास्त्रोक्त पद्धतीने जुळविण्यात आले आहेत! आजच्या सर्वच प्रकारच्या संगणक प्रणालींमध्ये डिव्होराक पद्धतीचा कीबोर्ड लेआऊट वापरण्याची सोय करून देण्यात आली आहे. अपल संगणकांत डिव्होराक कीबोर्डच प्रामुख्याने वापरला जातो. विशेष म्हणजे या कीबोर्डचे उजव्या हाताचे व डाव्या हाताचे लेआऊटही उपलब्ध आहेत. एकाच हाताने टाईप करू शकणाऱ्यांसाठी ते तयार केले गेल आहेत. अन्य भाषांमधील डिव्होराक कीबोर्ड तयार करण्याचे काम सध्या अनेक संगणक संशोधक करीत आहेत.
डिव्होराक कीबोर्ड वापरणाऱ्या काही नामांकित व्यक्ती:
-    बार्बरा ब्लॅकबर्न: विश्वविक्रमी टाईपिस्ट.
-    ब्राम कोहेन: बिटटॉरेंट चे निर्माते.
-    होली लिस्ले: अमेरिकन लेखक.
-    मॅट मुलेन्वेग: वर्डप्रेसचे मुख्य निर्माते.
-    नॅथन मायर्होल्ड: मायक्रोसॉफ्टचे मुख्य तंत्र अधिकारी.
-    स्टीव्ह व्होझ्नियाक: अपलचे सह-संस्थापक.
-    एलिझर युड्कोवस्की: कृत्रिम बुद्धिमत्तेचे एक संशोधक.
डिव्होराक कीबोर्डवर आधारित अधिक माहिती विकिपीडियाच्या मुक्त ज्ञानकोशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचे एकंदरित फायदे पाहता हा कीबोर्ड लेआऊट वापरण्यास काहीच हरकत नसावी!!!

4 comments:

 1. Nice article. We must consider of using this Dvorak keyboard.

  ReplyDelete
 2. we were unaware of this type of keyboard. thanx a lot for this useful information.

  ReplyDelete
 3. thanks alot for sharing this info with us......!!!!

  ReplyDelete
 4. It's very informative information . May be some people don't have knowledge about it

  ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com